तर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न ठरले

अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष या दोनच जाती आहेत,गंधर्व नेहमी सत्यच

बोलतात तर यक्ष असत्यच हे आपण जणताच.या बेटावरील लोक पुरोगामी विचाराचे आहेत. इथे आंतरजातीय(गंधर्व -यक्ष) विवाहांवर कोणतेही सामाजिक बंधन नाही. वधुवरांची परस्पर संमती हाच निकष.

येथील अनुमिन्दा या युवतीचा विवाह ठरला. तरुमित्र, दन्युमान आणि धन्वंगज या तीन स्थानिक तरुणांतील एक तिचा नियोजित वर आहे. या विवाहासंबंधी या चार जणांनी पुढील प्रमाणे विधाने केली:

अनुमिन्दा:-मी आणि माझा नियोजित वर एकाच जातीचे आहोत.
तरुमित्र:-आम्हा तीन तरुणांत केवळ एकच जण गंधर्व आहे.
दन्युमानः- आम्हा तीन तरुणांत केवळ एकच यक्ष आहे.
धन्वंगजः- तरुमित्र आणि दन्युमान या दोघांतील एक तरुण अनुमिन्दाचा नियोजित वर आहे.
तर अनुमिन्दाच्या नियोजित वराचे नाव काय?
या चारांतील कुणा कुणाच्या जाती निश्चित करता येतील त्या करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

ही नावे

आपल्याला कोठून मिळतात? प्रश्न कृपया, अस्थानी समजू नये.

अनुमिन्दा, दन्युमान, धन्वगंज या शब्दांचे अर्थ सांगावेत.

नावे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांस,
[अमरद्वीपावरील गंधर्व-यक्षांत ही नांवे प्रचलित आहेत.त्यांच्या भाषेचे ज्ञान मला नसल्याने अर्थ सांगता येत नाहीत.]
असो. हे गमतीने लिहिले. अहो, मराठीत ३६ व्यंजने आहेत.आणि गेला बाजार १२ तरी स्वर आहेतच.त्यांतून अनेक अक्षरे,जोडाक्षरे होतात. त्यांच्या संयोगांतून अनेकानेक शब्द निर्माण करता येतात.तशीच ही नावे मी बनविली आहेत.ती चांगली अर्थपूर्ण आहेत असा आभास निर्माण केला आहे.वस्तुतः ती सार्थ असतीलच असे नाही.खरे तर तुमच्या नावाचा नेमका अर्थ काय तेही मला समजत नाही.
......ता.क...वरपरीक्षेला आलेल्या एका तरुणाच्या अंगावर धनुष्याकृती जन्मचिह्न आहे. म्हणून त्याचे नाव 'धन्वंगज' आहे.'धन्वगंज' नव्हे!

नावाची कहाणी

ती चांगली अर्थपूर्ण आहेत असा आभास निर्माण केला आहे.वस्तुतः ती सार्थ असतीलच असे नाही.

मलाही ती अर्थपूर्ण वाटली आणि त्यांना अर्थ असावा की काय असे वाटले.

खरे तर तुमच्या नावाचा नेमका अर्थ काय तेही मला समजत नाही.

माझ्या नावाची कहाणी येथे बर्‍याचजणांना माहित आहे. आपल्यासाठी एक खरड लिहिते.

वरपरीक्षेला आलेल्या एका तरुणाच्या अंगावर धनुष्याकृती जन्मचिह्न आहे. म्हणून त्याचे नाव 'धन्वंगज' आहे.'धन्वगंज' नव्हे!

हो की! माझी नजरचूक झाली. क्षमस्व!

प्रयत्न

अनुमिंदा - गंधर्व
तरुमित्र - यक्ष
दन्युमान - गंधर्व
धन्वंगज - गंधर्व

अनुमिंदाचा नियोजीत वर - दन्युमान

- सूर्य

विनंती

यना, एक विनंती आहे. इथून पुढे तर्कक्रीडेचे शीर्षक असे द्यावे. म्हणजे तरी लोक जी काही बरोबर चूक उत्तरे व्यनिने पाठवतील.
तर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न ठरले (उत्तरे व्यनिने पाठवावी)

अभिजित

तर्क.२५ अनुमिन्दा:उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
राधिका,क्लिन्टन आणि अमित कुलकर्णी यांची उत्तरे आली. सर्व उत्तरे बरोबर आहेत. सर्वांत त्वरित उत्तर राधिका यांचे आले. कोडे स्थापित केल्यापासून आठव्या मिनिटाला राधिका यांचा निरोप आला.हे आश्चर्यकारक आहे.
श्री. क्लिन्टन यांनी सविस्तर युक्तिवाद लिहिला आहे. तो इतका नेमका आणि प्रभावी आहे की त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच. अन्य दोघांनी तर्क लिहिला नाही.
.........यनावाला.

तर्क.२५ अनुमिन्दा.. उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अदिती आणि तो यांची उत्तरे आली आहेत. ती बरोबर आहेत हे सांगायलाच नको. तर्क कसा लढवला हे दोघांनीही लिहिले आहे. तो यांचा युक्तिवाद अगदी संक्षिप्त पण परिपूर्ण आहे..अदिती यांचाही तर्कक्रम आणि त्याची मांडणी उत्तम आहे.
.......यनावाला
मृदुला यांचा निरोप आताच आला.त्या उत्तर शोधण्यात यशस्वी ठरल्या आहेत.योग्य युक्तिवादही लिहिला आहे.
.......यनावाला
वरदा यांनीही खरे उत्तर शोधले आहे.
.......यनावाला

कठीण जाते !!

मला अश्या प्रकारची कोडी सोडवणे जरा कठीण जाते आहे असे ल़क्षात आलेय माझ्या

मला अश्या कोड्याबाबतीत नक्की कुठल्या दिशेने, कसा विचार करायचा ह्याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल काय? जमले तर हेच उदाहरण घेऊन ?

तर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न ठरले....उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री.क्लिन्टन यांनी पाठविलेले उत्तर खाली जोडले आहे. तेच या कोड्याचे प्रमाणभूत उत्तर मानावे.........यनावाला.

--

१) अनुमिन्दा म्हणते की ती आणि तिचा नवरा एकाच जातीचे आहेत. जर ती गंधर्व असेल तर ती सत्य बोलत आहे आणि तिचा नवरा गंधर्व असेल. जर ती यक्ष असेल तर ती असत्य बोलेल आणि तिचा नवरा यक्ष आहे हे खोटे असेल. म्हणजेच तिचा नवरा गंधर्व असेल.

याचा अर्थः अनुमिन्दा गंधर्व/यक्ष कोणीही असली तरी तिचा नवरा गंधर्वच असेल.

२) आता धन्वंगजाच्या वाक्याकडे वळू या.तो म्हणतो की 'तरुमित्र आणि दन्युमान या दोघांतील एक तरुण अनुमिन्दाचा नियोजित वर आहे' याचा अर्थ धन्वंगज म्हणतो 'मी तिचा नवरा नाही'. जर धन्वंगज यक्ष असेल तर तो असत्य बोलेल म्हणजे धन्वंगज तिचा नवरा झाला. पण पहिल्या वाक्यातील conclusion प्रमाणे तिचा नवरा गंधर्व आहे. म्हणजेच धन्वंगज यक्ष असू शकणार नाही. तो गंधर्वच असला पाहिजे आणि तो सत्य बोलत असल्यामुळे तो तिचा नवरा नाही. म्हणजे नवरा उरलेल्या दोघांमधील-- तरूमित्र आणि दन्युमान यापैकी एक.

३) तरूमित्र म्हणतो '३ तरूणांमध्ये एकच गंधर्व आहे'. तो गंधर्व असेल तर ते सत्य असेल. पण conclusion क्रमांक २ प्रमाणे धन्वंगज गंधर्व आहे हे उघड आहे.म्हणजे ३ पैकी कमितकमी २ गंधर्व झाले. म्हणजे तरूमित्र खोटे बोलत आहे आणि तो यक्षच असला पाहिजे.म्हणजे त्याचे वाक्य '३ तरूणांमध्ये एकच गंधर्व आहे' हे असत्य आहे.तरूमित्र स्वतः यक्ष असल्यामुळे दन्युमान गंधर्व असला पाहिजे.

४) दन्युमान म्हणतो '३ तरूणांमध्ये एकच यक्ष आहे'. क्रमांक ३ च्या conclusion प्रमाणे तो गंधर्व आहे आणि तो बोलत आहे ते सत्य आहे. म्हणजेच एकच (तरूमित्र) यक्ष झाला. तरीही पडताळणीसाठी तो यक्ष असेल तर काय होईल ते बघू या.

तो यक्ष असेल तर एकूण २ यक्ष आणि १ गंधर्व झाले.पण क्रमांक ३ मध्ये म्हटल्याप्रमाणे गंधर्वांची संख्या १ असू शकत नाही. म्हणजे दन्युमान हा गंधर्वच असला पाहिजे.

म्हणजे--
१) तरूमित्र : यक्ष
२) दन्युमानः गंधर्व
३) धन्वंगजः गंधर्व

गंधर्व धन्वंगज म्हणत आहे की तो तिचा नवरा नाही आणि ते सत्य आहे. तसेच क्रमांक १ मध्ये म्हटल्याप्रमाणे अनुमिन्दाचा नवरा गंधर्वच आहे. याचा अर्थ तिचा नवरा दन्युमान आहे.

क्रमांक १ मध्ये म्हटल्याप्रमाणे अनुमिन्दा गंधर्व/यक्ष कोणीही असली तरी तिचा नवरा गंधर्वच आहे. याचाच अर्थ अनुमिन्दाची जात दिलेल्या माहितीवरून ठरवता येणार नाही.

क.लो.अ.

-----विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

दन्युमानः

कोणचेही उत्तर् न वाचता

१.अनुमिन्दा:-मी आणि माझा नियोजित वर एकाच जातीचे आहोत.
२.तरुमित्र:-आम्हा तीन तरुणांत केवळ एकच जण गंधर्व आहे.
३.दन्युमानः- आम्हा तीन तरुणांत केवळ एकच यक्ष आहे.
४. धन्वंगजः- तरुमित्र आणि दन्युमान या दोघांतील एक तरुण अनुमिन्दाचा नियोजित वर आहे.

उत्तर

अनुमिन्दा, दन्युमानः, धन्वंगजः > गंधर्व
तरुमित्र > यक्ष
अनुमिन्दा चा वर दन्युमानः

 
^ वर