आपल्या रक्तात काय काय सापडते?

एकादा माणूस लहानपणापासूनच शांत, विनम्र, सरळमार्गी, उदार वगैरे असतो, तर दुसरा एकादा ऊर्मट, धांदरट, अडमुठा, दुष्ट वगैरे असतो. स्वभावातले असले गुणदोष ज्याच्या त्याच्या रक्तातच असतात असे अलंकारिक भाषेत म्हंटले जाते. पण प्रत्यक्षात त्या दोघांचे रक्त प्रयोगशाळेत तपासून पाहिले तर कदाचित ते एकसारखेच निघण्याची शक्यता असते. माणसाच्या रक्तात खरोखर कोणकोणत्या गोष्टी असतात आणि त्या किती प्रमाणात असतात हे आता शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते. त्यातल्या काही मुख्य तपासण्यांबद्दल मला असलेली माहिती या लेखात दिली आहे. मी डॉक्टर किंवा पॅथॉलॉजी लॅबमधला सहाय्यक नाही आणि कधीही वैद्यकशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. मी स्वतः आणि माझे कुटुंबीय यांना आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने केलेल्या वाचनात मिळालेली माहिती या आधारावर मी हा लेख लिहिला आहे. अर्थातच तो अभ्यासपूर्ण वगैरे नाही, पण रक्ताची तपासणी या विषयाबद्दल थोडे समजून घेण्याची जशी मला उत्सुकता होती आणि आहे तशी काही इतर सामान्य वाचकांनाही असेल, त्यांना यातून थोडी उपयुक्त माहिती मिळू शकेल.

आपला श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, शरीराचे ठराविक तपमान राखणे, झालेली झीज भरून काढणे वगैरे शरीरातली महत्वाची कामे दिवसाचे चोवीस तास अव्याहत चालली असतात. त्यासाठी ऊर्जा आणि कच्चा माल यांचीसुध्दा सतत आवश्यकता असते. यांचा पुरवठा आपल्या अन्नामधून होतो, पण आपण ते दिवसातून दोन तीन वेळाच खातो. त्या वेळी खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्याचा रस रक्तात जातो आणि त्यातला थोडा भाग खर्च होऊन उरलेला रस शरीरातच निरनिराळ्या जागी साठवून ठेवला जातो. अन्नाचे पचन होऊन गेल्यानंतरच्या काळात ही साठवलेली द्रव्ये तिथून पुन्हा रक्तात प्रवेश करतात आणि त्याच्या सहाय्याने शरीराच्या सर्व भागामधल्या सर्व अवयवांना पुरवली जातात. अशा प्रकारे अन्नरसाचा काही भाग नेहमीच रक्तात असतो. विशेषतः साखर, मीठ यासारखे रासायनिक पदार्थ रक्तात विरघळलेले असतातच. त्यांचे प्रमाण विशिष्ट किमान आणि कमाल मर्यादांमध्ये ठेवण्याचे काम शरीरातल्या अनेक ग्रंथी मिळून बिनबोभाटपणे करत असतात. काही कारणामुळे त्यांचे संतुलन बिघडले तर मात्र ते प्रमाण लिमिटच्या बाहेर जाते आणि तसे बराच काळ राहिले तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊन अनेक व्याधी जडतात. रक्तामधली साखर किंवा कोलेस्टेरॉल यांचा समावेश अशा द्रव्यांमध्ये होतो. हे आणि आणखी काय काय रक्तात असते आणि त्यासाठी तपासणी केली जाते हे पुढे पाहू.

भरपूर पाण्यात शिजवलेल्या डाळीमध्ये तिखट, मीठ, मसाले, चिंच, गूळ वगैरे घालून त्यावर फोडणी देऊन आमटी बनवतात. या पाककृतीत टाकलेली काही द्रव्ये आमटीतल्या पाण्यात विरघळतात तर काही विरघळत नाहीत. आमटी हा समरस असा (होमोजिनियस) एकजीव पदार्थ होत नाही. रसायनशास्त्रानुसार हे एक संयुग (कॉम्पाउंड) नसते, ते एक मिश्रण (मिक्स्चर) असते. त्याचप्रमाणे रक्त हेसुध्दा अनेक घटकांचे मिश्रण असते. शिवाय पचन झालेल्या अन्नरसाचे मिश्रण त्यात मिसळते, तसेच शरीरामधील निरनिराळ्या ग्रंथींमधून निघालेले स्त्रावसुध्दा त्यात मिसळतात. शरीराला नको असलेली द्रव्ये रक्तामधूनच मूत्रपिंड (किडनी) आणि त्वचेमधील घर्मपिंडात जातात आणि तिथे ती रक्तामधून बाहेर काढली जाऊन लघवी व घामाद्वारे उत्सर्जित केली जातात. ही सारी द्रव्ये रक्तात मिसळलेली असली तरी त्यांच्या गुणधर्मावरून त्यांना ओळखणे आणि त्यांचे प्रमाण मोजणे शक्य असते. रक्ताच्या तपासणी (ब्लड टेस्टिंग)मध्ये हे काम केले जाते. अर्थातच या विविध द्रव्यांसाठी निरनिराळ्या प्रकारांच्या तपासण्या कराव्या लागतात. त्यातल्या काही मुख्य तपासण्या अशा आहेत.

१.पृथक्करणः रक्तामधील मुख्य घटकांची मोजणी या ब्ल़डकाउंटमध्ये करतात. ते घटक असे असतात.
तांबड्या पेशीः रक्तातला हा सर्वात मोठा घटक असतो. त्याच्यामुळेच रक्ताचा रंग लाल दिसतो. श्वासामधून फुफ्फुसात घेतलेल्या हवेतल्या प्राणवायूला (ऑक्सीजन) तो शोषून घेतो आणि शरीरातल्या सर्व पेशींना पुरवतो, तसेच शरीरात निर्माण झालेला कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू गोळा करून त्याला उच्छ्वासामधून बाहेर टाकण्यासाठी फुफ्फुसांपर्यंत नेऊन पोचवतो. तांबड्या पेशींमधला हिमोग्लोबिन नावाचा घटक हे काम करत असतो. तांबड्या पेशींची आणि त्यांच्यातल्या हिमोग्लोबिनची संख्या कमी झाली तर शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे सारीच इंद्रिये अशक्त होतात.
पांढर्‍या पेशीः आपल्या शरीरात शिरलेल्या रोगजंतूंचा सामना करून त्यांना नष्ट करतात. यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढते. त्यांचे प्रमाण थोडे वाढलेले तपासणीमध्ये दिसले तर याचा अर्थ आपल्या शरीरात काही रोगजंतूंनी मुक्काम ठोकला आहे असा होतो. त्यांचे प्रमाण नीचांकाहूनही कमी झाले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
प्लेटलेट्सः रक्तवाहिनीला इजा झाली आणि त्यामधून रक्त बाहेर आले तर त्यातल्या प्लेटलेट्स लगेच गोठतात आणि एकमेकांच्या सहाय्याने एक जाळे तयार करून रक्ताची गुठळी बनवतात. त्यामुळे रक्तवाहिनीच्या फुटलेल्या भागावर एक झाकण बसते आणि ते आतल्या रक्ताला बाहेर येण्यास प्रतिबंध करते. अशा प्रकारे त्या जखमेमधून होणारा रक्तस्त्राव आपोआप थांबतो. अशा प्रकारे आपला बचाव करणारा रक्तातला हा आणखी एक घटक आहे. त्यांची संख्या कमी झाली तर अगदी किरकोळ जखमांमधून किंवा साध्या खरचटण्यामधूनसुध्दा शरीरातले रक्त भळाभळा वहात राहू शकते.
इलेक्ट्रोलाईट्सः सोडियम, पोटॅशियम, क्लोरिन यासारखी काही मूलद्रव्ये शरीरामधील विविध इंद्रियांच्या कामासाठी आवश्यक असतात. या तपासणीत ती मोजली जातात.
वरील तीन्ही घटकांच्या ब्लडकाउंटवरून रोग्याच्या शरीराच्या एकंदर धडधाकटपणाचा अंदाज येतो, त्यावरून त्याची शारीरिक अवस्था समजते आणि गरज असल्यास त्याला सलाईन, रक्तपुरवठा, प्राणवायू वगैरेंचा पुरवठा करून आधार दिला जातो. तसेच अॅनिमियासारख्या काही विकारांची माहिती या चाचणीतून मिळते. यामधील कोठलाही घटक प्रमाणापेक्षा खूप जास्त असणेही चांगले नसते. ते एकाद्या दुर्धर रोगाचे लक्षण असू शकते.
काही विशिष्ट व्याधींचे निदान करण्यासाठी कॅल्शियम आणि लोह (आयर्न) यासारख्या मूलद्रव्यांचे रक्तामधले प्रमाण मोजले जाते.

२.साखरेचे प्रमाणः आजकाल भारतीयांमध्ये मधुमेह या विकाराचे प्रमाण वाढले आहे आणि ते वाढतच आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यामधील कार्बोहैड्रेट्सचे साखरेत रूपांतर होते. या साखरेचे प्राणवायूशी संपर्क आल्यावर ज्वलन होऊन त्यामधून ऊर्जा तयार होते. ही क्रिया होण्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची गरज असते. मधुमेह हा विकार झाल्यास शरीरातले इन्सुलिनचे उत्पादन कमी होते, पुरेसे इन्सुलिन उपलब्ध नसले तर साखरेचे पुरेसे ज्वलन होत नाही आणि त्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढत जाते. साखरेचे हे प्रमाण दिवसभरातसुध्दा सारखे बदलत असल्यामुळे एकाच माणसाच्या रक्तामधील साखर दिवसाच्या निरनिराळ्या वेळी वेगळी असू शकते. रोगाचे निदान करण्यासाठी ते प्रमाण मोजून त्या आकड्यांची मर्यादांबरोबर तुलना करायची असेल तर त्यासाठी चाचणीची काही ठराविक संदर्भ वेळ असणे आवश्यक असते. यासाठी दोन वेळा निश्चित केल्या आहेत.
फास्टिंग ब्लड शुगरः रात्रीचे जेवण करून झोपल्यानंतर आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचे रात्रभरात पचन होऊन त्यातली साखर यकृतात साठवली जाते आणि त्यानंतर ती यकृतामधून परत घेऊन तिचा उपयोग करणे चाललेले असते. नुकतेच पचन होऊन रक्तात शिरलेल्या साखरेचा अंश त्यात असत नाही. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी रक्ताची तपासणी केल्यास या परिस्थितीमधले साखरेचे प्रमाण समजते. निरोगी माणसाच्या रक्तात हे प्रमाण सुमारे ६० ते १०० च्या दरम्यान असते.
पोस्ट प्रॉन्डियलः सकाळचा नाश्ता किंवा दुपारचे जेवण केल्यानंतर बरोबर दोन तासांनी रक्ताचे सँपल घेऊन ही चाचणी करतात. सर्वसाधारण निरोगी माणसाच्या रक्तामधल्या साखरेचे प्रमाण एवढ्या वेळात पूर्वस्थितीवर आलेले असते. पण काही व्यक्तींच्या बाबतीत ते कदाचित येत नाही. यामुळे ही मर्यादा थोडी शिथील केली आहे. सामान्य माणसासाठी हे प्रमाण सुमारे ८० ते १२० आणि मधुमेहींसाठी १४० पर्यंत ठीक समजले जाते.
आजकाल शर्करा तपासण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅबमध्येच जाऊन रक्त काढून द्यावे लागत नाही. मुठीत मावू शकेल एवढे छोटेसे ग्ल्युकोमीटर वापरून आपण ही तपासणी घरच्या घरीसुध्दा करू शकतो. यात मिळणारे आकडे अगदी अचूक नसले तरी साधारण कल्पना येण्यासाठी ठीक असतात. याचा उपयोग करून आपण दिवसाच्या इतर काळामधले साखरेचे प्रमाण मोजू शकतो. अर्थातच हे थोडे खर्चिक असते. रोज इन्सुलिनचे इन्जेक्शन घेणारे मधुमेहाचे काही रुग्ण आता ही तपासणी अधून मधून भोजनाच्या आधी करून त्यानुसार इन्सुलिनचा डोस ठरवतात.
ग्लायकोनेटे़ड हिमोग्लोबिनः (HbA1C) या तपासणीमध्ये मागील तीन महिन्यातील रक्तामधल्या साखरेच्या प्रमाणाची सरासरी समजते. वर दिलेल्या दोन वेळा सोडून इतर काळामध्येसुध्दा रक्तामधील साखरेचे प्रमाण कमीजास्त होत असते. त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी काही महिन्यांनी ही तपासणी करून घेऊन उपचाराची दिशा ठरवली जाते.

३. क्लोरेस्टेरॉलः आपण खाल्लेले स्निग्ध पदार्थ कोलेस्टेरॉलच्या रूपाने रक्तात मिसळतात. लो डेन्सिटी. हाय डेंन्सिटी, व्हेरी लो डेन्सिटी यासारखे त्याचे काही प्रकार आहेत. त्यातले काही वाईट तर काही चांगले आणि काही अत्यावश्यक समजले जातात. याबद्दल बरेच उलटसुलट छापून येत असते. शिवाय आपण खाल्लेले तेल तूप आणि आपल्या शरीरात निर्माण होऊन रक्तात येणारे कोलेस्टेरॉल सारखेच नसतात असेही म्हणतात. कोलेस्टेरॉल्सच्या प्रकारांबरोबर ट्रायग्लिसराईडही मोजतात. लिपिड प्रोफाईल नावाच्या ब्लडटेस्टमध्ये त्यांचा संपूर्ण आलेख मिळतो. पक्षघात आणि हृदयरोगाच्या दृष्टीने या तपासणीला खूप महत्व आले आहे.

४. लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, थाइरॉईड टेस्ट वगैरेः अशा प्रकारच्या तपासण्यांमध्ये रक्तात असलेली बिलिरुबिन, SGPT, SGOT, Cretinine, T3, T4, Tsh यांसारखी या इंद्रियांशी संबंधित रसायने किंवा स्त्राव यांची मोजणी करून त्यांचे प्रमाण दाखवले जाते. त्यावरून ही खास इंद्रिये किती चांगले काम करत आहेत किंवा बिघडली आहेत याचा अंदाज घेतला जातो.

५. पीटी, पीटीटीः(Partial Prothombin Time, Prothombin Time) या तपासणीत रक्त गोठण्यासाठी किती वेळ लागतो आणि लागणे अपेक्षित आहे हे मोजले जाते आणि त्यांची तुलना केली जाते. त्यावरून एक INR नावाचा एक अनुपात (रेश्यो) ठरवतात. पक्षघात आणि हृदयरोगाच्या उपचाराच्या दृष्टीने या तपासणीला खूप महत्व आले आहे.

६. ब्लड टाईपः ए, बी, एबी, ओ आणि आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे रक्ताचे गट केलेले आहेत. रोग्याला दुसर्‍या माणसाचे रक्त द्यायचे असल्यास हा गट बघून घ्यावा लागतो. चुकीच्या गटाचे रक्त दिल्यास रोग्याचे शरीर त्या रक्ताचा स्वीकार करत नाही, त्यामुळे उपायाऐवजी मोठा अपाय होऊ शकतो. रक्तदान करण्यापूर्वी ही तपासणी करून घेतलेल्या रक्ताचा गट ठरवला जातो आणि रक्तपेढीं(ब्लडबँक)मध्ये त्यानुसार ते रक्त वेगळे साठवले जाते.

७. एलिसाः ही टेस्ट एड्स किंवा हा आजार किंवा एचआयव्हीचा संसर्ग ओळखण्यासाठी असते. आजकाल या दुर्धर आजाराने थैमान घातले असल्यामुळे कोठल्याही रोग्याला दिलेल्या रक्तात या आजाराचे विषाणू नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ज्या रोग्याचे ऑपरेशन करायचे आहे त्यालासुध्दा या आजाराची लागण झालेली नाही हे पाहून घेणे आणि त्यानुसार काळजी घेणे योग्य असते.

८. ब्लड गॅसेसः या तपासणीसाठी थेट हृदयामधून आलेले (शुध्द) रक्त रुग्णाच्या रोहिणी(आर्टरी)मधून काढून त्यातील प्राणवायू, कार्बन डायॉक्साईड वायू वगैरेंचे प्रमाण मोजतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता यावरून पाहिली जाते. मनगटातल्या नाडीमधून निघालेला हा रक्तप्रवाह लगेच थांबत नाही. यातून आणखी काही उद्भवू नये यासाठी खूप काळजी घेणे आवश्यक असते. ही रक्त तपासणी शक्यतोवर हॉस्पिटलमध्ये करावी.

९. ब्लड कल्चरः रक्तामधील रोगजंतूंना पोषक अशा वातावरणात वाढवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्यांचे निरीक्षण केले जाते. रोग्याला कोणत्या जंतूंचा संसर्ग झाला आहे आणि कोणती औषधे त्यांना मारक आहेत हे या तपासणीत समजते. टायफॉइड, मलेरियासारख्या काही रोगांचे लक्षणांवरून केलेले निदान निश्चित (कन्फर्म) करण्यासाठी ही तपासणी करतात.

१० डीएनए टेस्टः मुलगा वा मुलगी आणि त्यांचे माता पिता यांच्यामधला रक्ताचा संबंध या तपासणीतून सिध्द करता येतो. प्रत्यक्ष जीवनापेक्षा नाटक, सिनेमे, टीव्हीवरील सीरियल्स यांमध्येच ही टेस्ट अनेक वेळा दाखवतात.

याखेरीज अनेक तपासण्या आहेत. मुलांमध्ये जन्मजात आलेले किंवा आनुवंशिक रोग किंवा संधिवाता(आर्थ्रिटिस)सारखे दुर्धर रोग समजण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात, अॅलर्जी किंवा अँटिबॉडींचा अभ्यास काही टेस्ट्समधून केला जातो. वर दिलेल्या चाचण्यांध्ये काही आक्षेपार्ह आढळले तर त्या विशिष्ट निरीक्षणाच्या कारणाचे वेगळ्या तपासणींमधून अधिक तपशीलवार उत्खनन केले जाते. यावर जगभरातील प्रयोगशाळांमध्ये संशोधन चालले असते आणि त्यामधून खात्रीलायक तसेच निर्धोक ठरलेल्या चाचण्या घेण्यासाठी नवनवी उपकरणे तयार होऊन ती ठिकठिकाणच्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरींमध्ये बसवली जातात.

लेखनविषय: दुवे:

Comments

माहितीपुर्ण लेख...

प्लेटलेट्स बद्द्ल वाचताना एका दूरच्या नातेवाईकाला हिमोफिलिआ झाला होता हे आठवलं.

बाकी या घटकांवरून आपण कृत्रिमरित्या रक्त बनवू शकतो का? मागं कुठेतरी आपण आता पाहिजे त्या चविचं (ठराविक प्राणि, पेशी, उती) मांस कृत्रिमरित्त्या प्रयोगशाळेत तयार करू शकतो असं वाचलं होतं.

मधुमेह

भारतीयांत मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे यापेक्षा ते आता डिटेक्ट होऊ लागले आहे असे वाटते. वैद्यकीय सुविधांमुळे आयुष्यमान वाढल्याने मधुमेह आणि इतर शारीरिक व्याधी ओळखता येऊन त्यावर उपाय शक्य झाले आहेत. अन्यथा, पूर्वी चाळीशी-पन्नाशीत मरण येत असल्याने हे रोग ओळखताच येत नसावे.

बाकी लेख नेहमीप्रमाणेच सोप्या, सरळ भाषेत वाचनीय आणि उत्तम.

सहमत

१ पूर्वीच्या काळात मधुमेहाचे शरीरावर होणारे विशिष्ट असे दृष्य परिणाम लक्षात आल्यानंतरच त्याचे निदान होत असे. प्रत्येकाच्या बाबतीत हे परिणाम दिसतीलच असेही नाही. मधुमेहामुळे इन्फेक्शन पटकन होते आणि त्यामुळे दुसरा एकादा विकार उद्भवला किंवा वाढला तर ते मधुमेहामुळे झाल्याचे समजतही नसे. आधीपासून रक्तामधल्या साखरेची तपासणी करण्याची गरज पूर्वीच्या काळी वाटत नव्हती आणि तशी सोयही सुलभपणे उपलब्ध नव्हती .
२. कोलेस्ट्रोलचे दृष्य परिणाम नसतातच. त्याने हृदयविकार किंवा पक्षघाताचा झटका आला की खेळ खलास व्हायचा. त्याला कोलेस्ट्रोल जबाबदार असू शकेल हे ठाऊकच नव्हते. त्यामुळे कोलेस्ट्रोल हा शब्दच कानावर पडत नव्हता.
३.आज या दोघांचे स्वरूप आणि त्यांपासून संभाव्य धोके यांची माहिती झाली आहे, रक्ताची तपासणी करणे सोपे झाले आहे आणि ते केले जात आहे.
४. सुखासीन जीवन झाल्यामुळे रोजच्या कामातून होणारा व्यायाम नाहीसा झाला आहे, तसेच खाण्याच्या सवयी बदलल्यामुळे साखर, पिष्टमय पदार्थ आनि तेलतूप यांचे सेवन वाढले आहे.
याशिवाय आयुष्यमान वाढले असल्यामुळे हे मुख्यतः उतारवयातले प्रॉब्लेम जास्त प्रमाणात डिटेक्ट होऊ लागले आहेत. हे कारणसुद्धा आहेच.

एक महत्वाचा घटक विसरलात

एक महत्वाचा घटक विसरलात. अभिनय. बहुतेक सिने नट-नटांची मुले शाळे नंतर कोणत्या तरी कॉलेज मध्ये काही वर्षे काढून इतर कोणत्याही करीयरचा प्रयत्न न करता शेवटी अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावतात, तेंव्हा मिडीया "आई वडील अभिनयाच्या क्षेत्रात असल्याने अभिनय लहानपणा पासून त्याच्या/तिच्या रक्तातच होता" असे कौतुकाने लिहितात. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, MBA, आर्मी,नेव्ही,एयर्फ़ोर्स, IAS / IPS, एवरेस्ट चढणे, इंग्लिश चनेल पोहून पार करणे, ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणे,. . . . हे रक्तात नसते. त्या करता परिश्रम करावे लागतात. अभिनय मात्र रक्तात असतो. जसे रक्तात सेरम, हेमोग्लोबिन, प्लटेलेट, पांढरे व लाल रक्त पेशी इत्यादी असतात, तसेच अभिनय पण असतो. तो विसरलात.

याची एक साधी टेस्ट असते. आई वडील अभिनयाच्या क्षेत्रात असल्यास मुला / मुलीच्या रक्तात अभिनय असण्याची शक्यता असते; मुलाने/ मुलीने कॉलेजात काही विशेष दिवे लावले नसतील, तर त्याच्या/तिच्या रक्तात अभिनय असण्याची शक्यता खूपच जास्त असते, व तो /ती दिसायला हन्ड्सम / सुन्दर असेल तर त्याच्या/तिच्या रक्तात अभिनय असतोच असतो. (मात्र सुरुवातीचेच काही सिनेमे फ्लोप झाल्यास रक्तात असलेला अभिनय कुठे तरी गायब होतो)

'असतो' नव्हे 'सापडतो' का?

माझ्या लेखाचे शीर्षक 'आपल्या रक्तात काय काय सापडते?' असे मी मुद्दाम दिले आहे.
'आपल्या रक्तात काय कायअसते?' असे नाही.
कोठल्याही लॅबोरेटरीत अभिनयाचे जर्म्स डिटेक्ट होतात असे मी तरी ऐकले नाही.

वा!

अपेक्षेप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण संकलन आहे. एखाद्या तज्ज्ञाकडून यातील प्रत्येक घटकावर अधित तपशीलात केलेले लेखन मराठीतून आंतरजालावर येणे गरजेचे आहे. एखाद्या डॉक्टर-उपक्रमींनी मनावर घ्यावे ही विनंती

बाकी, थॅलेसिमियासाठीची (मेजर आणि मायनर) चाचणीदेखील हल्ली सर्रास केली जाते. जर आई-वडील दोघेही थॅलेसिमिया मेजर असतील तर अपत्यास थॅलेसेमिया होऊ नये म्हणून प्रसुतीच्याआधीच अधिक काळजी (+ काहि औषधोपचार) घेणे गरजेचे असते असे ऐकून आहे. यात नेमका कोणता घटक तपासतात त्याची कल्पना नाही.

अजून एक घटक राहिला तो म्हणजे स्टेम सेल्स. जन्म झालेल्या अपत्याच्या नाळेतून हा घटक मिळवून साठवून ठेवण्याचे प्रमाणही वाढते आहे. स्वतःचे स्टेमसेल्स ज्यांना परवडत नाहित त्यांच्यासाठी "पब्लिक स्तेमसेल्स ब्यांका" असतात असेही ऐकून आहे. ब्लड कॅन्सर आदी आजार झाले असता या सेल्सपासून संपूर्ण रक्त पुन्हा बनवता येते असे म्हणतात.

फोरेन्सिक टेस्ट्स

सर्वसाधारण माणसाच्या आरोग्याविषयक तपासण्यांचाच विचार मी माझ्या लेखात केला आहे. गुन्हेगारांचा तपास लावणे किंवा त्याचा गुन्हा सिद्ध करणे यासाठी केल्या जाणार्‍या चाचण्यांमध्ये रक्ताच्या तपासणीला खूप महत्व आहे. याबाबत मला फारशी माहिती नाही. सिनेमा आणि मालिकांमध्ये जे दाखवतात ते वास्तवाला किती धरून असते याचीही मला कल्पना नाही.

केवळ नोंद

हा प्रतिसाद नक्की कोणत्या प्रतिसादाला उद्देशुन आहे हे कळले नाही परंतू माझ्या प्रतिसादानंतर असल्याने कालांतराने गैरसमज टळावा म्हणून नमुद करून ठेवतो की मी वर दिलेल्या दोन्ही चाचण्या या फॉरेन्सिक नाहित तर सामान्य माणसासाठीच केल्या जातात.

पुस्ती

माझा हा प्रतिसाद कोणाला उद्देशून दिलेला नाही. माझ्या लेखात काय दिलेले नाही हे माझ्याच ध्यानात आल्याने मी ही पुस्ती जोडली आहे.

वा

वा. संकलन माहिती पुरवण्याकरिता उत्तम आहे.

 
^ वर