कोकणासाठी हवी जलवाहतूक

कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.

कोकण किनारपट्टी आजही पर्यटकांच्या पसंतीचा भाग मानली जाते. कोकणात जाण्यासाठी अनेक पर्याय उलपब्ध आहेत, तरी बोटींमधून प्रवास करण्याची धम्माल कशात नाही, असंही मानलं जातं. वाहतुकीच्या दृष्टीने चांगला असणारा हा पर्याय लवकरात लवकर खुला व्हावा, अशी मागणीही नेहमी केली जाते.

सुमारे पन्नास वर्षांपूवीर् चाकरमान्यांची एकमेव पसंती कोकण बोटीलाच असायची. त्यातूनच ते विजयदुर्ग, देवगड, वेंगुलेर् असा प्रवास करायचे. 1845 च्या सुमारास ब्रिटिशांनी प्रवासी सेवेसाठी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. 1940 ते 1950 च्या सुमारास संत तुकाराम, संत रामदास, अँथोनी अशा बोटी नावारूपाला आल्या होत्या. त्या वेळी प्रवाशांची क्षमता अडीशे ते तीनशेच्या आसपास होती आणि तिकीट अडीच, तीन, चार रुपये असायचं. पुढे बोट उद्योगाला मोठ्या प्रमाणात चलती मिळाली आणि त्यानुसार तिकीट दरही वाढले.

साधारण या बोटीवर तीन डेक असायचे, त्यांचे दर लोअर डेक (12 रु.) अपरडेक (16 रु.), केबीन (40 रु.) असे असायचे. मंुबईतून चाकरमानी याच बोटीने मंुबई ते मालवणचा प्रवास करू लागले. तेव्हा माझगावच्या भाऊच्या धक्क्यावर गदीर् जमायची ती सकाळी 9 वाजताची कोकण बोट पकडण्यासाठी.

बोट सुटताना तीन भोंगे व्हायचे. दुसऱ्या भोंग्याला सर्व प्रवासी बोटीत चढायचे आणि तिसऱ्या भोंग्याला शिडी उचलली जायची. सकाळी 10 वाजता काळेकुट्ट धुरांचे लोट आकाशात सोडत बोट मंुबई बंदर सोडायची. एकदा बोटीत स्थानापन्न झालं की वेगळंच विश्व निर्माण व्हायचं. तिथे गप्पांचे फड रंगत जायचे. जेवण असो की नाश्ता, सर्व जण एकत्र बसून त्याची मजा लुटायचे.

मात्र, रामदास बोट बुडाली ते प्रकरण चांगलंच गाजलं. पुढे बॉम्बे स्टीम कॉपोर्रेशनने रत्नागिरी, चंदावती, इरावती अशा नवीन बोटी ताफ्यात सामील केल्या. ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था त्या वेळी सर्वप्रथम सुरू करण्यात आली. त्याच वषीर् मार्चमध्ये चंदावती बोट मालवणच्या बंदरात रुतून बसली ती कायमचीच. पुढे 1964 साली काही कारणांनी ही कंपनी बंद पडली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गोव्यातील उद्योजक विश्वासराव चौगुले यांच्या स्टीमशिपमार्फतच्या चौगुले बोटसेवा पुन्हा सुरू केली. चौगुले स्टीमशिपने रोहिणी, सरीता, कोकणसेवक बोटी सुरू केल्या. मात्र, या बोटींचं आथिर्क गणित जमेना. त्यातच मालवणात बंदरात रोहिणी बुडाल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागला. नंतर खाजगी उद्योजक पुढे येत नसल्याने या सेवेचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.

मंुबई-गोवा सागरी वाहतूक मोगल लाइन्सच्या अधिपत्याखाली चालवण्यात आली. पण या सेवेत कोकणातील प्रमुख बंदरं वगळण्यात आली. 1988 मध्ये मोगल लाइन्स वाहतूक सेवाही बंद पडली. ब्रिटिशांनी नफ्यात चालवलेली बोटसेवा तोट्यात का आली, याचं कारण अजून लक्षात आलेलं नाही. कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी बोटसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. पर्यटनाच्या दृष्टीने या उद्योगाला चालना मिळू शकतो. ही सेवा पुन्हा एकदा सुरू झाल्यास त्यास प्रवाशांचा नक्कीच प्रतिसाद लाभेल. मात्र, ही सेवा सुरू होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं आहे.

संग्रहित-आंतरजालावरून साभार

लेखनविषय: दुवे:

Comments

कारण

कारण लक्षात आलेले नाही? आश्चर्य आहे. आर्थिक दृष्ट्या किफायतशीर नसणे हे एक मोठे कारण तर आहेच.पण लोकांच्या प्रवासविषयक बदललेल्या सवयी, वाढलेल्या अपेक्षा,वेळेचे महत्त्व यामुळे जलवाहतुकीचा लोकाश्रय कमी झाला. ब्रिटिशांच्या काळात कोंकणामध्ये रस्ते नव्हते. दक्षिण कोंकणात तर रस्तामार्ग (सडक मार्ग) म्हणजे बंगलोर रस्त्याने कोल्हापूरवरून राधानगरी-फोंडा कणकवली या अवघड घाटमार्गे खाली उतरावे लागे. त्याला 'वरची वाट'च म्हणत. थेट एस्टीसुद्धा नसे. दोन-तीनवेळा गाड्या बदलाव्या लागत. आज या सर्व गैरसोयी दूर झाल्या आहेत. त्यामुळेच (आणि वाहनसमृद्धी आल्यामुळेही) कोंकणात जाणार्‍यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि हे लोक रस्तामार्ग पसंत करतात. शिवाय जलवाहतुकीसाठी बंदर हे गाठावेच लागते. ही अधिकची यातायात सोयीस्कर नसते.
पूर्वीचा सीन डोळ्यासमोर आणून पहा. पन्नास-साठ माणसे एका डेक वर झोपली आहेत, काही लोळताहेत, काही ओकताहेत,मुलांची रडारड चाललीय.प्रत्येकाने घरून आणलेल्या जेवणाचा शिळा वास सर्वत्र भरून राहिलाय. आज कोणी असा प्रवास पसंत करेल का? आणि या गैरसोयी टाळून प्रवाश्यांना आरामदायक जलवाहतूक द्यायची तर एखादे लक्झरीलायनरच चालवावे लागेल. त्याचे तिकिट किती पडेल? वेगाचाही प्रश्न आहेच. पूर्वी दक्षिण कोंकणात पोचायला वीस ते चोवीस तास लागत. आज इतका वेळ कोण देईल? हॉवरक्राफ्ट या त्यातल्यात्यात वेगवान जलवाहनाचा (हे वाहन पाण्यापासून काही इंच उंचावरून चालू शकते म्हणून वेग पकडू शकते.) प्रयोगही फसला याचे कारण वेळ आणि चढे तिकीटदर हेच होते.
आणखी एक गोष्ट म्हणजे कोंकणातल्या नद्या ह्या वेगवान्,खळाळत्या असतात. पर्वतावरून खाली उतरून तीस मैलांच्या आत समुद्राला मिळत असतात. त्यांचा ग्रेडिअंट खूप जास्त असतो. त्यात पाऊस प्रचंड. त्यामुळे जमिनीची धूपही प्रचंड होते. तिला गाळाच्या रूपात जमिनीवर पसरायचा अवकाश न मिळता ती थेट समुद्रात जाते. यामुळे खाड्या बनतात,त्या ओहोरतात.त्यांची तोंडे उथळ बनतात आणि त्या नौकानयनास अपात्र आणि अनुपयुक्त ठरतात. खाडीमुखावर असलेली आणि नसलेलीही कित्येक बंदरे आज गाळाने भरून गेली आहेत. तो गाळ उपसणे आणि त्याची विल्हेवाट लावणे (डिस्पोजल) ही एक मोठीच डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे समुद्राची खोली कमी होऊन मोठी जहाजे किनार्‍यालगत येऊ शकत नाहीत. यात भर वाळूमाफियांची. त्यांनी नैसर्गिक वाळू उपसून उपसून किनारे उजाड केले आहेत आणि तिथली जमीन उघडी पडल्यामुळे अधिकच धुपते आहे. आणखी एक अलीकडचे कारण म्हणजे मुंबई,ठाणे कुलाबा(रायगड) जिल्ह्यांत निवासी आणि औद्योगिक उपयोगासाठी जमीन उपलब्ध नाही. ती समुद्रातून मिळवायचा प्रयत्न असतो. समुद्र एके ठिकाणी हटला तरी दुसरीकडे तो आक्रमण करतो. कोंकणात या अशा समुद्री आक्रमणामुळे कित्येक नैसर्गिक किनारे नष्ट होत आहेत.
या सर्व गोष्टी प्रवासी जलवाहतुकीला अनुकूल नाहीत.

पटले नाही

राही यांनी दिलेली कारणे पटली नाहीत. जल वाहतुकीचे अनेक फायदे आहेत, समुद्र मार्गेच नव्हे तर देशांतर्गत प्रवास सुद्धा. पण ते exploit करावे लागतात व लोकांना पटवून द्यावे लागतात. दोनच वर्षा पूर्वी काही कामानिमित्त इंग्लंडला गेलो होतो. माझे काम वालीन्गफोर्ड या जागी होते व मी साधारण चार किमी दूर एका हॉटेल मध्ये राहण्यास होतो. हॉटेल व वालीन्गफोर्ड हैड्रौलिक इंस्टीट्यूट दोन्ही थेम्स नदीच्या किनार्या लगत होती. तर पहिल्या दिवशी सकाळी इंस्टीट्यूट चा शास्त्रज्ञ मला घ्यायला चक्क मोटार बोटीतून आला. व पुढचे काही दिवस आम्ही दोघे मोटार बोटीतून हॉटेल ते इंस्टीट्यूट प्रवास करत असू. गंगा, ब्रह्मपुत्र, बराक, नर्मदा इत्यादी नद्यां मधून व कालव्यान मधून जल वाहतुकीचे चांगले potential आहे. पण आपण कधी त्या बाबत गांभीर्याने विचारच केला नाही. आपल्या देशात जल वाहतुकी बाबत औदासिन्यच आहे.

लंडन ते पेरीस थेट विमानाने, समुद्र खालून जाणार्या भुयारातून (chunnel) ट्रेनने किंवा त्याच भुयारातून आपल्या चारचाकीने जाता येते. तरी सुद्धा अनेक लोक डोवर ते कॅले समुद्र मार्गाने (फेरी) प्रवास पसंत करतात. काही वर्षां पूर्वी मी पण तसे केले. समुद्र प्रवासाची गम्मत म्हणून. अन्यथा समुद्र प्रवास आपल्याला कधी अनुभवायला मिळणार ? म्हणून. पण कामा निमित्त प्रवास करणाऱ्या करता पण फेरीतून जाण्याचे काही फायदे असतात. सगळ्यात मुख्य, स्थानिक प्रवासा करता आपले वाहन नेता येते. कोकण गोवा इत्यादी ठिकाणी गेल्यावर स्थानिक प्रवासा करता खूप खर्च येतो. मुंबई कोकण आपली चारचाकी चालवत नेणे फार सुखकर नसते. बोट सेवा सुरु करून त्यात आपली चारचाकी किंवा दुचाकी नेण्याची सोय केल्यास अनेक लोक बोटीने जाणे पसंत करतील. पण बोट मात्र पहिल्या पेक्षा जास्त सुखकर असायला हवी. विशेषकरून स्वच्छता गृहे, दोन्ही बाजूने बंदरापर्यंत पोहोचण्याची सोय, आपले वाहन बोटीत चढविण्याची सोय, इत्यादी.

सहमत

आपल्या देशात जल वाहतुकी बाबत औदासिन्यच आहे.

हे मात्र खरे आहे. अहो कोकण जरा विसरा, पण पुण्यासारख्या शहरात जर योग्य नियोजन केले तर वाहतुकीचा एक उत्तम पर्याय आहे. खरे औदासिन्य राजकिय इच्छाशक्तिमध्ये आहे. अन्यथा आज सुद्धा भारतात काही ठिकाणे अशी आहेत जिथे जल वाहतूक हा सर्वात योग्य पर्याय आहे. किंबहुना दुसरा पर्यायच नाही.
भारताला एवढी मोठी किनार पट्टी आहे. पण त्याचा म्हणावा तेवढा फायदा आपण घेतच नाही. त्याचा फायदा पाकिस्तानने घेतला हल्ला करायला.
शांधाय शहरात पुण्याप्रमाणेच मधुन नदी वाहते आणि त्याचा जलवाहतुकीसाठी योग्य वापर केला आहे. फेरीचे तिकिट फक्त २ युआन आहे.

देशांतर्गत वाहतूक

'मूळ लेख कोंकणातल्या किनारी वाहतुकीविषयी मुख्यत्वाने होता म्हणून त्याविषयी लिहिले. नद्या-कालव्यांमधून प्रवासी/मालवाहतूक उत्तरभारतात विशेषतः पूर्व उत्तरप्रदेश,बिहार,झारखंड,बंगालच्या मैदानी प्रदेशात,जिथे नद्या संथ होतात,तिथे मोठ्या प्रमाणावर चालते. गंगा नदी ही तिच्या मुखापासून आतमध्ये आठशे मैलांपर्यंत नॅविगेबल आहे. सत्यत: (इन फॅक्ट) हलदिया ते अलाहाबाद हा एक हजार कि.मी.चा मार्ग 'राष्ट्रीय जलमार्ग'(नॅशनल वॉटर वे) म्हणून घोषित झाला आहे. तिथल्या मोठ्या प्रमाणावरच्या जलवहातुकीची कल्पना आपल्याला बंगाली वातावरणातले सिनेमा बघून येते. तसेच महिन्यातून एकदोनदा नावा उलटून्/बुडून झालेल्या जीवितहानीच्या बातम्यांमुळेही येते.या नद्यांना हिमालयातील बर्फ वितळण्यामुळे उन्हाळयातही पाणी असते, त्या बारमाही असतात.
महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण दक्षिण भारतातल्याही नद्या सुमारे आठ महिने कोरड्याठाक असतात. पुण्यातल्या मुळामुठेमधून जलवाहतूक करण्याची कल्पना फारच विनोदी वाटली. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर जागोजागी, अगदी मिळेल त्या ठिकाणी लघु,मध्यम,मोठी धरणे,बांध घालून पाणी अडवले गेले आहे. या धरणांच्या पुढील भागात नदीचे पात्र फारच रोडावते. मात्र या धरणांच्या जलाशयात बोटिंग्,रोइंग्,अशा पर्यटनानुकूल सोयी तर असतातच पण फेरी,मोटरलाँच द्वारे प्रवासी जल वाहतूकही चालते. पुण्यामध्ये बंड गार्डन,इंद्रायणीकाठी देहू येथे अशी बोटिंगची सोय आहे.पानशेत जलाशयातही आहे असे वाटते.मुंबईत राष्ट्रीय उद्यानात आहे,ठाण्याच्या मासुंदा तलावात आहे, सोलापूरच्या छोट्याश्या सिद्धेश्वर तलावातही आहे. मुंबई मुख्य भूमी आणि मढ बेट या मध्ये 'तरी' द्वारे प्रवासी वाहतूक आणि हलकी मालवाहतूकही चालते. कोंकणामध्येही अनेक ठिकाणी तलावांमधून अशा सोयी पर्यटकांना अलीकडे मिळू लागल्या आहेत. छोट्या होड्यांद्वारे प्रवासी वाहतूक तर अनादि काळापासून सुरू होती. उलट ती आता बंद पडते आहे कारण नदीनाल्यांवर पूल झाल्याने रस्तेवाहतूक सोपी झाली आहे. या सगळ्याला केरळ हे राज्य अपवाद आहे. तिथे अगणित आणि तुलनेने रुंद आणि खोल खाड्या असल्याने तिथे पर्यटनसापेक्ष आणि कमर्शिअल अशी जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. तसे तर कश्मीरच्या दल लेक मध्ये छोटी छोटी मुले आपापले शिकारे वल्हवीत शाळेला जातात किंवा त्यांच्या आया आजूबाजूच्या चार-पाच मुलांना शिकार्‍यात घालून स्वतः वल्हवीत शाळेत सोडतात आणि येताना तलावातच बाजारहाट उरकून घेतात ते दृश्य रमणीय असते. न्यू यॉर्क च्या हडसन नदीतली प्रवासी फेरी वाहतूक फार कमी वापरली जाते. बहुतेक सर्व वाहतूक हॉलंड आणि लिंकन या दोन टनेल द्वारेच चालते. किफायतशीरपणा,कमी वेळ आणि कमी गैरसोय या मुद्द्यांना प्राधान्य देऊनच जलवाहतुकीकडे पाहिले पाहिजे.

आनंद आहे

पुण्यातल्या मुळामुठेमधून जलवाहतूक करण्याची कल्पना फारच विनोदी वाटली.

आनंद आहे. सध्या विनोदी वाटली तरी हरकत नाही. पण वर लिहिल्या प्रमाणे योग्य नियोजन केल्यास एक चांगला पर्याय आहे. याच पात्रांच्या बाजूने सध्या वाहतूक सुरु आहे. जी पावसाळ्यात थोडे पाणी वाढल्यास बंद होते. हेच पाणी बारमाही साठवणे हि अशक्य गोष्ट नाही. अर्थात तुम्हाला विनोद वाटत असल्यास ठिक आहे. आपण काही उदाहरणे दिली आहेत ती चांगली आहेत. जल वाहतूक आणि बाजारपेठ यांची सांगड घातल्यास सर्वांचा फायदा होऊ शकतो. जलवाहतूका हा काही पुर्णपणे मोठा पर्याय नाही हे मान्य आहे. पण पुढच्या अनेक दशकांचा विचार करुन आत्ताच पाऊले उचलल्यास एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
जल व्यवस्थापन, त्या संबंधीत प्रकल्प आणि त्यामधले भ्रष्टाचार पाहता हे ही लक्षात येईल की बहुजनांचे लक्ष नसलेल्या क्षेत्राचा गैरफायदा घेतला जात आहे. जर धरण बांधून पाणी अडवले जाऊ शकते तर अश्या प्रकारे एखाद्या शहरात जिथे नदी मधोमध वाहते तिथे पाण्याचा साठा करणे अशक्य आहे? जल वाहतुक सुरु करुन रस्त्यावर टोल लावल्यास जल वाहतुकीचा पर्याय नक्कीच लोकप्रिय होईल.
भारतातल्य बहुसंख्य नद्या गटारे झाल्यामुळे त्या निरुपयोगी आहेत हे जनमानस तयार झले आहे.

अर्थकारण नीट समजले नाही

नदीच्या पात्राच्या समांतर दोन्ही बाजूने रस्ते असले, आणि अधूनमधून पात्र ओलांडणारे पूलही असले, तर नदीत पाणी साठवून पात्रातून नावा चालवण्याचे अर्थकारण नीट समजले नाही.

ज्या ठिकाणी आधीच बारामाही पाणी आहे, त्या ठिकाणी पूल/रस्ते बांधण्यापूर्वी नावा किफायतशीर असू शकतात. अनेक देशांत फेरीबोट-मार्ग दिसतात. परंतु रस्ते-पूल बांधल्यानंतर हा नाविक मार्ग साधारणपणे बंद पडतो. हे जपान वा यू.एस वा युरोपातच नव्हे, भारतातही झाले आहे. उदाहरणार्थ आगशी-कुठ्ठाळी पूल बांधल्यानंतर तिथली फेरीबोट बंद पडली.

गोव्याच्या खाड्यांमध्ये खाण-मालवाहातुकीकरिता नावा किफायतशीर आहेत. (मांडवी आणि जुवारी नद्यांच्या पात्रातील खार्‍या पाण्याचा भाग.) या खाड्या बारामाही खार्‍या पाण्याने भरलेल्या असल्या, तरी इंधनाच्या दृष्टीने किफायतशीर वाहातुक भरती-ओहटीवर अवलंबून असते. शिवाय किफायतशीर नावा त्या मानाने वेगवान नसतात. माणसांची आणि बहुतेक मालाची वाहातुक खाड्यांशी समांतर असलेल्या रस्त्यांवरूनच मोठ्या प्रमाणात होते.

पुणे

पुण्यात सध्या वाहनांची संख्या आणि रस्त्यांची रुंदी पाहता आहेत ते रस्ते रुंद करणे फारसे फायदेशीर दिसत नाही. त्यामुळे हा पर्याय पुढे येऊ शकतो.

असहमत

>>बोटींमधून प्रवास करण्याची धम्माल कशात नाही

याबाबत असहमत आहे. किंबहुना बोटीतून (समुद्रातून) प्रवास करण्यात मजा आहे हेच मान्य नाही. आपल्याला तर बुवा मळमळून ......

ह्या लेखा मागचा उद्देश च कळला नाही

ह्या लेखा मागचा उद्देश च कळला नाही. लेखक विसरले असावेत की ते भारत नावाच्या देशात रहातात. इथे तर मुलभुत सुविधा नाहीत आणि होण्याची शक्यता नाही. निम्मा देश अर्धपोटी झोपतो. तिथे लेखकाची हि अपेक्षा अगदीच भाबडी आहे. कोकणात जल वाहतुक होण्या आधी PMT सुधरु दे, आहेत ते रस्ते थोडे बरे होउ देत. गरीबाला अन्न आणि ऑषध उपचार मिळुदे. राज्यकर्ते तुरुंगात जाउ दे.

इथे काहीही होणार नाही. आहे त्याच्यात सुख माना.

निराशावाद

कोकणात जल वाहतुक होण्या आधी PMT सुधरु दे, आहेत ते रस्ते थोडे बरे होउ देत. गरीबाला अन्न आणि ऑषध उपचार मिळुदे. राज्यकर्ते तुरुंगात जाउ दे.

इथे काहीही होणार नाही. आहे त्याच्यात सुख माना.
हसावे की रडावे? की रडतारडता हसावे? की हसताहसता रडावे? 'ठेविले अनंते' ही भूमिका, दैववाद आणि 'इथे काहीही होणार नाही' हा अमर विश्वास यांनी भारताचे जितके नुकसान केले आहे, तितके ब्रिटिशांनीही केलेले नाही.

मालवाहतूकदेखिल

लेख आवडला.

मुंबई-गोवा महामार्ग तसेच कोकण रेल्वे हे दोन्ही कोकणाच्या मध्यभागातून जात असल्यामुळे, बंदराकडील गावांत जाण्यास थोडे अडचणीचेच पडते. पूर्वी अंतुले मुख्यमंत्री असताना रेवस-रेडी सागरी महामार्गाचा विचार चालला होता. ते मुख्यमंत्री पदावरून जाताच तो विचारदेखिल बारगळला!

परंतु केवळ प्रवासी वाहतूकीवर अवलंबून न राहता मालवाहतुकीचादेखिल विचार केला, तर प्रकल्प फायदेशीर होईल असे वाटते.

सुदैवाने, मुंबईच्या पूर्व तसेच पश्चिम किनार्‍यावरून जलवाहतूक सुरू करण्याचा विचार सध्या सरकारपातळीवरून जोराने चालला आहे, ही समाधानाची बाब आहे.

 
^ वर