हिंदू धर्मातील श्रादध संकल्पना

काही वर्षांपूर्वी माझ्या मावशीबरोबर चर्चा करताना तिला पडलेला एक प्रश्न तिने मला सांगितला. तिला अजून तरी कोणी याबद्द्ल समाधानकारक उत्त्तर देऊ शकले नाही. मी स्वतः काही जणांना याबद्द्ल विचारले पण तेसुद्धा नीट उत्तर देऊ शकले नाहीत. उपक्रम परिवारात बरेच व्यासंगी आणि चौफेर ज्ञान असलेले सभासद आहेत, म्हणून इथे हा प्रश्न विचारायचे धाडस करत आहे. माझे या विषयातील ज्ञान अतिशय अल्प आहे, त्यामुळे चु. भू. द्या. घ्या.

आपल्या हिंदू धर्मात दिवंगत व्यक्ति आत्म्याच्या रूपाने वावरत असतात असे मानतात. पण आपल्या धर्मात पुनर्जन्म ही संकल्पनाही आहे. म्हणजेच बहुतांशी व्यक्ति या कुठे ना कुठेतरी पुनर्जन्म घेतात असे मानता येऊ शकते का? (एखादा मृत्यु झाला की त्या व्यक्तिच्या नावाने घरात दिवा लावायची पद्धत आहे आणि त्या भोवती असलेल्या पिठामधे ज्या प्राण्याचे/ पक्षाचे पाय उमटतात त्या योनीत त्या व्यक्तिचा पुनर्जन्म होणार असे काही जण मानतात). मग जर दिवंगत व्यक्ति पुनर्जन्म घेऊन कुठेतरी पुन्हा वावरत असेल तर अशा व्यक्तिच्या नावे श्राद्ध घालणे कितपत बरोबर आहे? कारण श्राद्ध करताना त्या व्यक्तिचे स्मरण करून तिच्या नावाने उदक व पिंड ठेवायचा असतो कारण ज्या आत्म्यांना मुक्ति मिळत नाही असे आत्मे अन्न-पाण्यासाठी तळमळत असतात. पण त्या व्यक्तिने तर पुनर्जन्माची योनी पिठातल्या पायांच्या रूपाने आधीच ठरवली आहे. मग या दोन संकल्पना परस्परविरोधी वाटतात.

अर्थात कोण मुक्त झाले आणि कोण अजूनही आत्म्याच्या रूपाने वावरत आहेत हे सगळे सांगणे अजूनतरी कुणाला शक्य नाही असे वाटते.

श्राद्ध आणि पुनर्जन्म यावर माझा विश्वास आहे किंवा नाही याविषयी प्रश्न उपस्थित न करता आपल्या धर्मात याबद्द्ल काय स्पष्टिकरण आहे हे कोणी सांगू शकेल काय? कारण हे वाचून कोणीही म्हणेल की तुमचा विश्वास नसेल तर सोडून द्या किंवा विश्वास असेल तर शंका घेऊ नका. पण मनात असलेला हा प्रश्न पिच्छा सोडत नाही. या समूहावर समाधानकारक उत्तर मिळेल या अपेक्षेत आहे.

कल्याणी.

लेखनविषय: दुवे:

Comments

पुढचा जन्म आमिबाचा! ;)

उपक्रम परिवारात बरेच व्यासंगी आणि चौफेर ज्ञान असलेले सभासद आहेत,

काय म्हणालात?

उपक्रम परिवारात बरेच व्यासंगी आणि चौफेर ज्ञान असलेले सभासद आहेत,

हां हां! बरं बरं! ;)

(एखादा मृत्यु झाला की त्या व्यक्तिच्या नावाने घरात दिवा लावायची पद्धत आहे आणि त्या भोवती असलेल्या पिठामधे ज्या प्राण्याचे/ पक्षाचे पाय उमटतात त्या योनीत त्या व्यक्तिचा पुनर्जन्म होणार असे काही जण मानतात).

माझी एक शंका. समजा जर मृत व्यक्तिने पुढचा जन्म अमिबाच्या योनीत घेतला तर अमिबाचे पिठात उमटलेले पाय कसे दिसणार? कारण संबंध अमिबादेखील नुसत्या डोळ्यांना दिसत नाही, मग त्याचे पाय कसे दिसणार?

अवांतर - अमिबाला किती पाय असतात?

असो,

आपला,
अमिबा अभ्यंकर.

प्रतिसाद

पिंडाला कावळा शिवला की मोक्ष मिळतो हे त्या कावळ्याला कळत असते तर आज त्यांनी अख्ख्या समाजावर राज्य केले असते.

हिंदू धर्मात बर्‍याच गोष्टी अशा केल्या जातात की त्या पटत नाहीत. आधीच्या पिढ्यांनी त्या पटवून न घेता मानल्या आणि त्यांच्या परंपरा झाल्या. सत्यनारायण, वास्तुशांत, लग्नाचे विधी(वेगवेगळ्या पद्धती), इतर अशास्त्रीय रुढी. आता सगळ्यांचाच लेखाजोखा मांडायचा झाला अन् बदलायचं ठरवलं तर धर्म बदलण्यासारखं होईल.

अवांतरः महात्मा गांधींनी सुद्धा हिंदु विवाह पद्धती पुरस्कृत केली आहे. याला संदर्भ आहे सध्या आठवत नाही.

मजकूर संपादित. विषयाशी संबंधित नसलेला मजकूर खरडवहीतून पाठवावा.

विचारप्रवाह

कल्याणीताई, आपण खूप महत्त्वाचा विषय मांडला आहे. पितरांची पूजा इतर जुन्या संस्कृतींमध्येही दिसून येते. हिंदू संस्कृतीत वेगवेगळ्या दिशांना वाहणारे अनेक प्रवाह-उपप्रवाह आहेत वेगवेगळ्या मान्यता आणि वाद (थिअरीज) आहेत. मृत्यूपश्चात मनुष्याचे नेमके काय होते याविषयी प्रत्येक मान्यतेनुसार वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि या विचारांनुसार वेगवेगळ्या आचारपद्धतींचा उदय झाला आहे. उदा. गीता आणि उपनिषदे यांचा संदर्भ घेतला तर आपले सगे-सोयरे, नातेवाईक या जन्मातही 'आपले' नाहीत तर मृत्यूपश्चात आपला त्यांच्याशी संबंध असणे शक्य नाही मग श्राद्धाचे निमित्तच उरत नाही.
आपला
(तत्त्वज्ञानाभ्यासक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

वासुदेवा,

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:

याचा अर्थ काय रे वासुदेवा? आमच्यासारख्या सामान्य माणसांना संस्कृत कळत नाही रे! म्हणून विचारतो! ;)

आपला,
(शिव्यांचा अभ्यासक!) धुरंधर भाटवडेकर.

पिंड आणि उपक्रमी.

आमच्या विश्वमान्यधर्मात अशा गोष्टी नाहीत.आपण उल्लेखलेल्या गोष्टीही मी मानत नाही.पण रिस्क घेत नाही.आत्मे,भुते,देव,या गोष्टी माननारा एक वर्ग हजारो वर्षापासून आहे,तसा त्यांना न माननारा एक वर्ग आहे,तेव्हा श्राद्ध आणि पुनर्जन्म या विषयावर आपला अधिकार नाही.आम्ही तर एक असा धर्म की, संप्रदाय पाहिला आहे की,ते म्हणतात पाच हजार वर्षापूर्वी आपण माणूस म्हणून येथे वावरत होतोच.तिथे तर पाय उमटण्याचा प्रश्नच नाही.

अवांतर ;) उपक्रम परिवारात बरेच व्यासंगी आणि चौफेर ज्ञान असलेले सभासद आहेत,असे म्हटल्यामूळे,ध्येयधोरणाने कितीही पिडीत असू.ज्ञान नसले तरिही,काहीतरी लिहिलेच पाहिजे या प्रेरणेने आमचा हा अभ्यासपूर्ण प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त! ;)

ध्येयधोरणाने कितीही पिडीत असू.ज्ञान नसले तरिही,काहीतरी लिहिलेच पाहिजे या प्रेरणेने आमचा हा अभ्यासपूर्ण प्रतिसाद.

उडिबाबा! ;)

बिरुटेसाहेब,

'ध्येयधोरणांनी पिडित' हे आवडलं! ;)

आपला,
('गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही', हे तत्व अंगिकारल्यामुळे कुठलीच ध्येयधोरणं नसलेला आणि ध्येयधोरणांसारख्या मोठमोठ्या शब्दांना घाबरणारा!) धुरंधर भाटवडेकर.

भाटवडेकर का भटावडेकर

आपल्याला तर बुवा भटा वडे करच आवडले.

वर्तक

पुणे येथील श्री. वर्तक यांचा या विषयावर सखोल अभ्यास आहे. त्यांचे 'पुनर्जन्म' नावाचे एक पुस्तक आहे.
त्यात असल्या प्रश्नांची समाधानकारक (?) उत्तरे मिळू शकतील.

=======================================
मजकूर संपादित. अश्याप्रकारचे व्यक्तिगत प्रतिसाद सदस्यांना व्य. नि. किंवा खरडवहीतून कळवावे. -- उपसंपादक.

वर्तक????

अरे देवा! पुन्हा वर्तक?? :(

पुन्हा वर्तक

वर्तक तेवढेही वाईट नाहीत हो. (म्हणजे मी कोण देणार सर्टीफिकिट?) :(

या माणसाचा व्यासंग अफाट आहे. त्यांचे संदर्भ चांगले असतात. फक्त त्या संदर्भातून आणि माहितीतून ते स्वतःची अनुमाने काढायला लागले की घोळ होतो. (आणि ते सूक्ष्मदेह वगैरे वगैरे) परंतु केवळ त्यांनी दिलेले संदर्भ लक्षात घेतले तर त्यांची पुस्तके उपयुक्त आहेत. विशेषतः वास्तव रामायणात आणि स्वयंभूत येणारे महाभारत, रामायण आणि पुराणांविषयी अनेक संदर्भ अत्यंत उपयुक्त (अचूक असे म्हणत नाही कारण १००%ची ग्यारंटी देत नाही) आहेत. एखाद्यास चौफेर वाचन करायचे झाल्यास वर्तकांना सहज टाळता येण्यासारखे नाही. (अर्थात, माझेही त्यांच्याबद्दल अनेक आक्षेप आहेतच.)

चू. भू. दे. घे.

यदा यदा..

हो हो या भूतलावर लोक जेव्हा जेव्हा असल्या शंका विचारत राहतील तेव्हा तेव्हा वर्तकांचा उल्लेख होणारच !

ग्लानि

म्हणजे आता आत्मा,पुनर्जन्म,प्लँचेट यातून मुक्ती नाही का?
प्रकाश घाटपांडे

चौर्‍यांशी

पण समजा आत्म्याचे चौर्‍यांशी लक्ष पुनर्जन्म होतात
चौर्‍यांशी लक्ष पुनर्जन्म होतात असे नसून चौर्‍यांशी लक्ष योनी (म्हणजे स्पेसिज असावेत) आहेत असे ऐकले आहे.
आपला
(स्मरणशील) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

चौर्‍याऐशी लक्ष - मग मोक्ष

चौर्‍याऐशी लक्ष - मग मोक्ष असा हिशोब नाही. आत्मा फिरतच राहतो. इट इज अ नेव्हर एंडिंग सायकल! जोपर्यत सार्‍या वासनांचा आणि पूर्वसंचिताचा र्‍हास होत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहते.
म्हणूनच मानवजन्म महत्वाचा. या योनीत माणूस (जीव/ आत्मा) (जन्मातील) स्वतःच्या मनावर आणि कृत्यांवर ताबा ठेवू शकतो. त्यामुळे वासनांचा आणि पूर्वसंचिताचा र्‍हास करून तो 'ईझीली' मोक्ष मिळवू शकतो.

वरील सारे 'असे म्हणतात' या सदरात मोडते हे सांगणे नलगे. मी चार्वाकाचा अनुयायी आहे. (त्यामुळेच क्रेडिट् कार्डचे हप्ते भरत असतो.;) आपल्या कोणत्याही कृत्याचे समर्थन या ना त्या तत्वज्ञानात सापडतेच! ;);))

८४,००,०००

ज्यावेळी लिहिले तेंव्हा इतक्याच योनी (सजीवसृष्टी तील एकूण सजीव जाती) अस्तित्वात किंवा माहित असाव्यात. (हे बिरबलाच्या दिल्लीत कावळे किती? या प्रश्नाच्या उत्तारासारखे वाटते ;))
त्यात डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे कांही जाती वाढल्या असतील. मग ज्याकाळी मानव जात अस्तित्वातच नव्हती तेंव्हा मोक्ष मिळवण्याची सोयच नव्हती काय? (- यामधून- मोक्ष मिळवण्यासाठी सोय म्हणूनच ईश्वराने मानव जातीची निर्मिती केली असाही जावईशोध कुणी लावू शकेल ! संशोधन व्हावे. ज्यांना कुणाला ईश्वरी साक्षात्कार वगैरे होतो त्यांनी 'त्या' परमात्म्याला हे जरूर विचारावे ही विनंती. )
तसेच जातीविनाशामुळे (एक्स्टिंक्षन) काही योनी कमी झाल्या असतील. त्यामुळे ज्यांना हे सारे खरे वाटते त्यांनी -बिरबलाच्या युक्तिवादाप्रमाणे कांही जाती वाढल्या आणि कांही कमी झाल्यामुळे - ८४,००,००० हा आकडा बरोबर समजावा.
पण हे काही वेगळेच सांगते. त्यांना हिंदु धर्मशास्त्राबद्दल कोणी सांगेल काय?

युयुत्सु, तुमच्या मूळ प्रश्नाप्रमाणे विचार केल्यास पृथ्वीवर काही गंडांतर येऊन सगळ्याच सजीव जाती नाहीशा झाल्यास परमेश्वराने सगळया आत्म्यांना एकतर मोक्ष दिला अथवा सगळेच आत्मे योनीच्या शोधात अंतराळात भटकत राहिले असे म्हणावे लागेल. (तसे म्हणण्यास कोणीच नसेल ही गोष्ट अलाहिदा ;))

नंतर..

पण नंतर काय होते?

चौर्‍यांशी लक्ष योन्यातून गेल्यावर मला वाटते परत पहिल्या योनीपासून सुरूवात होते.

गतानुगतिको लोका:

शाळेत असताना संस्कृतमध्ये 'गतानुगतिको लोका:' म्हणून एक गोष्ट धडा म्हणून होती. थोडक्यात त्या गोष्टीचा सारांश असा: एकदा राणीच्या दासीचे लाडके गाढव मरते.त्यानंतर ती दासी मोठमोठ्याने रडू लागते.राणीला तिची दासी रडत आहे ही बातमी कळते. त्यानंतर राणी त्या दासीच्या घरी जाऊन रडू लागते.मग राजा,सेनापती, सरदार, दरबारातील इतर मानकरी आणि असे करत करत शहरातील सर्व लोक दासीच्या घरी जाऊन रडू लागतात.नक्की काय झाले आहे हे विचारायची कोणीही तसदी घेत नाही आणि केवळ दुसरा माणूस रडत आहे म्हणून मी पण रडणार या 'गतानुगतिक' मनोवृत्तीमुळे सर्व लोक तिथे जाऊन रडायला लागतात.बाजूने काही परदेशी पर्यटक चाललेले असतात.त्यांना कळत नाही की शहरातले सगळे लोक का रडत आहेत! ते त्या रडणार्‍या माणसांपैकी एकाला कारण विचारतात. तो माणूस म्हणतो,'मला माहित नाही.माझा शेजारी इथे येऊन रडायला लागला म्हणून मी पण आलो'.शेजारी तिसर्‍या माणसाकडे बोट दाखवतो. असे करत करत कोणालाही कारण माहित नसते आणि शेवटी सेनापती राजाकडे, राजा राणीकडे आणि राणी दासीकडे बोट दाखवते.शेवटी दासीचे गाढव मेले हे कारण होते हे कळताच सगळ्यांची चांगलीच फजिती होते.

आपल्या समाजातही कमी-अधिक प्रमाणात असाच गतानुगतिकपणा आढळत नाही का?केवळ शास्त्रात लिहिले आहे म्हणून आपण अनेक गोष्टी कारण न समजता करत असतो.त्या कारणामुळे अनेक रूढी परंपरा पिढ्यानपिढ्या आपण जोपासत आलो आहोत.मला वाटते श्राध्द-पक्ष-पंचक या गोष्टी त्याचाच एक भाग आहेत.मी भारतीय तत्वज्ञानाविषयी जे काही वाचन केले आहे (स्वामी दयानंद, डॉ. राधाकृष्णन यांची पुस्तके) त्यावरून असे स्पष्ट आहे की भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे आत्मा हे प्रत्येक जीवाचे (अमिबापासून माणसापर्यंत प्रत्येकाचे) खरे स्वरूप आहे.आत्मा हा अमर असून त्याला जन्म-मृत्यू यासारख्या शरीराला लागू होणार्‍या संकल्पना लागू होत नाहीत. एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करणे म्हणजे आत्म्यासाठी कपडे बदलण्याइतके सोपे आहे.या सर्व गोष्टी आचरणात आणायला कठिण असल्या तरी एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून मला पटतात.पण श्राध्द-पक्ष सारखी कर्मकांडे नाहीत.कारण जर प्रत्येक जीवाचे शाश्वत स्वरूप आत्मा असेल आणि आत्म्याला जन्म-मृत्यू काही नसेल तर 'मृत' व्यक्तीसाठी श्राध्द कशाकरता हा प्रश्न उभा राहतो.

आणि दुसरा प्रश्न म्हणजे भगवद्गीता आणि श्राध्द-पक्ष यासारखी कर्मकांडे एकाच हिंदू धर्माचा भाग कशा होऊ शकतात? की काही हजार वर्षांच्या काळात पुरोहित वर्गाने आपल्या स्वार्थासाठी (दक्षिणेची सोय व्हावी म्हणून) अशी कर्मकांडे बेमालूमपणे शास्त्रांमध्ये घुसडून दिली आहेत?आणि २००७ च्या जगातही आपण त्यामागचे कारण न विचारता गतानुगतिकासारखे त्या कर्मकांडांचे पालन करत आहोत? दशमीच्या दिवशी कोणी मरण पावले की लागले पंचक. उपाय काय? पंचक शांती करा म्हणजे पुरोहिताला दक्षिणा द्या! मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाला तर त्याची शांती करा म्हणजे पुरोहिताला दक्षिणा द्या! आपल्या हातून मांजर मेले तर पापाचे परिमार्जन म्हणून पुरोहिताला दक्षिणा द्या! अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचे खरे कारण धर्माच्या नावावर कशाचातरी बागूलबोवा दाखवून लोकांना लुबाडणे हे आहे असे मला वाटते.माझे तरी मत बनले आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी तत्कालीन ब्राह्मणांनी (त्यात माझे पूर्वजही आले) अशा अनेक गोष्टी शास्त्रांमध्ये घुसडून दिल्या आहेत.काही हजार वर्षांच्या काळात त्या गोष्टी इतक्या बेमालूमपणे शास्त्रात मिसळून गेल्या की मूळ काय आणि घुसडलेले काय हे ओळखणे कठिण झाले.अन्यथा भगवद्गीतेसारखे उच्च तत्वज्ञान आणि इतरांना लुबाडणारी कर्मकांडे एकाच धर्माचा भाग कसे होऊ शकतात याचे कारण देणे कठिण आहे.

बायबलमध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे म्हटले आहे.त्याविरूध्द मत मांडले म्हणून कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांना धर्मगुरूंनी तुरूंगात डांबले होते.निदान इतिहासाच्या पुस्तकात तरी असेच लिहिले होते. २००७ च्या जगात काही कट्टर लोक सोडले तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे कोणीच म्हणणार नाही.जर एक समाज म्हणून ख्रिस्ती लोकांनी बायबलमध्ये म्हटलेली एखादी गोष्ट नाकारायचे धैर्य दाखवले असेल तर आपण आपल्या शास्त्रात न पटणार्‍या गोष्टी असतील तर त्या का नाकारू शकत नाही?पण दुर्दैवाने तसी नीरक्षीरविवेकबुध्दी आपण दाखवत नाही.

मागे मी आंतरजालावरील एका चर्चा व्यासपीठामध्ये असे मत मांडले तर मला काहींनी 'तू ख्रिस्ती का मुसलमान' असा प्रश्न विचारला होता.जर आपल्या शास्त्रांमधील काही गोष्टी मला मान्य नसतील आणि मी जर त्याबद्दल मतप्रदर्शन केले तर मी ख्रिस्ती किंवा मुसलमान
बनतो का?आणि मला असा प्रश्न विचारणारेच लोक मोठ्या तोंडाने 'हिंदू धर्म मोठा सहिष्णू आहे' असे म्हणतात. असो.

----विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

शंका

ब्राह्मणांनी (त्यात माझे पूर्वजही आले)

क्लिंटन म्हणजे कोकणस्थ म्हणायचे की देशस्थ की आणखी कोणी?

-कोकणस्थ

कोकणस्थ

कोकणास्थांवर मी काही बोल्लो तर माझा प्रकाटाआ होते असा अनुभव आहे.
प्रकाश घाटपांडे

धर्म

अन्यथा भगवद्गीतेसारखे उच्च तत्वज्ञान आणि इतरांना लुबाडणारी कर्मकांडे एकाच धर्माचा भाग कसे होऊ शकतात याचे कारण देणे कठिण आहे.

याचे एक कारण म्हणजे हिंदू धर्म ही एक 'जेनेरिक टर्म' आहे. त्याची नेमकी व्याख्या सापेक्ष आहे. भारतातील विविध प्रांतांमध्ये प्रिय देवता बदलतात. जसे मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्मात एकच कुराण आणि एकच बायबल आहे, तसे हिंदू धर्मामध्ये एक धर्मशास्त्राचे पुस्तक नाही. याचा परिणाम म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे त्यात बर्‍याच गोष्टी मिसळल्या गेल्या आहेत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

गतानुगतिकता

मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाला तर त्याची शांती करा म्हणजे पुरोहिताला दक्षिणा द्या!

संत एकनाथ महाराज मूळ नक्षत्रावर जन्मले.त्यांनी लिहून ठेवले आहे कि
मूळीच्या मूळी एका जन्मला ।
मायबापे घोर धाक घेतला।
कैसे नक्षत्र आले कपाळा'
स्वये लागलो दोहोच्या निर्मूळा॥।

मूळ नक्षत्रावर मूल जन्मल तर् ते आईबापाच्या मूळावर् येते या समजुतीतून ही शांतीपूजा तयार झाली. मग आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट ,ज्येष्ठा नक्षत्र दिरास वाईट अशी ती पुढची मालिका आहे. ज्योतिष हे धर्माचे अंग मानले असल्याने. कर्मकांडे ही ज्योतिषापासून वेगळि करता आली नाहीत.

प्रकाश घाटपांडे

आग लावून पसार

चर्चे वरून काही उत्तरे मिळाली का? तर पुढे चालू ठेवायला......

आभार

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. शंका अर्थातच फिटलेली नाही.

गरुड पुराण : काय केल्याने कोणता जन्म मिळतो?

दोनदा जन्मणार्‍यांची चंदी आहे बुवा... मिष्टान्न भोजन काय? हंसांच्या पंखांनी भरलेली उशी काय? पंचरंगी छत्री काय? स्वर्णपत्रे काय? मजबूत लाकडाचा पलंग काय? आणि काय काय बरंच...अरे, चोरांनो...हे मात्र अती आहे.
हे सारे प्रक्षिप्त आहे हे स्पष्टच आहे. जिथे मिळेल तिथे, प्रत्येक धार्मिक ग्रंथात हे चोर घुसलेले आहेत. त्यामुळेच हिंदू धर्माचे वाटोळे झाले.
या पुराणात-
काय केल्याने कोणता जन्म मिळतो याचे अत्यंत विनोदी वर्णन आहे.
(जसे - तुम्हाला पुढच्या जन्मी बकरी व्हायचे असेल तर चप्पल, गवत अथवा लोकर चोरा. चातक व्हायचे असेल तर पाणी चोरा. माकड व्हायचे असेल तर पाने, फुले चोरा. शिवाय जगातील सर्व जंगली वाघ मागच्या जन्मी द्विज होते आणि त्यांनी कसलाही विचार न करता जे मिळेल ते हादडले म्हणून या जन्मी ते वाघ झाले आहेत. - पर्यायाने - जगातील वन्य वाघांची संख्या वाढवण्यासाठी काय केले पाहिजे हे समजले असेलच.)
जन्म कसा होतो? याचं वर्णन आहे - शिवाय मग 'जीवन म्हणजे अळवावरचं पाणी' असं तत्वज्ञान आहे. 'इदं न मम' हेच मोक्षाचं द्वार आहे. पुण्य करा - स्वर्गात जा, पाप करा - नीच योनीत जन्म घ्या इ. आहेच.
हे स्वर्ग-नरक वगैरे आपल्याकडे - हिन्दू संस्कृतीत खूप उशीरा आले असे म्हणतात.जाणकारांनी माहिती द्यावी.

आपणा सर्वाना समजेलशा इंग्रजी भाषेत गरुड पुराण येथे उपलब्ध आहे.
शिवाय ते परभाषेत असल्याने कोणी आप्त मृत्युमुखी पडल्यावरच वाचावे असे शास्त्र नाही -
असे सुप्रसिध्द शास्त्रकार महामहोपाध्याय श्री.श्री.श्री.श्री.श्री.......श्री. विसुनानाशास्त्री यांचे म्हणणें आहे.
तसेच आपलें कोणी आप्त अद्याप मृत्युमुखी पडलेले नाही अशी व्यक्ती त्यांनी त्यांच्या
मृत्युलोकातील प्रदीर्घ वास्तव्यात पाहिलेली नाही असेही ते म्हणाल्याचे समजतें.
त्यामुळे ते वाचण्यास काहीच प्रत्यवाय नसावा.

कल्याणी, आपणही ते मुळातून वाचावे म्हणजे आपल्या सर्व शंका फिटतीलच याची खात्री आहे.

 
^ वर