दोन चित्रे

पहिले चित्र अमेरिकेतील शिकागो इथे घेतलेले आहे. शिकागोला भेट दिलेल्यांना शिकागो ट्रिब्युनची इमारत ओळखीची असेलच. शिकागोहुन प्रसिद्ध होणारे शिकागो ट्रिब्युन ह्या वर्तमानपत्रच्या मुख्य इमारतीवरच्या भव्य पाटीमधून 'शिकागो' ही अक्षरे निवडून ते चित्रात वापरली आहेत.

शिकागो ट्रिब्यूनच्या मुख्य इमारतीवरील पाटी

दुसरे चित्र अहे कॅलिफोर्नियाततील वाइन निर्मितीसाठी जगप्रसिद्ध 'नापा व्हॅली' इथले आहे. तिथल्या भौगोलिक वैशिष्ठ्यांमुळे हा प्रांत वाइन उत्पादकांसाठी फार महत्वाचा समजला जातो. इथे बनवली जाणारी वाइन स्थान महात्म्यामुळे उच्च प्रतीची समजली जाते. तिथल्या एका वाइनरीच्या प्रवेशद्वाराचे घेतलेले हे चित्र आहे. प्रवेशद्वार, रंगसंगती, भिंतींवर चढवलेली हिरवळ, खिडक्या ह्या टुमदारपणामुळे हे चित्र काढावेसे वाटले.

नापा व्हॅली

(चित्रांवर क्लिक करून स्लाइडशो कार्यान्वित करता येईल. -- व्यवस्थापन )

लेखनविषय: दुवे:

Comments

दोन्ही चित्रे आवडली, शिकागोचे त्यातल्या त्यात अधिक

दोन्ही चित्रे आवडली, शिकागोचे त्यातल्या त्यात अधिक.

"शिकागो" चित्र माझ्या मते अधिक कलात्मक, चित्रकाराकडून माझ्याकडे काही संवाद साधणारे, धोका पत्करणारे (edgy) वाटले.

दुसरे चित्र तांत्रिकदृष्ट्या उत्तम आहे. ग्रीटिंग कार्डवर छापावे इतके सुबक आहे. परंतु माझ्या दृष्टीने विस्मरणीय आहे.

दुसरे

मला दुसरे आवडले.

पहिले, दुसरे

मलाही दुसरा फोटो आवडला कारण तेथे एखादी संध्याकाळ घालवावी असे वाटले पण पहिला फोटो लक्षात राहिला (अक्षरांची ठेवण ओळखीची असल्याने) धनंजय यांनी सांगितलेले आवडले.

पहिला फोटो किंचित न आवडण्याचे कारण तो शिकागो या नावडत्या शहरातील आहे हे ही असू शकते. ;-)

पर्यायी शब्द

edgy ला पर्यायी शब्द आव्हानात्मक किंवा प्रभावी अधिक अचूक ठरेल का?
फोटो काढण्यात "धोका" पत्करण्यासारखे काय आहे हे समजले नाही.

धोके

पहिल्या चित्रात धोके अनेक आहेत.
निव्वळ आशयाबाबत
(१) कळकट रंगसंगती नयनमनोहर नाही. सुबक रंगोटी केलेला चेहरा कित्येक जाहिरातींत दिसतो. पण डोळ्यांत चिपाडे सुकलेल्या बाईचा चेहरा जाहिरातीत नव्हे, तर त्रासदायक संवाद साधणार्‍या चित्रकाराकडून आपल्याला दिसतो.
तांत्रिक/आशयाबाबत धोके :
(२) ट्रिब्यूनच्या आर्ट-डेको (उभ्या मजबूत रेषा भरपूर) इमारतीच्या मागे मॉडर्न शैलीची (चौकोन-चौकोन, पण उभ्या किंवा आडव्या रेषा मजबूत नाहीत) इमारत घेणे. या दोन शैली भूमिती/सौंदर्याच्या दृष्टीने परस्परपूरक नाहीत. परस्परपूर्ततेमुळे डोळ्यांना जो आराम मिळाला असता, तो येथे नाही. हा धोका आहे.
(३) चित्र रंगीत ठेवले आहे, कृष्णधवल नव्हे. या चित्रातली पुरोभूमी असलेली ट्रिब्यून इमारत बहुरंगी नाही. तिच्यातील वैशिष्ट्ये रेषा आणि पोत. ही दोन्ही वैशिष्ट्ये कृष्णधवलतेमुळे खुलतात. पिवळा-करडा रंग असल्यामुळे एक उदास अवकळा अधिक कळकट होते, हे खरे आहे. परंतु जवळजवळ तितकी अवकळा नुसत्या करड्या रंगानेदेखील आली असती. (येथपर्यंत धोका नाही, पर्याय तुल्य आहेत.) परंतु ईशान्य कोपर्‍यातल्या इमारतीमधील नारंगी भिंत ही चित्रातील सर्वात उठावदार वस्तू आहे. रंगीतपणामुळे ही भिंत (आणि या गच्च्या) चित्राचा मुख्य विषय होऊ बघतात. परंतु गच्च्यांचे कठडे वेडेवाकडे आहेत, धड उभे नाहीत, धड स्पष्ट-चौकोनी नाहीत. चित्र रंगीत ठेवल्यामुळे या त्रासदायक निर्हेतुक भासणार्‍या भागाला उत्सवमूर्ती बनवलेले आहे. रसिक त्रासाने चाळवण्याऐवजी वैतागून-कंटाळून जाईल, हा धोका पत्करलेला आहे. (कृष्णधवल चित्र असते तर चौरस खिडक्यांची सफेद भिंत ही सर्वात उठावदार झाली असती. नारंगी भिंत आणि गच्च्या पार्श्वभूमीत नाहिशा झाल्या असत्या.)

सारांश : चित्र कंटाळवाणे, कुरूप, डोळ्यांना त्रासदायक आणि निरर्थक अशा वेगवेगळ्या धोक्यांमधून वाट काढते. जे काय आहे ते कुरूपातही-स्वरूप आणि त्रासदायक-पण-विचारप्रवर्तक आहे. म्हणून सहेतुक आणि संवाद-साधणारे आहे.

दुसरे चित्र दूध-कोल्डड्रिंक आहे, तर पहिले चित्र दाट-कडू एस्प्रेसो कॉफीचा घोट आहे.

वा

प्रतिसाद आवडला. मलाही पहिले चित्र एखाद्या अस्वस्थ करणाऱ्या पेंटिंगसारखे वाटले. नवी दुनिया शोधायची म्हणजे धोके पत्करणे -- पत्करणे म्हटले की जाणणे आणि बुजणे आलेच -- आलेच.

+१

धनंजय यांचे विश्लेषण रोचक वाटले. चित्र काढताना इतका खोलवर विचार नव्हता, शुचि ह्यांनी दिलेला कचेरीतला औपचारिकपणा असाच काहिसा विचार अधिक होता.

सर्व प्रतिसादकांचे आभार!

शुद्धिपत्र : आर्टडेको नव्हे तर नियोगॉथिक

शिकागो ट्रिब्यून इमारत "आर्टडेको" शैलीची नसून "नियोगॉथिक" शैलीची आहे.

(या चित्रातल्या इमारतीच्या भागात उभ्या रेषांचे प्राबल्य आहे, ते आहेच.)

अप्रतिम छायाचित्रे - अतिशय सुंदर!!!

दोन्ही चित्रे फार फार आवडली. पहीले कचेरीचा औपचारीकपणा (फॉर्मॅलिटी) दर्शविणारे वाटते. याचे कारण उभ्या रेषांच्या शर्ट ची आठवण असावी.
तर दुसरे छायाचित्र देखील औपचारीक पण डिनर पार्टीचा फॅशनेबल, देखणा औपचारीकपणा दर्शविणारे वाटते.

हे झाले माझे मत.
______________
विशेषतः दुसरे चित्र पाहता कुतूहल या गोष्टीचे वाटते की इतकी सुबक, सुंदर फ्रेम आपण कशी निवडलीत? इमारतीच्या एवढ्या पसार्‍यातून बरोब्बर सौष्ठवपूर्ण फ्रेम निवडणे यामागे काही शास्त्र आहे की ही प्युअर (निव्वळ) कला आहे?

धन्यवाद

कचेरीतला औपचारीकपणा आणि डिनर पार्टी ह्या उपमा अतिशय चपखल वाटल्या. दुसर्‍या चित्रात दोन्ही छपरांचा कोन आणि रुल ऑफ थर्ड्सप्रमाणे येणारी खिडकी ह्या दोन गोष्टींमुळे तशी फ्रेम निवडली.

अभिप्रायाबद्दल अनेक आभार.

शिकागो!

दुसरे छायाचित्र अप्रतिम वावा छान छान आहे. पहिल्या छायाचित्राला क्यारेक्टर आहे म्हणून आवडले.

 
^ वर