तर्कक्रीडा २४:प्रा.अंबालिक लेले

गणित विषयाला वाहिलेले पहिले मराठी नियतकालिक 'तर्कभास्कर' मुंबईहून प्रसिद्ध होत असे .माझे आजोबा त्याचे वर्गणीदार होते.'तर्क भास्कर'चे बहुतेक अंक माझ्या संग्रही आहेत.
जुने अंक चाळताना १८९७ च्या अंकात प्रा.अंबालिक लेले यांचा 'गणिती मनोरंजन' या विषयावरील एक लेख वाचनात आला. त्यात त्यानी २९ या या संख्येचे अनेक आश्चर्यकारक गुणधर्म दिले होते.लेखाकाच्या परिचय चौकटीत "प्रा.लेले हे मुंबई विद्यापीठात गणिताचे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत" असे लिहिले होते.
या प्राध्यापकांचे आणखी कांही लेख आहेत का या उत्सुकतपोटी अंक चाळूं लागलो. तेव्हा १९३१ च्या अंकात एक लेख सापडला. तो प्रा. लेले यांनी लिहिला नव्हत्ता.तर त्यांच्या विषयी होता.त्यात लिहिले होते,
"प्रा. अंबालिक लेले यांना २९ ही संख्या फार प्रिय होती.आणि योगायोग असा की मृत्युसमयी त्यांचे जे वय होते(पूर्ण वर्षांत)त्या वयाच्या संख्येला २९ ने गुणले असता येणारी चार अंकी संख्या प्रा.लेले यांचा जन्मसन दाखविते."
तर प्रा. अंबालिक लेले यांचा जन्मसन कोणता?

(कृपया उत्तर व्यनि. ने)

लेखनविषय: दुवे:

Comments

वालावलकरशेठ,

तुम्हाला व्य नि ने उत्तर पाठवले आहे बरं का!

मानलं बुवा तुम्हाला! 'नाही एक दिवस या तात्याला माझ्या कोड्याचं उत्तर द्यायला लावलं तर नावाचा 'वालावलकर' नाही!' अशी शपथबिपथ घेतली होतीत की काय? ;)

तात्या.

तर्क.२४ उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आता पावेतो पाच सदस्यांनी उत्तरे पाठविली. महत्त्वाचे म्हणजे तात्यासाहेबांचे अकडेमोडीसह आलेले उत्तर अचूक आहे.त्यांचे विशेष अभिनंदन! तसेच युयुत्सु आणि अभिजित यांची उत्तरे बरोबर आहेतच. श्री. विसुनाना यांनी वय अचूक काढले. पण मृत्युसन काढताना शेवटी १ का मिळवला यावर मला विचार करायला हवा.

प्रतिसादाकरिता सर्वांना धन्यवाद!

१८५६

जन्मसाल + वय ही संख्या या अटीत बसायची असेल तर ती (२९+१=) ३०च्या पटीत आली पाहिजे.
ते १८९७ साली जिवंत होते. म्हणजे ६३ पेक्षा (६३ * ३० = १८९०) त्यांचे वय जास्त होते. ते १९३१ मध्ये किंवा त्याआधी निवर्तले. त्याअर्थी त्यांचे वय ६५ पेक्षा (६५*३०=१९५०) कमी होते. म्हणून लेले ६४ वय (म्ह. ६४*३०=१९२० साली) असताना गेले व त्यांचा जन्मसन १९२० -६४=१८५६.

- दिगम्भा

कळले नाही!

उत्तरे व्य नि नेच पाठवा अशी सुस्पष्ट शुद्ध मराठीतली सूचना असताना आपण इथे जाहीररित्या उत्तर द्यायचे प्रयोजन कळले नाही!

तात्या.

शतशः क्षमस्व, पण्

हातून चूक तर झाली, पण तात्या जरा सबुरीने घेतले असते व लग्गेच प्रतिसाद टाकला नसता तर माझा प्रतिसाद काढून टाकण्याचा प्रयत्न विफल झाला नसता.
आता परिस्थिती बदलणे अशक्य, म्हणून सर्वांची व यनांची पुन्हा क्षमा मागतो व शिक्षा म्हणून पुढची दोन कोडी सोडवणार नाही.
- दिगम्भा

शिक्षा?

पण तात्या जरा सबुरीने घेतले असते व लग्गेच प्रतिसाद टाकला नसता तर माझा प्रतिसाद काढून टाकण्याचा प्रयत्न विफल झाला नसता.

आता मला काय महिती तुम्ही प्रकाटा म्हणून! नेहमीची घाईगर्दीची कामे संपवून मी जरा उपक्रमावर डोकावलो आणि बघतो तर तुमचा जाहीर प्रतिसाद! म्हटलं मारावा एखादा चौकार! ;)

आता परिस्थिती बदलणे अशक्य, म्हणून सर्वांची व यनांची पुन्हा क्षमा मागतो व शिक्षा म्हणून पुढची दोन कोडी सोडवणार नाही.

अहो असं काहीतरी करू नका हो!

बिरुटे साहेब काय, तुम्ही काय! तुम्ही लोकांनी हल्ली ही शिक्षेची नवीन काय फ्यॅशन काढली आहे कोण जाणे! ;)

असो! स्वतःला कुठलिही शिक्षा करून घेऊ नका अशी कळकळीची विनंती!

आपलाच,
तात्या.

स्व्-शिक्षा

कृपया स्वतःचे दादोजी कोंडदेव करुन घेऊ नका.

फारतर शिक्षा म्हणून दोन नवीन कोडी उपक्रमावर टाका

कस्स्स्सं..

कोडी वाचून गेलो.

मी अमूक एका संखेला अमूक एका संखेने गुणून पाहिले पण इसविसनाचे कोणतेच वर्ष येईना म्हणून प्रयत्न सोडून दिला.

बिरुटे साहेब काय, तुम्ही काय! तुम्ही लोकांनी हल्ली ही शिक्षेची नवीन काय फ्यॅशन काढली आहे कोण जाणे! ;)
तात्या,
पूढे ही परंपरा रुढ होईल,असे वाटले नव्हते.माझ्याकडून फारच मोठी चूक झाली.त्यामुळे मी आता.................काही नाही ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:-)

त्यामुळे मी आता.................काही नाही

:-)

शिक्षा

शिक्षा म्हणून पुढची दोन कोडी सोडवणार नाही.
ही काय शिक्षा झाली? अभ्यास केला नाही म्हणून परीक्षेला न बसण्याची शिक्षा दिल्यासारखे झाले. शिक्षा भोगायचीच असेल तर तुम्हाला सर्वात आवडलेली दोन कोडी द्या.
आपला
(न्यायशास्त्राभ्यासक) वासुदेव

आम्हाला ती सुटतील असे नाही, पण वाचायला आवडतील.
आपला
(गणितभीरू) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

२९

गणित विषयाला वाहिलेले पहिले मराठी नियतकालिक 'तर्कभास्कर' मुंबईहून प्रसिद्ध होत असे
हे खरे का? आता तर्क या विषयावर काय काय प्रसिद्ध होते? मराठी आणि ईंग्रजी मध्ये? किंवा जाळ्यावर?

२९ या या संख्येचे अनेक आश्चर्यकारक गुणधर्म

कोणते असावेत ते? कुणाला माहित आहेत का यातले काही? की हे फक्त कोड्याच्या सोयीसाठी लिहिले असावे?

तर्क.२४;प्रा.लेले

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याची आणखी चार उत्तरे आली आहेत. श्री. दिगम्भा, अदिती,राधिका आणि आवडाबाई या सर्वांची उत्तरे बरोबर आहेत.त्यांत श्री दिगम्भा यांचा युक्तिवाद प्रभावी आहे.

तर्क.२४:प्रा.लेले..उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जन्मसन वयाच्या(आयुर्मानाच्या) २९ पट. जन्मसनात वय(म्हणजे वयाची एक पट) मिळवले की मृत्युसन येतो.म्हणून मृत्युसन वयाच्या ३० पट. १८९७ ते १९३१ या दरम्यान ३० ने नि:षेश भाग जाणारी एकच संख्या म्हणजे १९२०. हा मृत्युसन. त्याला ३० ने भागून ६४ हे वय.ते १९२० मधून वजा करून १८५६ हा जन्मसन.
(कोड्यातील सर्व माहिती कल्पनिक आहे.)

 
^ वर