ग्राउंडहॉग डे (१९९३)

"गरम शेगडीवर एका मिनिटासाठी हात धरला तर तो एक मिनिट एक तासासारखा वाटतो आणि एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो" हे आइनस्टाइनने दिलेले सापेक्षतावादाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की काळ थांबावा असे वाटते. पण खरेच फक्त आपल्यासाठी काळ थांबला तर काय होईल?

१९९३ साली प्रदर्शित झालेला 'ग्राउंडहॉग डे' याच कल्पनेवर बेतलेला आहे. फिल कॉनर्स हा एक स्वकेंद्रित वार्ताहर, जो एका वाहिनीसाठी बातम्या देतो. २ फ़ेब्रुवारीला ग्राउंडहॉग डे 'कवर' करण्यासाठी तो, त्याची निर्माती रीटा आणि कॅमेरामॅन लॅरी एका गावात येतात. कार्यक्रम संपल्यानंतर जेंव्हा फिल आणि मंडळी जायला निघतात तेंव्हा अचानक जोरदार वादळामुळे रस्ते बंद पडतात. अनिच्छेने का होईना पण ती रात्र त्यांना त्याच गावात घालवावी लागते.

Groundhog-Day
ग्राउंडहॉग डे (१९९३)

दुसऱ्या दिवशी सकाळी गजराचे गाणे वाजते. तारीख असते २ फेब्रुवारी! फिल आपल्या खोलीच्या बाहेर येऊन पाहतो हॉटेलच्या व्यवस्थापकापासून नोकरांपर्यंत सगळे त्याला आज २ पेब्रुवारी आहे असे सांगतात. ग्राउंडहॉग डे ची लगबग चालू असते. फिलला वाटते सगळे लोक मिळून त्याची गंमत करत असावेत. पण ग्राउंडहॉग डे चा कार्यक्रम खरेच पुन्हा सुरू होणार असतो. कालच्या सारखीच रीटा आणि लॅरी त्याला भेटतात आणि पुन्हा एकदा बातमी देण्याचे सोपस्कार सुरू होतात. फिल ला कळत नाही हे काय चालले आहे. तो रीटा आणि लॅरीला हे सांगायचा प्रयत्न करतो पण त्यांच्यासाठी हे सारेच अतर्क्य असते. शिवाय फिलच्या स्वकेंद्रित वृत्तीचा अनुभव असल्याने ते त्याच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देत नाहीत.

फिलसाठी हे सगळे एका स्वप्नासारखेच असते. कदाचित दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर सगळे काही सुरळीत होईल या अशेत तो झोपी जातो. पुन्हा त्याच गजराच्या गाण्याने त्याला जाग येते. तारीख पाहतो तर २ फेब्रुवारी! खोलीबाहेर आणि हॉटेलात काल भेटलेलीच माणसे, काल असलेल्याच जागी, काल करत असलेल्या गोष्टी करत असलेली त्याला दिसतात. ग्राउंडहॉग डे ची लगबग सुरू असते. कार्यक्रमाच्या जागेकडे जाताना गेले दोन दिवस त्याच जागी भेटलेला त्याचा जुना वर्गमित्र पुन्हा भेटतो जो सध्या इन्शुरन्स एजंट बनलेला आहे. तो गेल्या दिवसांप्रमाणेच पॉलिसी घेण्याची गळ घालतो. नेहमीप्रमाणेच रीटा आणि लॅरी भेटतात आणि बातमी देण्याचे सोपस्कार सुरू होतात. आता मात्र फिलला कळून चुकते की ही काहीतरी गडबड नक्कीच आहे. हा भ्रम किंवा भास नाही.अचानक कोणाला एका छोट्याश्या जागेत बंदिस्त करावे आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसू नये अशी फिलची अवस्था होते.

सुरुवातीला, दिवसभरात घडणाऱ्या गोष्टींची खडानखडा माहिती असल्याचा गैरफायदा घेण्याची इच्छा त्याला होते. त्यात तो काही अंशी यशस्वीही होतो. काहीही झाले, पोलिसांनी पकडून तुरुंगात जरी डांबले तरी दुसरा दिवस उजाडताच आपण आपल्या हॉटेलातील खोलीत असू हे त्याला माहीत असते. अश्या काहीबाही गोष्टी करण्यात यश मिळाले तरी 'एका दिवसात' रीटाच्या मनात आपल्याविषयी प्रेम निर्माण करण्यात मात्र तो अपयशी ठरतो.

काळाच्या तुरुंगात अडकल्याची भावना तीव्र होऊन पुढे त्याचे अद्वेगात आणि नंतर नैराश्यात रूपांतर होते. यातून सुटका करून घेण्यासाठी फिल बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करतो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या हॉटेलातल्या खोलीत नेहमीसारखा त्याचा दिवस सुरू होतो.

अश्याच एका दिवशी रीटाशी बोलताना तो आपले मन तिच्यासमोर मोकळे करतो. तिच्याशी बोलता बोलता आपल्या थांबलेल्या आयुष्यातही आपण काही चांगले करू शकू असे त्याला वाटू लागते. त्याचा स्वभाव बदलू लागतो. जर आपल्याला एकच दिवस पुन:पुन्हा जगायचा आहे तर आपल्या भोवतालच्या लोकांना मदत केली पाहिजे, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्याला वाटू लागते.

इतरांना मदत केल्यावर आणि इतरांना हवे ते त्यांना दिल्यावर मिळणारा आनंद आपल्याला हवे ते मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा जास्त चांगला असतो हे त्याला पटू लागते. स्वकेंद्रित आणि स्वार्थी फिल निस्वार्थी, आनंदी आणि इतरांना मदत करायला नेहमी तत्पर बनतो. आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे आणि काय असावे हे त्याला समजून चुकते.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेच गजराचे गाणे वाजते. तारीख असते ३ फेब्रुवारी!

अधिक माहिती :
चित्रपटाविषयी अधिक माहिती - IMDB
चित्रपटाविषयी अधिक माहिती - विकीपिडीया
ग्राउंडहॉग डे

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर विवेचन!

आइनस्टाइनचं वाक्य इथे अगदी चपखल बसतं. चित्रपटाचं कथानक वाचून पाहण्याची इच्छा झाली आहे. आजच DVD भाडयाने घेऊन पाहातो.

पोकर चेहर्‍याचा बिल मरे

हा माझाही आवडता चित्रपट. पोकर चेहर्‍याचा बिल मरेचा बघितला की हसू येतं. माझा आवडता नट. त्याची आणि अँडी मॅक्डॉवल ह्या दोघांतले रसायनशास्त्र (केमिस्ट्री) चांगलेच जमून आले होते. :):)

उत्सुकता चाळवणारा

आणि वेगळ्या विषयावरचा चित्रपट. इथथे परीक्षण दिल्यावबद्दल आभार, शशांक.
सन्जोप राव

मस्त/ अवांतर

मस्त चित्रपट. बर्‍याच आधी पाहिलेला होता तेव्हा परीक्षण वाचून पुन्हा पाहायला हरकत नाही.

अवांतर १: आइनस्टाईनचा सापेक्षतावाद सिद्धांत बदलण्याचा अपराध करते.
एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो आणि लग्नाला काही काळ गेल्यानंतर बायकोबरोबर घालवलेले एक मिनिट एक तासासारखे वाटते. (ह. घ्या. बायकांनी)

अवांतर २: यावर्षी ग्राउंडहॉगने वसंत ऋतूचे आगमन लवकर होणार आहे असे भाकित केले होते त्यानुसार आमच्याकडे कालच झाडांना पालवी फुटल्याचे दिसले. (हे आगमन लांबले तर एप्रिलच्या मध्यावर पालवी फुटते.)

कदाचित.. /ग्राउंडहॉग

एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो आणि लग्नाला काही काळ गेल्यानंतर बायकोबरोबर घालवलेले एक मिनिट एक तासासारखे वाटते.

कदाचित आइनस्टाइनलाही तसेच म्हणायचे असावे पण बायकोच्या भीतीने म्हटले नसावे :)

यावर्षी ग्राउंडहॉगने वसंत ऋतूचे आगमन लवकर होणार आहे असे भाकित केले होते त्यानुसार

हा कार्यक्रम बर्‍याच ठिकाणी होतो ना? प्रत्येकाचा 'एरिया' ठरलेला असतो का? आणि हो ग्राउंडहॉग ला मराठीत काही नाव आहे का?

ग्राउंडहॉग

हा कार्यक्रम बर्‍याच ठिकाणी होतो ना? प्रत्येकाचा 'एरिया' ठरलेला असतो का? आणि हो ग्राउंडहॉग ला मराठीत काही नाव आहे का?

मला माहित आहे त्यानुसार पेनसिल्वेनिया आणि न्यूयॉर्कच्या राज्यात होतोच शिवाय कॅनडातही होतो. त्याखेरीज इतरत्रही होत असावा असे वाटते. आम्ही पेनसिल्वेनियाच्या फिल नावाच्या ग्राउंडहॉगचे भाकित मानतो, जे सहसा चुकत नाही अशी बढाई मारली जाते. ;-) (याला कोणी गंभीरपणे घेऊ नये, फक्त जुनी प्रथा आहे.)

ग्राउंडहॉग रस्त्यावर बरेचदा दिसतो, दिसायला खारीसारखा असतो पण लहान सशाच्या आकाराचा असतो. (अमेरिकेत चक्क भारतीय डुकराच्या आकाराचे ससे आणि बैलाच्या आकाराची डुकरे पाहिली आहेत.) दोन फेब्रुवारीला आपल्या बिळातून बाहेर येऊन त्याने स्वतःची सावली पाहिली तर तो घाबरतो आणि पुन्हा जाऊन निद्रस्त होतो, म्हणजे थंडी वाढणार असे भाकित केले जाते. आमच्या सुदैवाने यावर्षी त्याला सावली दिसली नसावी. :)) या प्राण्याला मराठीत काही नाव असावे की काय याची कल्पना नाही.

धन्यवाद

प्रतिसादींचे आणि वाचकांचे आभार!
टीव्हीवर चॅनले चाळत असता योगायोगाने हा चित्रपट पाहण्यात आला. नेहमी लक्षात राहील/ठेवावा असा चित्रपट. बिल मरेचा अभिनय फारच छान आहे.

नविन

चित्रपटाची कथा वेगळी आहे. पाहिला पाहिजे जमलं तर.

छान

कथानकाकडे पाहताना, मेमेन्टो (याच्या बिलकुल उलट), ५० फस्ट् डेट्स, बटरफ्लाय् इफेक्ट, रन लोला रन वगैरे चित्रपट आठवले. हा ही पहायला हवा असे दिसते.

~ तो ~

रन लोला रन

ग्राऊंडहॉग डे पेक्षा याच विषयावरचा रन लोला रन अधिक प्रभावी आहे. :)

रन लोला रन

ग्राऊंडहॉग डे पेक्षा याच विषयावरचा रन लोला रन अधिक प्रभावी आहे. :)

मस्त

परिक्षण आवडले. हा एकदम धमाल चित्रपट आहे. बिल आणि अँडी या दोघांचा अभिनय छान आहे. बिलचा एवढ्यात आलेला लॉस्ट इन ट्रान्सलेशन पाहीला, पण तेवढा परिणामकारक वाटला नाही.
लेखाबद्दल धन्यवाद.
राजेंद्र

नक्कीच पाहणार

नक्कीच पाहणार हा चित्रपट. छान केले आहे परीक्षण.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

धन्यावाद

चित्रपटाबद्दलचे कतुहल वाढले, चित्रपट पहायलाच हवा.
कल्याण खराडे

 
^ वर