रक्ताभिसरण आणि रक्तदाब

आपल्या रक्तात काय काय असते असे लाक्षणिक अर्थाने बोलले जाते आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातांना त्यात काय पाहिले जाते किंवा सापडते हे मी या पूर्वीच्या लेखात लिहिले होते. ही रक्ताची केमिस्ट्री (रसायनशास्त्र) झाली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) किंवा त्यातल्या द्रवविज्ञान (हैड्रॉलिक्स) या शास्त्रांच्या दृष्टीकोनातून रक्ताचा अभ्यास करतांना त्यात काय दिसते हे या लेखात पाहू.

तळपायापासून मस्तकापर्यंत आपल्या शरीरात असलेली हाडे, मांस, कातडी, दात, केस, नखे वगैरे बाकीचे सर्व घनरूप घटक ठरलेल्या जागीच असतात आणि आयुष्यभर त्या जागीच राहतात, पण द्रवरूप असलेले रक्त मात्र सतत इकडून तिकडे फिरत असते. या क्षणी करंगळीत असलेल्या रक्तातला एकादा कण पुढल्या क्षणी पायात किंवा मेंदूत गेलेला असेल किंवा करंगळीतच परत आलेला असेल. शरीराच्या सर्वच भागातल्या रक्ताचा काही भाग दर सेकंदाला हृदयाकडे जातो आणि तिथून तो फुफ्फुसात जाऊन प्राणवायू घेऊन येतो आणि पुन्हा शरीरभर पसरत असतो. या क्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. हे साध्य करण्यासाठी आपले हृदय सतत धडधडत असते.

Heart

हृदयाचे चार कप्पे असतात. त्याच्या धडधडण्याच्या क्रियेत हे चारही कप्पे एका अत्यंत सुसंबध्द अशा क्रमाने आणि नियमितपणे आकुंचन व प्रसरण पावत असतात. पहिला कप्पा प्रसरण पावताच त्याला जोडलेल्या मोठ्या रक्तवाहिनीतून शरीरातले थोडे रक्त त्या कप्प्यात येते. तिथून ते दुस-या कप्प्यात जाते, तिथून फुफ्फुसाकडे जाऊन परत येतांना मात्र ते तिस-या कप्पात येते, तिथून आधी चौथ्या कप्प्यात जाऊन तिथून तीन मोठ्या रक्तवाहिन्यांमधून शरीरात पसरते. या प्रत्येक कप्प्यांना विशिष्ट प्रकारच्या झडपा असतात. त्यांमधून रक्ताचा प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहू शकतो. उंदराच्या पिंज-याचे दार उघडून तो आत प्रवेश करू शकतो पण आतल्या बाजूने तेच दार उघडून तो बाहेर येऊ शकत नाही. याचप्रमाणे आपल्या शरीरातले रक्त चित्रात दाखवल्याप्रमाणे आधीच्या कप्प्यामधून पुढच्या कप्प्यात ठराविक मार्गानेच वाहू शकते. उलट दिशेने वाहून परत जाऊ शकत नाही.

जेंव्हा ते हृदयाच्या चौथ्या कप्प्यामधून शरीरात ढकलले जाते त्या वेळी त्या कप्प्याच्या आकुंचनक्रियेने रक्ताला एक दाब मिळतो. हा रक्ताचा जास्तीत जास्त किंवा वरचा दाब (Systolic pressure) झाला. त्या दाबामुळे ते शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरते आणि सगळीकडून गोळा होत हृदयाकडे जाणा-या रक्तवाहिन्यांध्ये शिरून हृदयाकडे परत जाते. अर्थातच या वेळी त्याचा दाब कमी झालेला असतो. तरीही रक्ताला पुढे ढकलण्यासाठी तो पुरेसा असतो. पाण्याचा प्रवाह नळामधून वाहण्यासाठी त्याला पंपाने दाब द्यावा लागतो, हे प्रेशर पुरेसे नसेल तर नळाचे पाणी वरच्या मजल्यावर चढत नाही किंवा तोटीमधून अगदी कमी जोराने येते हा अनुभव आपल्याला असतो. आपल्या शरीरात पसरलेल्या असंख्य रक्तवाहिन्या आणि त्यांच्या सूक्ष्म अशा शाखा, उपशाखा वगैरेंमधून रक्ताचा पुरेसा प्रवाह वाहण्यासाठी हृदयाला जोर लावून रक्तावर दाब द्यावा लागतो. हृदयाकडून निघालेला रक्ताचा लोंढा संपला तरी रक्तवाहिन्यामधील रक्तावर कमीत कमी म्हणजे खालचा दाब (Dystolic pressure) असतोच. रक्तावरला दाब या दोन मर्यादांमध्ये सारखा बदलत असतो. हृदयामधून जोरात बाहेर पडतांना तो सर्वात जास्त असतो आणि कमी होत सर्वात कमी पातळीवर आल्यानंतर हृदयाचा पुढचा ठोका पडतो आणि त्याबरोबर रक्ताचा दाब पुन्हा वाढतो. हे सगळे एका सेकंदाच्या आत घडते.

BPMeaurement

रक्तदाबासाठी तपासणी करतांना हृदयामधून बाहेर पडणा-या रक्तवाहिनीमधील (Arteries) हे दोन्ही रक्तदाब मोजतात. त्यासाठी एका खास उपकरणाचा उपयोग केला जातो. यातली पोकळ बाही (कफ) दंडाभोवती घट्ट गुंडाळून त्यात हवा भरतात आणि फुगवत नेतात. या हवेच्या दाबामुळे दंडामधील रक्तवाहिनी चेपली जाते आणि तिच्यामधून हाताकडे जात असलेला रक्ताचा प्रवाह पूर्णपणे थांबतो. नळीने जोडलेला व्हॉल्व्ह उघडून आतली थोडी हवा बाहेर सोडली तर हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब हळू हळू कमी करत आणला तर चेपलेली रक्तवाहिनी मोकळी होत जाते आणि हातात जाणारा रक्तप्रवाह हळू हळू सुरू होतो. हवेचा दाब आणखी कमी झाल्यानंतर रक्तप्रवाह पूर्ववत होतो. या तपासणीचे वेळी हातात होत असलेल्या रक्तप्रवाहाचा आवाज स्टेथास्कोपने ऐकतात आणि रक्ताचा प्रवाह सुरू होण्याचा आणि पूर्ववत होण्याचा क्षण पकडतात. हवेचा दाब मोजण्यासाठी पारा भरलेली एक उभी नळी या यंत्राला जोडलेली असते. एका हाताने व्हॉल्व्ह उघडून हवा बाहेर सोडायची, त्याच वेळी कानाने स्टेथॉस्कोपमधला आवाज ऐकायचा आणि खाली जात असलेली पा-याची पातळी डोळ्याने पहायची अशी तीन कामे लक्षपूर्वक करायची असल्यामुळे ही तपासणी तज्ज्ञ डॉक्टर किंवा नर्सच करू शकतात. ही तीन्ही कामे यंत्राकरवी करवून घेऊन रक्ताचा दाब काट्याने डायलवर दाखवणारी यंत्रे निघाली आहेत आणि आता ती डिजिटल पध्दतीने आकड्यात दाखवणारी उपकरणेसुध्दा उपलब्ध झाली आहेत. पण भारतातले डॉक्टर त्यांवर फारसा भरोसा न ठेवता अजून जुन्या उपकरणांचाच उपयोग करतात.

रक्तदाब मोजणारी उपकरणे फक्त वरचा दाब (Systolic pressure) आणि खालचा दाब (Dystolic pressure) मोजतात. पण त्यांच्या दरम्यानच्या काळात हे कशा रीतीने (झटक्याने किंवा सावकाशपणे) वाढत किंवा कमी होतात हे समजण्यासाठी अधिक सेंसिटिव्ह इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता असते. ईसीजीमध्ये याचा आलेख (ग्राफ) मिळतो. हृदयाच्या एकामागोमाग पडणा-या ठोक्यांमध्ये रक्तावरचा दाब कशा प्रकारे बदलत असतो तसेच हे ठोके किती काळानंतर पडतात, ते एकसारखे असतात किंवा त्यात काही फरक असतो वगैरे सविस्तर माहिती त्यात मिळते. याच्याही पुढची पायरी आयसीसीयूमधील यंत्रात असते. त्यातल्या मॉनिटरवर हे ग्राफ सतत येत राहतात आणि रुग्णाचे हृदय कशा प्रकारे काम करत आहे हे डॉक्टरला दिसत राहते. याशिवाय ट्रेडमिल टेस्ट, टूडी एको, थॅलियम टेस्ट वगैरेंमधून हृदयाची क्रिया कशी चालली आहे याची डायनॅमिक माहिती मिळते.

ही सगळी यांत्रिक उपकरणे यंत्रयुगामध्ये तयार झाली. त्यापूर्वीच्या काळात अशी साधने नसल्यामुळे रक्तप्रवाह समजून घेण्यासाठी मुख्यतः नाडीचे ठोके पाहिले (स्पर्शाने समजून घेतले) जात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेदामध्ये नाडीपरीक्षा अत्यंत महत्वाची समजली जाते. फक्त नाडीच्या ठोक्यांचा अतीशय लक्षपूर्वक अभ्यास करून शरीरातील सगळ्या इंद्रियांचे काम कसे चालले आहे हे निष्णात वैद्य त्यावरून जाणत असत.असे सांगतात इंग्लिशमध्येसुध्दा परिस्थिती समजून घेणे या अर्थाने फीलिंग द पल्स असा वाक्प्रचार आहे. "तुम्ही काल दिवसभर काय काय खाल्ले आणि रात्री काय केले हे सगळे अमका तमका वैद्य फक्त नाडी बघून अचूक ओळखतो." असे एका बुजुर्ग माणसाने मला एकदा सांगितले होते. कदाचित हा त्याच्या गप्पिष्टपणाचा भाग असेल किंवा रोग्याने आपल्यापासून काही लपवून ठेऊ नये म्हणून त्या वैद्याने असा समज पसरवून ठेवला असेल. अशा प्रकारे नाडीपरीक्षेमधून सबकुछ जाणणारे वैद्य आजकाल सहजासहजी पहायला मिळत नसले तरी एका मिनिटात नाडीचे ठोके किती पडतात एवढे मात्र सगळे डॉक्टर आणि वैद्य मोजतात. हे काम करणारी यंत्रेसुध्दा आता अनेक ठिकाणी पहायला मिळतात. दर मिनिटाला नाडीचे ठोके पडण्याचा वेग सतत दाखवत राहणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणेसुध्दा आयसीसीयूमध्ये असतात. मिनिटाला जेवढे नाडीचे ठोके पडतात तितक्या वेळा हृदयाकडून शरीराला रक्तामधून नवा प्राणवायू मिळतो. झोपेत असतांना किंवा निपचित पडून राहिलेल्या वेळी शरीराला जेवढा प्राणवायू लागतो त्यापेक्षा कष्टाचे काम करत असतांना किंवा धावतांना जास्त प्राणवायूची गरज पडते. तो पुरवण्यासाठी नाडीचे ठोके तात्पुरते वाढतात आणि गरज कमी झाली की ते पुन्हा कमी होतात. जिममधल्या आधुनिक यंत्रांमध्ये नाडीचे ठोके दाखवणारी उपकरणे बसवली असतात. ते यंत्र चालवून वर्क आउट करतांना आपण हे पाहू शकतो. मानसिक धक्का किंवा भीतीमुळे सुध्दा छाती धडधडते तेंव्हा नाडीचे ठोके जलदगतीने पडतात. पण या सगळ्या गोष्टी बहुधा कमाल आणि किमान मर्यादांमध्येच घडतात. त्या मर्यादा ओलांडल्या गेल्या तर त्यापासून अपाय होण्याची शक्यता असते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास एका मिनिटात हृदयाच्या कार्याच्या चक्राची किती आवर्तने होतात, त्याची गती सारखीच राहते की त्यात बदल होतात, प्रत्येक आवर्तनात रोग्याच्या रक्ताचा कमाल आणि किमान दाब किती असतो. तोसुध्दा स्थिर पातळीवर राहतो किंवा त्यात बदल होत राहतो, या दोन्हींमध्ये होणारे बदल रोग्याच्या स्थिर किंवा चल स्थितीनुसार असतात की नाही. वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेऊन त्याच्या व्याधीचे निदान करण्यात केला जातो.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

सोप्या भाषेतला लेख आवडला. बाकी नाडी बद्दल चर्चा करायचा मोह आवरता घेतो आहे. इथले काही लोक त्यातले थोतांड समोर आणतीलच.

ही नाडी 'ती' नाही

माझ्या लेखात ज्या नाडीबद्दल लिहिले आहे ती आपल्या मनगटाजवळील रक्तवाहिनी असते. हृदयाकडून येणार्‍या रक्ताच्या लोंढ्यामुळे दर वेळी ती किंचित प्रसरण पावते आणि नाडीवर बोट ठेवल्यास तो धक्का जाणवतो. याला नाडीचे ठोके म्हणतात. हे बहुतेक लोकांना माहीत असेलच.

तामिळ भाषेतले नाडी ग्रंथ किंवा पायजम्यातल्या नाडीचा माझ्या लेखामधल्या विषयाशी कसलाही संबंध नाही . कृपया त्या दिशेने कोणीही विषयांतर करू नये अशी नम्र विनंती आहे.

वरचा दाब आणि खालचा दाब

वरचा दाब (Systolic pressure) आणि खालचा दाब (Dystolic pressure) हे कसे मोजतात ते मला माहिती आहे, पण त्याचा शास्त्रीय अर्थ कळला नाहीये. दोन्ही मोजायचे कारण काय?

त्यात सुद्धा वरचा दाब बराच जास्त होतो ( म्हणजे १२० चा १८० असे ), पण खालचा दाब जास्त झाला थोडाजरी तरी डॉक्टर जास्त काळजी घेतात असे का?

वरचा आणि खालचा रक्तदाब

खालचा दाब (Dystolic pressure) हा आपल्या रक्तवाहिनीवर तसेच जिथे जिथे रक्त जाते त्या सर्व इंद्रियांवर सतत पडत असतो. तो प्रमाणाबाहेर वाढल्यास त्यामुळे इजा होण्याची जास्त शक्यता असते. एकादे वेळेस ८० च्या ऐवजी ९० पर्यंत गेल्यास कदाचित चालेल पण नेहमीच त्याच्याही वर जात असेल तर त्यावर उपचार करावा लागतो.
वरचा दाब (Systolic pressure) हे प्रेशर विरुद्ध वेळ याच्या ग्राफचे शिखर आहे. रक्ताचा लोंढा झटक्याने येतांना त्याचा दाब तिथपर्यंत वाढतो आणि एक किंवा दोन शतांश सेकंद एवढ्या वेळात तो दाब पुन्हा खाली उतरतो. १२० ऐवजी १५० झाला तर ते आपल्याला कळतही नाही आणि बहुधा त्याने फारसा फरक पडत नाही. १७० -१८० वगैरे झाल्यास अस्वस्थ वाटते. या दाबाने सुद्धा इजा होण्याची शक्यता असल्यामुळे तो नियंत्रणाखाली आणण्यासाठी उपचार घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.
मी डॉक्टर नाही. माझे मत माझ्या अनुभवावरून दिले आहे.

अहा!

अहा! घारे सरांचे लेखन म्हणजे मेजवानी असते. सातत्याने माहितीपूर्ण लेखन करणार्‍या काही उपक्रमींपैकी एक असणार्‍या श्री.घारे यांचे हेही लेखन लौकीकाला साजेसे आहे.

मला यात नवी माहिती कमी मिळाली पण मराठीतून इतकी सुस्पष्ट माहिती अन्यत्र नसावी!
मस्त आणि आभार!

सहमत

+१ असेच म्हणतो.

प्रमोद

सुरेख

सुरेख लेख. वाचनखुण म्हणून साठवून ठेवते.

आणखी थोडी माहिती

गतिमान द्रवपदार्थांचा अभ्यास करून बर्नौली या शास्त्रज्ञाने त्याविषयी काही सिध्दांत मांडले होते. त्यामधली किचकट सूत्रे आणि समीकरणे माहीत नसली तरी त्यांचे काही अनुभव आपल्या नेहमीच्या जीवनात येत असतात.
१. नगरपालिकेच्या मुख्य पाईपलाईनपासून एका इमारतीला जोडलेला पाईप एक इंचाचा आणि दुसर्‍या इमारतीला जोडलेला दोन इंचाचा असल्यास दुसर्‍या इमारतीला जास्त पाणी मिळते.
२. एकाद्या चाळीच्या सर्व मजल्यांवरील नळ एकाच वेळी सोडलेले असले तर तळमजल्यावरील नळाला जोरात पाणी येते आणि वरच्या मजल्यांवर ते कमी कमी होत जाते.
३. गाळण्याच्या छिद्रांमधून पाणी भर्रकन खाली उतरते, पाण्याच्या मानाने दाट असलेल्या दुधाला किंचित जास्त वेळ लागतो.
यावरून असे दिसते की नलिकेचा व्यास कमी असल्यास किंवा पाण्याचा दाब कमी असल्यास पाण्याचा प्रवाह कमी होतो. तसेच द्रवाचा दाटपणा जास्त असल्यानेही त्याच्या प्रवाहाला जास्त अडथळा येऊन तो कमी होतो.
या तत्वांच्या आधाराने विचार केल्यास शरीरामधील रक्ताभिसरण जास्त चांगल्या रीतीने समजते. हृदयाच्या आकुंचन क्रियेमुळे रक्तावरील दाब निर्माण होतो आणि त्या दाबामुळे ते आर्टरीज या रक्तवाहिन्यांमधून शरीरामध्ये सगळीकडे पसरते आणि व्हेन्समधून हृदयात परत येते. शरीराच्या प्रत्येक भागाला रक्ताची जेवढी गरज असते त्याप्रमाणे हृदयापासून तिथपर्यंत जाणार्‍या रक्तवाहिन्यांचा आकार कमी किंवा जास्त असतो. त्यानुसार सर्व अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत असतो. त्यासाठी आवश्यक तेवढाच दाब रक्तावर दिला जातो. गरजेप्रमाणे त्यात तात्पुरता किंवा कायमचा बदल करण्याची अद्भुत यंत्रणा प्राणीमात्रांच्या शरीरात निसर्गतःच असते. यात काही असमतोल निर्माण झाला तरच त्यामुळे व्याधी उद्भवतात.

पाण्याचे पाईप आणि रक्तवाहिन्या या दोन्हीमध्ये एक महत्वाचा फरक आहे. पोलादाचे पाईप कठीण असतात आणि अंतर्गत दाबामुळे त्यांच्या आकारात होणारा बदल अत्यंत सूक्ष्म असतो. याच्या उलट शरीरातल्या रक्तवाहिन्या खूपच लवचिक (फ्लेक्झिबल) असतात. मनगट किंवा गळ्यावरल्या रक्तवाहिन्या त्यांच्यामधून जाणार्‍या रक्ताच्या प्रत्येक ठोक्याला फुगतांना बाहेरून दिसतात किंवा ते फुगणे बोटाला जाणवते. आपल्या रक्तवाहिन्या गरजेनुसार फुगू शकत असल्यामुळे त्यांच्यावरचा दाब आपोआप कमी होतो. वयोमानानुसार हा लवचिकपणा कमी होऊन त्या ताठर बनू लागल्यामुळे त्यांच्या अंतर्गत असलेला दाब वाढतो. तो वाढू दिला नाही तर रक्ताचा प्रवाह कमी होतो. यामुळे हातापायामधले त्राण कमी होते, तसेच गरज पडल्यास खूप जास्त रक्तपुरवठा होऊ शकत नसल्यामुळे लवकर थकवा येतो. रक्तदाब आणि रक्तप्रवाह या दोन्हीमध्ये ऑप्टिमायझेशन करणे शरीराला भाग असते. हे काम त्याच्या कुवतीनुसार ते करत असते. ते नीटपणे होत नसेल तर त्याला औषधांची जोड दिली जाते. याशिवाय काही ठिकाणी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आला असण्याची शक्यता असते. औषधोपचाराने रक्त पातळ केले गेले तर त्यामुळेही त्यावरला दाब कमी होतो आणि संकोच पावलेल्या रक्तवाहिन्यांमधून पुरेसा प्रवाह होत रहातो.

गुरुत्वाकर्षणामुळे हृदयामधून पायाकडे येणारे रक्त सहजपणे आपोआपच खाली येत असेल आणि त्यामुळे पायांना भरपूर रक्त मिळत असेल असे वाटेल, पण पायाकडून हृदयाकडे परत जातांना त्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द जावे लागते आणि त्यासाठी उचलणारा किंवा ढकलणारा दुसरा कोणताही जोर नसतो. त्यामुळे पायाच्या बोटांच्या शेंड्यापर्यंत जाऊन परत जाणारा रक्तप्रवाह थोडा कमीच असतो. विशेषतः कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराचे ऊष्ण तपमान राखण्यासाठी रक्ताच्या जास्त प्रवाहाची आवश्यकता असते ते न मिळाल्यामुळे पायाची बोटे सुन्न होतात.

चांगला लेख

लेख अतिशय चांगला आहे. खूप आवडला.

छान

छान.

अधिक लिहिण्यापूर्वी काही बारीकसारीक टिप्पण्या : हृदयाच्या चित्रात "६" क्रमांक अनेकदा आला आहे. त्यातल्या त्यात फुफ्फुसाकडच्या रक्तवाहिन्या आणि उर्वरित शरिराकडच्या रक्तवाहिन्यांकरिता वेगवेगळे संकेतांक दिले तर सोयीचे होईल.
डायास्टोलिकचे स्पेलिंग काही ठिकाणी "dia-" ऐवजी "dy-" असे आलेले दिसते, संपादकांना ते बदलता येईल काय?

"आर्टरी" करिता "धमनी" प्रतिशब्द आहे, बहुधा.

माहिती चांगली आहे, ती आहेच.
-----------

...याच्या उलट शरीरातल्या रक्तवाहिन्या खूपच लवचिक (फ्लेक्झिबल) असतात. मनगट किंवा गळ्यावरल्या रक्तवाहिन्या त्यांच्यामधून जाणार्‍या रक्ताच्या प्रत्येक ठोक्याला फुगतांना बाहेरून दिसतात किंवा ते फुगणे बोटाला जाणवते. आपल्या रक्तवाहिन्या गरजेनुसार फुगू शकत असल्यामुळे त्यांच्यावरचा दाब आपोआप कमी होतो. वयोमानानुसार हा लवचिकपणा कमी होऊन त्या ताठर बनू लागल्यामुळे...

या लवचिकपणाचे महत्त्व याहूनही जास्त आहे. ठोक्यातल्या-ठोक्यात रक्ताचा दाब जास्त असतो (सिस्टली काळात) तेव्हा धमन्या काहीशा फुगून रक्ताचा लोंढा साठवतात. ठोक्याच्या चक्रात रक्ताचा दाब कमी झाला (डायास्टली मध्ये) की लवचिकपणामुळेच पूर्ववत होऊ लागलेल्या धमन्यांमधून रक्त इंद्रियांमध्ये अभिसरतच जाते. म्हणजे हृदयाजवळीच धमनीला जरी "लोंढा+काही नाही असे चक्र प्रत्येक ठोक्याच्या चक्रात जाणवते, तरी इंद्रियांना "प्रवाहात सौम्य लोंढा+सौम्य घट" असे अभिसरण चक्र जाणवते. वयोमानानुसार लवचिकपणा कमी झाला की प्रत्येक ठोक्याला धमनीतील दाब खूप वाढतो आणि खूप कमी होतो. इंद्रियांना काही काळ लोंढा, तर काही काळ नगण्य रक्ताभिसरण मिळते, वगैरे.

...तो सुदिन

लेख आवडला आणि धनंजय यांचा प्रतिसाद मोलाचा वाटला. भारतातील बहुतांश हृद्रोगतज्ञांना धमन्यांच्या लवचिकपणाचे महत्त्व कळले आणि ते त्यांनी मान्य करून त्यानुसार उपचार सुरू केले असा सुदिन लवकरच उजाडावा. ;)

धनंजय यांनी (धमन्यांचे काठिन्य) या विषयावर एखादा विस्तृत लेख लिहावा ही विनंती.
(आरोप नव्हे पण शंका वाटते की धमन्यांच्या काठिन्यावर योग्य वेळीच उपचार न झाल्याने अनेक पेशंटना आपले अवयव किंवा प्राण गमवावे लागतात. [मॉर्बिडिटी/मोर्टॅलिटी] )

धन्यवाद

अधिक चांगली माहिती पुरवल्याबद्दल आभार. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास धमनीमधला तात्पुरता फुगवटा सर्ज टँक. बफर किंवा फ्लायव्हीलसारखे काम करतो.
शाळेत शिकतांना अशुद्ध रक्तवाहिन्यांना नीला (व्हीन) आणि शुद्ध रक्तवाहिंन्यांना रोहिणी (आर्टरी) म्हणतात असे शिकलो होतो. चित्रात दाखवतात त्याप्रमाणे रक्ताचा रंगसुद्धा लाल किंवा निळा होतो अशी भ्रामक कल्पना तेंव्हा झाली होती. शरीरात गेल्या गेल्या शुद्ध रक्त अशुद्ध कसे होते अशी शंका मनात येत होती. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणारी रक्तवाहिनी तथाकथित अशुद्ध रक्त वाहून नेत असली तरी तिला आर्टरी म्हणतात आणि परत येणार्‍या वाहिनीला व्हीन म्हणतात. अशुद्ध रक्तवाहिन्या नीला (व्हीन) आणि शुद्ध रक्तवाहिंन्या रोहिणी (आर्टरी) यातला गोंधळ टाळण्यासाठी मी ६ असा एकच कॉमन आकडा टाकून त्यांचा रक्तवाहिनी असा अर्थ दिला.

 
^ वर