शाब्दिक आणि व्याकरणाचे प्रश्न

जिथे क्रियापादे कर्त्याच्या लिंगानुसार बदलतात तिथे दोन वेगवेगळ्या लिंगातील कर्ते एका उभयान्वयी अव्ययाने जोडले तर क्रियापद कोणते वापरावे हा प्रश्न मला नेहमी पडतो.
उदा॰ नैतिकता ('ती' नैतिकता) आणि सदाचार ('तो' सदाचार) हे दोन्ही जोडले तर क्रियापद कोणते वापरावे? शेवटी येणार्‍या शब्दाशी सुसंगत वापरावे का? जसे "नैतिकता आणि सदाचार स्वाभाविक असावा" की अश्या अनेक कर्त्यांचा एक सामाइक कर्ता करून मग योग्य ते क्रियापद वापरावे? जसे "नैतिकता आणि सदाचार या गोष्टी स्वाभाविक असाव्यात"

(वि॰सू॰ - माझे व्याकरणविषयक ज्ञान रावसाहेबांच्या (पुलंचे रावसाहेब) संगीताच्या ज्ञानासारखेच आहे (रागाचा काष्टा, रागिणीचा पदर वगैरे). त्यामुळे शब्दयोजनेत काही चूक झाली असेल तरी भावार्थ समजून घ्यावा)

व्याकरणविषयक काही नेहमी पडणारे आणि अडणारे प्रश्न असतील तर तेही या चर्चेच्या निमित्ताने पुढे यावेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

धातू आणि क्रियापद

धातू आणि क्रियापद यातील नाते कुणीतरी कृपया स्पष्ट करावे ही विनंती.
-- लिखाळ.

धन्यवाद

टग्या,
माहितीसाठी धन्यवाद.
--लिखाळ.

धातू साधित

छान माहिती! धातू साधित क्रियापद असे देखिल काहितरी शिकल्याचे आठवते..त्याचा अर्थ काय?
-वरूण

अवांतर

क्रियापदाच्या मूळ रूपालाच कृदंत असे म्हणतात का?

'बोलणे' आणि 'खाणे' ही नाम

टग्यांशी बऱ्याच अंशी सहमत आहे. टग्या म्हणतात ते इंग्रजीतले 'रूट'. मला ह्या बाबतीत बराचसा गोंधळ होता म्हणून एका जाणकाराला विचारले . त्याच्यानुसार करणे, बोलणे ही नामेही आहेत. त्याचे 'बोलणे' झाले. माझे 'खाणे' झाले. ह्या वाक्यांत 'बोलणे' आणि 'खाणे' ही नामे आहेत.

'ऊन', 'आयला', 'ल्यावर' आदी प्रत्यय हे धातुसाधित बनवण्यासाठी वापरतात.

नव्या व्याकरणानुसार 'बोल', 'कर', 'सांग' हे धातू आहेत.
'बोलतो', 'बोलेल', 'बोलला' ही काळाचे प्रत्यय लागल्यावर बनलेली क्रियापदे आहेत. रूपांतून प्रत्यय काढल्यावर जो शब्द उरतो तो धातू.

चित्तरंजन

'बोलणे', 'खाणे' ही कृदन्त नामे.

श्री.चित्तरंजन यांस सप्रेम नमस्कार.
तुमच्या प्रतिसादातील सर्व विधाने व्याकरण दृष्ट्या सत्य आहेत. 'बोलणे' ,'खाणे ' ही नामेही आहेत. धातूंपासून निर्माण केलेल्या अशा नामांना कृदन्त नामे म्हणतात. धातू पासून क्रियापदरूपा व्यतिरिक्त जो शब्द बनतो तो कृदन्तच असतो.
काही उदाहरणे : (कृदन्ते अधोरेखित)
* सजल श्याम घन गर्जत आले बरसत आज तुषार |
* देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे।
*झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा।
* मना बोलणे नीच सोशीत जावे।
* येरे घना येरे घना न्हाऊं घाल माझ्या मना | (इथे ' न्हाऊं ' हे कृदंत नाम. मात्र " चला आज आपण गार पाण्याने न्हाऊं. " यात 'न्हाऊं' हे क्रियापद)

(तुम्ही आणखी उदाहरणे सुचवा म्हणजे योगेश यांच्या शंकेचेही (अवांतर) समाधान हो ऊं शकेल )

सर्दी खोकला

या प्रतिसादात

... सर्दी खोकला होऊ शकतो

असे वाक्य आले आहे. आपल्या नेहमी बोलण्यात येणारे हे वाक्य आहे.

वरील चर्चेत लिहिल्याप्रमाणे प्रश्न इथे पुन्हा पडला. "सर्दी होऊ शकते" आणि "खोकला होऊ शकतो" पण ते दोन्ही जोडल्यावर कोणते क्रियापद वापरायचे? "सर्दी, खोकला होऊ शकतो" आणि "खोकला, सर्दी होऊ शकते" असे वापरायचे (म्हणजे जोडलेल्या गोष्टीं*मधील शेवटच्या गोष्टीला सुसंगत क्रियापद) की सरळ "सर्दी खोकला असे रोग होऊ शकतात" (म्हणजे दोन गोष्टी (सर्दी आणि खोकला) यांच्यातून एक सामाईक गोष्ट बनवून (रोग) त्याला सुसंगत क्रियापद) वापरायचे?
यातले कुठले पर्याय बरोबर वाटतात?

* याला नेमके शास्त्रीय नाव काय ते माहीत नसल्याने 'गोष्टी' असे सामान्यीकरण करावे लागले.

हायफ़नेशेन करावे

अशावेळी इंग्रजीप्रमाणे हायफ़नेशन करण्याचा प्रघातही मराठीत आहे. आणखी उदाहरणे: माझे-तुझे, चालता-बोलता, धावत-पळत इत्यादी. शेवटी वापरात सातत्य असावे, हे सगळ्यात महत्त्वाचे.

चित्तरंजन

माझ्या मते

म्हणजे जोडलेल्या गोष्टीं*मधील शेवटच्या गोष्टीला सुसंगत क्रियापद
होय. अशा वेळेला दोन पैकी शेवटी असलेल्या शब्दाच्या लिंगा प्रमाणेच क्रियापदाचे रुप होते.

एक सामाईक गोष्ट बनवून (रोग) त्याला सुसंगत क्रियापद
बरोबर. अनेकदा आपण म्हणता तसे सामाईक रुप जे असेल तेच गृहित धरुन क्रियापद बनते.
उदा. मी त्यांना चहा आणि केळे दिले. यात 'तो' चहा आणि 'ते' केळे आहे पण केळे शेवटी आल्याने देणे चे रुप दिले असे होईल.
तर वर आपण म्हणता त्याप्रमाणे चहा आणि केळे यांना 'असे पदार्थ' हे गृहित धरुन दिले असे देणेचे रुप होते काही वेळा केले जाते. चित्त सुचवतात त्याप्रमाणे लिहिताना हायफन वापरला तर ते शब्द एकत्र करता येतात हे सुद्धा पटले.
अशा दोनही तर्‍हेने वाक्ये बनवली जातात. अर्थात हे दोन्ही पर्याय बरोबर हे माझे मत :) !! तज्ञ काय म्हणतात ते पाहूच.
-- लिखाळ.

योग्य निष्कर्ष

श्री. लिखाळ यांनी खालील निष्कर्ष निरीक्षणांच्या आधारे काढला असावा.

" अशा वेळेला दोन पैकी शेवटी असलेल्या शब्दाच्या लिंगा प्रमाणेच क्रियापदाचे रुप होते."

हा निष्कर्ष योग्यच आहे. पण वाक्य कर्मणी प्रयोगी असेल तरच तो लागू पडतो. शशांक यांचे वाक्य विद्यर्थी आहे .म्हणजे कर्मणी प्रयोगी आहे. म्हणजे शशांकांच्या शंकेचे निरसन लिखाळांनी केलेले आहे.पुष्ट्यर्थ पुढील वाक्ये पहा:

(माणसांनी) मौन,सदाचार आणि नैतिकता पाळावी.
" मौन, नैतिकता आणि सदाचार पाळावा.
" नैतिकता, सदाचार आणि मौन पाळावे.

चित्त सुचवतात त्याप्रमाणे लिहिताना हायफन वापरला तर ते शब्द एकत्र करता येतात हे सुद्धा पटले.
हे मात्र मान्य नाही. कर्मपदे दोनच असतील असे नाही. कितीही असोत . वरील नियम लागू पडतो. मात्र सकर्मक कर्तरी प्रयोग असेल तर क्रियापद रूप या नियमा प्रमाणे होत् नाही. म्हणून अटीचा निर्देश करणे आवश्यक ठरते.
.............यनावाला

धन्यवाद/उत्तम विवेचन

यनावाला, (तुम्हाला कोणत्या नावाने संबोधावे?)
तुम्ही केलेल्या उत्तम विवेचनामुळे बरेच दिवस भेडसावणार्‍या प्रश्नाचे उत्तर मिळाले. धन्यवाद!

व्याकरणाचे प्रश्न

"ज्या वाक्यात अनेक कर्तृपदे अथवा अनेक कर्मपदे येतात त्या वाक्यात क्रियापदाचे योग्य रूप कोणते ?" असा प्रश्न श्री.शशांक यांनी उपस्थित केला आहे. त्या विषयीं थोडे विवेचन
* या करिता कर्तरी, कर्मणी आणि भावे या तिन्ही प्रयोगांचा विचार करावा लागेल.
* क्रियापद सकर्मक की अकर्मक हेही लक्षात घ्यावे लागेल.
*कर्त्यांना अथवा कर्मांना जोडणारे उभयान्वयी अव्यय समुच्चय दर्शक( आणि, व) की विकल्प दर्शक ((किंवा,अथवा)
हे ही पहावे लागेल.
*** पुढील विवेचनात "उभयान्वयी अव्यय समुच्चय दर्शक मानले आहे.विकल्प दर्शक असेल तर क्रिया. रूप ठरविणे
सोपे असते.
(१) भावे प्रयोग :- क्रिया. नेहमी तृ.पु.ए.व .असते.
उदा. रामाने रावणाला मारले.
राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी कुंभकर्ण,इंद्रजित आणि अनेक राक्षसांना ठार मारले.
बांगला देशाने भारताला आणि द. आफ्रिकेला हरविले.
या प्रमाणे भावे प्रयोगीं क्रियापदाची कोणतीही समस्या नाही.

(२)कर्मणी प्रयोग :- क्रिया.कर्माप्रमाणे बदलते.....राजूने निबंध/कविता/गाणे लिहिला/ली/ले.
** कर्मणी प्रयोगात अनेक कर्मपदे असतील तर क्रियापदला ज्या कर्माचे साहचर्य असेल तदनुसार ते क्रियापद रूप घेते.
उदा.:-- राजूने एक निबंध,तीन कविता आणि दोन पदें वाचली.
राजूने कविता,पदे आणि निबंध वाचला.
मी आणि पत्‍नीने पाहुण्यांना दूध, पुरणपोळी आणि पेढा दिला.
( मी आणि पत्‍नीने पाहुण्यांना ) दूध, पेढा आणि पु.पो. दिली.
( " ) पे. ,पु.पो. आणि दूध दिले.
* मी आणि पत्‍नी ही दोन कर्तृपदे आहेत .त्यांचा क्रिया.वर प्रभाव नाही. कारण कर्म. प्रयोग.
या प्रमाणे कर्म. प्रयोगात क्रिया.रूपा विषयीचा नियम स्पष्ट आहे.इथे शंका असूनये.

(कर्तरी प्रयोगविषयी पुढील प्रतिक्रियेत)

शब्दही!

आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे, यापैकी एक शब्दही समजला नाही! खरंच व्याकरण हा प्रकार इतका कठीण आणि किचकट का असतो हो?

आमच्या गाण्यातदेखील ढोबळ मानाने व्याकरण पाळलं तर ठीक आहे, अन्यथा जे व्याकरण गाण्याचे नियम ठरवतं, तेच व्याकरण गाण्याची साफ वाट लावतं. गाणं अत्यंत नीरस बनवतं! गाण्याचं व्याकरण न शिकता, त्याचा भाव समजून घेऊन गाणं शिकणारे कितीतरी अधिक चांगले गातात असा आमचा अनुभव आहे. भाषेबाबतीतही तेच. व्याकरणाचे नियम पाळून लिहिलेला एखादा निबंध आणि ढोबळ मानाने व्याकरंणाचे नियम पाळून बोललेला एखादा संवाद, यात संवाद नेहमीच अधिक आपलासा का वाटतो?

असो, व्याकरणाचे महत्व नाकारून नक्कीच चालणार नाही हे आम्हीही जाणतो. पण ते समजायला इतकं कठीण का?, हा एक प्रश्नच आहे.

तात्या.

किचकट व्याकरण

श्री. विसोबा खेचर तथा तात्यासाहेब यांसी,
सप्रेम नमस्कार.
व्याकरणाविषयी तुम्ही जे मत मांडले आहे ते मला पूर्णतया मान्य आहे. खरे तर तो विषय इतका किचकट नाही. लिहिताना मी फार बोजड भाषा वापरली. तसेच कांही व्याकरणीय संकल्पनांचे पूर्वज्ञान गृहीत धरले. त्यामुळे साहजिकच वाचन कंटाळवाणे झाले. अधिक सोप्या आणि आकर्षक पद्धतीने लिहिणे मला जमले नाही हे खरे.
'भूतकाळ' शब्द टंकलिखित करताना माझ्या हातून जो मुद्रणदोष घडला तो निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. दोष लहान असला तरी अक्षम्यच. इतःपर अधिक दक्षता घेण्‍याविषयी प्रयत्‍नशील राहीन.
कळावे.....यनावाला

वा वा

यनावाला,
कर्मणी प्रयोगात अनेक कर्मपदे असतील तर क्रियापदला ज्या कर्माचे साहचर्य असेल तदनुसार ते क्रियापद रूप घेते.

आपण या एका वाक्याने चर्चा प्रवर्तकाची मुख्य शंका दुर केली आहेत असे वाटते.

तात्या,
आपण बोली भाषा शिकतो ती व्याकरणाचे नियम पाळतच शिकतो. लहानपणापसूनच पालक, शिक्षक आणि भोवतालचे लोक आपल्याला वेळोवेळी आपले बोलणे बोलणे सुधरुन ते व्याकरणशुद्ध करुन देत असतात. त्यामुळे आपोआपच आपण व्याकरणशुद्ध भाषा वपरु लागतो. मग एखादा लेख हा नियम माहित नसताना पण व्याकरशुद्ध भाषेतच लिहिला असेल तर लेखाच्या गोडीमध्ये फरक कसा पडावा ! व्याकरणदुष्ट लेखन मात्र गोडी कमी करते हे आपण सर्वच मानतो.
-- लिखाळ.

सुरेख

हा प्रतिसाद वाचल्यावर उरल्यासुरल्या शंकाचे समाधान झाले. तुमच्या कर्तरी प्रयोगाविषयीच्या माहितीची वाट पाहत आहे.

कर्तरीप्रयोगाविषयी

श्री. शशांक यांस,
दुसर्‍या काही विषयांत गुंतून राहिल्याने मी इकडे फ़िरकलोच नाही. त्यामुळे लिहायचे राहिले.तरी क्षमस्व.
(१) अकर्मक कर्तरी प्रयोग
नियम (१) अ.कर्तरी प्रयोगात अनेक कर्तृपदे असून त्यात एक प्र्.पु. असेल तर क्रियापद प्र.पु.अ.व. असते
****मी पळतो/पळालो/ पळेन
मी,ससा आणि कासव पळतों / पळालों / पळूं
इथे कर्त्यांचा क्रम कसाही असला तरी क्रिया.प्र्.पु.अ.व.च रहाते.
******मी,तूं आणि ससा पळतों /पळालों /पळूं.
नियम (२) अ.कर्तरी प्रयोगात अनेक कर्ते ,त्यांतील एक द्वि.पु.(मात्र प्र्.पु.कर्ता नाही) तर तर क्रिया.द्वि.पु अ.व.असते.
*****तू,कोंबडा आणि कुत्रा पहाटे उठतां /उठलां /उठाल.
(यांत आणखी मी असा कर्ता आणा क्रिया.लगेच बदलते)
सर्वच कर्ते तृ.पु.,भिन्नलिंगी,भिन्न वचनी असतील तर? यासाठी यतुम्हीच नियम शोधून काढा.
सकर्मक कर्तरी पुढच्या वेळी.
..........यनावाला

धन्यवाद

धन्यवाद! तुमच्या प्रतिसादांतून बरीच माहिती मिळाली. ही सर्व माहिती एकत्र करता येईल काय? जेणेकरून सर्वांना याचा उपयोग होऊ शकेल.

उदाहरण

कर्तरी प्रयोगः कर्ता हा 'नायक'.
'मी खून केला.'
कर्मणि प्रयोगः कर्म हा नायक.
'माझ्याकडून खून झाला.'
भावे प्रयोगः यात स्पष्ट दिसणारा नायक नाही.
'त्या जागी एक खून झाला.'
(भावे प्रयोगाच्या उदाहरणाबद्दल जरा शंका आहे. जाणकारांनी दुरुस्ती करावी.)

उदाहरण

अनु यांसी ;
सप्रेम नमस्कार
आरंभीच सांगतो की या प्रतिक्रियेत थोडे गमतीने लिहिले आहे, तरी राग नसावा.
"मी खून केला ." हे कर्तरी प्रयोगाचे उदा. म्हणून तुम्ही दिले आहे. ते
"मी व्याकरणाचा खून केला." असे असते तर यथायोग्य ठरले असते!!
अहो हा कर्मणी प्रयोग आहे. इथे 'केला' हे क्रियापद,' मी ' हा कर्ता, 'खून' हे कर्म.(नायक ही संज्ञा व्याकरणीय नाही )
कर्तरी प्रयोगात क्रि. कर्त्या प्रमाणे बदलते.वरील वाक्याचा कर्ता बदलून पहा. (आम्ही,तिने,चोराने, तू इ.) क्रि. जसेच्या तसे रहाते.(केलास असे रूप काही जण वापरतात.पण ते नियम बाह्य आहे.) म्हणजे हा कर्तरी प्र. नाही.
आता कर्म बदलून पहा. "मी हत्या केली."क्रि.बदलले. म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे.
कर्मणी प्रयोगात कर्माची विभक्ती प्रथमा असते तर कर्ता तृतीयेत असतो. "मी खून केला." या वाक्यात 'मी' हे तृतीयेचे रूप आहे. मराठीत 'मी'' सर्वनामाची प्र.आणि तृ. ची रूपे सारखी च असतात.(तसेच 'तू'ची सुद्धा) .जुन्या मराठीत
'मियां' , त्वां/तुवां (ते शारदा विश्वमोहिनी नमिली मियां|...मना त्वांचि रे पूर्व संचीत केले|) अशी रूपे होती. संस्कृतात 'मया' त्वया, मालवणीत 'मियां, तुयां ' हिंदीत ' मैने, तूने 'अशी तृतीयेची रूपे आहेत.मराठीत मात्र मी, तू.
दुसरे असे की मराठी भाषेच्या प्रकृती अनुसार कर्तरी प्रयोग भूत काळात होत नाही. "त्याने पत्र लिहिले." हा कर्मणी प्रयोग आहे.त्याचा कर्तरी करून पहा.
असो............यनावाला

बरं

अरे बापरे व्याकरणाचे आमचे फंडे पारच गंडलेले दिसतात.. मग या नियमाप्रमाणे मी जे उदाहरण कर्मणि चे म्हणून् दिले आहे ते कर्तरी चे आहे का? आणि भावेची उदा. पण चुकले आहे का? (तो प्रतिसादच खोडून टाकावा का?)
आपल्या उदाहरणाप्रमाणे :
१. तो बाजारात जातो: कर्तरी प्रयोग.
२. त्याने केळे खाल्ले : कर्मणिप्रयोग
भावेबद्दल मी आता न बोलणेच उत्तम.

कर्तरी,कर्मणी, भावे

अनु यांस

१. तो बाजारात जातो: कर्तरी प्रयोग.
२. त्याने केळे खाल्ले : कर्मणिप्रयोग . आता ही दोन्ही उदाहरणे अगदी बरोबर आहेत. क्र.(२) मधे केळे हे कर्म. त्याचे लिंग/वचन बदलून पहा. कर्म बदलते. म्हणून कर्मणी. क्र्.(१) अकर्मक कर्तरी. ' तो 'कर्ता. त्याचे लिंग/वचन बदलल्यास क्रि. बदलते. कर्म नाहीच .(क्रियापद अकर्मक)
आता " मीनाने मैत्रिणीला बोलावले." हे वाक्य घ्या. 'बोलावले'क्रियापद. कोणी? मीनाने (कर्ता) 'मैत्रिण 'कर्म"
कर्त्याचे लिंग/वचन बदलून पहा. क्रियापद बदलत नाही. म्हणून कर्तरी नाही. कर्म बदलून पहा.क्रियापद ढम्म. जसेच्या तसे. यावरून कर्मणी प्र. नाही. म्हणून भावे. भावे प्रयोगात क्रियापद नपु. ए.व.च असते.
.........यनावाला

सुंदर स्पष्टीकरण

आता (अश्विनी/अनंत)भावे प्रयोग म्हणजे नक्की काय ते नीट कळले.

व्याकरणाचे प्रश्नः सुधारणा

मी लिहिलेल्या प्रतिसादात '

" मराठी भाषेच्या प्रकृती अनुसार कर्तरी प्रयोग भूत काळात होत नाही."

हे विधान
" मराठी भाषेच्या प्रकृती अनुसार सकर्मक कर्तरी प्रयोग भूत काळात होत नाही."

असे हवे. क्षम्यताम् .

भूत काळ?

भूत काळ??

हे कुठलं भूत बुवा? ;)

" मराठी भाषेच्या प्रकृती अनुसार सकर्मक कर्तरी प्रयोग भूत काळात होत नाही."

आमच्या मते 'भूत' 'काळ' हे दोन वेगवेगळे शब्द नसून 'भूतकाळ' हा एकच शब्द आहे. निदान आम्ही तरी लहानपणापासून 'भूतकाळ' हा एकच शब्द वाचत आलेलो आहोत.

असो, आम्ही जरी व्याकरणाबद्दल मोठमोठ्या गप्पा मारत नसलो तरी शब्दांची आम्हाला थोडीफार जाण व समज आहे! ;)

आपला,
तात्या वाळिंबे!

नियमबाह्य नाही, पण मराठीची खुबी

केलास असे रूप काही जण वापरतात.पण ते नियम बाह्य आहे.
कर्मणि प्रयोगात द्वितीय पुरुषी कर्ता असल्यास क्रियापदाला कर्त्याप्रमाणे अतिरिक्त विकरण मराठीत विकल्पाने लागते. (अरबी भाषेतही असा काहीतरी दोन वेगवेगळ्या कारकांकडून क्रियापदाला प्रत्ययवजा विकरणे जोडला जाण्याचा प्रकार आहे, असे मला वाटते. संस्कृतात, हिंदीत, हा प्रकार दिसत नाही - गुजरातीबद्दल कोणाला माहिती आहे काय?)
अशा प्रयोगाला कर्तरि-कर्मणि संकीर्ण प्रयोग असे म्हटले जाते. तो नियमबाह्य नाही.
बाकी यनावालांचे अभ्यासपूर्ण विवेचन ज्ञानवर्धक आहे. धन्यवाद.
धनंजय

हा लेख

सर्किट महोदय,
वर नमूद केलेला लेख वाचयची इच्छा आहे. तो लेख आपण उपक्रमावर उपलब्ध करुन दिलारत तर बरे होईल.
--लिखाळ.

कविता महाजन यांना एक जाहीर पत्र

कविता महाजन यांना,
सादर नमस्कार
आपला ओघवत्या शैलीतील लोकप्रभेतील "ण आणि न ची भानगड" हा लेख वाचला. कसं बोलतो यापेक्षा काय बोलतो, हे महत्त्वाचं. ते लोकांना भिडतंय का, पटतंय का, भावतंय का... हे पाहावं. असं म्हणून आपण आपल्यापुरत्या मोकळ्या झाल्या आहात असं लिहिलंय, पण मी इतक्या सहजासहजी मोकळा होऊ शकत नाही.

लहान असताना मी जेव्हा गावी जात असे तेव्हा तेथील अशिक्षित बायका "मी जातो, मी आलो" असं पुल्लिंगी बोलताना पाहून खूप आश्चर्य वाटत असे. शाळेत कधीच न गेल्यामुळे घरात बोलणारे पुरूष हेच त्यांच्या भाषेचे शिक्षक असल्यामुळे असे होत असे. "आमच्यात असंच बोलतात" असं समर्थन करून पानी, पानि पाणी व पाणि हे चारही उच्चार लेखनासकट स्वीकारणे मराठीच नव्हे तर कोणत्याचा भाषेला शक्य होईल असे वाटत नाही.
'लोकशाही आहे' असं म्हणत सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणून त्याच्यामार्फत सर्व प्रकाराच्या चौकटी मोडून टाकण्याचा क्रांतीकारी प्रयत्न सोसायटीच्या मीटिंगांपासून इंटरनेटपर्यंत सगळीकडेच चालू आहे. 'लोकांना हवे ते त्यांना द्या' हा राजकारण्यांपासून अभिनेत्रींपर्यंत रुजत चाललेला ट्रेड धोकादायक आहे. शिकायला वेळ नाही म्हणून भाषेचे नियम नाकारल्यावर वेळेबरोबरच पैसा नाही असे म्हणून भाकरी उपडी करण्याइतक्या सहजतेने सामान्य माणूस कायदादेखील आपल्या हातात घेईल. माझे म्हणणे आपल्याला अतिरंजित वाटेल वा राईचा पर्वत होत आहे असेही वाटेल पण त्याला इलाज नाही. तुकारामासारख्या संताचे साहित्य बोली भाषेत नाही का? ते सामान्यांना समजत नाही का?

तरीही आपल्या लेखन शैलीचा चाहता,
शंतनू ओक

न् आणि ण ची भानगड

जेथे भावनांची देवाणघेवाण करायची आहे, तिथे शुद्धाशुद्ध बघायची गरज नाही काय? या प्रश्नातच खरे तर त्रुटी आहे.

अशुद्ध साधारणपणे फक्त नवशिके प्रौढच बोलतात. सामान्य तद्देशीय माणूस बहुधा अशुद्ध बोलत नाही. "आमचं आई म्हणालं" अशी चूक मराठी प्रदेशातला कोणी अशिक्षित माणूसही करणार नाही, तसा बोलणारा कन्नड मुलुखात लहानाचा मोठा झाला, असा आपण अंदाज करतो. त्याउलट "आई काय म्हन्तिया" असे म्हणणारा मराठी तर खासच, कोणी त्याची जात/गाव हेदेखील ओळखेल.

मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत - त्यांच्या भाषकांमध्ये त्या त्या बोलीत जसे शुद्ध असेल तसेच बोलणे/लिहिणे जरुरीचे असते. आता बहिणाबाईंच्या "मन वढाय वढाय" च्या ठिकाणी "मन ओढाळ ओढाळ" असे म्हणायला गेलो तर छंदोभंग होतो.

प्रमाणबोलीत मात्र जेव्हा बोलण्याची वा लिहिण्याची वेळ येते तेव्हा प्रमाण बोलीचे नियम पाळावे लागतात. आता मराठीच्या कित्येक बोलींपैकी कुठली "प्रमाण" बोली म्हणून निवडली गेली (आणि भविष्यात कुठली निवडली जाईल) या बाबतीत खरे तर "लोकशाहीच आहे" (किंवा पूर्वी राजेशाही म्हणा). महानुभावांची बोली साहित्यिक आणि समृद्ध असली तरी काय - ती मराठीची प्रमाण बोली झाली नाही. आजची प्रमाण बोली लोकांनी निवडली म्हणून प्रमाण आहे, महानुभावांच्या बोलीपेक्षा सरस होती म्हणून नव्हे.

प्रमाण बोली ही इतर बोलींपेक्षा शुद्ध नसली तरी ती बोलण्यात काही ठळक फायदे आहेत. बहुतेक सुशिक्षित लोक आपल्या घरगुती/जात-विशेष/प्रादेशिक बोलीला जोडून प्रमाण बोली जरूर शिकतात. त्यात त्यांचे विपुल शब्दभांडारही असते. त्यामुळे ज्या लोकांची घरगुती/जात-विशेष/प्रादेशिक बोली परस्पर एकच नसते, ते लोक प्रमाण बोलीचा जोड भाषा म्हणून उपयोग तर करू शकतातच, पण त्यात काव्यशास्त्रविनोदही करू शकतात.

तरी प्रमाणबोली वापरण्यात काही बोचरे तोटेही असतात. दोन जणांची घरगुती/जात-विशेष/प्रादेशिक बोली जर एकच असेल, तर काही काही बाबतीत प्रमाण बोलीत बोलल्यास मायबोलीचा जिव्हाळा करपतो. कविता महाजन यांच्या लेखात (संदर्भ जी एंचा) आपल्या मुलाला "किसना" असे हाक मारणार्‍या आईचा उल्लेख आहे. आई-लेकाची एक बोली असून प्रमाण बोलीतला "कृष्ण" होणे लेकाला अयोग्य वाटते. ते आपल्याला पटते.
तर मग प्रमाण आणि अन्य बोलीपैकी प्रसंगानुसार फायदे-तोटे लक्षात घेऊन बोलणे-लिहिणे करावे. कविता महाजन यांनी न सांगता तोच नीरक्षीरविवेक नाही का केला? अवतरित "उदाहरणे" सोडली तर पूर्ण लेख प्रमाण मराठीतच आहे. कारण येथे एका मोठ्या वाचकगणाशी त्यांना संवाद साधायचा आहे. पण ड्रायव्हरभाऊंशी त्या त्याच्या बोलीत बोलल्या, कारण त्यांना त्याच्याशी जवळीक साधायची होती.
नीरक्षीरविवेक हा असा की नळातून नितळ पाणीच यावे, आणि बाळाला स्तन्यच पाजावे. दूध आणि पाण्याची अहमहमिका म्हणून नळात दूध आणि बाळास पाणी असे करून चालणार नाही.

हा संदेश मी दुसरीकडे लिहायला हवा होता

प्रमाणभाषेबद्दल एक वेगळे चर्चासत्र चालू आहे, तिथे अनेक उत्तम विचार मांडले गेले आहेत. मी वरील संदेश तिथे लिहायला हवा होता. "उपक्रम"शी जशी माझी ओळख वाढेल, तसे कुठे काय चालू आहे ते मला कळेल!
धनंजय

कविता महाजन यांच्या लेखांवरील प्रतिक्रियांसंबंधी

शंतनू व धनंजय दोहोंचेही अभिनंदन,
आपण आपली प्रतिक्रिया महाजनबाईंना कळवा.
मराठी भाषा व संस्कृती यांच्या विषयी ज्यांना आस्था आहे त्याला धनंजय यांनी सांगितलेला विवेक आपोआपच सुचतो. मुळात प्रणाणभाषा ही बोलीभाषेतूनच बळ घेत असते. आज आपण जिला प्रमाण मराठी म्हणतो तीही १९ व्या शतकात लेखनवाचन व्यवहारावर प्रभुत्व गाजवणार्‍या एका गटाच्या बोलीतूनच आकाराला आली आहे. प्रमाणभाषेच्या संकल्पनेला व्यावहारिक संदर्भांसोबत राजकीय संदर्भ असतातच. ते टाळता येत नाहीत. महाजनबाई बांधिलकी मानणार्‍या कार्यकर्त्या लेखिका आहेत. न की ण या प्रश्नापेक्षा त्याला जोडलेल्या तुच्छवादी प्रवृत्तीसंबंधी त्या बोलत आहेत असे मला वाटते.
धनंजय किंवा शंतनू यांचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. सार्वजनिक आयुष्यात प्रमाणभाषेसंबंधी दक्ष असायला हवे हे खरे. परंतु ही आदर्श स्थिती कुणालाही गाठता येत नाही . प्रत्येकावर विशिष्ट प्रदेश, बोली लकबी यांचा संस्कार झालेलाच असतो. तिथे काही प्रमाणात उदार धोरण स्वीकारणेच योग्य ठरते. (लिखित-छापील साहित्याबाबत भाषेचे संपादन, दुरूस्त्या व प्रमाणीकरण करणार्‍या मुद्रितशोधन, भाषा सल्लागार इ. स्वतंत्र व्यवस्था असतातच की...) व्याकरणही व्यवहाराला अनुसरून काळानुरूप बदलावे लागते. भाषाविवेकाचा आग्रह संपून कर्मठपणाची हद्द कुठे सुरू होते हेही लक्षात घेतले पाहिजे.
असो. चर्चा उत्तम चालली आहे. बाईंना ती मेल केल्यास त्यांचेही म्हणणे कळेल...
-- उदय

सहमत

बोलीभाषेचेही आपले नियम असतातच. त्याअर्थाने ती देखील एक प्रमाण भाषाच आहे.

वैदर्भीय व्यक्ती "मले-तुले" असं म्हणेल हा अलिखित असला तरी नियमच आहे ना. अन्यथा तो अगदी सीताबर्डीचाही असला तरी कोणी त्याला वैदर्भीय म्हणणार नाही.

संगणकावर प्रमाणभाषा अतिशय उपयुक्त ठरेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

अवांतरः गूगल मध्ये सूचना हा शब्द टाकला तर येणारे निकाल व सुचना हा अशुद्ध शब्द टाकला तर येणारे निकाल यांचे तुलनात्मक समप्रमाण पाहता प्रमाणभाषेचे महत्त्व नव्याने कळेल. अन्यथा पुढेमागे शोधायचे काय हे शोधण्यासाठी नवीन शोधयंत्र विकसित करावे लागेल.

- आजानुकर्ण


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

बोली ती बोलीच .

आम्ही अनेक वेळा सांगितलं आहे की, प्रमाण भाषेचा हट्ट कशासाठी ?
बोली ती बोलीच.

अवांतर :) बोली भाषेची चळवळ उभी राहिल्याशिवाय,प्रमाणभाषेची वळवळ थांबणार नाही असे वाटते ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर