तर्कक्रीडा ३०:शाब्दिक(पुन्हा एकदा)

तर्क.२० प्रमाणेच इथे पद्यरूपात शोधसूत्रे (क्लुज) दिली आहेत.शब्दाचा अर्थ सूत्रात आहेच. अक्षरांची संख्या कंसात आहे.
उत्तर कृपया व्यनि. ने पाठवावे.
............................................................................

(१) करा आंदोलन जया काल वाहे |.....(४)
(२) मम सासू होईल शांत काय ? |...(४)
(३) ती वरे कोणत्या नक्षत्रा ?|...(३)
(४) कर हा कानी नीट ठेवूनी | बाधक अर्था घ्यावे ध्यानी |....(५)
(५) यानाच अशी प्रार्थना कशी ? |.....(३)
(६) असे विप्राच्या गळीं का न जावे ? |...(३)
(७) भारी दानव जर बदले तर |....(५)
(८) मोठेपण हे ऐसे ,कैसे सांगा मिळेल हा नमता ? |....(४)
(९) रमणी धन लाभतसे आर्जव हे खासे|.....(५)
(१०) अपेष्टा दु:ख हे व्हावे | तयाना मात्र बदलावे.|....(३)
(११) अशी कशी ही सोशिकवृत्ती |बदले काही हशील नसता |
(१२) हवातसा अन आवडीचा परी 'म'ला न संपत कैसा ? |
लेखनविषय: दुवे:

Comments

७,९,१२

प्रश्न् क्रमांक् ७, ९, १२ मध्ये काही त्रुटी नाहीत ना?
१२ मध्ये न ऐवजी ना हवे का? ना आहे असे धरून उत्तर दिलेले आहे. प्रश्न योग्य आहेत असा निर्वाळा दिला की अधि़क विचार करायला बरे. इतर सर्व उत्तरे कळवली आहेत.


राग येतो?- जोगिया असू दे

त्रुटी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
नाही. टंकलेखनदोष दिसत नाहीत. मात्र क्र.(११) आणि (१२) या शब्दांतील अक्षरसंख्या द्यायची राहिली. ती पुढील प्रमाणे हवी
(११) अशी कशी ही सोशिकवृत्ती बदले काही हशील नसता ?.....(६)
(१२) हवातसा अन आवडीचा परी मला न संपत कैसा?......(५)

या त्रुती निदर्शनाला आणून दिल्या बद्दल धन्यवाद.

तर्क.३०.उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.जगन्नाथ यांचे उत्तर सर्वप्रथम आले. त्यांनी बाराही शब्द अचूक शोधले आहेत. किंबहुना शब्द क्र. ११, १२ यातील अक्षर संख्या दिली नसतानाही ते शब्द त्यांना सापडलेच. अभिनंदन!
श्री. चोंबडा कोंबडा यांनी क्र.(७,८,९,१२ )वगळता अन्य आठ शब्द अचूक हुडकले.
श्री.जोगिया हे (७,९,१२) सोडून इतर नऊ शब्द शोधण्यात यशस्वी ठरले.
या दोघांचेही अभिनंदन !
.........यनावाला.

तर्क.३०:उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
श्री.प्रमोदकाका यांचे उत्तर आले.क्र.७ वगळता अन्य सर्व शब्द त्यांना अचूक सापडले आहेत.
.......................
पल्लवी यांचा व्यनि आला.(७ आणि १२ ) या दोन सूत्रां साठी त्यांना शब्द ठरवता नाहीत.उर्वरित सर्व दहा शब्द शोधण्यात त्या यशस्वी झाल्या.
................... दोघांचेही अभिनंदन!

आणखी उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आवडाबाई यांनी उत्तर पाठवले.संपूर्ण उत्तर बरोबर आहे. अभिनंदन!

तर्क ३०: उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्रीयुत प्रणवसदाशिवकाळे यांनी शाब्दिक कोड्याचे उत्तर पाठविले. सर्व बारा शब्द शोधण्यात ते यशस्वी झाले आहेत. अभिनंदन! " कोडी सोडवताना मौज़ वाटली." असे त्यांनी कळवले आहे. धन्यवाद!
.....यनावाला.

उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. योगेश दहा शब्द शोधून काढण्यात यश मिळाले."क्र. ७ आणि १२ शब्द् शोधीत आहे " असे ते कळवितात.
......................
श्री. योगेश यांनी उर्वरित दोन शब्द (७,१२) शोधून काढलेच.हे अपेक्षितच होते. ते लिहितात, "खूपच सही मज्जा येत आहे".
धन्यवाद! शेवटी ते म्हणतात,"आतां निवान्त झोप लागेल." हे वाचून मनात आले:
.....अरे! हे लोक विविध आस्थापनांत जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असतील. आधीच त्यांना मोकळा वेळ कमी.तेव्हा त्यांच्या बहुमूल्य समयाचा असा अपव्यय होणे योग्य आहे का?......
.........यनावाला.

असेच काही नाही!

.अरे! हे लोक विविध आस्थापनांत जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असतील. आधीच त्यांना मोकळा वेळ कमी.तेव्हा त्यांच्या बहुमूल्य समयाचा असा अपव्यय होणे योग्य आहे का?......

अहो असे काही नाही. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. तुमच्या शब्दक्रीडांमुळे उपक्रमावर आम्ही जास्त वेळ राहतो; नाही तर "आयडल ब्रेन" कुठे घेऊन जाईल ते सांगता येत नाही. ;)

-योगेश.

सहमत

तुमच्या शब्दक्रीडांमुळे उपक्रमावर आम्ही जास्त वेळ राहतो

सहमत

नाही हो

.....अरे! हे लोक विविध आस्थापनांत जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असतील. आधीच त्यांना मोकळा वेळ कमी.तेव्हा त्यांच्या बहुमूल्य समयाचा असा अपव्यय होणे योग्य आहे का?......

अपव्यय? नाही हो !! आम्ही तसा तो नाही समजत. कारण, आम्ही ह्याच्याकडे विरंगुळा म्हणून पाहतो आणि आम्ही आमच्या choice ने आलोयत् ईथे. खरं तर कोडं सोडवता आलं की आत्मविश्वास वाढतो थोडा !!

पण एक मात्र खरं , ते नाही आलं सोडवता तर मात्र दिवसभर डोक्यात कीडा राहतो !! तीच तर खरी मज्जा !!

अधिक उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************************
आज पुढील प्रमाणे उत्तरे आली:
*श्री. विसुनाना :सर्व (१२/१२) शब्द अचूक.
*श्री. जोगिया :नऊ शब्द आधी कळवले होते.आज बारावा शब्द शोधण्यात यशस्वी. (५,७)वगळता (१०/१२)
*श्री.अभिजित :बारातील (४,७,९) सोडता उर्वरित नऊ शब्द धुंडाळण्यात यश.
*राधिका : पहिल्याच व्यनि.त १२/१२ अचूक.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
........यनावाला.

शेवटचे उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.जोगिया यांना आणखी एक शब्द शोधण्यात यश मिळाले.( क्र.९. आता त्यांचे ११/१२ )

तर्कक्रीडा:३०: शाब्दिक उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
*********************************
या कोड्याच्या उत्तरांसाठी बारा सदस्यांनी एकूण बावीस निरोप पाठविले.सर्वाधिक निरोप श्री.जोगिया यांचे आले.(पाच)
या प्रतिसादांमुळे मी भारावून गेलो. सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. कोड्याचे उत्तर पुढीलप्रमाणे:
.............................
(१) करा आंदोलन जया काल वाहे |.....(४)......हेलकावा..(काही जणानी हेलकावे असे कळविले आहे.
(२) मम सासू होईल शांत काय ? |...(४).......सामसूम
(३) ती वरे कोणत्या नक्षत्रा ?|...(३)...रेवती
(४) कर हा कानी नीट ठेवूनी | बाधक अर्था घ्यावे ध्यानी |....(५)....हानीकारक.(काटेकोर व्याकरणनियमानुसार'हानिकारक')
(५) यानाच अशी प्रार्थना कशी ? |.....(३)......याचना.
(६) असे विप्राच्या गळीं का न जावे ? |...(३)....जानवे
(७) भारी दानव जर बदले तर |....(५)......वजनदार (भार=वजन; भारी=वजनदार 'दानव जर' बदलून)
(८) मोठेपण हे ऐसे ,कैसे सांगा मिळेल हा नमता ? |....(४)....महानता
(९) रमणी धन लाभतसे आर्जव हे खासे|.....(५)... मनधरणी
(१०) अपेष्टा दु:ख हे व्हावे | तयाना मात्र बदलावे.|....(३)....यातना
(११) अशी कशी ही सोशिकवृत्ती |बदले काही हशील नसता |....सहनशीलता
(१२) हवातसा अन आवडीचा परी 'म'ला न संपत कैसा ? |.....मनपसंत
...............................................
क्र.४ चे उत्तर 'हानीकारक' असे लिहिणे अपरिहार्य होते.वाटले या लहानशा चुकीसाठी सदस्य उदार अंतःकरणाने क्षमा करतील.पण नाही. श्री. दिगम्भा यांनी कान पकडलाच ! (मात्र सर्वांदेखत नाही.)

हानीकारक-बाधक

या शाब्दिकाचे उत्तर मी 'कानीटकर' असे दिले होते..

समस्त कानीटकरांनो माफी असावी..

अभिजित

 
^ वर