नावात काय आहे?

नावात काय आहे? असं आपण अनेक वेळा ऐकतो. पण ८० वर्षाच्या म्हातार्‍या आजोबांचं नाव किशोर, राहूल, चिन्मय, मानस, तेजस, आशूतोष, किंवा महिर कसं वाटेल? किंवा ८० - ८५ वर्षाच्या आज्जीचं नाव प्रिया, पिंकी, तनीशा, अंजली, मीनल, सायली, संजना कसं वाटेल?

लेखनविषय: दुवे:

Comments

अजून यौवनात मी...

अजून यौवनात मी...असे वाटेल आणि ते एका अर्थी चांगले पण आहे. (जो पर्यंत त्यात म्हातारचळ वाटणार नाही तो पर्यंत!)

गंमत वाटेल.

जसे लहान मुलामुलींची नावे तात्याराव,आबासाहेब,गोदाअक्का,लक्षुमीबाई वगैरे ऐकताना कसे वाटते? तसेच म्हातारपणी पिंकी आजी,प्रिया आजी किंवा मानस आजोबा,तेजस आजोबा असे ऐकताना वाटेल. मुलीचे नाव निदान लग्नानंतर बदलता येऊ शकते(बदललेच पाहिजे असा कायदा नसला तरीही) तसे मुलाचे नाव बदलले जात नाही. त्यामुळे लहानपणी/तरूणपणी एक नाव आणि म्हातारपणी दुसरे नाव(वयाला शोभतील अशी) ठेवण्याची नवी पद्धत सुरु करायला काहीच हरकत नाही. ह्या निमित्ताने लोकांना जन्मभर चिकटलेली(न आवडलेली) नावे बदलण्याची आयतीच संधी मिळेल. कशी आहे आयडियाची कल्पना?

हे हे हे

पल्लवी आज्जी.... कसं वाटतं?

नावावरुन लिंगबोध

पण जेव्हा प्रांजल, किरण,सुहास,प्रितम,सविता, शिरिष ही नावे मुलांची आणि मुलींची पण असतात मग त्यांचे आजी आजोबाकरण करताना अगोदर लिंग माहित पाहिजे. हल्ली प्वॉर कंच आन् पोर कंची वळखायला लई औघाडे.

प्रकाश घाटपांडे

बंगाली नावे

ही इतकी नाजुक नावे आपल्याकडे बंगाली कादंबर्‍यांमधून आली. सीकेपी सारस्वतांनी ती रूढ केली. फार पूर्वी चिं. वि. जोश्यांनी अशा नावांवर गर्भित टीका करणारे विनोदी लेखन केले होते. त्यांच्या पुस्तकात नाजुक नाव असलेल्या एका वृद्ध स्त्रीचे चित्रही होते. आपल्याकडे 'नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा ' अशी म्हण आहेच.
मुळात महाराष्ट्रात सविता, रश्मी, सुमन असली नावे मुलग्यांना ठेवायची पद्धत नाहीच. प्रांजलसुद्धा अगदी गुजराथी वाटते. किरण, शिरीष मात्र फार आढळते.
पुरुषांच्या नावापुढे राव ,काका, पंत, साहेब, आजोबा इत्यादी लावून काम भागेल. पुढील काळात पल्लवीआजींनाही चालवून घ्यावे लागेल. तसे म्हटले तर, आपल्याकडे हाक मारताना मोठ्या वयाच्या व्य़क्तीचे नाव घेणाची पद्धत मुळातच नाही. त्यांच्या गैरहजेरीतच नावापुढे आदरार्थी उपपद लावण्याचा प्रसंग येतो. त्यामुळे उपपदासकट नाव ऐकण्याचा प्रसंग क्वचितच येणार! लता मंगेशकरांचे वय कितीही झाले तरी त्या जनतेसाठी लताच असतील. पण त्यांना तोंडावर नुसते लता कोणीही म्हणणार नाही.--वाचक्नवी

वेळे सोबत

आपल्याला ही नावे सहसा नव्या पिढीला दिलेली दिसतात. पण ही पिढी जेव्हा वृध्द होईल तेव्हा त्यापुढील पिढीला ह्या नावांना भारदस्त वलयाची सवय पडेल. स्नेहलमावशी किंवा पल्लवी आत्या आताच आहे. त्यापुढच्या पिढीला स्नेहलाआजी किंवा पल्लवीआजी म्हणायला काहीच हरकत नसनार आहे.

खरं कारण असं आहे की ही नविन नावे आपण लहान मुलांची किंवा आताश्या तरूण असलेल्या पिढींची म्हणुन ओळखतो. 'केवळ आपल्या मते' त्यांना भारदास्तपणा नाहिये, जसा मनोहरराव , विलासराव, वासुदेवराव, लक्ष्मीबाई, अनुसया, देवकी या नावांना आहे.

हे सगळं सापेक्ष आहे असं नाही वाटत?

लहान मुलं आपल्या सोईसाठी असं टोपण नाव शोधुन काढतात हे खरं आहे.
मला मामा म्हणजे आजोळीच्या गोतावळ्यात जवळचे सहा मामा आहेत. लहान असतांना सलग त्यांचे लग्न झाले. दर उन्हाळ्याला घरी नविन लग्न असायचे. नविन मामी आणि त्यांचे नवे नाव. भलताच गोंधळ वाढायचा. मग आम्ही उपाय काढला. की मामाचं नाव घ्यायचं आणि समोर मामी लावयंचं. जसे गजाननमामी , चंदुमामी.

आता हे आठवून आम्ही भरपुर हसतो. मात्र त्यावेळी आमच्या या उपायावर मामालोक का दचकायचे हे समजायचे नाही.

नीलकांत

 
^ वर