विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी
केवळ गणिताचेच नव्हे तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे सुमारीकरण होत आहे. विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेत विद्यार्थ्याची नाराजी पत्करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्यांना जगता येत नाही. विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करणे गरजेचे ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची शहानिशा करू पाहणारे शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक इत्यादी प्रमुख घटक कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. म्हणून सर्व जण safe राहण्यातच धन्यता मानत आहेत. कायद्याचा बडगा केव्हा, कसा कोसळेल याचा नेम नाही. तुम्ही दिलेल्या मार्क्सवरून विद्यार्थी (व त्यांचे पालक) तुमच्यावर खटला भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिडा टळो म्हणत पैकीच्या पैकी मार्क्स देण्याकडे कल वाढत आहे. चुकीचे उत्तर बरोबर कसे यासाठी थोडीशी कसरत करावी लागते. तेवढे कष्ट घेण्याची तयारी परीक्षकांच्याकडे आहे.
अशाच एका चाचणी परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याच्या दबावामुळे परीक्षकांना कुठल्या कुठल्या दिव्यातून जावे लागते याचे एक मजेशीर उदाहरण!
1.भौतशास्त्र: टेबलावरील चेंडू घरंगळत कडेला आल्यानंतर चेंडू वर जाईल की खाली पडेल?
विद्यार्थ्याचे उत्तर: वर जाईल.
परीक्षकाची टिप्पणी: वर - खाली, उजवे - डावे या गोष्टी सापेक्ष असल्यामुळे सैद्धांतिकरित्या उत्तर बरोबर असू शकेल.
टेबलावरील चेंडू खाली पडून टप्पा घेतलेला चेंडू वर जाताना विद्यार्थ्यानी पाहिलेले असल्यास उत्तर बरोबर असेल.
विद्यार्थ्याचे डोके खाली व पाय वर या स्थितीत असताना पडणाऱ्या चेंडूचे निरीक्षण केल्यास चेंडू वर जाताना दिसेल.
निर्णय: स्वीकारार्ह
2.रसायनशास्त्र: या जगात सर्वात जास्त प्रमाणात कुठल्या पदार्थाचा वापर पिण्यासाठी होतो?
विद्यार्थ्याचे उत्तर: कोका कोला
परीक्षकाची टिप्पणी: विद्यार्थी हेच पेय नेहमी घेत असल्यामुळे त्याचे उत्तर प्रत्यक्ष अनुभवातून आलेले आहे. (Evidence based...) त्यामुळे तीच वस्तुस्थिती असावी. शिवाय कोकोकोलात पाण्याचे प्रमाण आहेच की.
निर्णय: स्वीकारार्ह
3.जीवशास्त्र: तुम्ही हाताच्या बोटाने लिहिता की पायाच्या बोटाने?
विद्यार्थ्याचे उत्तर: दोन्ही
परीक्षकाची टिप्पणी: याचे प्रत्यक्ष पुरावे प्रसार माध्यमात उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्याच्या उत्तरात चूक नसावी.
निर्णय: स्वीकारार्ह
4.गणित:बीजगणिताचा फायदा काय?
विद्यार्थ्याचे उत्तर: बीजगणित शेतात पेरून गणिताचे पीक घेता येईल
परीक्षकाची टिप्पणी: उत्स्फूर्तपणे दिलेल्या या उत्तरातून विद्यार्थ्याला शेतीचे ज्ञान आहे हे कळेल. त्यासाठी पूर्ण मार्क्स द्यावेत.
निर्णय: स्वीकारार्ह
5.इतिहास: भूतकाळ वा वर्तमानकाळातील कुठल्या व्यक्तीबद्दल आपल्याला अतीव आदर आहे?
विद्यार्थ्याचे उत्तर: वीरप्पन. तो खराखुरा फायटर होता.
परीक्षकाची टिप्पणी: हीरो म्हणून योग्य व्यक्तीची निवड केली आहे. त्याच्याकडे भरपूर काही शिकण्यासारखे होते.
निर्णय: स्वीकारार्ह
6.भूगोल: आपला जास्तीत जास्त वेळ कुठल्या ठिकाणी जातो?
विद्यार्थ्याचे उत्तर: मॉलमध्ये
परीक्षकाची टिप्पणी: विद्यार्थ्याच्या दृष्टीने एक अत्यंत प्रामाणिक व समर्पक उत्तर.
निर्णय: स्वीकारार्ह
7.साहित्य: तुमचा आवडता लेखक कोण व का?
विद्यार्थ्याचे उत्तर: माझा पाच वर्षाचा भाचा. तुम्ही आमच्या घराच्या भिंती बघाच. भिंत पूर्ण भरलेली आहे.
परीक्षकाची टिप्पणी: लेखक म्हणजे लिहिणारा या अर्थाने विद्यार्थ्याचा भाचासुद्धा लेखकच. विद्यार्थ्याने त्याच्या कला व साहित्य गुणाचे कौतुक केले आहे.
निर्णय: स्वीकारार्ह
8.व्याकरण: दोन शब्दाच्या वाक्याची रचना करा.
विद्यार्थ्याचे उत्तर: माहित नाही.
परीक्षकाची टिप्पणी: तांत्रिकदृष्ट्या हे वाक्य अर्धवट वाटते. फक्त त्यातील 'मला' हा शब्द गाळलेला आहे. परंतु वाक्यातून अर्थबोध होत असल्यामुळे उत्तर बरोबर आहे.
निर्णय: स्वीकारार्ह
9.शब्दसंग्रह: खोका म्हणजे काय?
विद्यार्थ्याचे उत्तर: एक कोटी रुपये
परीक्षकाची टिप्पणी: प्रश्न विचारताना समानार्थी उत्तराची अपेक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्याने या शब्दाला नवीन अर्थ प्राप्त करून दिला आहे. व तो जनसामान्यात रूढ आहे.
निर्णय: स्वीकारार्ह
10. सामाजिक अभ्यास: महात्मा गांधीजी कोण होते?
विद्यार्थ्याचे उत्तर: चौकातील पुतळ्याचे ते नाव आहे.
परीक्षकाची टिप्पणी: भोवतीच्या सूक्ष्म निरीक्षणातून दिलेले हे उत्तर आहे. त्याला प्रश्न कळला आहे. म्हणून उत्तर बरोबर आहे.
निर्णय: स्वीकारार्ह
अशा प्रकारे चाचणी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून इंजिनियरिंगमध्ये त्याला प्रवेश मिळाला.
अजून एका "दीड शहाण्या"ने दिलेली उत्तरं अशी होती:
कुठल्या युद्धात नॅपोलियनचा मृत्यु झाला?
शेवटच्या युद्धात.
बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या सह्या कुठल्या ठिकाणी केल्या?
कागदाच्या पानाच्या शेवटी.
रावी नदी कुठल्या State मधून वाहते?
Liquid state..
घटस्फोटासाठीचे महत्वाचे कारण कोणते?
लग्न....
नापास होण्याचे महत्वाचे कारण कोणते?
परीक्षा....
अर्धा कापलेला सफरचंद कसा दिसतो?
उरलेल्या अर्ध्यासारखा...
निळ्या समुद्रात तांबडा दगड टाकल्यास काय होईल?
दगड ओला होईल.
आठ दिवस झोपेविना माणूस कसा काय राहू शकतो?
त्यात काय विशेष. तो रात्री झोपत असेल.
8 मजूरांना एक भिंत बांधण्यासाठी 4 दिवस लागतात. तर ती भिंत बांधण्यास 4 मजूरांना किती दिवस लागतील?
शून्य दिवस. कारण अगोदरच ही भिंत बांधलेली असते.
याबद्दल अधिक टिप्पणीची गरज नसावी!
Comments
भौतिकशास्त्र
कृपया
1.भौतशास्त्र: ... ऐवजी 1.भौतिकशास्त्र: ....
असे वाचावे.
अनपेक्षित मांडणी
विषय गंभीर असला तरी मांडणी ढकलपत्रांसारखी वाटली
श्री. नानावटींकडून काहिशी अनपेक्षित मांडणी. असो.
बाकी शिक्षणक्षेत्रात इतके आणि इतक्या वेगाने प्रत्येक सरकार बदल करते आहे की प्रत्येक वर्षी पास झालेली बॅच आधीच्या आणि पुढच्या वर्षीच्या ब्याचपेक्षा गुणात्मक दृष्ट्या वेगळी असावी. :(
मार्क देण्यासाठी कारण ?
कुठल्या परीक्षेत मार्क देण्यासाठी कारण द्यावे लागते? हा बहुधा संभाव्य परीक्षकांच्या प्रशिक्षणाचा भाग असावा!
बीजगणिताचा फायदा काय?
लेख ढकलपत्रावरून घेतल्यासारखा वाटतो आहे याच्याशी सहमत.
बाकी, "बीजगणिताचा फायदा काय?" हे आणि उपरोल्लेखित इतर काही प्रश्न खरोखरी कोठे विचारले जात असतील तर त्या शाळेत पुन्हा अॅडमिशन घेण्यास मी तयार आहे.
रोचक
ढकलपत्रासारखा वाटला तरी विषय एकंदरीत रोचक!
फारा वर्षांपूर्वी मी प्राथमिक यत्तेत असताना त्यावेळच्या सिनियर विद्यार्थ्यांनी वर्षसंमेलनात एक नाटुकली केली होती. त्याचे कथाबीज साधरणतः असे -
त्या शाळेत शिक्षण घेतलेला एक विध्यार्थी नंतर बाह्य जगात अपयशी ठरल्यामुळे शाळेत परत येतो आणि तुम्ही मला काहीच शिकवले नाहीत, तेव्हा मी भरलेली फी परत करा असा तगादा लावतो. शेवटी मुख्याध्यापक शिक्षकांची एक कमिटी बनवितात आणि त्या विध्यार्थ्याची पुन्हा एक तोंडी परीक्षा घेण्याचे ठरवतात.
प्रश्न विचारले जातात. विध्यार्थी मुद्दामहून चुकीची उत्तरे देतो आणि शिक्षक तेच उत्तर बरोबर कसे हे त्याला पटवून देतात.
अगदी धमाल नाटीका होती. आता नाव विसरलो.
हलका फुलका
मस्त हलका फुलका लेख. असे डोक्याला त्रास न देणारे लेख अधुनमधुन असावेत.
एक किस्सा
माझी आई आणि वडील दोघेही १० आणि १२ बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासत असत. काही वर्षे मोडरेटर म्हणून पण होते. वर दिलेली उदाहरणे काहीच नाहीत अशी उत्तरे पाहायला मिळत आणि त्यांना बऱ्यापैकी मार्क देवून पास किंवा कधी कधी चांगलेच मार्क देत असत. मोडरेटरकडे गेल्यावर ते सगळे पुन्हा तपासून मार्क कमी केले जात असत. पुन्हा मोडरेटर लेव्हल पण २-३ असतात. दुसऱ्या लेव्हलला गेल्यावर काय होते ते मला माहिती नाही. हा किस्सा साधारणपणे १९९५ सालचा आहे. एकदा उत्तरपत्रिका तपासात असताना आईने वैतागून एका शिक्षकाला बोलावून घेतले. तो बराच दूरच्या गावातून आला होता. त्याचे सगळेच्या सगळे पपेर तपासले तर फार तर ७० एक पोरे पास होत होती. त्याला विचारले अरे बाकीच्यांना इतके मार्क कसे काय दिलेस बाबा. त्यावर त्याचे म्हणणे बाई हे उत्तर चुकीचे आहे हे मला पण माहिती आहे. पण आमच्या सारख्या गावाकडच्या मुलांना जर का तुमच्या शहरातल्या फुटपट्टीने मोजून मार्क दिले तर ही मुले कधी पास होणार? ह्यांच्या पैकी ९०% तर दहावी झाल्यानंतर पुढे शिकणार पण नाहीयेत. काय उपयोग नापास करून? ह्यांना शहरातल्या सारखे नीट शिक्षण आणि बाकीच्या सुविधा पण मिळत नाहीत. तुम्ही लोक इथे १० क्लास लावता तेवढे ह्या मुलांना कसे काय जमणार. कोण कुठून सुरवात करतो हे पण नको का पाहायला? ह्यातळी बरीच मुले अशी आहेत की त्यांच्या घरी कोणीच शिकलेले नाही. मग ह्या मुलांना जेमतेम मार्क देवून पाठवले पुढे तर काय बिघडले. सगळेच एकाच तराजूत तोलून कसे चालतील? ह्याला आईकडे काहीही उत्तर नव्हते आणि आज इतकी वर्षे झाली तर योग्य उत्तर मिळणे कठीणच आहे. सगळ्यांची परिस्थिती भिन्न असते. मुळात सगळ्यांना एकाच परीक्षा हे तरी बरोबर आहे का हाच मला प्रश्न पडतो. पण दुसरीकडे ह्याला पर्याय काय हे पण माहिती नाही.
पहिला भाग आवडला.
मात्र दुसरा भाग अनेक वेळा वाचून गुळगुळीत झालाअसल्यामुळे नविन वाटला नाही.
याचवरून 'ऑप्टीकल फायबर' शिकवणार्या सरांनी या विषयाचं महत्व सांगताना, टेलिफोन वगैरे आहेतच पण आता आणखी काही वर्षात एमएससीबीच्या जड तारा जाउन तिथेही ऑप्टीकल फायबरच टाकणार आहेत असं सांगितलं होतं. (विनोद म्हणून नव्हे, अगदी सिरीयसली)