तर्कक्रीडा : गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी (फाटकी आवृत्ती)

सूचना : कृपया शीर्षकातील 'फाटकी' हा शब्द उच्चारताना ट ह्या अक्षराचा उच्चार पूर्ण करावा.

श्री. आजानुकर्ण यांनी दिलेल्या 'गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी' याची फाटकी आवृती आम्हाला नुकतीच मिळाली. दोन्ही आवृत्त्यांमधील प्रारंभीचा भाग सारखाच आहे याकडे अभ्यासकांचे/ संशोधकांचे लक्ष आम्ही वेधू इच्छितो.
--------------------------

हिंदी महासागरातील अमरद्वीपावर राहणार्‍या धन्वगंजाचे रुधीरसागरातील मृत्यूद्वीपावर राहणार्‍या मृदूभाषिणीवर प्रेम होते. हा विवाह अर्थातच तिच्या वडिलांना मंजूर नव्हता. त्यांचे मन वळवण्यासाठी धन्वगंज द्वीपावर आला तेव्हा तेथील सेवकांनी त्याला पकडून सभास्थानी आणले.

मृदुभाषिणीच्या वडिलांना विवाह मंजूर नव्हताच. धन्वगंजाला प्रत्यक्ष पाहिल्यावर आणि त्याच्या मुखावरील बुद्धिमत्तेचे तेज पाहिल्यावर तर त्यांचा विचार निर्धारामध्ये परिवर्तित झाला. कारण ते स्वतःही अत्यंत बुद्धिमान होते आणि त्यांना जामताशी स्पर्धा नको होती.

मृदुभाषिणीचे वडील बुद्धिमान होते तसेच ते कुटिलही होते. ह्या संगमातून त्याच्या मेंदूत एक कल्पना आली. त्यांनी धन्वगंजास सांगितले की "माझ्या रूपवान आणि गुणवान कन्येशी तुझा विवाह करून देण्याची माझी इच्छा कदापि नाही. पण माझ्या कन्येची इच्छा तशी असल्याने तिला दु:ख देणे हे मलाही क्लेशदायक आहे. तेव्हा माझा होकार-नकार मी आता तुझ्या दैवावर सोपवत आहे. " असे म्हणून त्यांनी समीप उभ्या असलेल्या आणि अधोमु़ख होऊन आज्ञेची प्रतीक्षा करीत असलेल्या विनयशीला नावाच्या दासीला लेखनसाहित्य आणण्याची आज्ञा दिली. विनयशीलेने एका सुवर्णतबकातून काही भूर्जपत्रे, महत्त्वाच्या लेखनासाठीच जे उपयोगात आणले जाते असे जवाकुसुमांपासून तयार केलेले रक्तवर्णी द्रव व अत्यंत डौलदार आणि लेखनास सुयोग्य अशी लांबी असलेले मोरपीस आणले. मृदुभाषिणीच्या वडिलांनी दोन भूर्जपत्रे घेतली व जवाकुसुमांच्या द्रवात मोरपीस बुडवून भूर्जपत्रांवर काही अक्षरे लिहिली व दोन्ही भूर्जपत्रे दुसर्‍या एका सुवर्णतबकामध्ये पालथी ठेवली.

मनातून समाधानी असूनही मृदुभाषिणीचे वडिल सचिंत मुद्रा करून धन्वगंजास म्हणाले, "ह्या भूर्जपत्रातील एकावर 'होकार' आणि दुसऱ्यावर 'नकार' असे लिहिले आहे. तू ह्यापैकी एक भूर्जपत्र उचल. त्यावर जो शब्द असेल तेच माझे उत्तर असेल. ते मला कितीही अप्रिय असले तरी मी त्याचे पालन करीन."

मृदुभाषिणीचे वडील कुटिल होते हे धन्वगंजास ज्ञात होते. त्यावरून त्याने हे अनुमान काढले की दोन्ही भूर्जपत्रांवर 'नकार' लिहिलेले असणार आणि त्याचे अनुमान अचूक होते!

काहीतरी विचार करून त्याने एक भूर्जपत्र उचलले आणि तरीही मृदुभाषिणीच्या वडिलांना तिचा विवाह धन्वगंजाशी करावाच लगला.

धन्वगंजाने असे काय बरे केले असेल ज्यामुळे त्याचे इच्छित साध्य झाले?
------------------------------------------

फाटकी आवृत्तीमध्ये उखाण्याचा काही उल्लेख आढळला नाही. कदाचित त्या काळापर्यंत उखाण्याची प्रथा बंद झाली असेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्वंगजप्रेमकथा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मीरा फाटक यांनी वर्णिलेली फाटकी आवृत्तीतील कथा कल्पकतापूर्ण आहे. नायकाचे नाव "धन्वंगज" असे हवे.(धन्वगंज नव्हे.)" तर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न "यात मी हे नाव दिले आहे.श्री .आजानुकर्ण यांनी सुद्धा तेच नाव योजले आहे. केवळ शीर्षक देताना टंकलेखन दोष धडला असे दिसते. असो.
कोडे मात्र सोपे वाटते. उत्तर व्यनि . ने पाठवित आहे.
२/ मीरा फाटक लिहितातः " जवाकुसुमांपासून तयार केलेले रक्तवर्णी द्रव..... " जवाकुसुमे जरी रक्तवर्णी असली तरी त्यांच्यापासून मसी बनविल्यास ती काळीच होईल.इंग्रजीत या फुलांना शू फ्लॉवर म्हणतात. ही फुले चुरगळून बुटावर चोळली तर बुटाला काळे पॉलिश होते. केस काळे करण्यासाठी तसेच त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून जास्वंदीची फुले वापरतात.(जाता जाता : 'द्रव' हा शब्द पुल्लिंगी आहे.)

धन्वंगज प्रेमकथा

मी केलेले लिखाण आपण इतक्या बारकाईने वाचलेत व त्यातील त्रुटी निदर्शनाला आणून दिल्यात त्याबद्दल आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. जवाकुसुमाबद्दलच्या नवीन माहिती (बूट पॉलिश) साठीही आभार.
द्राव हा शब्द पुल्लिंगी आणि द्रव हा शब्द नपुंसकलिंगी अशी माझी माहिती होती. ती चूक आहे असे दिसते.

उत्तरे

श्री. यनावाला अनु यांच्याकडून बरोबर उत्तरे आली आहेत.

माझे उत्तर

व्यनिने !

ठाकुर अपने बेटी का हाथ मेरे हाथोंमे दे दो वरना...

मृदुभाषिणीचे वडील कुटिल ...दोन्ही भूर्जपत्रांवर 'नकार' लिहिलेले ...अनुमान अचूक होते!
धन्वगंजाने असे काय बरे केले असेल ज्यामुळे त्याचे इच्छित साध्य झाले?
ह म म....

१. वेंधळेपणाचा आव आणुन हळुच धक्का देउन सुवर्णतबक खाली पाडले, कुटिल माणसाचे कुटिल प्रकरण उघडकीस आणले.
२. म्हणाला ठीक आहे एक भूर्जपत्र उचलतो पण दुसरे माझ्या "डार्लींग"ला उचलुन वाचु दे. तिच्या मुखातुन् मला जो भला वा बुरा निकाल कळु देत.
३. धन्वगंज खुप हींदी सिनेमे / नाटके पहात असेल तर शत्रुच्या अड्ड्यात जाण्याआधी मृदुभाषिणीच्या आई-(किंवा अनेक आया, आजी, व् मृदुभाषिणीच्या वडीलांचे आवडीचे सर्व बोंबील मासे ) यांना आपल्या अड्ड्यात अडकवुन, मृदुभाषिणीचे कुटिल वडील यांना म्हणेल जर का मृदुभाषिणी माझी नाही झाली तर मृदुभाषिणीच्या आया, आजी अन बोंबील यांना कायमचे मुकाल.
४. विनयशीला हीला आधीच पटवुन "होकार" असलेले भूर्जपत्र हातचलाखीने काढेल.
५. म्हणेल मुझे मालुम था तुम कुछ उल्टी चाल चलोगे. सीधी तरह शादी की तयारी करो वरना ये मेरा नया कुडता देख रहे हो, अफगनिस्तानसे लाया हु, "बम - ईन - बिल्ट"आहे. दबॉऊ क्या ? सब उपर जायेंगे फिर् मेरी शादींमे तुमको उधर डांन्स करना पडेगा.
६. म्हणेल मुझे मालुम था तुम कुछ उल्टी चाल चलोगे. सीधी तरह शादी की तयारी करो वरना तुम्हारे और विनयशीला के कुछ "compromising MMS" मेरे मोबाईलमे आहे , सिर्फ send दबाने की देर आहे मृदुभाषिणीके आई को पता चलेगा. क्या बोलता मामू.. चल मेरी शादी बना मामू....
७. आणी जर का एका सभ्य सुसंस्क्रुत परीकथेच्या जगातील ही कहाणी असेल तर धन्वगंज त्याच्या आराध्यदेवतेचे मनोभावे स्मरण करुन म्हणेल जर का माझे प्रेम पवित्र असेल तर "...(आराध्यदेवते) " मृदुभाषिणीचे कुटिल वडील तिचा विवाह माझ्याशी लावून देतील असे त्यांचे मनपरिवर्तन कर. बस मग काय मंडळी रेस्ट ईज हिस्टरी.....

अफ्टरऑल दिलवाले दुल्हनिया लेकेही जायेंगे.

हे कोडे "गणित मनोरंजन विरंगुळा "ह्या यादीत असल्याने हे टाईमपास उत्तर.

ह ह लो पो!

हा हा हा . . . विनयशीला नावावरूनच समजायला पायजे . . . आणि काहीच नाही जमलं तर हा रामबाण उपाय आहे की . . .

उत्तरे

सन्जोप राव,वाचकन्वी, आवडाबाई, तो, प्रियाली यांची उत्तरे बरोबर आहेत. सहज यांच्या ७ उत्तरांपैकी क्र. २ हे बरोबर आहे. त्यांची इतर् उत्तरेही रंजक आहेत्.

श्री.यनावाला यांनी म्हटल्याप्रमाणे कोडे सोपे आहेच. तसेच ते खूप जुने असल्याने बर्याच जणांना माहीतही असेल. तरी मी का घातले? तर आजानुकर्णांच्या शैलीत लिहिण्याचा प्रयत्न करण्याचा मोह आवरला नाही!

कथेच्या वातावरणाशी मला सुसंगत वाटणारे उत्तर् अस:े सभागृहात पुरेसा प्रकाश नाही असे निमित्त सांगून भूर्जपत्रावरील शब्द वाचण्यासाठी धन्वंगज गवाक्षाजवळ गेला आणि जणू काही वार्‍यानेच ते भूर्जपत्र उडाले असे भासवत त्याने ते अलगदपणे बाहेर फेकून दिले.

पुढचे सर्व जाणताच.

रंजक उत्तरे

मीराताई,

बरोबर उत्तरे देणार्‍या इतरांची उत्तरे रंजक असतील तर ती ही येथे पेस्ट करा ना. त्यानिमित्ताने कसे कसे कल्पनाविलास केले जातात ते कळेल.

:)

सुंदरच

कोडे अशा पद्धतीने लिहिण्याची शैली सुंदरच आहे.

कृपया आजानुकर्णाची शैली वगैरे शब्द वापरु नका हो... मीच ती शैली चांदोबा, पंचतंत्र, विदूषक अशा ठिकाणांवरुन ढापली आहे. :)

 
^ वर