"मुंज" (यज्ञोपवीत संस्कार) केल्याने खरंच अक्कल येते का?

जसे प्रश्न "आजानुकर्ण" ह्यांना सतावतात, तसेच मलाही काही प्रश्न विद्वानांना विचारवेसे वाटतात, त्यातलाच हा एक - वयाने मोठी मंडळी सतत सांगत असतात कि "ह्याची मुंज लवकरच करून टाक, म्हणजे अक्कल येईल", आजतागायत मला ह्याचे अर्थ कळले नाही। माहिती असल्यास कृपया उत्तरे देण्याची कृपा करावी ।
(१) मुंज केल्याचे आणि अक्कलेचे आपसात काय सम्बन्ध आहे?
(२) ज्यांची मुंज होत नाही ते सोड़मुंजी पर्यन्त बेअक्कलच रहातात का?
(३) ज्या विधर्मी लोकांमधे "मुंज" हा प्रकारच नाही, तिथे काय सर्वजण "हेच" असतात?
(४) मुंज करणे हा एक वैयक्तिक धर्म आहे कि सामाजिक बन्धन?
(५) मुंज करणे हा निव्वळ पैसे उधळणी आहे का?
(६) किती बटुक आजच्या काळात मुंज केल्यावर सकाळ/संध्याकाळ "संध्या-अर्चा" करतात? आणि नाही करत तर मुंज करायचीच कशाला?
(७) जर हा मात्र एक "संस्कारच" आहे, तर अन्नप्राशन आदि पण तितकेच विधिविधानाने होतात का?

ह्यातले काही माहित नसल्याने काही वेडे प्रश्न केले असतील, त्यांना बगल द्यावी...

लेखनविषय: दुवे:

Comments

या विषयावरील चर्चा

या विषयावरील विस्तृत चर्चा मुंज करावी का? येथे पहा.

-आजानुकर्ण

मुंज आणि बेडूक

मुंजीत गुरुजी मांडीत बेडूक भरतात. असे मला लहानपणी सांगितले तेव्हा मला ते खरे वाटे तसेच त्याची भीती वाटे. मुंज ठरल्यावर मी आयडिया केली. मांडीला ब्लेडने थोडी चिर पाडली. मुंजी पर्यंत त्याची खूण उमटली . हेतू हा कि मांडीत बेडूक भरायची वेळ आली कि गुरुजींना दाखवायचे कि माझ्या मांडीत अगोदरच बेडूक भरला आहे. त्याचा हा पुरावा बघा.
प्रकाश घाटपांडे

मुंज-लग्न-शिक्षण

हे सर्व करून अक्कल येतेच याची कोणी शाश्वती देता येते काय? वाढलेल्या वयाचे पढतमूर्ख सर्वत्र दिसतात.

माझ्या मते अक्कल ही अशी गोष्ट आहे जी कोणतेही विधी किंवा पठण करून मिळत नाही. ती पोहर्‍यात म्हणजे आचारात येण्यासाठी आडात म्हणजे डोक्यात असावी लागते.

-राजीव.

अक्कल येते !

काही वेडे प्रश्न केले असतील, त्यांना बगल द्यावी...

नाही ! नाही !
अशा प्रश्नांनीच अक्कल येते असे आमचे मत आहे.
उदा. न्युटनला सफरचंद खाली का पडले हा वेडा प्रश्न पडला नसता तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असता का ?

प्रतिसाद संपादित करणे हा संपादक मंडळाच्या अधिकाराचा अतिरेक आहे, असे प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना वाटते.

माझी उत्तरे..

(१) मुंज केल्याचे आणि अक्कलेचे आपसात काय सम्बन्ध आहे?

काहीही नाही..

(२) ज्यांची मुंज होत नाही ते सोड़मुंजी पर्यन्त बेअक्कलच रहातात का?

हे तुम्हाला कुणी सांगितलं? :)

(३) ज्या विधर्मी लोकांमधे "मुंज" हा प्रकारच नाही, तिथे काय सर्वजण "हेच" असतात?

'हेच' म्हणजे आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे? कारण 'हेच' चे वेगवेगळे अर्थ असतात! :)

(४) मुंज करणे हा एक वैयक्तिक धर्म आहे कि सामाजिक बन्धन?

यापैकी काहीही नाही...

(५) मुंज करणे हा निव्वळ पैसे उधळणी आहे का?

'मुंज' हा आपल्याकडे एक संस्कार मानला गेलेला आहे. परंतु मुंज करताना कुणी किती खर्च करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि तसेही पैसे उधळण्याचे अनेक मार्ग आहेत आणि मुळात पैसे उधळणे हे सापेक्ष आहे!

(६) किती बटुक आजच्या काळात मुंज केल्यावर सकाळ/संध्याकाळ "संध्या-अर्चा" करतात?

कुणीच करत नसावेत.

आणि नाही करत तर मुंज करायचीच कशाला?

आपकी बात मे पॉईंट है! तरी पण आपल्या मुलाची मुंज करावी की नाही हा प्रत्येक आईवडिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं मला वाटतं.

(७) जर हा मात्र एक "संस्कारच" आहे, तर अन्नप्राशन आदि पण तितकेच विधिविधानाने होतात का?

प्रश्न समजला नाही.

अवांतर - एक गोष्ट मात्र खरी की कोणताही मुंज लागलेला, गोटा वगैरे केलेला बटू हा सुरेखच दिसतो. त्याला जवळ घेऊन त्याचा गोड पापा घ्यावासा वाटतो! :)

आपला,
(दर बुधवारी आणि शनिवारी रात्री 'संध्या' करणारा!:) तात्या.

एक उत्तर

तात्यांनी दिलेली उत्तरे एकदम पटली. माझी त्याहून वेगळी उत्तरे नाहीत (कदाचीत तात्यां इतकी आम्ही नेमाने "संध्या" करत नसू इतकाच काय तो फरक!)

बाकी फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्यावेसे वाटते: किती बटुक आजच्या काळात मुंज केल्यावर सकाळ/संध्याकाळ "संध्या-अर्चा" करतात? आणि नाही करत तर मुंज करायचीच कशाला?

जो पर्यंत लोकं स्वखुशीने मुंज करताहेत अथवा सोडमुंज करताहेत किंवा नुसतीच "संध्या" करताहेत, करूनदेत ना! त्याचा जर बाकीच्यांना त्रास होत नसला तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न अथवा आनंद/श्रद्धा वाटेल ते आहे. तुमचं आमचं त्यात कोण घोडं मारतयं? आपण जर खरेच "लिबरल" राहायचे असेल, तर इतरांच्या वैयक्तिक क्रियांनी (प्रॅक्टीसेसनी) जो पर्यंत इतरांना त्रास होत नाही, तो पर्यंत विरोध करू नये. नाहीतर उद्या तुमच्या वागण्यातले काही तरी शोधून असे वागण्याची गरज आहे का? म्हणत कोणी विचारायला लागले तर?

हं, आता उद्या विलासरावांनी महाराष्ट्रात अथवा सोनीयांजीच्या बोलक्या बाहुल्यांनी भारतात, कायद्याने मुंज सक्तीची केली तर त्याला मात्र माझा विरोध राहील.

आणखी एक उत्तर..

जो पर्यंत लोकं स्वखुशीने मुंज करताहेत अथवा सोडमुंज करताहेत किंवा नुसतीच "संध्या" करताहेत, करूनदेत ना! त्याचा जर बाकीच्यांना त्रास होत नसला तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न अथवा आनंद/श्रद्धा वाटेल ते आहे. तुमचं आमचं त्यात कोण घोडं मारतयं?

आणि ज्यांना त्याची खिल्ली उडवायची आहे त्यांना तसे देखिल करु द्या की! ..त्यांनी तरी कुठं तुमच्या मुंजीच्या वरातितलं घोडं मारलय? जो पर्यंत तुम्हाला व्यक्तिगत त्रास होत नाही तो पर्यंत ज्याना विरोध करायचा आहे त्यांना विरोध देखिल करु देत. काय बरोबर ना?

संस्कार / स्पिरिट्युआलिटी

(७) जर हा मात्र एक "संस्कारच" आहे, तर अन्नप्राशन आदि पण तितकेच विधिविधानाने होतात का?
आपला हा प्रश्न मला ज्या तर्‍हेने समजला तसे उत्तर देत आहे. चूक झाली असेल तर क्षमा करा.
जन्मानंतर सोयर इत्यादी पाळले जाते, बहुधा पहिले भरवणे हे समारंभाने होते, नाव समारंभपूर्वक संस्कार करुन ठेवले जाते, पहिल्या केशकर्तनाला जावळ काढणे असे म्हणतात आणि ते सुद्धा समारंभाने होते. विद्यार्जनाची सुरुवात मुंज करुन समारंभाने होते. गृहस्थाश्रमाची सुरुवात लग्न लावून समारंभाने होते. वानप्रस्थाश्रम / संन्यासाश्रम हे साठी, सहस्रचंद्रदर्शन इत्यादिने साजरी करतात. मृत्यु नंतर संस्कार करुन देह मातीत जातो.
अशा तर्‍हेचे सोळा संस्कार देहावर होतात आणि ते अनेकदा समारंभाने. मग त्यातील जे संस्कार करायचे ते करावे नसतील तर नको.
याकडे मी तरी आचार म्हणून पाहतो स्पिरिट्युआलिटी म्हणून नाही.

-- लिखाळ.

काहीच कळत नसल्याने, मला बरेच काही कळते असा अनेकदा माझा समज होतो.

समज

मला बरेच काही कळते असा अनेकदा माझा समज होतो.

काही कळत नाही असा जर तुमचा समज झाला तर तुम्हाला लिखाळराव न म्हणता सॉक्रेटिस नाही का म्हणणार? ;-)

सर्वेक्षण करता येईल...

"मुंज" (यज्ञोपवीत संस्कार) केल्याने खरंच अक्कल येते का?

(ह. घ्या.)

आपण मनोगतावर एक सर्वेक्षण करू - एकच सोपा प्रश्न प्रत्येक (याबाबतीत पुरूषालाच, मला वाटते) विचारायचा - काय रे "बाबा", तुझी मुंज झाली आहे का?

तो "बाबा" (की बाप्या) स्वतःचे डोके कसे लढवतो ते आपल्याला माहीत आहेच. मग ठरवू मुंज होऊनही असे डोके चालवतो/चालवत नाही तसेच मुंज न होऊनही डोके पळू शकते वगैरे.

यात एक गोष्ट कमी पडेल ती म्हणजे त्या त्या व्यक्तीची मुंज होण्याआधीची अक्कल आपल्यास माह्त नसेल, तरी देखील त्यावरून अंदाज येऊ शकेल वयकालानुरूप अक्कल आहे की कसे ते आणि मुंजीचा परीणाम देखील कळेल...

अकलेचे सर्वेक्षण झालेच पाहिजे !

विकासराव,
मुंज झालेल्या आणि मुंज न झालेल्या बाप्यांचे अकलेचे सर्वेक्षण झालेच पाहिजे !
या निमित्ताने आम्ही स्वतःला चेक करुन घेऊ ;)

अवांतर ;)संपादक मंडळाच्या कोणत्याही सदस्याला या सर्वक्षेणात नाव नोंदवता येणार नाही.

संपूर्ण प्रतिसाद डिलीट करणे हा संपादक मंडळाच्या अधिकाराचा अतिरेक आहे, असे प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना वाटते.

गुड वन!

अवांतर ;)संपादक मंडळाच्या कोणत्याही सदस्याला या सर्वक्षेणात नाव नोंदवता येणार नाही.

Good One!

..का नाही?

संपादक मंडळाच्या कोणत्याही सदस्याला या सर्वक्षेणात नाव नोंदवता येणार नाही.

उलट संपादन मंडळ ह्या संशोधनासाठी उत्कृष्ट विदा पुरवू शकेल असे वाटते ;-)

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

निरथक चर्चा

अशी निरर्थक बिनबुडाची चर्चा करण्यापेक्षा http://www.manogat.com/node/10077 येथे जाऊन समीर सुर्यकान्त यांनी
७-५-२००७ रोजी दिलेला प्रतिसाद वाचून मौन पाळावे.--वाचक्‍नवी

वाचला

समीर सुर्यकांत ह्यांचा भला मोठा प्रतिसाद मनोगतावरील चर्चेत जाऊन वाचला.

हे म्हणजे एखाद्या पोलिसाला पैसा का खातोस? असे विचारले असता त्याने उसळून .. 'सध्या सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो..फोन खाते,वीज मंडळ, नगर पालिका, महानगर पालिका, बांधकाम खाते, मंत्रालय इ.इ. सगळीकडे लोकं पैसे खातात ही यादी न संपणारी आहे मग तुम्हाला आमचाच भ्रष्टाचार का दिसतो? आम्ही पोलिस आहोत म्हणून? इतरांनी मणभर शेण खाल्ले त्यात आम्ही देखिल वाटीभर खाल्ले म्हणून काय झाले? आम्हालाच का झोडपता? असेच काहिसे आहे.

मुंज आणि त्यातले विधी हे निव्वळ हजारो वर्षांपासुन चालत आले आहेत म्हणून योग्यच? की केवळ जुनाट आहेत म्हणून टाकाऊ? ह्यावर चर्चा केल्यास आणि त्याची कारण मिमांसा पडताळून पाहिल्यास ती बिनबुडाची आणि निरर्थक चर्चा कशी काय ठरते बुवा?

संस्कार हे काही दर महिन्याला येणारे वीजेचे/फोनचे बील नव्हे की जे महिना अखेरीला भरुन टाकले म्हणजे पुढचा महिना बघायला नको.. लहान मुलांवर संस्कार हे कळत पेक्षा नकळत अधिक होत असतात. आई वडीलांचे त्यांच्या वागण्यातील बारकाव्यातुन दिसणारे विचार जेवढे संस्कार करुन जातात तेवढे संस्कार १०० वेळा मुंज करुनही होणार नाहित. बारसं,जावळ, मुंज असले विधी करुन टाकले म्हणजे 'मुलांवर संस्कार' ह्या जवाबदारीतुन अंशतहा मुक्ती ,आणि 'काय चिक्कू लोकं आहेत साधी मुंज देखिल केली नाही' ह्या आरोपातुन सुटका असा दुहेरी फायदा.

राहता राहिला तो निरुपद्रवी असण्याचा मुद्दा तर जगात हजारो निरर्थक गोष्टी लोक करत असतात ज्या अतिशय निरुपद्रवी असतात (समीर सुर्यकांतांच्या भल्या मोठ्या यादीतील अर्धे अधिक प्रकार देखिल निरुपद्रवीच आहेत तरिही त्यांचा मात्र उल्लेख त्यांनी निरर्थक असा केला आहे.) तेव्हा केवळ निरुपद्रवी आहे (किंवा उपद्रवमुल्य अतिशय कमी आहे) म्हणून निरर्थक गोष्टी करण्यात वेळेचा आणि श्रमांचा अपव्यय करतच रहावे का?

सहमत !

१००% सहमत.

संपूर्ण प्रतिसाद डिलीट करणे हा संपादक मंडळाच्या अधिकाराचा अतिरेक होता, असे प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना अजूनही वाटते.

क्षम्य

राहता राहिला तो निरुपद्रवी असण्याचा मुद्दा तर जगात हजारो निरर्थक गोष्टी लोक करत असतात ज्या अतिशय निरुपद्रवी असतात (समीर सुर्यकांतांच्या भल्या मोठ्या यादीतील अर्धे अधिक प्रकार देखिल निरुपद्रवीच आहेत तरिही त्यांचा मात्र उल्लेख त्यांनी निरर्थक असा केला आहे.) तेव्हा केवळ निरुपद्रवी आहे (किंवा उपद्रवमुल्य अतिशय कमी आहे) म्हणून निरर्थक गोष्टी करण्यात वेळेचा आणि श्रमांचा अपव्यय करतच रहावे का?

काही गोष्टी निरर्थक/निरुपद्रवी/कालबाह्य असतात पण त्या योग्य नसल्या तरि क्षम्य मात्र निश्चित असतात.

हे म्हणजे एखाद्या पोलिसाला पैसा का खातोस? असे विचारले असता त्याने उसळून .. 'सध्या सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो..फोन खाते,वीज मंडळ, नगर पालिका, महानगर पालिका, बांधकाम खाते, मंत्रालय इ.इ. सगळीकडे लोकं पैसे खातात ही यादी न संपणारी आहे मग तुम्हाला आमचाच भ्रष्टाचार का दिसतो? आम्ही पोलिस आहोत म्हणून? इतरांनी मणभर शेण खाल्ले त्यात आम्ही देखिल वाटीभर खाल्ले म्हणून काय झाले? आम्हालाच का झोडपता? असेच काहिसे आहे.

असेच आहे . दरोडेखोरांच्यात भुरटा म्हणजे सावच असतो. पोतिसांची परिस्थिती " सहनही होत नाही व सांगताही येत नाही ' अशीच अस्ते. सामान्य नागरिकाला तर पोलिसांच्या उपयुक्ततेपेक्षा समाजकंटकांच्या उपद्रव मूल्याचे भय अधिक असते.
प्रकाश घाटपांडे

बरोबर बोललात

या व्यक्तिने लिहिलेला प्रतिसाद असेही सांगतो असे मला वाचून वाटले की एखाद्याने चार लग्न केली किंवा चार लग्न केलेली चालतील तर आम्हीही आमच्या बायकांना सती पाठवले तर काय बिघडले? (असे त्यांनी कुठे म्हटलेले नाही पण मला त्यांचा रोख असाच वाटला.)

एखादा चूक करतो त्याला कोणी काही म्हणत नाही म्हणून मी ही चूक करणार आणि बोललात माझ्याविरुद्ध तर मी गळे काढून बोंबलणार ही कोणत्याप्रकारची प्रगती असते?

हातात प्लास्टीकची चावी देऊन ही स्वर्गाचे दार उघडण्याची चावी असे लहान पोरांना सांगतात आणि ती डोळे बंद करून मानतात ते धर्म आणि देश मध्ययुगीन काळापेक्षाही मागे जात आहेत हे उदाहरण समोर आहे. जर आपल्या धर्मात एखादा तोंड वर करून एखादी प्रथा अयोग्य आहे किंवा या प्रथेने काय साधणार असे विचारत असेल तर ते प्रगतीचे लक्षण आहे.

ते लेखक लिहितात की ब्राह्मणांचा विधी म्हणून नावे ठेवली, त्याच चर्चेत दुसरे एक लिहितात की हा विधी तीनही वर्णांत असतो. असो वा नसो, जर तो एखाद्या जातीचे मोठेपण किंवा फुकटचे वर्चस्व दाखवत असेल तर तो बंद करायला काय हरकत आहे?

ते लेखक म्हणतात की त्यांना आपली मुंज झाल्याचा अभिमान वाटतो, मला नाही वाटत. मला माझी मुंज करायच्यावेळेस आता चकोट करून वर्गात जायचे या भीतीने रडू यायचे बाकी होते. ज्या विधींचा आज काहीही उपयोग नाही, ज्याला आज महत्त्व नाही त्याच्या विरोधात आवाज काढला तर बिघडले कुठे?

- राजीव.

अभ्यासपूर्ण चर्चा !

सन्माननीय उपक्रमी,
आपण दिलेल्या दुव्यावर सदरील चर्चा आणि संबंधीत प्रतिसाद काळजीपूर्वक वाचला. त्यात मुंज करावे आणि त्याचबरोबर समाजात अनेक संस्कार चाललेले असतात तेव्हा मुंज निरुपद्रवी असल्याने करण्यास हरकत नसावी वगैरे वगैरे...! इथे जी अभ्यासपूर्ण चर्चा चालू आहे ती, मुंज केल्याने अक्कल येते का नाही त्याची.अक्कल म्हणजे काय हे एकदा ठरवावे लागेल,आणि त्यानंतर या संस्काराने शारीरिक,बौध्दीक,नैसर्गिक किंवा आणखी कोणते बदल होतात ? अशी चर्चा चालू आहे,किंवा तशी झाली पाहिजे. त्यातीलच एक भाग सर्वक्षण आहे,पण त्याचे स्वरुप ठरविता येत नसल्यामुळे सदरील चर्चेस ब्रेक लागला आहे. ;)

अवांतर :-)आमचा वेंधळेपणा जगद्विख्यात आहे,सोळा संस्काराबद्दल कुठे वाचायला मिळेल म्हणून शोधाशोध चालू होती,आम्हाला वाटले हा आर्यांचा उद्योग असेल असे वाटल्याने आम्ही 'आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास':-लेखक ऋग्वेदी. हे चूकीचे पुस्तक घेऊन आलो, त्यातल्या 'सणांचा' हा शब्द वाचलाच नाही. येईल कधी तरी तेही उपयोगाला :)
संपूर्ण प्रतिसाद डिलीट करणे हा संपादक मंडळाच्या अधिकाराचा अतिरेक आहे, असे प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना वाटते.

मुंज आणि अक्कल

१)मुंज केल्याने नसलेली अक्कल येते ही कोणी सांगितले? सुंता किंवा बाप्तिस्मा केल्याने येते?
२)जे अक्कलमंद असतात ते तसेच राहतात, जे मंद‍अक्कल असतात तेपण तसेच राहतात. मेंदूची वाढ वयाच्या आठव्या वर्षापर्यंतच होते.
३)ज्यांत मुंज नसते ते सर्वजण हेच म्हणजे अमुंज असतात.
४)दोन्हीही नाही. पहिल्यांदा घन अन्‍न खाणे हा धर्म आहे की बंधन?
५)वाढदिवसासाठी भेटकार्ड पाठवणे, फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे, एखादी भेट देणे निव्वळ पैसे उधळणे आहे का? खर्च किरकोळ असो की जास्त, विनाकारण करणे म्हणजे उधळपट्टी. लोकांना जेवायला घालणे हे पाप आहे का? उच्चशिक्षित सत्पात्र ब्राह्मणाला किरकोळ दक्षिणा देऊन त्याला जगायला मदत करणे हे? की एका छोट्या मुलाचा कौतुक समारंभ करणे हे?
६)संध्या करण्यासाठी मुंज करतात हे कुणी गाढवाने सांगितले?
७)अन्‍नप्राशन वयाच्या सहाव्या किंवा आठव्या महिन्यात करतात. तेव्हा समारंभ करता येतो, पण ते मूल त्याची मजा घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला घन अन्‍न खाता येते एवढा संस्कार त्याच्या मनावर झाला काम झाले. मुंज हा एकच पहिला संस्कार आहे की त्याची आठवण जन्मभर राहते. --वाचक्‍नवी

जगायला मदत

उच्चशिक्षित सत्पात्र ब्राह्मणाला किरकोळ दक्षिणा देऊन त्याला जगायला मदत करणे हे? की एका छोट्या मुलाचा कौतुक समारंभ करणे हे?

उच्चशिक्षित सत्पात्र असणार्‍या ब्राम्हणालाच काय इतर कुणालाही जगायला दक्षिणारुपी किरकोळ मदत लागत नसावी असे वाटते.

सोळा संस्कार

गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, विष्णुबलि, सीमंतोन्‍नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, सूर्यावलोकन, अन्‍नप्राशन, चूडाकार्य, उपनयन, महानाम्य, समावर्तन, विवाह, स्वर्गारोहण.---वाचक्‍नवी

डोक्यावरुन

३-४ शब्दांचे अर्थ कळले बाकी सगळे डोक्यावरुन गेले. विवाहा नंतर एकदम स्वर्गारोहण पाहुन मात्र गंमत वाटली.

हाहाहा

विवाहा नंतर एकदम स्वर्गारोहण पाहुन मात्र गंमत वाटली.
हाहाहाहा
ह.ह.पु.वा.

अवांतर ;) वानप्रस्थ आश्रम,वृध्दाश्रम,आणि मग स्वर्गारोहण असे पाहिजे होते का ! :))))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंजीचे कारण!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
फार पूर्वी गुरुगृही विद्यार्जनासाठी राहावे लागे. तेव्हा मुंज हा विधी करून मगच तो बटू खर्‍या अर्थाने शिक्षण घेण्यास गुरुगृही जाण्यास पात्र ठरत असे(असे म्हणतात) आणि म्हणूनच मुंज हा विधी त्यावेळी करत असत(शिकण्याचे लायसन्स समजू या)किंबहुना तो करणे बाध्य होते.
कालौघात आता अशी परिस्थिती राहिली नसल्यामुळे केवळ उपचार म्हणून(आणि मिरवण्याची एक संधी म्हणून) हल्ली मुंज केली जाते.बाकी त्या उपचाराने अक्कल येणे वगैरे गोष्टी निव्वळ बाष्कळपणा आहे.माझी मुंज मी सहावीत असताना वयाच्या ११ वर्षी झाली(तरीही अजून अक्कल आलेली नाही असे वाटते!!!).तुळतुळीत गोटा करून मागे घेरा ठेवलेले छायाचित्र अजूनही आहे.जेमतेम काही महिने संध्या केली आणि पुढे जानवेही काढून टाकले('वॉशिंग कंपनीत वॉशिंगला दिले आहे' असे त्या काळात गमतीने बोलले जाई हेही आठवले. ते अजूनपर्यंत तिथेच आहे. :D). मात्र पाठ खाजवायला ह्या जानव्याचा फारच छान उपयोग होत असे. त्या जानव्याला मारलेल्या गाठी हातात धरून गायत्री मंत्र म्हटल्यास भूते देखिल पळून जातात असेही सांगितले गेले होते.आता माझ्या सारख्या भूताला इतर भूतांची कसली भिती म्हणा!असो. एकूण माझ्या दृष्टीने कालबाह्य झालेला हा संस्कार आहे. मात्र कुणी करावा अथवा करु नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ठरावा.त्यावर चर्चा करून आपली सगळ्यांची चर्चेची खाज भागली तरी वास्तवात तसा फारसा उपयोग नाही हेही तितकेच खरे!
इति अलम्!

छान!

...त्यावर चर्चा करून आपली सगळ्यांची चर्चेची खाज भागली तरी वास्तवात तसा फारसा उपयोग नाही हेही तितकेच खरे!
आपली प्रतिक्रीया आवडली आणि पटली. ..

एक किरकोळ बदल सुचवू इच्छीतो: खाज चर्चेची नाही तर वाद घालण्याची असते! (बघा परत एका शब्दावरून वाद घातलाच..! )

 
^ वर