ओळख न दाखवणारे भारतीय

नमस्कार मंडळी,
परदेशात फिरताना मला नेहमीच एक अनुभव येतो, समोरुन येणारा भारतीय दुसर्‍या भारतीयाला ओळख दाखवत नाही. असे का? असे का? असा प्रश्न मला अनेकदा पडतो.

परवा मी स्वित्झर्लंड येथे फिरायला गेलो असताना. युंगफ्राउ या शिखरापाशी प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीमध्ये ९५% भारतीय होते. तेथे अनेक जणांकडे पाहून हसण्याचा मी निष्फळ प्रयत्न केला. त्या अनुभवानंतर मी मनावरच घेतले की आता समोर आलेल्या प्रत्येक भारतीयाकडे पाहून स्मितहास्य करायचे. त्यानंतर मी विविध ठिकाणी गेलो, काही ठिकाणी पुन्हा पुन्हा अनेक भारतीय दिसत होते. ते समोरुन येताना आपण नजरेला नजर देताच (सन्माननीय अपवाद जे एक दोनच होते ते वगळता) ते नजर चुकवित होते अथवा पाहून न पाहिल्या सारखे करत होते. (मी गुंड मवाली वगैरे दिसत नाही हो ! :)

असा अनुभव केवळ माझाच नाही तर इतर अनेकांचा आहे.

या उलट युरोपातील सर्व लोक मात्र दिसल्यावर 'हाय !' म्हणुन स्मितहास्य करुन जात असतात. हे भारतीय त्यांना हसून प्रत्युत्तर देतात पण इतर भारतीयांना पाहताच नजर चोरतात. पुलंच्या एका लेखात सुद्धा इंग्लंडमधील भारतीयांच्या याच वृत्तीवर त्यांनी बोट ठेवले आहे असे स्मरते. हाच अनुभव मला ऍम्स्टरडॅम येथे सुद्धा आला. तेथे सुद्धा अनेकानेक भारतीय दिसत होते. मी तर 'मिशन स्माईल' हे अभियानच उघडले होते. शेवटी माझे इतर मित्र या अभियानाला 'मिशन इंपॉसिबल' असे म्हणू लागले होते.

आता प्रश्न असा पडतो की, परदेश वारी साठी गेलेले आणि परदेशातच राहणारे अशा दोनही तर्‍हेच्या भारतीयांकडून साधारण एकाच तर्‍हेची ही वगणूक कशी मिळते? प्रांत, भाषा यांची विविधता न जुमानता सर्वच भारतीय या एका ठिकाणी एकता दाखवतात ! :)

आपल्याला असा अनुभव आहे का?

या मागे कारणे काय असावीत असे आपणाला वाटते?
समोरचा भारतीय आपल्या गळ्यात पडेल, पैसे मागेल, उगाच चौकशा करेल असे वाटत असावे का?
आपल्या पैकी अनेक जण परदेश प्रवास करणारे वा परदेशात स्थित असणारे आहेत. आपण स्वतः असे करता का? करत असाल तर का?

आपले प्रतिसाद परदेशात जाणार्‍या आणि असलेल्या भारतीयांच्या मानसिकतेवर काही प्रकाश टाकतील अशी आशा वाटते.

आपलाच,
-- (हसतमुख) लिखाळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

'मिशन स्माईल' हा शब्द आवडून गेला ;)

लिखाळशेठ,

आता 'शेठ'च म्हटले पाहिजे तुम्हाला. तुम्ही काय ब्बुवा स्वित्झर्लंडला फिरायला वगैरे जाता! ;)

अंदाजे किती पैशे पडतात हो स्वित्झर्लंडला साधारण १०-१२ दिवसांकरता फिरायला जायला? माझी आपली उगाचंच एकदा तिथे जायची इच्छा आहे हो! असो..;)

मी तर 'मिशन स्माईल' हे अभियानच उघडले होते. शेवटी माझे इतर मित्र या अभियानाला 'मिशन इंपॉसिबल' असे म्हणू लागले होते.

'मिशन स्माईल' हा शब्द आवडून गेला बरं का लिखाळराव! आणि 'मिशन इंपॉसिबल' ही त्याची शाब्दिक कोटीही आवडली... ;)

आपला,
(हासू आणि आसू या दोघांचंही मोल जाणणारा!) तात्या.

आभार

'मिशन स्माईल' हा शब्द आवडून गेला बरं का लिखाळराव! आणि 'मिशन इंपॉसिबल' ही त्याची शाब्दिक कोटीही आवडली... ;)
धन्यवाद तात्या,
अहो आम्ही कसले शेठ.
--लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

एक चांगला अनुभव

माझा एक अनुभव फारच चांगला आहे. मी २००४ साली पत्नीसह बार्सिलोनाला मुलाकडे गेलो होतो. आम्हा दोघांची ती पहिलीच परदेशवारी होती. बार्सिलोनाला उतरल्यावर कोणत्या पट्ट्यावर सामान येईल त्याचा शोध घेत सामान परत मिळण्याच्या हॉलमध्ये फिरत असता माझे पत्नीशी संभाषण चालू होते. इतक्यांत "तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?" असा चक्क मराठीत प्रश्न ऐकू आला. मागे वळून पाहिले तर एक बाई (त्यांचे नाव सौ. मुकादम आहे हे नंतर कळले) हा प्रश्न विचारीत होत्या. त्या स्पेनमध्ये स्थायिक झालेल्या होत्या. आमचे मराठी त्यांच्या कानावर पडल्यामुळे त्यांना खूप बरे वाटल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपणहून आमच्याशी बोलायला सुरवात केली होती. कदाचित स्पेनमध्ये मराठी माणसे कमी भेटत असल्यामुळे सौ. मुकादमांना आम्हाला पाहून आनंद झाला असेल.

छान

शरदराव,
प्रतिसादासाठी आभार. असे अनुभव नक्कीच सुखवून जातात हे खरेच. असे अनुभव नेहमी आले की अपवादाने?

--लिखाळ

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

भारतीय

इथे मला असा अनुभव आला कि उत्तर भारतातून परदेशात आलेले पंजाबी आणि दक्षिणेकडचे लोक(त्यात बरेचसे श्रीलंकन ही असतात,पण मला ते पटकन समजत नाही.)आपणहून ओळख दाखविणे,स्मितहास्य करणे टाळतात.(त्यातले बरेचजण पॉलिटिकल असायलम खाली इथे स्थाइक झालेले असल्याने असे करतात असे कळले.)
पण एकदा आम्ही प्रवासात असताना एकमेकांशी काही बोललो तर समोरच्या माणसाने आत्ता तुम्ही मराठीत बोललात ना? किती दिवसांनी ऐकले मी मराठी.असे म्हणून तो आमच्याशी गप्पा मारू लागला.एकदा फ्राफु मध्येही दुकानात आम्ही एकमेकांशी मराठी बोलत असलेले ऐकून एक जण आमच्याशी आपणहून बोलायला आले.
स्वाती

पॉलिटिकल असायलम

मी भारताबाहेर कधीच गेलेली नसल्याने मूळ चर्चाविषयाबद्दल मी काही बोलू शकत नाही. पण हा प्रतिसाद व त्यातील खालील वाक्य पाहून कुतूहल वाटलं

त्यातले बरेचजण पॉलिटिकल असायलम खाली इथे स्थाइक झालेले असल्याने असे करतात असे कळले

म्हणजे नक्की काय? (विषयांतर वाटल्यास क्षमस्व)
राधिका

बरोबर

मी सुद्धा असे ऐकले आहे...असायलम् वर राहिलेले लोक हे कादेशिररित्या राहत असतात. पण बेकायदेशीर रितीने (म्हणजे कसे ते मला माहित नाही) राहणारे सुद्धा पुष्कळ असतात.

आपण लिहिलेले हसतमुख लोक हे अपवाद होते कीपा आपणाला असे अनुभव नेहमीच येतात?
माझ्या बाबतीत तरी शेकडा नव्वद लोक नजर चोरतात. पाच लोक इलाज नाही हे पाहिल्यावर हसतात. आणि थोडे असे की आपणहून बोलतात.

--लिखाळ.

साहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) -(सखाराम गटणे- पुल.)

अनुभव

मला दोन्ही प्रकारचे अनुभव आले आहेत पण ओळख न दाखवणार्‍यांचे अनुभव जास्त आहेत असे वाटते. इथे स्थायिक असलेले काही भारतीय माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मागच्या महिन्यात माझ्याबरोबर काम करणार्‍या एका उत्तरप्रदेशातील युवकाच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी इथल्या एका स्नेह्यांनी त्याला रात्रीत तिकीट काढून देउन जाण्यासाठी सर्व मदत केली. असे अनुभवही येतात.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

माझे अनुभव

लिखाळ राव, माझे संमिश्र अनुभव नक्किच लिहावेसे वाटले. चांगले सुद्धा आहेत आणि तुम्ही म्हणत आहात असे हि आहेत. सविस्तर लिहिनच. माझे स्पष्ट मत विचाराल तर ओळख न दाखवणारे भारतीय आहेत त्यांच्यात एक संमिश्र भावना असते. एक प्रकारचा माज आणि एक प्रकारचा न्युनगंड असे मिश्रण असते. मला स्वतःला चांगले अनुभव जास्त आहेत वा माझा पाहण्याचा दृष्टिकोन तसा असावा किंवा मला भेटलेले लोक चांगले असावेत. असो जमल तर सविस्तर लिहिनच...





मराठीत लिहा. वापरा.

लिखाळ ...

तुम्ही कर्म करत राहा. एक दिवस नक्कीच सगळे तुम्हाला तुमच्या ह्या विशिष्ट सवयीमुळे ओळखायला लागतील आणि तुम्हाला टाळण्याऐवजी तुमच्याकडे पाहून स्मित करतील.असे करत असताना एखादे वेळी आपली जीवनसंगिनी देखिल आपल्याला मिळेल अशा शुभेच्छा देतोय.

मजकूर संपादित. व्यक्तिगत रोखाचा मजकूर काढून टाकण्यात येत आहे. अश्या प्रतिसादासाठी कृपया खरडवहीचा वापर करावा. -- उपसंपादक.

माझा अनुभव

लिखाळांप्रमाणे मला बरेचदा अनुभव आला आहे. इंडियन स्टोर किंवा विमानतळावर भेटणारे आणि काही गरज लागली म्हणून किंवा प्रवासात वेळ जावा म्हणून संभाषण वाढवणारे अशा लोकांना सोडून देऊ. त्याव्यतिरिक्त इतरत्र दिसणारे भारतीय लोक एकमेकांकडे बघतात पण हसत नाहीत असा अनुभव येतो.

जे अनोळखी लोक ओळख दाखवण्यास नकार देतात त्यांच्यात चाणाक्यांनी म्हटल्याप्रमाणे मी ही दोन प्रकार पाहिले आहेत आढ्यता किंवा न्यूनगंड.

भारतीय

आपण भारतात असताना दुसरा अनोळखी भारतीय भेटला असता त्याला हसून अभिवादन करता का? अनोळखी लोकांना हसुन अभिवादन करण्याची प्रथा आपल्याकडे तरी नाही. प्रचंड लोकसंख्या असल्याने कुणा कुणाला हसून नमस्ते म्हणणार? ह्या पेचामुळे ही संकल्पना आपल्याकडे रुढ झाली नसावी.. तेंव्हा हेच भारतीय जेव्हा परदेशात भेटतात तेंव्हा त्यांनी एकदम आपला मूळ स्वभाव सोडून अभिवादन करावे अशी अपेक्षा तरी कशी करणार? .. बाकी लिखाळराव स्विट्झरलँड/ ऍमस्टरडॅम इथल्या गमती जमती देखिल लिहा आम्हाला वाचायला आवडतील.. ऍमस्टरडॅमधील गणीकांच्या बाजारात एका गणीकेच्या दुकानात आपले चक्क आपले गणपती बाप्पा बसलेले बघून धक्काच बसला होता!

कल्पना नाही..

...काही गांजाच्या दुकानांच्या भिंतीवर देखिल सजावटीसाठी गणपती काढलेले देखिल दिसले... एकंदरीत तिथल्या लोकांना 'एलिफंट गॉड' चे अप्रुप आहे असे वाटते! .. अनिवासी भारतीयांना काय वाटते हे तिथे स्थायिक झालेले जर कोणी असेल तर सांगू शकेल.

लोभसवाणा!

एकंदरीत तिथल्या लोकांना 'एलिफंट गॉड' चे अप्रुप आहे असे वाटते! ..

आपला बाप्पा आहेच मुळी लोभसवाणा! सर्वांनाच आवडतो...;)

आपला,
(लालबागच्या राजाचा भक्त) तात्या.

एक कारण?

सध्या अमेरिकेतील काही भारतीय मंडळींमध्ये quixtar या मल्टी-लेव्हल मार्केटिंग 'बिझनेस' चे भूत सवार झाले आहे. त्याचे स्वरूप भारतातील ऍम्-वे सारखे आहे. त्या उद्योगाविषयी-- तो चांगला आहे की वाईट याविषयी मला कोणतेही भाष्य करायचे नाही. तो चांगला/वाईट कसाही असला तरी माझ्यात काहीही फरक पडत नाही.

मात्र आपल्या जाळ्यात (नेटवर्क या अर्थी) जास्तीत जास्त लोक यावेत म्हणून quixtar मधील लोक कधीकधी खरोखरच हैराण करतात. वॉलमार्ट/मॉल यासारख्या ठिकाणी शनीवार-रविवारी अनेकदा ही मंडळी हजर असतात. कोणी भारतीय दिसला की विनाकारण ओळख काढून 'मी तुम्हाला कुठेतरी बघितले आहे' अशा अर्थाचे वाक्य बोलायचे आणि संभाषणाला सुरवात करायची. आपला भ्रमणध्वनी क्रमांक घ्यायचा आणि रविवारी रात्री ८ वाजता 'तुम्ही 'बिझनेस' करू इच्छिता का' असा प्रश्न विचारत फोन करायचा! कधीकधी अशी मंडळी खूपच मागे लागल्यासारखे करतात.

मी भारतीयांचे खूप जास्त प्रमाण आहे अशा ठिकाणी राहत नसल्यामुळे मला तो अनुभव सुदैवाने आतापर्यंत एकदाच आला आहे . पण न्यू जर्सी/कॅलिफोर्निया यासारख्या ठिकाणी राहणार्‍या माझ्या मित्रांना तो अनुभव अनेकदा आला आहे. मी त्या प्रकाराविषयी इतके ऐकले आहे की कोणी अनोळखी भारतीय बोलायला आला किंवा हसला तर तो माणूस चांगल्या हेतूने तसे करत असला तरी एक शंकेचा किडा मात्र डोक्यात वळवळतोच! कशावरून तो मला quixtar साठी कॉन्टॅक्ट करत नसेल!

भारतीय लोक एकमेकांना ओळख न दाखविण्याचे अलिकडच्या काळातील हे एक कारण असू शकेल काय?

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

मराठी बोलू नको म्हणे :(

बार्किंग(यु,के) येथे एका मॉल मध्ये आम्ही फिरायला गेलो. विंडो शॉपिंग करताना एका बाईने (काकूंनी) "बहुतेक भारतातली आहे असं वाटतयं" असं छान मराठीत म्हटलं. मी बोलावं म्हणून पुढे जाईपर्यंत त्यांच्या बरोबरच्या एकाने "डोण्ट टॉक ईन मराठी हिअर" असं म्हटलं.

आपल्याकडलं पब्लिक आपल्याच लोकांशी बोलायच्या आधी विचार करताना दिसतात. वाईट वाटतं पण काही करू शकत नाही.

आज्जी आजोबा मंडळी मात्र एकदा हसून पाहिलं की निवांत गप्पा मारतात. कोण कुठले याची चौकशी करतात. पण त्यांची पुढची पिढी आली की एकदम चपापुन बसतात. "येस् लेट्स् गो" असं म्हणून निघतात. थोडं पुढे गेल्यावर मागं वळून बघतात. अशावेळी दुरदेशी कोणीतरी आपलं असावं असं वाटून जातं.

पल्लवी

संवाद फोबिया

हे सो कॉल्ड एटिकेट्स,मॅनर्स वगैरे संवादात अडथळा निर्माण करतात.
संवादातून आपले अंतरंग उघडे पडेल कि काय याची भीती.
वाद नको म्हणून संवादच नको.
संवाद आपल्याल कोषातून बाहेत काढतो.पण कोषातून बाहेर पडले कि असुरक्षिततेचे भय. म्हणून संवाद नको अस्तो.
संवाद हा नातं निर्माण करतो. नातं अपेक्षा निर्माण करतात. अपेक्षा निर्माण झाल्या कि अपेक्षाभंगाची भीती. म्हणून संवाद नको.
अनोळखी माणसे बोलण्यात गुंगवून लुबाडतात हे अनेक ठिकाणी वाचले असते,म्हणून भीती.
संवाद आपल्या खाजगीपणात हस्तक्षेप करतो.
थोडक्यात संवाद हा सुसंवादाकडे नेण्याऐवजी विसंवादाकडे नेईल याची भीती.
(संवादी)
प्रकाश घाटपांडे

सुरेख!

घाटपांडेसाहेबांच्या प्रत्येक वाक्याशी सहमत..

अतिशय सुरेख प्रतिसाद,

आपला,
(वादसंवादाशिवाय जगू न शकणारा!) तात्या.

अजून अनुभव नाही...

परदेशात जाण्याचा अजून तरी योग न आल्याने वरील प्रश्नावर नेमके कांही मत देऊ शकत नाही.
पण मराठी पर्यटक इतर ठिकाणी गेल्यावर इतरांचे मराठी बोलणे ऐकल्यास "तुम्ही कोण, कुठचे?" वगैरे चौकशी करतात असे पाहिले आहे. अशा अनेक ओळखी प्रवासातही होतात.
स्मितहास्याबद्दल म्हणाल तर - आपण नेहमी ज्या माणसांना बघतो त्यांच्याकडे फक्त ओळखीचा कटाक्ष टाकतो. स्मित करून "काय, कसं काय?" असं विचारणं आपल्याकडे फारसं प्रचलीत नाही. पण कुणाकडे जाऊन गप्पा छाटायला बंदी नसते. हेच आपले मॅनर्स ...तेच अंगात मुरलेलं असल्याने परदेशातही तसं होत असावं.
परदेशातील इतर देशांची माणसे स्मित करतात याला कारण त्यांना शिकवले गेलेले मॅनर्स् हे होय! नुसते "हाय" म्हणले की झाले.
त्यांच्याकडे औपचारिकता भिनलेली आहे. पण आपल्यासारखे ऊठसूट मित्रांकडे अथवा नातेवाईकांकडे जाणे, अघळपघळ वागणे त्यांच्याकडे चालत नाही. (हे भारतातील एका विविक्षित शहरातही आहे असे ऐकतो;) ह.घ्या.)

कोणते मॅनर्स् चांगले? - आपले का त्यांचे?
आपणही झपाट्याने औपचरिकतेकडे वाटचाल करत आहोत हे मात्र खरे!
हे चांगले की वाईट ठरवणे आपापल्या वर्तनावर अवलंबून आहे.

मिशन स्माइल.

आपण आपले हसत राहावे,कधी तरी लोक स्वत:हून पुढे येऊन बोलतील.परदेशातलं आम्हाला काही माहित नाही,त्यामुळे आमच्यासाठी हा विषय तुम्ही आम्हाला स्मित हास्य केलंय आणि आम्ही मुकाटपणे पुढे चाललोय असं ; )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमेरिका : अनिल अवचट

असेच अनुभव अनिल अवचटांच्या अमेरिका या पुस्तकातही आहेत.

"आमच्या मागे हे कशाला आले इथे आता कडमडायला" वगैरे प्रतिसाद परदेशस्थ भारतीयांच्या चेहर्‍यावर दिसतात असे अवचटांचे म्हणणे आहे.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

आताच ऐकले

पुलंच्या 'पाळीव पक्षी' या लेखात ते इंग्लंड मध्ये प्राणीसंग्रहालयात कावळा पाहतात तो प्रसंग आहे. तो हिंदी कावळा सुद्धा इंग्लंडमधील इखादा भारतीय जसे दुसर्‍याकडे पाहून नपाहिल्यासारखे करतो, तसे पुलंकडे पाहून तोंड फिरवतो :) असे वर्णन आहे !!

--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

हास्य !!!

नमस्कार,
आपण आपले अनुभव मोकळेपणाने सांगितलेत त्याबद्दल सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.

वरिल चर्चेमध्ये वागण्याच्या पाश्चिमात्य पद्धती आणि भारतीय पद्धती तसेच quixtar सारखे प्रकार याबद्दल भाष्य आहे.
मला आलेले अनुभव हे मी राहतो त्या देशात आले आहेतच परंतु जगप्रसिद्ध अशा प्रवासी ठिकाणी, जेथे अनेक देशांतून लोक ते स्थळ पहायला येतात, अशा ठिकाणी सुद्धा आले आहेत. मी राहतो तेथे तरी quixtar सारखा प्रकार नाही. तो अमेरिकेतच असावा असे दिसते. एक वेळ ते जमेस धरु..पण प्रवासी ठिकणी जेथे सर्वच पर्यटक हे निराळ्या देशातून आले आहेत ते सहज समजत असते अशा ठिकाणी सुद्धा नजर चोरणे हे बालीश पणाचे वाटते. याचे कारण समजत नाही.

शिष्टाचारांबद्दल बोलावे तर इथे सुद्धा रस्त्यात प्रत्येक जण एक मेकांकडे पाहून् हसत नाहीच. पण सहलीच्या ठिकाणी अथवा रस्त्या वरुन पळण्याचा व्यायाम करताना, पक्षी निरिक्षणासारख्या छंद जोपासण्याच्या ठिकाणी समानधर्मी लोक स्मितहास्य करतात. भारतीय मात्र हे करु शकत नाहीत याचे वाईट वाटते.

--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

भागो... भूत आया

ओळख तर सोडाच पण भागो इंडिअन्स आ रहे है असे म्हणणारे एक महाभागही पाहिले आहेत.

(अनेक चांगली मंडळीही भेटली आहेत... कधीतरी या विषयावर स्वतंत्रपणे सवड काढून बोलता येईल.)

 
^ वर