उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
स्वामी विवेकानंद
चोंबडा कोंबडा
July 17, 2007 - 9:06 am
स्वामी विवेकानंदां बद्दल आपण काय काय माहिती देऊ शकता? आपल्याला त्यांच्या बद्दल काय काय माहिती आहे. त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती देऊ शकाल का? येथे झालेल्या चर्चेतून थोडी माहिती मिळवू शकेन.
धन्यवाद
चोंबडा कोंबडा
डिस्क्लेमर : लेखनविषयक मार्गदर्शनात असलेल्या उद्दिष्टांशी सुसंगत
दुवे:
Comments
थोडी माहिती थोडे दुवे
माझ्या या अनुदिनी (ब्लॉग) वर एका नोंदीत विवेकानंदांशी संबंधित माहितीचे दुवे दिले होते. आपल्या माहितीसाठी इथे देत आहे.
विवेकानंदाचे चरित्र आणि विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
भारतभूमीच्या या सुपुत्राचे स्मरण व्हावे म्हणून काही दुवे देत आहे.
विषय चांगला पण खूपच मोठा...
स्वामी विवेकानंद हे बहुतांशी आपल्याला "अध्यक्ष महाराज आणि अमेरिकन बंधू भगिनींनो" या वाक्यामुळेच जास्त माहीत असतात. पण १९-२० च्या शतकात भारतात जी खूप प्रभावी व्यक्तिमत्वे वेगवेगळ्या क्षेत्रात झाली त्यातील विवेकानंद हे व्यवहारातील आध्यात्मिक कळस होते. त्यांचे विचार/लेखन हे खूप स्फुर्तीदायक आहेत आणि ते वाचताना लक्षात येते की ते नुसतेच संन्यासी नव्हते तर त्यांना अधुनीक भारताची स्वप्ने पडली होती आणि भारत अधुनीक व्हावा अशी महत्वाकांक्षा होती.
त्यांचे काही १-२ किस्से जर लिहीता आले तर दिवसभरात येथे लिहीन.
आभारी आहे
शशांक व विकास तुमच्या दिलेल्या माहिती बद्दल व दुव्यांबद्दल आभारी आहे. अधिक माहितीची आपल्यासारख्याच सुज्ञ उपक्रमींकडून अपेक्षा आहे.
एक विचार.
स्वामी विवेकानंदाबद्दल कितीतरी सांगता येईल.त्यांचा एक विचार असा.
"लोक काहीही म्हणोत,आपली जी निश्चित मते आहेत त्यांना चिकटून् रहा आणि मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री असू द्या; लोक म्हणतात, 'याच्यावर विश्वास ठेवा,त्याच्यावर विश्वास ठेवा,पण मी म्हणतो,'आधी स्वतःवर विश्वास ठेवा'.हाच उपाय आहे .आत्मविश्वास असू द्या-सारी शक्ती तुमच्यामधेच आहे,हे जाणून घ्या आणि ते प्रकट करा.म्हणा की सर्व काही करु शकण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे.'विष नाही,विष नाही'असे खंबीरपणे म्हटल्यास सापाचे विषदेखील बाधत नाही."
(१/५११-१२)
अद्वैत आश्रम कलकत्ता येथून दि.१२-८-१९८५ ला प्रसिध्द झालेले "'Vivekananda : His Call to the Nation "या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीत्ला हा एक विचार.
खरोखर स्वामी म्हणावे असे रुप !
पाश्चिमात्य देशांना भारताचे खरे रुप दाखवणारा आध्यात्मिक योध्दा.
आधुनिक भारताचे व आध्यात्मिक भारताचे स्वप्न पाहणारे एकमेव.
बुध्दी प्रमाणेच शरीरामध्ये तेज देखील हवे व तेज हे बलातून (ताकत) येते असे सांगणारे एकमेव.
वयाच्या ३० व्या वर्षी ७००० हजार अमेरीकन लोकांच्या समोर केलेल्या भाषणाने अमेरीकन लोकांमध्ये भारताबद्दल ओढ निर्माण करणारा एकमेव भारतीय. (असे म्हणतात की ३ मिनीटे सभाग्रह हे टाळ्याच्या कडकडाटात दणादुन गेले होते)
आध्यात्मिक समाधी मध्ये जाणारा व तेथे देखील स्वतःचा मोक्ष (मुक्ती ) न पाहता भारताचे उज्वल भविष्य पाहणारा एकमेव कर्मयोगी.
(ईतर उदा. सत्य साई बाबा, ओशो....श्री १००८, १००००५० असे किती तरी बाबा नंतर समाधीमध्ये गेले असावेत पण त्यानी एकतर स्वतःचा मोक्ष पाहीला अथवा आर्थिक प्रगती... नाहीतर ज्याला समाधी लागते त्याला काय करावयाचे आहे राडो चे रत्नजडित घड्याळ व मर्सिडीज् )
साहिल
टाळ्यांचा कडकडाट
मी माझ्या प्रतिसादात दिलेल्या दुव्यात त्या भाषणाचे ध्वनिमुद्रण१ (स्वागतपर भाषण) आहे. त्यात हा टाळ्यांचा कडकडाट ऐकता येईल.
१ - ह्या ध्वनिमुद्रणात असलेला आवाज स्वामीजींचा आहे की इतर कुणाचा याविषयी खात्रीशीर माहिती नाही पण संदिग्धता असली तरी ऐकायला काही हरकत नसावी.
संदिग्धता
ह्या ध्वनिमुद्रणात असलेला आवाज स्वामीजींचा आहे की इतर कुणाचा याविषयी खात्रीशीर माहिती नाही पण संदिग्धता असली तरी ऐकायला काही हरकत नसावी.
वर्षभरापूर्वी किंवा त्या आधी हे ध्वनीमुद्रणाबाबत मी ते खरे आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला होता पण ते खरे नसावे असे म्हणायला जास्त जागा आहे.. अर्थात आपण म्हणालात त्याप्रमाणे तरी ते ऐकणे चांगलेच आहे.
बलोपासना
बुध्दी प्रमाणेच शरीरामध्ये तेज देखील हवे व तेज हे बलातून (ताकत) येते असे सांगणारे एकमेव.
१९व्या-२० शतकातील कदाचीत एकमेव. १७व्या शतकात रामदास स्वामींनी तेच केले, म्हणून या आणि अशा अनेक गोष्टींमुळे त्यांना "राजकारणी संत" असे नाव पडले.
याच संदर्भात विवेकानंद एका ठिकाणि अशा अर्थाचे म्हणालेत की, आजच्या तरूणांचा देव आणि तत्वज्ञान हे "फूटबॉलच्या मैदानात" असले पाहीजे. जर ते खेळले नाही आणि राजसीक गूण संपादीले नाहीत तर त्यांचा स्वतःला आणि समाजाला/देशाला उपयोग नाही. त्यांच्या दृष्टिने भारत (भारतीय) हा तामसीक झाला होता.
असे म्हणतात की ३ मिनीटे सभाग्रह हे टाळ्याच्या कडकडाटात दणादुन गेले होते
त्यांच्या काही चुकांमुळे (साध्या शब्दात विसराळू/वेंधळेपणा मुळे) त्यांना आधी तिथे जायलाच मिळत नव्हते, मग त्यांना पहील्या दिवशी काही मिनीटे बोलण्याची परवानगी दिली. आणि नंतर त्यांना कॉन्प्फरन्स संपे पर्यंत दरोज लोकाग्रहस्ताव बोलायला लागले.
कधी कधी असे तिरकसपणे म्हणले जाते की, विवेकानंदांचे महत्व भारतीयांना ते अमेरिकेत गेले म्हणून कळले नाहीतर कोणी लक्ष दिले नसते. पण वास्तवीक बघता त्यांनी अमेरिकेच्या बाबतित जो काही पराक्रम गाजवला आणि भारताचे खर्या अर्थाने प्नतिधित्व केले त्यामुळे त्यांचे कौतूक झाले त्यात काहीच चूक नव्हते. "उत्तिष्ठ, जाग्रत, वरान्नबोधत् अर्थात arise, awake and stope not till goal reach" हे नुसते लोकांना सांगत बसले नाहीत तर स्वाचरणानी त्यांनी स्वतःच्या खिशात दमडी नसूनपण आणि त्यावेळेस प्रसिद्ध नसूनपण करून दाखवले. ना।इतर काय ते नुसते एक उपदेश कराणार्या अनंत स्वामींपैकी एक झाले असते...
धन्यवाद
आपण सर्वांनी येथे दिलेले छोटे किस्से मला उपयोगी पडले. अजून माहिती हवीच आहे.
लो. टिळक-विवेकानंद
लो. टिळक-विवेकानंद यांची रेल्वेमध्ये भेट झाली असे वाचल्याचे स्मरते. तपशील आठवत नाही.
विवेकानंदांचे विचार येथे पहायला मिळतील.
अभिजित..
“Education is the manifestation of the perfection already in man.”-स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांची भेट पुण्यातील
स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांची भेट पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या विंचूरकर वाड्यात झाली. ( याच वाड्यात गणेशोत्सवाच्या प्रसंगी टिळकांनी केलेले भाषण इतिहासप्रसिद्ध प्रसिद्ध आहे). या वाड्यात आजही भेटीसंदर्भातील फोटो बघायला मिळतो. वाडा आता बराच जुना झाला आहे. वाड्याचा पत्ता असा, 727, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड पुणे. (एका कार्यक्रमासाठी आम्ही मागे पुण्याला गेलो, तेव्हा याच वाड्यात मुक्कामी होतो.)
आणखी,
1. स्वामी विवेकानंद हे राजयोगी होते. राजयोगाचे साधन ते करत असत. यम, नियम, आहार, वगैरे 16 नियम/क्रिया राजयोगात करायच्या असतात. मात्र राजयोगाची साधना योग्य गुरुमार्फत दीक्षा घेऊनच केलेली उत्तम असे स्वामीजींनी म्हटलेले आहे. योगशास्त्रात हटयोगाचे साधन फारच कठिण असते. त्यापेक्षा राजयोग हा तुलनेने सोपा. व्यक्तिगत उन्नत्तीसाठी राजयोग अत्यंत फायद्याचा आहे.
2. विवेकानंदांची आणि त्यांच्या गुरुंची, रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली तेव्हा विवेकानंदांनी ( पूर्वाश्रमीचे नरेंद्र ) " मन चलो निजधाम..' या अर्थाचे आध्यात्मिक अर्थाने ओतप्रोत भरलेले गाणे ऐकवले. त्यानंतर श्री रामकृष्णांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी नरेंद्रला प्रेमाने आलिंगन दिले आणि हात जोडून प्रार्थनाही केली. नरेंद्राची विवेकानंद होण्याच्या वाटचालीतील हा एक सुरुवातीचा आणि महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. गुरु शिष्याचे नाते काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर स्वामी विवेकानंद आणि श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यासंबंधीची माहिती अवश्य करुन घ्यावी असे आम्हाला वाटते.
3. स्वामी विवेकानंद हा अधात्म आणि ज्ञान विज्ञानाचा धगधगता महासागर होता. (दीड दमडीची बुवाबाजी आणि तथाकथीत चमत्कार या माणसानं कधीच केलेला नाही) म्हणूनच आजही या विवेकानंदांनी दाखविलेल्या मार्गाचा स्वीकार करतात, संन्यास घेतात त्यात उच्चशिक्षितांची संख्या मोठी आहे; अगदी, डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ सुध्दा.
4. स्वामी विवेकानंदांवर "स्वामी विवेकानंद' नावाचा एक चित्रपट निघाला आहे. त्यातील रामकृष्ण परमहंसांची भूमिका "मिथुन चक्रवर्ती ' यांनी मोठ्या कसदारपणे साकारली आहे. इतकी की बराच वेळ हा अभिनेता मिथुन चक्रवर्ती आहे हे लक्षातच येत नाही. 7/8 वर्षांपूर्वी ( नक्की साल आठवत नाही) 15 ऑगस्टला हा चित्रपट दूरदर्शनने प्रसिद्ध केला होता. मन चले निजधाम हे मूळ गीत, चलो मन जाये घर अपने या बोलात प्रसिद्ध गायक येशुदास यांनी आपल्या भावपूर्ण स्वरात उत्तम गायलेले आहे. गाणे ऐकताना समाधी लागावी इतकी सुंदर ती रचना आहे.
सुंदर माहिती
अतिशय सुंदर माहिती दिलीत.
मन चलो निजधाम हे गीत नरेंद्र ब्राह्मो समाजात असताना गात असत आणि पहिल्या भेटीत रामकृष्णांनी त्यांना ते गाणे म्हणण्याची विनंती केली होती असे वाचल्याचे स्मरते. चूभूद्याघ्या
हे अगदी खरे आहे.
लो. टिळक-विवेकानंद भेटी - लोकमान्यांच्याच शब्दांत!
उपक्रमींना या दोन असामान्य व्यक्तींच्या भेटीचा वृत्तांत त्यातील एका व्यक्तीने (लोकमान्य) जसा सांगीतला तसा वाचायला आवडेल असे वाटत असल्यामुळे लिहीण्याचा प्रयत्न करत आहे.
संदर्भः लोकमान्य टिळकांच्या आठवणी, मूळ ग्रंथ १९२४, माझ्या कडील प्रत प्रकाशीत १ ऑगस्ट १९९२.
खालील आठवण ही श्री. प्रल्हाद नारायण देशपांडे (प्र.दे.) यांनी लिहीलेली आहे. पृष्ठ क्रमांक ३७९-३८२. मी वेळे अभावी थोडी संकलीत करत आहे (जिथे ... असे दिसेल तिथे)
प्र. दे.: ... लोकमान्यांचा स्वामी विवेकानंदांशी पत्रव्यवहार झाला असल्यास त्यांची पत्रे मिळवून मी मद्रासला पाठवावी असे मला स्वामी शर्वानंदांक्डून सांगण्यात आले. त्यासाठी मी १९१५ च्या आरंभी लोकमान्यांची भेट पुण्यास जाऊन घेतली ...स्वामी विवेकानंदाविषयीची लोकमान्यांकडून मिळालेली माहिती महत्वाची वाटल्यावरून पुढे देत आहे.
लोकमान्यः " १८९२ मध्ये एकदा मी मुंबईहून पुण्यास परत येण्यास निघालो असता एक संन्यासी सेकंड क्लासात मी बसलो होतो त्या डब्यात बसले. त्यांच्याबरोबर काही गुजराथी मंडळी पोचविण्यास आली असून त्यांनीच त्यांचे तिकीट काढून दिले होते आणि पुण्यास कोणाची ओळख नव्हती म्हणून माझी ओळख देऊन त्यांना माझ्या येथेच मुक्काम करण्यास सांगीतले. पुण्यास आल्यावर घरातील एक स्वतंत्र खोली त्यांस दिली....ते फारसे कोणाशी बोलत नसत, मी मात्र मधून मधून त्यांच्याशी बोलत असे. त्यावेळि आमच्या हिराबागेतील क्लबात दर आठवड्यास क्लबची सभा भरत असे. कोणी तरी एकजण एखाद्या विषयावर भाषण करी आणि मग मंडळीत त्या विषयावर चर्चा होत असे....एके दिवशी या आमच्या सभेस मी स्वामींस बरोबर नेले. त्या दिवशी काशीनाथ गोविंद नातू वकील यांनी भाषण करून तत्वज्ञानविषयक प्रश्नाचा पूर्वपक्ष मांडला. त्यावर नित्याप्रमाणे चर्चा व्हावयाची, परंतु विषय नेहेमींच्याहून निराळा म्हणून लवकर कोणी बोलावयास उठेना. तेंव्हा मी स्वामींस म्हटले 'आपण काही बोलावयाचे असल्यास बोलावे' त्यानंतर स्वामींनी सुमारे एक् तासभर भाषण करून त्या विषयावरील उत्तरपक्ष इतक्या उत्तम तर्हेने व अस्खलितपणे मांडला की सर्व मंडळी आश्चर्यचकित होऊन गेली....स्वामींनी आपले नाव सांगितले नव्हते. श्रीभगवद्गीता हा माझा आवडता विषय. त्या विषयी स्वामींशी दोनतीन वेळा चर्चा केली आणि गीतेचे सार व मर्म निष्कामकर्मयोगच आहे अशी मजप्रमाणे त्यांचीही निष्ठा असल्याबद्दल माझी खात्री झाली. दिवसेंदिवस स्वामींकडे लोक जास्त येऊ लागले. तेंव्हा एक दिवस 'उद्या आपण जाणार' असे स्वामींनी सांगून दुसर्या दिवशी पहाटे कुणी उठण्यापूर्वीच प्रयाण केले."
"पुढे चार-पाच वर्षांनी स्वामी विवेकानंद अमेरिकेत दिग्विजय करून स्वदेशी परत् येण्यास निघाले. तेंव्हा मार्गात त्यांचा ठिकठीकाणी मोठा सन्मान होऊन मानपत्रांचा त्यांजवर वर्षाव होऊ लागला. ते सिलोनमध्ये आल्यावर कोलंबो येथील एका इंग्रजी दैनीकात अशा समारंभाची हकीकत देऊन त्यांचा फोटोहि प्रसिद्ध करण्यात आला होता. तो पाहून आपल्या येथे राहून गेलेले तेच हे स्वामी आहेत असे मला वाटू लागले आणि मी त्यांस पत्र लिहून तसे कळविले, आणि कसेही करून बंगाल्यात परत जाताना आमच्या पुण्यास दर्शन देऊन जावे अशी त्यांस विनंती केली. त्यांचे उत्तर आले आणि माझी अटकळ खरी ठरली. 'सुमारे दोन महिन्यांचा कार्यक्रम ठरून गेला आहे यामुळे या खेपेस पुण्यास सवड होणार नाही तरी पुढे सवड काढून येईन' असे त्यांनी लिहीले होते. हे पत्र फारच गौरवयुक्त आणि भारदस्त होते."
प्र. दे.: हे पत्र आपल्या संग्रही मिळेल काय असे विचारता
लोकमान्यः " ते शक्य नाही. १८९७ सालच्या खटल्यापासून पत्रव्यवहार खासगी असो की सार्वजनिक असो, त्यातील अतिशय महत्वाचे कागद मात्र वेगळे काढून बाकी चटसारे अग्निनारायणास आठवड्याच्या आठवड्यास समर्पण करण्याचा आमचा संप्रदायच पडून गेला आहे. तथापी मला त्या पत्राची चांगली आठवण आहे. (असे म्हणून त्यातील काही वाक्ये त्यांनी बोलून दाखवली). पुढे काँग्रेसच्या निमित्ताने मी १९०१ मध्ये कलकत्यास गेलो होतो तेंव्हा स्वामी विवेकानंदांचा बेलूर मठ पाहाण्यास गेलो होतो. तेथील स्वामींनी आमचे चांगले स्वागत केले.... याही वेळी विवेकानंद स्वामींशी आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. धर्म हा जरी स्वामींचा नेहेमीचा मुख्य विषय असे तरी सर्व प्रकारच्या सार्वजनिक विषयांत त्यांची चांगली तयारी होती आणि त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास उल्हास वाटे. लोकजागृती, लोकशिक्षण किंबहुना परमहंस दिक्षेत असूनही सर्व प्रकारचा लोकसंग्रह करण्याची उत्कत इच्छा संभाषणातून नेहमी दिसून येत असे. त्या खेपेच्या भाषणात एकदा ते म्हणाले की, 'कोणाच्या बुद्धीचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या प्रांतात लवकर चांगलासा दिसून येत नाही. आपलीही धर्मावर फार श्रद्धा आहे. तेंव्हा मला वाटते आपण संसारत्याग करून संन्यास घेऊन धर्मजागृती व सर्वप्रकारचे लोकशिक्षण ही कामे करण्यासाठी आमच्या बंगाल्यात येऊन राहावे आणि त्याच कामासाठी मी आपल्या महाराष्ट्रात खपावे!' मी त्यांना ताबडतोब उत्तर दिले की,'संन्यास मी कधीच घेणार नाही, माझ्याने जी कार्ये व्हावयाची ती गृहस्थाश्रमात राहूनच होतील. शिवाय ज्याच्या त्याच्या प्रांतात कोणाचा बुद्धीप्रभाव चांगला दिसून येत नाही हे मत मला मान्य नाही. उलट जो पुढारी आपल्या प्रांतात पुढल्या रांगेत येईल तोच पुढे दुसर्या प्रांतात व सर्व देशात पुढे येण्याचा अधिक संभव असतो असे माझे मत आहे."
आभारी आहे
इथे इतकी सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल वरील सर्वांचा आभारी आहे.
अभिजित
वा
छान माहिती दिलीत.
आभार.
--लिखाळ.
जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!
संगीतज्ञ!
स्वामीजी संगीतज्ञही होते अशी आमची माहिती आहे!
असो, स्वामिजींना आमचा दंडवत...
तात्या.
थोडेसे वेगळे
रामकृष्ण परमहंस व नरेन्द्र यांची जी परमेश्वराच्या अस्तित्वाबद्द्ल दंतकथा सांगितली जाते त्यात तथ्य किति असावे?
रामकृष्ण परमहंस यांच्या कथा ऐकल्या कि ते पॅरानाईड स्किजोफ्रेनिक केस होती कि काय अशी शंका यावी असे वाटते.
अवांतर- हा कोणाच्या वैयक्तिक श्रद्धांवर हल्ला आहे असे न मानता वैज्ञानिक दृष्टिकोणातून चिकित्सेला खुला असावा म्हणून मांडला आहे. थोर पुरुषांच्याबाबत विद्वान लोकसुद्धा बिचकत लिहितात. जनतेचा रोष कुणालाच नको असतो
प्रकाश घाटपांडे
अरे वा!
मलाही असेच वाटते हो पण मी घाबरून गप्प बसतो.
-राजीव.
नक्की काय?
रामकृष्ण परमहंस यांच्या कथा ऐकल्या कि ते पॅरानाईड स्किजोफ्रेनिक केस होती कि काय अशी शंका यावी असे वाटते.
आपल्याला नक्की कुठल्या कथा माहीत आहेत हे (जेव्हढा माहीत असेल तेव्हढ्या) संदर्भासहीत लिहीले तर बरे होईल. हे मी आपली भुमीका समजून घेण्यासाठी म्हणत आहे, वादासाठी म्हणत नाही.
धन्यवाद
थोडेसे इथे
रामकृष्णांचे कालीमातेशी बोलणे, स्त्री वेष धारण करणे, बायकोशी मातेसमान वागणे, वगैरे व्यावहारिक दृष्ट्या विक्षिप्त बाबी ( ज्या बाबा, बुवा यांच्याबाबतीत नेहमीच आढळतात) या अनुषंगाने मी म्हणत होतो. मनोविकारांना समाजात मान्यता देताना अध्यात्माचा टच् द्यावा लागतो. ( हे मी उपरोधाने म्हणत नाही हे लक्षात घ्या) इथे
त्याबाबत थोडेसे वाचता येईल. पण मी हे मराठीत वाचले होत्ये. तो संदर्भ मात्र सापडत नाही.
प्रकाश घाटपांडे
कालीज् चाईल्ड
धन्यवाद प्रकाश,
सर्व प्रथम माझी भुमीका: मी काही रामकृष्णांना अथवा एकंदरीतच कुणा एका व्यक्तीला गुरू मानत नाही. अर्थात याचा अर्थ स्वतःला शहाणा अथवा जे इतरांच्या नजरेत आणि स्वतःच्या तपश्चर्येने गुरूस्थानी पोचले आहेत त्यांना कमीपण मानत नाही. रामकृष्ण हे असे नक्कीच आहेत जे स्वकर्तुत्वाने गुरूस्थानी पोचलेले आहेत. अर्थात हे माझे मत आहे, श्रद्धा म्हणून नाही. हा प्रतिसाद थोडा मोठा आहे कारण त्यात मधूनमधून पूर्वपिठीका देण्याची गरज भासली. हा (प्रतिसादातील) विषय माझ्यासाठी धर्म/श्रद्धा यांच्या पेक्षा या संबंधाने जे वेगळेच राजकारण त्याच्याशी आहे. (जे परकीय आणि आपल्यापेक्षा कमी समजल्या जाणार्या समाजाला स्वतःविषयी द्वंद्व तयार करायला केले असते )
आपण जो दुवा पाठवला होता त्यात विशेष असे दिसले नाही. तरीपण इतरांना काय वाटते ते पाहण्यासाठी रामकृष्णांबद्दलचा मी एक शिवाजीराव भोसल्यांनी लिहीलेला माहीतीपूर्ण लेख जो माझ्याजवळ होता तो वाचला आणि काही वेगळे असल्याचे आढळले नाही.
आपण, आपल्याला जे प्रामाणीकपणे वाटले ते अत्यंत समतोल शब्दात, कुणालाही न दुखावण्याची काळजी घेत मांडले आहे: "मनोविकारांना समाजात मान्यता देताना अध्यात्माचा टच् द्यावा लागतो". मला हे वाक्य पटले नाही, याचे साधे कारण असे आहे की या पद्धतीने वेड्यांच्या इस्पितळाला आध्यात्मिक आश्रमच आपण म्हणले असते.
वरील परिच्छेदाचे कारण एकच की यातील कोणतीच व्यक्ती आणि अशा अनेक भारतातच काय पण जगभर असतील या सामान्य जीवनशैलीत बसत नाहीत. हा काही "रिलीजन"चा भाग नाही. विज्ञान हे कुणालाही अनुभवता येते पण अध्यात्मासाठी प्रत्येक पायरीची वेगळी तयारी असते आणि ते स्वानुभवानेच जाणवू शकते. जो पर्यंत यातील एकाही व्यक्तीने अध्यात्माच्या नावाखाली काही चाळे केल्याचे ऐकले नाही , अथवा माझ्या मागे येऊन टाळ कुटा असे मार्केटींग करत बसले नाहीत तो पर्यंत आपल्या नजरेला पटले नाही तरी (आपल्याला सगळे माहीत नाही हे ध्यानात घेऊन) त्याचा स्वाध्याय न करता अथवा अनुभव न घेता पास्चात्य पद्धतीने चिरफाड करू नये असे वाटते.
असो, मला कल्पना नाही, की आपण हा विषय काढताना अजून काही माहीती होती की नाही ते. पण मला ती थोडीफार होती आणि त्याबद्दल काल जरा जलद वाचन करून ते आता थोडक्यात मांडत आहे. १९९३ साली युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो मधील "रिलीजियस स्टडिज्" क्षेत्रातील एक विद्यार्थी "जेफरी क्रिपाल" याने त्याच्या पि.एचडी. साठीचा प्रबंध लिहीला त्याचे नाव होते "कालीज् चाईल्ड" . हे तथाकथीत संशोधन रामकृष्णांवरील आहे आणि त्यातील एक रोख (वरकरणी कुठेही वेडवाकडे न लिहीता) असा आहे की ते समलिंगी होते. या पुस्तकावरून (त्याच्या दोन आवृत्या झाल्यात) भारतीयात आणि भारतात विशेष करून बंगालमधे खूप बोंबाबोंब झाली. गंमत बघा, सलमान रश्दी (जो खोमेनी स्वतःचा आवडता लेखक म्हणायचा!) त्याच्या "सेटानीक व्हर्सेस" या पुस्तकावर कुठल्याही मुस्लीम राष्ट्रांनी बंदी घालायच्या आधी धर्मनिरपेक्ष भारतसरकारने घातली, ती बरोबर का चूक हा वेगळा मुद्दा आहे पण तोच न्याय येथे दिल्याचे अथवा इतर अनेक ठिकाणि दिल्याचे जाणवत नाही.. (कशावर बंदी घालायच्या मी विरोधात आहे आणि समान न्यायाच्या बाजूने आहे). कदाचीत बंगाली सोडून भारतीय माध्यमांनी पण यावर चर्चा केल्याचे ऐकीवात नाही.
या लेखकाचे वैशिष्ठ्य म्हणजे तो "रिलिजियस स्कॉलर" (का? कारण पिएचडी, तेही युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो मधून) पण त्याच्याच शब्दात त्याचा अभ्यास बघा:
...American culture takes it for granted that sexuality lies at the core of our humanity (and spiritualities), that homosexuality is one of many natural human sexual orientations, and that it is a good, creative and positive thing to talk openly about all of this, others who grew up in different cultures no doubt feel very differently about these same matters...
...I speak and write from my own cultural and historical position, and that from that limited perspective what I have written is best understood as an ultimately appreciative attempt to make sense of Sri Ramakrishna's Sakta Tantra through the categories and ideas of that same culture and place....
...Historically speaking, my own project emerges not from British colonialism per se, but from the nineteenth-century missionary efforts of Swami Vivekananda in America (which, of course, was itself a response to Western colonialism) and, more recently, from the American counter-culture of the 1960's and its warm embrace of Tantric forms of Hinduism and Buddhism as powerful means to subvert and renew Western culture, what Agehananda Bharati once correctly predicted would develop into a kind of scholarly "Tantric Renaissance" in the States. ...
त्याचा संपूर्ण मुद्दा येथे वाचू शकता. पण थोडक्यात सांगायचे झाले तर ह्या विद्वानाने (स्कॉलर या अर्थी) बंगाली भाषा अभ्यासली नाही, संस्कृतीची जाणीव नाही आणि जे काही बंगाली मधून भाषांतरीत/अनुवादीत नाही, पण "interpret" (मराठी शब्द?) केलेले मिळाले त्याचा उपयोग करून तयार केला गेलेला हा प्रबंध.
त्यावरील रामकृष्ण मिशनच्या स्वामी त्यागानंद जे हार्वर्ड विद्यापिठात चॅप्लेन (धर्मोपदेशक) आहेत त्यांनी लिहीलेले उत्तर येथे वाचा. त्यावर झालेला पत्रव्यवहार येथे.
या सर्वाचा थोडक्यात अर्थ काय? दोन शक्यता: एक म्हणजे कुठलाही उद्देश न ठेवता झालेली चूक. दुसरी शक्यता म्हणजे : उद्देश ठेवून झालेली चूक. पहीले असले तर उत्तम. दुसरे असेल तर कारणे काय असू शकतात? - मी फक्त खाली मुद्दे मांडतो.
म्हणून मी जे काही माहीतीपूर्ण लिखाणांसंदर्भात संदर्भ संदर्भ म्हणून येथे पण इतर प्रतिक्रीयात ओरडत असतो त्यात लिहीणार्या व्यक्तीला पुरावा म्हणून मागत नसतो. त्याचे कारण हेच आहे की आज जे काही लिहीले जाते तो उद्याचा संदर्भ असतो. तो जर, जिथे लिहू तिथे, लिहीण्याची सवय/शिस्त आपण स्वतःला लावली नाही तर आपण असेच तिर्हाइताच्या संदर्भावर आपण कसे समाज म्हणून आहोत ते ठरवणार.
आता हा प्रतिसाद थांबवतो, बाकी आपल्यास जे योग्य वाटेल तसा अर्थ आपण लावा आणि रहा (मी काही कृष्ण नाही की आध्यात्मिक नाही, पण आपले तत्वज्ञान) सांगते आणि गीते मध्ये ही कृष्ण अर्जुनासाठी निर्णय घेत नाही, तो फक्त म्हणतो: "असे गुढाहुनी गुढ बोलीलो ज्ञान मी तुज, ध्यानी घेऊनी ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ||")
सहमत
दुरदर्शनर लागलेला चित्रपट बघताना अगदी असेच वाटले होते.. त्यात परमहंसांची भुमिका मिथुन ह्यांनी केली होती .. बाकी त्याविषयी आमचा काहिच अभ्यास नसल्याने अधिक माहिती नाही परंतु,
घाटपांडे साहेबांच्या ह्या विचारांशी मात्र पूर्ण सहमत! व्यक्तिपूजा करणार्यांचा रोष ओढवला जातोच!!
विदेही
मनोविकारांचा मागोवा हे डॊ. श्रीकांत जोशी लिखित पुस्तक वाचल्यावर मनोवैकारांबाबत ची टोकाची भूमिका का होते ते समजते. साधं नवरात्रात देवी अंगात येणे एवढ्याच गोष्टीवर जरी भाष्य केले तरी तो काहींच्या श्रद्धेवर हल्ला ठरु शकतो. अंगात येणे हा एक मनोविकार आहे. चिंता हा देखिल मनोविकाराच आहे. या अर्थाने सर्वच जण कधी न कधी मनोविकारी असतातच. प्रश्न समाजमान्यतेबाबत आहे. विदेहि असण मनोविकारी कि अध्यात्मिक?
प्रकाश घाटपांडे
झांजीबार
या अर्थाने सर्वच जण कधी न कधी मनोविकारी असतातच.
मला पेडगावच्या शहाण्यातले "दुनीया वेडांचा बाजार, झांजीबार" हे गाणे एकदम आठवले.
साधं नवरात्रात देवी अंगात येणे एवढ्याच गोष्टीवर जरी भाष्य केले तरी तो काहींच्या श्रद्धेवर हल्ला ठरु शकतो.
एखादी गोष्ट पटली नाही आणि त्यावर थट्टा/कुचेष्टा न करता, प्रामाणिक भाष्य केले तर तो कोणाच्या श्रद्धेवर खरे म्हणजे हल्ला म्हणून धरण्याचे कारण नाही. तसा धरला जातो हे चूक आणि दुर्दैवी आहे. पण त्याच बरोबर फक्त आपलीच भूमिका काय ती योग्य असे धरून चालत जाणे आणि समोरच्याला विद्वत्तेच्या नावाखाली ठोकणे पण अयोग्यच. (आपली भूमिका मान्यच आहे).
नवरात्रातील अंगात येण्यावरून एक गोष्ट आठवली: ठाण्यात अष्टमीला दोन-तीन ठिकाणी घाघरी फुंकणे चालते (निदान चालायचे) - त्यातील प्रसिद्ध ठीकाणे म्हणजे - घंटाळी, ब्राम्हण सेवा संघ, ब्राम्हण सभा. लोक रांगेत (घाबरून जरा लांबूनच) दर्शनाला थांबायचे. मी ही लहान असताना बघितले आहे की त्या संध्याकाळी या एरवीच्या वेळेस साध्या दिसणार्या बायका ४-५ तास सतत हातात घागर उडवत फुंकू कशा शकतात? आपण एखादे भांडे तरी असे १५ मिनिटे हलवू शकू का? याचा अर्थ मी काही म्हणजे देवीला उद्योग नाही म्हणून घागरी फुंकायला अंगात आली अथवा पुजा करायला पाहीजे इत्यादी, असा नाही घेतला,पण हा प्रश्न नक्कीच पडला की एव्हढी उर्जा या बायकांमधे कुठून येते? गंमत म्हणजे याच नवरात्राच्या काळात घंटाळी नवरात्रोत्सवामधे डॉ. अनील अवचट यांचे अंधश्रद्धा या विषयावर भाषण झाल्याचे आठवते आणि मी ते आवडीने बघायला गेलो होतो. कोणीतरी याच संदर्भाने प्रश्न विचारला आणि ते (अवचट) देखील प्रामाणीक पणे असे म्हणाले की ही उर्जा कुठून येते माहीत नाही , असते हे मान्य, पण देवी समजणे मला मान्य नाही.
विदेहि असण मनोविकारी कि अध्यात्मिक?
मला वाटते, शेवटि अशी स्वतःला विदेही समजणारी व्यक्ती अथवा अशी व्यक्ती जीला समाज विदेही समजतोय, ती नक्की काय करतेय ते पहावे. रामकृष्णांच्या बाबतीत किंवा तत्सम इतरांच्या बाबतीत त्यांनी नक्की काय दृष्टांत कोणाला दिलेत, त्यांचे लिखाण वाचावे आणि मग ठरवावे. आपण जर विवेकानंदांना मनोरूग्ण अथवा अंधश्रद्ध समजत नसलो तर एक विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, त्यांनी जे स्वतःच्या आयुष्याच्या बाहेर जाऊनही मिशन चालू केले ते स्वतःच्या याच गुरूच्या नावाने.
विदेही
मनोविकारांचा मागोवा हे डॊ. श्रीकांत जोशी लिखित पुस्तक वाचल्यावर मनोवैकारांबाबत ची टोकाची भूमिका का होते ते समजते. साधं नवरात्रात देवी अंगात येणे एवढ्याच गोष्टीवर जरी भाष्य केले तरी तो काहींच्या श्रद्धेवर हल्ला ठरु शकतो. अंगात येणे हा एक मनोविकार आहे. चिंता हा देखिल मनोविकाराच आहे. या अर्थाने सर्वच जण कधी न कधी मनोविकारी असतातच. प्रश्न समाजमान्यतेबाबत आहे. विदेहि असण मनोविकारी कि अध्यात्मिक?
प्रकाश घाटपांडे