अमेरिकन मासे आणि मी
सूशीचा विषय निघाला म्हणून. सुशीची चव हळूहळू कळते हेच बरोबर. एकदा चटक लागली की सुटणं मुश्कील. कोकण-गोव्यासारखं कुणालाच येणार नाही. त्यात आश्चर्य काय? पण आपल्या परीने करतात बिचारे. अमेरिकेतले मला आवडलेले माशांचे काही प्रकार असे:
१ चायनाटाऊनमध्ये एक बाई लहानसं हॉटेल चालवायची. तिच्या तिस-या आणि (मोठे) "प्रॉन्स" अप्रतिम असायचे.
२ इथे एक कोरियन हॉटेल आहे, त्यात अख्खा मॅकरेल भाजून देतात. अहाहाहाहाहा . . .
३ थायमध्ये बरेच प्रकार अाहेत. एक बांबू आणि कालवांची अामटी असते. बांबूचा अांबटपणा थोडा वेगळा असतो पण तो तिस-या, कालवं वगैरेंबरोबर फार चांगला लागतो. कधीकधी बांबूबरोबर मासे घालून त्याचं झणझणीत सूप करतात. आठवण झाली की कधी एकदा थंडी पडतेय असं होतं. पण ह्या सगळ्याचा मुकुटमणि म्हणजे "होआ मोक" हा पदार्थ. त्याचं वर्णन करणं अशक्य. तो खाऊनच बघितला पाहिजे. आणि खाऊन बघितलाच पाहिजे. त्याच्यात कधी कोबी तर कधी तुळशीची पानं घालतात. (थाय लोकांना तुळस प्रिय!) बस. ज्यात ह्या कृतीचा शोध लावला गेला ती संस्कृती धन्य!
४ एकदा न्यूयॉर्कला गेलो होतो तिथे एक जुन्या पद्धतीचं स्पॅनिश हॉटेल दिसलं. मस्त लाल आमटी आणि तिस-यांचा ढीग. मजा आली. बरोबर एक rioja चा ग्लास होता. (खोटं का बोलू?) खरोखर इतकी मजा आली की बाहेरून एक माणूस आत आला विचारायला, हे काय एवढं हादडतोयस म्हणून . . . फुकट हॉटेलची जाहिरात करून दिली!
५ सुशी इथे गल्लोगल्ली झाली आहे. परवडणारी आणि तरीही चांगली, अशी मिळणं कठीण. पण मिळते मधूनमधून. दोनतीन हॉटेलं लक्षात ठेवली की झालं. लोक ह्या "क्षेत्रात" नवीन नवीन करून बघतात, हे एक बरं आहे.
६ व्हिएतनामी लोक कोलंब्या वगैरे चांगल्या करतात. त्यावरून आठवलं की कोलंबियन लोकांची कोलंबी कधी खाऊनच बघितली नाही! बेसिक आमटी चांगली करतात पण. खरं तर मेक्सिकन सुद्धा खूप चांगलं करतात पण त्याला मागणी नाही. असले अरसिक लोक आहेत. अमेरिकेत बीफ सोडून सुचत नाही ना लोकांना.
७ क्यूबा . . . म्हणजे गोवा, असंच धरून चाला. तशी चव फार वेगळी, तरी साम्य जाणवतं. इकडे एक फार सुंदर हॉटेल आहे. त्या बाईंकडे बघूनच आपल्याला चांगलं खायला मिळणार याची खात्री पटेल. ह्या वरील सर्व ठिकाणी बायका स्वयंपाक करतात, हे एक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ताट "साफ" केलं की त्यांना खरोखरच आनंद होतो. झकपक अमेरिकन रेस्तराँसारखा शिष्टपणा नाही.
तर असं आहे. आता बघितल्यावर लक्षात येतंय की इटालियन लोकांचं ट्राय करून बघितलं नाही आहे. त्यांच्यात एक कालवांचं सॉस करतात ते छान असतं, पण "साकल्याने" अजून अभ्यास केलेला नाही. फुकट हो मी . . . तसे मला हेरिंग वगैरे प्रकार पण आवडतात. आणि इथे एका स्वीडीश रेस्तराँ मध्ये एक "सामन" घालून आमलेट करतात, ते स्वर्गीय असते. जाऊदेत. आणखी खूप आहेत. पण भूक लागली . . .
ह्या सगळ्यात दुःखाच्या दोनच गोष्टी. एक म्हणजे भारतीय आणि पाकिस्तानी हे कुणीच मासे नीट म्हणून करत नाहीत. तंदूर लावणारी माणसं ती. त्यांना काय येणार? आणि दुसरी दुःखाची गोष्ट म्हणजे सोलकडी कुठेच नाही! शेवटी सोलकडी नसेल तर मासे खाणं व्यर्थ आहे व्यर्थ!
Comments
मस्त
छोटेखानी माहितीपपूर्ण आणि तरीही मनोरंजक लेख आवडला!
थाय पदार्थ आवडत असले तरी 'होआ मोक' कधी ट्राय केला नाही. पुढच्या वेळेस गेलो की नक्की ट्राय करू!
हे अगदी १००% पटले.. मासे आणि कोलंबी दोन्ही खाण्याचा प्रयत्न केला पण पदरी घोर निराशाच आली... बाकी ह्या तंदूर लावणार्यांकडून निदान तंदूरी चिकन तरी व्यवस्थित खाण्यास मिळणे हा एक देखिल योगच असावा लागतो नशिबात.
अमेरिकन मासे आणि मी
होआमोक सगळीकडे मिळत नाही . . . आणि मेनूवर स्पेलिंग निरनिराळे असते ही एक अडचण आहे. पण नक्की ट्राय करण्यासारखा आहे. मासेखाऊ माणसाला आवडणारच.
तंदूरी सुद्धा नीट मिळत नाही हे म्हणणं अगदी बरोबर आहे. नाही मिळत. खरं म्हटलं तर रडच आहे. पुलंनी ज्यावर सणसणीत टीका केली होती तसला "बुफे"च बहुतेक ठिकाणी मिळतो. अरे मी मधुर जाफरीच्या रेस्तराँमध्येही जाऊन आलो. काही नाही सांगण्यासारखं. हे का होतं?
इकडे शिकागोत एक समाधान आहे. ते म्हणजे टॅक्सीचे अड्डे. तिकडे मात्र फर्मास करतात. म्हणजे गेटवेकडच्या "बडेमियां" इतकं "दर्जेदार" नाही, पण चांगलं असतं. बहुतेक पाकिस्तानी असतात. २४ तास उघडे. दोष एकच की नवीन म्हणून कधी काही करणार नाहीत. कारण त्यांचं गि-हाईकच तसं. रात्री इंग्लीश-आयरिश लोकसुद्धा झोकून येतात . . . "करी" ओरपायला उतावीळ झालेले.
हल्ली एक गोंयकार टॅक्सीवाला आहे, डिसोझा म्हणून, त्याने नवीन काढलंय असं म्हणतात. तो काय मासेबिसे करत असेल तर. जाऊन बघितलं पाहिजे. पण असं न्यूयॉर्कमध्येही नाही. "निटींग फॅक्टरी" (हा एक सुप्रसिद्ध म्यूझिकचा क्लब) मध्ये कार्यक्रम बघायला गेलो होतो तेव्हा मध्यंतरात नाक्यावरच्या ब्रिटीश (पक्षी: बांगलादेशी!) हाटेलात जाऊन आलो. हॅ, काही दम नाही. तिखटजाळ सगळं केलं होतं पण चव अशी नाही. मला वाटतं गोम ती हीच. इथे लोकांनाच वाटतं की इंडियन म्हणजे तिखट असलं पाहिजे. बाकी काही नसलं तरी चालेल.
साताठ वर्षांपूर्वी एक लाहोरचा माणूस होता. अत्यंत खानदानी. त्याचं (शिकागोतल्या) ब्रॉडवेवर हॉटेल होतं. तेच इथलं सर्वोत्कृष्ट "इंडियन". त्या बिर्याणीला जवाब नव्हता. पण बसलं. केलं बंद. आता कुठे काय माहीत नाही. सगळी लता, तलत, नूरजहां, मेहदीहसन असली गाणी लावायचा. लहान हॉटेल होतं. बहुतेक सगळी "रसोई" एकच मुलगी करायची. आणि दिसायला काय नुसती मधुबाला! ती स्वयंपाक करते आहे हे चित्रच बरोबर वाटत नसे. पण सगळं कसं अप्रतिम होतं. असल्या गोष्टी टिकत नाहीत जास्त.
अजून दोन
१. मासे आवडत असतील तर, इटालियन रेस्तराँमध्ये सी बास नक्की चाखून बघा. जोडीला शार्डने असेल तर अधिक उत्तम. :)
२. इथिओपियन हाटिलात, अख्खा भाजलेला मासा (ट्राऊट वगैरे) मिळतो. आपल्याकडच्या तळलेल्या तुकड्यांच्या जवळपास येणारा. (उदा. येथे पहा.)
अमेरिकन मासे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जगन्नाथराव,
.............आपण लिहिले आहे "आणि दुसरी दुःखाची गोष्ट म्हणजे सोलकडी कुठेच नाही! शेवटी सोलकडी नसेल तर मासे खाणं व्यर्थ आहे व्यर्थ!" या तुमच्या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे. सोलकढी शिवाय माशाचे जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. शेवटी सोलकढी-भात जेवून वर अर्धी वाटी कढी प्याल्यावर पोटात एक प्रकारचे समाधान पसरते.तृप्तता लाभते. मागे मत्यभोजना संबंधीच्या एका प्रतिसादात मी चार ओळी दिल्या होत्या त्या पुन्हा द्यायचा मोह होतो:
जेवाया मग अवीट गोडी |
घासावरती घास घेऊया |
मारुया s भातावरती ता s व|याला जेवण ऐसे ना s व |