'एक रूका हुआ फैसला' - एक वेगळा सिनेमा

मला आवडलेला एक सिनेमा म्हणजे 'एक रूका हुआ फैसला'. या सिनेमाचे दिग्दर्शक बहुतेक सईद मिर्जा आहेत. दुर्दैवाने हा सिनेमा मी कधीच सुरवातीपासून पाहिला नाही. सिनेमाचा विषय काहीसा असा आहे:

एका तरूण मुलावर त्याच्या वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे. आपल्याकडे जुरी पध्दत नाही आहे न्यायदानासाठी असा माझा अंदाज आहे, पण या सिनेमामधे त्या मुलाला दोषी किंवा निर्दोष ठरवण्याची जबाबदारी एका जुरीवर ठेवण्यात येते. या जुरीमधे असलेली माणसे म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामधून आलेली वेगवेगळ्या वयाची माणसे आहेत पण यात एकही स्त्री नाही.

ही सगळी माणसे एका खोलीत रात्रभर चर्चा करतात आणि शेवटी त्या मुलाला निर्दोष ठरवतात. पण या निर्णयापर्यंत पोचण्याआधी त्यांच्यामधे जी चर्चा होते आणि त्यामधे मनुष्यस्वभावाचे दिसणारे विविध नमुने हे अतिशय सुंदर पध्दतीने दाखवलेले आहे.

विशेष म्हणजे या सिनेमामधे एकही रूढ अर्थाने हीरो नाही आहे. के. के. रैना, अनु कपूर, झहीर, पंकज कपूर ही काही नावे आठवतात. आणि या सिनेमामधे एकही गाणे किंवा गरज नसताना घुसडलेले कॉमेडी सिन्स नाहीत. तरीही सिनेमा कंटाळवाणा होत नाही.

प्रथमदर्शनी जे दिसते ते नेहमीच सत्य असते असे नाही आणि आपले मत बदलणे हे कितीही अवघड असले तरीही न्याय होण्यासाठी त्याची गरज असते. एखाद्याचा पूर्वग्रह किंवा अहंकार हा दूसऱ्याच्या जीवाशी गाठ आणू शकतो आणि म्हणूनच माणसाने तारतम्य राखणे किती आवश्यक आहे हे आपल्याला हा सिनेमा बघून जाणवते. प्रत्येकाने एकदा तरी बघावा असा हा सिनेमा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

'शांतता! कोर्ट चालू आहे'

मूळ इंग्रजी चित्रपट पाहिला. पण हा 'एक रुका हुआ.." दूरदर्शनचा असल्याने पुनःप्रक्षेपण / तबकडी हे मार्ग अवघड आहेत. वरचे परिक्षण आणि संजोपरावांचा (या चर्चेतला) प्रतिसाद वाचून चुटपुट लागली आहे.
कोर्ट ड्रामा म्हटले की 'शांतता! कोर्ट चालू आहे' हे पिळवटून टाकणारे विजय तेंडुलकरांचे नाटक हटकून आठवतेच.

तबकडी

हा सिनेमा तबकडी वर इथे उपलब्ध आहे

अवांतर - सई परांजप्यांच्या 'दिशा'ची तबकडी कुठे मिळू शकेल काय? इथे भारतात तरी खूप शोधून मिळाली नाही आहे.

------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

दिग्दर्शक्

या चित्रपटाचे दिग्दर्शक बासु चॅटर्जी आहेत. चित्रपट छानच आहे. मूळ इंग्रजी चित्रपट अजुन बघता आला नाही.

- सूर्य.

फारच छान....

अत्यंत वेगळा आणि सुंदर सिनेमा. पंकज कपूरची अविस्मरणीय भूमिका. त्याचे ते पोक काढून चालणे, वारंवार ओठ चाटणे ,सतत आरोपीच्या विरोधात बोलणे आणि शेवटी तसे करण्याचे कारण स्पष्ट झाल्यावर खचून घायाळ होणे... सगळेच कायम लक्षात रहाण्यासारखे.
अनु कपूरचा गांधीवादी म्हाताराही हुबेहूब. तोंडात दात नसल्याने गालाच्या पोकळ हालचाली (आठवा, 'टिपरे' किंवा 'हसवाफसवी' मधले प्रभावळकर), अंगाची थरथर आणि शेवटी "अब शरीर साथ नही देता, वरना.." ही असहायता. जबरदस्त क्षमता असताना सतत दुय्यम भूमिका आणि सूत्रसंचालन करत रहावे लागलेल्या या गुणी अभिनेत्याविषयी वाईट वाटते.
चित्रपटाची वातावरणनिर्मीती अप्रतिम. दिवसभर चर्चा सुरु असताना कमालीचा उकाडा, तगमग आणि शेवटी ज्यूरी बाहेर पडण्याआधीचा पाऊस सूचक. ज्यूरींची अस्वस्थता दाखवणारे त्यांचे सततचे धूम्रपान, त्यांच्यातले गट आणि पूर्वगृह, एकमेकांच्या जातींविषयी त्यांच्या मनांत असणारी अढी, बेसावध क्षणी मुखवटे बाजूला झाल्यावर दिसून येणारे त्यांचे क्रूर जंगली चेहरे हे सगळे सूक्ष्म.
तथापि प्रथमदर्शनी जे दिसते ते नेहमीच सत्य असते असे नाही आणि आपले मत बदलणे हे कितीही अवघड असले तरीही न्याय होण्यासाठी त्याची गरज असते. एखाद्याचा पूर्वग्रह किंवा अहंकार हा दूसऱ्याच्या जीवाशी गाठ आणू शकतो आणि म्हणूनच माणसाने तारतम्य राखणे किती आवश्यक आहे हे या चित्रपटाचे सूत्र असावे असे वाटत नाही. माणसाचे बहुपेडी स्वभाव आणि जबरदस्तीने घोळक्यात रहावे लागल्यानंतर त्यांचे एकमेकांशी वर्तन हा या चित्रपटाचा विषय असावा. म्हणून शेवटचा रहस्यभेद हा अनावश्यकच वाटतो. ज्यूरींचे एकमत होतच नाही, वादविवाद सुरुच रहातो, धूम्रवेटोळी उठत रहातात आणी बाहेर वेडावाकडा पाऊस पडत रहातो... हीही या चित्रपटाच्या शेवटाची एक शक्यता वाटते.
छान विषय, कल्याणी. अशा इतरही चित्रपटांविषयी लिहा. 'एक डॉक्टर की मौत', 'मैं आजाद हूं' वगैरे.
सन्जोप राव

आवडले... नि पटले

शाळेत असताना मित्राच्या घरी हा चित्रपट दूरदर्शनवर अगदी स्वतःला विसरून पाहिल्याचे अजूनही आठवते(!!). नाव आणि तपशीलाचा पत्ता नव्हता. चित्र समोर उभे केल्याबद्दल संजोपांचे आभार!

कल्याणीताई -आपली आवड पाहून आनंद झाला.

सहमत

प्रथमदर्शनी जे दिसते ते नेहमीच सत्य असते असे नाही आणि आपले मत बदलणे हे कितीही अवघड असले तरीही न्याय होण्यासाठी त्याची गरज असते. एखाद्याचा पूर्वग्रह किंवा अहंकार हा दूसऱ्याच्या जीवाशी गाठ आणू शकतो आणि म्हणूनच माणसाने तारतम्य राखणे किती आवश्यक आहे

जीवाशी गाठ असो वा नसो माणसाने पूर्वग्रह आणि अहंकार सोडून तारतम्य राखणे नक्किच आवश्यक आहे!
चित्रपट पाह्ण्याची उत्सुकता लगली आहे. तबकडीवर उपलब्ध आहे का?

हा चित्रपट/१२ अँग्री मेन

हा चित्रपट पाहिला नाही, पण हा ज्या चित्रपटावर आधारित आहे तो १२ अँग्री मेन पाहिला आहे. त्याचे परीक्षण इथे वाचता येईल.

आभार

सर्वांचे प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

हा सिनेमा मी दोन वेळा सेट मॅक्स या वाहिनीवर बघितला आहे. कदाचित ते पुन्हा दाखवू शकतीलही.

मूळ सिनेमा मीही पाहिलेला नाही, पण आता नक्की बघायचा प्रयत्न करीन.

सन्जोप राव यांनी वर लिहिल्याप्रमाणे अनु कपूर व पंकज कपूर यांचे अभिनय उत्तमच आहेत. त्याचप्रमाणे विशेष उल्लेख के. के. रैना या गुणी अभिनेत्याचा करावासा वाटतो. या सिनेमामधे कुठेही दुसर्‍यावर कुरघोडी करायचा प्रयत्न न करता त्याने अतिशय छान काम केले आहे.

'एक डॉक्टर की मौत' हा सिनेमा खूपच वर्षांपूर्वी बघितला होता त्यमुळे आता पंकज कपूर हा मुख्य भूमिकेत होता या व्यतिरिक्त काहीच आठवत नाही.

चांगला

बर्‍याच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर हा सिनेमा पाहिला होता. आता आठवला. त्याकाळी कलात्मक चित्रपटांची लाट होती.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर