अतीव आदर, वगैरेवगैरे

काय आहे . . . कधी कधी कसं बोलावं हे समजत नाही. उगीच कोणी डोक्यात राख घालून घेऊ नका. पण ह्या आपल्या आदरणीय वगैरे व्यक्तींबद्दल परत परत फााा...ााार गहिवरून बोलण्याचे प्रकार बस झाले असं नाही वाटत? कितीदा बोलायचं? आपण बंगाली आहोत की काय? ठीक आहे. अमुकबद्दल परम भक्ती आहे. आहे ना? अरे सगळ्यांनाच आहे. त्यात सांगण्यासारखं काय? ही काय मोगलाई, पेशवाई आहे? पुन्हापुन्हा उच्चार केला नाही तर तुरूंगात टाकायला. गेली बरीच वर्षं अमेरिकेतही ही पद्धत आली होती खरी तर. आता लोक कंटाळले. होतं काय, विरुद्ध बोलायचीच बंदी होते. हल्ली मी कुठल्यातरी फोरमवर एका गाण्यावर लेख लिहिला. लेख नसेल तर चर्चेचा प्रस्ताव असेल. आपल्याला फरक कळत नसतो. फार काही नव्हतं त्याच्यात. पण काय चवताळून आले एकदम. म्हणजे काय तुझ्या मनात लताबद्दल अनन्यभक्ती नाही? काय पाखंडी माणूस आहेस तू? बंद कर आणि घरी जा. इ०इ०. सारांश काय तर तपासून बघायचंच नाही. हे आपल्यात फार आहे. सगळीकडे सांप्रदायिक वागत रहायचं, की झाले सगळे सुखी. आता लता मंगेशकर म्हणजे काय आहे हे अजून १००ांश सुद्धा कोणाला समजलेलं नाही. हजार मुलाखती झाल्या त्या लोकांच्या. पण काही बोलले म्हणून नाहीत. गाण्यातून काही समजेल तर समजेल. तर ते बघायला नको का? हे एक उदाहरण.

चलो. रोख कोणावर विशेष असा नाही. पण ब-याच दिवसांनंतर परतल्यावर जे दिसतं त्याचा एकत्रित परिणाम होतो. वाटतं की आपण (म्हणजे मराठी लोक) मस्त भांडणं करणारे होतो. हात जोडणारे कधीपासून झालो? १ अतीव आदर प्रकटन, २ पुस्त्या, ५ सहमत . . . ह्यातून काही निष्पन्न होत नाही. आणि त्यात मजाही नाही. असा ठराविकपणा आला की वाईट वाटतं . . .

लेखनविषय: दुवे:

Comments

यावरुन

जीए स्वतःही इतरांच्या लेखनात व आयुष्यात स्खलनशील मानवी आयुष्याचे असे काही कण मिळतात का हे तपासत असत हे आठवले.

-(हातात स्वागताचे हार धरलेला) आजानुकर्ण

व्यक्ती आणि सार्वजनिक जीवन

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणे ही टिळकांची चूक झाली हे लिहिताना मी म्हटले होते की समाजाचे पुढारीपण ज्यांनी घेतलेले असते किंवा ज्यांच्याकडे चालून गेलेले असते त्यांना ही व्हिजन असावी लागते. आपण जे करतो आहोत त्याला समाज डोक्यावर घेईल आणि पन्नास वर्षांनंतर त्याची काय अवस्था होईल याची त्यांना कल्पना करता आली पाहिजे. जी.एं.चे माणूसघाणेपण ही त्यांची खाजगी बाब आहे. सार्वजनिक जीवनात तिकिट लावून ते कधीच बसले नाहीत. (अण्णा, घाणेकर, पणशीकर यांच्या तिकिट लावून केलेल्या कार्यक्रमात एक अकाउंटेबिलिटी असणे अपेक्षित आहे) किंबहुना त्यांच्यावर टीका झाली नाही असे थोडेच आहे? नेमाडेंनी त्यांना 'मोठ्या मुलांच्या चांदोबा' तला लेखक म्हटले. या गोष्टीचे कधी ग्लोरिफिकेशन झाल्याचे ऐकिवात नाही. अण्णांचे गाणे थोर, पण म्हणून स्टेजवरचा त्यांचा मद्यधिंगाणा थोर नाही. लांब कशाला, परवा ज्या निळूभाऊंच्या तुम्ही पाया वगैरे पडालात आणि तुमची भारतयात्रा सफल वगैरे झाली, त्या निळूभाऊंना मी पाहिलेल्या 'कथा अकलेच्या कांद्याची' च्या प्रयोगाला धड उभेही रहावत नव्हते. निळूभाऊ थोर, पण म्हणून त्यांचे बरळणे थोर नाही!
सन्जोप राव

असं असावं

मूळ प्रश्न कलावंताच्या चुकीच्या वागण्याचा नाही तर त्यांना परमेश्वरस्थानी बसवून त्यांच्या दोषांचे समर्थन, प्रसंगी उदात्तीकरण करणार्‍यांचा आहे.
आपला
(पूर्वपदस्थ) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

ऍक्सेप्टेबल ?

एक सांगा. तिकीट काढून केलेला कार्यक्रम "आज माझा मूड नाही" असे सांगून रद्द करणे, आणि "आज मला चढली आहे" म्हणून रद्द करणे, ह्यात काय् जास्त ऍक्सेप्टेबल आहे ?

कार्यक्रम रद्द करण्याची दोन्हीही कारणे इक्वली अन्ऍक्सेप्टेबल् आहेत.

वाचनात नाही!

अण्णांचे गाणे थोर, पण म्हणून स्टेजवरचा त्यांचा मद्यधिंगाणा थोर नाही.

अण्णांच्या मद्यधिंगाण्याबद्दल वगैरे लिहिणार्‍या राव साहेबांनी कधी त्यांच्या गाण्याबद्दल लिहिल्याचे वाचनात नाही! :) ज्या माणसाला त्यांचा मद्यधिंगाणा दिसतो आणि त्याबद्दल तो तावातावाने लिहितो त्याच उत्साहाने त्यांच्या गाण्याबद्दल, त्यांच्या कलेबद्दल, राव साहेबांनी कुठे लिहिल्याचे वाचनात नाही! :)

असो...

तात्या.

त्याची गरजच नाही

अण्णांच्या गाण्याविषयी लिहिण्याची माझी ना पात्रता आहे, ना तशी गरज आहे. मी काहीही म्हटले तरी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले अण्णा हे सूर्य आहेत, हे जगजाहीर आहे. या चर्चेतही मी वारंवार तसे म्हटलेले आहे. म्हणून अण्णांचे सगळेच श्रेष्ठ, त्यांची व्यसनाधीनताही श्रेष्ठ, असे मानणे भाबडेपणाचे आहे. ज्या मनोनिग्रहाने अण्णा त्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडले तो मनोनिग्रह श्रेष्ठ असे म्हणा, हात वर करणारा मी पहिला असेन!
वस्तुनिष्ठ राहून विचार करणे त्रासदायक असते. क्वचित आपल्या मनातल्या मूर्तीला तडा जाण्याची शक्यता असते. त्यापेक्षा सदैव उद्गारवाचक रहाणे आणि वस्तुस्थितीपासून पळ काढत रहाणे हे सोपे आणि आनंददायक. पण ते योग्य नक्कीच नाही.
सन्जोप राव

गल्लत!

म्हणून अण्णांचे सगळेच श्रेष्ठ, त्यांची व्यसनाधीनताही श्रेष्ठ, असे मानणे भाबडेपणाचे आहे.

असे आम्हीही मानत नाही! पण मुळात त्यांच्या कलेव्यतिरिक्त इतर गोष्टींशी आपले काहीही देणेघेणे असू नये एवढेच आमचे म्हणणे! ते आपल्याला एक 'कलाकार' म्हणून माहीत आहेत तेव्हा फक्त त्यांच्या कलेविषयी एक रसिक श्रोता या नात्याने बरावाईट अभिप्राय आपण नक्कीच देऊ शकतो असे आम्हाला वाटते.

क्वचित आपल्या मनातल्या मूर्तीला तडा जाण्याची शक्यता असते.

तसे काहीच कारण दिसत नाही. कारण मनातली मूर्ती ही त्यांच्यातल्या कलाकाराची आहे, विशिष्ठ तर्‍हेची आदर्श वागणूक ज्याच्याकडून अपेक्षित आहे अश्या कुणा माणसाची नव्हे!

संजोपरावला जी ए कुलकर्णी लेखक म्हणून आवडतात. उद्या जर जी ए कुलकर्णी पाईप किंवा विड्या ओढू लागले तर त्याच्याशी संजोपचे काहीच देणेघेणे असता कामा नये असे आम्हाला वाटते! दारू पिऊन रस्त्यात पडायचं, की पाईप ओढायचा, की विड्या ओढायच्या हा जी एं चा व्यक्तिगत मामला आहे! संजोपने फक्त त्यांच्या लेखनाबद्दल बोलावं, लिहावं असं आम्हाला वाटतं! हां, उद्या जर जी एंनी विड्यांचे पैसे संजोपकडे मागितले तर भाग वेगळा! :)

आम्ही इथे आणि इतरत्र अनेकदा अण्णांच्या नावाचा अगदी जयघोष केलेला आहे, त्यांचे गोडवे गायलेले आहेत. परंतु ते सर्व फक्त आणि फक्त त्यांच्या कलेच्या संदर्भातीलच आहेत हे लक्षात घ्यायला हरकत नाही. 'भीमसेन जोशी-एक माणूस' या विषयावर आम्ही कुठेही त्यांचे गोडवे गायलेले नाहीत, ना कधी टीका केलेली आहे. किंबहुना असा कुठलाही अधिकारच आम्हाला नाही असेच आम्ही मानतो!

एखाद्याची कला आणि त्याची इतर वर्तणूक या संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बरीचशी मंडळी या दोन गोष्टींची गल्लत करताना दिसतात आणि भावनेच्या भरात इतर वर्तणुकीबद्दलच भरभरून लिहितात जे लिहिण्याचा आपल्याला काहीही हक्क पोहोचत नाही असे आम्हाला वाटते.

कलाकार कितीही मोठा असला तरी तोसुद्धा एक माणूसच असतो आणि माणूस म्हटला की गुणदोष हे असायचेच! त्यात काय विशेष? तेव्हा त्याचे गुणदोष अगदी हौशीहौशीने दाखवणे हा पोरकट व थिल्लरपणा आहे असे आम्हाला वाटते! :)

'वस्तुनिष्ठ', 'उद्गारवाचक' वगैरे मोठमोठ्या शब्दांचे धड अर्थही आम्हाला माहीत नाहीत! सबब त्याबाबत आम्ही फारसे काही भाष्य करू शकत नाही! :)

असो..

आपला,
(कलाकार आणि माणूस यांच्यात गल्लत न करणारा) तात्या.

अब्दुल कलाम केव्हापासून गायला लागले? :)

अब्दुल कलाम आणि सवाई गंधर्व असलं बरंच काही आणि तुम्ही तरी परफेक्ट आहात का असल्या तलवारी उपसतील.

राव साहेब, आपल्याला 'उस्ताद अब्दुल करीमखान' असे म्हणावयाचे आहे का? कारण अब्दुल कलाम नावाचा गाणारा कुणी माझ्या माहितीत तरी नाही!

आपल्याच भाषेत सांगायचं तर पिसाळून अंगावर येत, किंवा तलवारी उपसाण्याच्या नादात खुद्द आपणच अब्दुल करीमखान ऐवजी अब्दुल कलाम लिहून गेलेले दिसताय! :))

असो...

अभिजात संगीतातली फारशी महिती नसली की अश्या फुटकळ चुका होतातच! पण तलवारी उपसायला फारशी माहिती वगैरे असावी लागत नाही हो! :)

आपल्याला अब्दुल करीमखान असेच म्हणावयाचे आहे असे आम्ही समजून चालतो! :)

चूभूद्याघ्या!

तात्या.

अब्दुल कलामच !

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

तात्या संजोपजींना अब्दुल कलामच म्हणायचे आहे कारण आपणच आपल्या आधीच्या प्रतिसादात ते स्वत: अण्णांना भेटायला आले होते असे म्हटलेले आहे. संदर्भ तोच आहे. अब्दुल करीम खां साहेब नव्हेत!

हां हां बरोबर..

तात्या संजोपजींना अब्दुल कलामच म्हणायचे आहे कारण आपणच आपल्या आधीच्या प्रतिसादात ते स्वत: अण्णांना भेटायला आले होते असे म्हटलेले आहे. संदर्भ तोच आहे.

हां हां बरोबर..प्रमोदकाका, आपलं आणि रावसाहेबांचं बरोबर आहे!

सवाईगंधर्व, अब्दुल कलाम अशी नावं घेतल्यामुळे रावसाहेब त्यांचा उल्लेख करत आहेत की काय असे मला वाटले..

चुकलं आमचं!

बाकी बजुर्ग मंडळींच्या चुका काढण्याचे काम चोखपणे चालू द्या! :) चूक ती चूकच म्हटली पाहिजे! काय? :) नाहीतरी दुसर्‍याच्या चुका काढण्याव्यतिरिक्त आपण मंडळी दुसरं काय करू शकतो? :)

अवांतर -

नुकतीच 'आषाढस्य प्रथम दिवसे' या मेघदूतातील श्लोकांना आम्ही चाली दिलेल्या कार्यक्रमाची व्हीसीडी आमच्या हाती आलेली आहे. त्यातले काही दृकश्राव्य तुकडे कापून, ते जालावर चढवून आम्ही त्याबद्दल इथे लिहिणार होतो. पण आता मनात असा विचार येतो की का उगाच आपल्या चाली लोकांना ऐकवा? कारण आम्हास जी काही कणभर विद्या मिळालेली आहे ती त्या उश्या फेकणार्‍या अण्णांमुळेच मिळाली आहे असे आम्ही मानतो! आणि इथे तर अनेक मंडळी बाह्या सरसावून त्यांच्या उश्या फेकण्यावर, आणि श्रोत्यांकडे पाठ करून बसण्यावरच लिहीण्यात मग्न असून त्यातच धन्यता मानत आहेत!

असो..

आमच्या चाली आणि आमचा कार्यक्रम आमच्यापाशीच राहू द्यावा असं वाटतं! तो उगाच येथील उपक्रमावरील मंडळींना ऐकवू नये असं वाटायला लागलं आहे. कारण आमचं जे काही आहे ते अण्णांचंच आहे, अण्णांमुळेच आहे. त्यांनीच ते आम्हाला गेली ६० वर्ष भरभरून दिलं आहे! आणि इथे उपक्रमावर तर आमच्या गुरुजींच्या सोकॉल्ड चुकांवरच भरभरून वाचयला मिळतं आहे!

बघुया, मूड आला तर कार्यक्रमाबद्दल इथे लिहू...
'अब्दुल कलाम ' नावासंबंधी गैरसमजुतीकरता आम्ही रावसाहेबांची क्षमा मागतो..

बाकी चालू द्या...

आपला,
(संभ्रमित!) तात्या.

आम्हाला आवडेल

पण आता मनात असा विचार येतो की का उगाच आपल्या चाली लोकांना ऐकवा?

तात्या, आम्हाला बघायला आवडेल. जरूर जालावर ठेवून पत्ता कळवा. वादविवादात कुणाची काय "चाल" आहे त्यावराअपलई चाल ठरवणे इत्यादीचा विचार जास्त न करता मेघदूताची चाल अवश्य सुनवा!

व्य नि ने..

तात्या, आम्हाला बघायला आवडेल. जरूर जालावर ठेवून पत्ता कळवा. वादविवादात कुणाची काय "चाल" आहे त्यावराअपलई चाल ठरवणे इत्यादीचा विचार जास्त न करता मेघदूताची चाल अवश्य सुनवा!

विकासराव, आम्ही आपल्याला संबंधित दुवे व्य नि ने पाठवू. ज्यांना ज्यांना ऐकायची इच्छा असेल त्या सर्वांना आम्ही व्य नि ने दुवे पाठवू. परंतू त्याबाबत इथे काहीही जाहीर लिहिंण्यात आम्हाला स्वारस्य नाही!

तात्या.

हम्म्

तात्या तुमची संभ्रमित अवस्था होणे स्वाभावीक आहे. तुम्हाला ते ध्वनीमुद्रण येथे लावू नये असे वाटणे पण लक्षात येते. पण तो जर अण्णाद्वेषी मंडळी त्यांचा विजय समजतील त्याचे काय? तुम्ही त्यांच्या "विजयाला"हातभार लावणार? येथील अण्णाप्रेमी मंडळींना नाराज व अण्णाद्वेषी मंडळींना खुष हा कुठला न्याय? तात्या तुम्हीच सांगा.

तसेच तुमचे स्वःताचे सूंदर संकेतस्थळ आहे तिथे का बरे दुर्लक्ष करत आहात? तुम्हास आवडणारे सर्व लिखाण, दृकश्राव्य प्रकार यांचे मुख्य, मानाचे स्थान तिथेच हवे. अहो देवाचे स्थान हे मुख्य मंदीरात नको का? कशाला मुर्ती घेऊन बाजारात् लोकांना दाखवायला आणायचे?

तसे सर्व मोठी मंडळी बाहेर कर्त्रुत्व दाखवताना घराकडे (इथे संर्दभ तुमचे संकेतस्थळ) बरेचवेळा दुर्लक्ष करतात म्हणा.

(अवांतर - आठवले का शिल्पाताईंना पण त्यांचे लिखाण येथे न लावावे असा त्यांच्या लिखाणांवर प्रतीकूल प्रतीसाद आल्यावर वाटले होते, तसाच थोडासा हा प्रकार. संर्घष करो यार! जे योग्य आहे असे वाटते, ते न अडखळता केलेची पाहीजे.)

'आषाढस्य प्रथम दिवसे'

तात्या,

कार्यक्रमावर लिहा,अन त्याच्याच बरोबर एम.पी.थ्री तून त्या चालीही ऐकवा,आम्ही आपल्याला काय सांगावे,(सचिनला, गल्लीतला खेळाडू कसे खेळले पाहिजे हे सांगतो आहे.)उदाहरणार्थ :-विठ्ठलाच्या आद्यमुर्ती च्या वादाने आमची त्या मूर्ती कडे पाहण्याची दृष्टी बदलली असली तरी,जसे त्या स्थळाचे,श्रद्धेचे, महत्त्व कमी होत नाही,तसेच लाखो वारक-यांची दर्शनाला जाणा-यांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढेतेच आहे. तेव्हा आपल्या श्रध्दास्थानाकडे पाहणा-याला पाहिजे त्या चश्म्यातून पाहू द्या ! आपण कशाला त्याची चिंता करावी.'आषाढस्य प्रथम दिवसे'तब्येतीने येऊ द्या !

सुदैवाने काही साहित्यिकांचा सहवास आम्हाला लाभतो,त्यांची नावे आम्ही येथे घेत नाही.काय काय सवयी असतात त्यांना.पण म्हणून काही त्यांचे लेखन वाईट ठरत नाही.

अवांतर ;) विठ्ठलाबद्दल वाचन सुरू आहे.त्यामुळे विठ्ठलाचे उदाहरण सारखे सारखे येत आहे.विट्ठला तुझे दर्शन घेताना या बडव्यांच्या ध्येय घोरणात शिथिलता येऊ दे रे बाबा ! अस्सही आम्ही बोलून जातो :)

प्रति: लतादीदी, अण्णा, अमिताभ, काशिनाथ घाणेकर इ.इ.

अगदी बरोबर! हेच मला म्हणायचं होतं. मनोगतावरची चर्चा बरीच इंट्रेस्टिंग आहेसं दिसतं. वेळ मिळाल्यावर जरूर वाचेन.

कुसुमाग्रज मला आवडत नाहीत. त्यामुळे मला गाभारा म्हणजे काय हेही माहीत नाही. काशिनाथ घाणेकरांत मला स्वारस्य नाही. आणि खरं तर आजकाल महाराष्ट्रात (म्हणजे अर्थातच पुणं आणि मुंबई!) काय चाललं आहे ह्याचा अंदाज राहिलेला नाही.

पुस्ती: "अण्णा" व "बाबूजी" ही नावे वापरायची माझी व्यक्तिशः लायकी आहे असं मला वाटत नाही. परंतु भीमसेन जोशी व सुधीर फडके हे उच्च दर्जाचे संगीतकार आहेत हे मात्र मला प्रामाणिकपणे वाटतं. इतकं वाटतं की मी गाणं म्हणताना (शॉवरमध्ये!) "ष" चा पोटफोड्या उच्चार करतो, आता बोला! पण म्हणून काय त्यांच्यात दोषच नाहीत?

अगदी खरं बोललात...

आणि मुळात संपूर्ण निर्दोष व्यक्ति कुणीच नसते! जयेशराव, अगदी वैयक्तिकच बोलायचं झालं तर तुम्हीदेखील संपूर्ण निर्दोष नाही आणि मीही नाही! आपण सगळी माणसं आहोत आणि अहो माणूस म्हटलं की चुका, दोष हे असायचेच!

तात्या,
आपल्या वरील मुद्याशी १०० टक्के सहमत. यावर कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की जसे आपण व्यक्तिच्या गुणांवर खुल्या दिलाने प्रेम करतो, तसेच त्याचे दोष सुद्धा मोठ्या मनाने मान्य केले पाहिजेत, आणि त्याचे समर्थन करू नये.

आता दुसरा मुद्दा...
मुळात त्या व्यक्तिच्या दोषांशी आपले काहीच देणेघेणे नसते/ नसावे. त्या व्यक्तितले तथाकथित दोष हा त्या व्यक्तिचा वैयक्तिक मामला आहे!

जर हे दोष व्यक्तिच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असतील, तर ती त्याची खाजगी बाब आहे ही गोष्ट मान्य. परंतु त्या दोषांचे सार्वजनिक प्रकटीकरण होत असेल व त्याचा समाजात चुकीचा संदेश जात असेल तर ती मात्र नक्कीच खाजगी बाब होऊ शकत नाही.

मला शास्त्रीय संगीतातले ओ की ठो कळत नाही. कोणत्यावेळी कोणता राग ऐकावा इतकेही ज्ञान मला नाही. मी योगी नाही, परंतु माझ्या सारख्या सामान्य माणसाला समाधी अवस्था प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य मात्र त्यात आहे हे मी जाणतो.

व्यक्तिशः अण्णां बद्दल बोलायचे झाल्यास अंदाजे चार वर्षां पूर्वी आपल्या ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे झालेल्या मैफलीचे जनसंपर्क काम माझ्याकडे होते. तेंव्हा प्रथमच त्यांना लाईव्ह ऐकण्याची संधी मिळाली आणि तिथपासून मी सुद्धा त्यांच्या गाण्याचा फ्यान झालो.

-जयेश

कुणाकुणाच्या काय सवयी असतील! :)

तसेच त्याचे दोष सुद्धा मोठ्या मनाने मान्य केले पाहिजेत, आणि त्याचे समर्थन करू नये.

पण त्याच्या दोषांशी आपला काही संबंधच नसतो. आणि संपूर्ण निर्दोष कुणीच नसतो! तेव्हा त्याचं काही विशेष नाही! इथे आमच्या अण्णांच्या दारुच्या तांब्याबद्दल वगैरे सरसावून लिहिणारी मंडळी तरी कुठे १००% निर्दोष आहेत? त्यांच्या काय काय सवयी (!) आहेत/असतील हे आपल्याला कुठे माहीत आहे? :)

एखादी 'क्ष' व्यक्ति जर मला तिच्या उत्तम कलेमुळे माहीत असेल तर मी फक्त तिची कलाच पाहीन आणि तिच्याबद्दलच बोलेन! तिच्या खाजगी आयुष्यात ती काय करते, काय करत नाही, जे करते ते चूक की बरोबर याबाबत बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही!

व्यक्तिशः अण्णां बद्दल बोलायचे झाल्यास अंदाजे चार वर्षां पूर्वी आपल्या ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे झालेल्या मैफलीचे जनसंपर्क काम माझ्याकडे होते. तेंव्हा प्रथमच त्यांना लाईव्ह ऐकण्याची संधी मिळाली आणि तिथपासून मी सुद्धा त्यांच्या गाण्याचा फ्यान झालो.

क्या बात है...मी ती मैफल ऐकली आहे. तबल्याच्या साथीला झाकीरभाई होते!

देवत्वाचे सुवर्ण, मानव्याचे हीण आणि छिद्रान्वेशी समाज.

अलौकिक गोष्टी करणार्‍या माणसांचे व्यक्तिगत आयुष्यही अलौकिकच असले पाहिजे असा अट्टाहास का?
त्यांच्यात असलेल्या हीणामुळेच ते मानव झाले. नाहीतर ते आपल्यात कशाला आले असते?
अगदी जुन्या पिढीतल्या दुड्ढाचार्यंसारखं लिहितोय पण आजही ते लागू होतंच.

गांधीजी म्हटले की त्यांचा महाग साधेपणा, त्यांचा वाया गेलेला मुलगा, फाळणी
सावरकर म्हटले की त्यांचे इंग्रज सरकारला माफीपत्र
नेहरू म्हटले की लेडी एडविना, चीन पराभव
...
कलाम म्हटले की त्यांनी दुसर्‍यांदा राष्ट्रपती होण्याची दाखवलेली तयारी, झारखंड प्रकरण
प्रतिभा पाटील म्हटले की बँकेचे दिवाळे
...
लता म्हतले की 'म', कुजलेल्या गायिका, "मेरे वतन के लोगो" प्रकरण
महमूद म्हटले की दारू, बायका
अमिताभ म्हटले की मावळातली जमीन
...
सचिन म्हटले की फेरारी
सानिया म्हटले की कपडे
...
आण्णा म्हटले की दारूचा तांब्या
'ज' म्हटले की बायका

असे बरेच! अनंत...
हेच पुन्हापुन्हा आठवून आपला समाज फक्त स्वतःच्या हीणकस दर्जाला समर्थन आणि स्पष्टीकरण देत आहे.
समाजाचा दर्जा जितका खालावेल तितका आदर्शांची पायमल्ली करण्याचा हा प्रकार वाढत जाईल. हा 'मला तू करतोस ते येत नाही ना? मग तुला माझ्या पंगतीत बसवणारच' - असा दुष्टबुध्दी प्रयत्न आहे.
पुढच्या पिढीला 'यांच्यासारखे व्हा' असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे 'ह्यानी हे कृष्णकृत्य केले हो..." अशी दवंडी पिटायची.
***
'आमच्या' काळी (म्हणजे फारतर १५/१६ वर्षांपूर्वी) अलौकिक व्यक्तींचे असे काही खासगी डाग फक्त आतल्या आत चर्चिले जात.
आता प्रसारमाध्यमांच्या कृपेने तुम्ही आम्ही त्यांची उघड, सार्वजनिक वाभाडी काढतो. या बातम्या चवीने चघळतो.
ती उत्तुंग माणसे म्हणजे काय नळावर पाणी भरण्यासाठी आलेली शेजारीण आहे काय?
आपण केलेले कॄष्णकृत्य चव्हट्यावर मांडले गेले तर आपल्याला कसे वाटेल?

आणि त्यांच्यावर राळ उडवण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? ते भलेही आपल्याला मायबाप रसिक म्हणत असोत, त्यांनी मिळवलेले यश खडतर प्रयत्नांनी मिळवले आहे - समाजाने त्यांना उमेदीच्या काळात यातनाच दिल्या आणि आता ते यशस्वी झाल्यावरही तेच काम नेटाने सुरू आहे.
त्यांच्यातील देवत्वाला नमस्कार करायचा की हीणाला निंदायचे ? आपण काय करायचे ते आपापल्या दर्जावर अवलंबून आहे.

सार्वजनिक वाभाडी

बरोबर बोललात नाना.

ही सार्वजनिक वाभाडी आपली दैवते उच्च आहेत दाखवायलाही वापरतात. म्हणजे,

जीएना वर काढायला वपुंना ढकलायचे.
सुभाषबाबूंना वर काढायला गांधींना पाडायचे.
अलिशाला वर काढायला लताला पाडायचे.

असे उद्योग बरेच ठिकाणी चालतात तेव्हा कीव वाटते. आता तलवारी घेऊन धावत येऊ नका म्हणजे मिळवले. आम्ही वाचतो की....इथे तिथे.

(घाबरलेला) राजीव.

बाकीचं ठीक

बाकीचं ठीक आहे पण या लिस्ट मध्ये प्रतिभा पाटील कशा काय????????????

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

सहमत

आपण सगळी माणसं आहोत आणि अहो माणूस म्हटलं की चुका, दोष हे असायचेच

!

त्यामूळे आपल्या चुकांची टोचणी कमी होते. किती काळ हे ओझे बाळगत जगायच. म्हणून मला आयुष्यावर बोलू काही हा संदीप-सलील चा कार्यक्रम खूप आवडतो.

प्रकाश घाटपांडे

बरोबर पण..

म्हणून मला आयुष्यावर बोलू काही हा संदीप-सलील चा कार्यक्रम खूप आवडतो.

मला पण आवडतो, पण ते संदीप-सलील आहेत ना त्यांनी... (just kidding!) आता असे आपल्या वरील विधानावर असे कोणी तरी बोलणार असे वाटले, म्हणून अर्धे वाक्य लिहून ठेवले आहे. आता त्या बिचार्‍यांची लक्तरे उपक्रमच्या वेशीवर टांगली जाणार...

संदीप-सलील

मला पण आवडतो, पण ते संदीप-सलील आहेत ना त्यांनी...

कोण हे? :-)) ह्.घ्या.

यांची काही गाणी मला जाम आवडली आहेत. उदा: दिवस असे की कोणी माझा नाही, मी हजार चिंता वगैरे.

पण काही गाण्यात अक्षरशः पाट्या टाकल्या आहेत. उदा: कितिक हळवे, अजून तरी रूळ , अल्कोहोल.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

 
^ वर