मराठीला अभिजात भाषेचा दर्जा असावा काय?
भारतात संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. मराठी ही या भाषांसारखीच समृद्ध भाषा असून तिलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याविषयी अरुण जाखडेंचा "गाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा " हा लेख जून महिन्यात प्रसिद्ध झाला होता.
इंटरनेटवर या विषयावरील लेख येथे वाचा. : http://harinarke.blogspot.com/2012/07/blog-post_5163.html
या लेखानुसार, मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे आणि दरवर्षी २००० मराठी पुस्तके प्रकाशित होतात. या दोन्ही लेखांत पुढील मुद्दे मांडले आहेत.
अभिजात भाषेचे चार निकष आहेत
१. भाषेचे वय १५०० ते २५०० वर्षे असावे.
२. त्या भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य असावे.
३. भाषेने स्वत:च्या मूळ रूपांपासून आजपर्यंत केलेल्या प्रवासात अंतर अथवा खंडितता आली असेल तरीही, भाषेची चौकट कायम असेल आणि ती भाषा बोलणा-यांनी लिखित स्वरूपात फार मोठे साहित्य निर्माण केलेले असले पाहिजे.
४. त्या भाषेत सातत्याने लिखित स्वरूपात साहित्य लिहिलेले असावे. वरील चार निकष मराठी भाषा पूर्ण करत आहे. त्यासाठी समिती ज्या मुद्द्यांचा आधार घेत आहे, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे -
- जुन्नरजवळील नाणे घाटातील शिलालेख, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘महारथी’ असा उल्लेख आढळतो.
- २५०० वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या बौद्ध धर्मग्रंथात असलेला महाराष्ट्राचा उल्लेख.
गाथासप्तशती, महाराष्ट्रातील पुरातन शिलालेख यांकडे पाहता मराठी ही एक पुरातन भाषा असल्याचे स्पष्ट होते. मराठीचा प्रवास अडिच हजार वर्षांचा असून जुनी, मध्य आणि अर्वाचीन मराठी असा झाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर सरकारकडून भाषा विकासासाठी दरवर्षी किमान ५०० कोटी मिळतील.
यावरून प्रश्न पडतात.
१. वरल्या लेखांत म्हणल्याप्रमाणे मराठी अभिजात भाषा आहे काय?
२. अभिजात भाषा म्हणून गणल्या गेलेल्या इतर भाषांना ५०० कोटी रु. रक्कम मिळते काय आणि मिळत असल्यास तिचा विनिमय कसा होतो?
३. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास मराठी संवर्धनासाठी हा निधी कसा वापरता येईल.
Comments
पूरक लिंका...
जालावर एका ठिकाणी खुद्द हरी नरके ह्यांनीच सुरु केलेली चर्चा व त्यांच्या बाजूकडून आक्षेपांना दिली गेलेली उत्तरे वाचायला मिळतील ती इथे :- http://www.mimarathi.net/node/7321
बाकी सदर विषय आवाक्याबाहेरचा आणि अफाट असल्याने वाचनमात्रच राहिन.
--मनोबा
शंका
पहिल्याच निकषात मराठी बसत नाही असे वाटते.
>>सरकारकडून भाषा विकासासाठी दरवर्षी किमान ५०० कोटी मिळतील
भाषा विकास म्हणजे नक्की काय?
परराज्यांत मराठीचा प्रसार/प्रचार करणे? साहित्याला उत्तेजनार्थ पारितोषिके देणे? मराठी शाळा चालवणे?
मराठी विश्वकोश बनवणे? संगणक वापरासाठी मराठी फॉण्ट/सॉफ्टवेअर बनवणे?
की शुद्धलेखनाचे नियम बनवणे ?
नितिन थत्ते
असेच म्हणतो
त्यापेक्षा, संपूर्ण शालेय शिक्षणात मराठी विषय अनिवार्य करा, त्याने मराठी भाषा वाचली तर वाचेल.
अभिजात भाषा?
'अभिजात भाषा', केन्द्र शासन ह्या वा त्या भाषेला 'अभिजात भाषा' असा काही वेगळा दर्जा देते वा देऊ शकते ह्या सगळ्याच गोष्टी मला तरी अश्रुतपूर्व आहेत. इतक्या वर्षात पहिल्यांदाच असे काही वाचले. कोठल्या कायद्यानुसार केन्द्र शासनाला ही वा ती भाषा 'अभिजात' आहे असे प्रशस्तिपत्र देण्याचा अधिकार आहे हे कोणी स्पष्ट करेल काय?
Pending a clarification of the above, मला तरी असे वाटते की असला काही निरर्थक खटाटोप करून ह्या ना त्या भाषागटाचा रोष आपणावर ओढवून घेण्याचा आणि भाषांभाषांमध्ये तेढ लावून देण्याचा अव्यापारेषु व्यापार केन्द्र शासन करीत असेल असे वाटत नाही. अन्य प्रश्नांशी झगडतांना आधीच त्यांची पूर्ण दमछाक होतांना दिसते. ह्या वा त्या भाषेला 'अभिजात' दर्जा देऊन (वा न देऊन) ह्या भा़कड गाईचे दूध काढण्याचा उद्योग कोण करेल?
कोणत्याच भाषेला ती 'अभिजात' आहे म्हणून ५०० कोटि मिळाल्याचे ऐकिवात नाही. 'भाषेला मिळाले' म्हणजे नक्की कोणाला मिळाले? आणि त्या रकमेचे करायचे काय? केन्द्र शासनाच्या वार्षिक अंदाजपत्रकात ही मोठी रक्कम कोणत्या खान्यात सापडेल?
हरि नरके आणि तत्सम उद्योगी लोकांचा नवनवीन वाद सुरू करून स्वतःचे दुकान चालू ठेवण्याचा तर हा मार्ग नाही ना?
(http://www.mimarathi.net/node/7321 येथील चर्चा वाचली. माहीत असलेल्या सत्यस्थितीच्या चर्वितचर्वणापलीकडे काहीहि नवे हाती पडले नाही. वरील साध्यासुध्या प्रश्नांची उत्तरे तेथे दिसली नाहीत.)
जुनी!
भाषा इतकी वर्षे जुनी म्हणजे नक्की काय? भाषांचे प्रवाहित्व आपण मान्य करत असू आणि ठराविक काळातल्या बोलींना विशिष्ट नाव देत असू तर अभिजातता ही संकल्पना मला कळत नाही. एक उदाहरण देतो. बर्याच ठिकाणी मराठी १०व्या शतकाच्या आसपास किंवा नंतर अस्तित्वात आली असे म्हटले जाते. म्हणजे पहिला शिलालेख, ग्रंथलेखन यावरून. पण ही भाषा त्यावेळी आकाशातून पडली नाही. आधी बोलल्या जाणार्या भाषेच्या बदललेल्या रूपाला आपण मराठी असे नाव दिले, परंतु या काळात अचानक बदल होऊन मराठी निर्माण नाही झाली. ह्या प्रदेशातले लोक जी भाषा आधी बोलत त्याला माहाराष्ट्री म्हणत, आता जी बोलतात तिला मराठी म्हणतो. हे सोयीसाठी आपण केलेले नामकरण आहे. मात्र तमिळनाडूमध्ये पूर्वी आणि आताही बोलल्या जाणार्या भाषेलाही तमिळच म्हणतात. दोन्हींमध्ये फरक असला तरीही. आता तिथल्या लोकांनी एकच नाव दिले, म्हणून ती भाषा जुनी, आपण दोन नावे दिली म्हणून आपण आत्ता बोलणारी भाषा नवीन असे कसे म्हणता येऊ शकते? कदाचित यामुळेच आता अभिजाततेचा दर्जा मिळविण्यासाठी माहाराष्ट्री ही मराठीच असे म्हणणे चालू आहे का? मग अशाच प्रकारे शौरसेनी ही हिंदीच, मागधी ही बंगालीच असे म्हणून त्यांना पण अभिजात का म्हणू नये?
बाकी, अभिजात आहे म्हणून अभिजाततेचा दर्जा हवा आहे, की अभिजात म्हटल्यावर ५०० कोटी मिळतात म्हणून?
मिहिर कुलकर्णी
अभिजात भाषा आणि काही अधिक प्रश्न
अभिजात भाषा ही संकल्पना काही नवी नाही किंवा केंद्रसरकारने नवा शोधही लावलेला नाही. माझ्या अल्प माहितीप्रमाणे अभिजात (जुनी) ग्रीक ही भाषा आधुनिक ग्रीकपेक्षा वेगळी असून या जुन्या ग्रीकला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. चू. भू. द्या. घ्या.
याचप्रमाणे गाथासप्तशती हा आधुनिक मराठीत लिहिलेला ग्रंथ नसेल (तसा तो नाहीच) तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात घाई होत असावी पण हे जर खरे असेल तर अन्य भाषांचे काय? आजची कन्नड आणि १५०० वर्षांपूर्वीची कन्नड या सारख्याच आहेत का? जुनी कन्नड, जुनी तमिळ या सद्य कन्नड, तमिळ यांपेक्षा वेगळ्या असाव्या ना?
तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगु भाषांना गेल्या ६-८ वर्षांत हा दर्जा मिळाला आहे. त्यांना मिळालेले ५०० कोटी ते कसे उपयोगात आणतात याची माहिती मिळते का? विशेषतः संस्कृत. या भाषेत नेमकी कोणती नवी निर्मिती होते? का हा निधी नवनिर्मितीसाठी नसून ज्या जुन्या भाषा आणि त्यातील साहित्य आहे त्याच्या संवर्धनासाठी, भाषांतरासाठी किंवा या जुन्या भाषांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा आहे?
येथे लिहिलेल्या माहितीनुसार कलम ३५१ चा उल्लेख आहे पण तो अभिजात दर्जा देण्यासाठी आहे की कसे ते नेमके कळले नाही.
बोलाचीच कढी बोलाचाच भात.
प्राचीन ग्रीक वा प्राचीन लॅटिन ह्या भाषांना classical languages (मराठीमध्ये भाषान्तर - अभिजात भाषा) म्हणतात हे खरे आहे. त्यामधील होमरच्या ईलियडसारख्या काव्यांना greats असे संबोधण्याचीहि पद्धत होती - ऑक्सफर्ड विद्यापीठाचे हे संस्थळ पहा - आणि त्यावरून ’reading classics’, ’he read classics at Cambridge’, 'Classical Tripos' अशा प्रकारचे शब्दप्रयोग निर्माण झाले आहेत. युरोपातील विद्यापीठांमध्ये भौतिक शास्त्रे, उपयोजित विषय (जसे की अभियान्त्रिकी, संगणकशास्त्र) ह्यांना त्यांचे सध्याचे महत्त्व प्राप्त होण्यापूर्वी classics च्या अभ्यासावरच भर असे आणि आयसीएस, Foreign Service, ब्रिटनमधीलच उच्च मुलकी सेवा अशा क्षेत्रांत प्रवेश करू शकणारे बहुशः सर्वजणच classics पढलेले असत. (’येस मिनिस्टर’ मधील Permanent Secretary सर हम्फ्री ऍपल्बीला आपल्या classics पढल्याचा गर्व आहे आणि त्याचा वरिष्ठ म्हणजे मंत्री जिम हॅकर हा त्या तोडीचा नाही हे तो त्याला अनेकदा जाणवून देतो.) आपल्याकडेहि एकेकाळी शाळाकॉलेजात संस्कृत शिकणे, जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर असणे ह्याला असेच महत्त्व होते.
ह्या इतिहासामुळे प्राचीन ग्रीक आणि लॅटिन भाषांना ’classical’ म्हणजे ’अभिजात’ म्हणण्याची सर्वमान्य रूढि आहे. कोणा सरकाराने वा यूनोसारख्या आन्तरराष्ट्रीय संघटनेने हा ’दर्जा’ त्यांना सूचनापत्रक (official notification) काढून ’बहाल’ केलेला नाही.
म्हणूनच वर उपस्थित केलेल्या माझ्या प्रश्नाकडे मी पुनः वळतो. केन्द्र शासनाने संस्कृत, तामील, तेलुगु आणि कन्नड ह्या भाषांना हा ’दर्जा’ दिला आहे म्हणजे नक्की काय केले आहे आणि घटनेच्या कोणत्या कलमानुसार वा कोणत्या कायद्यानुसार केन्द्राला हा अधिकार मिळाला आहे ते स्पष्ट होत नाही. विकिपीडियामधील ह्या माहितीनुसार वृत्तपत्र सूचना विभागाच्या (PIB) ०८/०८/२००६ ह्या दिवशी जाहीर केलेल्या सूचनेनुसार कन्नडला हा दर्जा देण्यात येत असल्याचे मन्त्री अंबिका सोनी ह्यांनी राज्यसभेला सांगितल्याचे दिसते पण ही सूचना अतिशय मोघम शब्दात आहे. त्यात कसल्याहि कायद्याचा इत्यादि उल्लेख नाही. त्यावरून मी असा तर्क करतो की दोन कर्नाटकी खासदारांनी आपण काही कार्य करत आहोत हे आपल्या मतदारांना भासविण्यासाठी कन्नडला ’अभिजात भाषे’चा ’दर्जा’ का मिळत नाही अशी मागणी केली. लोकसभेतील बहुतेक प्रश्नोत्तरे लेखी स्वरूपाची असतात तसे एक मोघम लेखी उत्तर संबंधित मन्त्रालयाने दिले आणि प्रश्नाचा चेंडू पलीकडे कोलवला. (लोकसभेत, राज्यसभेत वा विधिमंडळांमधील बहुतेक ’कार्य’ अशाच स्वरूपाचे असते हे जाणकारांना चांगलेच माहीत आहे.) खासदारांना प्रत्येक अधिवेशनात चर्चेसाठी मिळणार्या हजारो कागदामध्ये ते कोठेतरी दडलेले होते. खासदारांना वार्षिक अंदाजपत्रक वाचायलाहि फुरसत नसते तेथे असले चिटोरे - संबंधित खासदार सोडले तर - कोण वाचणार? त्या दोन खासदारांना दाखवायला आणि वृत्तपत्रात आपले ’कार्य’ छापून आणायला निमित्त मिळाले. प्रत्यक्षात झाले काहीच नाही - बोलाचीच कढी, बोलाचाच भात! (मद्रास उच्च न्यायालयापुढील कोणत्यातरी याचिकेचा निर्णय लागेपर्यंत घोषणेची अंमलबजावणी होणार नाही हेहि त्याच पत्रसूचनेत नोंदविले आहे.)
संस्कृतबाबतचा हा विनोद येथे पहा. ह्या बातमीनुसार २००५ च्या ऑक्टोबरात संस्कृतला ’अभिजात’ भाषा असे घोषित करण्याचा निर्णय केन्द्रीय मन्त्रिमंडळाने घेतला. येथेहि ह्या मागचा कायदा, निर्णयप्रक्रिया असा काहीच उल्लेख नाही. आता प्राचीन ग्रीक इतकीच संस्कृत भाषाहि पहिल्यापासूनच रूढिमान्य ’अभिजात’ भाषा आहे. अचानक २००५ मध्ये तीच स्वत:सिद्ध बाब घोषित करण्याची स्फूर्ति केन्द्रीय मन्त्रिमंडळाला का यावी?
ह्याच बातमीमुळे ५०० कोटींचा उलगडा होतो असे वाटते. केन्द्रीय मन्त्रिमंडळाच्या त्याच बैठकीमध्ये पुणे आणि कोलकाता येथे दोन Indian Institutes of Science Education and Research स्थापन करण्याचा आणि त्यासाठी ५०० कोटि रुपये खर्च करण्याचा निर्णय झाल्याचे बातमीवरून दिसते. अशा संस्था उभारल्या की नाही हे ठाऊक नाही पण एकाच बातमीत आल्यामुळे त्या संस्थांच्या ५०० कोटीचा संस्कृत भाषा अभिजात म्हणून घोषित झाल्याशी बादरायणी संबंध उतावळ्या वीरांनी आणखी तिखटमीठ म्हणून पकडलेला असावा असे वाटते कारण अन्यत्र कोठेच ५०० कोटीला आधार दिसत नाही.
घटनेच्या ३५१व्या कलमात संस्कृतचा हिंदीच्या विकासासाठी उपयोग केला जावा अशा अर्थाची सूचना आहे पण तेथेहि संस्कृत ही ’अभिजात’ भाषा आहे अशा अर्थाचे काहीच मिळत नाही.
मी वर्णिलेला हा देखावा खराच असावा ह्यासाठी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. वरचे चिटोरे लोकसभेत गंभीरपणे घेतले गेले असते तर अन्य राज्यांच्या खासदारांनीहि आपापल्या भाषांसाठी तशीच मागणी लगेच केली असती. शिवसेनेच्या खासदारांनी ’मराठीलाहि हा दर्जा द्या नाहीतर रक्ताचे पाट वाहतील’ अशा भीमदेवी गर्जना केल्या असत्या. ’सामना’ला अग्रलेखांना एक नवा आगखाऊ विषय मिळाला असता. पण ह्यापैकी काहीच घडले नाही.
ह्या ’अभिजात भाषा’ प्रकरणात काही जीव असता तर त्याच्या मागे काही सुस्पष्ट कायदा, नियमावलि, अंदाजपत्रकी तरतूद, तिचा वापर कसा करायचा ह्याविषयी काही मार्गदर्शक सूचना इत्यादि बाबी कोठेतरी दिसल्या असत्या. पण त्यातील काहीच दिसत नाही. दिसते ते नरकेंसारख्या उद्योगी लोकांना गेल्या एकदीड वर्षात लागलेला ह्या बाबीचा शोध! म्हणून मला अशी दाट शंका आहे की एका विस्तृत अजेंडयाचा हा भाग दिसतो. हे माझे म्हणणे बरोबर असेल तर ह्या ’प्रश्ना’ची इतक्या गंभीर प्रकारची चर्चा करण्याचे मला कारण दिसत नाही.
हम्म!
याबाबत शंका नव्हती आणि नाही पण पाश्चात्यांप्रमाणेच आमच्या इतिहासाला, साहित्याला दर्जा प्राप्त झाला पाहिजे या एतद्देशीयांच्या उर्मीतून सूचनापत्रके काढून दर्जा बहाल करण्याच्या प्रक्रियेस (भले ती बाष्कळ वाटली) रोखता येईल असे वाटत नाही. अस्मितेची वगैरे झालर लावल्यास आणखीच बरे. लोकप्रतिनिधींनाही काहीतरी करून दाखवल्याचे श्रेय हवे असते आणि लोकांनाही काहीतरी मिळवल्याचे समाधान हवे असते. कन्नड, तेलुगु वगैरेंनी सुरुवात झाली आहे, मराठी पाऊल मागे राहता कामा नये अशी भूमिका घेणे आणि स्वतःचा फायदा साधणे शक्य असावे.
प्रश्न असा आहे की अशाप्रकारच्या मोहिमा राबवल्या गेल्याने हा प्रकार आज नाही पण उद्या रक्ताचे पाट वाहवू शकतो का? तर तशी शंका घेण्यास जागा वाटते. ४ भाषांना दर्जा देऊन झाला आहे. बंगाली, मराठी आणि इतर भाषांनाही तो द्यावा अशाप्रकारचा प्रॉपोगंडा होत राहिला तर सामनात लवकरच लेख येऊही शकेल. असो. या जरतरच्या गोष्टी.
'द हिंदू'तील बातमी म्हणते -
पुण्यातील या संस्थेचा भाषा विषयाशी फारसा संबंध दिसला नाही किंवा त्यांच्या संकेतस्थळावर तशी घोषणा/ बातमी नजरेस पडली नाही. चू.भू.द्या. घ्या. यावरून त्यांना निधी वगैरे मिळालेला नसावा (किंवा ही ती संस्थाच नसावी) असे दिसते.
मुळातच २००४ साली तमिळ भाषेपासून सुरुवात करणे हे एखाद्याला खूश करण्याचे राजकारण करायची गरज नव्हती. तिला दर्जा दिला, आता आमचीलाही द्या हा हट्ट कधीनाकधी होणारच.
असे वाटते आहे खरे.
--------
तरीही, या दाक्षिणात्य भाषांना अभिजातचा दर्जा (उदा. तमिळ) मिळाला त्या भाषा कोणत्या काळातील हा प्रश्न सुटला नाही. (अर्थात, तो कोल्हटकरांच्या प्रतिसादातून सुटावा अशी अपेक्षा नव्हतीच.)
मराठीची हलाखी दूर होणार आहे काय?
मराठी भाषा अभिजात म्हणून उद्या समजा घोषित झाली तर तिची हलाखी दूर होणार आहे का? अस्मिता, मराठी भाषा, मराठी अभिमान हे एक फार मोठे दुकान झाले आहे. मराठी टी-शर्ट, मराठी कार्डे, मराठीतून हे, मराठीतून ते. आधी आजूनकोणमी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे मराठीतून शिक्षणाची सोय करायला होवी. अधिकाधिक ज्ञानग्रंथ मराठीतून यायला हवेत. एकीकडे हा फालतू अभिजातपणाचा हव्यास करायचा आणि दुसरीकडे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धाडायचे. असो. ह्या राजकीय किंवा भावनेला हात घालणाऱ्या मुद्द्यांतून काही फारसे मिळणार नाही असे वाटते. असो.
आता मराठीचे वय1500-2000 वर्षे दाखवताही येईल. पण साहित्याचे काय? संगम साहित्याच्या तोडीचे साहित्य आहे का मराठीत? आणि ते अगदी मराठीच आहे असे म्हणता येईल का? असो. तज्ज्ञ मॅनेज करतीलच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"