काय वर मागायचा ?

आजचे बरेच (सर्व नव्हे) राजकारणी भ्रष्ट आहेत असा समज आहे, व त्यात काही तथ्य ही असेल. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहेच व नैतिकतेच्या निकषावर पण गुन्हा आहे. पण जर त्या पलीकडे जावून विचार करूया.

स्वातंत्र्य नंतर जवळपास ३० वर्षे पर्यंत अनेक उत्तम व्यक्तित्वाचे लोक राजकारणात होते. मधु लिमये, दंडवते, लोहिया, मावळणकर, हीरेन मुखर्जी, पिलू मोदी, नाथ पै, डांगे, धारिया, अनंतशयनम अयंगार, मौलाना आझाद, सी डी देशमुख, करणी सिंघ, यशवंत राव, जगजीवन राम, . . . . किती नांवे घ्यावीत. विद्वत्ता, स्वच्छ चारित्र्य, उत्तम वाक्पटुत्व इत्यादी असलेली दिग्गज मंडळी होती. तेंव्हा पार्लमेंट मध्ये आज सारखा गोंधळ, आरडाओरडा, वारंवार अवरोध व स्थगिती, कागद फाडणे, इत्यादी होत नसे. उलट चांगली भाषणे, वाद-विवाद, चर्चा इत्यादी होत असे. असे असताना तेंव्हा देशाची स्थिती उत्तम होती व नंतर ती रसातळाला गेली असेच असावयाला पाहिजे. पण चित्र नेमके उलटे आहे.

तेव्ह्ना फक्त ३३ कोटी लोकां करता आपण पुरेसे धान्य उगवू शकत नव्हतो; अन्न आयात करण्या करता आपल्याकडे पैसे पण नव्हते व अन्ना करता PL ४८० मध्ये मिळणाऱ्या भिके आपण वर अवलंबून होतो. त्या मुळे रेशन, काळा बाजार इत्यादी आलेच. देश कंगाल होता. गरीबांना सहाय्य करण्या करता (social sector spending) देशा कडे संपत्तीच नव्हती. विकास दर ३% पेक्षा ही कमी होता. उद्यमशीलातेला वाव नव्हता. देशाच्या सुरक्षे करता आपण अजिबात तयार नव्हतो. आधी पाकिस्तान ने काश्मीरचा बराच भाग गिळंकृत केला. मग चीन बरोबर युद्धात नामुष्की पत्करावी लागली. जगात भारतीयांना मान नव्हता, तुच्छतेने पहात असत. आजच्या भ्रष्ट व्यवस्थेचे मूळ बरेचसे ज्या लायसेन्स कोटा परमीट राज मध्यॆ आहे, त्या आता कुख्यात अश्या लायसेन्स कोटा परमीट राज व्यवस्थेचा पाया त्याच काळात रचला गेला. आता तो इतका घट्ट झाला आहे कि आज अनेक प्रयत्न करून पण आपण त्यातून बाहेर येवू शकत नाही.

आज पार्लमेंट मध्ये काय स्थिती आहे ते आपण जाणतोच. अनेकाना वाटते कि मत देउच नये, "कोणालाही नाही" अशी सोय असावी, परत बोलाविण्याचा अधिकार असावा, इत्यादी. पर्लामेंटरीयन बद्दल आज कोणीही चांगले बोलत नाही. पण देशाची स्थिती काय आहे? देश सर्व प्रकारे जास्त मजबूत आहे. १९६१ सारखी खोडी चीन आता करू धजणार नाही. भारतीयांना जगात मान आहे. आता आपण परकीय मदतीवर अवलंबून नाहीच, पण इतर देशाना आर्थिक मदत देतो. गरीबी तेंव्हा पण होती, आता पण आहे. पण आता रोहयो, अन्न सुरक्षा इत्यादी social sector कार्याक्रमां करता देशा कडे पैसा आहे. कारण विकास दर ३% पासून वाढून ८% पर्यंत पोहोचला आहे. लायसेन्स कोटा परमीट राज पूर्ण नष्ट झाले नसले तरी बरेचसे कमी झाली आहे. उद्यामशीलतेला जास्त वाव आहे.

प्रगतीचे काही indices असे असतात कि ते सहजा सहजी समोर येत नाहीत. (किंवा येवू दिले जात नाहीत). तीन दशकां पूर्वी सुखवस्तू घरातील कालचे उरलेले शिळे अन्न गडी -मोलकरीण घेत असत. या अपमानास्पद जिण्याचे दिवस गेले. आता गडी -मोलकरीण पण त्यांच्या स्वकष्टार्जित पैश्यातून विकत घेउन ताजे अन्न खातात. त्यांचा तांदूळ कदाचित जाडा भरडा असेल, पण तो त्यांचा, स्वकष्टार्जित असतो. यात जो स्वाभिमान आहे तो फार फार महत्वाचा आहे. पूर्वी श्रीमंतीचे लक्षण समजल्या जाणाऱ्या वस्तू - फोन, TV, रंगीत TV, फ्रीज, दुचाकी - आता Lower Income Group यांच्या घरात सर्रास असतात. झोपडपट्टीच्या छपरांवर DTH च्या तबकड्या असतात. हे वास्तव आहे.

काही गोष्टी तंत्रद्न्याना वर अवलंबून असतात. तेंव्हा प्रभावी antibiotic औषधे नव्हती म्हणून विषमज्वर, मलेरिया, व इतर अनेक आजारांनी सहज मृत्यू होत असे व सरासरी आयुष्यमान कमी होते. त्याचा दोष तेव्हांच्या पार्लमेंटरियन लोकांना देता येत नाही. पण पंचशील सारख्या धोरणाचे काय? किंवा लायसेन्स कोटा परमीट राज व्यवस्थेचे काय? सभागृहाच्या कामकाजात अडथळा न आणणाऱ्या स्वच्छ चारित्र्याच्या व अमोघ वक्तृत्वाच्या दिग्गजांच्या पार्लमेंट मध्ये "अहो, असे करू नका. याने उद्यमशीलता मारली जाईल व विकास खुंटेल" असे कोणी ठणकावून सांगितल्याचे ऐकिवात नाही. देशाची खरी प्रगती झाली ती दिग्गजांचे पार्लमेंट संपुष्टात आल्यावरच.

तर, उद्या जर या संकेत स्थळावर परमेश्वर अवतरला व त्याने आपल्याला एक वर मान्य केला, "वत्सा, सांग तुला कोणते पार्लमेंट हवे. सध्याचे का १९५० काळाचे" तर काय मागायचे?

लेखनविषय: दुवे:

Comments

अधिकार

वर नाकारण्याची सोय/अधिकार आहे का? :)

मला तरी १९०० सालात जे काय होते ते हवे आहे!!!

मला तरी १९०० सालात जे काय होते ते हवे आहे!!!

असहमत

यामधे आपण असे गृहीत धरून चाललो आहोत की धोरणे चुकीची म्हणजे लोक पण चुकीचे.
ते दिवसच तसे होते. सगळं जगच समाजवादाकडे चालले होते. आणि बादवे, लालबहाद्दुर शास्त्रींनी जय जवान जय किसान चा नारा देऊन थोडासा का होईना, बदल केलाच होता.
तुम्हाला अस म्हणायचे आहे का, की उदारीकरणाचा निर्णय केवळ दूरदृष्टीनेच घेतला होता म्हणून? त्यात बदलत्या जागतिक परिस्थितीचादेखील बराच वाटा होता.
असो.

तुलना अजिबात पटली नाही.

याचं कारण म्हणजे त्याकाळची आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. नुसतच तंत्रज्ञान नव्हे तर साक्षरता, इतर देशांचं सहकार्य/संबंध वगैरे अनेक गोष्टी सांगता येतील.

लेखातले काही पॅरॅतर कै च्या कै वाटले.

पूर्वी श्रीमंतीचे लक्षण समजल्या जाणाऱ्या वस्तू - फोन, TV, रंगीत TV, फ्रीज, दुचाकी - आता Lower Income Group यांच्या घरात सर्रास असतात. झोपडपट्टीच्या छपरांवर DTH च्या तबकड्या असतात. हे वास्तव आहे.

पुर्वी मोबाईल अगदी अमिरखानला सुद्धा परवडत नसे म्हणे आता तर झोपडपट्टीतली लोकंसुद्धा अगदी रुळावर हागायला जाताना मोबाइल घेउन जातात. :)

आज!आज!

१)वर्तमानेन कालेन बुधो लोके प्रवर्तते|
२)प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा.
३)जुने जाऊ द्या मरणालागुनी.
पुरे झाली अवतरणे. मलातरी आत्ताचा काळ, आत्ताची संसद हवी आहे. तिरकस अर्थाने घेतले तरी आत्ताच्या संसदेइतकी विनोदी आणि मनोरंजनप्रद संसद पूर्वी कधी पहायला मिळाली होती काय?

एक उदाहरण

मला जे म्हणायचे आहे ते एका उदाहरणाने स्पष्ट करतो.

एक चाळीत राहणारा, कारकुनी करून मुलाला शाळाकॉलेजात पाठविणारा बाप आहे. शिक्षणाचा उपयोग करून मुलगा आजच्या काळात उत्तम पगाराची नोकरी मिळवतो. आपल्या नोकरीच्या जोरावर वित्तसंस्थेकडून कर्ज काढतो आणि ५० लाखाचा फ्लॅट सहज विकत घेतो.

येथे तो दोन विचार करू शकतो. तो असे म्हणू शकतो की माझ्या वडिलांनी त्याग करून मला शिक्षण आणि सुसंस्कार दिले म्हणून मी हा फ्लॅट आज घेऊ शकलो. तो असेहि म्हणू शकतो की 'पहा, माझ्या दळिद्री बापाला जे जन्मभर जमले नाही ते मी एका झटक्यात केले की नाही?'

ह्यांपैकी तुम्हाला कोणता विचार पटतो?

दोन पैसे

अहो, असे करू नका. याने उद्यमशीलता मारली जाईल व विकास खुंटेल" असे कोणी ठणकावून सांगितल्याचे ऐकिवात नाही.

वर अरविंद कोल्हटकरांनी चपखल उदाहरण दिलेच आहे. माझे दोन पैसे -

नवजात बालकाला थेट व्यवहारी जगात संचारायला कोणी पाठवीत नाही. त्याची बालवयात योग्य ती देखभाल करून, योग्य ते शिक्षण वगैरे देऊन, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद आणि क्षमता आली, की मग तो आत्मविश्वासाने बाहेरील जगात संचार करू शकतो.

स्वातंत्र्यानंतर लगेचच जर आपल्या नवजात औद्योगिक जगताला बाहेरील बलाढ्य औद्योगिक विश्वाशी दोन हात करायला लावले असते तर, आपले उद्योग जगत उभेच राहू शकले नसते. तेवढी ताकत कुठल्याच खाजगी उद्योगाकडे तेव्हा नव्हती. तेव्हा, त्यांना थोडे फार संरक्षण देणे जरूरीचेच होते.

तसेच, धरण बांधणी (भाक्रा-नांगल, हिराकुड), पोलाद निर्मिती (राउरकेला, भिलाइ), वीज निर्मिती (विविध औष्णिक, जल आणि अणू वीज प्रकल्प) अशा पायाभूत (infrastructure) प्रकल्पांत थेट सरकारने गुंतवणूक करणे, हेदेखिल अपेक्षितच होते.

अगदी हेच बॅकांच्या राष्ट्रीयकरणाबाबातदेखिल म्हणता येईल.

प्रश्न एवढाच की, खाजगी उद्योगांना संरक्षण नव्वदीच्या दशकापर्यंत देणे जरूरी होते की ऐशीच्या दशकातच थांबवायला हवे होते? सत्तरीचे दशक हे खुपच लवकर झाले असते, असे वाटते.

ओब्झर्वेषन आणी थियरी

भारतीय संस्कृतीची एक खासियत ही, कि आपण experimental verification ला विशेश महत्व देत नाही. मुद्दामून प्रयोग करून observation करणे दूरच, आपोआप झालेले observation सुद्धा तत्कालीन समजुतीशी match होते का नाही हे पडताळून पहात नाही; व match होत नसल्यास तत्कालीन समजुतीं वर फेरविचार करून त्या बदलण्याचा विचार आपल्याला आवडत नाही.

जेंव्हा असे मानले जात होते कि पृथ्वी विश्वाच्या केंद्र स्थानी आहे व सर्व ग्रह तारे पृथ्वी भोवती फिरत आहेत, तेंव्हा काही विचारवंतानी असे पहिले कि ज्युपिटर च्या उपग्रहांची movement या समजुतीशी सुसंगत नाही. यातून हेलिओसेण्ट्रिक मॉडेल चा जन्म झाला. डार्विनची उत्क्रांतीची थियरी फक्त observation वर आधारित होती व फक्त observation च्या आधारे त्याने बायबल ला व चर्च ला चलेंज करण्याचे धारिष्ट्य दाखविले. जड वस्तू जास्त वेगाने व हलकी वस्तू कमी वेगाने पडते, हे खरे का, हा प्रश्न गलिलिओने एक साधे experiment करून मार्गी लावला.

आपल्याला observation भावत नाही. आयुर्वेदाचा जन्म झाला त्यावेळी आयुर्वेद इतर कोणत्याही वैद्यक शास्त्रापेक्षा खूपच प्रगत होते. पण शरीर खरोखरच वात पित्त व कफ या धातूंचे बनलेले आहे का; जीवंतपणी आपल्याला "वात" मोजता येतो का, किंवा शव विच्छेदन करून "कफ" दिसतो का; इत्यादी प्रश्न आपल्याला कधी पडलेच नाहीत. व आज ही पडत नाहीत. म्हणून आयुर्वेद आज पण शेकडो वर्षांपूर्वी होता तिथेच आहे, एक इंच पण पुढे सरकलेला नाही.

हे सगळे मी या धाग्यात का आणत आहे? तर, माझा लेखाचा उगम होता आजचे popular opinion, कि आपले बहुतेक प्रश्न आपले राज्यकर्ते नालायक असल्या मुळे आहेत, राज्यकर्ते भ्रष्ट व गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत, संसदेत विद्वत्तापूर्ण चर्चा करण्या ऐवजी नुसता गोंधळ घालतात, व त्यावर उपाय म्हणजे निवडून दिलेल्यांना परत बोलाविण्याचा अधिकार असणे, "या पैकी कोणीच नको" असे सांगण्याचा अधिकार असणे, इत्यादी. म्हणून मी एक प्रयत्न करून पहिला कि गेल्या सहा दशकातील संसद सदस्य व संसदेचे कामकाज व त्या त्या वेळी देशाची स्थिती याचे observation, व आपले popular opinion, यांची सांगड घालून प्रस्थापित समजुतींना challenge करता येते का.

चांगला प्रयत्न

प्रयत्न नक्कीच चांगला केला आहे. पण एक गोष्ट जाणवली की तुम्ही सदस्यांना फक्त दोनच पर्याय दिले. असे का? जर प्रयोग हवा तर नाविन्य हवेच. मागच्या एका चर्चेत तेच करायचा प्रयत्न केला. आपल्याला आपला देश कसा चालवायचा आहे याचा विचार आपण नव्याने करायला हवा. त्यासाठी सध्याची निरिक्षणे गरजेची आहेत. मागचे अनुभव गरजेचे आहेत. फक्त जुने बरे का नवे? हा प्रश्न योग्य नाही वाटत. जर आपण असा विचार केला की हि व्यवस्था सुधारण्यासाठी काय वर हवा तर अनेक उत्तरे मिळतील. भारतातली लोकसंख्या आणि प्रचंड लोकांची विविधता आणि ती न सोडण्याचा हट्ट हे मला मोठे अडथळे वाटतात. सर्व समावेशक असे उत्तर मिळणे अवघड आहे. जर जास्तित जास्त भारतीयांना एकत्र घेऊन काम करायचे म्हटले तर जे एकत्र नाहीत ते एकत्र वेगळ्या प्रकारे येऊन प्रभावी विरोध करतात आणि मग सगळेच खुंटते. मग बुद्धीजीवी या प्रकारांना कंटाळून भारताबाहेर जायचा विचार करतात. श्रमजीवी श्रमांचा बोबदला ज्याच्याकडून मिळतो त्याच्याकडे जातात. या सगळ्या गोष्टींचा फायदा घेणारा समूह हा राजकारण्यांचा बनला आहे. आजचे राजकारणी आहेत ते पाहिले तर ते म्हणजे जे चांगले राजकारणी होते त्यांचे नातलग अथवा अनुयायी म्हणवून घेणारे आहेत. लोकोपयोगी पेक्षा लोकप्रिय होतील अशी धोरणे, मतपेट्यांचे राजकारण, राजकारण्याची पिढीजात सत्ता, गांधी नावाचा वापर, लोकांची सामाजिक साक्षरता आणि समाजाप्रती बेपर्वाईचे धोरण हि आणि अशी अनेक कारणे आजच्या स्थितीला जबाबदार आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.

खुलासा

आपले काही मुद्दे काही प्रमाणात मान्य. उत्तर जरा निवांत पणे व आणखीन काही प्रतिक्रिया आल्या नंतर लिहिणार होतो पण आजचे राजकारणी आहेत ते पाहिले तर ते तुम्ही जे चांगले होते त्यांचे नातलग अथवा अनुयायी म्हणवून घेणारे आहेत. मुळे ताबडतोब एक खुलासा करणे भाग पडले. माझ्या नातेवाईकांत, अगदी दूरच्या पण, व ओळखीच्यात, एकही व्यक्ती, सध्या किंवा भूतकाळात, चान्गले वा वाईट - MP, MLA, कार्पोरेटर, अगदी नगर सेवक सुद्धा नाही. कोणाशी ओळख सुद्धा नाही म्हंटल्यावर कोणाचे अनुयायी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यात एक अक्षर पण जर खोटे असेल तर माझी हार्ड डिस्क दुभंग होवून माझ्या RAM ला आपल्या पोटात घेवो. सविस्तर नंतर

गैरसमज

तुम्ही काहीतरी गैरसमज करुन घेतला आहे. आजचे राजकारणी हे पिढीजात राजकारणार आहेत, अथवा जुन्या एखाद्या चांगल्या राजाकराण्याचे अनुयायी म्हणवून घेणारे आहेत असे मला म्हणायचे आहे. तुमच्या गैरसमजास माझी वाक्यरचना पण कारणीभूत आहे. जसे चित्रपटसृष्टीत आहे, तसेच काहीसे राजकारकारणात आहे. एखादा समाजकार्याला वाहून घेतलेला, चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस राजकारणात चांगले नाव कमवायची शक्यता जवळपास नाहीच असे सध्याचे चित्र आहे. अपवाद आहेत.

वरिल प्रतिसादातील वाक्यरचना बदलली आहे. :)

दोन विचार

कारकुनी करून मुलाला शाळाकॉलेजात पाठविणारा बाप . . . शिक्षण आणि सुसंस्कार दिले म्हणून मी . . . माझ्या दळिद्री बापाला जे जन्मभर जमले नाही ते मी एका झटक्यात केले की नाही?'
चुकीची अनालोजी. बाप फक्त कारकुनी करत होता ते जाणीव पूर्वक निवड म्हणून नव्हे, तर त्याची क्षमताच तेवढीच असणार म्हणून, ती त्याची मजबूरी होती; आणी त्याने शिक्षण दिले म्हणून मुलगा कर्तबगार झाला. या उलट, १९९० पर्यंत जी धोरणे त्या वेळच्या लोकसभेने राबविली ती त्यांची जाणीव पूर्वक निवड होती, त्यात कोणतीही मजबूरी नव्हती; आणी ती धोरणे त्यांनी राबविली म्हणून १९९२ मध्ये मनमोहन सिंग नवी धोरणे राबवू शकले असे अजिबात नव्हे.

तुम्ही सदस्यांना फक्त दोनच पर्याय दिले. असे का?

व्यवस्थेत काही आमूलाग्र बदल आणायचा असेल, इतर पर्याय सुचवायचे असतील तर त्या करता "भारतीय लोकशाहीचे भविष्य" हा धागा अजून जिवंत आहेच. मला हे गृहीतक चलेंज करायचे होते, कि आपण ज्यांना चांगले राजकारणी म्हणतो ते देशाचे भले करतात व आपण ज्यांना वाईट राजकारणी म्हणतो ते देशाचे वाटोळे करतात, हे कितपत खरे आहे.

आज आपल्या सामोर प्रश्न बरेच आहेत, गंभीर आहेत, व लोकशाही प्रक्रियेत फेरबदल करून ते सुटतील असे मानणे हा कमालीचा भाबडे पण होईल. लोकशाही प्रक्रियेत फेरबदल गरजेचे आहेत, पण पुरेसे नाहीत. (necessary, but not sufficient). खालील मुद्द्यांवर विचार व्हावा.

१: ढोबळ मानाने ज्याला आपण जनतेचे भले असे म्हणतो, म्हणजे सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार संधी, परवडेल अशी आरोग्य सेवा; पायाभूत सुविधा सर्वाजानिक सोयी, इत्यादी असावे, त्या करता राष्ट्रीय आमदनी वाढणे गरजेचे आहे. सिंगापूर येथे ठिकठीकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहे असतात त्याचे कारण सिंगापूरवासीयांना स्वच्छतेची फार काळजी आहे म्हणून नव्हे, तर त्या देशा कडे भरपूर पैसा आहे म्हणून. इंग्लंड येथे आरोग्य सेवा मोफत आहे त्याचेही कारण तेच - तशी सेवा देण्या करता तर त्या देशा कडे पैसा आहे म्हणून. आपल्याला पण हे सर्व हवे असते, पण राष्ट्रीय संपत्ती वाढविण्याच्या कोणत्याही पर्यायाला जनतेचाच विरोध असतो. "हट्टी कट्टी गरीबी, लुळी पांगळी श्रीमंती" असल्या महामूर्ख कल्पना फक्त भारतातच असाव्यात.

राष्ट्रीय संपत्ती फक्त उद्योगातूनच निर्माण होत असते. शेती तर सबसिडी वरच जगत आहे - खते, डिझल, ठिबक सिंचन equipment . . . सर्व करता सबसिडी, वीज पाणी मोफत, प्राप्ती कर नाही, उत्पादनाला minimum support price, आणी तरीही शेतकऱ्याची अवस्था समाधानकारक नाही. पण मोठ्या उद्योगांना आपला अनेकदा विरोध असतो, कधी पर्यावरणाच्या निमित्ताने, कधी जमीन नाकारून, त्यांना लागणारे कच्चे माल खनिजे नाकारून, पाणी नाकारून, वीज नाकारून नाही तर वीज प्रकल्पच नाकारून. उद्योगांचे उत्साहाने स्वागत कधीच नसते. (सध्या गुजरात याला अपवाद आहे).

हा सर्व विरोध जनते कडून आहे. बंगाल मध्ये नानो प्रकल्पाला विरोध, महाराष्ट्रात डाउ च्या R&D प्रकल्पाला, ओदिशात पोस्को प्रकल्पाला, तमिळनाडूत कूडमकुलन महाराष्ट्रात ऐनरोन पासून जैतापूर वीज प्रकल्प, आंध्रात धामपूर बंदर, देश भरात अनेक ठिकाणी सेझ, . . . . विरोध. किती उदाहरणे द्यावीत ? मोठे उद्योगच नव्हे तर पुण्यात नदी काठचा रस्ता, मुंबईत वांद्र-वरळी सागरी सेतू, पेडर रोड flyover, . . . . सरकारने प्रयत्न करते व जनता ते हाणून पाडते. थेट affected लोकांचा विरोध समजण्या सारखा आहे, पण मध्यम व उच्च वर्गाने या प्रयत्नाना पाठींबा कधीच दिला नाही, उलट विरोध करणार्याना "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते" म्हणून त्यांचा सत्कार केला. स्व्तः जन्म्भर काहीही क्रुति न करता इतरांच्या प्रत्येक क्रुतीला फक्त विरोध करणार्या बड्बड्यांना भारतातच जेवढा मान असतो, तेवढा इतर कुठेही नसावा.

तर, सरकार फार लायक आहे असे नव्हे, पण जनताच त्याही पेक्षा जास्त नतद्रष्ट आहे का, आपली मानसिकता DoNothingIsm (Do-Nothing-ism ) कडे झुकत आहे का, यावर विचार व्हावा.

२: नीती-धोरणे ठरविण्याचे व ती राबवून घेण्याचे काम साधारण वीसेक सिनियर मंत्र्यांचेच असते. काही ज्युनियर मंत्री फक्त राबविण्याचे काम करतात. बाकी सर्व MP फक्त त्यांना बहुमताचा पाठींबा देतात. या एमपी पैकी काही नालायक असले तर त्याने काही फार बिघडत नाही. दोन्ही मुख्य पक्षात उच्च शिक्षित व कार्यक्षम लोक आहेत. पी चिदम्बरम, पवन कुमार बन्सल, सलमान खुर्शीद, शरद पवार, कपिल सिब्बल, जयराम रमेश, कमल नाथ, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, शशी थारूर, मोन्टेक सिंघ अहलुवालिया; तसेच बीजेपीत अरुण जैतली, सुषमा स्वराज, यशवंत सिंन्हा, जसवंत सिंघ, नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंघ, शिवराज सिंघ चौहान, रमन सिंग, . . . सर्वच मातब्बर मंडळी आहेत. प्रश्न असा आहे, कि जनता त्यांना काम करू देणार, का प्रत्येक कामात खोडे घालत राज्यकर्त्यांवर नालायक असल्याचे आरोप करत राहणार. यावर पण विचार व्हावा.

सहमत

आज आपल्या सामोर प्रश्न बरेच आहेत, गंभीर आहेत, व लोकशाही प्रक्रियेत फेरबदल करून ते सुटतील असे मानणे हा कमालीचा भाबडे पण होईल. लोकशाही प्रक्रियेत फेरबदल गरजेचे आहेत, पण पुरेसे नाहीत. (necessary, but not sufficient). खालील मुद्द्यांवर विचार व्हावा.

तुमच्या प्रतिसादा बद्दल कमालीचा सहमत आहे. सर्व मुद्दे सुद्धा मान्य आहेत. वरच्या वाक्यातला "लोकशाही प्रक्रियेत फेरबदल गरजेचे आहेत, पण पुरेसे नाहीत." हा मुद्दा सर्वात महत्वाचा वाटतो.
गरज भागवणे महत्वाचे आहे. ती भागवताना तुम्ही लिहिलेल्या मुद्यांचा विचार करणे हे सुद्धा काम आहे. नीती-धोरणे ठरविण्याचे व ती राबवून घेण्याचे काम साधारण वीसेक सिनियर मंत्र्यांचेच असते. ते निर्णय घेतात. पण निर्णय घेताना आणि अंमलबजावणी करताना एक मोठी व्यवस्था लागते जी आज किडलेली आहे हि सामान्य जनतेची भावना आहे. ती किडण्यासाठी सामान्य जनता सुद्धा जबाबदार आहेच. हे नाकारता येणार नाहीच. पण जनता बदलायची कि सरकार? हे म्हणजे आधी कोंबडी कि आधी अंडे असा प्रश्न आहे. बदलाची गरज हि काळाची गरज आहे.
तुम्ही काही प्रकल्पांची उदाहरणे दिली आहेत. ती सर्व योग्य सुद्धा आहे. त्या सोबत होणारी आंदोलने हि जास्त राजकिय आहेत हे पण मान्य करायला हवे. मुळात असे प्रक्ल्प होणार हे जेंव्हा शासकिय पातळीवर सुरु होते, तेंव्हाव सुरु होते जमिनीच्या सौद्यांची चर्चा आणि तिथुनच सुरु होतो खरा खेळ. ज्या शरद पवारांनी अलिकडे वक्तव्य केले कि पुणे मुंबई पेक्षा इतरत्र उद्योग जाणे गरजेचे आहे. पण त्याच पवारांक्डे सत्तेच्या चाव्या कित्येक दशके आहेत. त्यांना हे शक्य होते. आज सुद्धा हे वक्तव्य मतपेटीचे राजकारण जास्त वाटते. हे लोकं बोलतात आणि काही राज्ये खरोखर बदल घडवून आणताना दिसतात. खास करुन गुजरात आणि तामिळनाडू. सध्याच्या काळात तिथे उद्योगांनी जास्त चांगला विस्तार केला आहे.

 
^ वर