समजा लेखनामध्ये प्रत्यय वापरणे बंद केले तर?

प्रत्ययाचा वापर केल्यामुळे एका शब्दाची अनेक रुपे होतात. त्या मुळे भाषा शिकणे अवङघड बनते. स्पेलिंग तपासणे क्लिष्ट होते. म्हणून प्रत्यय लावण्याचा (लावणे चा) नियम मराठी व्याकरणातून (व्याकरण तून) रद्द् करावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

उदाहरण

महाशय

आपले वरील वाक्य प्रत्यय न लावता असे दिसेल

प्रत्यय वापर कर एक शब्द अनेक रुप आहे. त्यामुळे भाषा शीक अवघड बन. स्पेलिंग तपास क्लिष्ट बन. म्हणून प्रत्यय लाव नियम मराठी व्याकरण रद्द कर.

दुसरे उदाहरण् पहा.

तू दारू पी सोड त्यामुळे तुझी अब्रू हो

प्रत्ययासहित वाक्य असे आहे

तू दारू पिणे सोड त्यामुळे तुझी बेअब्रू होईल

असो. आजकाल माझ्या लेखनात दारू जास्त येते आहे ही चिंतेची बाब आहे,मला आणि इतरांनाही. यापुढे जास्त येणार नाही याची काळजी घेईन. (......कधीच घेत नाही)

(प्रत्ययशत्रू) विनायक

विनायकराव,

विनायककाका,

असो. आजकाल माझ्या लेखनात दारू जास्त येते आहे ही चिंतेची बाब आहे,मला आणि इतरांनाही. यापुढे जास्त येणार नाही याची काळजी घेईन. (......कधीच घेत नाही)

नक्की काळजीच घ्या हो! (नाहीतर चुकून दारू घ्याल! ;)

असो!

बाय द वे, विनायकराव मला जरा मदत करा. वर तुम्ही प्रत्यय न लावता एक वाक्य लिहिले आहे म्हणून विचारतो. खालील काही वाक्ये प्रत्यय न लावता कशी लिहायची हो?

मजकूर संपादित. प्रतिसादांच्या माध्यमातून होणारे लिखाण सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी घ्यावी.

तात्या.

पचका!

मजकूर संपादित. प्रतिसादांच्या माध्यमातून होणारे लिखाण सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी घ्यावी.

संपादक महाशय, खरं तर तुमचा पचका झाला आहे! कारण तुम्ही संपादन करण्याआधीच विनायकरावांनी तो मजकूर वाचला होता! ;) हे हे हे... कसं गंडवलं! ;)

बाय द वे, माझा मजकूर संपादित का करण्यात आला हे कळेल का? मी फक्त उदाहरणादाखल काही वाक्ये लिहिली होती, ज्यांच्यातील सर्व प्रत्यय काढून टाकल्यावर ती वाक्ये कशी होतील ही माझी व्याकरणविषयक उत्सुकता होती.

त्या वाक्यांखाली मी 'सदर वाक्यांतील व्यक्तिंच्या नांवांचा कुणाही ज्ञात, अज्ञात, मृत वा जिवंत व्यक्तिंशी संबंध नाही. नांवामधील साधर्म्य हा केवळ एक योगायोग समजावा' असा डिस्क्लेमरही टाकला होता!

असं असतांना आपण आपल्या पदाचा गैरवापर करून तो मजकूर का संपादित केलात हे कळेल का? उपक्रमाचे संपादक झालात म्हणजे तुमचे हात आभाळाला पोचले की काय? ;)

तात्या.

लेखनाचे सर्वमान्य संकेत

व्यक्तिगत रोख असणारे किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारे लेखन आणि परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांना उद्देशून व्यक्तिगत स्वरूपाचे लेखन न करणे हे संकेतस्थळांवर पाळले जाणारे सर्वमान्य संकेत आहेत. या संकेतांचे स्वतःहून पालन करणे ही सर्व सदस्यांची जबाबदारी आहे. या संकेतांचे पालन न करणारे लेखन संपादित करून, अश्या स्वरूपाचे लेखन न करण्याची विनंती करण्याचा संपादन मंडळाचा नेहमी प्रयत्न असतो. सदस्यांनी या सूचना गंभीरपणे घेणे आणि त्याप्रमाणे आपल्या सार्वजनिक लेखनात बदल करणे अपेक्षित आहे. वारंवार विनंती करूनही जाणीवपूर्वक आणि/किंवा हेतुपुरस्सर वरील संकेतांचे उल्लंघन करणार्‍या सदस्यांच्या लेखनावर, संकेतस्थळाच्या आणि पर्यायाने सर्व सदस्यांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने, काही बंधने आणावी लागणे आवश्यक होऊ शकते. अशी वेळ येऊ न देण्यासाठी संबंधितांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

बहुसंख्य सदस्य उपरोल्लिखित सर्वमान्य संकेतांचे जाणीवपूर्वक पालन करतात हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे.

यासंबंधात काही शंका व सूचना असल्यास निरोपातून कळवाव्यात.

धन्यवाद,

यासंबंधात काही शंका व सूचना असल्यास निरोपातून कळवाव्यात.

धन्यवाद, सवडीने व्य नि पाठवूच!

आपला,
('सर्वमान्य संकेत' या शब्दांचा व्यापक अर्थ न कळलेला!) तात्या.

तुम्हाला

प्रत्यय लावताना शब्दांचे बदलणारे रूप अपेक्षित आहे का? म्हणजे "लावणे चा", "व्याकरण तून" वरून तसे वाटले. असे केले तर भाषा शिकणे आणि शुद्धलेखन चिकित्सा वगैरे गोष्टी निश्चितच सुलभ होतील. कदाचित भविष्यात अशी भाषाच बोलली जाईल.
आपला
(कल्पनाविलासी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

मला वाटते

मला वाटते जनहितवादी यांना सरसकट प्रत्यय अपेक्षित नसून शब्दाची बदलणारी रूपे म्हणायची आहेत. म्हणजे 'रामाची पत्नी सीतेला रावणाने पळवले', हे वाक्य 'रामची पत्नी सीताला रावणने पळवले' असे म्हणणे/ लिहिणे. विशेषनामांच्या बाबतीत हे बर्‍यापैकी झालेच आहे. नामांचाही वापर असाच करावा काय असा त्यांचा प्रश्न असावा.

मला स्वतःला अशी रूपे आवडतात. म्हणजे 'मृदुलाला आंबा आवडतो' म्हणण्यापेक्षा 'मृदुलेला आंबा आवडतो' म्हणणे.

हो

मला वाटते जनहितवादी यांना सरसकट प्रत्यय अपेक्षित नसून शब्दाची बदलणारी रूपे म्हणायची आहेत.
मलाही तसेच वाटले. काय म्हण ले आहे या पेक्षा काय म्हण चे आहे हे लक्ष मध्ये घेतले तर हे पटेल. (ही भाषा कोणा दाक्षिणात्याने मराठी बोलल्यासारखी वाटते पण हा सर्व सवयीचा परिणाम आहे आणि सवयी काळाप्रमाणे बदलत असतात.)
आपला
(विश्लेषक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

प्रत्यय

मृदुलाला आणि मृदुलेला दोन्हीमध्ये ला हा प्रत्यय आहेच. मृदुलेमध्ये तो व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे तर मृदुलाला मध्ये चुकीचा आहे. आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाला प्रत्यय लावताना आधीचे अक्षर ए होते जसे सीता, सीतेला. हे एका संस्कृततज्ञ उपक्रमी मैत्रिणीने सांगितले.

विनायक

क्षमस्व! मला बरेच दिबस येथे येणे जमले नाही. त्या मुळे ...

मी लिहताना चूक केली. माझा प्रत्ययाला आक्षेप नाही. विनायक यांचा आक्षेप बरोबर आहे. प्रत्यय पाहिजेच. मी सुचवलेली सुधारणा 'नामा' बद्दल आहे. प्रत्यय लाबताना नामाचे रुप बदलू नये. मी दिलेल्या उदाहरणावरुन ते स्पष्ट होते.

विनायक यांनी ही चूक लक्षात घेऊन सुधारणा केली त्या बद्दल धन्यवाद.

आता सांगा आपले मत काय आहे? म्हणजे मी दुसरा बदल सुचवायला मोकळा!

प्रत्यय लाबताना नामाचे रुप बदलू नये...विषयी

नामाची जास्तीत जास्त चार रूपे होतात :
१. प्रथमेचे एकवचन
२. प्रथमेचे अनेकवचन
३. सामन्यरूपाचे एकवचन
४. सामान्यरूपाचे अनेकवचन

१. कुत्रा
२. कुत्रे
३. कुत्र्या-
४. कुत्र्यां-

काही नामांची त्या मानाने खूपच कमी रूपे होतात
१. हत्ती
२. हत्ती
३. हत्ती-
४ हत्तीं-

सोपेपणासाठी केलेल्या काही काही सुधारणा भाषा बोलणारे-लिहिणारे अंगीकारतात, काही काही बदल रुजत नाहीत. सावरकरांची "सुलभ" लिपी त्यांच्या अनुयायांनाही भावली नाही - त्यात चूक काय हे कोणाला सांगता आले नाही तरी! लेखी भाषेतले अनुच्चारित अनुस्वार काढून टाकले तेव्हा ते सुलभीकरण मात्र मराठी लेखक-वाचकांनी पटकन स्वीकारले.

ही तर झाली केवळ लेखी भाषेतील उदाहरणे. बोली भाषेत सुलभीकरणासाठी "मुद्दाम" सुचवलेला कुठलाही बदल भाषेत स्थायी झाल्याचे मला माहीत नाही. तुम्ही सुचवता तो बोलीभाषेतला इतका मूलभूत फरक सहजासहजी स्वीकारला जाणार नाही असे वाटते.

एक तर मला नामांची अनेक रूपे असतात ते फारसे कठीण वाटत नाही - त्यामुळे तुमच्या प्रस्तावाला मी आणि माझ्यासारखे कशाला-ही-उठाठेव-वादी बहुधा जोमाने सहकार्य देणार नाही. पण मी काही तुमचा मोठा विरोधही करणार नाही. बघा जमते का तुम्हाला बहुतेक मराठी भाषकांचे जिभेचे वळण बदलायचे!

हेसुद्धा विचार करण्याजोगे आहे - भाषा ही प्रौढांनी शिकली म्हणून तिला चलती येत नाही, लहान मुले नकळत मातृभाषा शिकतात म्हणून भाषा चलनात राहाते. नामांच्या अनेक रूपांचे मराठी भाषक शिशूंशी फारसे वावडे असल्याचे ऐकिवात नाही.

धनंजय

नामांच्या अनेक रूपांचे मराठी भाषक शिशूंशी फारसे वावडे ..........

हिंदु धर्मियानी स्वतःला डबक्यात बांधुन घेतल्यामुळे भारताबाहेर धर्माचा प्रसार फारसा झाला नाही. भारतीयांची क्षमता असुन जगावर राज्य करु शकले नाहीत. याला कारण त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती व कुपमंडुकांचे विचार. नदीने वाटेत मिळणार्‍या प्रवाहाना सामाऊन घेतले नाही तर ती जशी उगम स्थानाजवळ असेल तशीच राहुन काही अंतर जाऊन लुप्त होईल. मराठी भाषेला टिकायचे असेल, सर्वदुर पसरायचे असेल, तर बदलावेच लागेल.

महाराष्ट्रात इतर प्रांतातुन प्रवाह येत आहेत. त्याना कोणी मज्जाव करु शकत नाही. ते खुशाल आपली भाषा स्वतः बरोबर आणतात. आपणाला त्यांच्या भाषेत व्यवहार कराव्यास भाग पाडतात. महाराष्ट्रात मराठी माणूस उपरा ठरत आहे. हे बदलायचे असेल तर खर्‍या उपर्‍याना मराठी शिकवावे लागेल. त्या करता मराठी जितकी सोपी व संगणक फ्रेंडली बनवता येईल तितकी केली पाहिजे. तरच ती पोटापाण्याची भाषा होईल.

पोटापाण्याची भाषाच समृद्ध व टिकाऊ होऊ शकते.

बोला मराठी टिकवायची का नाही?

संगणकाशी सख्य व्हावे लागते हे बरीक खरे

गेली अनेक वर्षे मी संगणकाशी सख्य म्हणून मराठी/संस्कृत रोमन लिपीमध्ये लिप्यंतर करून लिहू लागलो होतो. अजूनही काही विशिष्ट संस्कृतप्रेमी ई-मेलमंडळांत त्याच प्रकारे लिहितो.

पण आता गमभन, बरह, आय्-ट्रान्स् वगैरे प्रोग्रॅम इतके सोयीचे झाले आहे, की ते एक ठिकाण सोडले तर मी सगळीकडे पुन्हा सरसकट देवनागरी टंकित लेखन पाठवू लागलो आहे.

आधी (म्हणजे १०-१२ वर्षांपूर्वी) संगणकाच्या सोयीसाठी मी बदललो, पुढे माझ्यासाठी (म्हणजे माझ्यासारख्या, मनातून देवनागरीच आवडते, पण प्रयत्नपूर्वक रोमन बदल करणार्‍या लोकांसाठी) संगणक बदलला. दोन्ही बाजूने बदल झालेत. पण मला वाटते, ह्या बाबतीत तरी माझा पूर्वीचा प्रयत्नपूर्वक बदल मराठीभाषकांपैकी बहुसंख्य लोकांना मानवला नाहीत. उलट धीट हुन्नरी देवनागरी-प्रेमी लोकांनी संगणकच बदलला, आणि हे (आणि यूनिकोड) जगाने स्वीकारले.

मराठीने जग (किंवा अन्य प्रांत) पादाक्रांत करण्याचे बोल बोलण्याबाबत मला कसेसेच वाटते. गोवा मराठीमय करण्याच्या अतातायी खटाटोपामुळे कोकणी ही सुंदर भाषा बोलणार्‍यांत आणि माझ्यासारख्या गोवेकर मराठीभाषकांत तेढ निर्माण झाली, नाहीतर मराठीच्या सांस्कृतिक समृद्धीवर मनापासून प्रेम करण्याची कोकणीभाषक गोवेकरांची शेकडो वर्षांची परंपरा आहे...

तसे पाहता जगज्जेती इंग्रजी हीसुद्धा सुलभ भाषा नाही - कमालीच्या हुशार चिनी मित्रांना त्या भाषेने नामोहरम करताना मी पाहिले आहे - म्हणाव्या त्या नियमाला पदोपदी अपवाद! बहुतेक भारतीय लोकांना तरी ती नीट कुठे येते! इंग्रजी भाषेच्या पूर्वीच्या सुकाळाचे कारण इंग्रज साम्राज्य आहे हे नि:शंक. पण आजच्या जगात, इंग्रजी अंमलाखाली नसलेल्या युरोप आणि चीन-जपानमध्येही इंग्रजीचे ज्ञानार्जन वाढते आहे. त्याचे कारण इंग्रजीचे सुलभीकरण नव्हे. कारण हे की ह्या कठीण भाषेत अनेक उपयुक्त कृती लिहिलेल्या आहेत (म्हणजे व्यापाराची कंत्राटे, तांत्रिक पाठ्यपुस्तके, वगैरे), आणि प्रौढ वैचारिक आणि ललित ग्रंथ लिहिलेले आहेत. (शिवाय पाचकळ टाईमपास कादंबर्‍याही! कारण त्यालाही बाजारात भाव आहे.) फाजील गल्लाभरू कृतींचे उदाहरण घ्यावे तर भाषा सुलभ न करता हिंदी चित्रपटांनी अवघ्या भारताला नाही का नादावले?

मराठी भाषेचे जमेल आणि पचेल तितके सुलभीकरण जरूर करावे. पण ती टिकवण्यासाठी आणि अन्यभाषकांत तिची गोडी वाढवण्यासाठी तिच्यात उत्तम बोली/लेखी रचना (उपयुक्त, समृद्ध, किंवा बाजारभाव असलेल्या) करणे जरुरीचे आहे.

हा सुलभीकरणाला विरोध नाही - गैरसमज नसावा - पण मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आपल्यापुढे असलेल्या कार्याची अन्य आणि कदाचीत अधिक महत्त्वाची अंगे चर्चेत आणणे हे या प्रतिसादाचे प्रयोजन आहे.

सुलभीकरण, आणि संगणकसख्य व्हावेच! पण ते सुलभीकरण उपर्‍यांच्या सोयीने, मराठीभाषकांना जाचक वाटायला नको!

सुलभीकरण उपर्‍यांच्या सोयीने, मराठीभाषकांना जाचक वाटायला नको!

संगणकाशी सख्य म्हणून पूर्वी रोमन लिपीला पर्याय नव्हता. आता उपलब्ध आहेत हे मान्य. पण हा पर्याय अपुरा आहे. मी लिहतो ते देवनागरीलिपी मध्ये संगणकाच्या पडद्यावर दिसते परंतु मी लिहताना रोमनच लिहित आहे. दुसरे हे लिहलेले वर्ड मध्ये मी साठवू शकत नाही. त्या करता मॉड्युलर इंफोटेक व सी डॅक यांची प्रणाली वापरावी लागते. ते लिखाण येथे दिसत नाही. हे करावयाचे म्हणजे एकाच प्रकारे लिहुन दोन्ही ठिकाणी वाचता येणे शक्य होण्याकरता देवनागरी लिपी सोपी करणे आवश्यक आहे. मी यातील तज्ञ नाही. मला अशी लिपी पाहिजे की , ती कोठेही वापरता आली पाहिजे व एके ठिकाणी केलेले लेखन दुसर्‍या ठिकाणी वाचता आले पाहिजे.

इतर बाबीवर नंतर लिहीन

मी लिहताना रोमनच लिहित आहे.

याचा अर्थ मला जर 'क' लिहायचे असेल तर मी 'के' दाबुन नंतर 'ए' ही बटने दाबतो. याला कारण कीबोर्ड रोमन अक्षराकरता बनवला आहे. रोमन ५२ अक्षरे आहेत तर देवनगरी लिपीत ५६ अक्षरे अधिक प्रत्येक स्वराकरता दोन दोन चिन्हे आहेत. त्या मुळे कीबोर्ड वरची बटणे कमी पडतात व सर्व स्वर लिहण्याकरता दोन किंवा जास्त बटणे वापरावी लागतात. त्या मुळे लिहण्याकरता दुप्पट् किंवा जास्त वेळ लागतो. देवनागरीलिपी सुद्धा ५२ बटणावर बसवणे शक्य आहे. प्रत्येक स्वराचे दोन ऐवजी एकच चिन्ह केले तर ते शक्य होईल.

के व नंतर ए

बहुतेक असेच काहीतरी करावे लागेल. कीबोर्ड-ते-ग्लिफ् १-टु-१ जोड्या करणे जमणार नाही. कारण देवनागरीत अ-ची धरून ३३ बाराखड्या = ३९६ "साधी अक्षरे" आणि अशीच शेकडो जोडाक्षरे आहे.

पण तुमचे हे एक खरे की नुसता "के" लिहिला की "क्" न येता, "क" आला तर खूप वेळ वाचेल. उच्चारशास्त्राच्या दृष्टीने "क्" ="एकच बटण बरोबर असले, आणि "क" = "क् + अ" = दोन बटणे हे खरे असले, तरी सोय पण बघायला पाहिजे. "क्" खूप कमी दिसते, "क" खूपदा लिहावा लागतो. सारखा-सारखा "ए" दाबल्याने माझी डावी करंगळी दुखायला लागली आहे. (१००% खरी गोष्ट आहे ही!) सोयीसाठी गमभन-वाल्यानी (किंवा दुसर्‍या कुणाने) "के"-बटण = क; "के"-बटण+"\"-बटण = क्; असे करून चाचणी करायला लोकांना द्यायला पाहिजे.

संदीप सिबल (सिबळ?) यांचा Xdvng फाँट (गूगलवर सापडेल) युनिकोड सारखा नसून ASCII वरतीच बसवला आहे. मी त्याच्यात पूर्वी टंकन करीत असे. रोमनच्या शेकडो फाँट सारखा हा एक. फाँट डायरेक्टरीमध्ये ही फाईल चिकटवा, आणि कीबोर्ड ले-आऊट शिकला की थेट मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये क, ठ, वगैरे एका बटणात! मला तो आवडायचा. पण कीबोर्ड ले-आऊट पाठ करायला कठीण असल्यामुळे मी कुणा मित्राचे मतपरिवर्तन करू शकलो नाही. खुद्द मी तो सोडून "गमभन" किंवा "बरह" मध्ये टंकून, आलेख कापून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये चिकटवतो. त्यामुळे कोणी कोणाचे मतपरिवर्तन केले, त्याची कल्पना यावी!

मराठीत प्रत्येक स्वराच्या ह्रस्व-दीर्घासाठी एकच चिह्न देण्याबद्दल विचार यापूर्वी झाला आहे. याने सुरुवातीला वाटतो तेवढा मोठा (मूलभूत वगैरे) तोटा होत नाही. मोडी लिपीत ह्रस्व-दीर्घाला एकच चिह्न आहे, आणि यात तर कायद्याचे मराठी दस्तऐवज लिहीत. बहुतेक शब्दांच्या बाबतीत, दुसर्‍या कुठल्याच शब्दाशी गफलत होत नाही. पण तरीही काही थोड्या शब्दांच्या मध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून, किंवा पारंपारिकतेने म्हणा, देवनागरीमध्ये तो प्रस्ताव फारसा पुढे गेला नाही. माझा स्वतःचा या प्रस्तावाला विरोध-बिरोध नाही. पण मी या बाबतीत "अर्ली अडॉप्टर" नाही होणार, कारण सूरूवातीला असे लीहीणार्‍याचे लीहीणे वाचताना मीत्र आणी ईतर हीतसंबंधी मूद्द्याकडे दूर्लक्ष करून याच्यावरच भूणभूण करत बसतील.

कीबोर्डलेआऊट्स

तुम्ही म्हणता त्याप्रकारचा किबोर्डलेआऊट ( 'के' साठी क इ.)
http://www.lokmatmirror.com/vyaspeeth/
इथे आहे.
गमभनच्या मदतीनेच हा लेआऊट उपलब्ध केला आहे.

गमभन ओपन सोर्स असल्याने सोईचे किबोर्डलेआऊट यात बनवणे हे शक्य आहे. माझ्या कार्यालयिन वेळा संभाळून इतक्या प्रमाणात विविध लेआऊट्स मध्ये पैसा आणि वेळ खर्च करने सद्ध्या मात्र मल जमत नाही हे सांगावेसे वाटते.
अनेक कीबोर्ड लेआऊट गमभनमध्ये उपलब्ध करणे शक्य आहे. वेळ, निकड आणि श्रम या गोष्टी पूरक असल्या की कामाला वेग येईल अशी आशा करतो.

कसा काय तोटा होत नाही??

मराठीत प्रत्येक स्वराच्या ह्रस्व-दीर्घासाठी एकच चिह्न देण्याबद्दल विचार यापूर्वी झाला आहे. याने सुरुवातीला वाटतो तेवढा मोठा (मूलभूत वगैरे) तोटा होत नाही???
कसा काय होत नाही? आपल्याकडे र्‍हस्व-दिर्घ हे उच्चारावर आधारलेले आहेत. जर एखाद्या शब्दाचा दिर्घ उच्चार असेल तर केवळ संगणकाच्या सोयीसाठी र्‍हस्व लिहिण्यासारखा विचित्र प्रकार् नाही.. जगात मराठी गेली पाहिजेच पण मराठीच गेली पाहीजे.. सुलभीकरणाच्या नावाखाली मुलभूत् वैशिष्ट्ये सोडून देण्यात काय अर्थ आहे

ह्रस्व-दीर्घ साठी एक चिह्न - मूलभूत तोटा आहे काय?

मराठीत पूर्णपणे श्रवणप्रत्ययी लेखन होते असे म्हणणे योग्य नाही. बोलताना मराठीत अतिह्रस्व, ह्रस्व, आणि दीर्घ 'अ' आहेत, जे संस्कृतातून घेतलेल्या लिपीत नाहीत. मराठीत बोलताना ह्रस्व 'आ' आहे, तो लिखाणात नाही. तरी मोघम, म्हणजे एकच 'अ' आणि एकच 'आ' घेऊन लिहिलेले मराठी वाचक उत्तम वाचू शकतात. त्यामुळे असे दिसते की केवळ संदर्भाने अतिह्रस्व-ह्रस्व-दीर्घ समजायची कला आपल्याला माहीत आहे.

मराठीत "मराठमोळ्या" शब्दांत ह्रस्व-दीर्घ उच्चार शब्दातील स्थानामुळे आपोआप होतात. शेवटचे अक्षर (लुप्त 'अ' सोडला तर) आपोआप दीर्घ होते. शेवटून दुसरे अक्षर (शेवटचा लुप्त 'अ' मोजायचा नाही) आपोआप ह्रस्व होते. (वगैरे, वगैरे, नियम अजून संपले नाहीत. हे नियम लिहायला गेले तर बर्‍यापैकी कठिण जाईल, तरी बोलायला गेले तर मराठी जिभेला ते पूर्णपणे नैसर्गिक असतात).

तुम्हीच म्हटले आहे (टंकनदोषामुळे) :
> ...एखाद्या शब्दाचा दिर्घ उच्चार असेल तर...
बघा, यामुळे कुठलाच अनर्थ झाला नाही. प्रयत्न करून सुद्धा मला 'दि'र्घ असा उच्चार करणे कठिण जाते. उच्चार आपोआप बरोबर होत असल्यामुळे तुमच्या उचित अर्थाचे संदेशन बिनबोभाट पार पडले. म्हणूनच मी म्हटले आहे की "मूलभूत वगैरे तोटा होत नाही"

काही थोडे संस्कृत तत्सम शब्द घोटाळ्यात पाडू शकतात :
त्याचे पिता चहा पीता पीता म्हणाले...
वगैरे. पण हे शब्द खूप थोडे असतात.

कधीकधी लिहिलेले ह्रस्वदीर्घ आणि उच्चारलेले वेगवेगळे असतात :
१. ही आपल्या गावाची शीव. (सीमा या अर्थी, ह्रस्व, दीर्घ किंवा ह्रस्व-दीर्घच्या मध्यंतरीचा एक उच्चार 'शि/शी' ला चालतो.)
२. इथल्या देवळाचे दैवत शिव. ('शि' लिहिल्यासारखे नित्य ह्रस्व आहे - हा तत्सम संस्कृत शब्द आहे.)
३. शिंपीदादा, जत्रेसाठी मला कपडे शिव. ('शि' चा उच्चार दीर्घ "शी" असाच करावा लागतो. मोठ्याने म्हणून बघा.)
पण लेखी काही का लिहिलेले असले तरी संदर्भाने उच्चार सगळे नीट कळतात. म्हणून म्हटले आहे की लेखी बदल केला तर "मूलभूत तोटा होत नाही".

मुख्य हे समजून घ्यावे की मराठीची उच्चारवैशिष्ट्ये हल्लीच्या लिपीपेक्षा खूप जास्त आहेत. हल्लीची लिपी ही त्या मानाने आधीच फारच "सुलभ" आहे, तरी आपण मराठीचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चार हरवलेले नाहीत. मग आणखी थोडे सुलभीकरण केले, तरी सुद्धा ते वैशिष्ट्यपूर्ण उच्चार हरवणार नाहीत.

मुख्य म्हणजे ह्रस्व-दीर्घासाठी एकच चिह्न वापरण्याचा प्रयोग पूर्वी झाला आहे. हा काही फक्त आधुनिक डोक्यात आलेला "विचित्र विचार" नाही. आपले आजे-पणजे "मोडी लिपीत" लिहायला शिकले - ती लिपी शाळेत शिकावीच लागायची. त्या लिपीत ह्रस्व-दीर्घासाठी एकच चिह्न आहे. तरी आपल्या आज्या-पणज्यांचे वैशिष्ट्यपूर्ण मराठी उच्चार बिघडले नाहीत. त्यांचे बिघडले नाहीत, तर आपलेही उच्चार बिघडणार नाहीत. मराठेशाहीतील अनेक कायदेशीर दस्तऐवज मोडी लिपीत लिहिलेले आहेत. तसे लिहिल्यामुळे कुठेही अर्थाचा अनर्थ झालेला नाही.

तुम्हाला वाटेल की मी या विशिष्ट सुलभीकरणाचे वकीलपत्र घेतले. पण तसे नाही. मला स्वतःला ह्रस्व-दीर्घ लिहिणे सवयीमुळे सोपे जाते, आणि डोळ्यांना सवयीमुळे ह्रस्व-दीर्घ वाचायला सोपे जाते. शिवाय ज्या लोकांसाठी मी लिहितो, त्यांना ह्रस्व-दीर्घ वाचायला सवयीचे आहे, त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी ह्रस्व-दीर्घ लिहिणे मला प्रशस्त वाटते.

पण तुमचा रोख "मूलभूत तोट्या"कडे होता. मी खुद्द ह्रस्व-दीर्घ लिहिणारा असलो, तरी "मूलभूत तोटा" नाही असे मी प्रतिपादन करतो. म्हणजे, पुढेमागे कधी ह्रस्व-दीर्घ साठी एकच चिह्न वापरले गेले तर मराठीचा र्‍हास होणार नाही, उच्चार बिघडणार नाहीत, हे मला म्हणायचे आहे.

भा.पो.

भा.पो. :) आणि विचाराअंती बर्‍याच अंशी भा.प. (भावना पटल्या).. तरिही.. ह्रस्व-दीर्घ ही आपल्या लिपीची खासियत आहे असं मी सम़जतो.
बाकी, अ + करण्याऐवजी -अ ला पूर्ण पाठींबा

कीबोर्ड

रोमन कीबोर्ड वरील बटणांचा लेआऊट इंग्रजी भाषेत वापरल्या जाणार्‍या अक्षरांच्या हिशेबाने ठेवला आहे. जास्त वापरात येणारी अक्षरे मध्यावर आहेत. मराठी करता आता मी वापरत असलेला कीबोर्ड वेळखाऊ आहे. सीडॅकने जिस्ट नावाखाली जी संगणकप्रणाली बनवली आहे त्या मध्ये 'इनस्क्रिप्ट' कीबोर्ड लेआऊट वापरला आहे. तो लेआऊट मराठीकरता उत्तम आहे.

जर स्वराकरता लागणारी दुप्पट बटणे कमी केली तर २६ बटणावर देवनागरी लिपीतील सर्व अक्षरे येऊ शकतील. त्यामुळे लेखनाचा वेग खूप वाढेल.

शुद्ध मराठी

शुद्ध मराठी म्हणजे नेमके काय? शहरी मराठी त्यातल्या त्यात पुणेरी मराठीच शुद्ध का मानावी? खेड्यात बोलली जाणारी मराठी अशुद्ध का? इंग्रजी शब्द वापरले तर मराठी अशुद्ध का होते. आतापर्यंत फारसी, कानडी, हिंदी वगैरे भाषातून शब्द घेतले तेंव्हा मराठी का अशुद्ध झाली नाही?

मला बरेच असे प्रश्न पडतात. उत्तरे सापडत नाहीत.

शुद्धाशुद्ध

शहरी/खेड्यातली, कोकणातली, विदर्भातली, या सगळ्याच बोली त्यांच्या त्यांच्या व्याकरणात शुद्धच आहेत. या प्रकारची मते मी उपक्रमावरच काही चर्चांमध्ये मोठी पाल्हाळे देऊन सांगितली आहेत.

व्यवहारात शुद्ध/अशुद्ध शब्दाला पुण्य/पाप असा वास येतो.

"प्रमाण" असाही एक शब्द आहे. याला "चांगले/वाईट" असा अर्थ नाही. उदाहरणार्थ : "किलोग्राम" हे वजनाचे "प्रमाण" आहे. ते चांगलेही नाही, नि वाईटही नाही. कचरा "प्रमाण" म्हणून मी एक किलोभर घेतला तरी त्याला घाणच येणार. आणि "प्रमाण" वजन नसले तरी या चमचातले केशर सुगंधच देणार. किलो हे "प्रमाण" असल्याचा फायदा हा निव्वळ व्यावहारिक आहे.

भाषेच्या बाबतीत असे "प्रमाण" आहे की नाही, असा तुमच्या चर्चेचा रोख आहे काय? की पुण्यातली/पुसदमधली बोली "चांगली/वाईट" असल्या-नसल्याबद्दल आहे?

बोली "चांगली/वाईट" असल्या-नसल्याबद्दल आहे?

मला म्हणावयाचे आहे की, सर्वच बोलीभाषा शुद्धच मानाव्यात, मग ती पुण्याची असो, पुसदची असो, नगरची असो, कोल्हापुरी असो अगर इतर कोठलीही असो.

कीबोर्ड-ते-ग्लिफ् १-टु-१ जोड्या करणे जमणार नाही.

धनंजयराव, सीडॅकने हे केले आहे. त्या मध्ये मला एकच अडथळा वाटतो तो स्वर दोन प्रकारे लिहण्याचा. ते एक प्रकारे लिहण्याचे मान्य केले तर सर्व अक्षरे २६ बटणावर बसवता येतील. इंग्रजीत सुद्धा शिफ्ट की वापरुन कॅपिटल अक्षरे त्याच बटणावर बसवली आहेत. सीडॅकने 'डी' बटणावर् जोडाक्षरांची सोय केली आहेकेक् व्यंजन टंकलेखीत करुन 'डी' बटण दाबुन दुसरे व्यंजन लिहले की दोन्ही व्यंजनाचे जोडाक्षर तयार होते.

आवश्यकता आहे स्वराकरता एकच चिन्ह वापरण्याची

चिनी लिपी

अभिजात चिनी लिपीत ४०हजार मुळाक्षरे असतात, हल्लीच्या सुधारित लिपीत सुमारे ५००० (चू.भू.द्या.घ्या.)आहेत. ह्या लिप्या संगणकावर कशा बसतात, कुणी विचार केला आहे का? तसे बर्‍याच युरोपीय भाषांच्या लिपीत ऍक्सेन्ट मार्क्‌स, सर्कम्‌फ़्लेक्स, मॅक्रॉन, उम्‌लॉट, टाइल्ड, सेडिला, क्राउझेक, ओगोनेक(पोलिश हूक), हाचेक , स्पिरिटस ऍस्पर/लेनिस इत्यादी अनेक अक्षरखुणा असतात, त्यासाठी ते कळफलकावर वेगळ्या कळी कुठून आणतात? आंतरराष्ट्रीय फोनेटिक उच्चारखुणा कशा दाखवतात? लिपीत सुधारणा करण्यापेक्षा कळफलकात सुधारणा का करत नाहीत? ॐ , ॡ, ॠ , शृ सारख्या क्वचित लागणार्‍या अक्षरांसाठी जास्तीच्या कळी ठेवल्या की काम भागेल . नाहीतरी सध्या नुक्तावाले च आणि झ टंकता येत नाहीतच. र्‍हस्व वेलांटी फार अरुंद असते, स्ट्यि चे टंकन वेलांटी य मधील उभ्या कान्यापर्यंत न पोचल्याने सदोष होते. बाईन्‍ना, नैर्‌ऋत्य, नॉर्‌दॅम्फ्टन, श्री. महादेवी वर्मांना , (यातला 'वर्मान्‍ना' जुर्मानासारखा दिसतो)असले शब्द सध्याच्या कळफलकावरून टंकता येतच नाहीत. त्यांचीही सोय या जास्तीच्या कळफलकावर करावी. अजून अ वर चंद्र काढता येत नाहे तर बाकी काय म्हणावे? संगणकाला म्हणे सर्व जमते. मग साधी मराठी लिपी जमू नये?-वाचक्‍नवी

चिनी लिपीत ४०हजार मुळाक्षरे असतात

This could be Devnagari letter layout for keyboard
Proposed lay out of keyboard

चित्रा त देवनागरी लिपी २६ बटण वर कशी बसु शकते हे दाखवले आहे. असे केले तर रोमन मध्ये टंकलेखन करणे ऐवजी देवनागरी मध्ये करणे शक्य होईल.

मी ला संगणक ची फार शी माहिती नाही. कोठेतरी वाचले चे आठवते. ऑपरेटिंग सिस्टिम बनवणे वेळी कॅरॅक्टर मॅप बनवला ते मध्ये १ ते २५५ जागा निरनिराळे चिंन्हे करता राखून ठेवल्या. या जागा रोमन अक्षरे व इतर चिन्हे करता पुरे शा होत्या. जर देवनागरी बाराखडी सह टंक लेखक वर बसवणे असेल तर कॅरॅक्टर मॅप बदलणे आवश्यक आहे. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिम च नाही तर हार्डवेअर ही बदलले पाहिजे. ते आर्थिक दृष्ट्या परवडत असेल तर करणे अशक्य नाही.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

 
^ वर