डान्सबार, बारबाला आणि जिवाची मुंबई, एक बरबादी!

माझा सदर लेख उपक्रमरावांना माहितीपूर्ण व सामाजिक आशयाचा वाटल्यास इथे राहील, अन्यथा इथून उडवून लावला जाईल याची मला कल्पना आहे! ;)

काजल! वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पाच ते दहा हजार!

मोनिका! वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार!!

सोनी! वय वर्ष वीसच्या आसपास. रोजची कमाई रुपये पंचवीस ते तीस हजार किंवा त्याहून जास्त!

मंडळी, ही नांवे आहेत काही बारबालांची.

मंडळी, माझा काय योग आहे हे माहिती नाही, पण माझ्या आयुष्यात माझ्या कामधंद्याच्या निमित्ताने दारुवाले, शेट्टी बारमालक ही मंडळीच खूप आली. मी पडलो शेअरमार्केटचा माणूस! ज्या मार्केटची रोजची सरासरी उलाढाल ५०००० कोटी रुपयांची आहे अश्या मार्केटचा, ज्याला फक्त पैशांचं ग्लॅमर आहे आणि पैशांचीच भाषा कळते! त्यामुळे साहजिकच ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे अशी दोन नंबरवाली मंडळी या बाजारात अक्षरश: खोर्‍यानं पैसा ओततात. आपला धंदा पोर्टफोलिओ मॅनेजमेन्टचा! त्यामुळे ओळखीपाळखीने असे अनेक शेट्टी बारमालक माझे अशील आहेत. त्यामुळे त्यांच्याशी 'अपनेको क्या? धंदेसे मतलब!' या हेतूने वरचेवर भेटी होतात, त्यांच्या बारमध्येही जाणंयेणं होतं. या बारभेटींचाच एक भाग म्हणून मला डान्सबार, त्यातील पैशांची उलाढाल, त्यात थिरकणार्‍या बारबाला या सर्व गोष्टी खूप जवळून पाहायला मिळाल्या.

मंडळी, आपण पैशाला लक्ष्मीचं रूप मानतो आणि तिची पूजा करतो. पण या डान्सबारमध्ये लक्ष्मीला अक्षरशः बटीक होताना मी पाहिले आहे! हे डान्सबार म्हणजे आपल्या समाजाला लागलेली एक भयानक कीड आहे असे माझे वैयक्तिक मत आहे!

अवांतर - सुदैवाची गोष्ट इतकीच की इतक्या वेळा त्या डान्सबार्समध्ये जाऊनही मी माझ्या कष्टाचा, मेहनतीचा एक नवा पैसाही कधी कुठल्या बारबालेवर उडवला नाही, मला कधी उडवावासा वाटलाही नाही! आपण फक्त दुरून काय दिसेल ती दुनिया पाहायचं काम करायचं इतकंच! फक्त भीमसेनजींसारख्या दिग्गज गवयांच्या स्वरांचीच नशा आम्हाला आजवर भुरळ घालू शकली हे आमचं भाग्य! आणि तीच नशा आम्ही आजवर केली आणि जपली! नाहीतर पाय घसरून पडण्याचे भरपूर फसवे क्षण आजवरच्या आयुष्यात आले! असो..

हे डान्सबार दिवसभर बंद असतात. साधारणपणे संध्याकाळी सात नंतर ते सुरू होतात. रिक्षा करून, गाड्या करून त्यात नाचणार्‍या बारबाला तिथे जमू लागतात. प्रत्येक बारमध्ये त्यांची वेगळी मेकप रूम असते. मेकप करून, तंग आकर्षक पेहेराव करून हळूहळू बारच्या मुख्य बैठकीत या नटव्या दाखल होऊ लागतात. बहुतेक बारबालांची वयं पंचविशी तिशीच्या आतच! त्यातल्या बर्‍याचश्या दिसायला 'बर्‍या' म्हणता येतील अश्या. त्यातल्या काही खरोखरच 'सुरेख' या प्रकारात मोडणार्‍या! एका बारमध्ये साधारण तीस ते साठ एवढ्या बारबाला असतात. बर्‍याच डान्सबारमधून लाईव्ह ऑर्केस्ट्रे असतात. एखाददोन गाणारे, एखाददोन गाणार्‍या आणि साथीदार यांना या बार्समध्ये एक वेगळी रंगमंचवजा जागा असते.

हळूहळू गिर्‍हाइकांची वर्दळ वाढू लागते. व्हिस्की, बियर सर्व्ह केली जाऊ लागते. संध्याकाळची वेळ. समोर दारुचा गिल्लास, खिशात काळ्या पैशांची मस्ती आणि समोर दिसायला बर्‍या, तंग आकर्षक कपडे घातलेल्या तरूण मुली! बरबादीकरता अजून काय हवं?

साधारणपणे बिल्डर मंडळी, सरकारी कार्यालयात काम करून मजबूत वरपैसा कमावणारी माणसं, ही मंडळी या बार्सची गिर्‍हाईकं! बारमध्ये दारू प्यायला बसल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक मुलींपैकी एखादी मुलगी गिर्‍हाईकास पसंत पडते. वेटर लोकांकडून पाचशे हजाराच्या नोटांच्या बदल्यात दहा दहा चे सुट्टे मागवले जातात आणि त्या मुलीवर उधळले जाऊ लागतात. हजार, दोन हजार, तीन हजार! अशी रक्कम वाढतच जाते! एकदा आपल्याकडे पाहून एखादा मनुष्य पैसे उडवू लागला की ती बारबाला त्याच्यासमोर उभीच राहते. मध्येच सूचक हासणे, लाडिक हासणे, थोडक्यात समोरच्या माणसाला जितकं पाघळवता येईल तितकं पाघळवणे हेच तिचं काम! हे वेटर लोक मोठ्या स्टायलीत त्या पोरीवर हजार रुपायांची बंडलं उडवत असतात! मग बाकीचे वेटर लोक त्या खाली पडलेल्या नोटा गोळा करून नोटांची ती गड्डी त्या मुलीच्या हातात देतात. जशी दारुची आणि समोर उभ्या असलेल्या मुलीची धुंदी डोक्यात चढू लागते तश्या अजून नोटा उधळल्या जाऊ लागतात! मुलीच्या हातातली नोटांची गड्डी वाढतच जाते! एकेका मुलीची रोजची सरासरी कमाई दहा हजारापासून तीस हजारापर्यंत आहे अश्या दादरच्या 'बेवॉच' मधल्या किंवा ठाण्याच्या 'सीक्वीनस्' मधल्या काही बारबाला मला माहीत आहेत! या मुलींच्या अत्यंत पॉश अश्या शोफर्ड कार्स आहेत!

हे चित्र रोजचेच! साधारणपणे २०-२५ वर्षाची कुठलिही मुलगी ही आकर्षकच दिसते. त्यातून मग ती रंगरुपाने खरोखरंच सुरेख आणि देहबांध्याने आकर्षक असेल तर मग बघायलाच नको! तिच्यावर मरणारा तिचा यार रोज संध्याकाळी केवळ तिच्याकरता हज्जारो रुपये घेऊन बारमध्ये येणार! तिच्यावर वाट्टेल तसे पैसे उधळणार. काही वेळेला बारमध्ये येणार्‍या दुसर्‍या एखाद्या माणसाला तिच मुलगी आवडते. मग दोघात पैसे उडवण्याची स्पर्धा आणि जिद्द! यात त्या मुलीची दोन्हीकडून चांदी! खरं पाहता ती कुणाचीच नसते. ती असते फक्त पैशांची! पण स्त्रीदेहाच्या आणि दारुच्या धुंदीमुळे या गिर्‍हाइकांची सत्सदविवेकबुद्धी हरवते. गैरमर्गाने कमावलेला पैसा हा गैरमार्गानेच दुप्पट वेगात खर्च होतो हेच खरे! मंडळी, एकेका मुलीवर एकाच वेळेला दोघाजणांकडून अक्षरशः दोन दोन लाख रुपये तासाभरात उडवले गेलेले मी पाहिले आहेत! एकाने नोटा उधळल्या की दुसरा जिद्दीस पेटणार आणि दुसर्‍याने उधळल्या की पुन्हा पहिला जिद्दीस पेटणार! कसली भयानक जिद्द ही? की पैशांची, दारुची आणि स्त्रीदेहाच्या लालसेची मस्ती? यापैकी कुणालाही इंडियन कॅन्सर सोसायटीला किंवा क्राय सारख्या एखाद्या संस्थेला अवघ्या शंभर रुपयांचीही देणगी द्यायला सांगा. ते त्यांना जमणार नाही! मंडळी, या सगळ्या गोष्टी फार भयानक आहेत! घरच्या घरी सरकरी स्टॅम्प पेपर छापून विकणार्‍या (काय मस्त धंदा आहे ना!) अब्दुल करीम तेलगीने दादरच्या बेवॉच बार मध्ये अक्षरशः करोडो रुपये 'जानू' नांवाच्या बारबालेवर उडवले आहेत! उत्तरप्रदेशमधली अशिक्षित 'जानू' सध्या स्वतःच्या सर्व कुटुंबियांसमवेत कायमची दुबईत स्थायिक झालेली आहे! मंडळी, आता काय काय सांगू तुम्हाला!

आता हे शेट्टी बारमालक कधी कधी काय गेम खेळतात हे सांगतो! बारमध्ये एखादा मनुष्य त्याच्या आवडत्या बारबालेवर पैसे उधळत असतो. हा मासा जर गब्बर असेल तर बार मॅनेजमेन्टचाच दुसरा कुणीतरी मनुष्य डमी गिर्‍हाईक बनून त्याच्या बाजूला जाऊन बसतो. या डमीकडे अर्थातच ४-५ लाख रुपये (मालकाचेच!) तयार असतात. मग हा डमी गिर्‍हाईक त्याच बारबालेवर पैसे उधळू लागतो. (हे पैसे अर्थातच नंतर मालकाला परत मिळतात!) हे पाहून पहिला जिद्दीला पेटतो आणि आणखी पैसे उधळू लागतो! वेटर लोकांची खाली पडलेले हजारो लाखो रुपये गोळा करतांना अक्षरशः धावपळ सुरू होते. डमीकडचे पैसे अर्थातच कधीच न संपणारे असतात! ;) कारण त्याला चुपचाप मागच्या दाराने पैसे मिळतच असतात! असं करता करता खरा गिर्‍हाईक मात्र जिद्दीमध्ये येऊन बरबाद होतो. त्याचा संपूर्ण खिसा रिकामा होतो! आता बोला!

चेंबूरला कँपभागात, ठाण्याच्या लोकमान्यनगर, रामचंद्रनगर, किसननगर या भागात ह्या बारबालांची बरीच वस्ती आहे. बहुतेक बारबाला या उत्तरप्रदेश मधून मुंबईत येतात/आणल्या जातात. काही राजस्थानातूनही येतात. यांच्या सख्ख्या आयाच यांना इकडे पाठवायला उत्सुक असतात! 'बेटी, जल्दी बडी हो जा. पैसा कमानेके लिये तुझे बंबई जाना है' हे सांगून आईच मुलीला तयार करते! एक खूप मोठा अशिक्षित परंतु पैसे कमवायची बरोब्बर अक्कल असलेला हा उत्तरप्रदेशीय भय्या समाज आहे! तिवारी, मिश्रा, सिंग, अशी बहुतेकांची आडनांव! बार्समध्ये या बारबाला बॉलिवुडच्या नट्यांची (काजल, रवीना, रानी ) नावं घेऊन वावरतात! या मुलींना मुंबईच्या डान्सबारमध्ये आणणारी दलाल मंडळी ही बरीचशी शेट्टी आणि बंगाली आहेत. बसंतसेठ, मॉन्टोसेठ, गणेशसेठ असे काही दलाल मला माहिती आहेत! ही दलाल मंडळी उत्तरप्रदेश, राजस्थनातल्या १८ ते २० वर्षांच्या मुलींना हेरतात आणि पैशांचं अमिष दाखवून इकडे आणतात! 'पैसा कमानेका है, तो मुझको पेहेले खुश करना पडेगा. फिर मै सेठसे बात करके तुझे डान्सबारमे कामपे लगाऊंगा' या न्यायाने ही चाळीशी पन्नाशीतली दलाल मंडळीच सर्वप्रथम या अठरा अठरा वीस वीस वर्षांच्या मुलींना भोगतात! मग ज्या बारमध्ये तिला कामाला आणली जाते त्या बारच्या शेट्टी मालकाची मर्जी संपादन करायला हवी! मग ती मुलगी क्वालिफाईड बारबाला बनून लोकांसमोर उभी राहू लागते!

या डान्सबारमधले दारुचे आणि इतर पदार्थांचे दरही आवाच्या सवा असतात. दुकानात ५० रुपायाला मिळणारी बियर ही डान्सबारमध्ये २०० रुपायाला मिळते! १० रुपायाला मिळणारं शीतपेयं १०० रुपायाला मिलतं. म्हणजे ही शेट्टी बारमालक मंडळी किती प्रचंड नफेखोर आहेत ते पाहा! अर्थात, जोपर्यंत ते दर देणारी गिर्‍हाईकं आहेत तोपर्यंत बारमालकांना दोष देण्यात तरी काय अर्थ आहे असा विचार कधी कधी मनात येतो. शिवाय प्रत्येक बारबालेकडून त्यांच्या बारमध्ये उभं राहण्याचा १०० ते १५० रुपये रोजचा हप्ता बारबालांना बारमालकांना द्यावा लागतो. बारबालांची बारमधली सरासरी संख्या ४० जरी धरली तरी बारमालकाला रोजचे चार ते सहा हजार रुपये हे हप्त्यापोटी मिळतात! यातूनच पोलिस, गुमास्ताकायदावाले, यांचे हप्ते भरले जातात!

बारमध्ये येणारी नेहमीची गिर्‍हाइकं आणि त्यांच्या आवडत्या बारबाला यांच्यात मोबाईल फोनस् च्या नंबरचीही बर्‍याचदा देवाणघेवाण होते. तिला बाहेर घेऊन जाण्याकरता तो अर्थातच उत्सुक असतो! ते पैसे वेगळे. त्याच्याशी बारचा काहीच संबंध नाही. बाहेरच्या खाजगी लॉजिंग हॉटेलातून बर्‍याचश्या बारबाला आपापल्या गिर्‍हाईकासोबत जातात! हे दर दोन हजारापासून ते बारा हजारापर्यंत असतात! ती या बारबालांची दिवसाची कमाई! सर्वसाधारण दिसणार्‍या बारबाला असले प्रकार करतात! मी वर उल्लेख केल्याप्रमाणे दिसायला खरोखरंच सुरेख अश्या काही बारबाला असतात, ज्या दिवसाला पंचवीस ते तीस हजार रुपये कमावतात त्या दहा बारा हजार रुपयात खाजगी लॉजमध्ये कुठल्याही गिर्‍हाइकासोबत जात नाहीत! त्या फक्त झुलवत ठेवायचं काम करतात. त्यातच त्यांना लाख्खो रुपये मिळतात मग त्या कशाला कुणाबरोबर जाऊन आपला फॉर्म बिघडवून घेतील?! त्यांना 'त्या' कामाकरता न्यायचंच असेल तर त्यांचे दर अक्षरशः लाखात आहेत आणि ते देणारीही मंडळी आहेत!

असो मंडळी, इथेच थांबतो आता!

दारुडा मारकुटा नवरा, चार पोरं पदरात असलेल्या, परंतु मेहनतीने, इज्जतीने महिना दोन तीन हजार रुपये कमावणार्‍या आपल्या धुणंभांडी करणार्‍या बाया त्यापरीस मला खूप खूप मोठ्या वाटतात आणि त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो!

पण तात्याच्या नतमस्तक होण्या न होण्याला मुंबईत विचारतंय कोण?

--तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

लज्जारक्षण


तर तशी माझी गरज निर्माण झाल्यास मी तर जाईन बॉ नाचायला! अगदी कपडे काढत पण चालेल.
आपली काहीच हरकत नाय!
(असं ही आपल्याला काय... प्रॉब्लेम बघणार्‍याच्या नजरेत असतो...)

आपन् तर बाबा कापडं घालतो ती स्वत: च उन,थंडी वारा पाउस यापासून संरक्षण व इतरांच लज्जारक्षण यासाठी.दिगंबर साधुंची गोष्ट मात्र वेगळी आहे.
प्रकाश घाटपांडे

इतरांच लज्जारक्षण

इतरांच लज्जारक्षण
;)
आपली कापडं इतरांच्या लज्जारक्षणासाठी!! सही!! पटलंय!!!!

जर कशाला?

शिव शिव शिव!!!!, शांतम् पापम् शांतम् पापम्.
नाचू किर्तनाचे रंगी । नेसू सोवळे अंगी॥ अत्र्यंच्या 'तो मी नव्हेच' मधील् राधेष्याम महाराज आठवा! घाशीराम कोतवाल मधिल् सख्या चला बागांमधी रंग उधळू चला हा डान्स आठवा.
हॅ हे हॅ हे

प्रकाश घाटपांडे

आणी लग्ना आधी

कोलबेरराव (असं 'राव' म्हणणं चमत्कारीक वाटतंय नाही?)
आणी लग्ना आधी कोंबड्यांची (मुलीमुलींचीच फक्त!) पण एक पार्टी असते ना... ?
आपला
(हेन्स पार्टीत प्रवेश नसलेला!)
गुंडोपंत

हो असते..

बॅचलराट पार्टी का कायतरी म्हणतात त्याला. . आणि त्यावेळेसच अश्या गुंडोबार्स मध्ये जातात.. परंतु केवळ एक गंमत म्हणून कारण स्त्रियांना पुरुष देहाचे इतके आकर्षण नसते जितके पुरुषांना स्त्रि देहाचे असते असे 'आतल्या गोटातुन' ऐकून आहे.

अरेच्या युयुत्सु रावांनी आधिच माहिती दिली की...असो उपक्रमावर 'माहिती' मिळणे हे महत्वाचे कुणाकडून हे गौण ;-)!!
--
'स्टिव्हन कोलबर्ट' जर त्याचा नावाचा उच्चार कोलबेअर असा करत असेल तर आपण त्याला 'कोलबेर राव' म्हणायला काय हरकत आहे?

डान्स बार ! आणि पॉकेट मनी !

सुंदर लेख,
डान्स बार मधे, महाविद्यालयीन मुलीही पॉकेट मनी साठी येतात म्हणे ?

लेखकाची सर्जनशिलता अनुभवातून येते 'दूवे' देऊन नाही ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर्जनशिलतेचे समर्थन करतात.

बिरुटेसाहेब,

डान्स बार मधे, महाविद्यालयीन मुलीही पॉकेट मनी साठी येतात म्हणे ?

हो येतात. अंधेरीच्या (आता नक्की नांव आठवत नाही,) एका बारमध्ये आणि दादरच्या बेवॉचमध्ये काही काही वेळेला अश्या 'तयार' मुली येतात! या मुली स्वतःच बड्या बापाच्या बेट्या असतात. अर्थात, त्या रेग्युलर नसतात. साधारणपणे मिठिबाई कॉलेजच्या आणि भवन्स कॉलेजच्या एफ वाय आणि एस वाय (१३वी १४वी) काही मुली क्वचितप्रसंगी अशी कामे करतात.

सेंट झेवियर्स कॉलेजच्या आणि मिठिबाई कॉलेजच्या अश्याच १३वी ते १५ वी मधल्या काही मुली पाच ते सहा हजार रुपये घेऊन एखाद्या लॉजमध्ये 'त्या' कामाकरतादेखील येतात! अर्थात, ते आम जनतेकरता नाही. त्याकरता दलालामार्फत पक्की ओळख पाहिजे. हे दलाल कुर्ला, अंधेरीच्या काही बार्स मध्ये भेटतात. यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडेही नाही! (किंवा इथे ती मी देऊ इच्छित नाही!)

तात्या.

भयंकर वास्तव!

अंतर्मुख व्हायला लावणारा लेख!

>>हे डान्सबार म्हणजे आपल्या समाजाला लागलेली एक भयानक कीड आहे असे माझे वैयक्तिक मत आहे!

आजकालच्या जगात असेही विचार करणारे लोक आहेत हे पाहून खूप चांगलं वाटलं.
नाहीतर हल्ली 'ही काळाची गरज आहे' वगैरे मतंच जास्त ऐकू येतात. :(

>>दारुडा मारकुटा नवरा, चार पोरं पदरात असलेल्या, परंतु मेहनतीने, इज्जतीने महिना दोन तीन हजार रुपये कमावणार्‍या आपल्या धुणंभांडी करणार्‍या बाया त्यापरीस मला खूप खूप मोठ्या वाटतात आणि त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो!

मीसुद्धा!!
हे वाक्य अतिशयच पटलं.

मला तर या बारबालांपेक्षा उथळ आणि पांचट वृत्तीच्या मूर्ख सिनेमानट्यांचा जास्त राग येतो! अगदी सगळ्या नसल्या तरी बहुसंख्य बारबाला फसवून आणि इच्छेविरुद्ध या व्यवसायात् आणल्या जातात आणि या नट्या कळून सवरुन पैशाप्रसिद्धिच्या हव्यासापोटी शरीर उघडं टाकून उत्तान हावभाव करुन प्रेक्षकांच्या भावना चाळवण्याचं काम करतात. आणि मग असं दुसर्‍यांना चाळवून स्वतः अंगरक्षक/सेक्रेटरी/आई-वडील वगैरेंच्या ताफ्यात घरी जाऊन सुरक्षितपणे झोपतात आणि अशा चाळवलेल्या गेलेल्या प्रेक्षकाची शिकार बनते त्याच्याच आसपासची एखादी स्त्री किंवा मग आहेतच या 'ईझीली अव्हेलेबल' बाल-बार-बाला!

हा घ्या एक फोटो../व्ही आय पी रूम!

कालच संध्याकाळी 'क्ष' ठिकाणच्या एका 'अबक' डान्सबारमध्ये गेलो होतो. त्या बारच्या शेठचे शेयरचे व्यवहार मी सांभाळतो. त्याला त्याच्या व्यवहारांची माहिती द्यायची होती म्हणून काल तिथे जाणे झाले होते. शेठ माझ्या बाजुलाच बसला होता. आम्ही व्ही आय पी रूममध्ये बसलो होतो. ही रूम बारच्या मुख्य हॉलपेक्षा वेगळी असते. इथे ऑर्केस्ट्रा नसतो. इथे फक्त डेकवर गाणी लावून ती ऐकवली जातात. इथे खास खास दिसणार्‍या बारबाला आणि जी गिर्‍हाईकं पैशांनी गब्बर आहेत त्यांनाच सहसा प्रवेश दिला जातो! मी काही गब्बर नव्हतो, पण शेठसोबत व्यवहाराची बोलणी करायची होती म्हणून आम्ही व्ही आय पी रूममध्ये बसलो होतो! नाहीतर चुकून मीही गब्बर आहे की काय असा आपला गैरसमज व्ह्यायचा! ;)

तिथे बसल्याबसल्या मी एक फोटो घेतला.

फोटोत आपल्याला 'व्ही आय पी' मंडळी बसलेली दिसतील! ;)

फोटोत अगदी सुरवातीला जी पाठमोरी मुलगी उभी आहे ती 'पायल!' तिची रोजची कमाई १०००० रुपये आहे असं शेठ सांगत होता! असो..

आपला,
(मुंबईचा माहीतगार!) तात्या.

महितीपूर्ण चित्र

तात्या तुमची पण कमालच आहे!
एकीकडे क्ष ठीकाणचा अबक बार असा उल्लेख करता आणि दुसरीकडे तिथल्या व्ही आय पी रूमचा फोटो जाहिर छापता .. तुमचे सेठ चित्रात नाहित म्हणून वाटत ;-)
--
उपक्रमाने धोरणे शिथील केल्यास इथल्या चर्चा आणि लेख असेच रंगतील

वरूणदेवा,

एकीकडे क्ष ठीकाणचा अबक बार असा उल्लेख करता आणि दुसरीकडे तिथल्या व्ही आय पी रूमचा फोटो जाहिर छापता .. तुमचे सेठ चित्रात नाहित म्हणून वाटत ;-)

हा हा हा!

बाबारे, काल मी हळूच पायलचा एक सामोरा फोटोही काढला आहे. ही पायल आमच्या शेठच्या मर्जीतली हो! तो फोटो इथे टाकणे योग्य नाही. तुला पाहायचा असल्यास तो मी माझा मित्र युयुत्सूच्या खरडवहीत टाकला आहे. तिथे जाऊन पहा! ;)

उपक्रमाने धोरणे शिथील केल्यास इथल्या चर्चा आणि लेख असेच रंगतील

अरे बाबा हेच तर मी इथे आल्यापासून सांगत होतो! पण बोललो की 'तात्या बोलतो!', 'तात्या शिवराळ!' अशी दूषणे ऐकावयास मिळतात! चालायचंच! सुधारणा व्ह्यायच्या असतील तर कुणीतरी वाईटपणा हा घ्यावाच लागतो! ;)

असो..

तात्या.

आवडला

लेख आणि प्रतिसाद देखील.

उडवून लावला जाईल अशी शंका येण्यासारखं काही नव्हतं. खरं तर आमच्यासारख्या केवळ वर्तमानपत्रातील बातमीवर अवलंबून रहाणा-यांसाठी ही एक इनसाईडर स्टोरी आहे.

आभार..

प्रतिसाद, उपप्रतिसाद देणार्‍या सर्व संवेदनशील वाचकांचे आभार...

तात्या.

नमस्कार

तात्या,
लेख आवडला.
डान्सबार विषयी मला विशेष काही माहिती नव्हती. ते असतात येवढेच माहित होते. ( आणि त्यावर बंदी आल्यानंतर ते बंद झाले असे वाटत होते. ) हा इतका प्रकार आहे हे वाचून अश्चर्य वाटले.

--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

तात्या

आपला तर जवाब नाही. आपण तर सर्व जाणता.
आपला
कॉ.विकि

बे वॉच

तात्या,
नुकताच दादर येथील बे वॉच बारवर धाड पडली. याबाबत आपल मत काय.
आपला
कॉ.विकि

धाडसत्र..

तात्या,
नुकताच दादर येथील बे वॉच बारवर धाड पडली. याबाबत आपल मत काय.

त्यात काही विशेष नाही. असं धाडसत्र अधनंमधनं सुरूच असतं. कालांतराने पुन्हा सर्व व्यवस्थित सुरू होतं!

तात्या.

 
^ वर