गुलजार नावाचा कवी
फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी'एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा' नावाचा एक कार्यक्रम लागत असे. 'सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार' हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे. त्या कार्यक्रमात एकदा गीतकार गुलजार यांच्यावर आरोप केला गेला होता, की त्यांची गाणी फार दुर्बोध, कळायला अवघड अशी असतात. उदाहरणार्थ
'पत्थर की हवेली को
शीशे के घरोंदों में
तिनकोंके नशेमन तक
इस मोड पे जाते है'
म्हणजे काय?
गुलजार यांनी याचं काय स्पष्टीकरण दिलं हे लक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितल्याचं आठवतं की माझ्या ओळींचे शब्दशः अर्थ घेऊ नका. 'नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे' मधल्या 'आवाज' चा अर्थ स्वरयंत्रातून बाहेर पडणारा ध्वनी असा नाही. 'हमारा देश हमें आवाज दे रहा है' मधला 'आवाज'चा अर्थ काय आहे पहा! 'है नाम होटोंपे अब भी लेकिन, आवाज में पड गयी दरारें' मधल्या 'आवाज' चा अर्थ पहा!
'मोरा गोरा अंग लइ ले, मोहे शाम रंग दइ दे ' पासून गीतलेखनाला सुरुवात करणाऱ्या गुलजार यांची ओळख अशी सांकेतिक गाणी लिहिणारा गीतकार अशीच आहे. यातल्या बऱ्याच गाण्यांना आर.ड़ी. बर्मन यांचा परीसस्पर्श झाल्यानं ती अधिक सुंदर झाली हे खरं, पण तो झाला नसता तरी ती तितकीच आशयसंपन्न राहिली असती असं वाटतं. अर्थात या पहिल्या गाण्यावर असलेली शैलेंद्रच्या लोकगीतांची छाप लपून रहात नाही. (तोहे राहू लागे बैरी, मुसकाये जी जलायके) पण नंतर बाकी गुलजार यांची गीते अगदी स्वतंत्र अंगाने गेलेली दिसतात. खरंतर हा माणूस आधी कवी आणि मग गीतकार. म्हणून गुलजार यांच्या गाण्यांत काव्यगुण विपुलतेने आढळतो.
गुलजार यांच्या रचना समजून घ्यायच्या तर त्यांच्या गीतांमधील ही सांकेतिकता कळावी लागेल. 'वो यार है जो खुशबू की तरहा, जिस की जुबाँ उर्दू की तरहा' याचा अर्थ काय हे समजावून सांगणं कठीण आहे. 'उर्दू की तरहा' म्हणजे उर्दू की गैरउर्दू असा प्रश्न इथे गैरलागू आहे. 'तावीज बनाके पहनूं उसे, आयत की तरह मिल जाये कहीं' याचा आपल्याला कळालेला अर्थ आणि गुलजार यांना अभिप्रेत असलेला अर्थ एकच आहे का? मग अशा वेळी गालिबसारखे गुलजार यांचेही काव्य 'या तो आप समझे या खुदा समझे' म्हणून सोडून द्यायचे का?
संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. 'जीने के लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे, मुस्कराये तो मुस्करानेके कर्ज उतारने होंगे' असं लिहून जाणारे गुलजार 'वक्त के सितम कम हसीं नही,आज यहां है कल कहीं नही' असंही लिहितात. 'सुरमई अंखियोंमें नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे' ही लोरी 'सदमा' ला काय करूण झालर देऊन जाते! 'आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है' हा गुलजार यांचा खट्याळपणा आणि 'सीधे सीधे रास्तोंको हल्का सा मोड दे दो, बेजोड रूहोंको थोडासा जोड दे दो' हा अबोल प्रेमभाव! गुलजार यांच्या गीतांमध्ये रात्र, स्वप्न. चंद्र यांचे उल्लेख अनेकवेळा येतात.कुठे सलील चौधरींच्या सुरावटीवर मुकेश 'कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबोंने' म्हणतो तर कुठे किशोरकुमार कधी 'चांद चुराके लाया हूं, चल बैठे चर्च के पीछे' म्हणतो तर कधी 'फिर वही रात है ख्वाबोंकी'! गुलजार यांच्या पहिल्यावाहिल्या गीतातही 'छुप जाउंगी रात ही में, मोहे पीहा संग दई दे' आहे आणि 'बदरी हटाके चंदा, छुपकेसे झाके चंदा' हेही आहे!रस्ता, वळण हीही गुलजार यांची आवडती प्रतिमा. रस्ता वळाला की चाल वळणे हे तुमचेआमचे झाले. 'मै मुड गया तो साथ साथ, राह मुड गयी' हा तो खास गुलजार टच! 'इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते , कुछ तेज कदम राहे' इथेही रस्ते आहेतच ,पण 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा पहा! तीच गोष्ट 'जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है' या गाण्याची. 'प्यार की तुम इंतेहा हो, प्यार का आगाज हम' या ओळीतले सौंदर्य जसे मोहवणारे तसेच 'जीने की तुमसे वजह मिल गयी है, बडी बेवजह जिंदगी जा रही थी' या ओळीतलेही.
गालिबचा गुलजार यांच्या शायरीवरील प्रभाव हाही एक फार मनोरंजक विषय आहे. 'दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन, बैठे रहे तसव्वरे जाना किये हुये' या गालिबच्या मुखड्याचा वापर करून गुलजार यांनी एक स्वतंत्र गीत लिहिले आहे हे तर आपल्याला माहिती आहेच. पण उपमा उत्प्रेक्षांचा चमत्कारिक वाटावा असा कल्पक वापर हेही दोघांचे समान वैशिष्ट्य आहे. गालिबप्रमाणेच गुलजार यांच्या प्रतिमा सांकेतिक असल्यामुळेच की काय कुणास ठाऊक, पण अगदी वेगळ्या असतात. प्रेयसीच्या आगमनाला आम शायरांनी थंड हवेच्या झुळुकीची उपमा सर्रास दिली आहे. गुलजार बाकी याला 'तेरा आना भी गर्मियोंकी लू है' म्हणतात! प्रेयसीच्या बोलण्यात इतरांना चंदनाचा, वाळ्याचा वगैरे सुगंध दिसतो, गुलजारना बाकी 'तेरी बातों में किमाम की खुशबू है' असे म्हणावेसे वाटते. या किमामच्या आणि जर्द्याच्या खुशबूमध्ये जे रंगीलेपण आहे ते इतर सुगंधांत नाही!याच गीतात दिल्लीचा उल्लेख ते 'बल्लीमारा'च्या गल्लीसकट करतात. याच गल्लीत गालिबचे वास्तव्य होते हे आपण जाणतोच.
धडकत्या हृदयावर तर शेकड्यानी गाणी लिहिली गेली आहेत, पण या जळत्या हृदयातल्या आगीवर बिडी पेटवून घे असं आवाहन करणाऱ्या प्रियेची कल्पना गुलजारच करू जाणोत! ('बीडी जलायले जिगरपे पिया, जिगरमां बडी आग है'- इथेही ती बिडी आहे, सिग्रेट नव्हे - हे सिग्रेट सोडून बिडी ओढायला लागणाऱ्या चांगदेव पाटलाइतके - किंवा सिग्रेटीचे मचूळ ब्रँड सोडून वडारणीच्या रासवट अलिंगनासारखी चार मिनार ओढणाऱ्या दत्तू जोशीसारखे साक्षात्कारी!)
गुलजार यांची ही सांकेतिक संवेदनशीलता कधीकधी त्यांची मर्यादा होते की काय अशीही शंका येऊ लागते. 'जब तारें जमीं पर चलते हैं, आकाश जमीं हो जाता है, उस रात नही फिर घर जाता, वो चांद यही सो जाता है' हे थोडेसे उबवलेले वाटते. 'आंखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' हे नकोसे वाटते. मग तेवढ्यात वसंतरावांनी बांधलेले सुरेल 'पपीहरा' आठवते.
इक घन बरसे, इक मन प्यासा
इक मन प्यासा, इक मन तरसे
सावन तो संदेसा लाये
मेरे आंख से मोती पाये
दान मिले बाबुलके घरसे
गुलजार यांच्या गैरफिल्मी रचनांतून त्यांच्यातला गीतकाराआधीचा कवी दिसतो. 'स्पर्श' मालिकेसाठी वापरलेल्या
हाथ छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते
वक्त की शाख से लम्हे नही तोडा करते
या ओळी किंवा
शाम से आंख में नमी सी है
आज फिर आपकी कमीसी है
या ओळी पहा. इथली 'कमीसी' या शब्दाची निवड हीच ती गुलजार शैली.
'जिंदगी यूं हुई बसर तन्हा,
काफिला साथ और सफर तन्हा'
हीपण एक शीच सुरेख गजल.
आणि शेवटी गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा:
सुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखा
सरहद के उस पार से कुछ मेहमान आये है
आंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाये
पांव धोये, हाथ धुलाये, आंगन में आसन लगवाये
और तंदूर पे मकई के कुछ मोटे मोटे रोट पकाये
पोटली में मेहमान मेरे, पिछली सालोंकी फसलोंका गुड लाये थे
आंख खुली तो देखा घर में कोई नही था
हाथ लगाकर देखा तो तंदूर अभीतक बुझा नही था
और होटोंपर मीठे गुड का जायका अबतक चिपक रहा था
ख्वाब था शायद, ख्वाबही होगा
सरहद पर कल रात सुना है चली थी गोली
सरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबोंका खून हुवा है
Comments
मीठे गुड का जायका!
यातल्या बऱ्याच गाण्यांना आर.ड़ी. बर्मन यांचा परीसस्पर्श झाल्यानं ती अधिक सुंदर झाली हे खरं,
प्रश्नच नाही. पंचमदा आणि गुलजार यांचं नातं औरच होतं!
आंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाये
पांव धोये, हाथ धुलाये, आंगन में आसन लगवाये
ओहो! क्या बात है..ते आंगण डोळ्यापुढे आलं बघा रावसाहेब!
पोटली में मेहमान मेरे, पिछली सालोंकी फसलोंका गुड लाये थे
अतिशय तरल कल्पना!
सरहद पर कल रात सुना है चली थी गोली
सरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबोंका खून हुवा है
क्या बात है.. !
गुलजार साहेबांना सलाम! मोठा माणूस..!
आणि रावसाहेब, तुम्हालाही सलाम!
आपल्या या लेखाचा जायका बरेच दिवस आमच्याही जिभेवर राहील!
सुंदर लेख..!
अब क्या बताऊ आपको रावसाब, या गुलजार, पंचमदा, आणि हरिभाई या तिघांचे खूप उपकार आहेत हो!
आपला,
(गुलजार-पंचमदा-हरीभाई प्रेमी!) तात्या.
आवडलं...
संजोपराव ,
खुप झकास लिहीले आहे. गुलजार यांच्या गीतांचा चाहता मी आहेच. पण आपल्याला आवडलेल्या कवीचे एवढे सुंदर चित्रण करतायेतं हे वाचून खुप छान वाटले. इतर खुप काही लिहू शकनार नाही. पण एवढं सांगतो की लेख मनापासून आवडला.
नीलकांत
लेख
खुप छान लेख आहे.
पल्लवी
सुरेख
गुलजारच्या गीतांचा चाहता कोणी मिळणार नाही असे व्हायचे नाही. कविता तर फारच सुरेख. त्यांचा जन्मच पाकिस्तानात झाला असल्याने फाळणी, सरहद, शत्रुत्व अशा विषयांबद्दल त्यांच्या भावना फार हळूवार असल्याचे अनेकदा लक्षात येते.
बरेचदा त्यांना नक्की काय सांगायचे आहे हे कळत नाही आणि बरेचदा साध्या शब्दांतून बरेच काही सांगून जाते तशीच ही कविता आणि माझे आवडते गाणे -
तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं
लेख अप्रतिम आहे. आवडला.
सुरेख!
वा! सुंदर लेख, गुलजारच्या एखाद्या गाण्यासारखाच.
मुसाफिर हूं यारो, जाने क्या सोचकर, ओ माझी रे, थोडी सी जमीं वगैरे पासून रॉकफोर्ड मधल्या आसमां के पार पर्यंत गुलजारची गाणी एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. या लेखामुळे अनेक सुंदर आठवणींना उजाळा मिळाला.
सहमत
वरील मतांशी सहमत आहे.
रावसाहेब् - क्या बात् है!
गुलजार न आवडणारा माणूस शोधणं कठिणच आहे, पण गुलजार समजणारा माणूस सापडणं त्याहूनही अवघड आहे. आम्ही मात्र दोन्ही गटांत मोडतो (एकात आहे म्हणून आणि दुसर्यात् नाही म्हणून)- गुलजारची अशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदनही...
मंदार.
छान लेख
छान लेख.
जय हो गुलजार!
जय भोलेनाथ!!
बाबा त्रिकाल!
सुंदर लेख.
नमस्कार रावसाहेब,
सुंदर लेख.
गुलजारांची बालगीते ('मोगली'चे सुरवातीचे गाणे ) सुद्धा फारच सुंदर आणि सहज. याची आठवण झाली.
आपला,
--लिखाळ.
वा
सुंदर लेख.
आपण शेवटी उल्लेखलेल्या कविता जगजीत-गुलजार यांच्या मरासिम् अल्बम मध्ये आहेत.
गुलजारची गैरफिल्मी गीते थोडी जास्तच चांगली आहेत :)
(याचा अर्थ फिल्मी गीते मात्र वाईट आहेत् असा नाही.)
मुझको भी तरकीब सिखादे..
हा लेख पाहून त्याचे ठिगळे लावलेले लेख आठवत, 'मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !म्हणावेसे वाटते.
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे
अकसर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और सिरा कोई जोड़ के उसमे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गांठ गिरह बुन्तर की
देख नहीं सकता कोई
मैनें तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उसकी सारी गिराहें
साफ नजर आती हैं मेरे यार जुलाहे
~ तो ~
समविचारी
मनोगतावर ह्या लेखाला प्रतिसाद देताना मला हीच कविता आठवली.
ग्रेट माईंडस थिंक अलाइक :-)
राजेंद्र
आनंददायी
आपला लेख मनापासून आवडला. गुलजार यांची गाणी गुणगुणत लेख वाचायला खुपच छान वाटले.
कुतुहल.
लेख छानच उतरला आहे.
गुलजार या व्यक्तिबद्दल नेहमीच एक कुतुहल वाटत आले आहे. नुसतं त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहूनही मनात एक आदरभाव उत्पन्न होतो. पांढऱ्या शुभ्र वेषातील एक साधं परंतु अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमतव!
माधवी.
आभारी आहे.
इथे प्रतिसाद दिलेल्या सर्वांचा आभारी आहे. काही मित्रांना आता 'म' स्वर वर्जित आहे, त्यामुळे त्यांचे इथे प्रतिसाद वाचून बरे वाटले!
सन्जोप राव
कबड्डी कबड्डी..
काही मित्रांना आता 'म' स्वर वर्जित आहे, त्यामुळे त्यांचे इथे प्रतिसाद वाचून बरे वाटले!
च्यामारी संजोपशेठ,
शेवटी आलातच ना 'कबड्डी' 'कबड्डी' करत आणि कुणीही पकडायच्या आत माझ्या ओझरती एक टपलीत मारून गेलात! ;)
ठीक आहे, आता पुढची सर्वीस माझी! ;)
आपला,
(कबड्डीपटू!) तात्या.
जाळ्यावर
गुलजारलिखित बहुतेक गाणी म्युझिकइंडियाऑनलाइन च्या या पानावरून ऐकता येतील. हल्ली हे सं॰ स्थ॰ अधूनमधून चालत नाही. म्युझिकइंडियाऑनलाइनचा गाण्यांचा संग्रह सर्वात चांगला आहे पण ध्वनिमुद्रणाचा दर्जा तितकासा चांगला नाही.
धिंगाणा.कॉम असे एक नवे सं॰ स्थ॰ पाहण्यात आले. धिंगाणा.कॉम वरही गुलजारची काही गाणी ऐकता येतील. तिथे जास्त गाणी उपलब्ध नसली तरी आवाजाचा दर्जा उत्तम आहे. धिंगाणा.कॉम वर मराठी गाण्याचा संग्रह चांगला आहे.
दोस्तो से...
साथिया मध्ये एक गीत आहे
दोस्तों से झुठीमुठी दुसरों का नाम लेके फिर मेरी बातें करना
याचा अनुभव घेतलाय कधी?
गुलझार यांची गीते अनुभवण्यासाठी असतात.
छोटिशी शंका ....!
सन्जोप राव यांचा व्यासंग , मेहनत , अभ्यासु वृत्ती हे सर्व अनूकरणीयच आहे. वादच नाही. पण एक शंका... नव्हे २ शंका !
१] ' मोरा गोरा अंग लैले . . . . . ' हे गाणे मा झ्या माहिती प्रमाणे ' बंदिनी ' चीत्रपटातले. मग तिथे शैलेंद्र हवा.
२] ' कभी कभी तो आवाज . . . . ' हे गाणे 'आनंद ' मधिल . गितकार = योगेश. [ असे मला वातते .]
कृपया शंका समाधान करावे.
निरसन
केशव, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. 'मोरा गोरा अंग' हे बंदिनीतले गाणे गुलजार यांचेच आहे. गुलजार यांच्या गीतलेखनाची सुरुवात इथूनच झाली. 'आनंद' ची गाणी योगेश आणि गुलजार यांची आहेत. पैकी 'मैने तेरे लिये' हे गाणे गुलजार यांचे आहे.
सन्जोप राव
गुरू
मस्त लेख! परवाच गुरू सिनेमातलं "ऐ हैरत ऐ आशिकी" गाणं ऐकलं. त्यातला "दो चार महीन् से लमहो मे उमरोंके हिसाब होतें है" हा सवाल व त्यावरचा "जिन्हे देखा नहीं कलतक ...(पुढचे शब्द आठवत नाहित)" हा जवाब मस्त वाटला!
सूरमयी शाम
गुलजार यांच्या उपमा या नेहमीच काहीतरी वेगळ्या असतात. लेकीन या सिनेमातील 'सूरमयी शाम' या गाण्यात संध्याकाळ होण्याला अशीच एक उपमा वापरली आहे.
'जैसे खुशबू नजर से छू जाए'. असे काहीतरी क्वचितच दुसर्या कोणी लिहीले असेल!
ओ माझी रे
फारच मस्त लेख! ओ माझी रे - हे गीत् कुणी येथे देऊ शकेल् का?
धन्यवाद!
उपक्रम जिंदाबाद