कोकिलैर्जलदागमे - एक निरीक्षण

गेल्या मे महिन्यांत मराठी वृत्तपत्रलेखक संघ, मुंबई यांच्या सुवर्णमहोत्सवी संमेलनांत प्रमुख पाहुणे श्री. अरुण साधू यांनी आपल्या भाषणांत सांगितले की इंग्लंडमधल्या एका वर्तमानपत्राच्या फाइलींत एका वाचकाचे पत्र आहे त्यांत त्याने 'वसंत ऋतु सुरू होऊन इतके दिवस झाले पण अजून कोकिळेचे कूजन ऐकू आले नाही' असे लिहिले आहे. अरुण साधू पुढे म्हणाले की आपल्याकडे अशी वाचकांची संवेदनाशील पत्रे अभावानेच आढळतात.

तेव्हापासून अस्मादिकांनी कोकिळेचे कूजन ऐकू येते का ते रोज पाहायचे ठरवले. सकाळच्या वेळी अर्थातच ते नियमित ऐकू येऊ लागले.

आता
भद्रं भद्रं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे
दर्दुरा यत्र वक्तारा तत्र मौनं हि शोभते
या सुभाषिताप्रमाणे किंवा
पावस देखी 'रहीम' मन कोयल साधी मौन
अब दादुर वक्ता भये तो हम कह पूछत कौन
या रहीमच्या दोह्याप्रमाणे
पावसाळा सुरू झाला की हे कूजन बंद व्हायला पाहिजे.

कोकिळेच्या दृष्टीने पावसाळा केव्हा सुरू होतो ते बघायचे ठरवून मी रोज सकाळी कान उघडे ठेवून (लाक्षणिक अर्थाने) कोकिळेचा स्वर ऐकू येतो का त्याचा वेध घेऊ लागलो.

७ जून हा पावसाळ्याचा अधिकृत आरंभ समजला जातो. त्यामुळे त्या तारखेनंतर कोकिळेचा स्वर ऐकू येणार नाही अशी अपेक्षा होती. कोकिळा या समजुतीला पुष्टी देते का ते मला पाहायचे होते.

पण ७ जूननंतरही रोज सकाळी कोकिळेचा स्वर ऐकू येत राहिला तो २८ जूनपर्यंत. तोपर्यंत चांगलाच पाऊस लागला होता. नंतर मात्र तो ऐकू येईनासा झाला. म्हंटलं चला कोकिळेच्या दृष्टीने २८ जून हा पावसाचा आरंभ दिसतो.

आणि अचानक ८ जुलैला सकाळी पुन्हा कोकिळेचा स्वर ऐकू आला(त्यावेळी पाऊस उघडला होता). पण नंतर त्याची पुनरावृत्ति झाली नाही. म्हणून ८ जुलै हा वर्षांतला कोकिळ कूजनाचा शेवटचा दिवस म्हणून ठरवत असतांनाच.......

आज १६ जुलै ला सकाळी फिरायला बाहेर पडलो तोच पुन्हा कोकिळेचा स्वर ऐकू आला.

यावरून मी काढलेली अनुमाने
१) सुभाषितांत/दोह्यांत म्हंटल्याप्रमाणे कोकिळा पावसाळा सुरू झाल्यावर कूजन बंद करीत नसावी. बेडकांचा आवाज चालू असतांना ती कदाचित गात नसेल पण पावसाळ्यांतही त्यांचा आवाज बंद झाल्याची संधि साधून ती गात असावी.
२) कदाचित कोकिळा वर्षभर कूजन करीत असावी. त्यामुळे वसंत ऋतुचे आगमन व कोकिळेचे कूजन यांचा काहीही संबंध नसावा.

मी आता वर्षभर कोकिळेच्या स्वरावर लक्ष ठेवणार आहे.

आपल्याला काय वाटते?

Comments

कूजन

सर्वप्रथम लेखातील गैरसमज आढळला तो असा की कोकीळा गाते. ते तसे नसून नर कोकिळ कूजन करतो. मादी कोकीळा नाही.

प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या काही जातीत नर हे मादीपेक्षा अधिक उठावदार आहेत. उदा. मोर, बदके, कोकीळ, शिंगधारी सांबर, आयाळधारी सिंह इ. अधिक माहिती येथे मिळेल.

आंब्याला मोहर आला की कोकीळा गाते असे ही म्हटले जाते. वसंत ऋतूशी ही सांगडही घातली जाते.

वसंत ऋतू हा पक्ष्यांच्या प्रणयराधनाचा काळ असून आपल्या मादीला हाक देण्यासाठी कोकीळ याकाळात कूजन करत असावा. कोकीळ स्वतःची अंडी स्वतः उबवत नसला तरीही प्रणयराधनाचा काळ संपल्यावर त्याचे कूजन ऐकू येणे कमी होत असावे आणि शरद ऋतूमध्ये अतल्प किंवा बंद होत असावे.

बरं मग गाणे ऐका

पॉइंट ब्लँक रेंजमध्ये कोकिळाचे हे तथाकथित 'गाणे' ऐकून पहावे - डोके उठते!

अस्सं होय! मग ऐकाच तर. ;-)

कोकिळ गान येथे ऐका.

दुष्टपणाबद्दल क्षमस्व! :)

अहो!

पॉइंट ब्लँक रेंजमध्ये कोकिळाचे हे तथाकथित 'गाणे' ऐकून पहावे - डोके उठते!
अरेरे!
इतके काही वाईट नसते कोकीळगान.

मी पण ऐकले आहे अगदी जवळून तासंतास! तसेच आवाज काढून काढून सादही दिली आहे कित्येक वेळा! मला तर फार आवडायचे!
लहानपणीच्या कित्येक सुरेख आठवणीही त्या आवाजाभोवती आहेत...
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायला नको?)

सुभाषित

एक सुभाषित आठवलं
काक: कृष्णः पिकः कृष्ण : को भेदो पिक काकयो : ।
वसंत समये प्राप्ते काक : काक : पिक : पिक : ॥

प्रकाश घाटपांडे

गैरसमज सार्वत्रिक

प्रियालीताई,

सर्वप्रथम लेखातील गैरसमज आढळला तो असा की कोकीळा गाते. ते तसे नसून नर कोकिळ कूजन करतो. मादी कोकीळा नाही.

मला वाटतं 'कोकिळा' गाते हा गैरसमज सार्वत्रिक असावा. बहुधा आवाजांतील माधुर्याची स्त्रीत्वाशी सांगड घालण्याची रीत असावी. (स्त्री-गायकांनाच गानकोकिळा म्हणण्याची पद्धत आहे).

सध्याच्या मराठी माध्यमांतील इयत्ता ८ वी च्या मुलांसाठी जे इंग्रजी पाठ्यपुस्तक आहे त्यांत पहिल्याच The Cuckoo या कवितेंत Cuckoo साठी She हे सर्वनाम वापरले आहे.

कोकिळा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
''कू s हू कू s हू '' करणारा नर कोकिळ असतो ;मादी नव्हे हे जरी शास्त्राप्रमाणे खरे असले, तसेच संस्कृतात 'पिकः' हा शब्द पुल्लिंगी असला तरी मराठी मराठी बोलण्यात, लेखनात, ललित साहित्यात,कवितेत सर्वत्र " कोकिळा गाते " असेच म्हटले जाते, आणि "शस्त्राद्रूढीर्बलीयसी " या न्यायाने तेच अधिक योग्य आहे.
पावसाळ्यातही कोकिलकूजन ऐकू येते हे श्री.शरद कोर्डे यांचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. मात्र दर्दुरगान ह्ल्ली मुळीच ऐकू येत नाही. कुठे लघुरुद्र,महारुद्र असला आणि भटजी मंत्र म्हणत असले तर दर्दुरध्वनी ऐकू येतो तेवढाच!
पण संस्कृत साहित्यातील सगळेच संकेत निसर्गात दिसतात असे नाही.सिंह हत्तीचे गंडस्थळ फोडतो. असे संस्कृत साहित्यात अनेक ठिकाणी आहे.{ सिंहःशिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु.., स्थितिं नो रे दध्या:..(किसरी वरील 'गजालीश्रेष्ठा या) इ).पण Animal Planet चॅनेलवर हत्तीने जरा सोंडवर केली की सिंह पळून जातात असेच दिसते.

हा हा :)

पण Animal Planet चॅनेलवर हत्तीने जरा सोंडवर केली की सिंह पळून जातात असेच दिसते.

अबब हत्ती

खरं आहे... याला असं बघितल्यावर सोंड खाली असली तरी कोणत्या सिंहाची तिथंच उभं राहायची हिम्मत होईल...

- गजानुकर्ण

जबरा हत्ती

त्याच काय आहे गजकर्णसाहेब ,
हत्ती जर एवढी मोठी झाडे उपटू शकतो तर एवढासा साखळ दंड त्याला कसा काय बांधू शकतो ?
प्रकाश घाटपांडे

अबब हत्ती ! गतिमाम हत्ती !

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वा! काय हत्ती आहे! आजानुकर्ण यांनी येथे दिलेल्या या चित्राला एक गती आहे. ते पहात रहावेसे वाटते.

वाह !!

आजानुकर्ण यांनी येथे दिलेल्या या चित्राला एक गती आहे.
वा फार योग्य बोललात. मलाही असेच वाटले. तिरप्या रचनेमुळे (डायगोनल.. हत्तीचा मागचा तिरपा पाय. !) त्या चित्रात एक गती आहे नक्कीच.
--- लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

नॅशनल जिओग्राफिक

हे चित्र नॅशनल जिओग्राफिक वरुन घेतले आहे हे सांगणे न लगे.

चिमणी

गावाकडे असताना सकाळी सकाळी चिमण्या यायच्या अंगणात. आता इथं पुण्यात डोमकावळेच दिसतात फक्त. चिमण्याही कुठेशा गायब झाल्या आहेत.

चिमणी - चिवट पक्षी

या नावाचा ग्रेस यांचा पाठ शाळेत असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता असे वाटते. (चू. भू. द्या. घ्या)

चिमणी हा तसा चिवट पक्षी असावा असे वाटते, म्हणजे तो असा चटकन गायब होणारा पक्षी वाटत नाही. शहरीकरण आणि अन्नाचा तुटवडा यामुळे कदाचित दूर गेला असावा. चिमण्यांचे एक येथे अमेरिकेत पाहिले म्हणजे थंडी सुरू झाली अनेक पक्षी दक्षिणेला निघून गेले तरी बराच काळ चिमण्या मागे राहिलेल्या दिसतात. नोवेंबर, डिसेंबरमध्ये पाहिलेल्या तर नक्की आठवतात. जानेवारी, फेब्रुवारीत असतात का ते मात्र बघावे लागेल. इतके सखोल लक्ष दिले नाही.

मलाही अजून कोकीळ कूजन ऐकू येते.

रोज प्रातःकाली अजूनही मला को़कीळ कूजन ऐकू येत असते. कदाचित ह्या पर्यावर्णातील बदलामुळे ह्या पक्ष्यांच्या सवयी देखिल बदलल्या असाव्यात! कुणी सांगावे.ह्या बाबतीत एखादा पक्षीतज्ञच काही प्रकाश टाकू शकेल.
आमच्या इथे अजूनही कावळे,चिमण्या,पोपट,मैना(साळुंकी),बगळे,कबुतरं वगैरे पक्षी सर्रास दिसतात.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

छान विषय !

शरदराव,
फार मस्त चर्चा विषय. आपला निरिक्षण करण्याचा निर्णय सुद्धा फार चांगला आहे.

तरुशिखरावर कोकिळ कवीने पंचमस्वर लावला... ही ओळ आठवली.

कोकीळ या पक्षामध्ये नर आणि मादी दिसायला वेगळे असतात. नर पूर्ण काळा असतो तर मादी राखाडी आणि वर काळे ठिपके अश्या तर्‍हेची. या पक्षांचा प्रजोत्पादनाचा काळ वर्षांतून एकदा येतो. साधारण वसंत ऋतूमध्ये. माझ्या समजाप्रमाणे उन्हाळा सरता सरता जर मिलन झाले आणि अंडी घातली गेली तर पावसाच्या सुमारास पिले बाहेर पडतात आणि त्यांना वाढीच्या पहिल्या दिवसात भरपूर खाणे उपलब्ध असते. अश्याच बेताने साधारण पक्ष्यांच्या पुनरुत्पादनाचे चक्र असते.

कोकिळ गातो आणि मादिला आकर्षित करतो. मादी आपले अंडे (१/२) इतर कोणा पक्षाच्या घरट्यात घालते. अनेकदा आकाराने लहान पक्षी जसे शिंजीर (सनबर्ड), शिंपी अशा पक्षाच्या घरट्यात ती अंडे घालून पुढची सर्व जबाबदारी त्या पक्ष्याकडे सोपवते.

कोकिळ वर्गातले चातक (आफ्रिकन क्रेस्टेड ककू ? स्थलांतरित) , पावशा (युरेशियन ककू, उत्तर भारतातून आपल्याकडे स्थलांतर पेरते व्हा पेरते व्हा म्हणणारी) कारुण्य कोकिळा (प्लेंटिव्ह ककू) असेही पक्षी या सुमारास आपले अस्तित्व दाखवत असतात. स्वतःचे घरटे करणारा कोकिळ वर्गातला पक्षी म्हणजे भारद्वाज असे वाचलेले आठवते.

पक्षांच्या सहजवृत्ती नुसार मोठे अंडे त्यांना जास्त आकर्षित करते आणि ते उबवायला हे लहान पक्षी प्रेरित होतात. तसेच त्यांना अंडी मोजता येत नाहीत. अनेकदा ती कोकिळा त्याच घरट्यातले आधिचे अंडे बाहेर टाकते वा कोकिळेचे पिलू बाहेर आल्यावर ते काम करु शकते. अशा तर्‍हेने आपल्या खाण्यातील भागिदार कमी करुन स्वतः जगण्याची शक्यता ते वाढवते. वर सांगितलेल्या सहज वृत्तीनुसार मोठा 'आ' सुद्धा अन्न भरवण्यासाठी जास्त उद्युक्त करित असतो. त्यामुळे घरट्यातील इतर पिल्लापेक्षा कोकिळ बाळाला जास्त अन्न मिळते. त्याला जास्त अन्नाची गरज सुद्धा असतेच. ते आकाराने फार मोठे होणार असते. अशा या दत्तक आपत्याची सोय बघता बघता एखादे वेळी ते छोटे पक्षी अति कष्टाने आपले प्राण सुद्धा गमावतात.

आता हे पिलू आकाराने झपाट्याने वाढते. आणि राक्षसी पिलाला भरवणारे लहानसे आई-बाप मजेशीर दिसतात. असा एक क्षण डॉ. सतिश पांडे यांनी टिपलेला वृत्तपत्रात आला होता. (असे स्मरते).

आता असा प्रश्न पडेल की जर ते छोटे पक्षी कोकिळेचा वंश वाढवतात तर त्यांचा वंश कसा वाढणार? यावर उत्तर म्हणजे संख्या, स्वतःच्या पदरात दत्तक आंडे यायची शक्यता आणि सर्वात मुख्य म्हणजे लहान पक्ष्यांचा पुनरुत्पादनाचा वर्षातून दोन वेळा येणारा हंगाम.

हे मी सर्व कोकिळेचा विषय निघाला म्हणुन लिहिले. ते 'कोकिळगानाचा समय' या विषयाला धरुन नाही हे खरेच. माझी जशी माहिती आणि समजूत आहे तसे लिहिले. त्यात त्रुटी, चूका असल्यास जाणकारांनी क्षमा करुन त्या सुधाराव्यात अशी विनंती.

आपल्या पुढिल नोंदी ऐकण्यास उत्सुक आहे.
हा गायनाचा काळ स्थानपरत्वे थोडा बदलेल असे वाटते. त्यामुळे इतर उपक्रमी सुद्धा त्यांच्या परिसरातील नोंदी येथे ठेवतील तर ते अधिक चांगले ठरेल.

शुभेच्छा.
-- (पक्षीमित्र) लिखाळ.

जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!

चांगली माहिती - फूस

पक्षीमित्रांकडून अशीच माहिती अपेक्षित होती. ;-)
धन्यवाद.

कोकिळ वर्गातले चातक (आफ्रिकन क्रेस्टेड ककू ? स्थलांतरित) , पावशा (युरेशियन ककू, उत्तर भारतातून आपल्याकडे स्थलांतर पेरते व्हा पेरते व्हा म्हणणारी) कारुण्य कोकिळा (प्लेंटिव्ह ककू) असेही पक्षी या सुमारास आपले अस्तित्व दाखवत असतात.

या तीन पक्षांबद्दल काही अधिक लिहिता येईल का? त्यांच्याबद्दलही अनेक गैरसमज आढळतात.

आता फू र्‍हस्व करून फुस = फुकटचा सल्ला

पक्षीमित्रांनी (उर्फ लिखाळांनी) असा भला मोठ्ठा प्रतिसाद न टाकता वेळ मिळेल तसा या विषयावर स्वतंत्र लेख लिहावा. वाचायला आवडेल.

छान माहिती

लिखाळबाबू,
तुझी माहिती आवडली.कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते एवढीच माहिती मला होती,ती इतर लहान पक्षांच्याही घरट्यात अंडी घालते,आणि दत्तक पिल्लाच्या अन्नाच्या सोयीपायी प्रसंगी प्राणही गमावणारे चिमुकले पालक पक्षी ही माहिती तर मला अगदीच नवीन होती.
स्वाती

या वर्षी .....

या वर्षी - २००८ - मध्ये कोकिळेचा पहिला आवाज ४ मार्च ला ऐकू आला.

 
^ वर