इ-चरखा

नमस्कार मंडळी,
सदर विषयावर लेख लिहावा कि चर्चा करावी हेच ठरत नव्हते. पण म्हटले चर्चाच करावी. सध्या एखादे कमी खर्चातले आणि दैनंदिन गरजेचे उत्पादन म्हटले की ते हमखास चीनमधुन आयात केलेले असते. उदाहरणच द्यायचे झाले तर डास मारायच्या रॅकेटस्. असो, चर्चेचा मुद्दा तो नाहीच.
R.S. Hiremath Flexitron
लहानपणी आपल्यातल्या अनेकांनी सायकलवर लावलेला दिवा पाहिला असेल. सायकलच्या मागच्या चाकाला लावलेला डायनामो वीज तयार करतो आणि दिवा लागतो हे आपण सर्वजण जाणतो. तसेच चरखा आपल्याला गांधीजींमुळे माहित आहे. पण या दोन्हीचा संगम केला तर? हिच चर्चा आम्ही करत होतो. त्याच वेळी आम्हाला उत्तर मिळाले. हाच प्रश्न बंगलुरुच्या आर. एस. हिरेमठ यांना वयाच्या नवव्या वर्षी पडला आणि त्याचे उत्तर त्यांनी ३० वर्षांनी प्रायोगिक आणि व्यावसायिकरित्या मिळवले. सविस्तर माहिती येथे मिळेल. मोकळ्या हातांना काम आणि त्यासोबत एक दिवा अथव रेडिओ चालु शकेल इतकी विद्युत निर्मिती हे या चरख्याचे वैशिष्ठ्य. मला तर बुवा खुप आवडले. पण या कल्पना आपल्या इथे सत्यात येताना फारशा दिसत नाहीत. याचे कारण काय असावे? हे उत्पादन तसे जुने आहे. पण आपल्याला इतके दिवस का माहित नव्हते. भारतात अशा अनेक गरजा आहेत ज्या डोळ्यासमोर ठेवुन अनेक उत्पादने तयार करता येतील आणि व्यावसायिक उत्पादन सुद्धा बनवता येईल. आपल्याकडे अशा काही कल्पना आहेत का? असल्यास त्या सत्यात आणण्याकरिता आपल्याला काय मदत लागेल? अशी उत्पादने बाजारात आल्यास भारतीय उत्पादन म्हणून आपण त्याला प्राधान्य द्याल का?

सध्यातरी मी येथे श्री हिरेमठ यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
संदर्भः श्री. आर. एस. हिरेमठ आणि त्यांची फ्लेक्सट्रॉनिक्स कंपनी.

E-Charkha
E-Charkha

Comments

खप किती?

अशाप्रकारची नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपक्रमावर सातत्याने हवी.

लेख वाचून या उपकरणाचा खप किती असा प्रश्न पडला. तुम्ही दिलेल्या दुव्यात त्याचे उत्तर मिळाले पण दुवा सध्या वरवर वाचला. नंतर वाचून अधिक प्रतिसाद देते.

उत्तम पण...

प्रयोग उत्तम आहे, पण व्यवहार्य वाटत नाही, हिरेमठ ह्यांनी ९ व्या वर्षापासूनचे स्वप्न साकारण्यासाठी चरखा बनविला की त्याची उपयोगिता लक्षात घेउन बनविला हे जाणून घेणे गरजेचे ठरेल, काही प्रश्न उभे रहातात जसे कातलेल्या सुताचे काय करावे? भारीत बॅटरीवर फक्त एक बल्ब किंवा रेडिओ चालणार असल्यास ते वापरणार वर्ग कोणता? त्या वर्गाला हा चरखा परवडेल काय? अर्थात प्रश्न नाउमेद करण्यासाठी विचारले नाहीत पण उपयुक्ततेबाबत अशी उपकरणे कायमच कमी असतात असे वाटते.

अशा भारतीय संदर्भात हा प्रयोग पण उत्तमच आहे, पण त्याची व्यवहार्य राबवणूक शक्य कशी होईल/होईल काय असे वाटते.

तसे पहाता, १००% टक्के उपयुक्त नसली तरी डास मारणारी रॅकेट डास मारायचे काम करते हे खरेच आहे.

पण व्यवहार्य भारतीय उत्पादन मिळाल्यास त्याला प्राधान्य मिळेलच असे वाटते, न मिळण्यासाठी काही कारण लक्षात येत नाही.

चांगली ओळख

उत्पादन उपयुक्त आहे असे वाटते. बेसिकली हाताने जेवढे कार्य (वर्क) होऊ शकते त्यापैकी थोडेच चरख्यासाठी लागते. उरलेले कार्य वीजनिर्मितीसाठी वापरले जाते.

एल ई डी किंवा रेडिओ चालतो असे म्हटले आहे याचा अर्थ फारच थोडी वीजनिर्मिती होऊ शकते असे दिसते.

कारण
हाताने लावलेली ऊर्जा = चरख्यासाठी वापरलेली ऊर्जा + वीज निर्मितीसाठी लावलेली ऊर्जा हे समीकरण उल्लंघता येणारच नाही.

चरख्याऐवजी अधिक उपयुक्त काम केले जाऊ शलेल का हे पहायला हवे. (पंप चालवणे)

अवांतर : कष्टकर्‍यांच्या ऊर्जेतून वीजनिर्मिती करण्याऐवजी सुखवस्तूंच्या व्यायामातून वीजनिर्मिती करायला हवी. ट्रेडमिलवर व्यायाम करण्या ऐवजी डायनामो फिरवणे किंवा व्यायामाच्या सायकलला जो डायनामो असतो त्यात निर्माण होणारी वीज साठवायला पाहिजे.

नितिन थत्ते

+१

एल.इ.डी.पुरती म्हणजे बरीच कमी वाटते आहे.

अवांतराशी विशेष सहमती

-मिहिर कुलकर्णी

सहमत

उपक्रमाला साजेशी ओळख केली आहे.

पण चरख्याचा ह्यासाठी वापर हा तितका किफायतशीर वाटला नाही.
कारण रेडियो किंवा एल ई डी चालवायला खूपच कमी उर्जा लागती.
बाजारात असे हँडलवाले मॅन्युअल रेडियो चिक्कार उपलब्ध आहेत. हँडल फिरवले की रेडियो, छोटी विजेरी आणि फोन चार्जर अश्या कामांसाठी उर्जा मिळते. अतिशय सुटसुटीत उपकरण आहे.

असहमत

दीड हजारात केवळ डायनॅमो, बॅटरी सेल आणि दिवे म्हणजे निर्मितीमूल्याच्या तुलनेत खूपच महाग आहे. उपयुक्ततासुद्धा नाही. हल्ली कोणी चरख्यावर उदरनिर्वाह करते काय? जे करतील त्यांना ही किंमत परवडणार नाही. रोज एक तास चरख्यावर बसून सूत कातणार्‍या गांधीवाद्यांच्या घरी दिवे असतीलच (एसीही असू शकेल). चरख्यासाठी उपकरण निरुपयोगी आहे.
----
तासभर ट्रेडमिलवर चालून साधारण ३५० कॅलरी जळतात. म्हणजे, महिन्याला केवळ दहा युनिट वीज! त्यासाठीसुद्धा डायनॅमो आणि बॅटरीची गुंतवणूक आतबट्ट्याची ठरेल.

"Formally launched by President Pratibha Devisingh Patil" हे वाचून अजूनच निराशा झाली.

कॅलरी

>>तासभर ट्रेडमिलवर चालून साधारण ३५० कॅलरी जळतात. म्हणजे, महिन्याला केवळ दहा युनिट वीज! त्यासाठीसुद्धा डायनॅमो आणि बॅटरीची गुंतवणूक आतबट्ट्याची ठरेल.

??
ट्रेडमिल वर चालल्यावर शरीरातल्या ३५० कॅलरी जळतात. परंतु त्याखेरीज ट्रेडमिलचा पट्टा तासभर चालवण्यासाठी बाह्य कॅलरीज मात्र भरपूर जळतात. (चूभूदेघे) त्या वाचतील आणि थोडी वीज निर्मिती होईल. :-) ट्रेडमिलच्या किंमतीपेक्षा बर्‍याच कमी किंमतीला होऊन जाईल.

नितिन थत्ते

ट्रेडमिल

ट्रेडमिलवर ३५० कॅलरी जाळायला किती वीज लागते? सध्या हा चरखा मी स्वतः चालवुन पाहिला नाही. त्यामुळे उपयुक्तता वगैरे या सर्वा बद्दल मी टिप्पणी करु शकत नाही. हा मला केलेल्या प्रयोगाचे कौतुक मात्र आहे.

मुद्दा हा आहे की

भारतात अशा अनेक गरजा आहेत ज्या डोळ्यासमोर ठेवुन अनेक उत्पादने तयार करता येतील आणि व्यावसायिक उत्पादन सुद्धा बनवता येईल. आपल्याकडे अशा काही कल्पना आहेत का? असल्यास त्या सत्यात आणण्याकरिता आपल्याला काय मदत लागेल? अशी उत्पादने बाजारात आल्यास भारतीय उत्पादन म्हणून आपण त्याला प्राधान्य द्याल का?

D.Light
D.Light

मी हे उत्पादन वापरतो. भारत आणि आफ्रिका ही यांची मुख्य बाजारपेठ आहे. हेच उत्पादन भारतीय असते तर मला जास्त आनंद झाला असता.






हे पहा

हे पहा. उत्पादने उपलब्ध आहेत, वापरणारे वापरत देखिल आहेत.

अरे वा

माहिती बद्दल धन्यवाद. माहिती मागितल्यास माझीच माहिती जास्त मागितली जाते आहे. :)





इ-चरखा

नमस्कार!
>हेच उत्पादन भारतीय असते तर मला जास्त आनंद झाला असता.
पुढे दिलेल्या संकेतस्थळावर पाहिलेत तर आपणाला आनंद होईलच. येथे दाखवलेले दिवे सोलर पॅनेल वर चालू शकतात. त्याच्या सुधारित आवृत्ती सध्या काही गृहरचना संस्थाही वापरीत आहेत.
धन्यवाद.
--प्रसाद मेहेंदळे

http://www.babavakyam.com/htmls/deepthelamp.html

हिरेमठ

मी स्वतः हिरेमठ यांना फोन करुन काही मिनिटे बोललो. आवज खुप उत्साही होता. तसेच हा चरखा सध्या एल ई डी साठीची उर्जा उत्पन्न करतो आहे. पण भविष्यात कदाचित जास्त चांगला उपयोग दिसेल सुद्धा. जमल्यास हे उत्पादन प्रत्यक्ष पहायचा मानस आहेच. बाकी थत्ते म्हणतात त्या प्रमाणे सर्व प्रकारच्या/थरातल्या वाया जाणार्‍या उर्जा योग्य प्रकारे मॅनेज झाल्यास अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा जास्त चांगला अभ्यास आणि वापर होईल. चरखा ही त्याची एक चांगली सुरुवात म्हणता येईल. सुताचे काय करावे हा प्रश्न ते निर्माण करणारेच सोडवतील नाही का? शेतकरी शेती सोबत दुग्ध व्यवसाय करु लागले तसेच काहीसे..






स्तुत्य हेतु

या परिचयावरून तरी हा स्तुत्य हेतु असणारा बर्‍यापैकी निरूपयोगी प्रयोग वाटला!

------------------
ऋषिकेश
------------------

चांगला धागा

चांगला धागा. थत्त्यांशी बऱ्यापैकी सहमत.

बाकी भारतीय उत्पादनावर भर कशाला? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रात अनेक देशांतले लोक एकत्र येऊन काम करतात. "सायन्स इज ऍन इन्टरनॅशनल एन्टरप्राइज़" असे म्हटले जाते. तिथे असा विचार करून चालत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर