12 अँग्री मेन

खोली क्रमांक २२८, मॅनहॅटन कोर्ट. तो खून खटला सहा दिवस सुरू होता. अनेक साक्षीपुराव्यांनंतर आणि दोन्ही बाजूंच्या जटिल युक्तिवादानंतर, जजसाहेब अतिशय गंभीरपणे १२ ज्युरींना म्हणाले, "ह्या सर्व साक्षीपुराव्यांतून सत्य शोधून काढणे आता तुमचे काम आहे. लक्षात ठेवा, एक माणूस मेलेला आहे आणि दुसऱ्या माणसाचे आयुष्य तुमच्या हातात आहे. जर तुमच्या मनात जराशीही शंका असेल तर तुमचा निर्णय "नॉट गिल्टी (निर्दोष)" असा मानण्यात येईल. तुमचा निर्णय काहीही असो, मात्र त्यावर तुम्हा सर्वांचे एकमत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही याला दोषी मानले तर यापुढे कोणतीही माफीची याचिका किंवा वरील कोर्टात दाद मागता येणार नाही. या खटल्यात गुन्हा शाबीत झाल्यास मृत्युदंड बंधनकारक आहे. तुम्हा लोकांवर एक अत्यंत कठिण आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. धन्यवाद."
जजसाहेबांचे बोलणे संपले. तो मुलगा अतिशय चिंतातुर चेहऱ्याने जजसाहेबांकडे आणि ज्युरीतील सदस्यांकडे पाहतोय. ज्युरींच्या चेहऱ्यावरही तणाव आणि दडपण स्पष्ट दिसते आहे.

.....................
१८ वर्षाच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलावर आपल्याच वडिलांचा खून केल्याच्या आरोपावरून हा खटला सुरू आहे. त्याला लहानपणापासून वडिलांकडून मारहाण होत आहे, आई त्याच्या लहानपणीच गेलेली. खुनाच्या काही दिवसापूर्वी त्याने एका दुकानातून सुरा विकत घेतला होता अशी साक्ष दुकानदाराने दिलेली आहे. खून अगदी त्याप्रकारच्या सुऱ्यानेच झाला आहे. सुऱ्यावर मात्र त्याच्या हाताचे ठसे सापडले नाहीत.

खून होण्याच्या आधी त्यांच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एका म्हाताऱ्याने बापलेकात जोरदार वादावादी झालेली ऐकली आहे आणि त्यातही "आय विल किल यू" असे मुलाने म्हटलेलेही त्याने ऐकलेय. त्यानंतर लगेचच कोणीतरी खाली कोसळल्याचा आणि कोणीतरी जिन्यावरून धावत गेल्याचा आवाजही त्याने ऐकला आहे. त्याच्या घराच्या समोर राहणाऱ्या बाईने तर प्रत्यक्ष खून होताना पाहिल्याची साक्ष दिलेली आहे.

अटक झाल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबानुसार भांडण झाल्याचे त्याने मान्य केले आहे. पण घरातून निघून मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेल्याचे त्याने सांगितले. चित्रपटाचे नाव आणि त्यातील कलाकारांची नावे मात्र त्याला सांगता आलेली नाहीत. सुरा खरेदी केल्याचेही त्याने मान्य केले पण तो सुरा आता कुठे आहे असे विचारल्यावर तो त्याच्या खिशाला असलेल्या भोकातून कुठेतरी पडल्याचे त्याने सांगितले.

..................
ज्युरीतील सदस्य चर्चेसाठी एका खोलीत येतात. ते सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले, ज्येष्ठ/मध्यमवयीन आणि मुख्यत्वे मध्यमवर्गातील आहेत. पूर्वग्रह, भिती, संशय, शंका, मानसिक कमकुवतपणा, व्यक्तिगत आयुष्यात आलेले बरेवाईट अनुभव, राग, अविवेक, विचारांचा असमतोल अशा अनेकविध भावांनी ग्रस्त. या बारा लोकांना निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी जर त्या मुलाला दोषी ठरवले तर त्याचा "इलेक्ट्रिक चेअर" वर अंत होणार आहे.

ज्युरींनी त्याला दोषी ठरवले आणि तो निर्दोष असेल तर?
त्याला मिळालेला वकील नवशिका आणि तरूण होता. सरकारने बचावासाठी त्याची नेमणूक केली होती. इतक्या स्वाभाविक पुराव्यांमुळे हा खटला जिंकण्याची शक्यता तशी धूसर होती शिवाय जिंकूनही वकिलाला फारसा आर्थिक फायदा होणार नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या कामात कुचराई तर केली नसेल?
जर त्या मुलाला निर्दोष ठरवले आणि तो खरेच दोषी असेल तर?

पुढे काय? ...............

12 ANGRY MEN,
LIFE is in their hands, DEATH is on their minds!

12 ANGRY MEN [1] हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला होता. संपूर्ण चित्रपट एकाच खोलीतघडतो. अतिशय उत्कंठावर्धक आणि दर्शकांना गुंतवून ठेवणारा चित्रपट. आजही व्यवस्थापन शिक्षणामध्ये/चर्चासत्रांमध्ये याचे प्रदर्शन केले जाते. अभिनय, संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन अतिशय दर्जेदार. संधी मिळाली तर अवश्य पाहावा. पाहणे शक्य नसेल तर इथे [2] संपूर्ण कथा विस्तृत संवादांसह वाचता येईल.

आपला,
(प्रेक्षक) शशांक

[1] http://www.imdb.com/title/tt0050083/
[2] http://www.filmsite.org/twelve.html

सदर लेख पूर्वी मनोगतावर प्रकाशित केला होता. आता तो कालातीत विभागात गूगल ग्रुप्सवर आहे.

Comments

सुरेख

परिक्षण आवडले. वाचून चित्रपट बघायची उत्सुकता आहे. अभिनेत्यांमधले मार्टिन बालसॅम, जॅक वॉर्डेन, हेन्री फोंडा यांची नावे वाचून अभिनयाची जुगलबंदी रंगली असणार असे वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अप्रतिम चित्रपट

खूपच सुंदर चित्रपट. कृष्णधवल असल्याने आणखीच प्रभावी वाटतो.

चांगला परिचय...

...करून दिल्याबद्दल आणि दुव्यांबद्दल (विशेषतः दुसर्‍या) आभार! चित्रपट पाहण्याची इच्छा आहे... पाहू या कधी जमते ते!!

खूप दिवस झाले..

खूप दिवस /महिने झाले हा सिनेमा पाहून ,आता कुठे तबकडी मिळेल याचा शोध घ्यायला हवा. संग्रहात ठेवण्यायोग्यच आहे हा चित्रपट ! आणि त्यावरुन बेतलेला 'रुका हुआ फैसला' सुध्दा! तो पाहून सुध्दा काळ लोटला..
अशा चांगल्या चित्रपटाची आठवण करून दिलीत,खूप छान वाटले.
स्वाती

धन्यवाद

प्रतिसादींचे आणि वाचकांचे आभार! उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देतो. याशिवाय व्यवस्थापनशास्त्राशी निगडीत कार्यशाळेत असे चित्रपट दाखवून नंतर त्यावर बरीच चर्चा घडवली जाते. 'ग्रुप डायनॅमिक्स' आणि 'कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट' या विषयांच्या अभ्यासकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.

सहमत

चित्रपटांपेक्षा मराठी संकेतस्थळांवर मला ह्याविषयी अधिक प्रशिक्षण मिळते

ग्रूप डायमॅमिक्सबद्दलही असेच आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर