मंगळाचा कुंभेत प्रवेश दिनांक २९ मार्च २००७ रोजी

मंगळाचा कुंभ राशीप्रवेश दिनांक २९ मार्च २००७

लोकहो,

ज्योतिषविषयक लेखमालेतील आमचा हा पहिला लेख वाचकांना सुपूर्त करतांना आम्हाला आनंद होत आहे. ह्या लेखमालेतून ग्रह, राशी, नक्षत्रे यांच्या अनेक गमतीजमती आपल्याला समजणार आहेतच. त्याचप्रमाणे पारंपारिक ज्योतिषशास्त्राचा योग्य परिचय होणार आहे.

या लेखमालेतील प्रथम लेख आहे, मंगळाचा कुंभ राशीत होणारा प्रवेश. हा राशीप्रवेश दिनांक २९ मार्च रोजी होत आहे.

ज्या लोकांच्या पत्रिकेत कुंभलग्न आहे त्यांच्या लग्नात मंगळ येत आहे. आत्ता कुंभेत राहू आणि हर्षल हे ग्रह ठाण मांडून् बसले आहेत.

ह्या लोकांनी २९ मार्च नंतर फार सावधान रहावे असा सल्ला आहे. कारण मंगळ हा कलहप्रिय ग्रह आहे. तो लग्नात आल्यावर माणसाला भांडणे करायला प्रवृत्त करतो. रागीटपणा देतो, हट्टीपणा देतो.
लग्नातल्या मंगळाची पूर्ण् दृष्टी सप्तमावर पडत असल्याने ह्या लोकांनी वैवाहिक बाबतीत फार दक्ष रहावे. जोडीदाराशी होणारे लहान सहान मतभेदही अशा ग्रहस्थितीत घटस्फोटापर्यंत पोहोचवू शकतात.
बाकी विवेचन पुढे चालू.
आपला,
(ग्रहांकित) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

धोंड्या,

छान लिहिलं आहेस.

मिथून राशीचं सध्या बरं आहे कारे? ;)
एखादी लय भारी पोरगी पटवायची असेल तर् मिथून राशीला सध्या बरे दिवस आहेत का रे? ;)

नाही, मी आपलं असंच विचारलं हो!

आपला,
(कुठे काही चान्स मिळतोय का ते पाहणारा!) तात्या.

तात्या

तात्या,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

अरे एवढ्यात पोरगी पटवायला वगैरे जाऊ नकोस रे बाबा.

तुला मागेच सांगितले होते की १५ जुलै नंतर ह्या गोष्टी करायच्या म्हणून.

तुझी कुंडली माझ्या संगणकावर आहे रे . योग्य वेळ् आली की सांगेन.

थोडा धीर धर की लेका.

आपला,
(संयमी) धोंडोपंत

व्यक्तिगत निरोप/खरडवही

अश्या प्रकारच्या परस्परांतील गप्पागोष्टींसाठी 'व्यक्तिगत निरोप' आणि 'खरडवही' या सुविधा उपलब्ध आहेत. कृपया त्यांचा वापर करावा आणि सहकार्य करावे.

या सार्वजनिक मंचावर लेख, चर्चा आणि प्रतिसाद याद्वारे होणारे लिखाण सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी प्रत्येक सदस्याने घ्यावी अशी अपेक्षा आहे.

उपक्रमराव,

उपक्रमराव,

('प्रशासक महोदय' असल्या जड नांवाऐवजी 'उपक्रमराव' हे नांव मस्त वाटतं की नै? ;)

अश्या प्रकारच्या परस्परांतील गप्पागोष्टींसाठी 'व्यक्तिगत निरोप' आणि 'खरडवही' या सुविधा उपलब्ध आहेत. कृपया त्यांचा वापर करावा आणि सहकार्य करावे.

नाही, आपण म्हणता ते अगदी योग्य आहे. परंतु धोंडोपंतांचा ज्योतिषविषयक लेख पाहिला आणि नकळत त्यांना एक खाजगी प्र्श्न विचारावासा वाटला! अहो काय आहे, की ज्योतिष आणि ज्योतिषी हा विषयच असा आहे की सर्वसामान्य माणसं आपापल्या समस्या(!) विचारू लागतात. मीही नेमकं तेच केलं! ;)

माझीही एक समस्या मी उत्साहाच्या भरात धोंडोपंतांना विचारून टाकली! ;)

यापुढे मात्र वैयक्तिक लेखनाकरता व्य नि किंवा खरडवहीचाच वापर करीन हो!

आपला,
(काही(!) समस्या असलेला!) तात्या.

तात्यांच्या मताशी एकदम सहमत

तात्यांच्या मताशी एकदम सहमत

अगदी माझ्या मनातील हा प्रश्न होता..

धन्यवाद तात्या
- सागर

धोंडोपंतराव,

धोंडोपंतराव,

भारतातल्या सर्व ज्योतिषतज्ञांनी छातीठोकपणे क्रिकेट विश्वकपात भारताचा विजय वर्तवल्यानंतरही अशी नामुष्कीची वेळ का आली ?
ज्योतिष हे जर शास्त्र असेल, तर चयन समितीवर एकही ज्योतिषी का नाही ?

सर्कीटरावांप्रमाणेच आम्हीही आपल्याला हेच प्रश्न विचारू इच्छितो.

आपला,
तात्या तेंडूलकर!

कारण

भारतातल्या सर्व ज्योतिषतज्ञांनी छातीठोकपणे क्रिकेट विश्वकपात भारताचा विजय वर्तवल्यानंतरही अशी नामुष्कीची वेळ आली कारण या लोकांनी सांगितलेले विधी वगैरे एकटा सचिन सोडून कोणीही केले नाहीत. ह्यामुळेच पराभव झाला.

सर्किटदादा,
चयन समिती साठी 'निवड समिती ' हा मराठमोळा शब्द 'अजूनही ' वापरात आहे म्हटलं.

अवांतर

सचिनला त्या विधींचा काय फायदा झाला ? फर्नांडो ने देखील ते विधी केले होते का ? कारण सचिन त्याच्या चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला, असे ऐकिवात आहे.
अहो असं काय राव ! सचिनने ते विधी केले नसतील अथवा ते करताना त्याची काही चूक झाली असेल त्यामुळेच तो बाद झाला !
मला तर आता वाटतंय की भारतातले अनेक लोक सध्या तार्कीक आणि नास्तिक झाल्यानेच आपण विश्वकरंडक गमवला असावा ! हाय !
देवा धाव रे!
-- (भगत) लिखाळ.

प्रायश्चित्त

याचे प्रायश्चित्त म्हणून सर्वांनी माहीमच्या खाडीतील पाण्याने भरलेल्या बाटलीतील तीर्थ (नेहमीच्या तीर्थासोबत) रोज गोरज मुहूर्तावर घ्यावे.
नेहमीच्या तीर्थाने आपला संघ हरल्याचे दु:ख वाटत नाही व खाडीतील तीर्थाने पापक्षालन होते.

श्री. श्री. १००८ योगेशबाबा

मुंगूसबळी

आता विधींविषयी म्हणताय, तर जरा खुलासा करा की राव, त्यांनी कोणते विधी सांगितले होते ? सचिनला त्या विधींचा काय फायदा झाला ?
सचिनने नागबळी विधी केला होता असे वाचले आहे. (म्हणजे काय ते विचारू नये.)

फर्नांडो ने देखील ते विधी केले होते का ?
तेच विधी अर्थातच नाही परंतु सचिनच्या नागबळी विधीसाठी फर्नांडोने मुंगूसबळी विधी केला असावा.

घाई

अहो, असं काय करता सर्किटराव, सचिनला विधी करण्याची घाई झाली होती म्हणून तर तो शून्यावर बाद होऊन ड्रेसिंग-रूमला पळाला ना ! समझा करो यार!

"आईला ! कसला आवाज झाला रे ?"

सर्व ज्योतिषतज्ञांनी?

"भारतातल्या सर्व ज्योतिषतज्ञांनी " म्हणजे कुणी ?

आमच्या माहितीत तर कोणीही विद्वतजनांनी यावर भाष्य केल्याचे माहित नाही.

पिजर्‍यात पोपट घेउन बसणार्‍या सर्व ज्योतिषतज्ञांनी का?

आपला,
(प्रश्नांकित) धोंडोपंत

विषय भलतीकडे जातोय

विषय भलतीकडे जातोय. मूळ मुद्दा बाजूला ठेवून अनावश्यक गोष्टींचे चर्वण सुरू आहे.

गाडी रूळावर आणा.

आपला,
(मुद्देसूद) धोंडोपंत

कुंभ रास

धोंडोपंत,

कुंभ राशीच्या लोकांना या मंगळप्रवेशामुळे चांगला/ वाईट काय फरक पडेल ते सांगितलेत तर बरे होईल.

- (कुंभ राशीची ) प्राजक्ती

शत्रूगृही

प्राजक्ती,

कुंभ ही शनीची रास. कुंभ ही राजराशी आहे. हे लोक अत्यंत बुध्दिमान असतात. ही वायुतत्वाची रास आहे. त्यामुळे हुषारी ही उपजत असते.

शनी चे "पॉझिटिव्ह" गुण ह्या राशीत आहेत. निगेटिव्ह मकरेत आहेत.

कुंभ राशीचे लोक् हे अत्यंत विचारपूर्वक कृती करणारे असतात. कोणत्याही विषयात हे घुसले की त्याचे सखोल ज्ञान आत्मसात करण्याकडे ह्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे ह्या लोकांना तौलनिक अभ्यास करण्याची आवड असते.

यांना उधळपट्टी करायला आवडत नाही. चारचौघांसोबत हॉटेलात गेले, तर बील आल्यावर एकदम त्यावर झडप घालून् "मी देतो... मी देतो"... करणार नाहीत. शांतपणे लोकांना पैसे द्यायची "संधी" देतील.

मिथुन सुध्दा कुंभेसारखी वायुतत्वाची अत्यंत हुषार रास. पण त्यावर बुधाचा अंमल असल्यामुळे मिथुन राशीचे लोक उतावळे असतात.

त्यांचा हा धसमुसळेपणा कुंभेत नाही.

मंगळाचे गुण हे शनीच्या अगदी विरुध्द आहेत. मंगळ म्हणजे एक घाव दोन तुकडे. शनीमहाराज एकदम संथ. त्यामुळे कुंभेत मंगळ येतो तो त्याच्या शत्रूच्या घरात येतो. तेथे तो फारशी चांगली फळे देत नाही.

कुंभ रास पत्रिकेत कोणत्या स्थानात आहे? हे समजल्यावर त्यावरून मंगळाचे गोचरीचे फलादेश सांगता येतील.

आणि हो, कुंभेत सध्या राहू आणि हर्षलमहाशयही ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यावरून मंगळाचे भ्रमण फारसे सुखदायी नाही.

पण वर सांगितल्याप्रमाणे रास कोणत्या स्थानात आहे त्या स्थानाच्या कारकत्वावरून मंगळ भ्रमणाचे निश्चित परिणाम सांगता येतील.

आपला,
(ग्रहांकित) धोंडोपंत

धन्यवाद!

धोंडोपंत,

आपण दिलेल्या माहितीबद्दल अनेक धन्यवाद!
कुंभ रास पत्रिकेत कोणत्या स्थानात आहे हे मात्र मला माहित नाही. या राशीत मंगळ किती दिवस असणार आहे?

प्राजक्ती

राशीप्रवेश

प्राजक्ती,

कुंभेत मंगळ ०७ मे २००७ पर्यंत आहे.

७ मे रोजी रात्री ९.०५ ला तो मीनेत जाईल.

आपला,
(गणिती) धोंडोपंत

अच्छा

ठीक आहे..म्हणजे दीड महिना या राशीत् आहे..माहितीबद्दल धन्यवाद!

आपली,
(आभारी)प्राजक्ती

मंगळाचा कुंभेत प्रवेश

श्रीयुत धोंडोपंत यांस सप्रेम नमस्कार
सचिनच्या संदर्भात सभासदांनी विचारलेले प्रश्न निरुत्तर करणारे आहेत.त्यांत चेष्टेचाही सूर आहे.पण ती चेष्टा फलज्योतिषाची आहे.धोंडोपंतांच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल असा एकही शब्द कोणी लिहिला नाही.लिहिणारही नाहीत. कारण सर्वजण सुबुद्ध आहेत.आपण सर्व 'उपक्रम'कुटुंबाचे (परिवाराचे) सदस्य आहोत याची सर्वांना जाणीव आहे.आता आणखी कांही उदाहरणे:

** लोकसभेच्या २००४ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल ,त्यांचे सरकार येईल, श्री.बाजपेयीच पंतप्रधान होतील ; असे भविष्य सर्व सुप्रसिद्ध ज्योतिषांनी केले होते.ते सपशेल खोटे ठरले.
** त्यावेळी डॉ.मुरलीमनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते.ते निवडून येतील आणि त्यांना महत्त्वाचे मंत्रिपद मिळेल कारण त्यांचे सर्व ग्रह उच्चीचे आहेत असे भाकीत बत्तीस(३२) नामांकित भविष्यवेत्त्यांनी वर्तविले होते.प्रत्यक्षात डॉ.जोशी यांचे डिपॉझिट गेले.
** मागे अष्टग्रहीच्यावेळी पृथ्वीवर उत्पात घडतील असे सांगत ज्योतिषांनी उच्छाद मांडला होता.प्रत्यक्षात काहीच विपरीत घडले नाही.
**गेल्यावर्षी टी.व्ही.वरील मुलाखतीत एका प्रख्यात ज्योतिषाने सांगितले होते की जून २००६ मधे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाईल.तसे मुळीच घडले नाही.
या आणि अशा अगणित अनुभवांवरून सिद्ध होते की ज्योतिष हे शास्त्र नाहीच.आहे तो चुकीच्या गृहीतकांवर आधारित केवळ कल्पनाविलास.
आपला,.......यनावाला

धोंडोपंत

माझ्या मित्राला व त्याच्या होणार्‍या बायकोला मंगळ आहे. तर् अधिकृत लग्नाआधी त्यांनी आधी केळीच्या झाडाशी पाट लावावा की पिंपळाच्या?

तो राहतो तेथे एकही असे झाड उपलब्ध नाही. तर मग झाडाचे चित्र काढून् त्याच्याशी पाट लावला तर् चालेल का्?

-मंगळ पांडे

चित्र

मंगळावर फिरून आलेल्या बग्गीच्या चित्राला लावला तरी चालेल !

मंगळाचा कुंभ राशीत प्रवेश

समजा तुम्ही एका विस्तीर्ण माळावर पूर्वाभिमुख उभे आहात.अजून सूर्योदय व्हायचा आहे,तुमच्या समोर शंभर मीटर अंतरावर एक मोठे वर्तुळाकार मैदान आहे.मैदानाच्या परिघावरून चालत चालत एक माणूस फेरी घालत आहे.सूर्यबिंब क्षितिजावर आले आहे. एवढ्यात मैदानाला फेरी घालणारा माणूस तुम्ही आणि सूर्य यांच्या मधे आला.त्याला सूर्यबिंबाची पार्श्वभूमी लाभली म्हणजे त्याने सूर्यबिंबावर प्रवेश केला असे म्हणणार काय? खरे तर त्या माणसा पासून सूर्य १५कोटी किमी. अंतरावर आहे.
मंगळ त्याच्या कक्षेत फिरताना अशा ठिकाणी येतो की त्याला कुम्भ राशीतील नक्षत्रांची पार्श्वभूमी लाभते.आपल्याला वाटते मंगळाने कुंभेत प्रवेश केला.खरे तर तो कुंभेलील सर्वात जवळच्या तार्‍या पासूनही अब्जानुअब्ज किलोमीटर दूर असतो.
आपल्याला सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य.तो इथून ५०० प्रकाश सेकंद (८मि.२० से) अंतरावर आहे. प्रकाशाचा वेग ३लक्ष किमी. प्रतिसेकंद आहे.दुसरा कोणताही तारा इथून पाच प्रकाश वर्षांपेक्षा कमी अंतरावर नाही.काही तारे तर सहस्रावधी प्रकाश वर्षे दूर् आहेत. या अंतराचा विचार करता मंगळाची कक्षा नगण्य आहे. मंगळ त्याच्या कक्षेत कुठेही असला तरी तो कुंभ राशी पासून कित्येक अब्ज कि.मी .दूरच असतो.हे सर्व वैज्ञानिक वास्तव आहे.
तेव्हा मंगळाचा कुंभेत प्रवेश हा केवळ दृक् भ्रम आहे. तारे इतके दूरस्थ आहेत की आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहावर
कोणत्याही राशीतील कोणत्याही नक्षत्राचा काही सुद्धा परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही

मंगलळाचा कुंभेत प्रवेश

" त्या तिकडे काळोखात त्या झाडा खाली बागुलबुवा बसला आहे. त्याचे डोळे मोठे मोठे आहेत. त्याच्या कडे एक पोते आहे.
मुलांनी हट्ट केला तर तो येतो. त्यांच्यावर डोळे वटारून रागावतो आणि ऐकली नाहीत तर त्यांना पोत्यात घालून भूर घेवून जातो."
असे लहान मुलांना सांगणे

आणि

"आत्ता कुंभेत राहू आणि हर्षल हे ग्रह ठाण मांडून् बसले आहेत.

ह्या लोकांनी २९ मार्च नंतर फार सावधान रहावे असा सल्ला आहे. कारण मंगळ हा कलहप्रिय ग्रह आहे. तो लग्नात आल्यावर माणसाला भांडणे करायला प्रवृत्त करतो. रागीटपणा देतो, हट्टीपणा देतो.
लग्नातल्या मंगळाची पूर्ण् दृष्टी सप्तमावर पडत असल्याने ह्या लोकांनी वैवाहिक बाबतीत फार दक्ष रहावे. जोडीदाराशी होणारे लहान सहान मतभेदही अशा ग्रहस्थितीत घटस्फोटापर्यंत पोहोचवू शकतात."
असे अनभिज्ञ लोकांना सांगणे
यांत तत्त्वतः काही भेद नाही.

हा हा

उदाहरण आवडले

बागुलबुवा आणि मंगळ

किमान बागुलबुवाच्या भितीनी लहान मुले शहाण्यासारखी वागतात. तशीच काही खट्याळ माणसे जर मंगळाच्या भितीनी नीट वागणार असतील, तर काय हरकत आहे ?

- असामी

 
^ वर