उपक्रम दिवाळी अंक २०१२

यावर्षीच्या दिवाळी अंकाची घोषणा करण्यात उशीर झाला त्याबद्दल दिलगीर आहोत. गेल्यावेर्षीपेक्षा यंदा वेळ कमी असल्याने शक्य तितक्या लवकर लेखन पाठवून सहकार्य करावे ही नम्र विनंती.

विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे. उपक्रमींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे गेल्या चार वर्षांचे दिवाळी अंक वैशिष्ट्यपूर्ण झाले आहेत. यावर्षीचा दिवाळी अंकही असाच वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व उपक्रम सदस्यांना आवाहन आहे की त्यांनी आपले लेखन उपक्रम दिवाळी अंक २०१२ साठी पाठवावे.

लेखांचे विषय आणि प्रकार

भाषा, अर्थकारण, वाणिज्य, व्यवस्थापन, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, प्रवास, व्यक्तिमत्व, साहित्य व साहित्यिक, राजकारण इ. कोणत्याही विषयावर अनुभव, अनुवाद, आस्वाद, प्रवासवर्णन, बातमी, माहिती, विचार, व्यक्तिचित्र, संदर्भ, स्फुट, कोडी/तर्कक्रीडा, छायाचित्रे, चलचित्रे, व्यंगचित्रे आणि पानपूरके (वरील विषयांवरील थोडक्यात पण रंजक माहिती, घटना, 'तुम्हाला हे माहीत आहे का?' वगैरे) अश्या प्रकारचे लेखन पाठवावे.

लेखन पाठवताना

 • कृपया या अंकासाठी उपक्रमच्या लेखनविषयक धोरणात बसणारे लेखनच पाठवावे.
 • सदस्यांनी एकाहून अधिक लेख पाठवण्यास हरकत नाही.
 • उपक्रमचे सदस्य नसलेल्यांचे उपक्रमच्या धोरणात बसणारे लेखन त्यांच्या अनुमतीने पाठवण्यासही हरकत नाही.
 • लेखन प्रताधिकार कायद्याचा भंग करणारे किंवा उपक्रमवर किंवा इतरत्र पूर्वप्रकाशित झालेले नसावे.
 • लेखन शक्यतो ५ नोव्हेंबरच्या आधी पाठवावे. आणखी थोडा वेळ हवा असल्यास ५ नोव्हेंबर पूर्वी लेख पाठवण्याचा मनोदय कळवावा.

लेखनाविषयी मार्गदर्शन

 • लेख साधारणपणे किमान ५०० शब्दांचा असावा. (यथोचित अपवाद वगळता)
 • लेख मोठा असेल तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन भागात प्रकाशित करणे शक्य आहे.
 • पारिभाषिक शब्दांच्या बरोबर मूळ शब्द देवनागरी आणि रोमन लिपीत कंसात द्यावा.
 • आवश्यक तेथे संदर्भ, दुवे वगैरे द्यावेत.
 • आवश्यक तेथे चित्रे, आकृत्या, छायाचित्रे, तक्ते द्यावेत. याविषयी कोणतीही संपादकीय मदत लागल्यास कळवावे.
 • स्वतःविषयी थोडक्यात माहिती द्यावी, शक्य असल्यास छायाचित्रही. (वैकल्पिक)
 • लेखन upakramdiwali@ gmail.com या पत्त्यावर पाठवावे. लेखन टेक्स्ट स्वरूपात किंवा थेट विरोपात चिकटवून पाठवावे. लेखनाची एक प्रत स्वतःजवळही ठेवावी. उपक्रम दिवाळी अंकाविषयी सर्व पत्रव्यवहार दिवाळी अंक या सदस्यनामाशी करावा.

अंकनिर्मिती (मुद्रितशोधन, संपादन इ.), अंकाची सजावट, मुखपृष्ठ, चित्रे याबाबतीत सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे, लागलीच कळवावे.

तेव्हा झटपट लिहायला लागा आणि वरील सूचनांप्रमाणे शक्य तितके लेखन पाठवा! आपल्या उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे!

कळावे, लोभ असावा,

उपक्रम दिवाळी अंक २०१२

लेखनविषय: दुवे:

Comments

हार्दिक शुभेच्छा

दरवर्षाप्रमाणेच भरघोस प्रतिसाद मिळून उपक्रमाचा दिवाळी अंक जोरदार निघावा यासाठी हार्दिक शुभेच्छा.

छायाचित्रे

नवी छायाचित्रे त्यांच्या समुदायातुन येतीलच ...

धन्यवाद! आणि अधिक ...

उपक्रम दिवाळी अंकासाठी आतापर्यंत लेखन आणि छायाचित्रे पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

ज्या उपक्रमींनी लेखन पाठवण्याचा मनोदय कळवला आहे त्यांच्या लेखांची आम्ही वाट पाहात आहोत.

इतरांनीही कृपया वेळात वेळ काढून लेख किंवा शक्य न झाल्यास काही थोडक्यात पण मनोरंजक माहिती पानपूरके म्हणून पाठवावी. पानपूरके दिवाळी अंकात वेगवेगळ्या पानांवर दाखवली जातील. याशिवाय तर्कक्रीडा, चित्रे, छायाचित्रे, आपणांस हे ठाऊक आहे का? इ. इ. स्वरूपाच्या साहित्यामुळे दिवाळी अंक रंगतदार होईल! तेव्हा लगेचच लिहायला लागा आणि कळवा!!

प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक २०१२

थोडेच दिवस शिल्लक; लेख, पानपूरके, छायाचित्रे लवकरात लवकर पाठवा!

उपक्रम दिवाळी अंकासाठी लेखन आणि छायाचित्रे पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

ज्या उपक्रमींनी लेख पाठवण्याचा मनोदय कळवला आहे, त्यांच्या लेखांची आम्ही वाट पाहात आहोत.

लेख पाठवण्याची इच्छा असूनही वेळेअभावी शक्य झाले नसले तरी लेखनाचा प्रयत्न अवश्य करावा! लेखाचा विषय आणि अंदाजे शब्दसंख्या कळवून थोडीशी वाढीव मुदत घेता येईल!

पानपूरकांसाठी थोडक्यात पण मनोरंजक माहिती अवश्य पाठवावी.

प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक

मुदतवाढ

उपक्रम दिवाळी अंकासाठी लेखन आणि छायाचित्रे पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

अद्यापही दिवाळी अंकासाठी लेख, पानपूरके, कोडी, छायाचित्रे वगैरे पाठवायची असल्यास विषय, अंदाजे शब्दसंख्या इ. कळवून
वाढीव मुदत घेता येईल.

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक

अजूनही काही पाठवू शकतो काय ?

आजच सदस्य झालो.

अजून मुदत असल्यास थोडे साहित्य पाठविण्याची इच्छा आहे.

बाकी आपल्या अंकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

 
^ वर