विठोबा कोणता खरा.?

विठोबा कोणता खरा.?

पंढरपूरचा विठोबा तेव्हा खोटा ठरला होता, ( माढा,सोलापूर येथील विठोबा खरा की पंढरपूर येथील विठोबा खरा) याबाबत पंढरीनाथ सावंत यांचा दि.२२ जुलै मार्मिक च्या अंकातील एका लेखात त्यांचा एका इतिहास तज्ञाशी वाद होऊन ते या निष्कर्षावर आले की,विठोबाच्या पावलांवर एक हजार वर्षापासून भक्तमंडळी,वारकरी,डोकी घासतात,नारळ ठेवतात.अभिषेकांच पाणी माउलीच्या पायावर जातं,त्यात दही असते,त्यामुळे विठोबाची पावलं झिजून पार नाहीशी झालीत.आणि तीच खरी जी सध्याची पंढरपूरची विठ्ठल मूर्ती आहे.ती खरी मानली पाहिजे.एखाद्या प्रश्नाच्या उत्तराने,ते उत्तर कितीही समाधानकारक असले तरी, समाधानी होईल तो उपक्रमी कसा ?आमचंही काही समाधान झालं नाही.म्हणून तो प्रश्न घेऊन आम्ही उपक्रमाच्या दरबारात हजर झालो." बेदरच्या बादशहाने,विठ्ठलाचे मंदिर उद्ध्वस्त केले,येथील मूर्ती विजयनगरला हालविण्यात आली.एवढेच नव्हे तर त्या जागेवर मशीद सुद्धा उभारण्यात आली होती." आणि पुढे चांगा केशव नावाच्या महाराने मंदिर उभे करण्यासाठी मदत मिळवली आणि ते मंदिर पुन्हा उभे राहिले.आमच्या वाचनात असेही आहे की,भानुदास महाराजांनीही ही मूर्ती कुठूनतरी पंढरपुरास आणलेली होती. (चू.भू.दे.घे.) असो, अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा असलेल्या,पांडुरंगाच्या स्थळ काळाची अदला,बदल होऊ शकते. किंवा नसेलही झाले. उपक्रमी काय म्हणतात ?

अवांतर : ) देवशयनी आषाढी एकादशी पर्यंत हा विषय संपवावा,कारण त्या माउलीला आपल्याला फार मागणे मागायचे आहे,अर्थात न मागता देता तो देव असे म्हणतात.पण तरीही, आमचे उपक्रमी सुखात राहू दे,पाहिजे तिथे बक्कळ पाऊस होऊ दे.आणि येत्या वर्षात उपक्रमाच्या ध्येय-धोरणात शिथिलता येऊन इथे पुढच्या वर्षापर्यंत,कविता,ललित लेखनही दिसू दे. बोला "पुंडलिक गवरदे हारी विठठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय !

लेखनविषय: दुवे:

Comments

खरा विठोबा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या संदर्भात डॉ. रा.चिं. ढेरे यांचा एक दीर्घ लेख मागे 'सकाळ' वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. तो मी वाचला होता. सध्याची पंढरपूरची मूर्ती ही मूळ मूर्ती (तुकाराम काळी असलेली ) नव्हे. मूळमूर्ती माढा येथील देवळात आहे असे त्यांनी साधार सिद्ध केले होते. तो लेख मिळाला तर त्यातील महत्त्वाचा भाग येथे उद्धृत करीन. खूप काळ लोटल्याने आता लेखातील बारकावे (डीटेल्स) आठवत्त नाहीत.

उत्तर

आपण दिलेली माहीती खूप चांगली आहे. धन्यवाद. बेदरच्या बादशाप्रमाणेच अफझलखानाने पण दहशत निर्माण करून शिवाजीला मैदानात आणायला म्हणून विठ्ठल मंदीरावर हल्ला केला होता, मुर्तीस काही केले का ते माहीत नाही. (तुळजापूरची भवानीमातेची मुर्ती मात्र भंग केली होती). पण त्याने पंढरपुरच्या देवळात गाय मारून गोमांस पुजार्‍याच्या तोंडात भरवले असे वाचल्याचे आठवते.

मुर्तीबद्दल (मूळ की बदलेली हे) ऐतिहासीक उत्तर माहीत नाही पण तत्त्वज्ञानाचे उत्तर अनेकांनी सांगून ठेवले आहे:

"कानडाऊ विठठलू" या गाण्यात ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात की " क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणवूनी स्फुरताती बाहू, क्षेम देवू गेले तर मीची मी एकली..."
अर्थात, विठठलाला मिठी मारायला आतुर होवून गेलो आणि लक्षात आले की माझा मीच आहे ( म्हणजे विठ्ठल माझ्यातच आहे).

चोखा मेळा: कांदा मुळा भाजी, हीच माझी विठाबाई, कशास जाऊ दूर इथेच माझे पंढरपूर

सोयराबाई: अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग (तीला बिचारीला मंदीरात कधीच प्रवेश करता आला नाही असे ऐकले आहे, पण नक्की माहीत नाही)

इत्यादी...

बाकी विठठलाची पाद्य पूजा आता बंद करावी आण ऐतिहासीक मुर्तीची झिज थांबवावी असे मात्र नक्की वाटते.

कान्होपात्रा

स्वतःला विठुमाऊलीला वाहून घेतलेल्या कान्होपात्रेने त्यांना आदिलशाहा(!)कडे नेण्यात येत असताना विठूचरणी प्राण त्यागले.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

कानडा वो विठ्ठलू

"कानडाऊ विठठलू" या गाण्यात ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात की " क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणवूनी स्फुरताती बाहू, क्षेम देवू गेले तर मीची मी एकली..."
अर्थात, विठठलाला मिठी मारायला आतुर होवून गेलो आणि लक्षात आले की माझा मीच आहे ( म्हणजे विठ्ठल माझ्यातच आहे).

संपूर्ण अभंगच तसा आहे. पाया पडो गेले तंव पाऊलचि न दिसे . . . समोर की पाठीमोरा नकळे . . . म्हणजे काय? काही असेल, पण मूर्ती अनित्य आहे हेही सूचित होत नाही का? झिजणे (आणि "बदलणे") हाच मूर्तीचा धर्म आहे.

माढाची माहिती हवी होती.

यनावाला साहेब,आणि विकासराव,

माढा,सोलापूर येथील विठोबाची कोणी माहिती दिली असती तर त्या तुलनेत पंढरपूरच्या विठोबाबद्दल अभंगातून काहीतरी शोधता आले असते.असो आपल्या उत्सुकतेबद्दल आभारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माढा येथील मूर्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
डॉ. रा.चिं ढेरे यांचा लेख खूप वर्षांपूर्वी वाचला होता. त्यातील एकच गोष्ट स्मरते.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नामदेव,तुकाराम. रामदास इ.संतांच्या अभंगांत विठ्ठल मूर्तीचे जे वर्णन आहे ते माढा येथील मूर्तीशी जुळते.पंढरपूरच्या मूर्तीशी नाही. रामदास हे काही विठ्ठ्ल भक्त नव्हेत. पण ते एकदा पंढरपूरला गेले होते. त्यांच्या एका रचनेत आहे:

विठोने शिरी वाहिला देवराणा | तयाचे मुखी नाम रे त्यासी जाणा||

अर्थ असा की विठ्ठलाने ज्याला डोक्यावर घेतले त्या महादेवाच्या तोंडी ज्याचे नाव त्याला (रामाला ) ओळखा.(श्रीशंकर रामनामाचा जप करतात असे मानले जाते. रामरक्षेतही तसे आहे.) माढा येथील विठ्ठल मूर्तीच्या शिरावर शिवलिंग आहे. तोच रामदासांच्या वर्णनातील 'देवराणा'. असे डॉ.ढेरे यांचे म्हणणे आहे. आणखी काही पुरावे त्यांनी दिले आहेत पण आता आठवत नाहीत.

श्रीविठ्ठल: एक महासमन्वय

श्रीविठ्ठलाच्या विविध वादांसाठी,आणि उत्तरांच्या समाधानासाठी श्रीविठ्ठल: एक महासमन्वय जरुर वाचावे.

श्रीविठ्ठल: एक महासमन्वय
रामचंद्र चिंतामन ढेरे

प्रकाशक
दामोधर दिनकर कुलकर्णी
श्रीविद्या प्रकाशन
२५० शनिवार पेठ,
अष्टभुजा रस्ता,पुणे

(यनावाला साहेबांनी सुचविल्यामुळे या पुस्तकाचा शोध घेता आला.त्यांचे पुन्हा एकदा आभार.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
 
^ वर