तर्कक्रीडा:३२: साटेलोटे

.....श्री. आणि सौ.लोखंडे (काळाराम चौक,नाशीक) यांना दोन पुत्र आणि दोन कन्या आहेत. त्या चौघांची हाक मारण्याची नावे दोन अक्षरी असून ती विपू , विजू , विसू आणि विनू अशी आहेत.
.....श्री आणि सौ पितळे (शिवाजीनगर,पुणे ) यांनाही दोन मुलगे आणि दोन मुली आहेत.त्या चौघांना संबोधण्याची दोन अक्षरी नावे विपू , विजू , विसू आणि विनू अशीच आहेत.एकाच घरात सारख्या नावांची दोन मुले निश्चितच नाहीत.
..... लोखंडे, पितळे कुटुंबांतील या सर्व मुलांची मूळ तीन अक्षरी नांवे विपुल,विपुला ; विजय, विजया ;विश्वास,विस्मया आणि विनय,विनया यापैकीच आहेत.
.....एका वधुवर मेळाव्यात हे लोखंडे,पितळे कुटुंबीय परस्परांस भेटले. तिथे एकमेकांचा परिचय होऊन चार लग्ने ठरली. लोखंडे कुटुंबातील दोन मुली पितळ्यांकडे द्यायच्या; तर पितळ्यांच्या दोन मुली लोखंड्यां कडे सुना म्हणून आणायच्या असे ठरले. वधूवरांच्या जोड्या निश्चित झाल्या.
.....या जोड्यांत कोणताही वर आणि त्याची नियोजित वधू यांची दोन अक्षरी नांवे सारखी नव्हती.
विपुला लोखंडेच्या वराचे दोन अक्षरी नाव आणि विश्वास पितळेच्या वधूचे दोन अक्षरी नाव सारखेच होते.
.....विनया पितळे हिने "मी नोंदणी पद्धतीनेच विवाह करीन" हा निश्चय ठामपणे मांडला.दोन्ही कुटुंबांनी तो आनंदाने मान्य केला. एवढेच नव्हे तर चारही लग्ने नोंदणी पद्धतीने करावयाची असे ठरवून या दोन परिवारांनी विवाहपद्धतीतील सुधारणांच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले.
..... तर दोन्ही कुटुंबांतील मुला-मुलींची तीन अक्षरी नावे शोधून काढा.आणि नियोजित वधुवरांच्या जोड्या लावा.
*************************************************************************
(कृपया उत्तरे व्यनि. ने)

)

लेखनविषय: दुवे:

Comments

मिळाले का?

उत्तर/प्रश्न मिळाले का?

काहीतरी घोळ

जमले तितके उत्तर पाठवले आहे. सोबत एक शंकाही व्यक्त केली आहे. ;)

काहीतरी गडबड वाटत आहे..

विपुला लोखंडे, विश्वास पितळे यांची नावे देताना काही गल्लत तर नाही ना झाली?

चू.भू.द्या.घ्या.

अभिजित
संस्थापक-संचालक
मनमीत वधू-वर सूचक केंद्र,
कवठे महांकाळ

असेच

म्हणतो. थोडासा घोळ आहे.

काहीतरी गडबड आहे.

अथवा मी तेवढा हुषार नाही.

तर्क.३२:साटेलोटे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना आणि वरदा यांनी लावलेल्या वधुवरांच्या सर्व जोड्या अचूक आहेत. अभिनंदन! श्री. विसुनाना म्हणतात,"कोडे छानच रोमँटिक आहे."

तर्क.३२.साटेलोटे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तो यांचे उत्तर आले. नियोजित वधुवरांच्या चारही जोड्या शोधून काढण्यात ते यशस्वी ठरले आहेत.त्यांचे अभिनंदन!
.......यनावाला.

नाही येत

काही तरी समजण्यात गडबड होते आहे .....
उत्तर लवकरच द्या

तर्क.३२: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
विपुला लोखंडे हिच्या वराचे नाव काय असेल?

.....*विपुल पितळे नाही.कारण दोघे 'विपू' होतील.
.....*विनय पितळे नाही. कारण विनया पितळे ही मुलगी. एकाच घरात दोन 'विनू' नाहीत.
.....*विश्वास पितळे नाही. कारण या दोघांच्या जोडीदारांची नावे 'विसू' आणि ' विनू' अशी वेगवेगळी होतील.(ती सारखी आहेत असे दिले आहे.)
.....*म्हणून विपुला लोखंडेच्या वराचे नाव " विजय पितळे" च असले पाहिजे.(विजू)
.....* यावरून "विश्वास पितळे" च्या वधूचे नाव "विजया लोखंडे' च.(विजू)
.....* आता उर्वरित जोड्या ठरवणे अगदी सोपे आहे.
श्री, विसुनाना यांनी पाठविलेले उत्तर असे:
उत्तर असे-

चि.सौ.कां.विपुला लोखंडे - चि.विजय पितळे
चि.सौ.कां.विजया लोखंडे -चि. विश्वास पितळे
चि.विनय लोखंडे- चि.सौ.कां.विपुला पितळे
चि.विश्वास लोखंडे- चि.सौ.कां.विनया पितळे

पण यांत विस्मया हे नाव नाही.

मी ते ही नाव जमेस घेतल्याने दोन मुले आणि दोन मुली यांच्या जोड्या करणे अशक्य झाले.

असेच

विस्मया व विपुल दोन्ही नावे अनावश्यक होती हा छिन्न(!) इशारा ध्यानी आला नाही.

छिन्न

छन्न(!) इशारा, :) पण आपली उत्तरे नक्की छिन्न-भिन्न झाली.

सही गुगली !!

वाह काय गुगली आहे !!

कोड्यात काहीतरी गोम आहे हे कळत होते, त्यामुळे अनेक वेळा कोडे वाचले, पण एक निरागस वाटणारे वाक्य "सर्व मुलांची मूळ तीन अक्षरी नांवे विपुल,विपुला ; विजय, विजया ;विश्वास,विस्मया आणि विनय,विनया यापैकीच आहेत" त्यानेच विकेट काढली !!

मजा आली

असेच...

आता कोठे या कोड्यातून बाहेर पडतो आहे...

(चक्रव्यूहात फसलेला) एकलव्य

झकास

उत्तर कळल्यामुळे अजुन छान वाटत आहे.

 
^ वर