वॉटर किट वापरून कार चालवणारा पाकिस्तानचा "रमर पिल्ले"!

पाला पाचोळा, जडी - बुटी सारख्या वनस्पतीजन्य वस्तूंचा वापर करून जगातील कुठल्याही प्रकारचा असाध्य रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो याबद्दल तुम्ही चुकून जरी असहमती दर्शवली तरी या भानगडीत मी का पडलो असे तुम्हाला वाटू लागेल व तसले विधान केल्याबद्दल पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर येईल. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपल्या महान देशाची इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून चुटकीसरशी सुटू शकते यावर 1990च्या दशकात अनेकानी विश्वास ठेवला होता व या वनस्पती इंधनाचा महान संशोधक, केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे अनेकांच्या आठवणीत असेल.

हात लावीन तेथे सोनं याच तोर्‍यात व हर्बल फ्युएल हे परीस सापडल्यासारखे रमर पिल्ले मनसुबे रचत होता. 10 -15 रुपयात 4 -5 लिटर पेट्रोलएवढी ऊर्जा त्याचे हर्बल फ्युएल देऊ शकते या त्याच्या प्रात्यक्षिकेसहित केलेल्या दाव्यावर भारतीय वैज्ञानिकांच्या प्रचंड क्षमतेवर विश्वास ठेवणार्‍यासकट आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थेतील काही अभियंते, व मुख्यत्वेकरून तमिळ अस्मितेचे पाठिराखे व केंद्र सरकारच्या विज्ञान - तंत्रज्ञान खात्यातील टेक्नोक्रॅट्स यांना या संशोधनाने अक्षरश: वेड लावले होते. शेवटी हा दावा खोटा होता, ती एक फसवणूक होती व जे हर्बल फ्युएल होते त्यात गुप्तपणे पेट्रोल मिसळले जात होते. या गोष्टी कळल्यानंतर मामला थंड झाला. परंतु अलिकडे पुन्हा एकदा रमर पिल्ले यानी आणखी एक बायोफ्युएल या पर्यायी इंधनाचा दावा केला आहे. व त्याचे पेटंटही त्याने घेतले आहे.

परंतु अशा प्रकारचे अचरट दावे करणारे फक्त आपल्या देशातच आहेत व इतर देशात सर्व जण बुद्धी प्रामाण्यवादी आहेत असेही समजण्याचे कारण नाही. कारण पाकिस्तानातील आपले बांधवसुद्धा अशाच प्रकारच्या फसवणुकीला बळी पडत असल्याचा वृत्तांत इतक्यात वाचनात आला. एक मात्र खरे की अशा प्रकारचे चित्र विचित्र, विक्षिप्त, अचाट, वेडसर शोधाबद्दलच्या व ज्ञात नैसर्गिक सिद्धांत व नियम यांची खिल्ली उडविणार्‍या 'शास्त्रज्ञां'च्या दाव्यांच्या हकिकतीबद्दल वाचताना क्षणभर करमणूक व या समाजाचे काय होणार असे उसासे टाकण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीही नसते.

आजकाल या तथाकथित शास्त्रज्ञांना वैज्ञानिक प्रबंध लेखन, विशेषज्ञांकडून प्रबंधातील दाव्यांची तपासणी, प्रबंध प्रसिद्धी, प्रयोगाची पुनरावृत्तीक्षमता इत्यादी 'फालतू ' गोष्टींसाठी सवड व वेळ नसल्यामुळे ते थेट टीव्हीसारख्या माध्यमांतून जे काही दावे करायची आहेत ते दावे प्रेक्षकासमोर करत आहेत.

आघा वखार अहमद या पाकिस्तानी अभियंत्याने आपल्या वॉटर किटचे प्रात्यक्षिक व त्याबद्दलची इतर माहिती टीव्हीवरच केल्यामुळे त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. दर वर्षी 1400 कोटी डॉलर्सची बचत करू शकणार्‍या त्याच्या वॉटर किटचे कौतुक होऊ लागले. पाकिस्तानच्या पार्लिमेंटमध्येसुद्धा याची चर्चा झाली. बहुतेक सगळे भारावल्यासारखे विधानं करत होते. डॉ. परवेझ हूड्भॉयसारख्या वैज्ञानिकांनी या दाव्यातील फोलपणा उघड केला तरी त्याचा उपयोग झाला नाही. उष्णगतिकीच्या दुसर्‍या नियमाचे कशा प्रकारे उल्लंघन होत आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्नही त्याने केला. नेचर या साप्ताहिकात पाण्यापासून इंधन कसे शक्य नाही याबद्दलच्या लेखाचाही काही उपयोग होत नाही. परंतु सगळे पालथ्या घड्यावर पाणी! कारण हा विषय आता पाकिस्तान अस्मितेचा मामला झाला होता! व कुणाच्याही अस्मितेबद्दल शंका घेणे हे आता महापातक समजले जात आहे.

वखार अहमदच्या दाव्यानंतर महंमद कमर खान या अभियंत्यानेसुद्धा हायड्रोलिसिस किट वापरून पाण्याचा वापर करून कार इंजिन चालवता येते, असा दावा केला आहे.

अशा प्रकारच्या पोकळ दाव्यांत नेहमीच आपला देश आघाडीवर असतो. गंगा मॉंचे पवित्र जल + गोमातेचे मूत्र + वेदोक्त मंत्रपठण एवढ्या गुंतवणुकीवरून आपण 500 प्रवाश्यांना घेऊन जाऊ शकणार्‍या A380 सुपरजंबो एअरबसने किंवा नुकत्याच एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झालेल्या बोइंग 787 ड्रीमलायनरने न्यूयॉर्क ते दिल्ली हा प्रवास सहजपणे करू शकतो. परंतु दुर्दैवाने येथेही पाकींने आपल्यावर कुरघोडी केली! हे काही ठीक झाले नाही!

Comments

ही शुड गेट ओल द नोबेल प्राइझेस इन द वर्ल्ड

एक पाकिस्तानी वैज्ञानिक अता उर्रहमान त्रासून उपरोधिकपणे म्हणतात, 'ही शुड गेट ओल द नोबेल प्राइझेस इन द वर्ल्ड' तर तिथल्या अणुबॉम्बाचा जनक डॉ. अब्दुल क़दीर खान म्हणतो, 'कोई फ्रॉड नहीं.'

मस्त!

मस्त बातमी ;-)

दुर्दैवाने येथेही पाकींने आपल्यावर कुरघोडी केली! हे काही ठीक झाले नाही!

अगदी अगदी! :-)

जगी हा खास वेड्यांचा पसारा, मांडला सारा

सकाळ वाचकांना यात नवीन काहीच नाही. मागच्याच महिन्यात एका व्यक्तीने पेटंट घेतल्याची बातमी आली होती - कारच्या बट्रीतील विजेने पाण्याचे विघट्न करायचे, त्यातील हायड्रोजन पेट्रोल मधे मिसळला कि गाडी एक लिटर वर पन्नास किमि चालते व बट्री परत रीचार्ज होतेच. म्हणजे थोडक्यात एक लिटर पेट्रोल वर पन्नास किमि गाडी चालते. दोन वर्षां पूर्वी कोणा राजा मराठे यांनी क्रुत्रिम पाऊस पाडण्याची सोप्पी पध्दत सांगितली होती. एका तंदूर सद्रुश भट्टीत थोडे मीठ व नौसादर टाकावयाचे, कि धुरा बरोबर ते ढगात पोहोचून क्रुत्रिम पाऊस पडेल. अनेकांनी तसे केले व पाऊस पडल्यची ग्वाही दिली. सकाळ ने हा "प्रयोग" करण्या करता एक फौन्डेशन पण स्थापले होते. मागच्या महिन्यात तर चक्क "मराठी विज्ञान परिषद" यांनी हा "प्रयोग" फर्गुसन टेकडी वर केला. Indian Institute of Tropical Meteorology मधले शास्त्रज्ञ मूर्खच की, जे सिल्वर आयोडाईड सारख्या महागड्या द्रव्यांचे फव्वारणी विमानातून थेट ढगात करण्या करता पैसे खर्च करतात. त्या आधी कोणा अर्थ विद्वानाने कोणतही कर न आकारता देशाचा गाडा चालविण्याची थियरी मांडली होती. असे अनेक "क्रान्तीकारी शोध" सकाळ आपल्या वाचकां पर्यंत सारखेच पोहोचवीत असतो.

कसली हसते आहे :)

मस्त बातमी आहे खरच :)

बाबौ!

विडीयो बघून डोकं दुखायलंय! काय लोकं, काय मिडीया, धन्य आहे तो देश. आररारर...
_/\_

इतकं

इतकं कमी लेखू नका. अशा बाबतीत भारत कधीही आख्ख्य जगाला मागं टाकू शकतो ह्यावर आपला तर बुवा विश्वास आहे.
एखाद्या लढाईत हरलो म्हणून काय, सर्वात पुढे आम्हीच असणार शेवटी, हे नक्की.

 
^ वर