अतीव आदर, वगैरेवगैरे

काय आहे . . . कधी कधी कसं बोलावं हे समजत नाही. उगीच कोणी डोक्यात राख घालून घेऊ नका. पण ह्या आपल्या आदरणीय वगैरे व्यक्तींबद्दल परत परत फााा...ााार गहिवरून बोलण्याचे प्रकार बस झाले असं नाही वाटत? कितीदा बोलायचं? आपण बंगाली आहोत की काय? ठीक आहे. अमुकबद्दल परम भक्ती आहे. आहे ना? अरे सगळ्यांनाच आहे. त्यात सांगण्यासारखं काय? ही काय मोगलाई, पेशवाई आहे? पुन्हापुन्हा उच्चार केला नाही तर तुरूंगात टाकायला. गेली बरीच वर्षं अमेरिकेतही ही पद्धत आली होती खरी तर. आता लोक कंटाळले. होतं काय, विरुद्ध बोलायचीच बंदी होते. हल्ली मी कुठल्यातरी फोरमवर एका गाण्यावर लेख लिहिला. लेख नसेल तर चर्चेचा प्रस्ताव असेल. आपल्याला फरक कळत नसतो. फार काही नव्हतं त्याच्यात. पण काय चवताळून आले एकदम. म्हणजे काय तुझ्या मनात लताबद्दल अनन्यभक्ती नाही? काय पाखंडी माणूस आहेस तू? बंद कर आणि घरी जा. इ०इ०. सारांश काय तर तपासून बघायचंच नाही. हे आपल्यात फार आहे. सगळीकडे सांप्रदायिक वागत रहायचं, की झाले सगळे सुखी. आता लता मंगेशकर म्हणजे काय आहे हे अजून १००ांश सुद्धा कोणाला समजलेलं नाही. हजार मुलाखती झाल्या त्या लोकांच्या. पण काही बोलले म्हणून नाहीत. गाण्यातून काही समजेल तर समजेल. तर ते बघायला नको का? हे एक उदाहरण.

चलो. रोख कोणावर विशेष असा नाही. पण ब-याच दिवसांनंतर परतल्यावर जे दिसतं त्याचा एकत्रित परिणाम होतो. वाटतं की आपण (म्हणजे मराठी लोक) मस्त भांडणं करणारे होतो. हात जोडणारे कधीपासून झालो? १ अतीव आदर प्रकटन, २ पुस्त्या, ५ सहमत . . . ह्यातून काही निष्पन्न होत नाही. आणि त्यात मजाही नाही. असा ठराविकपणा आला की वाईट वाटतं . . .

लेखनविषय: दुवे:

Comments

आता

आता हे वरचे पटले आहे पण सहमती दिली तर परत तेच होईल! ;)
व्यक्तीपुजा काही फार देवून जात नाही हेच खरं!
लताबाईंचेंएमबाजी नि पैश्याला हावरटपणाचे किस्से दादा कोंडकेंच्या पुस्तकात पण वाचले आहेत.

पण तुम्ही आज लतावर लिहिलंत उद्या अण्णांवर लिहाल मग?
आमच्या सारख्यांची आहे का पंचाईत? ;)

आपला
गुंडोपंत

जागतीक मराठी परीषद - ऐकलेला किस्सा

जागतीक मराठी परीषदेचे दिल्लीत आधीवेशन होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची मुलाखत घेणे चालले होते. प्रश्नकर्ताने प्रश्न विचारला:
"माननीय सुधाकररावजी नाईक साहेब, आपल्याला 'शिवाजी' बद्दल काय वाटते?" (राजा शिवाजी अथवा शिवाजी महाराज वगैरे नाही..)

जागतीक मराठी परीषद - ऐकलेला किस्सा

त्या प्रश्नकर्त्याला माहीत नसेल. पण आम्ही लहानपणी मनमुराद शिवाजीचा एकेरी उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ त्याला समजणार नाही. पण म्हणूनच विसाव्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ गायिकेलाही आम्ही लताच म्हणतो.

हे जागतिकवाले येतात कुठून कोणास ठाऊक! इकडे अमेरिकेत तर असे काय नमुने आहेत की बस. त्याना भारताबद्दल काहीच माहिती नाही. कुमार, कार्तिक, राज, नील, असली काहीतरी नावं असतात त्यांची. "शिवाजी" हा एक "minor warlord" होता असलं काहीतरी बडबडत असतात. आणि गोरे लोक ह्यांनाच विचारतात भारताबद्दल. वैताग आहे.

सगळच असं नसतं

पण आम्ही लहानपणी मनमुराद शिवाजीचा एकेरी उल्लेख केला आहे.

शिवाजीचा उल्लेख हा राजा म्हणून केला तरी आपण एकेरीच करतो आणि तेही प्रेमाने.फक्त एका मुख्यमंत्र्याला जाहीर सभेत चार विशेषणे लावताना एक आदर म्हणून शिवाजी बद्दल काही म्हणावेसे न वाटणे हे बरोबर नाही ह मुद्दा होता.

हे जागतिकवाले येतात कुठून कोणास ठाऊक!

माझ्या माहीतीप्रमाणे हा प्रश्नकर्ता भारतातील मराठीच होता... जागतीक मराठी परीषदेत अमेरिकन्सच नसतात. ती चालू केली मनोहर जोशी आणि शरद पवार यांच्या पुढाकाराने..

इकडे अमेरिकेत तर असे काय नमुने आहेत की बस. त्याना भारताबद्दल काहीच माहिती नाही.

आपण अमेरिकेतून लिहीत असाल तर कुठून लिहीता हा प्रश्न आहे. आपण म्हणता तसे नमुने नक्कीच असतात पण आता काळ खूपच बदलला आहे आणि "शिवाजी" हा एक "minor warlord" होता , असे आता कोणी बोलल्याचे मी तरी ऐकलेले नाही. (अमेरिकेभरच्या या बाबतीतील उचापत्यांबद्दल मला खबरबात असते..)

सगळच असं नसतं

शिवाजीचा उल्लेख हा राजा म्हणून केला तरी आपण एकेरीच करतो आणि तेही प्रेमाने.फक्त एका मुख्यमंत्र्याला जाहीर सभेत चार विशेषणे लावताना एक आदर म्हणून शिवाजी बद्दल काही म्हणावेसे न वाटणे हे बरोबर नाही ह मुद्दा होता.

कबूल आहे ना मला.

माझ्या माहीतीप्रमाणे हा प्रश्नकर्ता भारतातील मराठीच होता... जागतीक मराठी परीषदेत अमेरिकन्सच नसतात. ती चालू केली मनोहर जोशी आणि शरद पवार यांच्या पुढाकाराने..

"जागतिकवाले" म्हणजे ह्यांच्याचबद्दल बोलत होतो. आपल्या "बृहन्महाराष्ट्रा"तले extra-नमुनेदार मराठीभाषक नमुने!

आपण अमेरिकेतून लिहीत असाल तर कुठून लिहीता हा प्रश्न आहे. आपण म्हणता तसे नमुने नक्कीच असतात पण आता काळ खूपच बदलला आहे आणि "शिवाजी" हा एक "minor warlord" होता , असे आता कोणी बोलल्याचे मी तरी ऐकलेले नाही. (अमेरिकेभरच्या या बाबतीतील उचापत्यांबद्दल मला खबरबात असते..)

आता काही आठवत नाही. पण ही खबरबात काय ते तर सांगा. खूप उत्सुकता आहे. वाटलं तर चर्चेचा प्रस्ताव टाका नवीन ...

शिवाजी

शिवरायांच्या नावाइतका दुसर्‍या कोणत्याही नावाचा बाजार राजकीय पक्षांनी केला नाही.

लहानपणी "शिवाजी म्हणतो" हा खेळ खेळत होतो. मजा यायची. आजकाल भगवे दंडुके पाठीवर बसतील म्हणून "प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, गोब्राह्मणप्रतिपालक, कुळवाडीभूषण, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात" असे म्हणावे लागते. आणि त्यातही मग गोब्राह्मणप्रतिपालक म्हणायचे की नाही यावर भांडणे होतात.

ह.घ्या.

आता गंभीर...

शिवाजीराजांचा एकेरी उल्लेख कोणत्या अर्थाने, कसा होत आहे याचा विचार करत नाहीत. माझा पती छत्रपती (पुढे छत्रपती बदलून छत्रीपती), मारुतीच्या हाती शँपेन (पुढे मारुतीच्या बदलून माकडाच्या) या नाटकांच्या संदर्भातही झालेले वादही पहा...

सुरेख चर्चाप्रस्ताव आहे.

आजानुकर्ण शी अतिसहमत

शब्दन शब्दाशी सहमत
व्याकरणात देव,राजा,मित्र व आई यांचा उल्लेख एकेरी करण्यास परवानगी आहे. असे देव गुरुजींनी सांगितल्याचे आठवते.

प्रकाश घाटपांडे

देव,राजा,मित्र व आई

या यादीत मित्र नसतं.. पण मित्राला एकेरी संबोधन्यासाठी कुणाची परवानगी किंवा शिफारस लागत नाही. :-)

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

प्रसिद्धी

एखादी व्यक्ती खरेच प्रसिद्ध असेल तर आपण सुप्रसिद्धची उपाधी नावाआधी लावत नाही - पुल
उदा. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी १५००० धावा केल्या ह्या बातमीपेक्षा
सुप्रसिद्ध नेते माननीय अतुलचंद्ररावजीसाहेब शेरतुकडे यांनी वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली ह्या बातमीला सुप्रसिद्धची जास्त गरज आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

ही प्रसिद्धी बघा

right
Vadhadivas

प्रकाश घाटपांडे

विनोद

चांगला विनोद आहे :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लिहिलं काहीच नाही . . .

अहो तेव्हढंसुद्धा लिहिलं नव्हतं. आणि त्याच्यात विशेष रसही नाही मला. मुख्य तक्रार काय तर अतीव-आदराचं खूप प्रदर्शन झालं की बोलता येत नाही. उगाच कुणाला दुखवा कशाला असं फीलिंग येतं. मग कोणाचं काही तपासून बघता येत नाही. आता हे पैशांचं मला माहीत नव्हतं, पण जवळपास ७५/७६ च्या आसपास त्यांचं गाणं नीरस होऊ लागलं त्याचा ह्या "हावरटपणा"शी संबंध असेल की नाही? म्हणजे कलेशी संबंध आहे. बोलायला बंदी असू नये. व्यक्तिपूजाही करा. कारण शुद्ध व्यक्तिपूजा म्हणून कोण करत नाही. शेवटी एक काहीतरी तत्त्व असतं माणसात, त्याच्यावर प्रेम असतं. जरूर करा. पण तीनतीनदा बोलून दाखवू नका. आणि खरा जो भक्त असतो तो दोषांचीही छाननी करतो. तो प्रेमापोटीच करतो हे लक्षात ठेवा. एवढंच.

"अण्णां"बद्दल काय लिहिणार? मला त्यांच्याबद्दल अतीव म्हणजे अतीवच आदर आहे. काही बोललेलं मी मुळीच खपवून घेणार नाही! आता म्हणाल तर या क्षणी इथे "रसिकान रे" सुरू आहे. त्याच्यापुढे झनक झनकवा "क्यू" मध्ये . . .

असहमत..

आता हे पैशांचं मला माहीत नव्हतं, पण जवळपास ७५/७६ च्या आसपास त्यांचं गाणं नीरस होऊ लागलं त्याचा ह्या "हावरटपणा"शी संबंध असेल की नाही?

असहमत..

'७५-७६ च्या काळात लतादिदींचं गाणं नीरस होऊ लागलं' या वाक्याशी असहमत आहे!

आपला,
(लताभक्त) तात्या.

नीरस . . .

असहमत..

'७५-७६ च्या काळात लतादिदींचं गाणं नीरस होऊ लागलं' या वाक्याशी असहमत आहे!

आपला,
(लताभक्त) तात्या.

आता ते गाणंच नीरस, की ल/प्या आणि क/आ च्या सांगीतिक करामती नीरस हे कसं सांगणार? आणि ते इतरांच्या तुलनेत तरीही श्रेष्ठ असेल, पण आधीच्या लताच्या तुलनेत नाही. मुळीच नाही. मला सत्यम-शिवम आणि सरगमपासूनच भीती बसली होती. "मैं तुलसी" वगैरे तर अगदी अंगावर आली. शेवटी "देखा एक ख्वाब" ह्या गाण्यामध्ये "संपलंय" हे लक्षात आलं. ती गाणी वाईट नाहीत. पण आपण आधीची ऐकली आहेत ना.

विसंगती

"अण्णां"बद्दल काय लिहिणार? मला त्यांच्याबद्दल अतीव म्हणजे अतीवच आदर आहे. काही बोललेलं मी मुळीच खपवून घेणार नाही! आता म्हणाल तर या क्षणी इथे "रसिकान रे" सुरू आहे. त्याच्यापुढे झनक झनकवा "क्यू" मध्ये . . .

जगन्नाथराव, आता काय म्हणावं याला. आपला तो बाळ्या अन् दुसर्‍याचा तो कार्टा असं काहीसं मराठीत म्हणतात. याला विसंगती नाही तर काय म्हणायचे?
- जयेश

सहमत

सहमत...

अवांतरः एकदा हेच अण्णा म्हणे दारूचा तांब्या घेउन व्यासपीठावर प्रेक्षकांकडे पाठ करून बसले होते म्हणे गायला. आता हि ऐकिव माहीती आहे. खरे काय ते अण्णांना आणि त्या प्रेक्षकांना माहित.

मराठीत लिहा. वापरा.

आणि त्याच अण्णांना..

अवांतरः एकदा हेच अण्णा म्हणे दारूचा तांब्या घेउन व्यासपीठावर प्रेक्षकांकडे पाठ करून बसले होते म्हणे गायला. आता हि ऐकिव माहीती आहे. खरे काय ते अण्णांना आणि त्या प्रेक्षकांना माहित.

आणि त्याच अण्णांना भेटायला त्यांच्या घरी भारताचे माजी राष्ट्रपती 'अग्नीपंख'कार अब्दुल कलाम गेले होते ही मात्र ऐकीव नसून खरी बातमी आहे!

आणि त्याच अण्णांनी 'सवाईगंधर्व महोत्सव' हे भारतीय संगीतातील एक अजरामर सोनेरी पान लिहिले ही देखील ऐकीव नसून खरी बातमी आहे!

असो...

आपला,
(मीन माइंडेड नसलेला!) तात्या.

'अग्नीपंख'कार

अग्निपंख तर आहेच पण डायरेक्ट 'अग्नि'कार म्हटलं तरी चालेल. :-)

अभिजित...

यावरुन आठवले...

बोवा,
यावरुन जीएंचे खालील आशयाचे वाक्य आठवले...
गावात पटकीची साथ येऊन १०० माणसे मेली तर त्यात ४० मुडदे निर्व्यसनी लोकांचे सापडतील... पण आण्णांसारखा आवाज आणि कर्तृत्व यापैकी कुणाचं असेल का?

- आजानुकर्ण गटणे

लिंकनची गोष्ट

अमेरिकेतील सिव्हिल वॉरच्या वेळेस लिंकनने जीवाची पराकाष्ठा करून देशाची फाळणि टाळली आणि गुलामगिरी संपवून हा देश समतेच्या पुढच्या टप्प्यावर आणला.

ह्या लढाईतील त्याचा एक सेनापती, खूप पराक्रमी होता म्हणून लिंकन त्याचे ऐकायचा, सल्ला घेयचा, अर्थातच म्हणुन तो इतरांच्या डोळ्यात खुपायचा. एकदा काही अधिकारी धीर करून लिंकनसमोर गेले आणि तो संध्याकाळी कसा व्हिस्की पिऊन नशेत असतो हे "काळजी"च्या आणि "तक्रारी"च्या सुरात सांगू लागले. लिंकन ने त्यांना प्रश्न विचारला की तो कुठल्या ब्रँडची पितो ते शोधून काढा. अधिकारी कोड्यात पडले, त्यांना कळेना याला काय म्हणायचे आहे ते. मग लिंकन शांतपणे म्हणाला तोच ब्रँड तुम्हीपण जरा दरोज घेत चला, कदाचीत तुम्ही पण पराक्रम गजवू शकाल...

हा हा हा!

मग लिंकन शांतपणे म्हणाला तोच ब्रँड तुम्हीपण जरा दरोज घेत चला, कदाचीत तुम्ही पण पराक्रम गजवू शकाल...

हा हा हा! क्या बात है.. :)

तात्या.

--
सध्या पावसाळ्याचे दिवस असून दुषित पाण्यामुळे काही माणसे पोटदुखी, पोटशूळ व जुलाब या मुळे आजारी पडल्याच्या बातम्या हल्ली वरचेवर येत आहेत. कृपया सर्वांनी काळजी घ्या! :)

चर्चेचा नेमेका हेतु काय?

खरंतरं मला वाटलं होतं जगन्नाथरावांनी चर्चेसाठी खूप चांगला विषय निवडला आहे. मी काही लताबाईंचा समर्थक नाही की अण्णांचा टीकाकार नाही. मी मागे एका चर्चेत म्हटले तेच पुन्हा म्हणतो. कोणाही मोठ्या व्यक्तिच्या गुणदोषांची तटस्थपणे चर्चा केल्याने त्या व्यक्तिचे मोठेपण कमी होत नाही. माझं हेच म्हणणं जगन्नाथरावांनी खालील परिच्छेदात मांडले.

व्यक्तिपूजाही करा. कारण शुद्ध व्यक्तिपूजा म्हणून कोण करत नाही. शेवटी एक काहीतरी तत्त्व असतं माणसात, त्याच्यावर प्रेम असतं. जरूर करा. पण तीनतीनदा बोलून दाखवू नका. आणि खरा जो भक्त असतो तो दोषांचीही छाननी करतो. तो प्रेमापोटीच करतो हे लक्षात ठेवा. एवढंच.

परंतु खालच्याच पेरिच्छेदात मात्र नेमकी उलट भूमिका मांडली ती अशी..

"अण्णां"बद्दल काय लिहिणार? मला त्यांच्याबद्दल अतीव म्हणजे अतीवच आदर आहे. काही बोललेलं मी मुळीच खपवून घेणार नाही! आता म्हणाल तर या क्षणी इथे "रसिकान रे" सुरू आहे. त्याच्यापुढे झनक झनकवा "क्यू" मध्ये . . .

मग या चर्चेचा नेमेका हेतु काय?
-जयेश

अरे काय यार!

जगन्नाथरावांनी खालील परिच्छेदात मांडले.

व्यक्तिपूजाही करा. कारण शुद्ध व्यक्तिपूजा म्हणून कोण करत नाही. शेवटी एक काहीतरी तत्त्व असतं माणसात, त्याच्यावर प्रेम असतं. जरूर करा. पण तीनतीनदा बोलून दाखवू नका. आणि खरा जो भक्त असतो तो दोषांचीही छाननी करतो. तो प्रेमापोटीच करतो हे लक्षात ठेवा. एवढंच.

परंतु खालच्याच पेरिच्छेदात मात्र नेमकी उलट भूमिका मांडली ती अशी..

"अण्णां"बद्दल काय लिहिणार? मला त्यांच्याबद्दल अतीव म्हणजे अतीवच आदर आहे. काही बोललेलं मी मुळीच खपवून घेणार नाही!

साधा कंट्रीविनोद आहे. बाळकराम, आणि कोण तो, दिवाकर, तिथपासून सगळ्यांनी असले पीजे मारले आहेत. आपण मारायचे नाहीत? बोला की, "अण्णा"नी दारू सोडली ती एकदोन वर्षं नुसती भकास गेली . . . असं वाटत असेल तर खुशाल बोला.

हे पुढचं तुम्हाला उद्देशून नाही: मला स्वतःला समोर "प्याला" ठेवून गाणं-वाजवणं हेच चुकीचं वाटत नाही. काय करू? आड्यन्सचा अपमान होतो का? होऊ देत. आपल्याला काय पडली आहे? अापण गाणं फक्त ऐकत असतो. का सरस्वती देवीची अवहेलना होते, असं म्हणतात? देवीने प्रगट होऊन सांगितलं? भाषणं नकोत. एक तान घ्या आणि मू*** होतं की नाही सांगा . . .

सहिच...

मला स्वतःला समोर "प्याला" ठेवून गाणं-वाजवणं हेच चुकीचं वाटत नाही. काय करू? आड्यन्सचा अपमान होतो का? होऊ देत. आपल्याला काय पडली आहे?
हे मात्र सहिच. उद्या शाळेतल्या वर्गांमध्ये शिक्षक असाच हाता ग्लास घेउन शिकवत आहेत. शिक्षक वर्गात आल्यावर सगळे विद्यार्थी उठून आपापले ग्लास घेउन चिअर्स करत आहेत. आपल्याला काय पडली आहे? शेवटी परिक्षा विद्यार्थ्यांना द्यायची आहे. अभ्यास करतील नाहितर नापास होतील. आपल्याला काय पडली आहे? शिक्षकाने शिकवायचे काम करावे. विद्यार्थ्यांनी शिकण्याचे. ते करत असताना इतर गोष्टींकडे लक्ष कशाला? काय?

अवांतरः आमचे संगीतज्ञान जरा कमीच आहे. म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो? हे संगीत गुरू शिष्य शिकवताना शिकताना घेउनच बसतात का? कि त्यांचे शिकण्यापेक्षा पिणे हि योग्यता जास्त महत्वाची आहे. गुरूदक्षिणा म्हणून कोणता ठराविक ब्रँड द्यावा लागतो का? असो. आम्ही संगीता पासून (कृपया याचा अर्थ संगीता नावाची स्त्री असा घेउ नये.) जरा दूरच राहतो. उगाच भावना दुखावण्याचा प्रश्न असतो. काय?

मराठीत लिहा. वापरा.

पंढरीची वारी!

उद्या शाळेतल्या वर्गांमध्ये शिक्षक असाच हाता ग्लास घेउन शिकवत आहेत. शिक्षक वर्गात आल्यावर सगळे विद्यार्थी उठून आपापले ग्लास घेउन चिअर्स करत आहेत. आपल्याला काय पडली आहे? शेवटी परिक्षा विद्यार्थ्यांना द्यायची आहे. अभ्यास करतील नाहितर नापास होतील. आपल्याला काय पडली आहे? शिक्षकाने शिकवायचे काम करावे. विद्यार्थ्यांनी शिकण्याचे. ते करत असताना इतर गोष्टींकडे लक्ष कशाला? काय?

आमच्या मते शाळेतला वर्ग आणि संगीताची मैफल यात फरक आहे!

आमचे संगीतज्ञान जरा कमीच आहे. म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो? हे संगीत गुरू शिष्य शिकवताना शिकताना घेउनच बसतात का? कि त्यांचे शिकण्यापेक्षा पिणे हि योग्यता जास्त महत्वाची आहे. गुरूदक्षिणा म्हणून कोणता ठराविक ब्रँड द्यावा लागतो का? असो.

संगीताचे ज्ञान वाढल्यास वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतात असे वाटते! कमी ज्ञान किंवा घोर अज्ञान असल्यास असले प्रश्न पडू शकतात असे आमचे मत आहे.

अवांतर-

आम्ही सध्या हा अभंग ऐकत आहेत. हा अभंग ऐकताना 'तपस्या' कशाला म्हणतात, 'नादब्रह्म' कशाला म्हणत असावेत याचा थोडासा अंदाज येतो! आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांना वरील कोणतेही प्रश्न पडत नाहीत! यातल्या 'बाप रखुमा देवीवर विठ्ठलू' मधली यमनची जागा ऐकल्यावर पंढरीची वारी केल्याचं पुण्य मिळतं असं आम्ही मानतो!

या अभंगावर लवकरच आम्ही एखादा रसग्रहणात्मक लेख उपक्रमावर लिहिणार आहेत.

असो..

सध्या आम्ही 'जय शारदे वागिश्वरी' या गाण्याचे रसग्रहण लिहीत आहोत!

आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.

संगीत विद्यालय

चांगले संगीत कलाकार संगीत विद्यालयात बनतात. योग्य शिक्षण घेउन. चौथी पास होउन मुख्यमंत्री बनणारा एखादाच. संगीत विषारद होण्यासाठी काही परिक्षा द्याव्या लागतात हे तरी खरे आहे का? शाळेत संगीताचा शिक्षक होण्यासाठी काही तरी का होईना पात्रता असावी लागते असे आमचे अजुनही ठाम मत आहे.

मराठीत लिहा. वापरा.

पात्रता

रामसाहेब, पात्रतेचा विषय काढलात? अहो, इथे ब्राम्हणांबद्दलची चर्चा वाचा. तिथे तर हाच मुद्दा सुरू आहे. पात्रता असुन सुद्धा हाल होताहेत. भारत सोडा. वगैरे. पण तुम्हीच सांगा नोकरी देताना शैक्षणिक पात्रता पाहतात कि नाही? अहो एकलव्य पण शिकलाच की धनुर्विद्या. पण अंगठा गमावला ना?
भारतातलं सोडा इथे पात्रता नसलेल्यांनाच जास्त किंमत आणि प्रसिद्धी आहे. अमेरिकेत पात्रता निकष पुर्ण केल्या शिवाय मिळते का हरितपत्र? लोक काय मजा म्हणून विद्यापीठांचे उंबरे झिजवतात का? कि विद्यापीठ मजा म्हणून संगीताचे शिक्षण देते?

आपण वर लिहीलेले कलाकार महान नाहित असे आम्ही कधीच म्हणलेले नाही. इथे मुळ मुद्दाच आहे तो अतीव आदराचा ... चांगल्याला चांगले म्हणा आणि वाइटाला वाइट म्हणा. चांगल्याच्या नावावर वाइट सुद्धा चांगले म्हणायचा हट्ट कशाला?

राहिला मुद्दा जाळपोळीचा. त्याला आम्ही जबाबदार नाही. कोणताही प्रश्न चर्चेने सोडवाता येतो हे आम्हा भारतीयांचे मत ते आम्हाला पटते आणि जिथे बळाचा वापर करायला हवा तिथे करायलाच हवा असे अमेरिकेचे मत सुद्धा आम्हाला अनेकदा पटते. आम्ही आपले सर्व सामान्य माणूस. विचारले म्हणून आमचे मत मांडतो. सामाजिक प्रश्न चर्चेने सोडवता येत असताना जाळपोळ करणार्‍यांना समाजकंटक म्हणतात. संकेतस्थळांच्या बाबतीत कदाचित संस्थकंटक म्हणावे लागेल. त्यामुळे आम्ही उपक्रमावर जाळपोळ वगैरे काहि सुरू करत नाहिये.

अश्या जाळपोळी हिरीरीने करणारे तरी कुठे फेडतील ही पापे? सांगा बर?

एकुण काय उपक्रमावर राम नाही राहिला ....

मराठीत लिहा. वापरा.

हल्लिची पिढी

एकुण काय उपक्रमावर राम नाही राहिला ....

हल्लिच्या पिढित काही राम राहिला नाही हे प्रत्येक पिढीत गुळगूळीत झालेले वाक्य आहे.
प्रकाश घाटपांडे

हल्लिची पिढी -एकादशी करते का ?

एकुण काय उपक्रमावर राम नाही राहिला ....

आषाढी एकादशीचा उपवास करा सगलीकडे विठ्ठलात राम दिसाया लागन.

प्रत्येक पिढी

हल्लिच्या पिढित काही राम राहिला नाही हे प्रत्येक पिढीत गुळगूळीत झालेले वाक्य आहे.
बरोबर आहे. आम्ही लिहिले होते. एकुण काय उपक्रमावर राम नाही राहिला .... अहो येथे तळीराम आहे/आहेत. नुसता राम नाही दिसला म्हणून हे वाक्य लिहिले. ह. घ्या.

मराठीत लिहा. वापरा.

अभंग आवडला

धन्यवाद तात्या,

अभंग एकदम आवडला!

व्यक्तीपूजा

आपल्याकडे व्यक्तीपूजा फार लोकप्रिय आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असले तर तिला लगेच देव्हार्‍यात बसवले जाते. शेवटी सर्व माणसे आहेत. माणसांच्या हातून चुका होऊ शकतात हे लक्षात घेतले जात नाही. मग अमिताभने शेतकरी असल्याचे दाखवले किंवा सचिनला कारचा टॅक्स भरावा लागला नाही अशा बातम्या वाचल्या की लोकांना धक्का बसतो. अमिताभ अतिशय चांगला अभिनेता आहे, पण म्हणून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो एका ठराविक पद्धतीनेच वागत असेल ह्या निष्कर्षाला काही अर्थ नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आणि ते आपण ठरवूही शकत नाही!

अमिताभ अतिशय चांगला अभिनेता आहे, पण म्हणून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो एका ठराविक पद्धतीनेच वागत असेल ह्या निष्कर्षाला काही अर्थ नाही.

सहमत, शिवाय त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसं वागावं हेही आपण ठरवू शकत नाही! तो अधिकार आपल्याला नाही...

उद्या एखादा गवई जर दारुचा तांब्या घेऊन, श्रोत्यांकडे पाठ करून गायला बसला तर तो त्याचा प्रश्न झाला अन् त्या मैफलीत बसून त्या गवयाचं गाणं ऐकायचं किंवा नाही हा श्रोत्यांचा प्रश्न झाला!

झाली की नाही फिट्टंफाट! :)

परंतु तेच जर श्रोते असंही गाणं ऐकत असतील तर ती त्या श्रोत्यांची रसिकता म्हणावी लागेल आणि त्या गवयाच्या गायकीतही काहीतरी अद्भुत आहे असेच म्हणावे लागेल!

Right? :)

आपला,
(गुणग्राहक) तात्या.

वैयक्तिक प्रश्न

शिवाय त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसं वागावं हेही आपण ठरवू शकत नाही! तो अधिकार आपल्याला नाही...

सहमत. तो त्याचा/तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्याला एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे काही गुण आवडत असतील तर त्या गुणांचे कौतुक करावे, त्याच्या/तिच्या वैयक्तिक आयुष्याची हमी घेऊ नये. पण जर एखादा गवई समारंभात असे करत असेल तर ती खाजगी बाब रहात नाही, कारण ही श्रोत्यांना दिलेली प्रतिक्रिया आहे. अर्थात असे गाणे श्रोते ऐकत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी ऐकले असते याची खात्री देता येत नाही. अर्थात याचे कारण मला शास्त्रीय संगीतातले ओ की ठो कळत नाही असे देता येऊ शकते. :)
माझ्या मते इथे प्रश्न श्रोत्यांच्या सेल्फ रिस्पेक्टचा आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

जरा...

समजा अण्णांचे गाणे ऐकताना लोकांना त्यांच्या समोरचा दारूचा तांब्या दिसत असेल, तर त्या लोकांची ते गाणे ऐकण्याची पात्रता नाही असे मला वाटते.
हे जरा नवीनच आहे. दिसण्याचा आणि ऐकण्याचा संबंध कोणाची पात्रता ठरवतो. यालाच इथे अतीव आदर वगैरे म्हटले आहे. असो...

असले जरी महान ते अण्णा अन त्या लतादिदि..
या आदरास हसतो आहोत सामान्य आम्ही फिदिफिदि...

मराठीत लिहा. वापरा.

अण्णा तांब्या आणि गाणे

समजा अण्णांचे गाणे ऐकताना लोकांना त्यांच्या समोरचा दारूचा तांब्या दिसत असेल, तर त्या लोकांची ते गाणे ऐकण्याची पात्रता नाही असे मला वाटते.

ह्यात "पात्र" वर जाडा टाईप टाकला असता तर तुम्हाला टाईमपास पीजेचा चाणक्य पुरस्कार मिळाला असता . . .

क्या बात है..

समजा अण्णांचे गाणे ऐकताना लोकांना त्यांच्या समोरचा दारूचा तांब्या दिसत असेल, तर त्या लोकांची ते गाणे ऐकण्याची पात्रता नाही असे मला वाटते.

क्या बात है...लाख मोलाची बात!

तात्या.

पुरस्कारांच्या देशा

यावर हेरंब कुलकर्णी साधना साप्ताहिकातील " तिरकस चौकस् " हे सदर ३१ व्या पानवर् इथे वाचा.
तसेच " साहित्यिक आणि पुढारी एक प्रेमकहाणी इथे ३१ व्या पानावर वाचा.

प्रकाश घाटपांडे

पुरस्कारांच्या देशा

हे मनोरंजक दुवे दिल्याबद्दल तुम्हाला जुलै २००७ चा तात्या अभ्यंकर पुरस्कार . . .

मूळ मुद्दा हरवत चालला आहे

आता चर्चेचा मूळ मुद्दा हरवत चालल्याचे जाणवते. मुळातच ज्यांनी चर्चा सुरु केली त्यांनाच त्याचे भान उरले नाही असे दिसते. जगन्नाथरावांनी मांडलेला चर्चेचा बीजलेख खूप महत्वपूर्ण आहे. मला वाटले त्यातून काही चांगले निषन्न होईल. परंतु त्यांनीच त्यांच्या भूमिकेला छेद दिला. हे व्यक्तिगत नाही, पण जे चर्चा सुरु करतात, त्यांनी ती off the track होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे.
असो...

व्यक्ति कितीही मोठी असली तरी तिच्या दोषांचे समर्थन करु नये. एखादी व्यक्ति जेंव्हा समाजात प्रसिध्द पावते, तेंव्हा लोकांनी तिला मोठे केलेले असते याचे तिने भान ठेवले पाहिजे. त्यामूळे त्या व्यक्तिने आपल्या कोणत्याही कृतीने लोकांमध्ये चुकीचे संकेत जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.

आज दुर्दैवाने अण्णा हजारे, बाबा आमटे, नानाजी देशमुख यांच्या सारख्या निरलस वृत्तीने काम करणार्‍या व्यक्तिंचे अनुकरण करणारे खुप कमी लोक आहेत. परंतु कलाक्षेत्रातील व्यक्तिंचे अनुकरण करणारे लाखो आहेत. एखादा अभिनेता विशिष्ट पध्दतीने सिगारेट ओढत असेल, तर लगेच त्याचे अनुकरण केले जाते. त्यामूळे समाजावर प्रभाव पाडू शकणार्‍या व्यक्तिंनी सामाजिक भान बाळगलेच पाहिजे असे माझे ठाम मत आहे. सचिनने लाखो रुपयांचा कर चुकवला असेल किंवा अमिताभने चुकिच्या पध्दतीने मावळची जमिन मिळवली असेल तर तो नक्किच त्यांचा वैयक्तिक प्रश्न होत नाही.

गुणांचे कौतुक जरुर करावे, परंतु दोषांचे समर्थन करण्यासाठी बाह्या सरसावू नयेत.

-जयेश

आयडॉल्स... विद ग्रेट पावर

त्यामूळे समाजावर प्रभाव पाडू शकणार्‍या व्यक्तिंनी सामाजिक भान बाळगलेच पाहिजे असे माझे ठाम मत आहे.

सहमत आहे. विशेषतः अशा व्यक्तिंचे वैयक्तिक आयुष्य ढवळून निघालेले असते, त्याची आणि त्यांच्या व्यावसायिक आयुष्याची सरमिसळ झालेली असते त्यामुळे समाज जर त्यांना दैवत मानत असेल तर तशी प्रतिमा राखणे आवश्यक होते. (यात चूक की बरोबर हा विचार केलेला नाही, बरेचदा अपरिहार्यताही असू शकते.)

आमचा लाडका स्पायडरमॅन नेहमी म्हणतो

"विद ग्रेट पावर कम्स ग्रेट रिस्पाँसिबिलिटी" हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे वाक्य आहे.

सहमत

जयेश आणि प्रियाली दोहोंशी सहमत.

गुणांचे कौतुक जरुर करावे, परंतु दोषांचे समर्थन करण्यासाठी बाह्या सरसावू नयेत. हा मुद्दा समजून घेणे महत्वाचे आहे.

मराठीत लिहा. वापरा.

ग्रेट पॉवर ही पहाण्या-वाचण्यापुरतीच...बाकी लहानपण देगा देवा..

"विद ग्रेट पावर कम्स ग्रेट रिस्पाँसिबिलिटी" हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे वाक्य आहे.

हे माझे ही आवडते वाक्य आहे. पण सर्वसाधारण पणे व्यक्तीला/समाजाला असे "हिरो" हे पाहायला अथवा ऐकायला आवडतात, स्वानुभवायला नाही अगदी त्यातील सर्व चांगल्यावाईट गोष्टींसकट. कारण लांबून टिका करणे सोपे असते. म्हणूनच आपण रामाला देव करतो, कृष्णाला देव करतो, शिवाजीचे तेच आणि आंबेडकरांचे पण तेच. एकदा देव म्हणले की पूजा करून मोकळे आचरण्याचा संबंध येत नाही, फार तर फार नाटकात अथवा नाटकी पद्धतीने नक्कल करू अथवा त्यांच्यातील दोषांची/कथांची चर्चा टिका टिपण्णीसहीत करू पण स्वतः "ग्रेट पॉवर.." व्हावे का हा प्रश्न आला की "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.." म्हणत गप्प बसणार.

गीतेमधे तर कृष्णाने म्हणलेलेच आहे (ते मी आधी पण कुठेतरी लिहीले आहे..)

"जे जे आचरीतो श्रेष्ठ ते ते ची दुसरे जन, तो मान्य करतो ते ते, लोक चालवतात ते" आणि म्हणून स्वतःस मोठ्या समजणार्‍या व्यक्तीची जबाबदारी ही तितकीच मोठी असते. ( मीची कर्मी न वागेन, जरी आळस झाडून, सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग | सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे, होईन संकरद्वारा मीची घातास कारण || इत्यादी...)

एक गोष्ट (खरी-खोटी माहीत नाही):
स्वातंत्र्यपूर्व काळातला एक देशभक्त पोटतिडकीने एका खेड्यात लोकांसमोर देशसेवेबद्दल बोलत होता. त्यात् तो म्हणाला की,"जेंव्हा काम (देशकार्य) करायची वेळ येते तेंव्हा आपण मागे, कारण आपल्याला शेजार्‍याच्या घरात शिवाजी जन्माला येयला हवा असतो, स्वतःच्या नाही..." इत्यादी. एक तरूण खूप भारावून गेला आणि नंतर त्या देशभक्ताला भेटून म्हणाला की, "आपले म्हणणे पटले आणि म्हणूनच (देशभक्त पुर्ण ऐकायच्या आधी थोडा खूश होउ लागला तितक्यात, पुढे ऐकले:) मी ठरवले आहे की मी लवकरच लग्न करणार आणि लगेच मूल होण्यासाठी प्रयत्न करीन. मला मुलगा झाला की त्याला शिवाजी होण्यासाठी नक्की प्रोत्साहन देईन!"

स्पायडरमॅन

विद ग्रेट पावर कम्स ग्रेट रिस्पाँसिबिलिटी

दुसर्‍या स्पायडरमॅन मध्ये त्याचे काका(?) स्पायडरमॅनला हेच समजावतात..

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

सहमत

सचिनने लाखो रुपयांचा कर चुकवला असेल किंवा अमिताभने चुकिच्या पध्दतीने मावळची जमिन मिळवली असेल तर तो नक्किच त्यांचा वैयक्तिक प्रश्न होत नाही.

सहमत आहे. माझा वरील प्रतिसाद त्यांचे फ्यान सूज्ञ असतील तर लागू आहे. पण आपल्या देशात लाखो फ्यान्स अंधानुकरण करत असताना त्यांनी नक्कीच काळजी घ्यायला हवी. शिवाय, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी कायद्याचे उल्लंघन करणे चूक आहे. त्याचे समर्थन कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही, मग ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

राजेंद्रराव,

आपल्या देशात लाखो फ्यान्स अंधानुकरण करत असताना त्यांनी नक्कीच काळजी घ्यायला हवी.

कशी काळजी घेणार? अहो कलाकारांचं/खेळाडूंचं एक वेळ सोडा पण जी मंडळी भ्रष्टाचारी असतात, व्यसनी असतात अश्यांना तर आपण बहुमताने निवडून देतो त्याचं काय?

मला सांगा राजेंद्रराव, आपण मतदान करता का? आपण किंवा आपल्या घरातील मंडळी, आईवडील, काकाकाकू, वगैरे दर पाच वर्षांनी ज्या व्यक्तिला मते देतात, शासनाचा कारभार जिच्या हाती सोपवतात ती व्यक्ति १००% धुतल्या तांदळासारखी असते का? त्या व्यक्तिने कधीही भष्टाचार केलेला नसतो याची खात्री आपल्याला असते का? पण तरीही आपण त्याला मतं देताच ना?

विचार करून उत्तर द्या, मग पुढे बोलू..

तात्या.

मूळ मुद्दा

तात्या,
सुदैवाने राजकारणी मंडळी इतकी लोकप्रिय नाहीत की त्यांचे अंधानुकरण केले जाईल. याउलट अभिनेते, खेळाडू यांचे अंधानुकरण मोठ्या प्रमाणावर होते. मंगल पांडे प्रदर्शित झाल्यावर अनेक तरूणांनी आमिर खानप्रमाणे केशभूषा केली होती. अशी परिस्थिती असल्यावर कलाकारांनी आपले वर्तन कसे आहे याची काळजी घ्यायला हवी. अर्थात आपले कलाकारही सलमानसारखे असल्यावर सगळाच आनंद आहे.
इथे मूळ मुद्दा हा आहे की जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने, (अभिनेता, खेळाडू किंवा राजकारणी, कुणीही )कायद्याचे उल्लंघन केले तर ते चूक आहे. अमिताभने अनेक चित्रपटात सुंदर अभिनय केला आहे, पण जर त्याने जमीन चुकीच्या पद्धतीने मिळवली असेल तर ते चूक आहे. त्याच्या अभिनयामुळे त्याला असे करायची मुभा मिळत नाही. आणि त्याचा अभिनय चांगला आहे हे या गोष्टीचे समर्थन होऊ शकत नाही.
भ्रष्टाचाराने बरबटलेली राजकारणी मंडळी, तरीही त्यांचे निवडून येणे हा स्वतंत्र विषय आहे. त्यावर चर्चा करायची असल्यास नवीन चर्चाविषय सुरू करावा.

विचार करून उत्तर द्या,
सुचवणीबद्दल अनेक धन्यवाद :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मुळात,

व्यक्ति कितीही मोठी असली तरी तिच्या दोषांचे समर्थन करु नये.

मुळात त्या व्यक्तिच्या दोषांशी आपले काहीच देणेघेणे नसते/ नसावे. त्या व्यक्तितले तथाकथित दोष हा त्या व्यक्तिचा वैयक्तिक मामला आहे!

आणि मुळात संपूर्ण निर्दोष व्यक्ति कुणीच नसते! जयेशराव, अगदी वैयक्तिकच बोलायचं झालं तर तुम्हीदेखील संपूर्ण निर्दोष नाही आणि मीही नाही!

आपण सगळी माणसं आहोत आणि अहो माणूस म्हटलं की चुका, दोष हे असायचेच!

तात्या.

सहमत...

मुळात त्या व्यक्तिच्या दोषांशी आपले काहीच देणेघेणे नसते/ नसावे. त्या व्यक्तितले तथाकथित दोष हा त्या व्यक्तिचा वैयक्तिक मामला आहे!

पूर्णपणे सहमत... मग ती व्यक्ती आण्णा असो किंवा (व्यक्तीगत आयुष्यात चाळे करणारा) मायकेल जॅक्सन असो. :)

मायकलच्या आत्म्याला शांती लाभो. Long live the King...

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः||

आपला
(ब्लॅक ऑर व्हाईट, बीट ईट, डेंजरस अशा अप्रतिम गाण्यांचा प्रेमी) मायकेल आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लतादीदी, अण्णा, अमिताभ, काशिनाथ घाणेकर इ.इ.

जगन्नाथराव, मुळात हे लक्षात घ्या की 'राजा नागवा आहे' असे एखादा निरागस पूर्वगृह नसलेला लहान मुलगाच म्हणू शकतो. एरवी लोक लतादीदी, अण्णा असे विषय आले की घसाभर आवंढा धेऊन तयारच असतात. 'लतादीदींनी आज गायलेली गाणी ऐकायच्या लायकीचीही नाहीत' असे तुम्ही म्हणा, की लोक लगेच ' आयेगा आनेवाला, धीरे धीरे मचल, अगर मुझसे मुहब्बत है, ऐ मेरे वतन के लोगों, पंडीत नेहरु ढसढसा रडले' वगैरे म्हणत पिसाळून अंगावर येतील. 'अण्णांची गाण्यातली थोरवी आभाळाइतकी, पण त्यांची स्टेजवरची उशांची फेकाफेक हा रसिकांचा अपमान आहे ' असे तुम्ही म्हणा की लोक त्यांचे मारवे आणि त्यांचे मालकंस, अब्दुल कलाम आणि सवाई गंधर्व असलं बरंच काही आणि तुम्ही तरी परफेक्ट आहात का असल्या तलवारी उपसतील. 'बाबूजी हा मराठी संगीतातला मानदंड हे खरं, पण 'वीर सावरकर ' साठी जमवलेल्या पैशांचा हिशेब दिला का हो त्यांनी' असं स्वतःशी पुटपुटून तरी बघा, वीज पडेल. 'अमिताभ हा भयानक उच्च अभिनेता, पण आज तो हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात लोभी माणूस आहे' असं तुम्ही फक्त म्हणून बघा, दरडी कोसळतील. 'पणशीकरांचा अभिनय ठोकळेबाज आणि साचाबद्ध आहे, काशिनाथ घाणेकरांनी प्रत्येक भूमिकेत परतपरत संभाजीच केला, बालगंधर्वांच्या स्त्रीभूमिका आणि त्यांचे गाणे याविषयी आता हुंदके काढणे बंद केलेले बरे...' असलं काही म्हणायचं नसतं. अमरावतीला घाणेकरांच्या प्रयोगाला लोकांनी 'घाणेकर प्यालेले आहेत, आम्ही प्रयोग होऊ देणार नाही...' अशा धमक्या दिल्या, मग घाणेकरांनी जीव तोडून आवाज लावला आणि त्याच रात्री ते गेले. पण याचेही आपण ग्लोरीफिकेशनच केले आहे! थोडक्यात काय, तर 'आज' या विषयावर बोलू नका. कालचे काय ते सांगा. कुसुमाग्रजांची 'गाभारा' आठवते ना? (बघा, गेलो की नाही परत भूतकाळात?)
या विषयावरील एक चर्चा http://www.manogat.com/node/6081 इथे पहा
सन्जोप राव

 
^ वर