विविध

१) "ऐपत" शब्दाची फोड
आपण 'ऐपत' हा शब्द आर्थिक क्षमता या अर्थाने वापरतो. त्याची फोड अशी :
ऐपत = ऐ + पत = आय + पत
आय म्हणजे उत्पन्न (उदा. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स).
पत म्हणजे बाजारांतून कर्ज (किंवा उधार) घेण्याची क्षमता. (इंग्रजी 'क्रेडिट्')

२)वाट पहाणे
वाट म्हणजे रस्ता. आपण एखाद्याची वाट पहातो म्हणजे त्याच्या येण्याचा रस्ता (किंवा रस्त्याकडे) पहातो.

३) सशाचा ठोसा
"सशाचा ठोसा" हे इंग्रजींत Rabbit Punch हा वाक्प्रचार आहे त्याचे (मी केलेले) मराठी भाषांतर.
ससा हा भित्रा प्राणी आहे असे म्हणतात. म्हणून एखाद्या भित्र्या माणसाचे वर्णन करतांना त्याचे काळीज सशाचे आहे असे आपण म्हणतो.
"सशाचा ठोसा" म्हणजे न्यूनगंडग्रस्त सशाने विचारपूर्वक सिंहाला ठोसा मारणे, सिंहाचे लक्ष गेले नाही तर आपण सिंहाला कसा ठोसा लगावला पण सिंहाची आपल्याला उलटून मारण्याची कशी हिंमत झाली नाही अशी इतरांपुढे फुशारकी मारणे, पण सिहाचे लक्ष गेले व तो रागावलाच तर त्याच्यापुढे "सहज गंमत केली हो. मी बापडा तुम्हाला काय मारणार?" म्हणून शरणागति पत्करणे.
न्यूनगंडाने पछाडलेल्या माणसाला जेव्हा कमीपणाची भावना असह्य होते त्यावेळी तो कुणा बलवत्तर माणसाला सशाचा ठोसा लगावतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

मजकुरांत भर

तीन दिवस झाले तरी एकही प्रतिसाद नाही व मजकुराची फारशी वाचनेही झालेली दिसत नाहीत. उपक्रमींचे लक्ष वेधून घेण्यांत व त्यांच्या विचारांना चालना देण्यांत मजकूर अपयशी ठरला आहे असे दिसते. (की उपक्रमी दुसर्‍या आघाडीवर लढण्यांत गुंतले होते?).

काहीही असो. प्रतिसादांचा भोपळा फोडण्यासाठी मी मूळ मजकुरांत खालील भर घालीत आहे.

आणखी काही व्युत्पत्ती
१) तटस्थ : तट म्हणजे संरक्षक भिंत किंवा कुंपण. तट-स्थ म्हणजे कुंपणावर स्थित म्हणजे बसलेला.
२) सहज : 'सह' म्हणजे बरोबर. 'ज' म्हणजे जन्माला येणारा. सह-ज म्हणजे बरोबर जन्माला येणारा, कुठल्याही विशेष प्रयत्नांशिवाय (एखाद्या गोष्टीबरोबर) आपोआप येणारा.

वा!

वावा शरदराव, तुम्ही दिलेल्या शब्दांच्या व्युत्पत्ती अगदी तर्कसंगत आहेत. आणखीही असतील तर कळवा.
आपला
(तर्कप्रिय) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

सहज

सहज आवडले!
सहज हा एक खास विषय आहे. ज्या गोष्टी सहजतेने घडतात त्या काही वेगळ्याचह् असतात!घज आलेल्या ताने सारखी.
सहज फिरायला जाणे वेगळे असते चालायला जाण्यपेक्षा...
'सहजतेने जगणे नि आपले असे सहज जगणे मान्य करणे' जमले की मग जमलेच सगळे!

काय म्हणता?
आपला
सहज लिहिणारा
गुंडोपंत

रॅबिट् पन्च्

सशाच्या ठोशाविषयी खालील व्युत्पत्ती मिळाली
Rabbit punch "chop on the back of the neck" so called from resemblance to a gamekeeper's method of dispatching an injured rabbit.
यावरून दिसते की सशाने मारलेल्या ठोशाऐवजी हा सशाला मारलेला ठोसा असावा

तट म्हणजे (नदीचा) किनारा. तटस्थ म्हणजे प्रवाहात पोहण्याऐवजी किनार्‍यावर उभा असलेला.

ऐपत = आय + पत हे (सद्गुरू) वामनराव पै अन्वय लावतात त्या पद्धतीचे वाटते, उदा. तथास्तु म्हणजे "तसाच तू" वगैरे.
मूळ शब्द उर्दू/अरबी/फारसी असणार पण मला शब्दकोशात अजून व्युत्पत्ती मिळाली नाही हेसुद्धा खरे.
बहुधा चित्तोपंत सांगू शकतील.
- दिगम्भा

सशाचा ठोसा

'सशाचा ठोसा' याचे मी दिलेले स्पष्टीकरण रॉबर्ट् थौलेसच्या " Straight and Crooked Thinking" या पुस्तकावरून घेतले आहे. सदर पुस्तक वादचर्चेत ज्या अप्रामाणिक युक्त्या वापरल्या जातात त्यांसंबंधी आहे.

वा!काय पण 'आ'कार लावलाय!

दिगम्भाजी 'आ'कार बाकी चांगला लांबलचक लावला आहे! तुमचा दमसास भन्नाटच आहे! जियो!तथास्तु!

तथास्तु म्हणजे तसेच होऊ दे(होईल),तसेच राहू दे(राहील) अशा अर्थी!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

आणखी काही व्युत्पत्ती

१) धंदा :
धंदा = धन्दा = धन + दा. धन म्हणजे पैसा. दा म्हणजे देणारा/री.
धंदा म्हणजे पैसा मिळवून देणारी गोष्ट.

२) भंगी :
भंगी म्हणजे भंग करणारा किंवा भंगलेल्या गोष्टी उचलणारा. (भंगलेल्या गोष्टी कचर्‍यांत टाकण्यात येतात किंवा कचर्‍यांत टाकण्यापूर्वी त्यांचे तुकडे केले जातात.)
प्रचलित अर्थ या विश्लेषणाशी काहीसा न जुळणारा आहे.

३) इंग्रजी शब्द foreign
foreign = fo(e) + reign ( 'e' चा लोप झाला असावा)
foe म्हणजे शत्रु
reign म्हणजे राज्य किंवा अंमल
foreign country ज्या देशांत शत्रूचा अंमल आहे असा देश.

मस्त.

कोर्डे साहेब,

व्युत्पत्ती आवडल्या .धंदा आणि भंगी हे तर फारच सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्थवाही

शरदराव,
तुम्ही दिलेल्या व्युत्पत्ती या अर्थाच्या दृष्टीने योग्य आहेत पण व्युत्पत्ती म्हणजे शब्द कसा तयार झाला यासंबंधीचे विवेचन असे वाटते. भाषेचे जाणकार याबाबत अधिक माहिती देऊ शकतील. पण तुम्ही अर्थाच्या दृष्टीने केलेला या शब्दांचा विस्तार तर्कसंगत आणि मनोरंजक आहे.
आपला
(अर्थान्वेषी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

छान व्युत्पत्ती आहेत!

कोर्डेसाहेब खरेच छान व्युत्पत्ती आहेत.
धंदा= धन देणारा ही व्युत्पत्ती तर खासच आहे.
फॉरेन ची व्युत्पत्तीही आवडली आणि पटलीही.
एक गंमत म्हणून त्याचा उच्चार ’फॉर्हेन’ असा केल्यास(काही लोक करतातही)त्याची व्युत्पत्ती ’फॉर हेन(कोंबडीसाठी ) असा होईल.

अजून एका इंग्लीश शब्दाची व्युत्पत्ती (news--- north-east-west-south) अशी होते.चारही दिशेने आलेल्या/जमवलेल्या बातम्या अशा अर्थी!

एक इंग्लीश शब्दप्रयोग आहे a bit allways remains! त्याची गंमत पहा!

ए काढल्यास बीट ऑलवेज रिमेन्स!(bit allways remains)

बी काढून टाकल्यास इट ऑलवेज रिमेन्स!(it allways remains)

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

अतिपरिचयात्

काही शब्द वापरून वापरून इतके गुळ्गुळीत झालेले असतात की त्यांची अर्थपूर्ण फोड आपल्याला जाणवतही नाही. असे काही शब्द :

१) पारंगत : 'पार' म्हणजे दुसरी बाजू किंवा दुसरे टोक. गत म्हणजे गेलेला. पारंगत म्हणजे टोकाला गेलेला किंवा पोचलेला.

२) करारी : (स्वतःशी किंवा दुसर्‍याशी केलेल्या) कराराप्रमाणे वागणारा.

३) नक्कल (कॉपी या अर्थाने) : न + अक्कल (जे करायला अक्कल लागत नाही ती गोष्ट)

४) नखरा : न + खरा (ज्यास्त स्पष्टीकरणाची जरूर नाही)

वा! मस्त!

शरदराव खरंच की आपण म्हणता आहात ते! रोजच्या वापरातले हे शब्द आज 'नव्याने ' कळले.येऊ द्यात अजून काही!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

ऐपत

दिगम्भा म्हणतात ते खरे आहे. ऐपत हा अरबी शब्द आहे, त्याचा संस्कृत 'आय' शी काही संबंध नाही.
धंदा हा उर्दू शब्द आहे.-त्याची व्युत्पत्ती संस्कृतपासून असती तर शब्द 'धनदा' झाला असता.
करार, करारमदार -अरबी शब्द. करारनामा, करारी -फार्शी. मराठीत करारीचा अर्थ करार पाळणारा असा होत नाही तर कडक किंवा तत्त्वनिष्ठ असा होतो.
नकल, नकल्या, अक्ल --तिन्ही अरबी शब्द. परंतु 'न' हा उपसर्ग अरबी नाही, त्यामुळे न + अक्कल = नक्कल हे योग्य नाही. मुळात अकल शब्दाचे मराठीत अक्कल झाले. दगडचे कुत्सितार्थे दग्गड होते तसे.--वाचक्नवी

काही शक्यता

वाचक्नवी यांस,
मला वाटतं
१) ज्या दोन शब्दांच्या संयोगाने तिसरा शब्द बनतो ते एकाच भाषेंतले असण्याची आवश्यकता नसावी.
२) नवीन शब्द बनतांना मूळ शब्दांतील अक्षराचा लोप होण्याची किंवा त्यांत उच्चाराच्या सोयीसाठी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) जगांतील अगदी भिन्न वाटणार्‍या भाषांमध्येही काही शब्द सारखेच असावेत.

शक्य आहे

तरीसुद्धा नक्कल आणि अक्ल यांचा काही संबंध असण्याची शक्यता कमी. तसेच ऐपत आणि आय. फारच थोड्या अरबी- फार्शी शब्दांत आणि संस्कृत शब्दांत सारखेपणा आहे. --वाचक्‍नवी

 
^ वर