सहज आठवलं म्हणून

बाँबस्फोट खटल्यांत संजय दत्त ला ६ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. कायद्याने आपले काम चोख बजावले याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

संजय दत्त ला असंगाशी संग केल्याबद्दल शिक्षा झाली हे योग्यच झाले. पण तरीही त्याला एवढी मोठी शिक्षा व्हायला नको होती असे कुठेतरी मनाच्या कोपर्‍यांत वाटते.

या संबंधांत काही जुन्या गोष्टी आठवतात.

बाँबस्फोट प्रकरणाची चौकशी चालू असतांना संजय दत्त अमेरिकेंत होता. त्यांत आपले नाव आरोपी म्हणून घेतले जात आहे हे जेव्हा त्याला कळले त्यावेळी त्याची शहानिशा करण्यासाठी तो विनाविलंब अमेरिकेंतून भारतांत आला. यांत त्याने भारतीय न्यायसंस्थेची बूज राखली व तिला सहकार्य केले. शिक्षा सुनावली गेल्यावर तुरुंगांत नेले जात असतांनाही माझा माझ्या देशाच्या न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे उद्गार त्याने काढले. (पहा : ३ ऑगस्टच्या टाइम्स् ऑफ् इंडियाची मथळा बातमी).

"त्यांत काय विशेष?" तुम्ही म्हणाल, "एक जबाबदार नागरिक म्हणून संजय दत्त चे ते कर्तव्यच होते."

अगदी बरोबर. आता दुसरी गोष्ट पहा.

ही सुद्धा बॉलीवुडशीच संबंधित एका इसमाची आहे. गुलशनकुमार खून खटल्याची चौकशी चालू असतांना नदीम परदेशांत (मला वाटतं इंग्लंडमध्ये) होता. आपले नाव आरोपी म्हणून घेतले जात आहे हे कळल्यावर कायद्यांतील सर्व त्रुटी व तरतूदींचा गैरफायदा घेत अजूनही तो परदेशांत दडी मारून बसला आहे. त्याने आपण अल्पसंख्य असल्यामुळे भारतांत आपल्याला न्याय मिळणार नाही अशी शंका व्यक्त करायलाही कमी केले नाही.

आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

माणसे

काही अरभाट तर काही चिल्लर...

संजय दत्त आणि नदीम दोघेही चिल्लर..

झाले ते चांगले झाले. गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे.

वास येतोय.

कोर्डे साहेब,

संजूबाबा च्या या गुणामुळेच तो तुरुंगात गेल्यापासून आम्हालाही झोप येत नाही.
पण या चर्चेचा रोख जर 'हिंदु विरुध्द 'ते' असा असेल तर कायदा सर्वांना सारखाच असेल असे वाटते !
आमचा अझहर(क्रिकेट चा कर्णधार) नाही का त्याला तो अल्पसंख्याक असल्याची जाणीव झाली होती.

अवांतर :- ( ३१ जुलै १९८० ला महंमद रफीचा जनाझा उठला.आज इतक्या वर्षानंतरही रफीसाहेबांची गाणी जिवंत आहेत,साडेतीन पिढ्यांशी निगडित असणार्‍या या गायकाची कोणालाही आठवण झाली नाही,याचे वाईट वाटते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रफींची गाणी

इतक्या वर्षानंतरही रफीसाहेबांची गाणी जिवंत आहेत

दिलीपसाब..ये भी कोई बात हुई. रफीसाहेबांची गाणी जिवंत आहेत यातच सर्व आलं. नाहीतर आजकाल विनाकर्तृत्व शुभेच्छा, अभिनंदन, आदरांजल्यांचे पेव फुटले आहे. कुणाचे काय हेतू असतात तर कुणाचे काय. रफींची याद या समाजाला आली नाही हे काही वाईट नाही झालं...

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

रफींची गाणी ! एक मत.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

अभिजित सेठ,
रफीसाहेबांची गाणी जिवंत आहेत यातच सर्व आलं.

सहमत.
पण या निमित्ताने काही प्रासंगिक लेखन,त्यांची मराठी गाणी,हिंदी,काही किस्से,त्यातील काही कंगोरे,असं काहीतरी यायला पाहिजे होतं, म्हणून तसं म्हणालो.आणि समाजाचं म्हणाल, तर त्याला कोणाचीच आठवण येत नसते,आठवण येते पण तीही आमच्यासारखीच प्रासंगिक असते आणि कधी कधी वाटतं,काही आठवणींसाठी दर्दी माणसांचीही गरज असते.असे आमचे मत आहे.( ह.घ्या.)रफीप्रेमींना आठवण झाली नाही,म्हणजे ते दर्दी नव्हेत का ? असं तर आम्हाला म्हणायचंच नाही.

अवांतर :-) वरील सर्व वाक्यात शुद्धलेखनातील तेराव्या नियमाच्या उत्तरार्धाच्या आम्ही रेवड्या उडवल्या आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यक्तिनिष्ठ विचार

शिक्षा ही नावाला होत नसते पण त्या नावाच्या मागे जी व्यक्ती असते त्या व्यक्तीने केलेल्या चुकांना होत असते. ही शि़क्षा केवळ तो संजय दत्त म्हणून जास्त वाटते का? असा विचार करत असताना आपण एक गोष्ट सहज विसरून जातो की त्याच्याकडे अशा गोष्टी होत्या ज्या अतिरेक्यांनी निष्पाप माणसांना मारयला, निष्पाप कुटूंबे उध्वस्त करायला आणि भारताला अस्थीर करायला वापरल्या.

आपले (जनतेचे) नशीब की न्यायमुर्ती आणि वकील हे न्यायाच्या बाजूने राहीले. सरकार जास्त ढवळाढवळ करू शकले नाही. संजय दत्तचे नशीब की त्याच्या अपकृत्याचा संबंध "तो स्वतः अतिरे़की " अशा पद्धतीने लागला नाही आणि तसा मुद्दामून लावला गेला नाही.

त्याला कायद्याप्रमाणे १० वर्षेपण शिक्षा होऊ शकली असती पण त्याची आपण उल्लेखलेली चांगली वागणूक न्यायालयाने नक्कीच विचारात घेतली आणि त्याला होऊ कायद्याप्रमाणे द्याव्या लागणार्‍या ५-१० वर्षे शिक्षा कालवधीतील ६ वर्षे म्हणजे खर्‍या अर्थाने साडे चार वर्षेच (कारण दिड वर्षे तो आधी तुरूंगात होताच) शिक्षा दिली आहे.

वास्तवीक ह्या बॉलीवूडच्या पडद्यावरील हिरोला खर्‍या आयुष्यात "वाल्याचा वाल्मि़की" होण्याची सुवर्णसंधी आली आहे. वाल्याला पण वाल्मिकी होण्यासाठी एकाजागी अनेक वर्षे बसावे लागले होते. पण आता वाल्मिकींना कोणी हा तो दरोडेखोर म्हणून ओळखत नाही तर रामायणाचे कवी म्हणून ओळखतात. अर्थात याचा अर्थ संजय दत्त ने रामनाम करत रामायण लिहावे असा नाही तर या प्रायश्चित्ताचा कालसापेक्ष उपयोग करून काहीतरी चांगल्याअर्थाने नंतर आयुष्यात काम केले तर फक्त त्याच्यासाठीच नाही तर इतर अनेक जे जीवन चुकीच्या मार्गाने जातात त्याला प्रेरणा ठरू शकेल. नाहीतर दुर्दैवी, व्यसनाधीन, घटस्फोटीत, असंगाशी संग करणारा पण सिनेमात भूमीका वठवायला शिकलेला म्हणून तो पुढे लक्षात ठेवला जाईल...

'मदर इंडिया'चा बेटा 'खलनायक' 'मुन्नाभाई'!

रविवारच्या संवादमधील खालील शब्द या चर्चेनिमित्त योग्य वाटतात...




'मदर इंडिया'चा बेटा 'खलनायक' 'मुन्नाभाई'!

.....

कायद्याच्या कलमांचा आधार घेत संजयला जामीन मिळेल, तसे होईल, तेव्हा पुन्हा त्याच्या मिरवणुका निघतील, डोक्याला गुलाल फासून तो सिद्धिविनायक आणि अनेक मंदिरांत जाईल, तिथे टीव्हीच्या कॅमेऱ्यांची झुंबड उडेल, फ्लॅशलाइट्सचा लखलखाट होईल, त्याच्या अभिनंदनाचे हजारो मेसेजेस पडद्यावर झळकतील, पुन्हा काही चॅनेल्स त्याच्या स्वागताचे बॅनर्स पडद्यावर आणतील, त्यावर जाहिराती रचल्या जातील, संजयचा पुढचा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांच्या उड्या पडतील. संजयबरोबर मैत्री करणाऱ्यांनी ज्यांचे संसार उघड्यावर आणले, ते मात्र आपल्याच नशिबाला दोष देत घरात बसून राहतील. त्यांच्याकडे कॅमेरा येणार नाही, कारण ते सिनेमात हिरो नाहीत आणि त्यांचे आई, वडील आणि बहीण खासदार नाही.

इथे म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच, पण काळ सोकावतो आहे आणि तो तसाच सोकावत राहिला, तर तो साऱ्या सुसंस्कृत समाजाचा व संस्कृतीचा घात करणारा 'काळ' ठरेल, ही भीती आहे. म्हणूनच न्यायाधीश कोदे व नेटाने युक्तिवाद करणारे अॅड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन करतानाच शिक्षांची अंमलबजावणी विनाविलंब व्हावी, ही जनतेची अपेक्षा इथे व्यक्त कराविशी वाटते.
.....

इतकी चर्चा कशासाठी?

भारतात रोज शेकडो खटल्यांचा निकाल लागत असेल. हजारो लोकांना शिक्षा ठोठावली जात असेल. संजय दत्त हा असा कोण टिकोजीराव ज्याला सहा वर्षे शिक्षा झाली म्हणून इतकी चर्चा व्हावी? त्याला बघायला न्यायालयासमोर झुंबड उडते, पोलिसांना लाठीमार करावा लागतो, त्याला येरवड्याला हलवले ही हेडलाईन होते.... हे सगळे कशाचे लक्षण आहे? कधी नव्हे तो कायदा इतका वस्तुनिष्ठ झाला आहे, त्याला त्याचे काम करु द्या. कायद्यासमोर सगळे सारखे हे आधी आपण आपल्या मनात ठसवू या.
सन्जोप राव

कायद्यासमोर ...

कायद्यासमोर सगळे सारखे हे आधी आपण आपल्या मनात ठसवू या.

आमच्या मनांत पुष्कळ आहे. पण कायदा राबवणे ज्यांच्या हातांत आहे त्यांची गणिते वेगळी असतात ना!

 
^ वर