गीतरामायणातील अभिजात संगीत..
राम राम मंडळी,
रविवार दिनांक १९ ऑगस्ट २००७ रोजी पार्ले कट्टा आयोजित 'सरीवर सरी' ह्या कार्यक्रमांतर्गत पार्लेकरांनी माझा 'गीत रामायणातील अभिजात संगीत' या विषयावरील व्याख्यान व प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवर्षी पार्लेकरांतर्फे 'सरीवर सरी' हा एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो.
जेवणानंतरच्या दुपारच्या सत्रात माझा कार्यक्रम श्रोत्यांना भरल्यापोटी ऐकायला मिळेल! :)
मंडळी, भाईकाका एकदा म्हणाले होते, "की जसे मणिकांचन योग, दुग्धशर्करा योग असतात, तसाच 'फडके-माडगुळकर' हादेखील एक विलक्षण योगच!
बाबुजींनी गीतरामायण बांधतांना आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातील खजिना मुक्तहस्ते श्रोत्यांना वाटला आहे. आज आपण 'दैवजात दु:खे भरता' हे गाणं गेली पन्नासहून अधिक वर्ष ऐकत आहोत. दरवेळी हे गाणं ऐकताना आपण एका वेगळाच अनुभव घेतो. अंतर्मुख होऊन त्यातल्या चालीला, गायकीला आणि शब्दांना दाद देतो. पुष्कळदा ही दाद मूक असते, परंतु खूप आतून कुठूनतरी आलेली असते. हे श्रेय अर्थातच बाबुजींचे आणि गदिमांचे! पण मंडळी, अजून एका गोष्टीला या गाण्याचे श्रेय जाते, आणि ती गोष्ट म्हणजे आपला यमनकल्याण हा राग! परंतु बर्याचश्या श्रोत्यांना याबद्दल माहिती असतेच असे नाही.
आणि माझ्या कार्यक्रमाचा नेमका हेतू हाच आहे की गीतरामायणात बाबुजींनी अत्यंत चपखलपणे आणि विचारपूर्वक वापर केलेल्या आपल्या रागदारीसंगीताबद्दल श्रोत्यांना माहिती पुरवणे.
आपल्या रागसंगीतातील रागांचा काही एक स्वभाव आहे, काही एक चेहरा आहे. माझा कार्यक्रम हा गीतरामायणातील गाण्यांच्या अर्थानुरुप बाबुजींनी एखादा राग का बरं वापरला असेल, यातून त्यांना काय बरं सांगायचं असेल याचा शोध घेणारा असेल. गीतरामायणात यमनकल्याण, भूप, देशकार, मधुवंती, तोडी यांसारखे किती सुंदर सुंदर राग वापरले आहेत की ज्यावर काही बोलावं, सांगावं तेवढं थोडंच!
मंडळी, आज पन्नासहून अधिक वर्ष एखादी कलाकृती जेव्हा रसिकांवर राज्य करते तेव्हा त्यात गायक, कवी, आणि संगीतकार यांचा तर सिंहाचाच वाटा आहे हे निर्विवाद, परंतु आपल्या हिंदुस्थानी रागसंगीताचाही खूप महत्वाचा वाटा आहे एवढंच सांगण्याचा हा एक लहानसा प्रयत्न! बाबुजींनी आपल्यासमोर अक्षरशः साजुक तुपातल्या उच्चतम मिठाईचे दालन खुले केले आहे, त्यातल्या कुठल्या मिठाईत केशर आहे तर कुठल्या मिठाईत छानशी चारोळी तीट लावून सजली आहे एवढंच सांगायचा प्रयत्न मी सदर कार्यक्रमातून करतो.
पण गीतरामायण ही नुसतीच मिठाई नव्हे बरं का मंडळी, तर त्यात
'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' हा आर्त आणि पोटात खड्डा पाडणारा जोगियाही आहे,
थांबा रामा थांब जानकी,
चरणधूळ द्या धरू मस्तकी,
काय घडे हे आज अकल्पित,
थांब सुमंता थांबवी रे रथ
हे सांगणारा आणि जिवाची घालमेल करणारा तोडीही आहे,
काय सांगणे तुज धीमंता,
उदारधी तू सर्व जाणता,
पुत्रवियोगिनी माझी माता,
तुझ्या वर्तने तिला भासवी
भरत तोच श्रीराम!!,
बोलले इतुके मज श्रीराम!
हे सांगणारा चंद्रकंसही आहे,
आणि,
रसाळ मुले-फले सेवूनी,
रसाळता घ्या स्वरात भरुनी,
अचूक घेत जा स्वर मिळवुनी,
लयतालाचे पाळा बंधन,
गा बाळांनो श्रीरामायण
हे सांगणारी भैरवीही आहे.
मंडळी, खरंच या जुन्या मंडळींनी इतकं प्रचंड मोठं काम करून ठेवलं आहे की माझ्यासारख्या संगीताच्या विद्यार्थ्याला ते आयुष्यभर शिकत रहावं इतपत पुरेल!
असो, इच्छुक उपक्रमींनी कार्यक्रमाला अवश्य या ही नम्र विनंती!
आपला,
(बाबुजीभक्त) तात्या.
Comments
रम्य हा स्वर्गाहून कार्यक्रम...
बाबूजी आणि गदिमांचा कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला मिळाला नसला तरी नंतर काही उदयोन्मुख कलाकारांनी केलेला गीतरामायण पाहून थक्क झालो होतो.
कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.
या व अशा कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफीती आम्हाला उपलब्ध करुन देता आल्या तर पुन्हा एकदा दुग्धशर्करा योग येईल. :)
उत्तम आवाजा सहीत
या व अशा कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफीती आम्हाला उपलब्ध करुन देता आल्या तर पुन्हा एकदा दुग्धशर्करा योग येईल. :)
हेच फक्त
"उत्तम आवाजा सहीत" असे नक्की म्हणेन.
आपला
गुंडोपंत
दैवी!
बाबूजी आणि गदिमांचा कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला मिळाला नसला
आत्तापर्यंत ८ - १० वेळेलातरी मला प्रत्यक्ष बाबुजींकडून गीतरामायण ऐकायचा योग आला हे मी माझं भाग्य समजतो. दैवी या शब्दाचा नक्की काय अर्थ आहे/असावा याचा अंदाज हा कार्यक्रम पाहताना यायचा!
या व अशा कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफीती आम्हाला उपलब्ध करुन देता आल्या तर पुन्हा एकदा दुग्धशर्करा योग येईल. :)
प्रयत्न करतो बॉस..
तात्या.
--
चांगल्या वर्तणुकीच्या वचनावर संत तात्याबा 'अनुमती प्रकाशनाच्या' जेल मधुन सुटले आहेत! त्यांचे व्य नि चे आणि खरडवहीचे अधिकार त्यांना परत देण्यात आले असून रोज संध्याकाळी उपक्रमाच्या पोलिस ठाण्यावर त्यांना हजेरीकरता जायचे आहे! :)
भजन
मला तर अनुराधा पोडवालची भजनच आवडतात बॉ..
शुभेच्छा आणि
तात्या सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा! कार्यक्रम नक्कीच चांगला पार पडेल अशी खात्री आहे. काही एम पी ३ टाकता आल्या तर पहा! तसेच कसा कार्यक्रम झाला ते कळवा!
गीत रामायण हा एक मराठी भाषेतील चमत्कार् आहे. आपण उल्लेल्खलीली गाणी माझी आवडती गाणी आहेत. मला शास्त्रीय संगीतातील ओ की ठो कळत नाही (जरी न शिकता मी कुठल्याही प्रकारच्या की बोर्डवर कुठलेही गाणे न बसवता, तात्काळ वाजवू शकत असलो तरी) . पण गीत रामायणातील अजून चाल आणि अर्थ यांचा मिलाप असलेली काही आवडती गाणी सांगावीशी वाटली म्हणून लिहीतो:
गृहाद नावाड्याचे,
अतिथी असो वा असोत राम, पैल लावणे अपुले काम
भले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू... नकोस नौके परत फिरू ग..
कौसल्येचे
स्वतः स्वतःशी कशास चोरी वात्सल्यावीन अपूर्ण नारी,
कळाले सार्थक जन्मातले, पाहूनी वेली वरची फुले
किंवा, दशरथाचे आणि अयोध्येचे वर्णन करणारे (जे एकताना वाटते की रामराज्य हे दशरथाच्या काळातच होते!)
राज सौख्य ते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनाचे,
काय काज त्या सौख्य धनाचे, कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी, अयोध्या मनू निर्मित नगरी..
रामाचे "बोलीले इतके मज श्रीराम" हे गाण्यात त्याचा मानवी स्वभाव आणि आदर्शपणा दिसतो तर शेवटच्या वाल्मिकींच्या तोंडी, "काय धनाचे मुल्य मुनीजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण", म्हणताना, जगण्यातील कर्तव्य न चुकता अलीप्त भावना भरली आहे.
माझ्या सहा वर्षाच्या मुलीला आवडणारे गाणे म्हणजे ज्यात बाबुजींनी धुमाकूळ घालून दाखवलाय ते: सूड घे त्याचा लंकापती!
काही ऐकलेल्या-वाचलेल्या आठवणी (तुम्ही ऐकल्या असतील याची खात्री आहे):
- बाबूजींनी चाल रचली त्यावर आधारीत मग गदीमांनी गाणे तयार केले.
- पहीले गाणे गदिमांकडून हरवले गेले तर त्यांना कोंडून ठेवले होते कारण रेकॉर्डींगची वेळ आली आणि गाणेच नव्हते!
- "राम जन्मला ग सखे" गाणे सुचत नव्हते, तेंव्हा रात्री येराझरा घालणार्या गदीमांना माई माडगुळकरांनी विचारले (असे का होत आहे) , ते गंमतीत म्हणाले की रामाचा जन्म होतोय अण्णा माडगुळकरांचा नाही!
- "दाटला चोही कडे अंधार" या दशरथाच्या तोंडच्या गाण्याचे ध्वनी मुद्रण करत असताना, बाबुजी इतके एकरूप झाले की त्यातील भावनेने थरथरायला लागले आणि लोकांना त्यांना धरून ठेवावे लागले का असेच काही..
विकासराव,
(जरी न शिकता मी कुठल्याही प्रकारच्या की बोर्डवर कुठलेही गाणे न बसवता, तात्काळ वाजवू शकत असलो तरी)
याचा अर्थ आपल्याला उत्तम स्वरज्ञान आहे असा होतो. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण संवादिनीवर साथसंगतही करता का?
नकोस नौके परत फिरू ग..
पाहूनी वेली वरची फुले
राज सौख्य ते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनाचे,
काय काज त्या सौख्य धनाचे, कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी, अयोध्या मनू निर्मित नगरी..
ही गाणीदेखील फारच सुरेख आहेत! 'अयोध्या मनू निर्मित नगरी' या गाण्यात बाबुजींनी देशकाराचा फार सुरेख उपयोग केला आहे. एकच चिंतन लक्ष मनाचे मधला बाबुजींनी केलेला 'क्ष' या अक्षराचा उच्चार फक्त बाबुजींनीच करावा! :)
माझ्या सहा वर्षाच्या मुलीला आवडणारे गाणे म्हणजे ज्यात बाबुजींनी धुमाकूळ घालून दाखवलाय ते: सूड घे त्याचा लंकापती!
क्या बात है..:)
आणि मुख्य म्हणजे आपली सहा वर्षांची लेक गीतरामायणातील गाणी ऐकते ही मला विशेष कौतुकाची गोष्ट वाटते. तिला माझे अनोकोत्तम शुभाशीर्वाद...
बाबूजींनी चाल रचली त्यावर आधारीत मग गदीमांनी गाणे तयार केले.
असं फार वेळेला झालेलं नाही. बहुतेक वेळेला गाणं आधी लिहून झालेलं असे, आणि त्याला चाल नंतर लागत असे.
"दाटला चोही कडे अंधार" या दशरथाच्या तोंडच्या गाण्याचे ध्वनी मुद्रण करत असताना, बाबुजी इतके एकरूप झाले की त्यातील भावनेने थरथरायला लागले आणि लोकांना त्यांना धरून ठेवावे लागले का असेच काही..
याचप्रमाणे 'माता न तू वैरिणी' हे गाणं गाऊन झाल्यावर बाबुजी अत्यंत अस्वस्थ असत आणि खूप थकून जात. त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात मध्यंतराच्या आधी हे गाणं बाबुजी गात आणि मध्यंतराची विश्रांती घेत.
तात्या.
धन्यवाद
धन्यवाद तात्या,
आपण संवादिनीवर साथसंगतही करता का?
नाही, मी टाळ्या वाजवायला किंवा कार्यक्रम संयोजीत करायला असतो. प्रभाकर कारेकर आणि हर्मोनियम वादक थत्ते यांचा असाच एक कार्यक्रम इथल्या मराठी मंडळासाठी (अध्यक्ष असताना) करायची संधी लाभली. दोघांचा खूपच छान अनुभव आला होता. (आणि तसाच कधीही न विसरता येणारा चांगला अनुभव आला होता तो "भक्ती बर्वे" यांचा...)
मुख्य म्हणजे आपली सहा वर्षांची लेक गीतरामायणातील गाणी ऐकते ही मला विशेष कौतुकाची गोष्ट वाटते.
(तिला पण कि बोर्ड असाच वाजवत येतो. वंदे मातरम् पासून काही तिच्या वयाची इंग्रजी गाणी..) चांगले संगीत आवडत असेल तर त्याला कुठलेही बंधन नसावे असे वाटते. त्यामुळे मराठी असल्यामुळे मराठी काय आणि अमेरिकेत राहात असल्याने इंग्रजी काय चांगले संगीत कानावर पडण्याची व्यवस्था आई-वडील म्हणून आम्ही करतो. बॉलीवूडचे व्यवस्था केली नाही तरी येते! आवडी-निवडी वयाप्रमाणे बदलल्या तरी चांगले ऐकलेले कुठेतरी डोक्यात कायमचे राहते असे वाटते.
असं फार वेळेला झालेलं नाही. बहुतेक वेळेला गाणं आधी लिहून झालेलं असे, आणि त्याला चाल नंतर लागत असे.
खुलाशाबद्दल धन्यवाद याबाबत आपल्याला जास्त माहीती आहे.