जिपिएस मार्गदर्शक
अमेरिकेत नवी गाडी खरेदी करण्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेलच. इथे गाडी खरेदी करताना किंमत ही गाडीच्या नुसत्या मॉडल वर ठरत नसून त्यात अतिरिक्त सुविधा काय काय आहेत ह्यावर पण बरीच ठरते. एकाच कंपनीने निर्मिलेल्या आणि एकच मॉडेल असणाऱ्या दोन गाड्यांचा किंमतींमध्ये खूप फरक असतो आणि त्याचे कारण असते ह्या इतर सुविधा. ज्यामध्ये समावेश असतो तो महागडी साउंड सिस्टम, अंतर्गत सजावट (लेदर इंटिरियर), इ.इ. सुविधांचा. ह्यातच आता नव्या तंत्रज्ञानामुळे भर पडली आहे ती जिपिएस यंत्रणेची. निव्वळ ह्या सुविधेचा समावेश करण्यासाठी गाडीची किंमत हजार बाराशे डॉलर्स ने वाढू शकते. परंतू ह्याला पर्याय म्हणून आपण हि यंत्रणा बाजारातून स्वतंत्र विकत घेऊ शकता.
स्वतंत्रपणे विकत घेण्यात असणारे फायदे -
- आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य राहते - कोणता ब्रँड कोणते मॉडेल किती फिचर्स इ.इ.
- हे उपकरण आपण आपण दुसऱ्या गाड्यांमध्येही वापरू शकता.
- पैशाची बचत - सहसा ही बाजारात मिळणारी उपकरणे तुलनेत स्वस्त असतात.
वरील फायद्यांमुळे मी गाडी विकत घेताना जिपिएस हि सुविधा घेण्यासाठी अतिरिक्त हजार बाराशे डॉलर्स खर्च न करता साधारण अडीचशे डॉलर्स खर्च करून गार्मिन कंपनीने बनवलेला StreetPiolot c320 हा जिपिएस खरेदी केला. आता त्याची किंमत त्याहूनही कमी झाली असून ऍमेझॉन च्या संकेतस्थळावर हे उपकरण दोनशे दहा डॉलर्स ला विकत मिळते. गार्मिन बरोबरच, 'टॉम टॉम', मजेलीन अश्या कंपन्यांचेही अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत.
काय आहे ही यंत्रणा - ह्या यंत्रणे मध्ये आपण एक छोटे उपकरण (चित्रात दाखवल्या प्रमाणे) गाडीच्या काचेवर लावायचे असते. ह्या उपकरणाचे मुख्य दोन भाग असतात त्यातले नकाशे आणि त्यातली इलेक्ट्रॉनिक चीप. ह्या चीपच्या आधारे उपग्रहाशी संपर्क साधला जातो आणि तुमचे स्थान निश्चित केले जाते आणि नकाश्याचा वापर करून तुम्हाला ते उपकरणाच्या पडद्यावर दाखवले जाते. आता जसे जसे तुम्ही ह्या स्थानापासून पुढे जाल तसे तसे उपग्रह तुमचा माग काढत काढत राहतो आणि नकाश्यामध्ये तश्या नोंदी करत राहतो. ह्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी हरवण्याची संभावना खूपच कमी होते.
जिपिएस यंत्रणा खरेदी करण्या आधी बऱ्याच जणांचा गैर समज असतो की हे उपकरण खरेदी केले असता 'उपग्रहाची सेवा वापरण्यासाठी अतिरिक्त रक्कम खर्च करावी लागते. परंतु तो चुकीचा समज आहे. अमेरिकन सरकारच्या धोरणानुसार ह्या उपग्रहांच्या वापरासाठी पैसे न आकारण्याचे ठरवले आहे. तेव्हा एकदा का उपकरण खरेदी केले असता अतिरिक्त खर्च काहीही नाही. मी नुकताच जवळपास १७०० मैलांचा प्रवास करून ह्या उपकरणाची चांगली चाचणी घेतली. ह्या उपकरणांची अचूकता खूपच वाढत आहे असे लक्षात आले. मी वापरलेले उपकरण हे टच स्क्रिन सहित येते त्यामुळे कुठे जायचे तिथला पत्ता टंकित केला आणि पडद्याला स्पर्श केला की तुमचे काम संपले. हे उपकरण तुम्हाला सूचना सांगायला सुरुवात करते (डावीकडे वळा, उजवीकडे वळा इ.). ह्या सूचना बऱ्यापैकी अचूक असतात आणि अधिक माहितीसाठी पडद्यावरती नकाश्यातही पाहू शकता. c320 हे अतिशय प्राथमिक मॉडेल असून c450 पर्यंत किमतीच्या चढत्या क्रमाने उपकरणे उपलब्ध आहेत. ह्या मध्ये तुम्हाला, सुचनां बरोबरच रस्त्यांची नावे वाचणे, माहिती साठवण्यासाठी स्वतःची हार्ड डिस्क असणे, एम पी ३ प्लेयर समाविष्ट असणे इ.इ. अतिरिक्त सुविधा मिळतात.
मार्गदर्शनाशिवाय तुम्ही जिथे असाल तिथल्या आजूबाजुची प्रेक्षणीय स्थळे, उपाहारगृहे, पार्किंगची सुविधा अशी माहितीही मिळते आणि एका स्पर्शाने आपण त्यातल्या कुठेही गाडी नेऊ शकता. अनोळखी गावामध्ये असताना ह्याचा खूपच उपयोग होतो. (आठवा इंडियन रेस्टॉरंट शोधण्यासाठी केलेली धडपड!!)
माझ्या मते, कमी झालेल्या किंमती आणि वाढत चाललेली अचूकता पाहता ही यंत्रणा आपल्या गाडीत लावायला काहीच हरकत नाही. रस्ता चुकण्याची भिती, त्यांमुळे वाया जाणारे वेळ/इंधन आणि होणारी चीड चीड हे सगळे पाहता उपग्रह तंत्रज्ञाचा फायदा जरूर घ्यावा.
-वरूण
Comments
"मार्ग"दर्शक लेख!
मिलिंद - स्टीव्ह जॉब्सच्या iPHONE मध्ये आपल्या बर्याचश्या स्वप्नांची पूर्तता झालेली दिसेल! जीपीएस्, संगणक, iPOD, दूरध्वनी हे सारे APPLE च्या सुंदर बांधणीत आपल्यासमोर काही महिन्यातच येते आहे... cheers!!
वरुण - माहितीपूर्ण लेख. धन्यवाद!
माझ्याबाबतीत म्हणायचे झाले तर जीपीएस् ची खरेच गरज आहे का ह्या प्रश्नाला सोयीस्करपणे "मुळीच नाही" असे उत्तर देऊन आजवर घेणे टाळले आहे... मॅपक्वेस्ट/ याहू/ गूगल यांच्या मेहेरबानीवर मार्ग शोधतो आहे. पाहूया किती दिवस तग धरतो ते...
चांगला लेख
नवी गाडी घेतली त्यात इनबिल्ट नेविगेशन सिस्टिम आहे. सध्या वापरायची कशी ते शिकते आहे. विशेषतः आवाजावरून आज्ञा देणे पण फारसे जमलेले नाही परंतु प्रणाली खूपच उपयोगी आहे . विशेषत: मिडवेस्टमध्ये मैलोन् मैल गाडी हाकावी लागत असल्याने तर नक्कीच्.
लेख आवडला. आणखी येऊ दे.
नवीनच माहिती!
चारचाकीशी निगडीत अशी काही यंत्रणा आहे याचा आम्हाला पत्ताच नव्हता. एक तर आम्ही अमेरिकेत रहात नाही, आणि भारतातदेखील आमच्या मालकीची चारचाकी नाही, ही दोन प्रमुख कारणे यामागे असावीत!
पण लेख मात्र माहितीपूर्ण आहे. तसेच, काही उपक्रमींच्या स्वतःच्या मालकीच्या चारचाकी गाड्या आहेत, हीदेखील माहिती या लेखाच्या आणि त्याला आलेल्या प्रतिसादांच्या निमिताने आम्हास मिळाली व आनंद वाटला!
आमची चारचाकी विकत घेण्याची ऐपत येईल तेव्हा आम्हालादेखील हा लेख नक्की उपयोगी ठरेल असे वाटते!
आपला,
(भारतीय रेल्वेचा, महाराष्ट्रा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा, बेस्ट उपक्रमाचा, आणि एखाद दिवस चैन म्हणून फार फार तर रिक्षा करणारा प्रवासी!) तात्या.
जीपीएस
The children of Israel wandered around the desert for 40 years. Even in biblical times, men wouldn't ask for directions.
उपयुक्त लेख, वरूण. या तंत्रज्ञानाविषयी ऐकून होतो, आता ते ओळखीच्या लोकांच्या वापरात आले आहे, हे वाचून बरे वाटले.
भारतातही जीपीएस अतिशय प्रभावीपणे काम करते आहे. या जीपीएसचा अर्थ आहे 'गुड पीपल्स सजेशन्स'. 'गणपती चौक कुठेशी आला हो मामा?' ,'नृसिंहवाडी कोणच्या बाजूला राहिली हो मावशी?','फलटण किती लांब आहे हो दादा?' असा डेटा या सिस्टीममध्ये फीड करावा लागतो. मग प्रोसेसर डेटा फीडरला एकदा वरपासून खालपर्यंत न्याहाळतो. तोंडात तंबाखूचे पान किंवा मशेरी असेल तर तोंड मोकळे केले जाते आणि अघळपघळ सूचना दिल्या जाऊ लागतात...
'हितनं सरळ नीट नाकाम्होरं जायाचं बगा कोसभर. काय? तितं कोपर्याव बाबू फडतार्याचं दुकान दिसन. खताची झायरात हाय बगा पिवळ्या रंगाची दुकानावं. तितनं म्होरं गेला की खालच्या अंगाला पांडर्या रंगाचं द्येऊळ हाय मारूतीचं . लय कडक हाय हां मारूती. बायामान्सांची सावलीदिकून खपायची न्हाय. काय? द्येवळापास्नं खात्या हाताला वळाला की कृष्णामाई आलीच. फूल वलांडून पल्याड गेला की नरसोबाची वाडी. काय? आवं लई सोपं हाय. आंदळ्यालाबी सापडंल बगा. का द्येऊ कुनाला तरी संगट?'
सन्जोप राव
खाता हात, धुता हात! ;)
द्येवळापास्नं खात्या हाताला वळाला की कृष्णामाई आलीच.
बरं का संजोपमामा,
'खाता हात' अन 'धुता हात' हे सबुद म्हन्जी आमच्या आतरे सायबाची द्येन हाय बरं का! ;)
नाय, तशी चूभू द्यावी अन घ्यावी म्हन्तो म्या! पर आतरे सायबच असनार त्ये!
तुमी काय म्हन्ता?
वाईच आमची चंची ठ्येवल्ये नव्हं आक्षी सांबाळून? पुन्यात आलो की घीऊनच जाईन म्हन्तो! ताईसायबास्नी दंडवत कळवा बर्का आमचा. तात्या इचारत व्हता म्हनावं!
तात्याबा!
चांगला लेख
लेख चांगला आहे.
भारतात, टाटा टेक्नॉलाजीज हि कंपनी टाटा मोटर्स साठी सुद्धा असे काही बनवत आहे अशी ऐकिव माहिती आहे. नवीन इंडिका सोबत एक सिम कार्ड मिळते असे हि ऐकले आहे. याचा वापर करून आपण आपले वाहन कुठे आहे, अथवा काही संदेश पाठवून गाडी थांबवू शकतो. हि सर्व ऐकिव माहिती आहे.
धन्यवाद
सर्कीट, एकलव्य, प्रियाली, तात्याबा, रावसाहेब, चाणक्य सर्वांचे आभार!!
छान लेख
सोप्या भाषेतील सचित्र, माहितीपर लेख आवडला. 'उपग्रहाची सेवा वापरण्यासाठी अतिरिक्त रक्कम' हा गैरसमज दूर केल्याबद्दल विशेष धन्यवाद! अश्याच आणखी गोष्टींची ओळख करून द्या.
अवांतर - संजोप राव, तुम्ही सांगितलेल्या जीपीएसची मदत वेळोवेळी होत असते. या जीपीएसची "का द्येऊ कुनाला तरी संगट?" ही सेवा मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातच उपलब्ध आहे असे वाटते. मुंबईतला हा जीपीएस नेहमी 'बिजी' असतो आणि पुण्यात तर चालतच नाही म्हणे! महाराष्ट्रातील इतर भागात ही सुविधा कशी चालते याचा अनुभव नाही पण बरी चालत असावी. (कृ. स. ह. घ्या.)