दिवाळी अंक - वाचलेले काही फुटकळ-१

'अक्षर' दिवाळी अंकातला सुलेखा नागेश यांचा डॉ. नयना पटेल यांच्या आणंद येथील कृत्रीम गर्भारोपणाचे इस्पितळ व भाडोत्री मातांचे (सरोगेट मदर्स) वसतिगृह याविषयीचा लेख रोचक आहे. उपजीविकेची मर्यादित साधने असलेल्या स्त्रियांचे आयुष्य अशा उपक्रमात सहभागी झाल्याने कसे बदलून गेले आहे, तथापि या गोष्टींमध्ये सहभागी होणे याला समाजात अद्याप मान्यता कशी नाही आणि त्यामुळे या सरोगेट मदर्सना हे सगळे लपूनछपून कसे करावे लागते याबातची माहिती रंजक तरीही विचार करायला लावणारी आहे. प्रगत देशांमध्येही याबाबत गुप्तता पाळण्याकडेच (यातल्या 'पाळण्या' या शब्दावर कोटी करायचा मोह आवरुन!) लोकांचा कल असतो हे वाचून काहीसे नवलही वाटते. याच अंकातील मारी कॉल्विन या अमेरिकन युद्धपत्रकार महिलेविषयी चा मीना कर्णिकांचा लेखही मुद्दाम वाचावा असा आहे.पाडगावकरांनी 'सलाम' या कवितेच्या वाचनादरम्यान म्हटल्याप्रमाणे 'भय' आणि 'शोषण' यांच्या सावलीत किड्यामुंग्यांसारखे आयुष्य जगणार्‍यांच्या गर्दीत चेचन्या, श्रीलंका, सीरीया , अफगाणिस्तान अशा जगातील कमालीच्या अशांत भागांत राहून वृतांकन करणार्‍या, हल्ल्यात एक डोळा गमावूनही जिद्द न हरणार्‍या आणि अशाच एका हल्ल्यात प्राण गमावणार्‍या मनस्वी मारीचे वेगळेपण ठळकपणाने दिसत राहाते. लेखिकेने लेखाच्या शेवटी मारीला केलेल्या 'सलाम' मध्ये आपणही सामिल होतो. जराही संवेदनशीलता शाबूत असेल तर हा लेख वाचून लगेचच तरी दिवाळीच्या फराळावर ताव मारणे किंवा पणत्या,मेणबत्त्या, आकाशकंदील, फटाके लावायला धावणे शक्य होणार नाही. या लेखाचे हे मोठे यश आहे असे मला वाटते.
'सत्यमेव जयते' ही आमीर खानची मालिका, मलाला युसुफझाई आणि ग्रेस यांच्याविषयी या वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये बरेच लेख आहेत.'मलालाविषयी 'अक्षर' च्या अंकाच्या मुखपृष्ठावरील इरावती यांचे चित्र आणि 'डरते है बंदूकवाले एक निहत्ती लडकी से, फैले है हिम्मत के उजाले, एक निहत्ती लडकी से' हा हबीब जालिब यांचा शेर वाचून मला बरे वाटले. हातात पूजेचे तबक घेऊन, डोक्यावरुन पदर घेऊन, नाकात नथ घालून सुस्मित आणि सलज्ज वगैरे मुद्रेने उभ्या असलेल्या ललनांचे मुखपृष्ठ असलेले अंक आता स्टॉलवरुन उचलावेसेही वाटत नाहीत. अर्थात या पूर्वग्रहाची जबरदस्त किंमत द्यावी लागते. उदाहरणार्थ या वर्षीचा 'माहेर'चा दिवाळी अंक. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.दीपावली'त रामदास भटकळांचा ग्रेसवरील (आणि अनिल अवचटांचा आनंद नाडकर्णींवरचा 'माझा आनंदा' (इथेही 'मी आहेच!) हा लेख आहे. अनिल अवचटांचे लेखन आता पूर्वगग्रहाची टरफले काढून वाचताच येत नाही. सदाशिव अमरापूरकरांचा हा लेख ( तो अवचटांचा आहे, हे सोडल्यास!) तसा निर्दोष आहे, पण ते तितकेच. अवचटांच्या लेखनात सगळ्यात महत्त्वाचे पात्र असते ते म्हणजे 'मी'. या लेखातले अमरापूरकरदेखील अवचटांना वाट करुन देण्यासाठी अंग चोरुन उभे आहेत असे वाटते. मुक्तांगण, बासरी, सुनंदा, ओरिगामी, ओतूर....मला वाटते पन्नाशी-साठीनंतरचे माणसाचे आयुष्य हे त्याच्या आधीच्या आयुष्याची रिवाईंड केलेली फिल्मच असते. ती माणसाने शांतपणे, एकट्याने बघावी. वाटल्यास पुन्हापुन्हा बघावी. प्रत्येक अनुभवाकडे 'आता यावर काहीतरी लिहितो...' असे बाह्या सरसावून बघणे माझ्या आकलनापलीकडले आहे. असेच काहीसे मला विजय पाडळकरांचे मौजेतला 'जीएंची प्रतिमासृष्टी आणि सिनेमा' हा लेख वाचताना वाटले. 'मला श्रीखंड आवडते आणि मला चित्रे काढायलाही आवडते, मग मी श्रीखंडानेच चित्रे काढणार..' असे काहीसे पाडळकरांनी केले आहे. पाडळकरांनी 'हंस' मधील 'चोरी (नंतर 'वर्ग-स्क्वेअर' चे चिन्ह) चा मामला' हा लेख का लिहिला हे त्यांना कुणीतरी खाजगीत विचारायला हवे. 'इट हॅपन्ड वन नाईट' चा एक प्रसंग, 'चोरी चोरी' तला एक प्रसंग असे या दोन चित्रपटांच्या पटकथांचे जणू संकलनच पाडळकरांनी सादर केले आहे. सो व्हॉट? यापुढे जाऊन त्यात 'दिल है की मानता नही' चीही भर घालता आली असती. पण पुन्हा एकदा, सो व्हॉट?
भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती यांमुळे अस्वस्थ झालेल्या लेखकांचे बरेच लेख या वर्षीच्या दिवाळी अंकांत आहेत. माझ्या मते हे एक चांगले लक्षण आहे. 'वर्षाचा मंगल दिवस, मग त्या दिवशी असलं अभद्र, अपशकुनी कशायला वाचायला पाहिजे?' असल्या विचारांची राखरांगोळी होईल तोच खरा मंगल दिवस. तीच खरी दिवाळी. प्रज्ञा दया पवारांचा 'हा गुन्हा आपण वारंवार करत राहूयात' हा लेख थोडासा दोन्ही हातात तलवारी परजणारा असला तरी या वर्गात मोडणारा आहे. 'माझं बरं चाललंय ना, मग मरु दे तो समाज...' असं म्हणून 'नो पार्किंगमध्ये गाडी लावून, पकडलो गेलोच तर पोलिसाच्या हातात पन्नासाची नोट सरकावून मद्दडपणे सणाची 'खरेदी' वगैरे करणारे लोक अशा लेखांची पाने उलटवून पुढे जातात. त्यांनी तसेच करावे ('माझ्या बुद्धिमत्तेविषयी तुम्ही साशंक झालात. तसेच राहा!' एकनाथ बागूलांना पुलंनी लिहिलेल्या पत्रातले वाक्य!) 'असहाय नागरिक आणि मोडलेली व्यवस्था' हा नरेंद्र चपळगावकरांचा मौजेच्या दिवाळी अंकातला असाच एक लेख.
'दीपावली' तले नंदिनी आत्मसिद्धांचे उर्दू लेखक /शायरांवरील लेख अप्रतिम असतात. 'आईना हमें देखकर (के?) हैरान सा क्यूं है?' हा शहरयार यांच्यावरील लेख असाच आहे. या सगळ्या लेखांचे पुस्तक निघावे (आणि मग आपण ते विकत घ्यावे!) असे मला फार वाटते.
'रेहमानचे वारसदार' या रणजित पवारांच्या लेखाचे त्याच्या शीर्षकाशी काय नाते आहे हे समजून घेणे मला कठीण गेले. पण एकंदरीत नव्या संगीतकारांविषयी फक्त कुत्सित नाराजीच असणार्‍यांना सावध करणारा हा लेख आहे, हे नक्की. त्यातही पियुष मिश्रा या माझ्या आवडत्या अभिनेता-लेखक-संगीतकाराचा झालेला उल्लेख वाचून मला फार बरे वाटले. या वर्षीच्या बर्‍याच दिवाळी अंकांमध्ये 'गँग्ज ऑफ वासेपूर' चा टाळ्यांच्या कडकडाटात झालेला उल्लेख बाकी मला कळाला नाही. ते माझे या बाबतीतले अज्ञान असे समजून पुढे जाणेच इष्ट ठरेल.मि. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हाजिर हो' हा चंद्रसेन टिळेकरांचा लेख या वर्षीच्या दिवाळी अंकांतला एक उत्तम लेख मानता येईल . 'आई अंबाबाईच्या कृपेनंच महाराष्ट्र बुद्धिप्रामाण्यवादी आहे' असलं भन्नाट वाक्य लिहिणार्‍या पुलंना एक माध्यम म्हणून वापरुन टिळेकरांनी समाजाच्या दांभिकपणाला जे चिमटे काढले आहेत त्याचे नाव ते. वैचारिक चालना देणारे लिखाण करायचे तर चकलीचा तुकडा दह्यात बुडवून खाता येण्यासारखेही करता येते याचा हा नमुना म्हणता येईल ( 'खुसखुशीत' हा शब्द लिखाणात वापरणार्‍याला बाकी आता जनलोकपाल बिलातच दहा हजार वर्षांची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करणे आवश्यक आहे!) सुबोध जावडेकरांचे लेखन मुद्दाम वाट पाहावे असे असते. 'अक्षर' मधील त्यांचा 'माणसं परोपकारी का असतात?' हा लेख मला आवडला.Altruism ही नक्की काय भावना असते? तिचा उगम कुठून होतो? मानवेतर जीवां मध्ये ही भावना असते का? या सगळ्याबाबत जावडेकरांनी केलेला उहापोह रंजक आणि माहितीपूर्ण आहे. (उंदीर आणि चिंपाझींवर या संदर्भात केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष तर फारच!) मुद्दाम वाचावा असा हा लेख आहे.
'दीपावली'च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ वेधक आहे. देवदत्त पाडळकरांच्या या सुरेख चित्राचे 'संवेदना' हे नाव सोडून सगळे मला कळाले. (मौजेच्या अ़ंकाचे 'हेड ऑफ अ वुमन' हे अमेदियो मॉदिलियानीचे मुखपृष्ठ आणि त्यावर असलेला प्रभाकर कोलतेंचा लेख हे मला सौरभ गांगुलीला ऑफ स्टंपवर टाकलेल्या वेगवान बाऊन्सरसारखे फसवून गेले. 'नवचित्रकलेच्या प्रदर्शनात एकेक चित्र बघून मी थोबाडीत मारल्यासारखा चेहरा करुन पुढे सरकत होतो ' हे कुणाचे तरी (आणखी कोण?) वाक्य आठवले. काहीकाही गोष्टी आता नशिबात नाहीत म्हणून सोडून देणे भाग आहे. One may not be elected!) 'लोकमत दीपोत्सव' च्या दिवाळी अंकात 'कपाळमोक्ष होऊन खड्ड्यात पडलो तरी बेहत्तर, पण इतरांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मी मठ्ठ बैलासारखा चालणार नाही हा उर्मटपणा ही बदलासाठीची पूर्वअट आहे' असं सुभाष अवचट लिहितात . 'जुने जाऊ द्या मरणालागुनि' वगैरे ठीक आहे पण आहे ते मोडल्याशिवाय नवे होणार नाही म्हणून 'मी आधी आहे ते सगळे मोडणार, मग नवे निर्माण होते की नाही ते नंतर बघू हा या अवचटांचा 'उर्मटपणा' मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे!
या आणि इतर अंकांतल्या कविता मी वाचण्याचा इमानेइरबारे प्रयत्न केला. काही परिचित लोकांच्या कविता समजून घेण्याचा मी प्रामाणिक वगैरे प्रयत्न केला आणि त्या मला (नेहमीप्रमाणे) कळाल्या नाहीत, म्हणून मग मी तो नाद सोडून दिला. सुजित फाटक यांची 'अक्षर' मधली 'प्रिय पुणे' ही कविता मला कळाल्यासारखी आणि म्हणून आवडल्यासारखी वाटली.
पुणे,
सह्याद्रीत पडलेलं प्लॅस्टिक हे तुझ्या मेट्रोपोलिटन अस्तित्वाची
डॉल्बी डिजिटल मेलोड्रामाटिक साक्षय
या आणि अशा ओळी ध्यानात राहातात.
आणि शेवटी 'अक्षर' मधल्या निळू दामलेंच्या 'अनोखा व्हिसलब्लोअर' या ज्युलियन असांजबद्दलच्या लेखाविषयी. हा लेख अत्यंत अभ्यासूपणाने लिहिलेला आहे. विशेषतः बगदादमध्ये अमेरिकन सैनिकांनी निरपराध अफगाणी माणसे (व मुले) यांच्यावर विनाकारण केलेल्या गोळीबाराबद्दल असांजने मिळवलेल्या collateral murder या फिल्मविषयी वाचताना अस्वस्थ व्हायला होते. 'वर्तमानपत्रं निष्प्रभ आहेत. बातम्यांचा वापर करुन, ब्लॅक मेलिंग करुन गब्बर झालेले पत्रकार एक शोधा, दहा मिळतील. या गोचीकोंडीतून असांजनं वाट काढली' असं दामले लिहितात. (मग 'लवासा' हे तुमचे पुस्तक हा त्याचाच एक भाग का? असे प्रश्न विचारायचे नसतात!)
बाकी दिवाळी अंक वाचायला अजून सवड झालेली नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

आवडला

काही दिवाळी अंकांचा गोषवारा आणि समाचार आवडला.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र दिवाळी अंक

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र चा दिवाळी अंक हा दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते. बोलीभाषेत मात्र सर्व याला दिवाळी अंकच म्हणतात. दिवाळी अंक म्हटले तर प्रतिगामी वा अंधश्रद्ध ठरु अशी भिती त्यामागे असावी.
अंकात सुमन ओक यांचा लेख आहे. विषय आहे जोहॅनिस क्वॅक (जॉन) या जर्मन तरुणाने " भारतीय बुद्धीवादी,त्यांच्या अश्रद्धेचे स्वरुप आणि श्रद्धेबाबत भ्रमनिरास" या विषयावर केलेले एक संशोधन.ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस ने प्रकाशित केले आहे. त्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्य यावर प्रकाश टाकला आहे.
पुष्पाताई भावे यांची राजीव देशपांडे यांनी घेतलेली विशेष मुलाखत अंकात आहे. कार्यकर्ता मुलाखत म्हणुन प्रा प रा आर्डे यांची तिमिरातून तेजाकडे अशी मुलाखत आहे.
धर्मस्थळ चिकित्सेत मुंबईचा मिरा दातार दर्गा, बुलढाण्यातील चिखलीचा सैलानी बाबाचा दर्गा, रत्नागिरीतील शहानूर बाबाचा दर्गा, सांगलीजवळ ख्वाजा कबीर दर्गा, नंदूरबार जवळील गुलामअली चिश्ती दर्गा अशा पाच दर्ग्यातीळ अघोरी उपचाराबद्दल माहिती देणारे लेख आहेत. मनोरुग्णांना दर्ग्याची नव्हे तर मानसमित्रांची गरज या डॉ प्रदीप जोशी यांचा लेख ही आहे.
ओळख प्रेरणादायी कामाची अंतर्गत अंनिस च्या कोल्हापूर व लातूर येथील आंतरजातीय विवाह केंद्राच्या भुमिका व अनुभव या बद्दल माहिती आहे.
गर्भ संस्कार एक थोतांड- डॉ चंद्रकांत संकलेचा ; हिंदूत्ववादी संघटनांनी हिंदुंच्याकरिता केले तरी काय? - डॉ शरद अभ्यंकर हे लेख आहेत.
"वाढती दैववादी मानसिकता व आजचे समाज वास्तव' हा परिसंवाद आहे. यात कॉ. गोविंद पानसरे, संध्या नरे-पवार, सुभाष थोरात, तारा भवाळकर, डॉ रावसाहेब कसबे, डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा सहभाग आहे.
एकंदरी अंक अर्थातच वैचारिक मेजवानी आहे.

छान!

दुसर्‍या भागाची वाट बघतोय.

 
^ वर