नम्र विनंती

माझ्या सगळ्या हितचिंतकांना गंभीरपणे वाटतंय की मी फेसबुकवर / वेबसाइट्सवर टाइमपास करतेय. त्यापेक्षा मी निमूटपणे पुढची कादंबरी लिहिण्यावर लक्ष केंद्रित करावं.
पण मला एकूण लेखनव्यवहार, प्रकाशनव्यवहार या गोष्टींचा अक्षरशः उबग आलाय. मनापासून लिहावं वाटावं असं वातावरणच नाही. नुसतं मळभ आलेलंय. साधे संदर्भग्रंथ उपलब्ध होत नाहीत. रॉयल्टीतून लेखनाचा खर्च देखील निघत नाही. प्रकाशक उदासीन आहेत. मलाही आता पूर्वीइतके कष्ट करावे वाटत नाहीत; किमान काही गोष्टी तरी अनुकूल असाव्यात असे वाटते.
नाही म्हणायला वाचकांचा प्रतिसाद भरपूर असतो. पण पडद्याआडच्या गोष्टी ते बापडे कुठे जाणतात?
यापुढे पुस्तकं छापण्याच्या भानगडीत न पडता कवितांप्रमाणेच कथा-कादंबर्‍या-लेख देखील इंटरनेटवरच लिहावेत असं वाटतंय...............
किंवा कुठेच काही लिहूच नये! तर उद्यापासून सगळं बंद करावं आणि मुकाट्याने रोजीरोटी कमावण्यासाठी काहीतरी कारकुनी करावी, हेच उत्तम! या भाषेत लिहिण्याची, पूर्ण वेळ लेखक म्हणून जगण्याची माझी लायकी नाही, हेच खरं.

कृपया यावर मस्करी, विनोद करू नयेत. काही गंभीर मांडायचे असेल तरच लिहावे ही नम्र विनंती.

लेखनविषय: दुवे:

Comments

माझे मत

उपक्रमावरील प्रत्येक सदस्य काही प्रथितयश लेखक वगैरे नाही. एक साधा वाचक, प्रतिसादक म्हणून माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून असे वाटते की ही फेज अधूनमधून किंवा केंव्हातरी येत असते. फक्त वारंवारिता कमीअधिक होत असावी. असो. नेटवर फार वेळ वाया जातो हे खरे आहे हो. पण असो. काही चांगल्या गोष्टीही आहेत. पण लेखन होत नाही हे कारण असल्यास नेटव्यवहारात फार वेळ 'घालवू' नये हे उत्तमच. तरीही जे नेटव्यवहारात वेळ 'घालवत' नाहीत ते लेखक वगैरे काय भारे बांधतात हेदेखील बघायला हवे. (एकादृष्टीने पुस्तके कागदावर छापून वृक्षतोडीस हातभार लावण्याऐवजी नेटावर साहित्य प्रकाशित करणे अधिक बरे. बापरे एकट्या 'हिंदू'पायी किती वृक्षतोड झाली असेल.) असो. हेही दिवस जातील.

दुसरे म्हणजे लेखनव्यवहार किंवा प्रकाशनव्यवहार. सहसा निर्मितीची प्रक्रिया आनंददायी असते असा समज आहे. पण मी मराठीतले जेवढे प्रकाशक आणि प्रकाशनसंस्था आणि त्यांचे व्यवहार बघितले आहेत त्यावरून प्रकाशनव्यवहार मात्र अतिशय उबग आणणारा आहे, ह्याबाबत संपूर्णपणे सहमत आहे. बहुतेक मोठे प्रकाशक सोडल्यास प्रकाशक अगदी चवन्नीछाप धंदा करतात.1 प्राध्यापकांची आणि निवृत्त झालेल्या किंवा निवृत्तीस आलेल्या ताईबाईअक्कांची आणि अण्णांची पुस्तके, कथासंग्रह, कवितासंग्रह पैसे घेऊन प्रकाशित करून ते पैसे कमवीत असतात. असो.

मराठी भाषेपेक्षा इंग्रजीत स्थिती बरी आहे का हो? म्हणूनच किरण नगरकर मराठी सोडून इंग्रजीत लिहू लागले.

असो. चूभूद्याघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

टेक अ ब्रेक!

विषय मस्करी करण्याजोगा वाटला नाही. विचार करता चर्चेसाठी योग्य मुद्दे मिळतील.

माझ्या सगळ्या हितचिंतकांना गंभीरपणे वाटतंय की मी फेसबुकवर / वेबसाइट्सवर टाइमपास करतेय. त्यापेक्षा मी निमूटपणे पुढची कादंबरी लिहिण्यावर लक्ष केंद्रित करावं.
पण मला एकूण लेखनव्यवहार, प्रकाशनव्यवहार या गोष्टींचा अक्षरशः उबग आलाय. मनापासून लिहावं वाटावं असं वातावरणच नाही. नुसतं मळभ आलेलंय. साधे संदर्भग्रंथ उपलब्ध होत नाहीत. रॉयल्टीतून लेखनाचा खर्च देखील निघत नाही. प्रकाशक उदासीन आहेत. मलाही आता पूर्वीइतके कष्ट करावे वाटत नाहीत; किमान काही गोष्टी तरी अनुकूल असाव्यात असे वाटते.
नाही म्हणायला वाचकांचा प्रतिसाद भरपूर असतो. पण पडद्याआडच्या गोष्टी ते बापडे कुठे जाणतात?

बरोबर आहे. धाटणीतल्या गोष्टींचा उबग प्रत्येकाला येतो पण जर तुमचे हितचिंतक तुम्हाला फेबु आणि साइट्सवर टाइमपास करू नका असे सांगत असतील तर त्यामागे काही कारण असेल. कदाचित, आपली आवडती लेखिका इथे वेळ वाया घालवते असे मनापासून त्यांना वाटत असेल.

इंटरनेटचं माध्यम इतकं स्वस्त झालं आहे की कोणीही उठून कोणालाही सल्ले द्यावेत, कोणीही कोणाचे अपमान करावे किंवा आरोप करावे. अशा वातावरणात तुम्हाला लेख टाकून इंस्टंट ग्रॅटिफिकेशनही मिळेल, निंदाही पदरी पडेल आणि खर्च निघणार नाही हे तर आलेच.

---------

तुम्हाला जर ब्रेक हवा असेल तर लेखनापासून (इंटरनेट किंवा छापील) काही काळ दूर राहून बघा. दुसर्‍या कशात तरी मन रमवा.

----------

हा सल्ला तुम्हाला दिल्याने तुमचे चाहते माझ्यावर वैतागणार नाहीत अशी आशा करते.

सहमत

सहमत, इट्स अ फेज, इट विल पास.

अहो माणूस म्हणलं की उजवं-डावं चालायचचं, शेक्सपिअरला पण कंटाळा आलाच असेल की कधी.

सहमत आहे

रॉयल्टीतुन लेखनाचा खर्चही निघत नाही ही खरेच दुर्दैवाची बाब आहे. बाकिचे त्रास सहन करायलाही एकवेळ हरकत नाही पण त्यातुन खर्च निघण्या इतपत देखिल मोबदला मिळत नसल्यास अशी मरगळ येणे स्वाभाविक आहे.

कठिण प्रकार आहे

मागच्या पिढीतील प्रथितयश मराठी कवी उदरनिर्वाहाकरिता नोकरी करत. बहुधा प्राध्यापकी. कादंबरीलेखकांवरही अशी वेळ यावी?

बाप रे!

तुमच्या सारख्या प्रथितयश लोकांचा अनुभव असा आहे तर होतकरु लेखकांचे कसे होत असेल? तुमच्या ह्या लेखना वरुन मला साइडवेज ह्या हॉलिवडपटातील हताश लेखकाची आठवण झाली. तुमच्याशी त्याचे साधर्म्य नाही पण नैराश्याचा सुर ओळखीचा वाटला.

त्यातला हा उध्रुत केलेले हे वाक्य अगदी अंगावर येते: "I'am thumbprint on the window of a skyscraper. I'm a smudge of excrement on a tissue surging out to sea with a million tons of raw sewage." अशी भावना सर्वांचीच कधी कधी होत असावी. माझी तरी होते.

अवांतर : मध्यंतरी काही नवकवी त्यांच्या कवितांचे अल्बम वगैरे जोरात काढायचे पण एका अल्बम नंतर काहीच ऐकू येत नाही म्हणजे पहिला अल्बमंच दिवाळं काढत असणार.

अल्बम

हल्ली पुस्तकांची जागा बऱ्यापैकी अल्बमांनी घेतलेली दिसते. काही कवी काव्यसंग्रहाच्या भानगडीत न पडता थेट अल्बमच काढतात. असो. हा दृकश्राव्य धुडगुसाचा जमाना आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर