परदेशातील मराठी मंडळे

परदेशात आल्यावर बरेचसे भारतीय, आपला समाज, आपली माणसे जोडलेली राहावीत या हेतूने भारतीय मंडळांचे/ संघांचे सदस्यत्व घेतो. भारतीय समाज, सण, कार्यक्रम या सर्वांशी आपली नाळ जोडलेली राहावी या भावनेतून. मराठी मंडळेही याच भावनेतून जोडली जातात. अर्थातच, प्रत्येकाला या मंडळांचे बरे वाईट अनुभव येतात. एक उदा. सांगायचे झाले तर:

इंडिएनापोलिसचे आमचे मंडळ तसे लहान आहे. त्यात फारसे राजकारण नाही, हेवेदावे नाहीत परंतु एक गोष्ट प्रभावाने जाणवते ती म्हणजे अनास्था. मध्यंतरी बीएमएमसाठी आलेल्या एका कलावंताचा अतिशय सुरेख कार्यक्रम मंडळाने आयोजीत केला होता. कार्यक्रमाची प्रसिद्धी, लोकांना इमेल्स पाठवणे, फोनवरून आमंत्रणे देणे इ. इ. ही व्यवस्थित झाले होते. प्रत्यक्ष कार्यक्रमास मात्र फक्त ३४ जण उपस्थित राहिले. (हीच संख्या पाडवा-गणपतीला सुमारे १५० ते २०० च्या घरात असते.) आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरेच सदस्य मराठी कार्यक्रमात आपल्याला कोणतीही रुची नसल्याचे सांगतात. इतर वेळेसही, केवळ मराठी गाण्यांचा कार्यक्रम ठेवणे अशक्य होते कारण लोकांना हिंदी गाणी लागतात. मंडळाचे अंक निघतात त्यात मुलांना इंग्रजी लेख छापण्याची मुभा असते पण मोठेही 'आजकाल मराठी कोण वाचतो हो...आम्हाला इंग्रजीत लिहू द्या.' अशी मागणी करतात.

एकंदरीत आपला मराठी बाणा दाखवण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो हा अनुभव अनेकांना आला असेल.

एकमेकांवर राळ उडवण्यासाठी ही चर्चा सुरु केलेली नाही हे ही नमूद करावेसे वाटते. मंडळांचे कारभार व्यवस्थित कसे चालावे? लोकांना आकर्षित कसे करावे? त्यांच्या औदासिन्यावर उपाय शोधले आहेत का? या पिढीनंतर पुढची पिढी या मंडळांना जोडली जाईल का? (खरंतर, आताच्याच तरूण पिढीकडून अनास्था दिसत आहे, आम्हाला मराठीतलं काही कळत नाही असे सांगणारी भारतातूनच येणारी पिढी निर्माण होते आहे.) हे सर्व प्रश्न मंडळात स्वेच्छेने काम करणार्‍या मंडळींपुढे कधीनाकधी उपस्थित झाले असावेत तर सदस्यत्व घेतलेल्या लोकांनाही अनेक अनुभव आले असावेत.

उपक्रमावर परदेशातील अनेक मंडळी आहेत. त्यापैकी बरेच मराठी मंडळांशी जोडलेलेही असतील. बे एरिया किंवा त्यासमान मोठ्या मंडळातील अनुभव आणि लहान मंडळातील कटु-गोड अनुभव येथे मांडावेत, जेणेकरून अनास्था, औदासिन्य कसे टाळता येईल याची कल्पना यावी.

विशेष सूचना: कटु अनुभव मांडताना तिरप्या तिरप्या प्रतिसादांच्या वादांची झुंबड उडणार नाही आणि उपक्रमाच्या ध्येयधोरणांकडे लक्ष द्यावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

म्म्

(खरंतर, आताच्याच तरूण पिढीकडून अनास्था दिसत आहे, आम्हाला मराठीतलं काही कळत नाही असे सांगणारी भारतातूनच येणारी पिढी निर्माण होते आहे.)
असं?!! मग कठिण आहे.

तसेही मला वाटले होते की विशेषतः अमेरिकेतील मराठीमंडळे एकदम उत्साही आणि कार्यरत आहेत. बर !..आता बरेच काही कळेल ..

--('डे' एरिआत राहणारा) लिखाळ.
DE (Deutschland)

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)

जर्मनीत

विशेषतः अमेरिकेतील मराठीमंडळे एकदम उत्साही आणि कार्यरत आहेत.

अहो पण तुमच्या जर्मनीत मंडळ आहे का? तुम्ही तेथे जाता का? मंडळ असून जात नसाल तर का नाही? तुम्हाला तुमचे काही अनुभव आहेत का? ते आम्हालाही सांगा की.

(युरोपातील उखाळ्यापाखाळ्यांत इंटरेश्टेड) प्रियाली.

डे एरियात !

डे एरियात !
आमच्या इथे ब्रेमेन, स्टुटगार्ट, फ्रांकफूर्ट या आणि अशा मोठ्या शहरांत मराठी माणसे एकत्र येवून गणपती, दिवाळी वगैरे साजरी करतात असे ऐकून आहे. (कुणिससं म्हणत होतं बुवा !). मागल्या वर्षी स्टुटगार्ट येथे दिलीप प्रभावळकर कार्यक्रमास आले होते असे ऐकले. यंदा सुद्धा बव्हेरियामध्ये सर्व जर्मनीभरच्या मराठी लोकांचे संमेलन आहे. पण मी जावू शकेन असे दिसत नाही. :(

मी जेथे राहतो तेथे दोन मराठी लोक आहोत :) ( आणि आम्ही दोन मंडळे स्थापन केली आहेत :) तसे नाही उगीच मजा. आम्ही दोघेच असल्याने आम्ही कार्यक्रम करु शकत नाही. पण एका संक्रांतीला इतर मंडळींना कटाची आमटी आणि पुरणपोळी करुन बेत जमवला होता. (पुरणाची पोळी कसली ! पुरणाचे पराठे होते ते ! असं कुणिससं म्हणत होतं बुवा !)

-- लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)

महाराष्ट्रात मंडळे

महाराष्ट्रात मंडळे स्थापन करुन,त्यांच्यात मराठीची आवड निर्माण करायची
मग ते कोणत्याही देशात गेले,तर मंडळाचे काम मनासारखे होईल.
कशी आहे आयडीया.

आयडीया में दम है!

महाराष्ट्रात मंडळे स्थापन करुन,त्यांच्यात मराठीची आवड निर्माण करायची
मग ते कोणत्याही देशात गेले,तर मंडळाचे काम मनासारखे होईल.

तुम्ही हे गांभीर्याने म्हणाला का ते कळले नाही परंतु कल्पना वाईट नाही. लहान मुलांना ती इंग्रजी शाळेत गेली (किंवा नाही गेली) तरी मराठीशी संबंधीत संस्थांशी जोडलेले ठेवले तर मोठेपणी ते उत्साहाने अशा संस्थांत भाग घेतील असे वाटते.

असेच.

इंग्रजी शाळेत गेली (किंवा नाही गेली) तरी मराठीशी संबंधीत संस्थांशी जोडलेले ठेवले तर मोठेपणी ते उत्साहाने अशा संस्थांत भाग घेतील असे वाटते.

गंभीरपणे म्हणते( म्हणतोच्या ऐवजी म्हणते.नाव बदलल्यामुळे ) .

स्वदेशातील मंडळे...

परदेशातील मराठी मंडळाबद्दल लिहायचे आहे पण त्याआधी (पटकन लिहीता येईल असे वाटत असल्याने!) "महाराष्ट्रातील मंडळाच्या" अनुभवावर लिहीतो.

इंग्रजी माध्यम असो-नसो, मराठी वाड्मय मंडळ असणे चांगले ठरू शकते. आमच्या शाळेत तसे होते. अर्थात तसे शिक्षक लागतात आणि सुदैवाने तसा उत्साह असलेले काही शिक्षक होते. परीणामी नवीन वाचायच्या गोष्टी, कविता, नाटके इत्यादीची माहीती झाली.

व्हि. जे. टि. आय. मधे पण उत्साही प्राध्यापकांमुंळे चांगले मंडळ होते. (आता परिस्थिती माहीत नाही). तिथले स्वरूप अर्थातच थोडे निराळे म्हणजे वेगवेगळ्या कक्षेत्रातील व्यक्तींना बोलावणे आणि मराठी नाटक बसवणे असे होते. पण तिथे अनेक नामवंत हजेरी लावून गेले आहेत- लेखक, लेखिका, कवी, कवियत्री, राजकारणी आणि नट.

मी सरदार पटेल मधे असताना, तिथे पण मंडळ होते कळले. पहील्या वर्षी ५ रू वर्गणी वर्गातून गोळा करायला मदत केली. पण काहीच कार्यक्रम झाला नाही. दुसर्‍या वर्षी परत जेंव्हा मदत मागायला कार्यकारीणी आली, तेंव्हा म्हणले आधीच्या वर्षाचे पैसे वापरा मगच मी पैसे परत गोळा करायला मदत करीन नाहीतर बहीष्कार. मुले चांगली होती, कदाचीत (परिक्षांमुळे) उत्साह कमी असेल, गैरव्यवहार नव्हता पण जेव्हढा पाहीजे तेव्हढा प्राध्यपकांकडून पाठींबा नव्हता. मग डॉ. आनंद नाडकर्णींना भाषण देयला बोलवायचे ठरवले, तेंव्हा भवन्स कँपस मधे (जेथे सरदार पटेल आहे) ड्र्ग्जचे प्रकार घडले होते. नाडकर्णी तेंव्हा या विषयावर प्रसिद्ध होत होते. त्यांना भेटायला गेलो, तर ते म्हणाले की बोलायला येईन पण विषय ड्रग्ज नसेल तर विषयाचे नाव असेल, "कामसंवाद". मी जरा बिचकलो की आता काय करायचे! कार्यकारीणीला अर्थातच उत्साह आला! पण प्राध्यापक आढेवेढे घेयला लागले. पण शेवटी मान्य झाले. आणि हा शुद्ध मराठी कार्यक्रम अतिशय सुसंस्कृतपणे भाषण आणि प्रश्नोत्तराच्या रूपात प्राध्यापक आणि मराठी आणि अमराठी मुलांच्या "उत्साही" सहभागाने पार पडला. तसेच एकदा श. ना. नवरे पण आले होते. मी शब्दवेध (what's the good word) आयोजीत केले होते आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभला होता.
थोडक्यात स्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत. अमेरिकेत "बूक क्लब्स" असतात तशी आणि अनेक नवीन कल्पनांनी.

सहमत.पण...!

स्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत.

सहमत,पण मंडळात केवळ साहित्य गप्पा नसाव्यात.तर वेगवेगळे सण,त्यांचे नवीन संदर्भ,इतिहासाच्या चर्चा,गाणी (मराठी,हिंदी) कोडी,खेळ,असे काही असले की,मग त्यात कंटाळा नसतो,कधी तरी व्याख्यान पण संवादरुपी, अध्यात्मिक तत्वज्ञानावर फारसे बोलूच नये असे वाटते,आणि 'ती' मनमोहिनी म्हणते त्या प्रमाणे,एकदा की तरुणांमधे अशी आवड निर्माण झाली की,मग ती कोणत्याही देशात गेली,तरी मंडळांचा उत्साह कमी होणार नाही,असे वाटते.खरे तर परदेशातील मंडळांचे स्वरुप कसे असते,हे फारसे माहित नसल्यामुळे जरा अंदाजेच हा प्रतिसाद लिहितो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्म्म !

"स्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत "

जर साध्य झालेच तर कोठे कोठे आहेत ह्याची सुची देखील प्रसारित / प्रसिध्द करावी !

पण मंडळात केवळ साहित्य गप्पा नसाव्यात.तर वेगवेगळे सण,त्यांचे नवीन संदर्भ,इतिहासाच्या चर्चा,गाणी (मराठी,हिंदी) कोडी,खेळ,असे काही असले की,मग त्यात कंटाळा नसतो,कधी तरी व्याख्यान पण संवादरुपी, अध्यात्मिक तत्वज्ञानावर फारसे बोलूच नये असे वाटते,आणि 'ती' मनमोहिनी म्हणते त्या प्रमाणे,एकदा की तरुणांमधे अशी आवड निर्माण झाली की,मग ती कोणत्याही देशात गेली,तरी मंडळांचा उत्साह कमी होणार नाही,असे वाटते

१००% सहमत.
मी देखील गेलो होतो एकदा कार्यक्रमाला हिंदी गाण्याची भेंडी खेळून खेळून थकलो तोच एकाने नरेन्द्र (कोकणवाले) बाबाचे भजन व भाषण लावले ! वरती हा सल्ला देखील मराठी मंडळामध्येच "राज भाई, सुन रहे हो ना ? क्या गजब बोलतो माहीत आहे, शेकडो लोगों की भिड लगती है, सिर्फ उन्हे देखने के लिए ! "
बस तो आमचा आखरी सलाम मंडळाला !

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मिळाली की येथे लिहीनच.

हे पहा

"स्वदेशात मराठी मंडळे असावीत आणि ती उत्साहाने चालवावीत "

जर साध्य झालेच तर कोठे कोठे आहेत ह्याची सुची देखील प्रसारित / प्रसिध्द करावी !

हे पहा

शुद्धलेखनाच्या चुका कृपया मोठ्या दिलाने(काळजाने) दुर्लक्षित कराव्यात.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

धन्यवाद

धन्यवाद अभिजित,
तुम्ही फक्त आय. आय. टी. खडगपूर च्याच मराठी मंडळाचा दुवा दिला आहे.

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

सर्व सदस्यांना विनंती

कृपया चर्चा परदेशातील मराठी मंडळांवर आहे तेव्हा स्वदेशातील मराठी मंडळांवर यापुढे विषयांतर नको. स्वदेशात मराठी साहित्य, कार्यक्रम, वाहिन्या, मराठी समाज जितक्या मुबलकपणे मिळते तितक्या मुबलकपणे परदेशात ते नसल्याने मराठी भाषा, साहित्य, कलावंत यांच्याशी येथील मंडळींना बांधून ठेवण्यासाठी काय करावे?

लोकांचे औदासिन्य कसे दूर करावे?
काही कटु-गोड अनपेक्षित अनुभव आणि त्यावर योजलेले उपाय इ. वर चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे.

---
याबरोबरच वर* लिहिल्याप्रमाणे कोणावरही राळ उडवण्यासाठी या चर्चेचा वापर करू नये ही विनंती.

वर म्हणजे मुख्य चर्चाप्रस्तावात.

सहमत !

१. मराठीची ची गोडी जपण्यासाठी प्रथम मराठी पुस्तके / कथा / कादंबरी / मासिके मडंळामध्ये उपलब्ध असावीत.
२. मंडळाचा सर्व प्रथम नियम असावा कि येथे मंडळामध्ये फक्त व फक्त मराठीमध्येच बोलावे.
३. गाणी / नाटके / भाषण / आरती जे काही करावयाचे आहे त्या आधी सदस्यांचे मत घ्यावे.
४. मराठी मंडळामध्ये आल्यावर असे वाटावयास हवे की आपण महाराष्ट्रामध्येच एका कार्यलयात आलो आहोत ( असे नको की दिल्ली मध्ये आहे तर दिल्लीचा कुतबमीनार व लाल किल्ला भिंतीवर टांगला )

५. चुकुन माकुन एखादा असदस्य- मराठी मानव जर तुमच्याकडे माहीती साठी आला तर त्याला योग्य ती माहीती व वागणूक मिळावी. ( अनुभव खुप वाईट आहेत ते देखील देशी - भारतातलेच)

बस, अजून काही सुचले तर लिहीनच येथे.

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

माफी

कृपया चर्चा परदेशातील मराठी मंडळांवर आहे तेव्हा स्वदेशातील मराठी मंडळांवर यापुढे विषयांतर नको.

मला माहीत नव्हते की येथे (या चर्चेमध्ये) जे परदेशी बांधव आहेत त्यांनीच लिहावयाचे आहे अहो आम्ही अजून नेपाळ नाही पोहचलो तो जर्मनी काय अन् अमेरीका काय आम्हाला काय ठाव.
मी चूकून दोन वेळा (पण वेगळेगळा) प्रतिसाद दिला व त्यामुळे चर्चे मध्ये आलेल्या खंड ह्या बद्दल माफी असावी.

धन्यवाद.

वर* लिहिल्याप्रमाणे कोणावरही राळ उडवण्यासाठी या चर्चेचा वापर करू नये
?

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

गैरसमज नको

मला माहीत नव्हते की येथे (या चर्चेमध्ये) जे परदेशी बांधव आहेत त्यांनी लिहावयाचे आहे

असे कोठेही म्हटलेले नाही, कृपया वाक्यांचा विपर्यास नको. चर्चेच्या शीर्षकापासून मसुद्यापर्यंत चर्चा परदेशी मराठी मंडळांसाठी आहे, कारण सदस्यांच्या प्रतिसादातून काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. एखाद दोन विषयांतरीत प्रतिसाद बरे वाटतात/ चालून जातात परंतु चर्चेचा रोख बदलावा असे चर्चाप्रस्ताविकेला वाटत नाही. (वरील प्रतिसाद लिहिला तोपर्यंत नंदन, विकास आणि खिरे यांचे प्रतिसाद आले नव्हते, त्यामुळे चर्चेचा रोख बदलतो आहे की काय असे वाटणे गैर नाही असे वाटते.)

अर्थात, यात माफी मागण्यासारखे किंवा गैरसमज करून घेण्यासारखे काहीच नाही.

स्वदेशातील मराठी मंडळे, जसे इतर राज्यांतील मराठी मंडळे वगैरे यावर चर्चा होणे हे ही उत्तम आहे परंतु ती चर्चा वेगळ्या चर्चाप्रस्तावाखाली किंवा इतरत्र व्हावी. या चर्चेत नको इतकेच म्हणायचे होते.

माझा अनुभव

भारतीय/मराठी जेवण मिळतं या कारणामुळे पहिल्या वर्षी विद्यार्थीदशेत महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना मी हजेरी लावली. दुसर्‍या वर्षी समितीत सहभागी झालो. गेल्या वर्षभरात अध्यक्ष म्हणून काम केले आणि या वर्षी जरी समितीमध्ये नसलो, तरी अधूनमधून स्वयंसेवकगिरी करत असतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आणि आयोजक म्हणून गाठीशी असणार्‍या ह्या थोड्याशा अनुभवाच्या जोरावर ही प्रतिक्रिया देतो आहे.
अध्यक्ष म्हणून म्हणा किंवा आयोजक म्हणून, पुढील अडचणी येत असतात. अर्थात, यात सामान्यीकरण करण्याचा, सरसकट अमेरिकेतील मराठी मंडळींना दोष देण्याचा हेतू नाही.

१. आर्थिक पाठबळाची समस्या -- वर्षभरात साधारण जरी सहा कार्यक्रम जरी बसवायचे ठरवले (संक्रांत, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, क्रीडा दिवस, नाटके, सहल, गणपती, कोजागिरी/दांडिया, दिवाळी यापैकी), तरी जेवण, हॉलचे भाडे, इन्शुरन्स, इतर खर्च पकडला तरी एका माणसामागे दर कार्यक्रमाला साधारण ८ ते १० डॉलर्स खर्चावे लागतात. बहुतांश सभासद खळखळ करत नाहीत, परंतु कधीकधी "अहो, या रेस्टॉरंटमधले जेवण आहे का. त्यांचा बुफे तर ७ डॉलर्सला असतो. तुम्ही कार्यक्रमाचे १० डॉलर्स का घेता आहात?" अशा प्रश्नांनाही तोंड द्यावे लागते.

२. प्रेक्षकांचा प्राधान्यक्रम -- 'लग्नात मुलगी वराचे रुप बघते, मुलीची आई आर्थिक स्थैर्य पाहते, वधूपिता चार लोकांचे मत अजमावतो परंतु इतरेजनांना फक्त जेवणाचा बेत काय आहे याचीच चिंता असते', अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे जेवण हाच मुख्य कार्यक्रम आहे, अशी काही मंडळींची (सर्वच नाही) समजूत असते. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जर १० ते १२ कार्यक्रम, १२ ते १ जेवण, १ ते ३ पुन्हा इतर कार्यक्रम असे असेल, तर साडेबाराशिवाय सभागृह भरत नाही.

दुसरे म्हणजे, प्रेक्षकांत मुख्यत्वे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे विद्यार्थी किंवा नुकतेच नोकरीला लागलेल्या अविवाहितांचा/नवीन दांपत्यांचा. दुसरा म्हणजे ३५-४५ वयोगटातील जोडप्यांचा, आणि तिसरा माहिती तंत्रज्ञानाची लाट येण्यापूर्वी अमेरिकेत वीस-तीस वर्षांपूर्वी येऊन स्थायिक झालेल्या मध्यमवयीन/वृद्ध मंडळींचा. अर्थात, शहरा-शहरामागे कुठला भाग अधिक आहे हे बदलत जाते.

तिसर्‍या गटातली मंडळी आवर्जून कार्यक्रमांना हजेरी लावतात, कौतुक करतात आणि क्वचित कधी आमच्या येथे वाढलेल्या पिढीने मराठी संस्कृती जपली नाही अशी हळहळ व्यक्त करतात. दुसर्‍या गटातील प्रेक्षक हवे असतील, तर लहान मुलांचे कार्यक्रम ठेवणे (वेशभूषा स्पर्धा, नृत्याचे कार्यक्रम किंवा अगदी लहान मुलांसाठी श्लोक म्हणणे, चित्रकला स्पर्धा) अपरिहार्य असते. या कार्यक्रमांचा पहिल्या गटातील मंडळींना जाम कंटाळा येतो, त्यामुळे महाराष्ट्र मंडळ म्हणजे हे असलेच काहीतरी असते, अशी समजूत करून घेऊन ते फिरकत नाहीत.

शिवाय मग ज्यांना शास्त्रीय संगीत की हिंदी ऑर्केस्ट्रा, दांडिया की कोजागिरी, नाटके की क्रीडास्पर्धा अशा प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतातच.

हे औदासीन्य दूर करायचे असेल, तर मुळात प्रेक्षकांकडून प्रतिसाद हवा हे खरं पण त्याशिवाय मंडळांना देखील काही करता येण्यासारखे आहे. म्हणजे, अमेरिकेत वाढलेल्या १० ते १६ वयोगटांतील मुलांचा 'यूथ क्लब' तयार करून त्यांच्यावर कार्यक्रमातील काही भागाची जबाबदारी देणे, केवळ दोन-तीन महिन्यांतून एखादा कार्यक्रम न करता महाराष्ट्र मंडळ हे समस्त मराठी मंडळींकरता एक व्यासपीठ म्हणून सदैव उपलब्ध राहील हे पाहणे. सतत चांगले, वेगवेगळे कार्यक्रम केले की हळूहळू का होईना सभासदांचा प्रतिसाद वाढतो असा अनुभव आहे. मौखिक प्रसिद्धीचा यात मोठा हातभार लागतो. अर्थात, वैयक्तिक गैरसमज, हेवेदावे या गोष्टी असायच्याच पण केवळ अमका अमका मंडळात आहे, म्हणून आम्ही तिकडे जाणं बंद केलं याला काही अर्थ नाही.

इतर भाषकांच्या मंडळांनाही थोड्याफार प्रमाणात याच समस्या भेडसावतात, असे एक-दोघांशी बोलल्यावर ध्यानी आले. गणपती आणि दिवाळी यांना जेवढी गर्दी होते, तितकी इतर महाराष्ट्र मंडळांच्या कार्यक्रमांना होत नाही . हीच गत बंगाली मंडळाच्या दुर्गापूजेची आणि गुजराती मंडळाच्या दांडियाची. तरीही अनेक मंडळे दरवर्षी नाटके बसवणे, महाराष्ट्रातून येणार्‍या कलाकारांचे कार्यक्रम सादर करणे आणि इतर उपक्रम राबवणे (सॅन होजे महाराष्ट्र मंडळाने मराठी विकीपीडीयाला हातभार लावण्यासाठी तेथील निवृत्त मंडळींना उद्युक्त केले होते. मिलिंदराव, यासंबंधी अधिक माहिती देऊ शकतील.), हे सारे करत असतात -- हे कौतुकास्पद आहे. सक्रिय सहभाग जमला नाही तरी हजेरी लावून आपला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा असे वाटते.

[अर्थात, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याने मराठी संस्कृती जपली जाते, असा येथे दावा करायचा नाही. तो चर्चेचा विषयच नाही.]

अगदी मनातलं

नंदन,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अगदी माझ्या मनातलं लिहिल्याप्रमाणे वाटलं.

विशेषतः सदस्यांचे जे गट पाडले ते अगदी पटले. पहिल्या गटाची अनास्था नेहमीच मनाला विशाद देऊन जाते.

दिवाळीला आमच्या मंडळात बाहेरून कार्यक्रम बोलावला जातो. यावेळेस आम्हाला काही इंटरेश्ट नाही हो एकपात्री कार्यक्रमात नाहीतर नाटकांत म्हणून येणं टाळलं जातं किंवा जेवणाच्या वेळेस मंडळी येतात. ४ वाजताचे कार्यक्रम ५ वाजता आणि ६ वाजताचे कार्यक्रम ७ वाजता हे ठरलेले.

समितीत या असे सांगताना अक्षरशः लोकांचे पाय धरणे बाकी राहते. थँकलेस जॉब असतो, तो आम्हाला नको असे सांगितले जाते. याच्या अगदी उलट चित्र आमच्या येथील तेलगू मंडळात दिसते. हा विरोधाभास का ते मात्र कळत नाही.

तुम्ही सुचवलेले पर्याय आवडले.

आभार.

काही समस्या काही उपाय

दिवाळीला आमच्या मंडळात बाहेरून कार्यक्रम बोलावला जातो.

आमच्या कडे मुलांचे कार्यक्रम झाले पण मग ज्यांची मुले काम करताहेत ते सभागृहात बाकिचे बाहेर गप्पा मारण्यात मग्न.

४ वाजताचे कार्यक्रम ५ वाजता आणि ६ वाजताचे कार्यक्रम ७ वाजता हे ठरलेले.

शक्य तितका वेळेवर कार्यक्रम चालू करायचा प्रय्तन् करायचे (अगदीच कमी लोक असली आणि बाहेरचे कलाकार असल्यास जरा सांभाळावे लागते). हळू हळू लोकांना सवय होते.

एक मजेदार उदाहरण

परंतु कधीकधी "अहो, या रेस्टॉरंटमधले जेवण आहे का. त्यांचा बुफे तर ७ डॉलर्सला असतो.

जेंव्हा बॉस्टन भागात प्रथमच उडीपी भवनमुळे दाक्षिणात्य खाद्यपदार्थ मिळू लागले (आता ते बंदझाले आणि पंजाबी रेस्टॉरंट मधे डोसा मिळतो!), तेंव्हा तत्कालीन समितीने ठरवले की आपण अमुक कार्यक्रमासाठी ईडली/मेदू वडा सांबार आणि असेच काही अजून पदार्थ ठेवू या. लोकं एकंदरीत खूष होती. पण उडप्याचा अंदाज थोडा चुकला आणि सांबार थोडेच कमी आले. सर्वांना मिळाले पण जरा हात राखून. पण कुणाला काही प्रश्न नव्हता...

माझ्या ओळखीतील एका (कमिटीवर नसलेल्या पण मधून मधून मदत करणार्‍या) व्यक्तीने कुणाला तरी विचारले की कसा वाटला आजचा मेन्यू? अपेक्षेप्रमाणे उत्तर आले, मेन्यू चांगला होता पण सांबार कमी पडले त्यामुळे जरा कमी खाल्यासारखे वाटले.

तिने लगेच त्यांना शांतपणे आणि सभ्यपणे समजावले: " अहो, असे बघा, माणसे आजकाल ८० वर्षांपर्यंत जगतात असे धरू. त्यात १० व्या वर्षापासून मोठ्या व्यक्तीसारखे खातो असे समजले, तर ७०वर्षे झाली. त्यात ३६५ दिवस आपण दोनदा जेवण, एकदा ब्रेकफास्ट, दुपारचे काहीतरी तोंडात टाकणे असा सर्व हिशेब केला तर एक लाखापेक्षा जास्त वेळा खातो. त्यात एकावेळेस सांबार अर्धी वाटी कमी आले तर काय झाले?" :-)

सही!!!

" अहो, असे बघा, माणसे आजकाल ८० वर्षांपर्यंत जगतात असे धरू. त्यात १० व्या वर्षापासून मोठ्या व्यक्तीसारखे खातो असे समजले, तर ७०वर्षे झाली. त्यात ३६५ दिवस आपण दोनदा जेवण, एकदा ब्रेकफास्ट, दुपारचे काहीतरी तोंडात टाकणे असा सर्व हिशेब केला तर एक लाखापेक्षा जास्त वेळा खातो. त्यात एकावेळेस सांबार अर्धी वाटी कमी आले तर काय झाले?"

मस्तच! हे पाठ करून ठेवते. वापरण्याची संधी मिळणार याची खात्री आहे!!!

मूळ प्रतिसाद अद्यापही वाचलेला नाही, बहुधा उद्या उजाडणार.

अप्रासंगिक रस आणि टिप्पण्या.

तिने लगेच त्यांना शांतपणे आणि सभ्यपणे समजावले: " अहो, असे बघा, माणसे आजकाल ८० वर्षांपर्यंत जगतात असे धरू. त्यात १० व्या वर्षापासून मोठ्या व्यक्तीसारखे खातो असे समजले, तर ७०वर्षे झाली. त्यात ३६५ दिवस आपण दोनदा जेवण, एकदा ब्रेकफास्ट, दुपारचे काहीतरी तोंडात टाकणे असा सर्व हिशेब केला तर एक लाखापेक्षा जास्त वेळा खातो. त्यात एकावेळेस सांबार अर्धी वाटी कमी आले तर काय झाले?" :-)
हा हा..मजेशीर अनुभव आणी मस्त उत्तर. लोकांना उदरभरणात इतका (अप्रासंगिक) रस का असतो नकळे !
पण अश्या उत्तरावर 'आम्ही पैसे मोजले होते म्हणून सांगतो !' हे प्रत्युत्तर नाही आले म्हणजे मिळवली.
-- (प्रासंगोचित) लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)

श्लोक

कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम्|
बान्धवा: कुलमिच्छान्ति मिष्टान्नमितरे जना:||

आठवला :). अशीच धारणा असावी बहुधा.

वा

वा छान. मी सुद्धा तो आठवायचा प्रयत्न करित होतो.
मस्त !!
--लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)

आ?

अक्षरे लाल का होत आहेत काय माहित !
--लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :)

मस्त!

मला हे सुभाषित माहीत नव्हते, आता पाठच करून ठेवीन!

धन्यवाद

मराठी वाचवा! ;-)

हा कार्यक्रम ममं च्या माध्यमातून करण्यासाठी किती पापड बेलावे लागलेत, तुला काय सांगू नंदन.

पापड लाटावे लागले.. लाटण्याने, बेलनने नाही. ;-) असो.

पण पापड लाटण्याचा काही उपयोग झाला का? म्हणजे याविषयी लिहिलेले लेख आठवतात पण प्रत्यक्ष कृती कोणी केली का? किंवा विकिवर सहभाग घेतला का?

विकिपिडिया


(सॅन होजे महाराष्ट्र मंडळाने मराठी विकीपीडीयाला हातभार लावण्यासाठी तेथील निवृत्त मंडळींना उद्युक्त केले होते. मिलिंदराव, यासंबंधी अधिक माहिती देऊ शकतील.),


त्यासाठी मिलिंदरावांनी त्यांचे वर्ग चालवले होते. आम्हाला बी प्रवृत्त करा की. तांत्रिक दृष्ट्या तेवढे सक्षम करा. आम्ही बी खारीचा वाटा उचलू.
प्रकाश घाटपांडे

बरं - हे माझे अनुभव!

कृपया चर्चा परदेशातील मराठी मंडळांवर आहे तेव्हा स्वदेशातील मराठी मंडळांवर यापुढे विषयांतर नको.

प्रयत्न करून पाहीला पण उपयोग होत नाही असे दिसतयं! (ह. घ्या.),त्यामुळे आता मला माझ्या आगामी आत्मचरीत्रातला थोडा भाग येथे आधीच द्यावा लागत आहे!

ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतात की "एक तरी ओवी अनुभवावी". तसेच मला म्हणावेसे वाटते की "एकदा तरी संस्था (त्यात काम करून) अनुभवावी"!

मराठी मंडळावर (न्यू इंग्लंड मराठी मंडळ - बॉस्टन) काम करायचा मला पाच वर्षांचा अनुभव आहे. कुठल्याही संस्थात्मक संघटनेत काम करताना जे काही अनुभव येयला हवेत ते आले, पण कटूता मात्र आली नाही . मला सुरवातीस, मी ज्या कंपनीत काम करायला लागलो तिथल्या एका मराठी व्यवस्थापकाने आग्रह केल्यामुळे मी मंडळात काम करायला लागलो. भांडाभांडी/वादविवाद होऊ शकतात असे एकंदरीत मराठी मंडळांबद्दल बोलले जाते म्हणून म्हणले की येऊन पाहीन, जमले नाही तर क्षमा करा. त्यांनी मान्य केले. त्या वेळी जे अध्यक्ष होते ते अगदी मेटिक्यूलस होते. त्याचा चांगला प्रभाव पडला. सर्व कार्यकारीणी माझ्यापेक्षा मोठ्या वयाची आणि .कॉमच्या आधीच्या काळातील होती त्यामुळे मध्यमवर्गीय मराठी कुटूंबांचे वागणे असायचे. काही पटायचे काही वेळेस समजायचे नाही....

त्याच सुमारास बी एम एम बॉस्टनच्या तयारीची सुरवात चालू झाली. त्यामुळे बी एम एम बॉस्टनच्या बिझिनेस कन्व्हेन्शनच्या कमिटीत सामील झालो. बी एम एम बॉस्टन अतिशय यशस्वी झाले - नुसता कार्यक्रम म्हणून नाही तर "टिम वर्क" म्हणून ही. याचा अर्थ असा नाही की कुठे "भांड्याला भांडे" लागलेच नसेल, ते कुठेही लागते. पण "हा आपल्या गावात कार्यक्रम होतो आहे, तो माझा कार्यक्रम आहे" या प्रकारची एक वृत्ती सर्वांमधे तयार झाली होती आणि ते त्या अधिवेशनाचे खरे यश होते.

त्यानंतरच्या वर्षी खरे म्हणजे मी बाहेर पडणार होतो पण उपाध्यक्ष होण्याचा आग्रह धरला. सर्व नवीन आणि समवयस्कर प्रतिनिधी म्हणून त्या वर्षी प्रथमच आले. वेगळाच उत्साह होता. त्यामुळे आधीपेक्षा वेगवेगळे कार्यक्रमही झाले. गणपतीच्या वेळेस फक्त मुलांसाठी स्पर्धा न होता गृहीणींसाठी मोदक स्पर्धा तसेच अजूनही काही कार्यक्रम झाले. एकंदरीत मजा आली. एक तक्रार नवीन लोकांची असते/असायची की मंडळात लोकं आपापले ग्रूप्स करून बसतात त्यामुळे आम्हाला यावेसे वाटत नाही. त्यात तथ्यही असते. या वरून ओळखी करण्याचा प्रयत्न ही झाला, पण तो पुरेसा होत नाही. वास्तवीक याबाबत माझे मत जरा वेगळे होते. आपण नवीन ठिकाणी येतो, नवीन ठिकाणी काम करायला लागतो, सर्वत्र लगेच ओळखी होतात का? पण आपण ते मान्य करतो आणि रूळतो. मी असल्या लष्कराच्या भाकर्‍यांची आवड असल्याने कोणी ओळखीचे नसूनही गेलो आणि हळू हळू ओळखी झाल्या. तीच गोष्ट अजून काही मित्रांची . असो.

नंतरच्या वर्षी तसा अचानकच अध्यक्ष झालो कारण अध्यक्षांना कामानिमित्त बाहेर जावे लागले. मंडळात सातत्य राहण्यासाठी थांबायचे ठरवले पण अध्यक्ष होण्याचा सुरवातीस विचार नव्हता. एका अर्थी नव्याने .कॉम मुळे येणार्‍या नवीन समवयस्क पिढीचा आणि आधी आलेल्या पिढीबरोबर काम केलेला असा एक दुवा झालो. पण आधीच्या पिढीतील तसे कोणीच नवीन कमिटीवर नसल्याने काहीजणांना (जुन्याजाणत्यांना) जरा "कल्चरल शॉक" बसला. (नंतर् कोणीतरी म्हणल्याप्रमाणे कामराज प्लॅन न ठरवता, विना उद्देश झाला...) . कारण जी नव्यांची तक्रार (कोणी ओळखीचे नाही) तीच जुन्यांची.. त्यात मी लहान वाटत असल्याने मग मला सुचना करायला अनेक फोन येयचे, अरे असे कर, करू नकोस, अमुक आवडले नाही, आणि अर्थातच नवीन कमिटी चांगले काम करत आहे असे सांगणारे पण फोन असायचे. त्यावर्षी मंडळात १२ महीन्यात १३ कार्यक्रम झाले. त्यात दोनदा नाटके झाली, एक एकपात्री (भक्ती बर्वे), एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, संक्रांत, होळी-पाडवा (मराठी चित्रपट), गणेशोत्सव, कार्यक्रमाच्या वेळेस स्पर्धा, (मोदक स्पर्धा, मुलांची श्लोक स्पर्धा, मोठयांसाठीरैंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधण्याची स्पर्धा - ह्यात खूप मजा आली होती), सत्यनारायण, स्थानीक सहल, दिवाळी, स्थानीक मराठी लोकांचे भारतीय कार्यक्रमात (स्वातंत्र्यदिनाच्या) प्रायोजन करणे, स्थानीक देवळात दाक्षिणात्य जास्त असल्याने गनपतीच्या वेळेस त्यांना वाटे की मराठी माणसांचा हा सामाजीक सण असून ते नसतात, मग त्या वर्षी मंडळाच्या (फक्त कमिटीच्या नाही) सदस्यांनी उत्साहाने स्वैपाकातीला काही भाग (काहीशे माणसांसाठी) केला, तिथे पुजेला जोरात आरत्या म्हणून गणपती बाप्पा म्हणले वगैरे, सत्यनारायणाच्या पुजेस जमणारी दक्षिणा पुजा सांगणार्‍यांची परवानगी घेऊन भारतात काम करणार्‍या संस्थेस दिले. बी एम एम मधे मिळालेल्या पैशांमधून जे व्याज मिळते त्यातून परत मंडळ सदस्यांना परत देयचे असते (स्वस्तात कार्यक्रम वगैरे), तो दिलाच पण मराठी चित्रपटांच्या कॅसेटस एका स्थानीक ग्रंथालयात ठेवल्या. इत्यादी इत्यादी.

पण हे सर्व झाले ते कमिटीत उत्साही आणि मनापासून आलेली लोकं होती आणि यातील प्रत्येक कल्पना सुचवायचे म्हणून. आणि अर्थातच घरात (कधी त्रागा झाला तरी) समजून पेशन्स ठेवणार्री सहचारीणी असल्यामुळे. आधीच्या अध्यक्षांबरोबर, कमिटींबरोबर शिकलो आणि स्वतःच्या काही गोष्टी त्यात घातल्या. एक महत्वाचे म्हणजे सार्वजनीक संस्था आहे त्यामुळे त्याचा ताळेबंद हिशेब वर्षाअखेरीस दिला (शिवाय तोही लाल रंगात नाही!). त्यामुळे जे थोडे लोकं माझ्यावर लहान आहे वगैरे म्हणत वागायचे त्यांनी कौतूक करायला फोन तरी केले किंवा गप्प झाले. अर्थात हे परत शक्य झाले कारण तसे खजीनदार होते ज्यांनी पैशाचा चोख हिशोब ठेवला, कार्यक्रम न बघता बाहेर बसताना कुरकुर केली नाही की कोणी काही वेड्या सारखे बोलले (इतके कसे पैसे, यावेळीस तरी खाणे मिळणार का वगैरे..) तरी शांतपणे दुर्लक्ष केले.

हे सर्व होत असताना सतत बघावे लागायचे की कुठे विसंवाद (मिसकम्यूनिकेशन) होत नाही आहे ना, कमिटीत अथवा इतरांशी. कधी कधी काही निर्णय घेताना, कार्यक्रम ठरवताना एखाद्याला आवडणे न आवडणे होयचे पण त्या वेळेस स्वतःकडे वाईटपणा घेण्याची तयारी ठेवावी लागते. पण शक्यतो त्यातून व्यक्तिगत वितुष्ट येऊन न देता. एका गोष्टीचा त्रास होयचा म्हणजे लोकं आर एस व्ही पी करायची नाहीत, त्यामुळे कधी जेवण जास्त तर कधी कमी. कमी असले की काही लोकं कुरकुर करणार (तरी $५ च्यावर खाण्याचे तिकीट ठेवत नसू) त्यातून मग तक्रारी, मागे बोलणे किंवा मंडळाच्या कार्यक्रमाला येऊन वाद घालणे असे १-२% लोकं असतातच. जास्त असले आणि मग उरले म्हणून शेवटी असलेल्या लोकांमधे वाटले की म्हणणार घरी घेऊन जाण्यासाठी ठेवले! (तरी बरं कोणालाही ते वातले जायचे आणि असे किती दिवस त्यातून पोट भरणार!) पण जरी त्रागा झाला तरी दुर्लक्ष आणि कधी कठोर व्हावे लागायचे, पण ते तेव्हढ्यापुरते मर्यादीत ठेवता येणे महत्वाचे असते. कारण अहंकार ठेवून कुठलेही सार्वजनीक काम करता येत नाही. जरी संपूर्ण अहंकार घालवणे शक्य नसले तरी तसे प्रयत्न करत काम करावे लागते. जी गोष्ट आपण स्वेच्छेने स्वयंसेवी म्हणून करतोय त्यामुळे जर रात्री झोप लागणार नसली अथवा डोक्यात नकारात्मक विचार वाढीस लागणार असले तर माझे म्हणणे आहे की त्यापेक्षा करू नका. पण जर हे थोडाफार त्रास होऊन का होईना करण्याची तयारी असेल तर अवश्य करा कारण त्यात आपली नकळत मानसीक वाढ होत असते, कमितकमी स्वत:च्या व्यावसायीक आयुष्यात मनुष्य स्वभावाला तोंड देताना तर ते जाणवतेच. त्याचे चांगले फायदे हे त्यातल्या कटकटींपेक्षा जास्त ठरू शकतात. शिवाय आपण काहीतरी स्वत:बाहेर जाऊन चांगले करतो ते वेगळेच.

संघटना या त्या त्या वेळच्या व्यक्तींच्या एकत्रीत येण्यामुळे चालतात किंवा गुमान पडून राहतात! पण संस्थेच्या जीवनात कधी स्थितीस्थापकत्व येऊ नये असे वाटते. म्हणजे, एखाद्या व्यक्तीने कायम अध्यक्ष राहू नये अथवा त्याच त्याच लोकांनी कमिटीत पण राहू नये. त्यामुळे नवीन कल्पनांना वाव मिळत नाही. तसेच आपण नसले तर संस्था चालणार नाही हा अहंकार स्वतःस आणि त्या संस्थेस मारक असतो. भले चुका होऊ देत, एखादी गोष्ट न आवडूदेत त्यावर बोला, पण नवीन लोकं (ज्यांनी आधी काम केले नाही अशी नवीनची व्याख्या) येऊदेत. त्यामुळे नंतर मंडळातून बाहेर आलो पण मंडळातील नवीन लोकांना मदत करण्यापासून अथवा (विचारले तरच) मार्गदर्शन करण्यापासून नाही. फायदा म्हणाल तर एक नक्की झाला - कुटूंबच्या कुटूंबांमधे आधी काही ओळख नसताना देखील कायम स्वरूपी मैत्री झाली आणि परदेशात राहत असून पुढच्या पिढ्यांना स्थानीक मावश्या-काका मिळाले...

धन्यवाद

मला माझ्या आगामी आत्मचरीत्रातला थोडा भाग येथे आधीच द्यावा लागत आहे!

सर्वप्रथम आपल्या आगामी आत्मचरित्राला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!! :)) आणि विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मुद्दे पटण्यासारखे आहेत हे वेगळे सांगायला नकोच.

एक तक्रार नवीन लोकांची असते/असायची की मंडळात लोकं आपापले ग्रूप्स करून बसतात त्यामुळे आम्हाला यावेसे वाटत नाही. त्यात तथ्यही असते.

याबाबत मात्र आमच्या ममं मध्ये उलट दिसते आणि याचे कारण हे मंडळ रिलेटिवली लहान असावे. जसे, आम्ही नव्याने सदस्यत्व घेतले तेव्हा ओळखपाळख नसताना अनेकजण जवळ येऊन विचारपूस करणे, किंवा घरी येण्याचे आमंत्रण देणे अशा गोष्टी घडल्या. बहुधा त्यामुळेच मला मंडळाविषयी आपुलकी वाटली परंतु नंदनने गट पाडल्याप्रमाणे हे करणारी मंडळी तिसर्‍या गटातील. ( माहिती तंत्रज्ञानाची लाट येण्यापूर्वी अमेरिकेत वीस-तीस वर्षांपूर्वी येऊन स्थायिक झालेल्या मध्यमवयीन/वृद्ध मंडळींचा. ) पहिला गट हा आपल्याच मित्रमंडळीत-गटात रममाण असतो.

अहंकार ठेवून कुठलेही सार्वजनीक काम करता येत नाही.

मला वाटतं की एखाद्याला अशा समितीवर काम करायचे असेल तर हा 'थँकलेस जॉब' आहे, लोक पाठून वाईट बोलणार, ना ना प्रश्न विचारून भंडावून सोडणार, प्रसंगी अपमानही होणार हे लक्षात घेऊनच काम करायला हवे. जर समितीवरील मंडळी विचारांची पक्की असतील तर बरीच कामे सुरळीत पार पडतात असे वाटते आणि प्रसंगी होणारी प्रशंसा सुखावून जाते.

'थँकलेस जॉब'

'थँकलेस जॉब'हा शब्द अगदी योग्य आहे. आणि तसा तो कुठल्याही सार्वजनीक कामात असतो, असे गृहीत धरून (पण पॉझीटीव्ह विचारांनी) जर आपण करू लागलो तर यश मिळेल याची १००% खात्री देणार नाही पण १००% अपयश मिळणार नाही एव्हढे मात्र नक्की म्हणीन. या वरून बिल कॉस्बीचे एक छान वाक्य आठवले, " I don't know the key to success, but the key to failure is trying to please everybody."

खरंय!

विकासराव,
तुम्ही अनुभव तर सुरेख दिला आहेच. वाचायला आवडला!

अनुभवाचे बोल व प्रबोधनही आवडले. काही प्रमाणात प्रेरणाही मिळाली.

मला ही असे असे कडू गोड अनुभव आले आहेत. काही भारतातले भेद तसेच्या तसे इथे घडतानाही पहिले आहेत. (बोलता बोलता 'आडनाव काय म्हणालात?' असं त्याने विचारून, मी ते सांगितल्यावर इतकावेळ आरामात गप्पा मारणारा बहुदा एकारांत माणूस चक्क न बोलता चालायलाच लागला! मी चाट नि खुप अस्वस्थ झालो होतो!)

मग 'आम्ही पुण्याचे' - 'आम्ही मुंबईचे (त्यात परत आम्ही दादर तुम्ही डोंबिवली चे असे ही?)' असे भेदही दिसले. (यात काय विशेष असते ते कळले नाही असो.) यात ही दोन गावे सोडून बाकीचे सगळे ग्रामीण असे काहीसे :)
मला अगदी उपरेपणा जाणवला. मग माझा पण उत्साह गेला... काही दिवस फिरकलोच नाही. महा. मं. मध्ये जाऊन तरी काय करायचे? उगाच परत तेच नि तेच असे वाटले
त्यापेक्षा नकोच ते!! थोडक्यात युटिलिटी व्य्हॅल्यु (सतत तीच असावी असा अजिबातच आग्रह नाही/नव्हता पण इतर भावनिक काही मिळत नसेल, तर ते तरी असं. ) तर काहीच दिसत नव्हती बाकी 'इतर बरेच काही' दिसत होते!

(खरं तर तेव्हढा एकच अनुभव होता, अशी धारणा करुन घ्यायला नको होती असे नंतर वाटले!)

पण आता ते विचारही मागे टाकले.
अर्थात, "अरे हे आहे म्हणून यायचेच नाही असे कसे? आपणच हे चित्र बदलायचे आहे... तर ये आता मंडळात." असा एका जवळच्या मित्राने दिलेला आग्रहाचा सल्लाही कारणीभूत आहेच! या वर्षी सदस्यत्व घेतले आहे. कार्यक्रमांनाही नियमित पणे (धडपडत वेळेवर जाण्याच्या प्रयत्नासह!) जातो आहे. आवडायलाही लागले आहे... मागच्यावेळी भेटलेली मंडळी नशिबाने आताशा दिसतही नाहियेत!!
या वर्षी तर मंडळाचा मुख्य कार्यभार फक्त तरुण मंडळीच सांभाळत आहेत असे दिसले.
त्यांचे काही कार्यक्रम नोंद घेण्यायोग्य होते.
परिसंवाद /चर्चा - घरात मराठी बोलावे की इंग्रजी?
(तरुण जाणत्या झालेल्या मुलांचा सूर चक्क घरात मराठीच असावे असा होता... हा एक मोठा आशादायक भाग वाटला)
मराठी गाण्यांचा सुरेख कार्यक्रम - सादरीकरण, सूत्रसंचालन वगैरे सगळे काही तरुण मंडळी (... अर्थाच कार्यक्रम जोषपूर्ण नि जोरदार! सिडनीच्या म. संमेलनातही चांगल्यापैकी गाजला!)
मुलांनीच बनवलेला साधासा नेटका जेवणाचा मेनूही डोकेबाज वाटला!

एकूणच महा. मंडळ एका कंपूचे नसून 'आपलेही' आहे, असे काहीसे वाटायला लागले आहे... :) कदाचित काही दिवसात काही पेलेल तितकी जबाबदारीही घेईन.

-निनाद
(आवांतर: इथे उपक्रमावर नवीन येणार्‍या सदस्यांनाही असाच उपरे पणाचा अनुभव जाणवत असेल का?)

अवांतरः उपरेपणा

इथे उपक्रमावर नवीन येणार्‍या सदस्यांनाही असाच उपरे पणाचा अनुभव जाणवत असेल का?

तुम्ही सांगितलेले अनुभव विशेषत: आडनावाच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच येतात आणि सर्वत्रच येतात. आडनाव सांगितल्यावर जर त्यावरून तुमची नेमकी जात कळत नसेल (जसे, देसाई, देशपांडे, राव, कुलकर्णी) तर प्रश्न अधिकच खोलात शिरून विचारले जातात तेव्हा उबगही येतो.

हा अनुभव उपक्रमावर सध्या तरी फार कमी प्रमाणात येत असावा कारण येथे त्यामानाने कमी सदस्य आहेत आणि फारशी कंपूबाजी दिसत नाही. इतरत्र मात्र असे अनुभव घेतले आहेत.

एकूणच महा. मंडळ एका कंपूचे नसून 'आपलेही' आहे, असे काहीसे वाटायला लागले आहे

असे वाटणे उत्तम आहे कारण कोणा एका कंपूची किंवा काही सदस्यांची मक्तेदारी इतरांना कंटाळवाणी होऊ लागते. ती होऊ नये म्हणून इतरांनी मजा बघत गप्प न बसता नव्या सदस्यांना सांभाळून घेण्याची, मदत करण्याची तयारी दाखवणे गरजेचे आहे.

चर्चा चालू द्या

चर्चा वाचताना मजा येत आहे. आमचे दाणापाणी मातृभूमीतच असल्याने या चर्चाप्रस्तावावर मतप्रदर्शन करणे अवघड जात आहे. मात्र राज जैन व निनाद यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील मंडळांमध्ये आडनाव ऐकल्यानंतर अंगावर पाल पडल्याप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली जाते असा अनेक मित्रांचा अनुभव आहे.

असो. विषयांतर नको.

उपक्रमावर नवीन येणार्‍या सदस्यांना उपरेपणाचा अनुभव जाणवत नसावा असे वाटते.


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

वेगवेगळा ऍप्रोच

वरील सर्वांचे म्हणणे, अनुभव कॉमन आहे. पटते आहे. थोडक्यात सुचवतो, सगळीकडे हे घडते का माहीत नाही, असेल देखील. पण करून बघण्यासारखे आहे.
बरेचदा एक कार्यकारणी सगळे आयोजन करते, श्रेय कमी नावे जास्त ठेवली जातात अगदी तोंडावर नाही तरी ..
१) ज्या त्या भागातील इतर यशस्वी संस्था आहेत (इतर धर्मीय, राजकीय, सामजीक, सांस्कृतीक्) त्यांची आपल्याला पचतील अशी व्यवस्थापननीती आणली, (मारुन मुटकून / अनीहाऊ) सदस्यांकडून काय कार्यक्रम हवे ते लिहुन घेतले व त्यातील निवडले तर सहभाग जास्त असेल,( हे सहज होणारे काम नाही ) पण समजा दर दिवाळीला पुढील वर्षी काय हवे ते ईमेल ने पाठ्वा शक्यतो "टीक" करता येईल असा फॉर्म किंवा ऑनलाइन सर्व्हे.
२) मंडळाच्या संकेतस्थळावर असे (चर्चा) व्यासपीठ सदस्यांसाठी उपलब्ध करुन् देणे, जेणे करुन लोकांचा सहभाग वाढेल मग आपसुक हे आपले आहे ही भावना, पाठींबा व वाढता सहभाग
३) लहान मुलांसाठी, तरुण मुलांसाठी स्वतंत्र विभाग करुन त्याचे व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपवणे.
४) मराठी मंडळ हे मराठी (थोड संकुचीत वाटतय, मराठी येत असलेल्या, किंवा सहभागी होऊ इच्छीणार्‍या) माणसाठीचे मंडळ हवे, मराठी सांस्कृतीक् मंडळ नको. तेथील (जेथे रहाता तेथील, त्या काळातील, फक्त महाराष्ट्र|तल्या, आपल्या लहानपणच्या आठवणीतल्या मराठमोळ्या वातावरणतील नाही) मराठी माणसाच्या व तेथील सामाजीक आयुष्याचा त्यात ठसा, चालीरीती (लगेच नकरात्मक दृष्टीकोन नको, परदेशातील सर्व काही वाईट नसते) आल्यातर पुढील पीढीला पण आजी आजोबा, आई बाबांचे मंडळ न वाटता त्यांचे मंडळ पण वाटेल.
५) लहान मुलांना लेखी मराठी शिकवायची सोय असावी.
बाकी आपण मराठी माणसे, जर का कोणाला (कोणीही असो) नावे नाही ठेवू शकलो तर थू आपल्या मराठीपणावर....ह. घ्या.

मंडळाचे संकेतस्थळ

सहज,

आपण म्हणत असलेल्यातील एक "सहज" शक्य असलेला ऍप्रोच म्हणजे :मंडळाच्या संकेतस्थळावर असे (चर्चा) व्यासपीठ सदस्यांसाठी उपलब्ध करुन् देणे. ही कल्पना खरेच चांगली ठरू शकेल.

बाकी मंडळात कुणालाही येता येऊ शकतं. जेंव्हा आंतर्देशीय विवाह असलेले लोकं येतात तेंव्हा त्यांचे इतर (भिन्न) वंशीय "बेटर हाफ" पणं येतात. गणपतीला कधी कधी मुंबईतून आलेले गुजराथी पण येतात.

मराठी मंडळ हे मराठी (थोड संकुचीत वाटतय, मराठी येत असलेल्या, किंवा सहभागी होऊ इच्छीणार्‍या) माणसाठीचे मंडळ हवे, मराठी सांस्कृतीक् मंडळ नको.

आपला हा मुद्दा न पटणारा आहे. मंडळ हे मराठी माणसासाठीच तर असते. त्यात सांस्कृतीक कार्यक्रम पण येणारच - म्हणजे संक्रांत, गणपती, दिवाळी इत्यादी. त्या वयतिरिक्त बाकीचे कार्यक्रम पण होतातच की . त्यासाठी कोणी धोतर-लुगडी नेसून येत नाही. आजकाल झब्बे घातले तर ते झी टिव्हीच्या प्रभावाने असे म्हणावे लागेल. बाकी इथले वाईत आहे असे कोणीच म्हणत नसते. ते प्रत्येकजण आपापल्या आवडिनिवडीप्रमाणे "एन्जॉय" करतेच पण त्याचा मराठीशी काहीच संबंध लागत नाही. उ. दा. मराठी मंडळाने तरूण मुलांना आकर्षीत करायला उद्या "डान्स फ्लोअर" वर डान्स करायला दिला, तर् ते काय कुठेही मिळते त्याला मराठी मंडळ कशाला हवे आहे? एक प्रयत्न झाला आहे जरी कमी प्रमाणात तरी - तो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे.

लहान मुलांना लेखी मराठी शिकवायची सोय असावी.

बॉस्टनमधे त्यासाठी शिशूभारती आहे आणि ते ज्या भाषांसाठी विद्यार्थी आहेत त्या शिकवतात. मराठी मुले बरीच असतात, ही शाळा दर रविवारी न चुकता असते.

यस

मंडळात कुणालाही येता येऊ शकतं
हो. तसे पण (९९.९९% वेळा ) इतर कोणी आले तर आपण नाही म्हणत नाही.
माझे वाक्य "मराठी मंडळ हे मराठी माणसाठीचे मंडळ हवे, मराठी सांस्कृतीक् मंडळ नको." हे मला माझ्या टिप्पणी शिवाय ((थोड संकुचीत वाटतय, मराठी येत असलेल्या, किंवा सहभागी होऊ इच्छीणार्‍या) )संकुचीत वाटले. "मराठी"च्या सेवेला नाही तर मंडळात येणार्‍यांच्या अपेक्षा / गरजा भागवणारे मंडळ असे म्हणायचे आहे.

तसेच "मराठी सांस्कृतीक् मंडळ नको." मधे "फक्त "मराठी सांस्कृतीक् मंडळ नको." असे हवे होते. जर परदेशी वातावरणात वाढलेल्या मराठी मुलांना त्या नेहमीच्या सांस्कृतीक कार्यक्रमात रस राहीला नाही , ते जसे मोठे होतील तसे. तर त्या युवा पिढीला अगदी पुर्णपणे आर्कषीत नाही करू शकलो तरी त्यांना यावस वाटेल, त्यांची रुची राहील असे काहीतरी असावे असे मला म्हणायचे आहे. डान्स फ्लोअर किंवा अजुन काही हे ज्या त्या मंडळाने ठरवायचे. लहान असताना आईवडलांबरोबर येतात मुले, मोठे झाले की काय ह्या बाबत मी विचार करतोय.

एक प्रयत्न झाला आहे जरी कमी प्रमाणात तरी - तो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे.
यु गॉट द पॉईंट.

जेथे जेथे मराठी मंडळ तेथे किंवा त्या गावात / भागात लेखी मराठी शिकवायची व्यवस्था झाली तर उत्तम किंवा सोपे म्हणजे परत आंतरजालाचा वापर, ऑनलाईन सोय झाली तर उत्तमच. मराठी शिकलेले पालक, आजी आजोबा असा अभ्यासक्रम स्वता शिकुन मुलांना घरच्या घरी शिकवू शकतील. जेष्ठ व तज्ञ सभासद जर का असा अभ्यासक्रम विकसीत करु शकले तर सहीच.

चांगला उपाय आहे

सहज,

तुम्ही सुचवलेले सुधारित उपाय आवडले. होतं काय की कोणतेही अतिरिक्त कार्यक्रम करायचे झाले की पैशांची गरज लागते आणि बरेच उपक्रम तेथेच बारगळतात.

तो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे

हा उपाय उत्तम. ऑनलाईन चर्चांत भाग घ्यायला लावणे हा ही उत्तम उपाय.

येथे एक गोष्ट आमच्या मंडळाबाबत सांगावी लागते की आमच्या शहरात आयटी तंत्रज्ञांची संख्या कमी आहे. बाकीची लोकसंख्या तिसर्‍या गटातील किंवा संगणकाशी फारशी जवळीक नसलेली 'नेटसॅवी नसलेली' आहे. मंडळाच्या वेबसाईटवर भाग घ्या/ प्रतिक्रिया लिहा/ संस्थ तपासत जा/ सूचना द्या असे कानी कपाळी ओरडून अद्याप फारसा प्रतिसाद दिसत नाही. अर्थात, ओरडण्याची संधी सोडत नाही, तेव्हा माघार घेतलेली नाही. :)

हे योग्य!

एक प्रयत्न झाला आहे जरी कमी प्रमाणात तरी - तो म्हणजे इथले (अमेरिकेतील) आपले सामाजीक विषय घेऊन त्यावर नाटक करणे.

अगदी योग्य... उगाच संगीत मानपमान वगैरे बसवण्यापेक्षा सुसंगत वाटते...!

तसं आता आमच्या कडे हिंदी इंग्रजीचा मारा इतका आहे की महाराष्ट्रात प्रत्येक गावा एक मराठी मंडळ काढायची वेळ आली आहे!
एक शीललेख पण हवा "इस क्षेत्रमे सन २००० से पहले मराठी भाषा बोली जाती थी, कहते है की इस भाषा मे वर्तमान पत्र कुछ महाजला स्थल भी कभी हुआ करते थे"

आपला
हरियाणवी अतो ऍग्रेसिव हिंदी भाषीकांनी वैतागलेला
गुंड्या

हा हा...

गुंडोपंत
सा रम्या पुण्यनगरीमध्ये शनवारवाड्यासमोर हा फलक लावावा काय?

अवांतर: शनवारवाडा हा शुद्ध शब्द आहे याची नोंद शुद्धपंडितांनी घ्यावी.


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

अगदी मार्मिक विवेचन

तुमचे मूळ विचार अगदी मार्मिक आहेत.

ही मराठी मंडळांची अनास्था इथल्या बे एरियातल्या महाराष्ट्र मंडळातदेखिल जाणवते. सर्व प्रतिसाद वाचले नाहित पण नंदन यांचा प्रतिसाददेखिल उच्च आहे. मला वाटते मराठीशी आणि पर्यायानी आपल्या संस्कृतीशी कमी कमी होणारं नातं नंदन ह्यांनी दिलेल्या वर्गिकरणात (आणि माझ्या प्रत्यक्ष अनुभवात) दिसून येते. याचमुळे तिसर्‍या गटातील लोक जिथे जास्त (उदा. न्यू जर्सी) तिथे संस्कृतीक कल जास्त तर अफाट प्रयत्न करुनसुद्धा जिथे पहिल्या गटातील मंडळी जास्त (उदा. बे एरिया) तिथे सहल, क्रिडा, ऑर्केस्ट्रा इत्यादींवर जास्त भर. इथे म्हणूनच 'कला' नावाची केवळ मराठी सांस्कृतीक कार्यक्रम करणारी एक वेगळी संस्था आहे - महाराष्ट्र मंडळाशी त्याचे सलोख्याचे संबंध आहेत (असं बाहेरून तरी वाटतं), पण आपल्या आवडी आणि कार्यक्षेत्र वेगळं आहे हे जाणून दोन्ही संस्थांमध्ये दिसणारे लोकही वेगळे असतात. बे एरिया सारख्या मराठी लोकांचा सुळसुळाट असलेल्या ठिकाणी सुद्धा ह्या दोन्ही संस्थांचे कार्यक्रम क्वचितच तुडुंब भरलेले असतात.

उपाय काय? तर मला वाटतं की इंग्रजी आणि पाश्चात्य वळणाच्या आवडी तसेच हिंदी / उर्दू आणि बॉलिवूड मधून आलेल्या आवडींचं प्रभुत्व येती काही वर्ष तरी असणार आहे, हे प्रथम आपण मराठी प्रेमींनी मान्य करायला पाहिजे. आणि आपली अपेक्षा आपण त्याप्रमाणेच मोजकी ठेवली पाहिजे. जसे आपल्याला मराठी कार्यक्रम,नाटकं, शास्त्रीय संगीत, भावगीतं आवडतात तशीच ती सर्वांना आवडतील अशी अपेक्षा ठेऊ नये. कारण तूर्तासतरी अशी लोकं कमीच असणार आहेत. अगदी महाराष्ट्रात आणि पुण्यात देखील अशी मंडळं काढायचा प्रस्ताव त्यामुळे अगदी स्तुत्य आहे. पण विषयावरून न भरकटता - अशा कमी गर्दीची अपेक्षा करून जर कार्यक्रम योजले, तर मग प्रत्येक कार्यक्रमाचा प्रवेशशुल्क वाढवला पाहिजे असे दिसते - अर्थातच हा आपल्या जगावेगळ्या आवडींसाठी द्यायचा "जिझिया" कर आहे.

पण मला आशा वाटते की ही परिस्थिती काही वर्षांनी सुधारेल. स्वतःच्या अनुभवावरुन सांगतो, कि ज्या पाश्चात्य संस्कृतीत अगदी लहानाचा मोठा झालो (भारतातच) त्याच्याबद्दल मला अजूनही आपलेपणा आणि सहजता वाटत नाही. निखळ आनंद मिळतो तो बरेचदा नवीन मराठी कार्यक्रमातूनच. पण ह्या गोष्टींचं महत्व कळायला काही वर्ष दुसर्‍यांची उसनी वस्त्र स्वतःचे अलंकार म्हणून मिरवायला लागतात आणि त्यानंतरच ती कितीही आपलीशी केली तरी आपली होत नाहित हे जाणवतं.

खिरे

हम्म! खरं आहे

ह्या गोष्टींचं महत्व कळायला काही वर्ष दुसर्‍यांची उसनी वस्त्र स्वतःचे अलंकार म्हणून मिरवायला लागतात आणि त्यानंतरच ती कितीही आपलीशी केली तरी आपली होत नाहित हे जाणवतं.

हे म्हणणं खरंच आहे, मला पटतही... पण काय कोणास ठाऊक इतकी अनास्था मनाला त्रास देऊन जाते.(विशेषतः पहिल्या गटाचे ह्यॅ! मराठी कार्यक्रम काय? अशा तर्‍हेचे उद्गार ऐकले की विशाद वाटतो. एक मजेशीर गोष्ट पाहिली आहे की आमच्या मंडळात त्यामानाने अमेरिकेत जन्मलेली मुले कार्यक्रमात रुची दाखवतात. आम्ही गाणी शोधतो, कार्यक्रम बसवतो इ. सांगतात तेव्हा बरंही वाटतं.)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

चॅरीटी बिगीन्स ऍट...

या सर्व मंडळांबद्दल बोलताना आणि त्यातही पुढच्या पिढीच्या संदर्भात बोलताना एक गोष्ट जाणून करणे गरजेचे आहे ते म्हणजे घरात मराठी संवाद "सहज" करणे. सहज अशासाठी म्हणले कारण त्यात मुलांना मजा वाटली पाहीजे, त्या भाषेबद्दल प्रेम वाटले पाहीजे त्यात जाच नसावा. मी येथे आधीच्या पिढीतील असे बरेच जागृक पालक पाहीलेत ज्यांची मुले त्या अर्थाने "नॉर्मल" राहीली आहेत. त्यांना कार्यक्रमाला आई-बाबांबरोबर येताना लाज वाटत नाही, आई-बाबा ज्यांच्याशी बोलतात त्यांच्याशी बोलायला (उगाच तटस्थपणे न उभे राहता) काचकूच होत नाही.

शेवटी मंडळे हे काही क्लब नसतात तर त्यातून जसा मोठ्या पिढीला विरंगूळा मिळतो तसाच पुढच्या पिढ्यांना लहान असताना लहान सहान कार्यक्रम/सप्र्धांमधून प्रोत्साहन मिळणे, स्वतःच्या माणसांबद्दल/भाषेबद्दल/संस्कृतीबद्दल न्यूनगंड न वाटणे असे अनेक पैलू त्यात असतात. याचा अर्थातच अर्थ असा नाही की फुकाचा अभिमान तयार करावा, अथवा इंग्रजी बोलू नये, इथल्या पद्धतीने मजा करू नये वगैरे. पण योग्य वापर केल्यास आपण दोन्ही पद्धतीने (परदेशी आणि भारतीय) चांगल्या गोष्टी "एन्जॉय" करू शकतो आणि त्यामुळे मुलांना पण वर म्हणल्याप्रमाणे न्यूनगंड येत नाही...

लंडनमधील मराठी झेंड्यांची पंच्याहत्तरी

लंडनमधील मराठी झेंड्यांची पंच्याहत्तरी

[ Saturday, August 25, 2007 06:13:22 am]

डॉ. माधवी आमडेकर

सायबाच्या देशात गेली ७५ वर्षे मराठीचा जरीपटका अखंडपणे फडकवत ठेवणारे लंडनचे महाराष्ट्र मंडळ २५ ऑगस्टपासून आपला अमृतमहोत्सव साजरा करतेय. त्यानिमित्त या मंडळाबद्दल आणि या सोहळ्याबद्दल माहिती देणारा हा खास लेख थेट लंडनहून...

लंडनमधील मराठी कुटुंबात आज लगीनसराईची धामधूम आहे. कारण त्याच्या घरात आज तेवढाच महत्त्वाचा सोहळा होणार आहे. लंडनच्या मराठी माणसाच्या मनातील जागा असलेले महाराष्ट्र मंडळ ७५ वर्षे पूर्ण करत आहे. उद्या जेव्हा मराठीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा भारताबाहेर मराठीचा प्रसार करणाऱ्या आद्य संस्थांमध्ये लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचा निश्चितच समावेश असेल.

१९३२ साली झालेल्या गोलमेज परिषदेच्या वेळी साहित्यसम्राट न. चि. केळकर लंडनला आले असताना महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर, कोल्हापूरचे दिवाण सूर्वे आणि केसरी वृत्तपत्राचे ताम्ण्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या मंडळाचे कार्य तेव्हापासून बहरले ते आज ७५ वर्षे उलटली तरी तेवढेच ताजेतवाने आहे. दूरदेशी आलेल्या पाखरांना कडाक्याच्या थंडीतही घराच्या मायेची उब देण्याचे फार मोठे योगदान या संस्थेकडे जाते.

माणसाच्या आयुष्यात येतात तशीच स्थित्यंतरे संस्थेच्या आयुष्यातही येतात. लंडनच्या महाराष्ट्र मंडळानेही अशीच स्थित्यंतरे अनुभवली आहेत. विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर संस्थेने अनेक बऱ्यावाईट प्रसंगाना तोंड दिले. पण १९५२ मध्ये बाळासाहेब खेर यांची लंडनमध्ये भारतीय राजदूत म्हणून निवड झाली आणि मंडळाला नवी पालवी फुटली. ते बहरलेले झाड आजही लंडनमधील मराठी माणसांचे हक्काची सावली बनून राहिली आहे.

भारतावर ब्रिटिशांना १५० वर्षाहून अधिक काळ राज्य केले. त्यामुळे सायबाच्या बोलण्याचालण्याचे अनुकरण आपण केलेच, त्याच्या देशाबद्दलही अनेक भारतीयांना आकर्षण होते. तसेच सत्तर-ऐशी वर्षापूवीर्चा काळ पाहता त्यावेळी व्हीसाचे बंधनही त्रासदायक नव्हते. त्यामुळे अनेक कर्तबगार आणि जिद्दी मराठी माणसे डॉक्टर्स, इंजिनिअर्स म्हणून किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनमध्ये आपले नशीब काढण्यासाठी आले.

त्यातील काही कोकणातले होते तर काही पश्चिम महाराष्ट्रतले... एवढेच नव्हे तर त्यातील अनेकांच्या मराठीचा लहेजाही वेगवेगळा होता. पण सातासमुदापारच्या त्या भूमीत हे अंतर त्यांना एकत्र येण्यापासून रोखू शकले नाही कारण तेथे ते होते फक्त भारतीय मराठी. असे भेदाभेद त्यांनी तेथे पाळले नाहीत म्हणून ते यशस्वीपणे गेली ७५ वर्षे अखंडपणे एकत्र नांदू शकले.

या साऱ्या लंडनमधल्या आद्य मराठींमध्ये पांडुरंग बनारसे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बनारसे हे लंडनमधले पहिले मराठी कारखानदार म्हणून ओळखले जातात. तसेच लंडनच्या आजीबाई म्हणून मराठी भाषकांना ख्यात आसलेल्या बनारसेआजी या युरोपातील पहिल्यावहिल्या हिंदू मंदिराच्या संस्थापक ठरल्या. अशा अनेक जणांनी या दूरदेशात आपापले कामधंदे सांभाळून मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्यासाठी मनापासून प्रयत्न केला.

१९८९ मध्ये लंडनमधल्या महाराष्ट्र मंडळाला स्वत:चे घर मिळाले. खुद्द लंडनच्या वायव्येला असलेल्या एका जुन्या चर्चची वास्तू मंडळासाठी घेण्यात आली. त्यापाठी सहस्त्रबुद्धे, प्रभू, चौगुले, दिघे ही कुटुंबे तसेच राम मराठे आदींचे फार मोठे योगदान आहे. या स्वत:च्या भव्य आणि प्रशस्त वास्तूत मग संस्थेच्या कार्याला खऱ्या अर्थाने स्थैर्य लाभले.

मंडळात जवळपास दहा ते बारा कार्यक्रम दरवषीर् नियमितपणे होतात. त्यात गणेशोत्सव, दिवाळी, संक्रांतीचे हळदीकुंकू, आंनदमेळा, संगीताच्या बैठकी, स्थानिक कलाकारांची नाटके, लहान मुलांसाठी सुटीतील शिबीर, ज्ञानेश्वरी वाचन, आरोग्य शिबीर, प्रदर्शन आदींचा समावेश असतो. यातील प्रत्येक उपक्रमातील अबालवृद्धांचा सहभाग आयोजकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देत राहतो. त्यामुळे नव्या कार्यक्रमासाठी ऊर्जा मिळते आणि उत्साहाचा उत्सव असाच वाढत राहतो.

अशा तऱ्हेने नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचे कार्य लंडनचे महाराष्ट्र मंडळ मोठ्या जिद्दीने करत आहे. तसेच इथल्या यशवंतांच्या कौतुकातही मंडळाने कधीच हात आखडता घेतला नाही. उदाहरणच द्यायचे तर, जेव्हा दिवंगत शंकराराव जोशी, शरद डोंगरे, शंकर नायरी, सतीश देसाई आदींना आपल्या कतृत्त्वाबद्दल इंग्लंडच्या राणीचा बहुमान मिळाला, तेव्हा महाराष्ट्र मंडळानेही त्या बहुमानाबद्दल त्यांचा मोठ्या कौतुकाने गौरव केला.

मंडळाचे आज हजाराहून अधिक सभासद आहेत. गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमात तर सात आठशे माणसे एकत्र जमतात, गणरायाच्या पूजाअर्चनेत रममाण होतात. दरवषीर्च्या गदीर्मधील या चेहऱ्यांमध्ये आता अनेक अनोळखी चेहरे वाढले आहेत. यापाठी नवा आयटी कन्सल्टंटचा ओघ दिसतो. पण हेच तर या गदीर्चे सौंदर्य आहे. नव्या जुन्याचा संगम घडतोय, म्हणूनच ही संस्था खंबीरपणे उभी राहिलेली दिसते.

इकडल्या सुपरमाकेर्टमध्ये गेलो, तर मध्येच काही तरुण जोडप्यांची मराठीतून चाललेली कुजबूज कानावर पडते. तर कधीकधी एखादा मराठी तरुणांचा कंपूच स्टेशनवर टवाळकी करताना आढळतो. तेव्हा खरोखर मनाला सुखद धक्का बसतो. हे मराठीपण कुठेही असलो तरी असेच पिंपळपानासारखे जपलेले राहावे असे वाटत राहते. हे विचारच मनाला पुढील काम करण्यासाठी नवी उभारी देतात.

याच उभारीने काम करणारे लंडनचे महाराष्ट्र मंडळ पंच्याहत्तर वर्षांचे झाले. या अमृतमहोत्सवासाठी २५, २६ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबरला इंलिंग येथील प्रशस्त व्हिक्टोरिआ हॉलमध्ये भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील हजारो मराठी या सोहळ्यासाठी लंडनमध्ये जमले आहेत. या सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल तर असेलच पण सोबत असेल अनेक मराठी दिग्गजांची आणि जंगी मेजवानीची. मग या सोहळ्याची शोभा वाढवायला येताय ना!

लंडन महाराष्ट्र मंडळ

दोनेक वर्षांपूर्वी लंडनला जाण्याआधी सहज म्हणून तिथल्या महाराष्ट्र मंडळाशी संपर्क साधला होता. त्यावेळेस त्यांच्याकडुन ( ४ दिवसांनी ) आलेल्या अतिशय रुक्ष उत्तरावरुन परत कधी ह्या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला.

अनुभव

मला काही त्या मंडळाबाबत माहीती नाही किंवा अनुभव नाही. पण आमच्या मंडळाच्या नावात न्यू इंग्लंड हा शब्द असल्याने, मी अध्यक्ष असताना अधूनमधून इ-मेल्स येयच्या की मी लंडनला येतोय/येतेय काही माहीती मिळेल का वगैरे. मग त्यांना कळवायचो की लंडन हे इंग्लंड मधे आहे तर न्यू इंग्लंड हे अमेरिएकेत...

 
^ वर