अराजकाच्या वाटेवर पाकिस्तान

पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती फारच तणावपूर्ण आहे आणि या अस्थिरतेचे बरेच दूरगामी परिणाम होतील असे वॉशिंग्टन, लंडन पासून दिल्ली, इस्लामाबादपर्यंतच्या राजकीय आणि वैचारिक वर्तुळांत चर्चिले जात आहे. याच विषयावर निवृत्त कर्नल आठले यांचा लेख रेडिफ या जालनियतकालिकात आलेला आहे. (http://www.rediff.com/news/2007/jun/14guest.htm) त्यात त्यांनी बरेच महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. ते असे,

१. शिक्षित आणि उच्चपदस्थ वर्गात वाढणारा लष्करी शासनाविरुद्धचा असंतोष
२. सर्वसामान्य जनतेच्या मनात अमेरिका आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाविषयी आत्यंतिक द्वेष
३. येत्या निवडणुकीत (इतर राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांपुढे) आपले महत्त्व कमी होईल ही धार्मिक पक्ष आणि संघटनांच्या मनात असलेली भीती. (त्यामुळे लोकप्रियता वाढवण्यासाठी अविचारी मार्गांचा अवलंब होण्याची शक्यता)
४. भारत-पाकिस्तान शांतताचर्चेला बसलेली खीळ. (शांतताचर्चेच्या शेवटी काश्मीर पाकिस्तानला मिळेल अशी सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेच्या मनात भरवून दिलेली धारणा.)
५. सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर भारताच्या आणि भारतीयांच्या मागे पडत चालल्याची भावना.
६. बेरोजगार, तरूण आणि आततायी लोकांचे वाढते प्रमाण
७. लष्करी नेतृत्वाच्या मनात सैन्यावरील आणि देशावरील पकड ढिली होण्याची भीती.
८. मुस्लिम लोकांचे जागतिक पातळीवर हेतुपूर्वक शोषण केले जात असल्याची वाढती भावना.
९. प्रचंड वेगाने वाढती लोकसंख्या (पाकिस्तानातील जननदर प्रत्येक स्त्रीमागे ५.४ मुले इतका आहे.)

(या मुद्द्यांशिवायही इतर बरेच मुद्दे मूळ लेखात विस्ताराने मांडले आहेत. विस्तारभयास्तव इथे देता येणार नाहीत.)

यापैकी कोणत्याही एका किंवा अनेक कारणांचा एकत्रित परिणाम होऊन अस्थिरतेच्या उंबरठ्यावर असेलेला पाकिस्तान खूप मोठ्या राजकीय आणि सामाजिक आणीबाणीच्या परिस्थितीत ढकलला जाऊ शकतो. याचे जागतिक स्तरावर अतिशय दूरगामी आणि भयानक परिणाम होऊ शकतील. भारताला विशेषतः या बर्‍यावाइट परिणामांची मोठी झळ बसेल हे उघड आहे.

१. आपल्याला पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटते?
२. वर दिलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ/खंडनार्थ काही माहिती तुमच्याकडे आहे का?
३. पाकिस्तानात अराजक माजले तर काय परिणाम होतील याविषयी काही कल्पना तुम्ही करू शकता का?
४. भारतीय आणि जागतिक नेतृत्वाला हे थांबवण्यासाठी काही करता येईल का?

आपला,
(शेजारधर्मदक्ष) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

लेखनविषय: दुवे:

Comments

भारत

४. भारतीय आणि जागतिक नेतृत्वाला हे थांबवण्यासाठी काही करता येईल का?

-मला तर असले अराजक माजवण्यात भारताचा हात असल्याचा दाट संशय येतो. तेव्हाच सगळे शेजारधर्मदक्ष गांधीवादी काँग्रेसवाले गप्प आहेत. आणि आपण थांबवायच्या फंदात पडातयचं कशाला. अलिप्त राष्ट्र संघटनेचे संस्थापक संचालक आहोत् आपण. अलिप्त राहायचं. नाहीतरी तेवढंच कश्मीरचवरचं पाकीस्तानच लक्ष कमी झालंय.

अभिजित..
ठकास महाठक ठोश्यास ठोसा -समर्थ रामदास

संशय का मनी आला?

अभिजितराव, आपले मत व्यक्त केल्याबद्दल आभारी आहे.
मला तर असले अराजक माजवण्यात भारताचा हात असल्याचा दाट संशय येतो
असा संशय येण्यामागे काय कारणे आहेत बरे?
आपला
(प्रश्नग्रस्त) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

जशास तसे

आपल्या इकडे पाकिस्तान दंगे करवते. म्हणून् आपण तिकडे. आपलीही गुप्तचर संघटना आहेच की. श्रीलंकेत नाही का आपण लिट्टेला मदत करत.

काहीच नाही.

१. आपल्याला पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटते?
काहीच नाही.
२. वर दिलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ/खंडनार्थ काही माहिती तुमच्याकडे आहे का?
काहीच नाही.
३. पाकिस्तानात अराजक माजले तर काय परिणाम होतील याविषयी काही कल्पना तुम्ही करू शकता का?
काहीच नाही.
४. भारतीय आणि जागतिक नेतृत्वाला हे थांबवण्यासाठी काही करता येईल का?
काहीच नाही.

नाराज अमावस्या.
[उपक्रमवर उद्या शेवटचा दिवस]
मजकूर संपादित. इतर सदस्यांच्या नावांवर व्यक्तिगत रोखाची टिप्पणी करणारे प्रतिसाद कृपया देऊ नये ही विनंती.

पाकिस्तान : माकडाच्या हातात कोलीत

१. आपल्याला पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटते?

ही परिस्थिती काही एका दिवसात झालेली नाही. भारतद्वेष हे एकमेव धोरण ठेवून केलेल्या वाटचालीचे हे फलित आहे. शिवाय तेथील राज्यकर्ते धार्मिक कट्टरतेलाही आजवर खतपाणीच घालत आले. लोकशाहीच्या नावाखाली मूठभर लोकांची ठोकशाही आणि इतर वेळी उघड उघड लष्करी हुकुमशाही यामुळे तेथे (विचारप्रवण = समंजस = थंड) मध्यमवर्ग निर्माणच झाला नाही. त्यामुळे समाज विचार करायलाच विसरला. पाकिस्तान हे राज्य नाही - अराजक आहे असे म्हणण्याची वेळ त्यामुळेच आली.

२. वर दिलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ/खंडनार्थ काही माहिती तुमच्याकडे आहे का?
३. पाकिस्तानात अराजक माजले तर काय परिणाम होतील याविषयी काही कल्पना तुम्ही करू शकता का?

'पाकिस्तानात अराजक माजले तर' - नव्हे ते माजलेच आहे. फक्त ज्वालामुखीचा स्फोट होणे बाकी आहे. आज ऐकू येणार्‍या कुरबुरी त्या विस्फोटाच्या पूर्वसूचना आहेत.
हा विस्फोट जेंव्हा होईल तेंव्हा अत्यंत आततायी, धर्मांध मंडळी सत्तेचा कब्जा घेतील. ज्या लष्करालाच दहशतवादी बनवले जाते त्या लष्कराकडून त्यांना विरोध होईल असे वाटत नाही. एखादा धर्मांध लष्करी अधिकारी त्याचा ताबा घेईल.
ही परिस्थिती भारताच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. एकतर भारत हा काफिरांचा देश असे त्यांचे मत, त्यात काश्मीर मिळत नाही, आणि बांग्लादेश निर्मितीचा सल यामुळे कुरापत काढून भारताला अद्दल घडवण्यासाठी ते टपूनच आहेत. त्यांच्याकडील क्षेपणास्त्रे आणि अणुध्वम हे माकडाच्या हातातले कोलीत आहे. सध्याचा हुकुमशहा अमेरिकेशी मैत्रीचे नाटक करत असल्याने उघड्यावर त्याला संभावित बनावे लागते. पण उघडपणे धर्मांधच सत्तेवर आले तर त्यांना आवरणार कोण? शेवटी नुकसान तर आपलेच होणार.
म्हणून परिणामांची कल्पना आहे पण ती न करणेच उत्तम!

४. भारतीय आणि जागतिक नेतृत्वाला हे थांबवण्यासाठी काही करता येईल का?
यु.स्टे. ऑ. अमेरिकाच काही करू शकते. त्यांनीच दबाव आणून पाकिस्तानच्या सर्व आण्विक सुविधांवर ( Atomic facilities) जागतिक निरिक्षक आणि पहारेकरी नेमणे गरजेचे आहे. सध्याच्या लष्करशाहीला 'सुसरबाई, तुझीच पाठ मऊ' म्हणून तिच्यावर स्वार झाले पाहिजे.
चीन तर भारताला मदत करण्यासाठी काहीच करणार नाही. ही सारी पाकी अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे त्यांचीच कृपा ! आपला जानी दोस्त रशिया अजून स्वतःचाच घोळ निस्तारत आहे. भारतातील सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याचा अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांना आणि पर्यायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फायदा आहे. त्यामुळे तेच या प्रश्नात लक्ष घालतील असे वाटते. बाकीची सं.रा. सुरक्षा समितीतली राष्ट्रे (यु.के., जर्मनी, फ्रान्स् इ.) या प्रश्नी अमेरिकेचीच री ओढतील असे वाटते...

भारतीय नेतृत्वाला पाकिस्तान जुमानेल असे मुळीच वाटत नाही. पण भारताच्या थंड शासकांनी याबाबत निदान जगभर शंख तरी करायला हवा.

मर्कटलीला

विसुनाना, आपल्या विस्तृत विवेचनाबद्दल आभारी आहे.

भारतद्वेष हे एकमेव धोरण ठेवून ....
पाकिस्तानच्याही काही जागतिक महत्त्वाकांक्षा आहेत जसे जगातील सर्व मुस्लिम देशांचे नेतृत्व स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न, अमेरिकाप्रणित आतंकवाद विरोधी लढ्यातील प्रमुख साथीदार म्हणून राजकीय वजन वाढवण्याचे प्रयत्न इत्यादी. शिवाय पाकिस्तानात अराजक माजले तर भारताबरोबरच मध्य-पूर्व, अमेरिका, ब्रिटन आदी युरोपियन देश या सर्वांना धोक्याचे होऊ शकेल.

यु.स्टे. ऑ. अमेरिकाच काही करू शकते.
सहमत. पाकिस्तानावर काही प्रतिबंधात्मक कारवाई करावी असा विचार अमेरिकन राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

बाकीची सं.रा. सुरक्षा समितीतली राष्ट्रे (यु.के., जर्मनी, फ्रान्स् इ.) या प्रश्नी अमेरिकेचीच री ओढतील असे वाटते
असहमत. ब्रिटन वगळता सुरक्षा समितीतील इतर देश अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी धोरणांना विरोध करतील असे पूर्वानुभवावरून वाटते.

आपला
(मर्कटलीलावलोकक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

मुशर्रफ, युरोप आणि इंग्लंड

आज मुशर्रफांना पाकिस्तानात पर्याय नाही, हे स्पष्ट आहे.
पण मुशर्रफ नंतर काय हा कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वॉशिंग्टन मधील थिंक टँक्सचे बरेच पाणी वाहात असावे.

अमेरिकेला जर्मनी आणि फ्रांस हे दोन नवीन मित्र मिळाले आहेत. गेल्या दोन वर्षात ह्या देशांत अमेरिकेचे मित्र राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत (मर्केल आणि सार्कोझी.) ब्लेअर गेल्यावर ब्रिटनच्याच मैत्रीची शाश्वती उरलेली नाही, असे वाटते.
जर्मनी, फ्रान्सशी अमेरिकेचे संबंध पूर्वीइतके ताणलेले नाहीत हे खरे, पण अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या आततायी निर्णयाचे डोळे झाकून समर्थन ते करणार नाहीत. या दोन्ही देशांतील आणि इंग्लंड-इटली वगळता बहुतेक सर्व पश्चिम युरोपीय देशांतील जनमत सर्वसाधारणपणे इराक-युद्ध-विरोधी पर्यायाने बुश-विरोधी आहे त्यामुळे अमेरिकेचे समर्थन राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते. इंग्लंडमधेही ब्लेयरांचे बुशप्रेम देशहिताचे नाही हे सर्वसामान्य जनतेला आणि ब्लेयर यांच्या पक्षबांधवांनाही कळून चुकले आहे.

आपला
(आंतरराष्ट्रीय) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

देशहिताचे काय - भारताला लागू?

देशहिताचे काय आहे, आणि काय नाही, हे अतिरेकी हल्ल्यानंतर सामान्य जनतेला कळते.
हे विधान भारताला कितपत लागू पडेल असे वाचकांना वाटते?
मला तरी वाटत नाही. ;) (उदा. उ.प्र. आणि गोव्यातील निवडणुका)

थोडक्यात उत्तरे

१. आपल्याला पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटते?
काळजी!
२. वर दिलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ/खंडनार्थ काही माहिती तुमच्याकडे आहे का?
नाही.
३. पाकिस्तानात अराजक माजले तर काय परिणाम होतील याविषयी काही कल्पना तुम्ही करू शकता का?
हो. थोडीफार. भारतावर हल्ले, क्षेपणास्त्रांचा वापर व निर्वासितांचे लोंढे!
४. भारतीय आणि जागतिक नेतृत्वाला हे थांबवण्यासाठी काही करता येईल का?
हो. पाकिस्तानी अर्थव्यवस्था पूर्णपणे परदेशी मदतीवर चालते आहे. तेव्हा मदतशील देशांना नक्कीच काही करता येईल. भारताला (स्वतःचे लष्करी बळ वाढवून मग) पाकिस्तानातील बेरोजगारी कमी करण्यासाठी औद्योगिक मदत देऊ करता येईल. सर्वसामान्य जनतेच्या मनात भारताविषयी, भारतीयांविषयी प्रेम निर्माण केल्यास जमेल असे वाटते.

परदेशी मदत

मृदुलाताई, आपल्या संक्षिप्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपण थोडक्या शब्दात परिस्थितीचे नेमके विश्लेषण केले आहे. विशेषतः चौथ्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

पाकिस्तानी अर्थव्यवस्था पूर्णपणे परदेशी मदतीवर चालते आहे. तेव्हा मदतशील देशांना नक्कीच काही करता येईल.

ही परदेशी मदत स्वीकारणारे जे लोक आहेत त्यांचे सर्वसामान्य जनतेवर कितपत नियंत्रण आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. उदा. आतंकवाद्यांचे तळ ज्या ठिकाणी (अधिक संख्येने) आहेत त्या वझीरिस्तान प्रांतावर पाक सैन्याचे नियंत्रण नाही आणि इतर देशांच्या सैन्याला तिथे येऊ न देण्याचे तिथल्या शासकांचे धोरण आहे. अश्या परिस्थितीत काय करणे शक्य आहे?

आपला
(कूटप्रश्नग्रस्त) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

पुन्हा राष्ट्राध्यक्ष आणि नव्या घडामोडी

बहुमताने निवडून येऊन मुशर्रफ यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदावर आपला दावा सांगितला आहे. अर्थात याला न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे पण ती मिळेल(च) असे दिसते आहे. बेनझीर भुट्टो यांच्याशी केलेला गुप्त करार, नवाझ शरीफ यांना पुन्हा हद्दपार करणे, अमेरिका आणि अमेरिकेच्या साथीदारांविषयी वाढता असंतोष आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अघोषित यादवी या सर्वांमुळे पाकिस्तानातील परिस्थिती अधिकच क्लिष्ट आणि बेभरवश्याची बनली आहे.
राष्ट्राध्यक्ष बनल्यास लष्करप्रमुख हे आपले पद सोडण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. यामुळे मुशर्रफांची दुसरी कारकीर्द कितपत टिकेल आणि त्यांचे पाकिस्तानावर खरोखरीचे नियंत्रण कितपत असेल याविषयी शंकाच आहे.
आपला
(वार्ताहर) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

मोठा भाऊ.

भारताची भूमिका मोठ्या भावाची असली पाहिजे.

सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तान्, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका या देशातील गुणवंत आणि प्रतिभाशाली तरुणांना नौकरीसाठी संधी दिली पाहिजे. ( अमेरिका देते तशी).

औद्योगिक वसाहतीत अशी संधी दिली तर ५ वर्षात आमुलाग्र बदल झालेला दिसेल.

असहमत

सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तान्, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका या देशातील गुणवंत आणि प्रतिभाशाली तरुणांना नौकरीसाठी संधी दिली पाहिजे. ( अमेरिका देते तशी).

अमेरिकेशी तुलना सर्वथा अयोग्य वाटते. भारत अजूनही विकसनशीलच आहे. भारत विरुद्ध इंडिया संघर्षात बाहेरच्यांना फायदा कशाला? लष्करात गुरखा रेजिमेंट आहे , पाक नाही.

प्रकाश घाटपांडे

महासत्तेच्या वाटेवर.

भारत महासत्तेच्या वाटेवर आहेच पण त्याच बरोबर अश्या प्रस्तावाने या सर्व देशातील दरी कमी होत जाईल असा माझा विश्वास आहे.

 
^ वर