... मग त्यांनीच बनवला रस्ता !

बिकट वाट- वहिवाट अशी त्या गावांची अवस्था होती. या वाईट अवस्थेवर आपण मात करायची, असे तीन गावांमधील लोकांनी ठरवले आणि त्यातून उभे राहिले एक आदर्श काम. आपल्याच गावांमधील रस्त्याच्या कामासाठी एकाच ग्रामपंचायतीची तीन गावे एकत्र आली आणि या गावांमधील लोकांनी आपले रस्ते बांधून काढले.

ही गोष्ट आहे वेल्हे तालुक्‍यातील मोहरी, सिंगापूर आणि एखलगाव या गावांची. ही गावे हरपूड ग्रामपंचायतीत येतात. दुर्गम भागातील या गावांमध्ये प्रत्येकी 20 ते 25 कुटुंबे राहतात. हरपूड गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर चढ-उताराच्या वाटेने या गावामध्ये चालत जावे लागते. एसटीची सेवा केवळ हरपूडपर्यंत असून, पुढच्या गावात जाताना चालतच जावे लागते.

पावसाळ्यात प्रचंड पावसामुळे पासलीपर्यंतच एसटी धावते, पुढे गुडघाभर चिखलातून वाट काढत गावकऱ्यांना चालतच आपल्या गावी जावे लागते. या गावांना जोडणारे रस्ते वाईट अवस्थेत होते, त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुचाकी कशीतरी या रस्त्यांवरून जाऊ शकायची; पण पावसाळ्यात मात्र एकही वाहन या रस्त्यांवरून जाऊ शकायचे नाही, अशी रस्त्यांची अवस्था. गावाजवळ मोठे रुग्णालय नसल्याने अचानक कोणी आजारी पडले, तर त्याची दुर्दशा फारच व्हायची.

खराब रस्त्यांवरून त्या व्यक्तीला डालात घालून पासलीच्या रुग्णालयात न्यायचे म्हणजे मोठी कसरतच; शिवाय त्याच्यावर उपचार सुरू होईपर्यंत जीव टांगणीला लागलेला. रस्ता खराब असल्याने रुग्णांचे हाल व्हायचेच, शिवाय वेगावरही मर्यादा यायच्या. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे डॉक्‍टरही या गावाकडे फिरकायला नाखूषच असायचे. सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम घडवणारी गोष्ट म्हणजे या गावातील रस्ते. त्याचा परिणाम गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही व्हायचा. प्राथमिक शाळेत शिकवायला येणाऱ्या शिक्षकांना या गावांमधील शाळा ही एक शिक्षा वाटायची, ती रस्त्यांमुळे आणि दळणवळणाच्या गैरसोयीमुळेच.

या गावांमधील मुले इतरत्र शिकायला गेली तरी हीच समस्या. वर्षानुवर्षे या अवस्थेत काढल्यानंतर गावकऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्याला कोणीच आयते रस्ते बांधून देणार नाही, त्यासाठी कष्ट आपल्यालाच करायचे आहेत. ही गोष्ट गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत मांडली. ग्रुप ग्रामपंचायतीतील सदस्यांनाही या गोष्टीची जाणीव होती, त्यामुळे लोकांच्या उत्साहाला आणि रस्त्याच्या कामाला खतपाणी कसे घालता येईल, याकडे लक्ष द्यायला सुरवात केली; तेव्हा असे लक्षात आले, की राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक विकासाची कामे होत असतात.

त्यामधून रस्तेबांधणी, पाणलोटक्षेत्र विकासासारखी अनेक कामे होतात. आपल्याकडचे रस्तेही खराब आहेत आणि आपल्या हातांना कामही हवे आहे, आपणच रोजगार हमी योजनेंतर्गत आपल्या गावातील रस्त्यांचे काम केले, तर दोन्ही गरजा पूर्ण होतील. या विचारातून एक चांगले काम उभे राहिले. मोहरी, एखलगाव आणि सिंगापूरच्या रस्त्यांसाठी आपण श्रमदान करायचे, असे गावकऱ्यांनी ठरवले. त्याला ग्रामपंचायतीने साथ दिली. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू झाले.

रस्त्याच्या बांधकामाचे स्वरूप भिन्न होते. मिळणारा निधी पंचायतीचा आणि श्रम गावकऱ्यांचे. रोजगार हमी योजनेंतर्गत काम केल्याचा दुहेरी फायदा या गावांमधल्या ग्रामस्थांना झाला. त्यांच्या गावचा रस्ता पक्का होऊ लागलाच, शिवाय गावातल्या गरजू लोकांच्या हाताला सरकारतर्फे कामही मिळाले. एखलगाव, सिंगापूर आणि मोहरी या गावांमधल्या जवळजवळ 50 लोकांना रस्त्याच्या निमित्ताने उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. सिंगापूर ते पासली हा पाच किलोमीटरचा रस्ता ग्रामस्थांनी बांधून पूर्ण केला आहे.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या भागातील बांबूसारखे उद्योगधंदेही चांगले चालू लागतील, असे गावकऱ्यांचे मत आहे. आपल्या प्रतिकूलतेवर आपणच मात करायची असते, ही गोष्ट या ग्रामस्थांकडून शिकण्यासारखी आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

हे सिंगापुर - ते सिंगापोर

एखलगाव, सिंगापूर आणि मोहरी गावच्या लोकांचे आणि हरपुड ग्रामपंचायतीचे अभिनंदन.
भारतातील समस्त खेड्यांनी स्वकष्टाने विकास कामे हाती घेतली आणि तडीस नेली तर त्यांचे सिंगापोर व्हायला वेळ लागणार नाही.

(अवांतर - १. अजूनही या खेड्यांमध्ये वीज नाही असे कळते. सिंगापुरात प्राथमिक शाळा कागदावरच अस्तित्वात आहे. हे खरे आहे काय?
२.पुण्याबाहेरील महाराष्ट्रवासियांसाठी ही गावे पुणे जिल्ह्यात आहेत असे नमूद करणे गरजेचे आहे.)

सुंदर..

शिल्पाताई, लेख सुंदर आहे. फक्त एकच सुचवावेसे वाटते की आता जरा दोनचार दिवस तरी ब्रेक घ्या बुवा! :)

तात्या.

ब्रेक नकोय !

तुमचे लेख छान आहेत. प्रतिसाद त्यामानाने कमीच आहेत. पण लेख माहितीपुर्ण आहेत.
अशी माहिती सहसा कुठे(महाजालावर) वाचायला मिळत नाही . अश्याच आगळ्या प्रयोगांबद्दल आणि अश्याच काही संस्था व व्यक्तींबद्दल सुध्दा वाचायला निश्चीतच आवडेल.

विनंती आहे की, जो पर्यंत लिहीण्यासारखे काही शिल्लक असेल तो पर्यंत ब्रेक नकाच घेऊ !

नीलकांत.

ब्रेक नको.

ज्यांना वाचायचे नाही त्यांना न वाचण्याचा पर्याय आहेच. मात्र ज्यांना वाचायचे आहे त्यांचा वाचण्याचा हक्क असा ब्रेक घेऊन हिरावून घेऊ नका.

हक्क

ज्यासनी 'ब्रेक लावा' असा फुकटचा सल्ला द्याचा हाये त्येंचा ह्यो फुकटचा सल्ला देन्याचा हक्कबी असा हिरावू घेऊ नका :-)

ब्रेक नको पण सहभाग हवा

शिल्पाताई,

तुम्ही सातत्याने टाकत असलेले लेख चांगलेच आहे पण उपक्रम हे संकेतस्थळ लेखक-वाचकांच्या देवाणघेवाणीवर चालते याकडेही लक्ष पुरवा. (तुम्ही ते तसे केले नाही म्हणून बिघडते अशातला भाग नाही पण केलेत तर लेखांना अधिक वजन येईल.) लोक ज्या शंका काढतात, प्रश्न विचारतात त्याचे निराकरणही करत जावे. तसे झाले नाही तर बरेच सदस्य या लेखांना गांभीर्याने घेणार नाहीत किंवा लेखिकेला आपल्या प्रतिसादांत काडीमात्र रस नाही असे समजून कंटाळून जातील.

वर्तमानपत्रातील छापलेले लेख आणि वैचारिक देवाणघेवाणीवर बांधणी केलेल्या संकेतस्थळावरील लेख यांत फरक असावा असे वाटते.

असो... स्वयंसिद्ध गावकर्‍यांची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

सहमत पण.

सहमत,
नवलेखकांचा हिरमोड होऊ नये म्हणून बोलवत नव्हते,पत्रकार असल्यामुळे त्या एकदा बातमी लावून गेल्या की, पून्हा तिकडे पहाणे नको. अशा सरावामुळे कदाचित तसे होत असावे,पण त्यांनी याच लेखाच्या बाबतीत विचारांची देवाणघेवाण करावी असे नव्हे तर सदस्य म्हणून इतर लेखांवरही ,शेरे,टवाळक्या,माहितीपूर्ण प्रतिसाद द्यावेत असे मला ही वाटते.पण असे सांगणारा मी कोण ?याचीही एक चिंता आहेच. किंवा

शिल्पाजी,
लेख आवडला,गावक-यांचे अभिनंदन.

असे म्हणून पून्हा दुस-या लेखाची वाट पहाणे. त्या जर विचारांची देवाण घेवाण करणार नसतील तर हा एक पर्याय चांगला वाटतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहिती महत्त्वाची

उपक्रमी मित्रांनो,
प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

माझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.

आपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे नविन सदस्यांना समस्या येणार नाही.

 
^ वर