आपापली दैवते

अतीव आदर, वगैरेवगैरे या चर्चेमुळे एक नव्याने नव्हे पण सातत्याने जाणवले की एकाचे दैवत हे दुसर्‍यासाठी केवळ मानवी आविष्कार असतो. त्यामुळे एकजण प्रेम, भक्ती, वगैरेच्या नजरेतून बघणार तर दुसरा त्यातील असतील नसतील त्या तृटींना बघून त्यातील नकारात्मक बाजू केवळ "मानवी" भाग दाखवण्यासाठी म्हणून पुढे करणार. यात दैवत हा शब्द, एखाद्या व्यक्तीस दुसर्‍या एखाद्या व्यक्तीतील भासणारे (अथवा खरेच असणारे) असामान्य गूण भावून जे प्रेम / भक्ती तयार होते त्या संदर्भातील आहे.

ह्या चर्चेत हे एका दैवी देणगी असलेल्या गायकाबद्दल आणि नंतर अजून अनेकांबद्दल अशा प्रतिक्रीया झाल्या तर इतर ठिकाणी कधी एखाद्या लेखकाबद्दल, गायीकेबद्दल, एकाद्या राजकीय नेत्याबद्दल, कधी राष्ट्रपतींबद्दल तर कधी पुराणातील व्यक्तीरेखा अथवा त्या तयार करणार्‍या व्यासांबद्दल होत राहते. मग एक जण जरा काही चांगले बोलला की ते काही जणू काही अंधश्रद्धाच आहे या थाटात अंधश्रद्धा निर्मूलन चालू! मला वाटते की असे वाद घडत असताना (आणि संवाद बिघडत असताना) तसे वाद करणार्‍या व्यक्तीला त्या विशिष्ठ दैवतांच्या विशिष्ठ दैवी देणग्या अथवा असामान्य कलाकृतीं/कृतीं बद्दल काही अमान्य नसते. पण जर आपण त्यात काही विरूद्ध बोललो नाही तर "दोन विरुद्ध पार्ट्या नेटच्या एकाच बाजूने टेनीस खेळताहेत अशी अवस्था होऊन काही खेळ होणारच नाही" असे कुठेतरी मनात खोलवर वाटून पुढच्या प्रतिक्रीया होतात की काय असे वाटते.

विचार करा प्रत्येकाच्या मनात आपापली ठरलेली दैवते असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि प्रकृतीप्रमाणे दैवते. - जसा स्वभाव जो ज्याचा, श्रद्धा त्याची तशी असे, श्रद्धेचा घडला जीव, जशी श्रद्धा, तसाची तो|| (गीताई ) . कधी ती धर्माप्रमाणे असतील, कधी तत्वज्ञानाप्रमाणे, कधी समाजकारणाने तर कधी राजकारणाने.. प्रत्येक जण त्या त्या दैवताची चांगली प्रतिमा मनात मनापासून जपतो. मला काय म्हणायचे जो पर्यंत अशा दैवतांचा आणि त्यांची भक्ती करणार्‍यांचा इतरांना त्रास होत नाही तो पर्यंत, केवळ आपण मराठी आहोत हे सिद्ध करण्यासाठी वाद घातलाच पाहीजे का?

जगात सर्वगूण संपन्न कोणीच नसतो. पण त्यामुळे एकतर आपण प्रत्येकाचे उणे शोधत बसू शकतो किंवा चांगल्या गोष्टींना दाद देऊन स्वतःच्या मनाने चांगली सृष्टी निर्माण करू शकतो. आपण कसे होणार/जगणार हे त्या नजरेवर ठरते. म्हणून एकनाथांच्या खालील ओळी पटतात का ह्याचा विचार करा आणि काय वाटले ते तसेच वाटल्यास आपण दैवते कुणाला मानतो ते कळवा.

जो जो जयाचा घेतला म्या गूण, तो तो म्या गुरू केला जाण, |
गुरूसी झाले अपारपण, जग संपूर्ण गुरू दिसे ||
लेखनविषय: दुवे:

Comments

आपापली दैवते

केवळ आपण मराठी आहोत हे सिद्ध करण्यासाठी वाद घातलाच पाहीजे का?

विषय खूप वाढत जाईल म्हणून आतापुरतं हे एकच घेतो. वाद घालण्याचे जे अनेक फायदे आहेत ते खोट्या गोडीगुलाबीने वागण्याने नष्ट होतात. उदाहरणार्थ अमेरिकेत असं अनेक क्षेत्रांत झालेलं आहे. तो एक स्वतंत्र लेख होईल. वादाचं दुस्वासात रुपांतर नाही होता कामा. पण "दैवत आहे" असं म्हणून टीका करणा-याला गप्प करणे हे फार घातक आहे.

व्यक्तिपूजा वाईट असा एक नेहमी मुद्दा मांडला जातो. मला असं वाटतं की हा दिशाभूल करणारा मुद्दा आहे. व्यक्ति हा पूजेचा विषय नाही, असा मुद्दा मांडला पाहिजे. पूजनीय असते ते एका अथवा अनेक व्यक्तींतले तत्त्व. त्या तत्त्वाला नंतर व्यक्तिरूप देऊन त्यावर अनेक संस्कार केले जातात तेव्हा बनते ती देवता. तिची पूजा असावी. रूपक द्यायचे तर, एक किंवा अनेक लोकधुनांतून राग जसा "काढला" जातो, तशी व्यक्तींतून देवता उत्पन्न होते. ह्या दोन फार वेगळ्या कोटी आहेत. धून संपू शकते पण राग संपू शकत नाही तो ह्यामुळे. मर्त्य-अमर्त्य हा फार मोठा फरक आहे. देवतेत जर दोष दिसले तर तो तुमच्या दृष्टीचा दोष. व्यक्तीत दिसले तर ते त्या व्यक्तीचे असू शकतात.

म्हणून व्यक्तीची पूजा नसते. ते प्रेम. त्यात ती व्यक्ति मानवीच असल्यामुळे स्खलनशील आहे, ह्या भावनेचा अंतर्भाव पाहिजे. नाहीतर ते प्रेम नाहीच. दोषरहित माणूस असू शकतो ही सरळ सरळ अंधश्रद्धा आहे.

एवढं माझ्याकडून पुरे. मला स्वतःला गैरलागू दोष काढणं आवडत नाही. परत गवयाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर संगीतबाह्य दोष ऐकण्यात मला अजिबात रस नाही. पण समजा हावरटपणाच्या दोषामुळे भाकड चालींची आणि हलकट आशयाची शेकडो गाणी गायली गेली, असं असेल तर जरूर त्याच्यात रस आहे.

मिश्रण

एकाच शरीरात अनेक व्यक्ती कधी वेगवेगळ्या क्षणी तर कधी एकाच क्षणी निवास करत असतात.

अगदी पटलं. व्यक्ती ही गुणदोषांचे मिश्रण आहे.(ते संयुग झालं तर मात्र् अवघड आहे) गुणांचे उपयुक्तता मूल्य हे दोषांच्या उपद्रव मूल्यापेक्षा तुलनेने भरपूर असेल तर गुणांचे उदात्तीकरण होते आणि दोषाचे क्षमीकरण होते. ते स्वाभाविक आहे. दैवतीकरण यापेक्षा काय वेगळे असते?
प्रकाश घाटपांडे

एकसंध

एकाच शरीरात अनेक व्यक्ती कधी वेगवेगळ्या क्षणी तर कधी एकाच क्षणी निवास करत असतात.
आपला हा युक्तीवाद मला काही पटला नाही. व्यक्तीमत्व (स्कित्झोफ्रेनिक नसणार्‍यांचे) हे एकसंध असते / असावे असे मला वाटते. एखादी व्यक्ती अनेक शरिरकष्ट घेवू शकते पण अर्धा तास सुद्धा भुकेची कळ सोसु शकत नाही असे उदाहरण घेतल्यास त्या दोनव्यक्ती एका मनात (शरिरात) असा अर्थ मी घेणार नाही. कोणाची क्षमता कोठे जास्त तर कोठे कमी असते. त्यामुळे उत्तम अभिनय करणारा मनुष्य गुन्हेगार होणे अथवा दारु चे व्यसन असणार्याने उत्तम गाणे हे सर्व एकाच व्यक्तेमत्त्वाची अंगे आहेत. क्षमता कोठे जास्त तर कोठे कमी. पण व्यक्तीमत्व एकसंधच आहे. अभिव्यक्ती (एक्सप्रेशन) मध्ये क्षेत्रानुसार बदल.
-- (एकसंध व्यक्तिमत्त्वचा) लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

व्यक्तीमत्व

मला वाटते एकाच शरीरात अनेक व्यक्ती याचा अर्थ "स्वभावाचे वेगवेगळे पैलू" असतात असा आहे. आपल्यातीलच चांगल्या-वाईट स्वभावांना जाणवून घेणारी पाडगावकरांची एक कविता आहे (आम्हाला शाळेत होती):

कधी पाहतो मी माझ्यातच विचित्र मानव
....

कधी पाहतो मी माझ्यातच विराट मानव
....

विद्रूप मी ही विराट मी ही, साक्षी केवळ आणिक तरीही, भूविवरातील अंधाराचा, आकाशाचा

चर्चा कशाबद्दल चालली आहे हे महत्त्वाचे

जगात सर्वगूण संपन्न कोणीच नसतो. पण त्यामुळे एकतर आपण प्रत्येकाचे उणे शोधत बसू शकतो किंवा चांगल्या गोष्टींना दाद देऊन स्वतःच्या मनाने चांगली सृष्टी निर्माण करू शकतो.

खरे आहे, याच बरोबर एखाद्यावर होणारी चर्चा नेमकी कोणत्या विषयावर सुरू आहे ते जाणून तशी प्रतिक्रिया व्यक्त करणे महत्त्वाचे आहे असे वाटते. एकाच व्यक्तीबद्दल अनेक लोकांच्या भावना, अनुभव वेगळे असू शकतात. एखाद्याला एखाद्या व्यक्तिबद्दल जिव्हाळा असेल तर दुसर्‍याला त्याच व्यक्तीबद्दल राग असू शकतो, परंतु आपले राग-लोभ आपण योग्य जागी प्रदर्शित करतो का हे ही जाणवायला हवे.

उदा.

सचिनने अमुक एका मॅचमध्ये विक्रम केला, झंझावती धावा काढल्या, प्रतिपक्षाला धूळ चारली या कौतुकात 'हल्ली सचिनचा परफॉर्मन्स ढासळला आहे' हे वाक्य अस्थानी नसावे परंतु अचानक "त्याने फेरारीचा कर भरला नाही" हे वाक्य कसे काय येऊ शकते? या वाक्याची जागा इतरत्र नाही का? "प्रसिद्ध व्यक्ती आपल्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतात" या चर्चेत त्याचा समावेश होऊ शकतो.

याचबरोबर,

लताच्या गाण्याचा उहापोह चालला असता एखादा तिच्या अलीकडील आवाजावर टीका करत असेल तर ती अस्थानी नाही. ती खुल्या दिलाने स्वीकारायला हवी. मात्र त्यांच्या आवाजावर चर्चा सुरू असताना त्यांनी पेडर रोड पुलाला विरोध केला हे वाक्य अस्थानी वाटते.

तेव्हा एखादी चर्चा करताना विषयाशी सुसंगत जाऊन केवळ त्या विषयापुरते बोलणे आवश्यक असते. धुवट रंगातील अवांतर-विषयांतर आपली भडास काढण्यासाठी असतातच. (ह. घ्या)

व्यक्तीपूजा करणे किंवा न करणे हा त्या त्या व्यक्तिचा वैयक्तिक प्रश्न वाटतो पण कधी कधी विषयात नको ते घोडे दामटल्याने अशा गोष्टी हाणामारीपर्यंत पोहोचतात.

पटले

चर्चा नेमकी कोणत्या विषयावर सुरू आहे ते जाणून तशी प्रतिक्रिया व्यक्त करणे महत्त्वाचे आहे असे वाटत

वरील विधान (त्याचा रंग विषयांतरासाठी नाही आहे!) अगदी पटण्यासारखे आहे. मला इतकेच म्हणायचे होते. धन्यवाद.

अस्थानी नसलेली टिका पण खुल्या दिलाने स्विकारता येयला पाहीजे पण त्यासाठी सर्वांनीच प्रतिसाद देताना "मला असे वाटते" म्हणले म्हणून बिघडत नाही. उ.दा. कुणाला लताचे "जिया बेकरार है ", आवडेल तर कुणाला तीचा आत्ताचा भसाडा आवाज आवडेल. पण, "मला तीचा आवाज आता आवडत नाही" अथवा "मला तरी पण तिचि आत्ताची गाणी आवडतात" इतके सहजपणे म्हणणे काही अवघड नसावे. बर्‍याचदा लिहीणार्‍याचा रोख हा गैरसमज अथवा वाद निर्माण करतो इतकेच.

बाकी कुठल्याही प्रकारच्या राजकारणातला भाग म्हणून सोडल्यास (त्यात प्रेम आणी युद्धासारखे सर्व माफ!) असे दोष सांगायच्या आधी मी असा विचार करतो:

मी काही सचीन सारखी बॅटींग करू शकत नाही - मग उगाच कशाला त्याला नावे ठेवू
माझा गळा काही लता, आशा, (अगदी उषा पण! ह, घ्या.), बाबूजी, अण्णा सारखा नाही - मग उगाच कशाला त्यांना नावे ठेवू?
अमिताभचे वर्तन मला नक्कीच सामान्य माणूस म्हणूनपण आवडत नाही पण तरी कधी नशीब तर् कधी स्वतःच्या घोडचुकांनी, त्याची, रसातळाला पोचल्यानंतरची वर उसळी मारून येयची (चित्रपटात आणि खर्‍या जीवनात) जी जिद्द आहे ती मला आकर्षक आणि स्वतःत हवीहवीशी असणारी वाटते - मग उगाच त्याला कशाला नावे ठेवू?
मी काही गांधीजींसारखा दुसरा गाल पुढे करू शकणार नाही की सावरकरांसारखा "बुद्ध्याची वाण धरीले करी हे सतीचे" असे स्वतः बद्दल म्हणवून घेण्याचे साधे धाडसपण दाखवणार नाही - मग उगाच कशाला त्यांना नावे ठेवू?

मला पु.ल. हे नुसते लेखक म्हणून आवडत नाहीत तर एक असा मराठी लेखक ज्याने (मी वाचल्याप्रमाणे) एक कोटींचे रुपयात दान केले आणि त्याव्यतिरीक्त अनेक ग्रंथालयात मोफत पुस्तके दिली ते वेगळेच.. पण माझ्या लहान खिशातून साधे चार आण्याचे दान जर देताना हात आखडत असेल तर मी त्यांच्या नुसत्याच आरत्या का ओवाळू?
....

बा. भ. बोरकरांची एक कवीता आहे: संपूर्ण लक्षात नाही पण वाचण्यासारखी आहे. पु.ल.-सुनीताबाईंच्या तोंडून त्यांच्या कार्यक्रमात ऐकायचे भाग्य लाभले होते:

तो स्वर्ग नको सूरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा
ती तृप्ती नको, ती मुक्ती नको, मज येथील हर्ष नी शोक हवा
--
पुढे या कवीतेत बोरकर अनेकांच्या चांगल्या गोष्टींचे वर्णन करून त्या मला हव्यात असे म्हणतात.

असो...

क्या बात है.. एकनाथ महाराज की जय! :)

जगात सर्वगूण संपन्न कोणीच नसतो.

अगदी सहमत!

पण त्यामुळे एकतर आपण प्रत्येकाचे उणे शोधत बसू शकतो

पुन्हा सहमत! शरीराप्रमाणेच मनालाही कुबड आलेली माणसे असे करू शकतात! :)

किंवा चांगल्या गोष्टींना दाद देऊन स्वतःच्या मनाने चांगली सृष्टी निर्माण करू शकतो.

हो पण त्याकरता चांगल्या गोष्टींना दाद द्यायला अंगी तेवढी रसिकता आणि जाण असावी लागते! नाहीतरी 'गाढवाला गुळाची चव नसतेच म्हणा! :)

जो जो जयाचा घेतला म्या गूण, तो तो म्या गुरू केला जाण, |
गुरूसी झाले अपारपण, जग संपूर्ण गुरू दिसे ||

क्या बात है.. एकनाथ महाराज की जय!...

तात्या.

गाढव-

'गाढवाला गुळाची चव नसतेच म्हणा! :)

पण ते गाढव झाल्याशिवाय कसे कळणार? पण गाढव मातीत, चिखलात , लोळताना कुणी बघितलं असेल तर ते लोळताना त्याच्या चेहर्‍यावर आनंद अवर्णनिय अस्तो. अगदी ओसंडून वहात अस्तो. आता हे मला कसं कळाल? ( सोप आहे मी मनातल्या मनात गाढव होउन बघितलं) आमच्या गावी शेतांची जी नावे असतं उदा. सोंड्या, तेजेगावडी,पांढरी, अंबरखाना, बेलशेत, त्यात गाढवलोळी अशा नावाचे पण शेत आहे. त्या बद्द्ल अधिक माहिती विचारली तर जुन्या लोकांनी सांगितले तेथे पुर्वी गाढवे लोळत असत.

प्रकाश घाटपांडे

अवांतर

सोप आहे मी मनातल्या मनात गाढव होउन बघितलं

काही फरक वाटला का? :-)) ह. घ्या.

कलाकार आणि चाहता

एखादा गवई आपले गायन सादर केल्यावर एखाद्याने 'आज काही भट्टी (हातभट्टी नव्हे) जमली नाहि बुवा, अमक्या ठिकाणी जागा चुकली. ' असे म्हणाला तर गायक काही असे म्हणत नाही ' एवढ असेल तर तुम्ही गाउन दाखवा बरं?' हेच नाते लेखक वाचक यांच्यात् असतं. आमच्या सारख्या लोकांना काही लोक म्हणतात यांना ना तांदळातले खडेच दिसतात. एवढे निवडलेले तांदूळ दिसत नाहीत. पेला अर्धा भरलेला आहे हा सकारात्मक दृष्टिकोना ऐवजी यांना अर्धा रिकामा पेलाच दिसतो. ( म्हनजे नकारात्मक दृष्टिकोण) हे आता इतक गुळगुळीत वाक्य झाले आहे.खरतर पेला एकाच् वेळी अर्धा भरलेला आहे व अर्धा रिकामा आहे हे सत्य आहे.
(तांदळातला खडा)
प्रकाश घाटपांडे

चाहता पण कसला?

गायक - गायीकेच्या गाण्याचे चाहते असाल आणि एखादे गाणे अथवा एखाद्याचे गाणे आवडले नाही म्हणाल तर ती ज्याची त्याची आवड झाली आणि ती मान्यपण असायला हवी पण गाणार्‍याच्या गळ्यातला आवाज ऐकण्या ऐवजी गळ्यात दाऊ कुठली ओतली जात आहे, खेळाणार्‍याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या इतर व्यक्तिगत सवयींची, चुकांची (गुन्ह्यांची नाही) वगैरे चर्चा, ज्यावेळेस होते तेंव्हा पेला अर्धाच रिकामा नसतो, तो रिकामाच असतो असे मला वाटते.

कलाकाराचा चाहता हा त्याच्या कलेचा चाहता असावा. त्यात त्याने कलाकाराचे कौतूक केले तर काही बिघडले असे वाटायचे कारण नाही. अपवाद एखाद्या संजय दत्तचा असू शकतो, ज्याने सामाजीक आणि राष्ट्रीय गुन्हा केला असे न्यायालयात सिद्ध झाले आहे... मग त्याचा मुन्नाभाई कितीही आवडला तरी त्याला (तसेच त्या सलमान खानला) शिक्षा व्हायलाच हवी असे वाटते..

कलाकार आणि आदर्श व्यक्ती

इथं कलाकार आणि आदर्श व्यक्ती ह्यांची गल्लत केलेली दिसते. भिमसेन जोशी, लता, अमिताभ हे सगळे कलाकार आहेत. त्यांच्या त्यांच्या कलेच्या प्रांतात त्यांनी उत्तुंग कलेचा अविष्कार घडवला आहे. पूजा करावी ती त्यांच्यातील ह्या कलेची आणि टिका देखिल करावी त्यांच्यातल्या कलेविषयक त्रुटींविषयी. भिमसेनांच्या कार्यक्रमाला जाणर्‍याला दारूचा तांब्या खटकत असेल तर,एवढेच विचारू इच्छितो की ' बाबा रे तु गाणं ऐकायला गेला होतास की 'दारू चे दुष्परिणाम आणि आदर्श जीवन पद्धती' ह्यावर बौद्धिक ऐकायला?" कारण आयुष्यात आदर्श कुणाचा ठेवावा? असा प्रश्न विचारला असता वरीलपैकी एकाचे नाव तरी आपण घ्याल का? हा प्रश्न जेव्हा विचारला जाइल तेव्हा अमिताभ चे जमिन प्रकरण, अण्णांची दारू, लताचा हावरटपणा ह्यावर बोलता येईल.

आम्हाला केव्हिन स्पेसी ह्या नटाचा अभिनय अप्रतिम वाटतो ह्यावर मागं कुणीतरी म्हणालं होतं, 'तसा बरा अभिनय करतो पण खासगी जीवनात एकदम तिरसट आणि हलकट माणूस आहे' म्हणे....असेल बाबा आम्ही काय तलवारी उपसणार नाही कारण, त्यामूळे आमच्या "आम्हाला केव्हिन स्पेसी ह्या नटाचा अभिनय अप्रतिम वाटतो" ह्या विधानावर परीणाम शून्यच राहतो. उद्या सुनिल शेट्टी जर खासगी जीवनात अगदी देव माणूस आहे म्हणून कुणी सांगीतले तरी "अभिनयात तो दगड आहे" ह्याच विधानाशी आम्ही ठाम राहणार. कारण सुनिल शेट्टी आणि केव्हिन स्पेसी ह्यांचे विचार आणि पुस्तके वाचून आम्ही आमची जीवन पद्धती ठरवत नाही.

वरूणदेवा,

पूजा करावी ती त्यांच्यातील ह्या कलेची आणि टिका देखिल करावी त्यांच्यातल्या कलेविषयक त्रुटींविषयी.

लाख मोलाची बात! अरे पण इथे काही मंडळी मोठ्या हौशीहौशीने कलेऐवजी इतर गोष्टींबद्दल लिहितानाच दिसत आहेत! (विशेष करून आमचे काही हितचिंतक काका मामा वगैरे! :)

भिमसेनांच्या कार्यक्रमाला जाणर्‍याला दारूचा तांब्या खटकत असेल तर,एवढेच विचारू इच्छितो की ' बाबा रे तु गाणं ऐकायला गेला होतास की 'दारू चे दुष्परिणाम आणि आदर्श जीवन पद्धती' ह्यावर बौद्धिक ऐकायला?"

पूर्णपणे सहमत...

तात्या.

अवांतर - वरूणदेवा, कलामसाहेबांची एक केशरचना सोडली तर आजपर्यंत आपलं प्रत्येक गोष्टीत पटत आलेलं आहे! :))

एकदम पटले..

भिमसेन जोशी, लता, अमिताभ हे सगळे कलाकार आहेत.

अगदी पटले.

आम्हाला केव्हिन स्पेसी ह्या नटाचा अभिनय अप्रतिम वाटतो ह्यावर मागं कुणीतरी म्हणालं होतं, 'तसा बरा अभिनय करतो पण खासगी जीवनात एकदम तिरसट आणि हलकट माणूस आहे' म्हणे....

या बाबतीत मी म्हणत होतो की वादासाठी वाद घातलाच पाहीजे का? मराठीत एक चांगली म्हण आहेच: "ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये". याचा काही संदर्भात अर्थ वेगळा असला तरी या संदर्भात पण लावता येऊ शकेल.

वेगवेगळे अनर्थ

"ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये".

१) कारण ते सापडणार नाही म्हणून
२)धू म्हणल की धुवायच लोंबतय काय म्हणून विचारायचे नाही.
३) नसत्या चौकशा कशाला?
४) आम खानेसे मतलब पेड गिननसे क्या ?
५) सापडलच तर वांधे होतील
६) प्रवचनकार श्रोत्यांना नेहमीच हे सांगत असतात.
प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे

कंटाळ्य, बौर्‍य

कीती खीस पाडणार आहोत ह्या एका गोष्टीचा? संपतच नाहीये बूवा. बास की आता.

आजानुकर्णा कूठेतरी हींडुन ये लवकर आणी झकास फोटो टाक पाहू. :-)

चर्चा आणि वाद...

चर्चा विषय वाचूनच काय आहे कल्पना आली होती. किती हि ठरवलं तरी प्रतिसाद दिल्या शिवाय राहावलं नाही.
प्रत्येकाची आपापली दैवत असतात. - मान्य.
जर त्या सगळ्या चर्चा व्यवस्थित वाचल्या तर चर्चा कशा कराव्यात/करू नयेत. यावर एक नवीन चर्चा प्रस्ताव सुरू करता येइल.

अण्णा: सर्वात जास्त नाजुक विषय...
अण्णांच्या गायकी बद्दल सगळ्यांनाच आदर आहे. त्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाहिच. मुद्दा होता/आहे तो स्तोम माजवण्याचा. चुकिच्या गोष्टी बरोबर दाखवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याचा. आपापल्या दैवतांचे समर्थन करताना, नाक कापलं तरी भोक आहेच या म्हणीचा वारंवार प्रत्यय येत होता. मग त्यावरून एकमेकांची लायकी (पात्रता हा जरा श्रीमंत शब्द) काढणे वगैरे. यात नक्कि काय मिळते?

तांब्या: त्याच्याकडे कशाला बघताय?
बरोबर. पण आमच लक्ष जातं तिकडे. गाणारे तानसेन असतील. पण दारूचे वाईट परिणाम आम्ही पाहिले आहेत. कदाचित अतिसेवन झाल्यास कार्यक्रम बिघडू शकतो. (अमेरिकेत अश्या अनेक शक्यतांचा विचार होत असावा असे आमचे मत आहे. म्हणूनच फाईल डिलीट करायच्या इराद्याने खटका दाबला तरी विचारतात , तुम्हाल खरच फाईल डिलीट करायची आहे का?) पण आता याला म्हणतील गाणे ऐक गप्प बसून. का? ते महान आहेत म्हणून. अरे, रसिकांना ऐकायचेच आहे तर आणि त्यांना ऐकवायचेच आहे तर मग बंद खोलीत बसून गावा. गाणे पहायचे कशाला? का गाणे गाताना दिसणारी तोंडे हि एका अप्सरे सारखी दिसतात? कलाकारांना म्हणता का कि माझा मोबाइल आहे. तो वाजायचा तितका वाजेल तुझे काम गायचे आहे. ते गप्पपणे कर.

मुद्दा अतिरेकाचा मांडला होता. त्यावरून दुसर्‍याची लायकी काढणे, शहाणपणा शिकवणे याला काय म्हणावे? अण्णांबद्दल बोलले कि खवळून गप्प बैस म्हणून सांगतात. मैफलीत हिरमोड करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवणारे सुद्धा आहेत. पण इथले नियम, सभ्यता धाब्यावर बसवणार्‍यांना गप्प बस अथवा चालता हो म्हणायची इच्छा/दम आहे का कोणाच्यात? तिथे साध्या एका सदस्याला मात्र शांत हो, परत ये आणि काय काय? काहिंच्यासाठी इथल्या चर्चा या अण्णांच्या मैफिली इतक्याच सरस असतील. तिथे चर्चेचे मुळ मुद्दे सोडून अवांतरला पकडायचे. अश्या सदस्यांना समज देते का कोणी? तिथे मात्र सहमती दिसली कि लगेच गाढवाला गुळाची चव काय? वा.. वा..

असो, तांब्यांच्या मुद्याने वाहत जाणार्‍या चर्चांना थांब्याचे ठाव ठिकाण दिसत नाही. दुर्दैवाने अशा दैवत मानणार्‍यांना पण असे मुद्दे हे चर्चा चघळायला आवडतात. त्यामुळे दैवत म्हणजे नक्कि काय आणि त्या दैवतांप्रति भक्ति म्हणजे काय हाच एक अनाकलनिय मुद्दा कायम चर्चेचा राहिल असे वाटतो. बाकि चालूद्यात...

इथं हे नेहमी असचं चालत राहणार...
ह्यांना काहि म्हणलं कि हे असेच खवळणार...
चर्चेवर चर्चा, मुद्यांवर गुद्दे हे येतच राहणार...
दैवतांच्या चर्चेत येथे भक्ति कधीच नाही येणार ...
इथं हे नेहमी असचं चालत राहणार...

कोणाला म्हणावे बरोबर?
मीच तो खरा आहे जर?
मागायची कशाला कोणाकडे दाद?
जर नाहीच करायची नाहीच चर्चा
तर नुसताच घालायचाय वाद?

इथं हे नेहमी असचं चालत राहणार...
दैवतांच्या चर्चेत येथे भक्ति कधीच नाही येणार ...





मराठीत लिहा. वापरा.

उद्देश

जर त्या सगळ्या चर्चा व्यवस्थित वाचल्या तर चर्चा कशा कराव्यात/करू नयेत. यावर एक नवीन चर्चा प्रस्ताव सुरू करता येइल.

हाच उद्देश ही चर्चा सुरू करण्यामागे होता. कोणाच्या बाजूने, विरूद्ध वगैरे लिहीणे हा नव्हता.

अण्णा चांगले गातात का अजून काही करतात हा तत्कालीन मुद्दा होता इतकेच पण हे सुरवातीस म्हणल्याप्रमाणे सातत्याने घडते आणि बर्‍याचदा त्यात तसे वाद घालणार्‍यांचा हेतू वाईट जरी नसला तरी चर्चा भरकटायला आणि गैरसमज वाढायला कारणीभूत होतात असे वाटले.

हाहाहा!!!!

>> (अमेरिकेत अश्या अनेक शक्यतांचा विचार होत असावा असे आमचे मत आहे. म्हणूनच फाईल डिलीट करायच्या इराद्याने खटका दाबला तरी विचारतात , तुम्हाल खरच फाईल डिलीट करायची आहे का?)

हाहाहा!!!!

>> इथले नियम, सभ्यता धाब्यावर बसवणार्‍यांना गप्प बस अथवा चालता हो म्हणायची इच्छा/दम आहे का कोणाच्यात?

फारच विनोदी आहात बुवा!!!

विकासजी,

पूर्ण चर्चा वाचली पण हा प्रतिसाद वाचून पालथ्या घड्यावरून पाणी म्हणजे काय ते आठवलं.

छान कविता..:)

मुद्दा होता/आहे तो स्तोम माजवण्याचा. चुकिच्या गोष्टी बरोबर दाखवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याचा.

इथे कुणी अण्णांच्या कलेव्यतिरिक्त त्यांच्या इतर गोष्टींचे स्तोम माजवलेले निदान माझ्या तरी वाचनात नाही. आपल्या असल्यास कृपया दाखवून द्यावे..

आणि कलेबद्दल म्हणाल तर कुणाच्याही कलेबद्दल कितीही वेळा कुणाही सभासदाला भरभरून लिहिण्यावर बंदी नसावी असे वाटते!

आपापल्या दैवतांचे समर्थन करताना, नाक कापलं तरी भोक आहेच या म्हणीचा वारंवार प्रत्यय येत होता.

कुणाचं नाक कापल्याची भाषा करताय आपण चाणक्यराव? आणि दैवतं ही दैवतंच असतात. त्यांचं समर्थन वगैरे करावं लागत नाही!

मग त्यावरून एकमेकांची लायकी (पात्रता हा जरा श्रीमंत शब्द) काढणे वगैरे. यात नक्कि काय मिळते?

एकमेकांची लायकी किंवा पात्रता काढणे यात खटकण्यासारखे काय आहे? उदाहरंणार्थ मला कुचिपुडी नृत्यातील शून्य समज आहे. उद्या जर मला एखाद्याने कुचिपुडी नृत्याच्या बाबतीत काही बोलण्याची तुझी लायकी/पात्रता नाही असं जर म्हटलं तर त्यात माझ्या तरी नाकाला मुळीच मिरच्या झोंबणार नाहीत! अर्थात, मी त्या नृत्यासंबंधीच्या कुठल्याही विषयात किंवा त्या क्षेत्रातील कुठल्याही कलाकाराच्या बाबतीत मधे मधे नाक खुपसून बोलणारही नाही, हा भाग वेगळा! :)

पण इथले नियम, सभ्यता धाब्यावर बसवणार्‍यांना गप्प बस अथवा चालता हो म्हणायची इच्छा/दम आहे का कोणाच्यात?

ऐ शाब्बास! :) अगदी योग्य मुद्द्यावर आवाज उठवलात पाहा चाणक्यराव! आम्हीही आपल्या सोबत या आंदोलनात आहोत...

अश्या सदस्यांना समज देते का कोणी? तिथे मात्र सहमती दिसली कि लगेच गाढवाला गुळाची चव काय? वा.. वा..

अच्छा, म्हणजे आमच्या लेखणीने बरोब्बर वेध घेतला म्हणायचा! :)

असो, तांब्यांच्या मुद्याने वाहत जाणार्‍या चर्चांना थांब्याचे ठाव ठिकाण दिसत नाही.

वा! 'तांब्याचे' आणि 'थांब्याचे' यमक आवडले...:)

त्यामुळे दैवत म्हणजे नक्कि काय आणि त्या दैवतांप्रति भक्ति म्हणजे काय हाच एक अनाकलनिय मुद्दा कायम चर्चेचा राहिल असे वाटतो.

खरं आहे.. कविताही छान आहे..

आपला,
(भक्तिमार्गाच्या कितव्या पायरीवर आहोत हे माहीत नसणारा!) तात्या.

तीन आंधळे हत्ती आणि माणूस

एक वाचनात आले:

तीन आंधळ्या हत्तींना उत्सुकता असते की माणूस कसा असतो. ते ठरवतात की त्याला स्पर्श करून पाहूया. मग पहीला "शहाणा" ("wise") हत्ती स्पर्श करतो आणि म्हणतो की माणूस "सपाट" (flat) असतो. बाकीचे दोन "wise" हत्ती पण स्पर्श करून मान्य करतात की हो, मनुष्य हा "flat" च असतो.

तात्पर्य: सर्वांचे एकमत झाले याचा अर्थ एखादी गोष्ट बरोबर असतेच अशातला भाग नाही. तसेच (सात आंधळ्या माणसांप्रमाणे) प्रत्येकाचे अशंतः बरोबर असले आणि तरी एकमत झाले नाही म्हणून पूर्णतः खरे, सर्वांचे मिळूनपण ठरत नाही.

माझं दैवत

कुसुमाग्रज!

-- ईश्वरी.

माझी दैवते

अनुराध पोदवाल, गुलशन कुमार, अनुप जलोटा आणि अन्नु मलिक
अनुराधा पोडवालांची गायत्री मंत्राची टेप मी नेहेमी ऐकतो

 
^ वर