उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
संगीतातील "अभिजातवाद"?
जगन्नाथ
June 23, 2007 - 7:02 pm
आत्ताच डॉ. बिरुटे यांचा "अभिजातवाद" ही काय संकल्पना आहे यावरचा लेख वाचला. तो तुम्ही मुळात वाचा. पण त्यावरुन मला टाळक्यात प्रकाश पडल्यासारखं झालं . . . आजकाल मी कुमार गंधर्वांचंच गाणं सतत ऐकत असतो. त्यांनी शास्त्रशुद्ध ठेवलं नाही, भेसळ केली, असे कधी काळी त्यांच्यावर आरोप होते. पण खरं तर ह्या गाण्यात शंभर टक्के "अभिजातवाद"च भरलेला आहे असं आता मला वाटलं. त्यामुळेच अगदी काव्याच्या दृष्टीनेही सगळ्या बंदिशी अतिशय वरच्या दर्जाच्या आहेत. आशयापासून अगदी अनुप्रास-यमकांपर्यंत सगळं जुन्या पद्धतीचं अाहे. पण ठराविक साच्यातलं काहीही नाही. सगळं "नवीन". ह्यालाच अभिजातवाद म्हणतात ना?
दुवे:
Comments
माझं मत..
वरील उतार्यातील दोन वाक्ये -
१) पण खरं तर ह्या गाण्यात शंभर टक्के "अभिजातवाद"च भरलेला आहे असं आता मला वाटलं.
२) पण ठराविक साच्यातलं काहीही नाही. सगळं "नवीन". ह्यालाच अभिजातवाद म्हणतात ना?
याबाबत, म्हणजे कुमारांच्या गाण्याबाबत आपल्याला नक्की काय काय वाटतं या बाबत आपण अधिक खुलासा केल्यास आपल्या मते अभिजातवाद म्हणजे काय हे आपोआपच स्पष्ट होईल असं वाटतं. आणि मुख्य म्हणजे आपल्याला कुमारांचं गाणं आवडतं हेच माझ्या मते पुरेसं आहे! बाकी 'अभिजात' किंवा 'अभिजातवाद' म्हणजे काय, किंवा अभिजातवाद कशाला म्हणतात यासारखे सगळे शब्दच्छल गौण आहेत!
अर्थात, हे माझं मत! बाकी चालू द्या..
आपला,
(कुमारप्रेमी) तात्या.
माझं मत..
आवडतं. खरोखर आवडतं. शब्द गौण आहेत हे तर झालंच, पण काहीतरी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. कारण मी गप्प बसून ऐकण्याइतका "पोचलेलो" नाही . . . तर अभिजात वाटतं म्हणजे काय, तर ऐकताना एकदम काहीतरी प्राचीन ऐकतो आहे असा भास होतो. किंवा एखादा मध्ययुगातला राजगायक गात आहे, असं वाटतं. ह्या बोलण्याला तसा विशेष अर्थ नाही, हे तर झालंच. पण मला सांगीतिक काही सांगता येणार नाही. मला गाणं येत नाही. पण आपण खूपदा बघतो, की समजा एक पौराणिक अथवा ऐतिहासिक चित्रपट आहे, तर शक्यतो वातावरणनिर्मिती म्हणून केदार, कामोद, मालकौंस, बागेश्री असे राग असतात. ते जुने आहेत म्हणून बहुतेक. पण तरी तशी "वातावरणनिर्मिती" होतेच असं नाही. मात्र कुमार ह्यांच्या गाण्यात ती होते. त्याच्यात काहीतरी सूक्ष्म वेगळेपणा आहे. तो सर्वसाधारण श्रोत्याला समजत नाही. फक्त जाणवतो. म्हणजे मी एकच "जागा" दहादा रिवाइन्ड करून ऐकली तरी मला मुळीच समजणार नाही. मग नाइलाज म्हणून आपण उपमा-उत्प्रेक्षांची भाषा काढतो. श्री ऐकताना (सा नंतर) प लागला की एखाद्या प्राचीन नगरीत, चौकातल्या घंटेचा अावाज दुरून ऐकू येतो आहे, असं वाटतं . . . आता सा-प मध्ये नवीन काय असणार? पण काहीतरी खुबी आहे, गुप्त जागा आहे, असं राहून राहून वाटतं. बागेश्री प्राचीन वाटतो. शंकरा अतिप्राचीन वाटतो. हे एवढे मोठे रागसुद्धा नीट ठरले नव्हते, का रागारागांतले अन्योन्यसंबंध लोकांना जास्त माहीत होते, अशा काळातून कोणीतरी घेऊन अाला आहे असं वाटतं. चीजेची विशिष्ट रचना आहे तीही त्याला कारणीभूत असणारच. आणि हे सर्व गाणं अत्यंत भावानुकूल असल्यामुळे ह्या सगळ्याचा बंदिशींतल्या काव्याशीही दाट संबंध आहे. उदाहरणार्थ त्यातील जी नायिका आहे ती "अभिजात" अाहे हे निःसंशय. सगळा भावाविष्कार जुन्या पद्धतीचा आहे. फार तर सदारंग काळातला आहे. निसर्गवर्णन त्याहीपेक्षा जुने आहे. तसं genius च्या डोक्यात काय चालू आहे हे आपल्याला कळणं शक्यच नाही. पण जुनं ते सोनं हे ह्या माणसाला (माणूसच होता असं समजूया!) पटलं होतं. फक्त त्याचा अर्थ इतका सरळसोट नाही. परंपरा ही सोन्याची खाण आहेच, पण अक्षरशः चिखलात जो अविश्रांत राबतो तोच कण दोन कण बाहेर काढू शकतो. आणि स्वतः दागिना कधीच घालत नाही. जाऊदे. ही सर्व बडबड आहे. मी परत जरा वेळ मिळाला की एखाद्या प्रसिद्ध चीजेबद्दल "काय वाटतं" हे जमेल तसं लिहीन. काय वाटतं म्हणण्यापेक्षा काय प्रश्न पडतात, असंच ते होणार आहे . . .
कुमार गंधर्व
शरद
कुमार खऱ्या अर्थाने "नायक" होते. माझ्या सारख्या वादी-संवादी ,कोमल-तीव्र, वगेरे काहीही न कळणाऱ्या माणसाला शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी तीन-तीन तास मांडी
घालून बसावयाला लावणारा कलाकार हा "नायक" च असला पाहिजे. रागदारी सोडा,
तो थोरा-मोठ्यांचा प्रांत.आमच्या सारख्यांना दिवसातून एखादे निर्गुण भजन ऐकले तरी पुरते.
शरद
सहमत आहे..
रागदारी सोडा, तो थोरा-मोठ्यांचा प्रांत.आमच्या सारख्यांना दिवसातून एखादे निर्गुण भजन ऐकले तरी पुरते.
सहमत आहे.....
कुमारांबद्दलची माझी एक लहानशी आठवण येथे वाचता येईल..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!