प्राचीन पुरुष-नावांसाठीचे नियम

या संकेतस्थळावर "संस्कृत" विषयावर चर्चा करताना एका अवांतर विचारप्रवाहामुळे पतंजलीचे व्याकरणमहाभाष्य उडत उडत चाळायला घेतले. आधी लक्षात न घेतलेला एक परिच्छेद माझ्या डोळ्यासमोर आला. (पतंजलीचे व्याकरणमहाभाष्य संस्कृत व्याकरणाचा सर्वात प्रमाण ग्रंथ होय.)

पहिल्या पस्पशाह्निकात व्याकरण शास्त्र शिकायची अनेक प्रयोजने सांगताना पैकी हे एक (सर्वात महत्त्वाचे नव्हे, पण तरीसुद्धा...) सांगितले आहे -

याज्ञिका: पठन्ति - दशम्युत्तरकालं पुत्रस्य जातस्य नाम विदध्याद् घोषवदाद्यन्तरन्तःस्थमवृद्धं त्रिपुरुषानूकमनरिप्रतिष्ठितं । तद्धि प्रतिष्ठिततमं भवति । द्व्यक्षरं चतुरक्षरं वा नाम कृतं कुर्यान्न तद्धितम् | इति ॥
न चान्तरेण व्याकरणं कृतस्तद्धिता वा शक्या विज्ञातुम् ॥

अर्थ साधारणपणे असा (चू भू द्या घ्या, सर्व संदर्भ मधुसूदन प्रसाद मिश्र यांच्या हिंदी टीकेतून, चौखंबा प्रकाशन, वाराणसी १९७८)
(महाभाष्याचे अवतरण सुरू)
याज्ञिक म्हणतात (काही विद्वानांच्या मते अशा आशयाचे वेदमंत्र आहेत, बाकीच्यांच्या मते "याज्ञिक" म्हणजे यज्ञ करणारे लोक) -
(महाभाष्यान्तर्गत अवतरण सुरू)
जन्मलेल्या पुत्राच्या दहाव्या दिवसानंतर त्याला नाव अशा प्रकारचे द्यावे -
१. त्याची सुरुवात "घोष" व्यंजनाने व्हावी: म्हणजे वर्ज्य आहेत क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, ष, स, बाकी सर्व व्यंजने चालतील
२. त्याच्या अन्तर्गत अन्त:स्थ वर्ण असावा - म्हणजे, य, र, ल, व पैकी एकतरी असावे. (अन्तर्गत म्हणजे "मधले" अक्षर, पहिले ते वेगळे!)
३. त्यातील पहिल्या अक्षरातला स्वर आ, ऐ, किंवा औ नसावा.
४. मुलाचा आजा, पणजा, किंवा खापरपणजा, या तिघांपैकी, जवळीक दाखवणारे नाव असावे
५. शत्रूंमध्ये ते नाव प्रतिष्ठित नसावे
तरच ते सर्वात प्रतिष्ठित होते.
६. ते दोन अक्षरी किंवा चार अक्षरी असावे
७. ते कृदन्त (म्हणजे थेट धातुसाधित) असावे, तद्धित (बाकी सर्व साधित पदे) नसावे.
- (महाभाष्यान्तर्गत अवतरण समाप्त)
व्याकरणाशिवाय कृदन्त आणि तद्धितान्त कळणे शक्य नाही.
(महाभाष्याचे अवतरण समाप्त)

हा म्हणजे भलताच कठीण प्रकार झाला. खुद्द महाभाष्य लिहिणार्‍या "पतंजलि"-आचार्यांचे नाव या नियमांना जुमानत नाही!

संस्कृत व्याकरणग्रंथांतल्या उदाहरणात सापडणारा आवडता "देवदत्त" या सर्व निकषांना उतरतो.
विश्वामित्र चालतो, पण वसिष्ठ (३ अक्षरे) नाही!
पाच पांडवांपैकी "धर्म" ठीक, "युधिष्ठिर" नाही (२रे अन्तःस्थ नाही).
भीम (२रे अन्तःस्थ नाही), अर्जुन (१ले घोष नाही, ३ अक्षरे), नकुल (३ अक्षरे), सहदेव (१ले घोष नाही), सगळे नापास.
दुर्योधन पास.
"राम" नाही (पहिला स्वर आ, २रे अन्तःस्थ नाही).
कृष्ण नाही (१ले घोष नाही, २रे अन्तःस्थ नाही), गोविन्द नाही (३ अक्षरे), वासुदेव नाही (पहिला स्वर आ, २रे अन्तःस्थ नाही).

हा कसला नावांबद्दलचा नियम प्रयोजन म्हणून दिला आहे!

असो, पण वैदिक कर्मकांडे पाळणार्‍यांमध्ये असे कुठले नामकरण विधीचे नियम असल्याचे कोणी ऐकले आहे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

ऑपशन्

पुर्वी म्हणे सगळे तोंडी शिकवायचे ना? कदाचीत हा धडा शिकवायचा विसरला असेल म्हणुन किंवा सगळ्या स्टूडंटस् नी हा चॅपटर ऑपशन् ला टाकला असेल्. :-) ह. घ्या.

कदाचीत इतर काही विद्वान व पतंजली विरोधक, राजकीयमंडळींनी ह्या "चॅपटर"ला सर्वोच्च न्यायालयातून सॉरी राजदरबारातुन् "स्टे" आणला असेल. न्यायमूर्ती, राजा सगळ्यांची नावे ऍज इट् इज् ह्या नियमबाह्य असतील :-)

असो, पण वैदिक ..नामकरण विधीचे नियम ..ऐकले ..?
आत्तापर्यंत एवढेच ऐकले आहे की "पत्रीकेप्रमाणे" काय अक्षर आले आहे त्यावरुन नाव ठेवा. (आपली ज्योतीष्य स्पेशलीस्ट मंडळी खुलासा करतीलच्) कदाचीत ह्या सगळ्या प्रकरणामुळे की काय एकापेक्षा जास्त नावे (लहान मुलांची, त्यांच्या घरच्यांनी) ठेवायची प्रथा सुरू झाली असेल.

दुर्योधन पास

जरासंध आणि जयंद्रथही पास. :-)

ते कृदन्त (म्हणजे थेट धातुसाधित) असावे, तद्धित (बाकी सर्व साधित पदे) नसावे.

हे कसे ते उदाहरणाने सांगता येईल का?

कृदन्त - तद्धित

सर्वात सामान्य आढळणारी तद्धिते म्हणजे अपत्य/गोत्र सांगणारे शब्द.

पृथेचा पुत्र पार्थ
पंडूच्या कुळातला पांडव

अपत्य अर्थ नसलेली जुनी तद्धित नावे मला शोधून थोडीच सापडली -
पद्म नाभीत असलेला पद्मनाभ (येथे नाभि हा थेट धातू नाही, म्हणून हे कृदन्त नाही, हे तद्धित)
पुरुषोत्तम येथे उत्तम उत्+तम असे तद्धित - धातूपासून नाही आले.

पण देवकीला "नंदवणारा" देवकीनंदन मात्र कृदन्त बरे का! कारण "नन्दन" हे थेट नन्द् धातूपासून साधित झाले आहे.
बाकी अपत्य-अर्थ नसलेली जवळजवळ सगळी प्राचीन नावे कृदन्तच आहेत. त्यात राम, कृष्ण, दुर्योधन, धर्म, सगळे आले.

खास मराठी नावे म्हणावी तर दगडाशी संबंधित दगडू, धोंड्याशी संबंधित धोंडू ही तद्धिते.
वाघ मारणारा वाघमारे कृदन्त (थेट मार- धातूपासून आलेले रूप) - पण हे आडनाव झाले...

तद्धित नाव निषिद्ध केले तर सगळी "अमक्याचे अपत्य" नावे बाद होतील, आणि मुलाला काहीतरी स्वतंत्र ओळख मिळावी असा हेतू असेल.

धनंजय

पतंजली की पाणिनी

पतंजलीने व्याकरणावर काही लिहिलय हे माहित नव्हतं पाणिनी ने मात्र व्याकरण लिहिलय हे माहित होत.

त्रिमुनि-व्याकरण

पाणिनींपासून सुरू झालेल्या परंपरेला त्रिमुनींचे व्याकरण असे म्हणतात.
प्रथम अष्टाध्यायी लिहिणारे पाणिनि-आचार्य (मराठीतही पाणिनी हे ह्रस्व अंती म्हणून उगीच "आचार्य" उपाधी जोडली!)
दुसरे वार्तिके लिहिणारे कात्यायन आचार्य
तिसरे व्याकरणमहाभाष्य लिहिणारे पतञ्जलि-आचार्य

या तिघांपैकी पुढच्या आचार्याला मागच्याच्या चुका सांगण्याचा अधिकार आहे. चुका दाखवणे अशा प्रकारचे - "पाणिनी अमुक नियम म्हणून सांगतात, पण प्रत्यक्षात लोकांमध्ये तमुक ऐकायला मिळते, त्यामुळे नियम 'तमुक' असा मानावा." त्यातल्या त्यात जमल्यास पतंजली कात्यायनांचे दोष काढणेच कसे चुकले, आणि मूळ पाणीनींचेच कसे बरोबर आहे असे समजावून सांगतात.

त्या तीन मुनींच्या शे-दोनशे वर्षांच्या काळात ती भाषा लोकांत सामान्यपणे बोलली जायचे संपले असणार, कारण त्यापुढे "प्रत्यक्षात 'असे' नाही, 'तसे' बोलतात" म्हणून अधिकाराने सांगायची कोणाची हिंमत राहिली नाही. म्हणून पतंजलींचे मत ते सर्वात प्रमाण. पातंजल-योगसूत्रे लिहिणारे पतंजली ते हेच का दुसरे कोणी याबाबत निश्चित काही सांगता येत नाही.

मुनि?

कुठेतरी असे वाचले/ऐकले आहे की ऋषि-मुनी यांपैकी मुनि हे जैन धर्मीय असत.
हे खरे आहे का?
- दिगम्भा

मुनि

होय, जैन आचार्यांची नावे अधिक करून मुनि म्हणून ऐकायला मिळतात.
गौतम बुद्धाला बौद्ध लोक "शाक्यमुनि" असे देखील म्हणतात.
ऋषिकेश (हे सरकारी आणि सामान्य नाव - या गंगातटावरच्या या गावाला काही लोक 'हृषीकेश' असे देखील म्हणतात) येथे गंगेच्या उजव्या तटाला 'मुनि की रेती' म्हणतात, ते बहुतेक हिंदू मुनींवरून आले आहे - तिथे जैनांचा मोठा प्रभाव जाणवला नाही. नारदाला मराठीत साधारणपणे "नारदमुनी" असे म्हणतात. तो हिंदू पुराणांतला शिक्कामोर्तब झालेला देवर्षी असून त्याला नारद-ऋषी फारसे म्हटले जात नाही. मुनी आणि ऋषी शब्दांपैकी निवड सवयीने आणि रूढीने ठरत असावी.
खुद्द पतंजली आणि पाणिनी त्या काळच्या व्याकरणकारांचा "आचार्य" म्हणून उल्लेख करतात. "त्रिमुनी" किंवा "मुनित्रय" म्हणणारे त्या शिष्य परंपरेतील पुढची मंडळी.

मुनि

मला वाटते मुनिवेश धारण करून माणूस आयुष्यात केव्हाही मुनि बनू शकतो. ऋषी मात्र जनतेने बनवायचा असतो.--वाचक्‍नवी

मौन?

"ऋषि" व "मुनि"चा शब्दार्थ काय?
मुनि व मौन यांचा काही संबंध आहे का?
म्हणजे मौनव्रत पाळणारा तो मुनि किंवा मुनि मौन पाळतात असे (ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण किंवा ब्राह्मण ब्रह्म जाणतो या धर्तीवर*)?
[*कृपया हे विधान वस्तुस्थितीनिदर्शक आहे किंवा मी असा दावा करतो आहे असे समजू नये]
अर्थात् मग नारदाला मुनि म्हणणे उपरोधिक होईल ( हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है, वगैरे) :))
- दिगम्भा

शंका

जन्मलेल्या पुत्राच्या दहाव्या दिवसानंतर त्याला नाव अशा प्रकारचे द्यावे -
हे ठीक. पण बाराव्याच दिवशी नाव देण्याची प्रथा कशी सुरु झाली? याविषयीही काही सूत्रे आहेत का? आजकाल वैद्यकीय व इतर कारणांमुळे -लहान मुलाला जनसंपर्कामुळे काही त्रास होऊ नये वगैरे- मुलाला लगेच बाराव्या दिवशी नाव दिले जात नाही हे खरे आहे. पण तरीही नामकरण विधीला "बारसे" असेच म्हणतात.

विषयांतराबद्दल क्षमस्व!

:)

:) वाचून मजा वाटली. देवदत्त नावामुळे तर आणखीच! आम्हाला कारकप्रकरण शिकवणार्‍या बाईंच्या बॅचने म्हणे या देवदत्ताच्या उदाहरणांवरून एक कथा बनवली होती. यज्ञदत्ताचा मुलगा देवदत्त, तो काणा असतो :ड् त्याची बायको.... वगैरे वगैरे. हे सगळं आठवलं. बिच्चारा देवदत्त!
राधिका

हा तर लेख आहे!

या लेखाला चर्चेचे स्वरूप देण्यापेक्षा लेखाचे स्वरूप आहे असे वाटले.
एकुण लेख आवडला, वेगळा विषय.
अजूनही असे आले तर चालेल!
यावर काही प्रतिक्रिया मात्र देता आली नाही.

आपला
गुंडोपंत

लेख असायला पाहिजे

खरे आहे. पण लेख म्हणावा तर मजकूर फारच तोकडा आहे. "चटरफटर" असा सुद्धा लेखनप्रकार सुरू केला पाहिजे!
:-)

माझे नाव

माझे नाव तर बाद झाले !
जेथे राम चालत नाही तेथे राज काय करणार :((

"हे व्याकरण पुर्वी शाळेमध्ये छळायचे नंतर, संकेतस्थळ बनवताना, मनोगत वर व परत एकदा येथे उपक्रमवर छळण्यासाठी आले आहे, ह.घ्या."

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

स्त्रियांची नावे

येथील धनंजय, वाचक्नवी, राधिका, यनावाला या दिग्गजांची/विद्वानांची व इतर ज्ञानी लोकांची बरोबरी करायची माझी हिम्मत नाही पण
असे वाचल्याचे आठवते की स्त्रियांची नावे नद्या, दगड, फुले यावरून ठेवू नयेत.
अर्थात् तरीही अशी नावे (गंगा, यमुना, अश्विनी {की आश्विनी?}, रोहिणी, गुलाब, चंपा, इ.) जुन्या काळापासूनच ठेवली जातात हेही खरे.

- दिगम्भा

दिग्गज किंवा विद्वान?

उगीच मला इतरांच्या पंक्तीला बसवू नका. मी सामान्यच, फक्त संस्कृती आणि भाषेवर प्रेम करणार्‍यांपैकी. माझ्या लिखाणातल्या कितीतरी त्रुटी दिगम्भांनी दाखवल्या आहेत. मला हरबर्‍याच्या झाडावर चढवून त्यांनी खाली रिकामे राहू नये, ( अधूनमधून झाड हलवावे.)
आत्ताच पहा. दिगम्भांची माहिती मला नवीन आहे.
पाणिनी इ.स.पू ४५०. राम, धर्म, युधिष्ठिर त्यापूर्वीचे. पाणिनी चे व्याकरण 'रामायणा' तसुद्धा पाळले गेले नाही. त्यात अनेक आर्षरूपे आहेत.वाल्मिकी तर आद्यकवी. त्याला स्फुरलेली पहिली काव्यरचना:
मा निषाद प्रतिष्ठाम्‌ त्वमगम: ...यातसुद्धा व्याकरणाची चूक आहे-त्वं गम: हवे होते. पाणिनीनंतर कात्यायनी आणि इ.स.पू १५० मध्ये पतंजली. त्यामुळे पतंजलीने सांगितलेले पुरुषी नावाचे संकेत पूर्वीच्या लोकांना लागू पडतील अशी अपेक्षा बाळगणे अनुचित. देवदत्तसारखाच व्याकरणात पुन्हापुन्हा येणारा माणवक मात्र, प्रथम घोषवर्ण, मधे अर्धस्वर आणि धातूपासून उत्पत्ती हे तिन्ही नियम पाळणारा!
पाणिनीकालीन भाषेत बदल झाल्याने कात्यायनाला पाणिनीच्या सूत्रांवर वार्तिक लिहावे लागले. पाणिनीचे एक तृतीयांश नियम कात्यायनाने सुधारले आणि त्यात भर घातली. पतंजलीचे महाभाष्य तर पाणिनीयसूत्रांची आणि कात्यायनांच्या वार्तिकांची समीक्षा करते. या तिघांनंतरमात्र संस्कृत व्याकरणाची प्रगती झाली नाही. इ.स. ६५१ मध्ये लिहिलेले भर्तृहरीचे वाक्यपदीय, इ.स. ६६२ मध्ये जयादित्य आणि वामनाने लिहिलेली काशिकावृत्ती, इ.स . १६२५ मध्ये प्रसिद्ध झालेला भट्टोजी दीक्षिताची टीका, ही सर्व वर सांगितलेल्या तीन व्याकरणमुनींच्या ग्रंथांवर आधारलेली पुस्तके. - --वाचक्‍नवी

 
^ वर