आश्लेषा नक्षत्र

लोकहो!!

शनी सध्या आश्लेषा नक्षत्रातून जातो आहे. मुळात अशुभ असलेले हे नक्षत्र सध्या फारच बिघडले गेले आहे. ज्या कर्कराशीच्या लोकांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर झाला आहे, ते काय परिस्थितीतून जात आहेत, याची आम्हाला कल्पना आहे.

या नक्षत्राचे नाव आदिशेष या पृथ्वीचा भार आपल्या डोक्यावर पेलणार्‍या शेषनागावरून पडले आहे. हे नक्षत्र डोक्यावर काही ना काही भार टाकते. नको त्या जबाबदार्‍या अंगावर येऊन पडतात. प्रभूरामचंद्राचा भाऊ लक्ष्मण याच नक्षत्रावर जन्मला होता.

पण हे नक्षत्र नुसता भार टाकत नाही तर त्या पार पाडण्याचे सामर्थ्यही देते. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण या व्यक्ती याच नक्षत्रावर जन्मल्या.

नक्षत्रचक्रातील हे नववे नक्षत्र आहे. आकाशात याचा आकार मराठी ९ सारखा दिसतो. या नक्षत्राचे सर्व चारही चरण हे कर्क राशीत येतात. याचा चौथा चरण हा गंडांतर तारा योगात असल्याने त्यावर जन्मणार्‍या व्यक्तिची जननशांत करावी असे धर्मशास्त्र सांगते.

हे नक्षत्र बुधाचे आहे. चंद्राच्या राशीत आहे आणि या नक्षत्राची देवता सर्प आहे. या नक्षत्रात या तिघांचे गुण/अवगुण एकवटले आहेत. बुधामुळे हे अवखळ आहे, चंद्रामुळे विलासी आहे आणि सर्पामुळे सुस्त पण जागरूक आहे.

या नक्षत्रावर जन्मणारे लोक मध्यम उंचीचे पण जरा जास्त आडवे आणि बेढब असतात. शरीर पुष्ट व मांसल असते. मान, मांड्या, पोटर्‍या, दंड, मनगटे साधारण भरलेली असतात. यांची खूण म्हणजे यांचे नाक. नाकाचा शेंडा हा थोडासा पोपटाच्या चोचीसारखा खाली वाकलेला असतो.

या लोकांचा स्वभाव सुस्त, भिडस्त, ऐषारामी, चंचल, भावनाप्रधान, विकारवश व मोहाला लवकर बळी पडणारा असतो. यांना स्वत:चे ठाम मत नसते. लोकानुकरण करणारे असतात. त्यामुळे त्यांची मते ही त्यांना भेटणार्‍या लोकानुसार बदलतात. लगेच प्रभावित होतात.

स्त्रियांनाही हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया आडव्या, बेढब बांध्याच्या असतात. त्यांचे अवयव पुष्ट असले तरी आकारहीन असतात. त्यांच्यात चापल्याचा अभाव असतो. मध्यम वयातच अंगाने सुटायला लागतात. गुरू लग्नात असेल तर पोट थुलथुलीत असून कमरेला वळ्या पडतात. त्यांना घराची आणि कुटुंबाची ओढ असली तरी घरकामात विशेष रस नसतो. त्यापेक्षा घरात बसून आराम करणे त्यांना आवडते. नाटक, सिनेमा, दूरदर्शनवरील मालिका, संगीत यांची फार आवड असते. तशा त्या कलाप्रिय असतात. पण स्वत: कला शिकण्यापेक्षा त्याचा आस्वाद घेणे पसंत करतात.

फॅशनची आवड असली तरी आळशीपणामुळे त्यांना फॅशनेबल राहणे जमत नाही. स्वभावाने मात्र प्रेमळ, उदार, हळव्या, दयाळू , भावनाप्रधान असतात.

या नक्षत्रात दोन टोकाची माणसे जन्मतात. एक सतत जाकरूक राहून प्रचंड कार्य करणारे कर्तृत्ववान लोक जे फणा उगारलेल्या नागासारखे तल्लख असतात, तर दुसरे म्हणजे वेटोळे घालून झोपलेल्या सुस्त अजगरासारखे कायम निद्रिस्त.

या नक्षत्रात रवि, मंगळ राहू सारखे ग्रह असतील त्यांच्याकडे जबाबदार्‍या येतातच. अशा वेळेस हे लोक त्यांच्या कुटुंबात प्रमुख असतात. तसेच एखाद्या सोसायटीचा, ग्रामपंचायतीचा, जिल्हापरिषदेचा, साखर कारखान्याचा कारभार सांभाळणारे असतात. पण चंद्र, गुरू, शुक्र या सारखे शुभ ग्रह असतील तर केवळ ऐशाराम हेच त्यांचे ध्येय असते. दुसर्‍यांकडून सेवा करून घेणे हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार आहे अशा थाटात वावरत असतात. आणि सर्वात कहर म्हणजे या व्यक्ति इतरांशी कशाही कठोरपणे वागल्या तरी इतर लोक त्यांची सेवा करण्यास तत्पर असतात.

या नक्षत्रात रवी असता तो अधिकारयोगाच्या दृष्टीने चांगला असतो. या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. पण रवि बिघडल्यास दुसर्‍यावर हुकूमत गाजवून अधिकाराचा दुरूपयोग करण्याकडे कल असतो.

चंद्र असता शरीर मांसल, गुबगुबीत पण रोगप्रतिकारक शक्ती कमी. अधिकाराच्या दृष्टीने चंद्र काही कामाचा नाही. वातविकाराने त्रस्त होतात. मध्यमवयात शरीर सुटते.

मंगळ या नक्षत्रात असता रोगप्रतिकारक शक्ती कमी. अंगात रक्त कमी. ऍनेमिया असतो. स्वभावाने भांडखोर, दुष्ट, खर्चिक, उधळ्या असतात. फाजील पराक्रम करून स्वत:चेच नुकसान करून घेतात.

बुध असता अशक्त, थापाड्या, नकला करणार्‍या असतात. इतरांच्या मागे त्यांची टवाळी करणे यांना विशेष आवडते. एखादा कसा बोलतो, कसा चालतो हे हावभाव करून लोकांना सांगतात.

गुरू या नक्षत्रात बरा असतो. पण अधिकार देणार नाही. शरीर भारदस्त देतो पण त्यांना स्वार्थी, घमेंडखोर बनवतो. वृथा अहंकार निर्माण करतो. मी म्हणजे काय? असे ऍटिट्यूड असते.

शुक्र असता शरीरप्रकृती आणि सौंदर्याच्या दृष्टीने चांगला असतो. चेहरा सुंदर मोहक असतो. पण शरीर बेढब. ज्या स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र या नक्षत्रात असतो त्या अत्यंत विलासी, चैनी, रंगेल, भोगी आणि विषयासक्त असतात. शुक्र बिघडलेला असल्यास मोहात फार लवकर गुरफटतात.

शनि जर या नक्षत्रात बिघडला तर जुनाट रोगाने पिडीत असतात. या लोकांना काहीतरी व्यंग असण्याची दाट शक्यता असते. हे लोक कपटी, घातकी आणि आतल्या गाठीचे असतात. यांचे आयुष्य इतरांबद्दल कटकारस्थाने करण्यात जाते. स्वत: अतृप्त असतात. कोणी सुखी झाले की त्याच्यावर जळफळतात.

राहू अधिकार आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने चांगला. हे नक्षत्र क्रूर आणि राक्षसगणी असल्यामुळे राहूला ते मानवते. पण बिघडलेला राहू हा समाजविघातक धंदे करणारा असतो. डान्सबार, दारूचे गुत्ते, मटक्याचे अड्डे यात हे लोक गुंतलेले असतात.

केतू असलेल्याने थंडीपासून खूप त्रास होतो. सतत नाक वहात असते. थोड काही थंड प्यायले की लागले शिंकायला.

हर्षल बुध्दिमत्ता आणि अधिकार देतो पण त्याचबरोबर विक्षिप्तपणाही देतो. बिघडलेल्या शुक्राबरोबर असता वेश्यांच्याकडे जाणारा असतो. तसे नसल्यास रखेली ठेवणारा असतो.

नेपच्यून असता हे लोक रसिक, हौशी असतात. यांना एखादे वाद्य वाजवता येतेच.

या नक्षत्राचे रत्न पाचू आहे आणि २ अंकाचे प्रभुत्व या नक्षत्रावर आहे.

मुहूर्तशास्त्रात हे काही फार चांगले नक्षत्र समजले जात नाही. ते क्रूर, राक्षसगणी आणि गंडांतराच्या योगातले असल्यामुळे शुभकार्याला वर्ज्य आहे. पण ते अधोमुख असल्याने विहीरी खणणे, जमीन नांगरणे, जमीनीचा पाया भरणे, उत्खनन करणे म्हणजे ज्या ज्या गोष्टींना मान खाली ठेवून काम करावे लागते त्यासाठी योग्य आहे. त्याच प्रमाणे द्यूत खेळणे, जुगार खेळणे, दारू गाळणे, जारणमारण, सापाचे विष काढणे असल्या क्रूर कर्मास चांगले समजले जाते. पण शुभकृत्ये या नक्षत्रावर करू नयेत.

आपला,
(सांगोपांग) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

नेमकी! ;)

स्त्रियांनाही हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया आडव्या, बेढब बांध्याच्या असतात. त्यांचे अवयव पुष्ट असले तरी आकारहीन असतात. त्यांच्यात चापल्याचा अभाव असतो. मध्यम वयातच अंगाने सुटायला लागतात. गुरू लग्नात असेल तर पोट थुलथुलीत असून कमरेला वळ्या पडतात. त्यांना घराची आणि कुटुंबाची ओढ असली तरी घरकामात विशेष रस नसतो. त्यापेक्षा घरात बसून आराम करणे त्यांना आवडते.

आम्हालाही नेमकी याच नक्षत्रावरील स्त्री बायको म्हणून मिळणार असे वाटते! ;)

आपला,
(आर्द्रा नक्षत्रातला!) तात्या.

महागात!

धोंडोपंत,
सिंह राशीतल्या मघा नक्ष्हत्रावर जन्मलेल्या लोकांबद्दल आपल्याला काय वाटते ?

तुम्हाला जगातली सगळी 'ऐहिक' सुखं महागात पडणार आहेत असे दिसते!

आम्हाला त्याचं विशेष काही नाही, कारंण आमच्यावर टीकासुमने उधळण्यातच आंतरजालावरील अनेक ऐहिक सुखे आपापल्या लेखण्या परजून पोटं भरीत आहेत आणि वाहवा मिळवित आहेत! ;)

तात्या.

आपण परत अवतीर्ण झाल्याने मला वाटले की परत एकद विचारून पहावे बुवा

नमस्कार धोंडोपंत,
हा प्रतिसाद मी आधी दिलाच होता पण त्यावेळी आपण अंतर्धान पावला होतात.
आपण परत अवतीर्ण झाल्याने मला वाटले की परत एकद विचारून पहावे बुवा!
(जर काही चुकले असेल तर माफी द्यावी. बरोबर असेल तर् दिलदार प्रतिसाद द्यावा!)
मी प्रशासकांना विनंती करतोय की हा प्रतिसाद अस्थाई असल्यास काढून टाकावा. (पुन्हा... पुन्हा... तेच... तेच! ;) )
-------------
नमस्कार धोंडोपंत,
लेखमाला चांगली आहे, परंतु
कृतिका नक्षत्र या लेखात,
'या व्यक्ती पराक्रमी, धाडसी, निग्रही तसेच करारी असतात. कोणत्याही संकटाला न डगमगता धैर्याने तोंड देऊन त्या महत्तम पदास पोहोचलेल्या आढळून येतात. हे नक्षत्र राक्षसगणी, क्रूर व कष्टप्रद असले तरी प्रचंड कार्य करणारे, प्रसिध्दी देणारे आणि उच्चपदाला नेणारे आहे.

स्त्रियांनाही हे नक्षत्र शरीरप्रकृती आणि सौंदर्याच्या दृष्टीने चांगले असते.

शरीराचा प्रत्येक भाग उठावदार असतो. अवयव पीळदार व घट्ट असतात. चेहरा त्रिकोणी व उभट, कपाळ भव्य पण जरा पुढे आलेले असते. नाक जरा मोठे असते. चेहरा सुंदर व आकर्षक असतो.'

हे वाक्य, जोतिषालंकार पंचांग गणितमार्तंड माननिय श्री. प्रभाकर आंबेकर लिखित 'नक्षत्र जोतिष' (तृतियावृत्ती १६ मे १९९६, चंद्रवल्लभ प्रकाशन, पुणे.) या पुस्तकात, पान क्र.२१ वर तिसर्‍या परिच्छेदात जसे च्या तसे आहे.
आपण या पुस्तकाचा लेखमालेसाठी वापर करत असाल तर उत्तम आहे, परंतु वापर केल्यावर श्रेय/संदर्भ देणे ही आपले कर्तव्यच आहे. संदर्भ देण्याने लेखकाची व लिखाणाची विश्वासार्हता वाढते.

मात्र, जोतिषात अनेक ग्रंथांमध्ये पुनरुक्ति असते.
या न्यायानुसार आपले विचार इतर ग्रंथांतून आले असल्यास,
तसे नमूद करणे योग्य राहिल असे आमचे म्हणणे आहे.

आपला विनम्र,
गुंडोपंत

गुंडोपंत

तुमच्या चमत्कारिक अभिप्रायाचा उद्देश समजला नाही.

आम्ही आंबेकरांचे पुस्तक जरूर् वाचतो. त्यातली अनेक वाक्ये आपल्याला भिडतात्. ती दीर्घकाळ स्मरणात राहतात आणि त्यांचा वापर ही होतो. त्यात गैर काय् हे समजले नाही? हे म्हणजे एखाद्या गवयाने मालकंस गायला की तुमची ही तान अमुक अमुक गायकाने घेतलेली होती हे म्हणण्यासारखे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे श्रेय्. आम्ही स्वतः कुठल्याही ज्योतिषविषयक लेखनाचे श्रेय आजवर घेतलेले नाही. जे ज्ञान चालत आले आहे ते पूर्वापार चालत आले आहे.

आंबेकरांनी ते स्वत: निर्माण केलेले नाही.

तिसरी गोष्ट आंबेकरच कशाला, आम्ही व.दा. भट, म.दा.भट, मोघे, देशिंगकर, वाईकर, सोमण, राजे, जोशी, दत्तात्रय कुळकर्णी, दाते, फडके, काटवे या सर्वांची पुस्तके वाचतो.

आमच्या गुरूजींनी जे शिकवले त्याच्याही नोटस आहेत. या सर्वातली काही वाक्ये अशी फीट डोक्यात बसतात की ती कधीही विसरली जात नाहीत.

या क्षेत्रातले अनेक विद्वान आमचे स्नेही आहेत. त्यांच्याशी अनेक चर्चा चालतात. चर्चेदरम्यान तो एखादे असे काही बोलून जातो की ते थेट आपल्या डोक्यात त्या शब्दांसकट फिट बसतं.

आता श्रेय देणे म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर "याचे श्रेय आंबेकरांना', दुसर्‍या वाक्याचे श्रेय अमक्यांना, तिसर्‍याचे आम्हाला स्वतःला, असे भाग करणे महामूर्खपणाचे ठरेल.

"जो पर्यंत वरील मजकूर हा आम्ही स्वत: आमच्या संशोधनातून निर्माण केला आहे" असा दावा कोणी करीत नाही , तो पर्यंत श्रेय लाटण्याचा वगैरे संबंध उद्भवत नाही.

आम्ही लेखन करतो यावर जर आपली खुन्नस असेल् तर तसे स्पष्ट सांगावे म्ह्णजे आम्ही इथून आमचे तोंड काळे करू.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आपण असा राग मानू नये ही विनंती.

आम्ही लेखन करतो यावर जर आपली खुन्नस असेल् तर तसे स्पष्ट सांगावे म्ह्णजे आम्ही इथून आमचे तोंड काळे करू.

आमची आपल्यावर खुन्नस असण्याचे काहिही कारण नाहिये! तेंव्हा आपण असा राग मानू नये ही विनंती. या शिवाय ज्योतिष विषयक लेखनाला आपण येथे कोणत्या माध्यमातून आणता हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न होता.

या सर्वातली काही वाक्ये अशी फीट डोक्यात बसतात की ती कधीही विसरली जात नाहीत.
हे मान्य आहे. पण सहज एक ओळ टाकली "क्षक्षक्ष म्हणतात की..." आपल्या याच लिखाणाचे संशोधन निबंधात रुपांतर होईल. :)

पुस्तके माहित झाली तर जास्त लोक ती वाचू शकतात इतकेच. हा नियम सर्व प्रकारच्या संशोधनात्मक लेखनाला लागू असतो.
तेंव्हा राग नसावा ही नम्र विनंती.

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत

गुंडोपंत,

आम्ही आत्ताच आंबेकरांचे पुस्तक काढून पाहिले. त्यात आंबेकरांनी त्या पुस्तकातील ज्ञान त्यांनी स्वतः निर्माण केले आहे असा कुठेही दावा केलेला नाही.

म्हणजेच हे ज्ञान त्यांना कोणाकडूनतरी प्राप्त झालेले आहे. त्याचे श्रेय त्यांनी कोणाला देण्याची आवश्यकता नाही.

ज्योतिषशास्त्राचे ज्ञान पिढ्यानपिढ्या गुरू व ग्रंथ या माध्यमातून पुढील पिढयांकडे सुपूर्त होत आहे, हे वास्तव आहे.

जर आंबेकरांनी , "मी जे काही लिहिलाय ते मी माझ्या स्वतःच्या संशोधनातून लिहीले आहे असे दावे केले असते" तर प्रश्न वेगळा होता.

but he himself agrees, that he has learnt it from his Guru or books and by writing this book, he is playing the role of a middleman for transferring the knowledge to the future generations.

आम्हीही येथे लेखन करून हेच करतो आहोत. जे जे आपल्याला माहीत आहे, ते ते इतरांपर्यंत पोहोचवणे.

"मी तर हमाल, भारवाही" असे तुकाराम म्हणतात.

अमुकअमुक वाक्य क्ष ने या या पुस्तकात लिहीले आहे, असे उल्लेख करणे अशक्य आहे. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे ही वाक्ये आपल्या अंतरंगात जाऊन मुरलेली असतात आणि त्याचे मूळही कालांतराने माहित नाहीसे होते.

मग् काय् करायला लागेल, प्रत्येक पुस्तकातले आवडलेले वाक्य लेखकाच्या नावासकट् लिहून ठेवायचे, त्याची बाडे बनवायची, आणि मग आपण लेखन करतांना ती बाडे समोर घेऊन बसायचे,

मग बघायच, " आयचा घोव ! हे वाक्य कोणी म्हटलयं?" चला काढा बाड आणि शोधा"....

(संपादक महाशय - "आयचा घोव" ही शिवी नाही. घोव म्हणजे दादला.)

किंवा कोणाशी चर्चा करत असता, तो एखाद छान वाक्य बोलून गेला की खिशात डायरी ठेवायची, ती लगेच बाहेर काढून त्यात लिहून घ्यायचं. अमुक अमुक वाक्य --- मंदार केळकर म्हणाला दिनांक अमुकमुक. हे वाक्य गोविंदराव म्हणाले दिनांक अमुक अमुक

हे करणं केवळ अशक्य आणि मूर्खपणाचे आहे.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

हा विषय माझ्यापुरता संपला.

धोंडोपंत,
मी तुम्हाला आधी नम्रपणे विनंती केली होती, दुसरा प्रतिसादही मी नम्रपणेच दिला होता. (मी खरं तर तुम्हाला खडूस पणे लिहू शकत होतो. पण मोह मी आवरला!) पण तुम्ही अकारण थयथयाट करता आहात!

तुम्ही रा. सु. आंबेकर यांच्या पुस्तकातली वाक्ये चोरी केली आहे हे मान्य करायला तयार नाही हेच यातून दिसते आहे!
जर त्यातून वाक्य घेतले आहे तर 'घेतले आहे' हे मान्य करायला काहीच हरकत नाही.

तुमचे
अमुकअमुक वाक्य क्ष ने या या पुस्तकात लिहीले आहे, असे उल्लेख करणे अशक्य आहे. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे ही वाक्ये आपल्या अंतरंगात जाऊन मुरलेली असतात आणि त्याचे मूळही कालांतराने माहित नाहीसे होते.

तुमच्या अंतरंगात मुरलेल्या माहितीचे हे मुळ मी तुम्हाला दाखवले होते, पण आपली चोरी झाकण्याच्या नादात तुम्ही शब्दांचा फाफटपसारा मांडला आहे.
शेवटी सत्य हेच आहे की या पुस्तकातून वाक्य चोरले आहे. (पण हे मान्य करायला तयार नाही!)
हे वाक्य आंबेकर 'बोलले' असते तर् मी काहीच म्हणालो नसतो. पण वाक्य 'लिखित' स्वरूपात आहे. तेंव्हा ही चोरीच आहे! तुम्ही हे प्रांजाळपणे कबूल केले असते तर हा वाद उद्भवलाच नसता. या प्रकाराला तुकारामा सारख्या महापुरुषांची उदाहरणे देवून झाकता येणार नाही. त्यांचे भारवाही असणे हे वेगळ्या संदर्भात आहे. तुकारामांनी गाथा 'लिहिली' आहे. कुणाचे तरी वाचून, ऐकुन लिहुन काढलेली नाही हे येथे लक्षात घ्यावे!

मग् काय् करायला लागेल, प्रत्येक पुस्तकातले आवडलेले वाक्य लेखकाच्या नावासकट् लिहून ठेवायचे, त्याची बाडे बनवायची, आणि मग आपण लेखन करतांना ती बाडे समोर घेऊन बसायचे,
अर्थातच! असं केलंच जाते! त्यालाच लिटरेचर रिव्ह्यु असे म्हणतात.झी आपल्या किर्तन परंपरेत वारंवार सिद्ध झालेले आहे होत असते.
हे करणं केवळ अशक्य आणि मूर्खपणाचे आहे.
लोक ज्योतिष्यांना का फाट्यावर मारतात यातील कारणे, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे!
असो,
आपण येथुन पुढे माझ्या खरडवही वापर 'या विषयासाठी' न केल्यास उत्तम राहील. आपल्या या विषयाच्या हाताळण्याच्या पद्धतीमुळे हा विषय माझ्यापुरता संपला आहे.

आपला
गुंडोपंत

चोरी???

चोरी कशी?

आंबेकरांचे किंवा कोणाचेही वाक्य आमचे आहे हे म्हणणे म्हणजे चोरी. उलट आंबेकरांशिवाय इतर कोणकोणत्या लेखकांचा प्रभाव आमच्यावर आहे हे ही आम्ही सांगितले आहेच. त्यामुळे चोरीचा आरोप हा हातात मुद्दे नाहीत म्हणून केलेली चिखलफेक ठरते.

असो. आम्हाला आपल्या खरडवहीत येऊन प्रेमपत्र लिहायची मुळीच कंड नाही. वाद तुम्ही निर्माण केलेत. आम्ही आमचे लेखन करून आमच्या मार्गाने निघून गेलो होतो.

फाट्यावर मारणे या गोष्टीचा जो फाटा तुम्ही फोडला आहे त्यावर इथे काही लिहीत नाही. ते व्यक्तिगत खरडवहीत लिहीन्. इथे लिहीणे सुसंस्कृतपणाचे ठरणार नाही.

विषय तुम्ही निर्माण केलात आणि आता तुम्हीच संपलाय म्हणून घोषित करताय. पुन्हा असल्या टवाळक्या करण्याआधी विचार करायचा.

धोंडोपंत

खाली लिहीलेली आमची स्वाक्षरी नीट वाचा. म्हणजे तुमच्या चोराच्या उलट्या बोंबा कशा आहेत ते समजेल. ही स्वाक्षरी प्रत्येक अभिप्रायात दिसते.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही.

ठीक आहे रे धोंड्या!

तू असा लगेच तडकू नकोस आणि इथुन तोंड काळं वगैरे करण्याची भाषा करू नकोस. तू गुंड्याला दिलेलं उत्तर योग्य आहे आणि पुरेसं आहे. तेव्हा आता हा विषय डोक्यातून काढून टाकून पुढच्या लेखनाला लाग!

तुझा,
तात्या.

नामदेव शिंपी?

ज्योतिष्यावर परंपरागत काम करणारे-

मला आठवते त्या प्रमाणे (अभ्यासूंनी चुक सुधारावी!)
नामदेव शिंपी आणी गोसावी समाज यासाठी परंपरागतरीत्या काम करतो.
पण सगळे तोंडी! या समाजाचे लिखित काय आहे त्याची कल्पना नाही.

गोसावी बर्‍यापैकी 'वेळ असेल तसे' आणी चेहरा (व पाकीट) पाहुन सांगतात! पण मुळात स्थैर्य नाही, त्यामुळे शिक्षणाचा अभाव असल्याने हे सगळे लिखित स्वरूपात आले नसावे. फक्त चेहरा पाहून एखाद्याला कसे 'नीट ताब्यात घ्यावे' (हे ज्यांनी कधी 'गोसाव्या कडून भविष्य ऐकले आहे' त्यांनाच कळेल!) हे सगळे भन्नाट 'बॉडी लंग्वेज स्किल्स' त्या त्या पिढीसोबतच लयास जाते आहे.

(मी मागे शोध यंत्राच्या लेखात मांड्लेला डिजिटल डिव्हाईड चा मुद्दा येथे अतिशय तीव्र स्वरूपात आहे! हा समाज या सगळ्या पासून अगदीच तुटून गेला आहे.)
आपला
(कुडमुड्या)
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

ब्राह्मणेतर

शिवराम गणपत पवार यांची रेवती योगतारेचा शोध शके १८२९ ( ७८ मिळ्वले कि सन मिळतो) , पंचांग कल्पतरु सारणी ,ग्रहसाधनिका, त्रिकोणमिती,शून्यलब्धगणित, वेधविज्ञान,ग्रहगती सिद्धांत, ज्योतिषशास्त्र इ. ग्रंथ लिखित आहेत्. (संदर्भ- भारतीय ज्योतिषशास्त्र शं बा दिक्षित तिसरी आवृत्ती- प्रशंसन -३) परंतु ब्राह्मणेतरांकडे ज्ञानाची साधने खूपच कमी प्रमाणात होती असा तो काळ होता.
प्रकाश घाटपांडे

महाशंका...

उपक्रमपंत -
आपण इतर अनेक ठिकाणी डिसक्लेमर्स लावलेले आहेत.
सदर चर्चा (आणि तत्सम) चर्चा उडवून टाकाव्यात असे आम्ही म्हणत नाही पण या प्रकारांचे उपक्रम समर्थन करित नाही किंवा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर हे सल्ले वाचावेत असा खुलासा येथे का नाही याची राहून राहून शंका मनात येते आहे.

अवांतर - कायदेशीर दृष्ट्या उपक्रमाला असे लिहिणे बंधनकारक आहे किंवा असावे की काय अशीही महाशंका!

चोरी वगैरे..


त्यामुळे माझे प्रथमदर्शनी असे मत झाले आहे, की ही अंशी शब्दांची सलग वाक्ये लिहिताना लेखकाने सदर पुस्तक समोर ठेवले असावे. आणि त्यामुळे त्याला चोरी हेच अभिधान योग्य ठरेल.

थोडक्यात. गुंडोपंतांचे म्हणणे खरे असल्यास धोंडोपंत चोर ठरतात.


या वर धोंडोपंताचे म्हणणे "आमचे ज्योतिषविषयक लेखन हे आम्ही केलेल्या व्यासंगातून, अभ्यासातून,वाचनातून, अध्ययनातून केलेले आहे. आम्ही कोणतेही नवीन शोध लावल्याचा दावा करीत नाही."


वराहमिहिर् च्या बृहत्संहिते पासून निरुपण,विश्लेषण अशा प्रकारचे लिखित मजकूराचे संस्कारण सादरीकरण सुलभिकरण हे प्रत्येक ज्योतिषी करत आला आहे. त्या अर्थाने सगळेच चोर ठरतात. जर जसे च्या तसे न देता त्यात थोडेसे शब्दांचे बदल् केले तर ( म्हणजे चोरी वाटू नये म्हणून घेतलेली काळजी) तर ती चोरी म्हणून गणली नसती. सामूहिक कॉपी मध्ये शिक्षकच सांगतात समोरच्याच जसं च्या तसं लिहू नका.वाक्यात बदल करा.
व्यावहारिक दृश्ट्या सुद्धा जेथे शक्य आहे तेथे संदर्भ द्यावेत.

प्रकाश घाटपांडे

वाक्यात बदल-प्रतिक्रिया

परंतु एखाद्या पुस्तकातली अंशी शब्दांची तीन वाक्ये जशीच्या तशी लिहिणे, हा योगायोग असण्याची शक्यता (प्रॉबॅबिलिटी) किती आहे ते आम्ही लिहिलेय.
त्या गणितात काही चुका असतील तर कळवा.

या बद्दल् काहीच म्हणायचे नाही. मुद्दा निर्विवाद आहे. पण त्याला चोरी पेक्षा उचलेगिरी उचित वाटते. अनेक प्रथितयश लेखक सुद्धा सृजनात्मक उचलेगिरि करर्तात.(अर्थात ते समर्थनिय नाही हा भाग वेगळा) पण वाक्यात फिरवाफिरवी करण्यापेक्षा उघडउघड उचलेगिरी परवडली एखाद्या चाणाक्ष वाचकाला पकडता तरी येते. साहित्यात अशा प्रथितयश उचलेगिर्‍या पकडलेल्या आहेत.
प्रकाश घाटपांडे

जबरदस्त!

युयुत्सुंची ऍनेलिटीकल ऍबीलीटी जबरा आहे!
मुद्दा पुर्णपणे विशद केल्याबद्दल धन्यवाद!
आपले वरचे लिखाण पाहून आपण तर गार! ;)
परत एकदा
धन्यवाद!
आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

गणित...

चूभूद्याघ्या

  • ८० शब्द, प्रत्येक शब्दाला ~३.१ प्रतिशब्द असे असल्यास तेच ८० शब्द निवडण्याची शक्यता ~(०.३)^८० = १.४७ * १०^-४२. पण हे ८० शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता ~१.४७ * १०^-४२/(८०!) = ~२.०६*१०^-१६१
  • ८० शब्द, प्रत्येक शब्दाला ~१.२ प्रतिशब्द असे असल्यास तेच ८० शब्द निवडण्याची शक्यता ~(०.८३३३)^८० = ४.६ * १०^-७. पण हे ८० शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता ~४.६ * १०^-७/(८०!) = ~६.४६*१०^-१२६
  • ८० शब्द, प्रत्येक शब्द एकमेवाद्वितीय! तेच ८० शब्द निवडण्याची शक्यता १^८० = १. पण हे ८० शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता १/(८०!) = ~१.३९*१०^-११९

अवांतर - मराठी व्याकरणाच्या नियमांमुळे वरील शक्यता वाढतील. उदा. क्रियापद हे फक्त वाक्याच्या शेवटीच येईल. इ इ इ. पण देऊन देऊन किती सवलत देणार? ५ एकमेवाद्वितीय शब्द त्याच क्रमाने येण्याची शक्यता शेकडा एकापेक्षा कमी आहे! हे पाहिले की लक्षात येईल की काटा अगदी थोडासाच इकडून तिकडे हलेल.

खुलासा - युयुत्सु महाराजांनी गणित मांडण्यासाठी घातलेल्या निकषांमध्ये एकलव्य बसत नाही. पण असूदे... अपना तो याराना है... चलता है!!

(शक्यतेच्या पलिकडला) एकलव्य

चोरी

धोंड्या,
ल्येका पुस्तकातली वाक्यं येक बी सबुद हिकडच तिकडं न करता जशी च्या तशी लिवलास आनि त्या चाप्टर गुंड्यानं तुला बरुबर पकडला तर सरळ 'मी आउट' म्हनून टाक की!
तुझी बॅटींग परत येनार न्हाइ का?असा डोस्क्यात राग घालून त्येच्याच अंगावर ब्याट घेउन का निघालायस बाबा?

असो.

खेडूतबुवा,
तुम्हास्नी खेडूत कस म्हनाव? फकस्त भासा अशी हाय म्हून? तुमी त लै भारी दिस्ता राव इचारानं...

बरं असो!
आता जे झाले ते झाले!
आपण हे सगळे विसरून जाऊन परत ज्योतिष्यावर लिखाण सुरु ठेवू या असे आवाहन मी करतो आहे!

आपला
(चाप्टर?)
गुंडोपंत

 
^ वर