वारस

वारस

एका विषयात मनातल्या किती गोष्टी उतरवायच्या, असं होतं. खरं तर याविषयी काहीतरी लिहावं हे बऱ्याच दिवसांपासून मनात होतं. आज दादाच्या जिज्ञाच्या झालेल्या आगमनाच्या फोननं त्याला एक नवी जाग दिली.

पित्याची शाल अन मातेची उब घेऊन येणारं हे अर्भक. या चिमुकल्या जिवाला आपण किती स्वरूपांत पाहत असतो! एकमेकांच्या असीम समर्पणाची पावती, घराण्याचा वारस, वंशाचा दिवा, आई- वडिलांच्या म्हातारपणाची काठी, सक्षम पालक म्हणवून घेण्यासाठीची पात्रता की अजून काही? की फक्त निसर्गाचा नियम म्हणून झालेलं प्रजनन? या सगळ्याचं स्वरूप कालानुसार, प्रसंगानुसार आपण ठरवणार असतो. ज्या ज्या घरात हा जीवरूपी प्रकाश पडत नाही, ती सगळीच घरे अंधाराने भरलेली आहेत असं समजायचं का? काही कारणांमुळे जिथे हा अंकुर फुटत नाही, तिथे समर्पणच नाही? का जिथे हा वारस नाही त्या घराणेशाहीचा लौकिक केवळ तो नसल्यानेच वृद्धिंगत होणार नाही?

आपल्या जिवासारखा दुसरा जीव निर्माण होणं, हा अनुभव लग्नरूपी बंधनातून आलेल्या दोन जिवांचे बंध अजून घट्ट करतो. पण काही कारणांमुळे असा जीव जन्म घेत नसेल, तर तो बंध अजून घट्ट व्हावा, हीच तर काळाची अपेक्षा नसते?

हे इवलेसे रोप रुजविण्याच्या आधीच त्याचे भांडवल करून किती जीव नागविले जातात? मूल होणार नाही हे कळल्यावरसुद्धा किती कुटुंबांतले लोक आपल्या सुनेविषयी, ती मांडवात होती त्या वेळेइतकेच प्रेम, आदर किंवा कौतुक बाळगतात! शिक्षणाने संपन्न झालेले आम्ही, केवळ या एका गोष्टीला फ्लॉ समजून "नवीन आई' या पर्यायी व्यवस्थेपर्यंत जातो. "तू त्याला मूल देऊ शकत नाही म्हणून तो असा वागत असावा" असे सांगणारी सासू जर एखाद्या सासुरवाशिणीची आई असती, तर इतक्‍या सहज आपल्या मुलाच्या या भावी पराक्रमाचे समर्थन करू शकली असती काय? मुलगा, सून, अन्‌ नातवंडांचे वर्षो न्‌ वर्षे तोंड न पाहिलेली, एकाच गावात असून मुलेसुनांची वेगवेगळी घरे असणारी जाणकार, बुजुर्ग माणसेदेखील "अजून नाही का काही?''
हे असले वयस्कर प्रश्‍न विचारून त्या जोडप्याबद्दलची हिणवणूकवजा काळजी चारचौघांत व्यक्त करतात.

हे प्रश्‍न आणि मानवी मनाच्या अपेक्षा इथेच संपत नाहीत. अनेक वर्षं अपत्यासाठी प्रतीक्षा करत असलेलं कुटुंब किंवा त्या कुटुंबाचे सो कोल्ड हितचिंतक आपले जाहीर अन्‌ निरागस मत मांडतात... "काही असो बाबा, लहान मूल घरात आलं, पाळणा हलला म्हणजे भरून पावलं...'' मग हाच नियम अंतिम व कायम का जोपासला जात नाही. काल पर्यंत काहीही व्हावं अशी दैवाकडे माफक अपेक्षा करणारे आम्ही... "आता तरी ह्या खेपेला तुम्हाला मुलगा होईल बरं का..."
अशी सदिछचा व्यक्त करतो. दुसरयाने सांगण्याचे सोडा काही घरात तर चार चार मुली केवळ मुलगा होत नाही ह्या कारणाने केवळ प्रतीक्षा यादी म्हणुन येतात. ’सरस्वती’ विद्येचे आणि ’लक्ष्मी’ हे संपत्तीचे मुख्य दैवत माणणारया देशात ४८ टक्के मुलींना आपण मुलगा असायला हवे होते असे वाटायला लावणारी कसली ही पालनशैली? याला काही हौशि किंवा सुज्ञ कुटुंबप्रमुख अपवाद असतीलही पण आज हा प्रश्न नको तेवढा बिकट आणि भयानक होतोय. गर्भलिंग तपासणी करणारे डॉक्टर आणि त्यांच्याभोवती निर्माण होणारी गर्दी पाहून या दोघांच्याही दुटप्पीपणाची चिड येते.

नुकत्याच झालेल्या आरोग्यविभागाच्या पुरस्कार कार्यक्रमात स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी आणि जाणकारांनी यांवर चिंता व्यक्त करुन आता कठोर पावले उचलण्याची वेळ आल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ उदरभरणाचे साधन नसून त्याच्या साह्याने योग्य अणि अयोग्य यांतील भेद ओळखन्याची नवी द्रुष्टी प्राप्त होत असते. आजही आपल्या समाजात डॉक्‍टर हा शिक्षणातील राजा मानला जातो. दवाखान्यांबाबत सामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. स्वतः पालकांच्या सहभागाशिवाय असे प्रकार घडणे शक्‍य नाही; पण तरीही एक जबाबदार घटक म्हणून डॉक्‍टरने आपली खरी भूमिका बजावणे क्रमप्राप्त आहे. आपल्या पांढऱ्या शुभ्र कोटावर केवळ दोन पैसे जास्त मिळवता येतील म्हणून एवढा मोठा डाग लावून घेणे, ही या प्रतिष्ठित व्यवसायासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. सुदैवाने, कानावर बंदूक टेकवून "करतो की नाही हे काम?' अशी परिस्थिती या शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात डॉक्‍टरांवर अजून तरी आलेली नाही.

यासाठी कायदा जरी असला तरी खरा संबंध आहे तो भावनेशी. कायद्याने फार तर भीती वा जरब निर्माण होईल; पण त्याने अंतरीच्या जाणिवा जागृत होतीलच याची शाश्‍वती नाही. तसे झाले तर बंटी काय किंवा बबली काय... सारखेच! अगदी नशिबाने किंवा नियतीने दोघांनाही नाकारले तरीही उभयतांमधले नाते हे मात्र राजा-राणीचेच राहावे, ही अपेक्षा.

सुनील चोरे - पुणे, (बेल्हे)
sunilchore@rediffmail.com

(मूळ प्रकाशन ’सकाळ’-२८ एप्रिल, ’लोकमत’-२६ एप्रिल, ’सामना’-७ मे २००७)

लेखनविषय: दुवे:

Comments

भयानक...

आपण अत्यंत योग्य शब्दात हा विषय मांडल्याबद्दल आभार.
स्त्रिलिंगी अर्भकांची हत्या ही भारताच्या सडक्या-कुजक्या मानसिकतेचे प्रतीक आहे असे मी मानतो.
"तुम्ही कोण शहाणपणा शिकावणारे? ज्याचे जळते त्याला कळते" असे म्हणून स्वतःच्या(!) मुलींना(!!) गर्भातच अथवा जन्मल्यानंतर ठार करणार्‍या नराधमांना फाशीच दिले पाहिजे. - हे पहिले मत.
आणि त्यांच्यावर अशी वेळ येऊ देणार्‍या समाजानेही आता आपल्या महान वगैरे संस्कृतीच्या पोकळ गफ्फा मारणे बंद करावे.- हे दुसरे मत.

प्रत्येक भारतीय नागरीक (माझ्यासकट) हा आदर्श विचार आणि भ्रष्ट आचार असलेला एक दुभंग व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. जन्मतः तो तसा नसतो, पण भारतातील परिस्थिती त्याला तसा बनवते.

सहमत...

विसुनानांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत!

आपला,
(लाजेने मान खाली गेलेला) तात्या.

सही

पण हा पाळणा रात्रभर मूल केकाटत असताना हलवण्याची जबाबदारी बाळाच्या वडिलांना द्यावी.
सर्व घरांत एका पेक्षा अधिक मूल होणार नाही ह्याची हमी मी देतो.

सही...!

आपल्याअंगाला आंच लागली की कळतं हेच खरं

आपला
गुंडोपंत

तर्पण आणि भारतीय डुक्कर

अरे भोxxxxx, (कितीही संयम ठेवायचा म्हटले तरी असल्या धर्माला...) तुमच्या पितरांचे आत्मे वगैरे जर पुनर्जन्म घेतात तर मग त्यांचे तर्पण कशाला? ते कुठेतरी उकिरड्यावर चरत आहेत.
तर्पण करण्यासाठी मुलगा हवा म्हणून मुलींना ठार कराल तर तुमचे यच्चयावत पितर (भारतातील) डुक्करांच्या जन्माला जातील.

हा धर्म आता अमुलाग्र बदलायला हवा. हे धर्मपांडू लोक मंदिराऐवजी नवा धर्म का उभारत नाहीत? असा धर्म की ज्यात जे हवे तेवढेच असेल आणि जे नको ते मुळीच नसेल. धर्मांचे अनेक प्रयोग झाले आहेत आणि त्याचा विदाही उपलब्ध आहे. त्यामुळे आदर्श धर्म निर्माण करणे या बिनकामाच्या माणसांना सहज शक्य आहे. तेवढे एकच महान कार्य ते का करत नाहीत?

अजून नाही का काही?

अजून नाही का काही? ही आपणा सर्वांचीच मानसिकता नाही का?

  • ग्रॅज्युएट झालास, नोकरी मिळत्ये की अजून नाही का काही?
  • नोकरी मिळाली, मुली/ मुले सांगून यायला लागल्या का नाही अजून?
  • मुली / मुलगे सांगून येतात पण तुझ्याशी लग्नाला तयार होतात की नाही अजून?
  • लग्न झालं, वर्ष उलटायला आलं अजून नाही का काही?

थोड्याफार बदलाने आपण इतरांना हा प्रश्न कधीनाकधी विचारत असतो. आप्तांना विचारलेला प्रश्न कदाचित आपुलकी किंवा काळजीतून येतो परंतु परक्यांना विचारण्यात बरेचदा भोचकपणाच जास्त असतो. जो पर्यंत 'इतरांच्या घरात डोकावून आनंद लुटण्यात मजा असते' ही विचारसरणी दूर होत नाही तो पर्यंत 'अजून नाही का काही?' हा प्रश्न ऐकू येतच राहिल.

बाकी राहिली मुली जन्माला न घालण्याची मनोवृत्ती. तिचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. दुर्दैव इतकेच की त्या दुष्परिणामांचे बळीही मुलीच ठरण्याची शक्यता आहे. मध्यंतरी या विषयावर एक थोडी भडक कथा असलेला 'मातृभूमी' हा चित्रपट येऊन गेल्याचे वाचले होते.

"काही असो बाबा, लहान मूल घरात आलं, पाळणा हलला म्हणजे भरून पावलं...''

याच्या पुढचा विचार म्हणजे हे वाक्य तरी अंतिम का? नाही हलला पाळणा तर घेऊ एखादे अर्भक दत्तक. आपले म्हणून वाढवू तो जीव. त्याला माया लावू, आपलं ते देऊ, मोठं करू. आपल्या देशात अशा अनेक बालकांना चांगल्या घराची आणि मातापित्यांची गरज आहे आणि सुदैवाने त्यातील एक होण्याची संधी आपल्याला मिळाली आहे तेव्हा मूल दत्तक घेऊ आणि चांगला मनुष्य मोठा करू हा विचार का नाही जोपासला जात?

सही सवाल.

मॅडम ,

काय बात है,व्हेरी गुट. काय भारी प्रश्न विचारले बघा तुम्ही .मी नमस्कार करुन राह्यलो पहा तुम्हासनी. दिस्तेत का महे जोडेल हात तुम्हाला.

आई, बाप, आ़जी, आजोबा होण्याअगोदर माणूस व्हायला हवे.

तुम्हा सर्वांचे आभार, तुम्ही वेळ देवून लेखाचे वाचन व विवेचन केले आणि ह्या एका नाजूक विषया प्रती आपल्या भावना मांडल्या. खरतर ह्यामुळे एक जरी जीव मग तो लहान अर्भकाचा असो वा मूल होत नसलेल्या भगीनीचा असो...तो वाचला तरी माझ्या लिहीण्याचे सार्थक होईल. आणि ज्याप्रकारे या याला समाजाच्या अनेक स्तरांवरून प्रतिसाद येतोय त्यावरून मला नक्कीच असे वाटतेय कि माझे प्रयत्न कुठेतरी कामा येतील!

उदाहरणादाखल सांगतो..वहिनी ने गावी आमच्या कामवालीला हे वाचून दाखविले, तिला तिनही मुली आहेत, वहिनी म्हणाली लेख संपला आणि तिच्या डोळ्यातून घळा-घळा अश्रू आले. यांवरूनच कळून येते की तिला घरून किंवा समाजातून काय्-काय अनुभव आले असतील. काही अविचारी नवरयांनी अथवा सासवांनी हे वाचले असेल तर कुठेतरी ते चुक-चुकतीलच.

आई, बाप, आ़जी, आजोबा होण्याअगोदर माणूस व्हायला हवे.

----सुनील....

 
^ वर