अमेरिकन हिस्ट्री - एक्स

काही चित्रपट मनोरंजनाचा मसाला ठासून भरलेले परंतू वास्तवाशी कसलीही सांगड न घालणारे बाजारू असतात तर काही वास्तववादी पण मनोरंजनाचा अभाव असणारे अत्यंत रुक्ष कंटाळवाणे असतात. मनोरंजन आणि वास्तव ह्या दोन्हीचा बॅलन्स साधणारे चित्रपट मात्र दुर्मिळच येतात आणि त्यामुळेच सर्वात जास्त आकर्षून घेतात. वास्तवाशी अतिशय प्रामाणिक असणारे परंतु त्याचबरोबर पकड घेणारे कथानक, नेमका अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन ह्यामुळे करमणूक मूल्य देखिल असणारे हे चित्रपट. ह्या विभागणीत बसणारा आणि माझ्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत खूप वरचे स्थान असणारा चित्रपट म्हणजे अमेरिकन हिस्ट्री एक्स. आपली विचारांची बैठक पुन्हा एकदा तपासून पाहायला लावणारा आणि तितकेच सुन्न देखिल करून जाणारा चित्रपट. तत्कालीन (काँटेंपररी)अमेरिकेचे अतिशय यथार्थ चित्रण ह्या चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाचे कथानक हे 'डेरेक व्हिनयार्ड' ह्या मध्यवर्ती भूमिकेच्या अवती भवति फिरत राहते. ही भूमिका अविस्मरणीय केली आहे ती 'एडवर्ड नॉर्टन' ह्या हर हुन्नरी कलाकाराने.( काही वर्षांपूर्वी मी अक्षरशः निव्वळ एडवर्ड नॉर्टनची भूमिका आहे एवढ्या माहितीवर त्याचे जवळपास सगळे चित्रपट बघितले..) डेरेक हा एका कनिष्ठ मध्यमवर्गीय अमेरिकन घरातला अग्निशमन दलातल्या कर्मचाऱ्याचा मुलगा. जात्याच हुशार अभ्यासात देखिल चांगली प्रगती असणारा. बहीण भाऊ आई बाबा असे त्याचे छोटेसे कुटुंब.

चित्रपट सुरू होतो तो कृष्णधवल माध्यमातून उलगडणाऱ्या फ्लॅशबॅकने. भर रस्त्यावर दोन खून पाडल्यावर तुरुंगात शिक्षा भोगून शेवटी जामिनावर डेरेक घरी येत आहे. एका सामान्य मधमवर्गीय घरातील हुशार चुणचुणीत मुलाने तरुण वयात मात्र इतका भीषण गुन्हा का केला? ह्याचा शोध म्हणजे ह्या चित्रपटाचा पूर्वार्ध. भाषेवर उत्कृष्ट पकड असणारा आणि अभ्यासात देखिल बऱ्यापैकी गती असणारा डेरेक शाळेत देखिल मुख्याध्यापकांचा लाडका असतो. हाच डेरेक पुढे मात्र भरकटत जाऊन जातीयवादी आणि द्वेषमुलक संघटनेत सामील होऊन त्याच्या नेतृत्वापर्यंत कसा पोहोचतो हा प्रवास परिणामकारक केला आहेत कल्पक पात्र उभारणीने. डेरेकचे वडील, कृष्णवर्णीय मुख्याध्यापक डॉ‌. स्विनी, ज्यू शिक्षक मर्विन, जातीयवादी संघटनेचा नेता कॅमरन अलेक्झांडर, डेरेकचा भाऊ डॅनी ही सर्व पात्रे आणि त्यांचे कथानकाला आवश्यक बारकावे खूपच प्रभावीपणे मांडले आहेत. बराचसा चित्रपट उलगडत जातो तो डेरेकच्या भावाच्या, डॅनीच्या स्वगतातून. डॅनीला मुख्याध्यापकांनी 'त्याच्यावर त्याच्या भावाचा असणारा प्रभाव' ह्यावर पेपर लिहायला सांगितलेले असते आणि त्यासाठी लिखाण करताना डॅनीच्या समोर सगळा भूतकाळ उभा राहतो.

वर्णद्वेष हा अमेरिकेतील एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. त्यावर आजपर्यंत अनेक पुस्तके आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अमेरिकन हिस्ट्री एक्सच्या कथानकाचा गाभा देखिल वर्णद्वेषच आहे. मुख्याध्यापक स्विनींचा डेरेकवर खूप प्रभाव असला तरी त्याच्या मनावर खोल परिणाम होत असतो तो त्याच्या वडिलांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा.वडिलांनी सहज केलेली शेरेबाजी पौगंडावस्थेतल्या डेरेकची विचारसरणी बदलण्यास कशी कारणीभूत होते हे दाखवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे.

"पूर्वी नव्हते हो हे ऍफरमेटीव्ह ऍक्शनचे खूळ! लोकांना नोकऱ्या देताना फक्त त्यांच्या गुणात्मक अवलोकन केले जायचे त्यांना वंशावर आधारीत सूट मिळायची नाही आता मात्रा निव्वळ कृष्णवर्णीय असण्याच्या जोरावर लोकांना भरती केले जाते"

ही डेरेकच्या वडिलांची तक्रार ऐकताना आजकाल आपल्याकडे देखिल घराघरामध्ये चालणारे संवाद आठवतात. अत्यंत सहज केलेली टिपणी कुणावर आणि कसा परिणाम करून जाईल हे सांगता येत नाही ह्याचे प्रत्यंतर येते. अशातच डेरेकच्या वडिलांचा मृत्यू ड्यूटीवर असताना एका कृष्णवर्णीय गुंडाकडून होतो आणि त्यामुळे डेरेकचे पूर्ण जीवन बदलते. दुःखाचे रुपांतर प्रचंड द्वेष आणि संताप ह्यात होण्यास वेळ लागत नाही. मेंदूचा ताबा संताप आणि राग ह्यांनी घेतलेला डेरेक कॅमरन अलेक्झांडर नावाचा वर्णद्वेषी आणि नाझीवादाचा पुरस्कार करणारी संघटना चालवणाऱ्या धूर्त माणसाच्या जाळ्यात सापडतो. अनेक उडाणटप्पू गोळा केलेल्या कॅमरनला डेरेकच्या रूपात एक नेता मिळतो. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर डेरेक देखिल चिल्लर गुंडगिरी करणाऱ्या ह्या उडाणटप्पूंच्या जमावाला संघटित करण्यास यशस्वी होतो. सर्वसामान्य डेरेक आता नेता झालेला असतो. वर्णाच्या आधारावर दहशत पसरवणे, गोरी कातडी हीच जगातील सगळ्यात श्रेष्ठ जमात बाकी सर्व वर्ण कनिष्ठ, असले प्रोपागांडा चालवणे जोरात चालू असते. अशातच डेरेकच्या घरी त्याच्या गाडीत चोरी करायला आलेले ३ भुरटे चोर डेरेकच्या तावडीत सापडल्यावर तो त्यातल्या दोघांची अत्यंत निर्घृण हत्या करतो. केलेल्या कृत्याचा कसलाही खेद अथवा पश्चात्तापाचा लवलेशही नसणारा डेरेक एखाद्या क्रांतिकारकाच्या थाटात स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतो.

ह्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंगात रवानगी झाल्यावर मात्र डेरेकचे जीवनात आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला त्याला तुरुंगातही त्याच्याच संघटनेचे काही गोरे भेटल्याने तिथेही त्याला बाहेरच्या सारखेच वाटत असते परंतु लवकरच डेरेकच्या लक्षात वास्तव यायला लागते. तुरुंगाच्या बाहेरचे आणि आतले जीवन ह्यातला फरक कळू लागतो. बाहेरुन अंमली पदार्थ मिळावेत म्हणून खालच्या वर्णाच्या रखवालदारांशीही हात मिळवणी करणारे आणि त्यांना चिरीमिरी देणारे संघटनेचे लोक बघितल्यावर त्याला ह्या सगळ्यातला पोकळपणा लक्षात येऊ लागतो. राग आणि संतापाच्या भरात भरकटलेले त्याचे विचार मुळात बुद्धिवादी असलेले त्याचे मन मार्गावर आणू लागते. अर्थातच त्यामुळे त्याच्यात होणारे बदल सहकारी साथीदारांना मात्र आता खटकू त्याचा लागलेले असतात,आणि त्याला धडा शिकवण्यासाठी ते त्याच्यावर अनन्वित अत्याचार करतात. आपल्याच लोकांकडून मिळालेल्या ह्या वागणुकीने तुटायला आलेल्या डेरेकला तुरुंगात एकमेव सहारा राहिलेला असतो तो म्हणजे मुख्याध्यापक स्विनी. जगाने वाया गेलेला असे प्रमाण पत्र दिले असले तरी स्विनींचा मात्र आपल्या विद्यार्थ्यावर विश्वास असतो. खचलेल्या डेरेकला ते तुरुंगात भेटायला येतात. 'तू आतापर्यंर्त अस काहीही केलं आहेस का ज्यामुळे तुझं स्वतःचंच आयुष्य अधिक सुंदर झालं?' ह्या त्यांच्या एका प्रश्नानेच निगरगट्ट झालेला डेरेक ढसढसा रडू लागतो आणि पश्चात्तापाच्या भावनेने पोखरून निघतो. शेवटी पॅरोल वर सुटका झालेला आणि आतून बाहेरुन बदललेला डेरेक एडवर्ड नॉर्टनने अप्रतिम जमवला आहे. धाडसी आत्मविश्वास आणि बेफिकीर वृत्ती पासून एका प्रगल्भ आणि वास्तवाचे भान असणाऱ्याचा व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास खूपच छान रंगवला आहे.

तुरुंगातून बाहेर पडता पडता का होईना योग्य मार्ग डेरेकला दिसला असला तरी तुरुंगात जाण्यापूर्वी त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारा त्याचा लाडका डॅनी मात्र चांगलाच वाहवत चाललेला असतो. डेरेकमध्ये झालेला हा कायापालट डॅनीच्या आकलन शक्तीच्या मात्र बाहेर असते. इकडे कॅमरनने डॅनीला देखिल डेरेक सारखा नेता बनवणे सुरू केलेले असते. शाळकरी वयात माईनं कांफ वरती लेख लिहिणे, प्रचंड वर्णद्वेषी विधाने करणे ह्यामध्ये डॅनी रमलेला असतो. तुरुंगातून बाहेर पडलेल्या डेरेक समोर सगळ्यात मोठे आव्हान असते ते डॅनीला ह्या सगळ्यापासून परावृत्त करण्याचे. एका अंधाऱ्या रात्री रस्त्याच्या कडेला बसून डेरेक आपली सगळी कथा डॅनी समोर मांडतो. दोन भावांच्या संवादाचा हा हळुवार प्रसंग खूपच परिणामकारक झाला आहे. "सतत चीड, राग, द्वेष ह्याचा मला आता मनापासून कंटाळा आला आहे" ह्या डेरेकच्या शब्दातील तळमळ त्याच्या तुरुंगातील अनुभवातून विलक्षण परिणाम करून जाते. हिंसेच्या परिसीमा गाठल्यावर त्याचा उबग आल्याने संन्यास घेणारा सम्राट अशोक नकळत आठवून जातो. ह्यापुढील चित्रपट मात्र सुन्न करणारा आहे. शेवट मी इथं देणार नसलो तरी अतिशय दुःखांत आहे इतकेच नमूद करून हा लेख संपवतो.
- वरूण

Comments

शेवट

ह्या चित्रपटाचा शेवट खरेच पिळवटून टाकणारा आहे, छान परी़क्षण केले आहे.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

परिक्षण...

... मनाला भिडणारे आहे.

वरुण - नेहमीप्रमाणेच आपली अभिरुची आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट नक्कीच बघेन.

आवडले

परीक्षण मनाला भिडणारे आहे.
वरुण - नेहमीप्रमाणेच आपली अभिरुची आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट नक्कीच बघेन.

असेच म्हणतो. परीक्षण आवडले.

अवांतर - एडवर्ड नॉर्टनचा रेड ड्रॅगन मधील एफबीआय एजंट मला आवडतो.

हे परिक्षण आहे का?

वरूणदेवा,

हे परिक्षण आहे का? तसे असेल तर दिगदर्शकाच्या, कथा-पटकथाकाराच्या नांवांचा उल्लेख व्ह्यायला हवा होत. इतर भूमिका कोणी कोणी केल्या आहेत? त्यांच्या नांवांचाही उल्लेख असायला हवा होता. चित्रातली ती गॉगल लावलेली बाई कोण आहे? दिसायला बरी वाटते आहे! ;)

कथानकाबद्दल बाकी छान लिहिले आहेस..

तात्या.

धन्यवाद

तात्या,
ह्याला परिक्षण म्हणा नाहितर रसग्रहण. मी लिहिताना असे काहिच ठरवून लिहिले नसल्याने वरिल उल्लेख राहून गेले. इथे ही सर्व माहिती मिळू शकेल. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
चित्रातील गॉगल लावलेली बाई (ह्या चित्रात) तुम्हाला बरी दिसली असली तरी चित्रपटात ती कथा नायकाची आई आहे ;-)
-वरूण

चांगले परिक्षण

हा चित्रपट पाहिला पाहिजे असे वाटले.
मला एडवर्ड नॉर्टनचा प्रायमल फिअर मधला ऍरॉन भलताच आवडला होता.
त्यावरून आपल्या बॉलिवूड कॉपीपंडीतांनी 'दीवानगी' (नॉर्टन= अजय देवगण) बनवला होता.

प्रायमल फिअर

काही वर्षांपूर्वी मी अक्षरशः निव्वळ एडवर्ड नॉर्टनची भूमिका आहे एवढ्या माहितीवर त्याचे जवळपास सगळे चित्रपट बघितले.

प्रायमल फिअर पाहून एडवर्ड नॉर्टनच्या डोळ्यांतील धूर्त झाक आवडली नव्हती. ती नावड बराच काळ टिकली यात या अभिनेत्याच्या अभिनयाची कल्पना यावी. 'द इल्युजनिस्ट' हा चित्रपट पाहे पर्यंत कायम होती. इल्युजनिस्ट हा देखील एक चांगला चित्रपट आहे आणि कथानक खूप सशक्त नसले तरी एडवर्ड नॉर्टनने तो चित्रपट प्रेक्षकांना रुचेल याची जबाबदारी चांगली वाहिली आहे.

चित्रपटाचे परीक्षण सुरेख झाले आहे. हा चित्रपट पाहिला नाही परंतु परीक्षण वाचून पहावासा वाटला.

अवांतरः दिवानगी हा चित्रपट आणि अजय देवगण याचा अभिनय दोन्ही आवडले नव्हते. हॉलीवूडपटातून काय चोरावे याची कल्पना अद्याप अनेक बॉलिवूडकरांना नाही याचे एक चांगले उदाहरण हे असावे.

परिक्षण, परीक्षण

'परीक्षण' हा शब्द बरोबर आहे 'परिक्षण' नव्हे. वरूण यांनी चित्रपटाचे परीक्षण चांगलेच केले आहे.
आपला
(परीक्षणवाचक) वासुदेव

सुरेख

सुंदर परिक्षण. चित्रपट बघायला हवा.

मनोरंजन आणि वास्तव ह्या दोन्हीचा बॅलन्स साधणारे चित्रपट मात्र दुर्मिळच येतात आणि त्यामुळेच सर्वात जास्त आकर्षून घेतात.
१००% सहमत आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आभार

प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्वांचे आभार.

- वरूण

चीड, राग, द्वेष

"Life is too short to be pissed off all the time."
- Danny, American History -X

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

कालच

चित्रपटाचा अर्धा भाग बघितला. लाईट गेल्यामुळे पुढचा भाग बघता आला नाही.

एडवर्ड नॉर्टनची फाईट क्लब मधली भूमिकाही मला आवडते. :)मन सुन्न करून टाकणारा चित्रपट

ह्या गुरुवारी केबलवर हा चित्रपट लागला... आणि थँक्स टू वरुण... नाव ओळखीचे वाटले म्हणून पाहत राहिलो. पाठोपाठ दोनवेळा पाहिला.

डेरेकने मित्रमंडळींना केलेली "अभ्यास आणि आभास" पूर्ण आवाहने, डॅनीची डेरेकवरील श्रद्धा, उध्वस्त कुटुंब सारे सारे काही कोणत्याही घरात घडू शकते हे सारखे जाणवत राहते. डेरेकचे वडील हे डेरेकसारखी अतिरेकी नव्हते, पण त्यांचे "डायनिंग टेबल टॉक" कसे कधी विष भिनवत जाते ते पाहिले की आजूबाजूला, अगदी तुम्हाआम्हाकडून कधी ना कधी होणार्‍या असहिष्णुतेचा कधी कोठे कोणत्या रूपात विस्फोट होईल याची शंका मनात आल्यावाचून राहत नाही.

.. एकलव्य_X

 
^ वर