तर्कक्रीडा २३:प्रगत शेतकरी

......प्रा. पायगुणे एकदा एस्.टी. गाडीने प्रवास करीत होते.त्यांच्या शेजारी एक खेडूत बसला होता."सहप्रवाशाशी संवाद साधावा" या तत्त्वानुसार प्रा. नी त्याला नाव,गाव विचारले.आपली ओळख करून देताना आपण गणिताचे प्रा. आहोत, असे सांगून त्यांनी प्रश्न केला,
"वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात?"
"पाय म्हणतात." सहप्रवाशाने उत्तर दिले.
"अरे वा!अचूक. छान.या पायची बावीस सप्तमांश ही किंमत केवळ दोन दशांश स्थळां पर्यंतच ठीक आहे. पायची बत्तीस दशांश स्थळांपर्यंतची अचूक किंमत मला तोंडपाठ आहे." गणिताच्या प्रा. पर्यंत 'पाचपोच' हा शब्द पोचलाच नव्हता.
.....यावर खेडूत म्हणाला,
" सर, मी आपल्याला एक कोडे घालतो:
......आमच्या गावची एक शेतकरी माय
........तिने पाळली आहे एक गाय
........गोठ्यात बसून ती धार काढत हाय
......तर तिथं किती असतील पाय?"

थोडा वेळ विचार करून प्रा. म्हणाले,"सहा.गाईचे चार, माईचे दोन."
"चूक. तुम्ही दहा पाय असे सांगीतले असते तर तुम्हाला नव्वद टक्के गुण मिळाले असते. खरे तर तिथे तेरा पाय आहेत."
"तेरा? ही तर विषम संख्या आहे."
"शिवाय ती मूळ संख्या आहे हेही मला माहीत आहे.दहावी पर्यंत शिकलो आहे मी."
तर या दहा आणि तेरा पायांचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आपण देऊ शकाल काय?( हे तसे तार्किक अथवा गणिती कोडे नाही.)..........यनावाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

पायावर...

... लोळण घ्यायची पाळी आली आहे.

अवांतर

(ता.क. यनावाला, आपल्या नऊ अंकांच्या कोड्याचा आज पहिल्यांदा मुलाखतीत उपयोग केला. आवडले. उपयुक्त आहे.)

युयुत्सु - हे कोडे यनावालांकडून साभार असा खुलासा आपण मुलाखतीअंती केला की नाही?

(प्रताधिकाराधिकारी प्रतिहारी) एकलव्य

हे सामान्यज्ञान कोडे नाही ना?

यनासाहेब, मती गुंग!

गाय दुभती आहे म्हणजे तिचे वासरू आहे - ते चार पाय.
माई म्हातारी आहे. ती काठी घेऊन चालते - तो एक पाय.
ती तिपाई वर् बसली आहे - ते तीन पाय.
असले काही नाही ना? नसेलच. पण स्पष्ट करावे.
तरीही विचार सुरू आहे.

दुभती गाय

म्हणजे वासरू हवेच. हे लक्षात आलेच नाही. मी काहीतरी भन्नाटच उत्तर पाठवले आहे. :)))

पायावर लोळण घ्यायची पाळी आली

सहमत.

दहा

दहा पाय सहज सापडतात, आणखी तीन कुठे शोधावे!

स्टूल/खूर्ची?

गायीचे दूध काढणारी माय ३ पायांच्या स्टूलावर बसली आहे का?येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

माय आणि लेकरू!

माय म्हटले की लेकरू असणारच!

हे घ्या उत्तर ?

यनावाला साहेब,
कोडी वाचायचो तेच चांगले होते.

माई चे दोन,गायीचे चार+एक( अधिक एक फूटलेला)आणि वासरूचे चार,तरी अकराच.

उत्तर मात्र जाहिररित्या सांगावे,ही नम्र विनंती.

गाय,अन वासरु दिसले,की प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,मनातल्या मनात,त्यांचे पाय मोजतात.

२२ आणि ७ शी ...

.. संबंध असावा!

तर्क.२३:प्रगत शेतकरी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
खरे तर निश्चित असे एकमेव उत्तर काढण्यासाठी पुरेशी माहिती कोड्यात नाही.इथे तर्क चालवायचा म्हणजे कल्पना करायच्या.
......गाईचे दोहन करण्यासाठी तिला पान्हा फुटावा लागतो.या साठी तिथे वासरू असावे लागते. गाय वासराला चाटूलागते तेव्हाच तिला पान्हा फुटतो.हे आपल्या देशी कपिले बद्दल तरी खरे आहे. कारण ते दोहन मी लहानपणी पाहिले आहे.( संकरित गाईंना समोर आंबोण ठेवले तरी पान्हा फुटत असेल कदाचित.) "तिने पाळली आहे एक देशी गाय" असे कोड्यात लिहायला हवे होते. त्या वासराचे चार पाय.
.....शेतकरी प्रगत आहे.त्याला पाय् , विषम संख्या, मूळ संख्या या संज्ञा माहीत आहेत. त्याचे गावही प्रगत असणार. माय गोठ्यत बसून दूध काढीत आहे. तेव्हा ती तीन पायांच्या स्टुलावर बसली असण्याची शक्यता अधिक आहे.त्याचे तीन पाय.असे तेरा. खरे तर हे तसे कोडे नव्हेच. उगीच पाय् वर काही कोटी करायची म्हणून लिहिले. विसुनाना, अत्त्यानंद, डॉ.बिरुटे यानी तिवईची कल्पना मांडलीच आहे.

१ २ अ ब ३

"अ" आणि "ब" ओळखा? या कोड्याची आठवण झाली.

अ = साडे आणि ब = काडे

एकलव्य

हे कशावरून???

वासरू गोठ्यात असताना देशी गाई पण दूध देत नाहीत.

अहो पण गायीचे दूध माय काढत होती हे कशावरून?? आणि वासरू आजूबाजूला हुंदडत नव्हते कशावरून??

गोठ्यात बसून ती धार काढत हाय

मला वाटलं की माय गोठ्यात बसून चाकू सुरीला धार काढत होती. ;-) आता धार लावण्याचे जे चाकवाले यंत्र असते त्याचे पाय चार असे मला वाटले. (असा कल्पनाविलास का सुचावा याबाबत मात्र फारसा तर्क चालवता येत नाही.)

सर्वांनी ह. घ्या

झक्कास!

मला वाटलं की माय गोठ्यात बसून चाकू सुरीला धार काढत होती. हे म्हणजे एकदम झक्कास बरं का!
कोणत्याही जाहिरात संस्थेत आपण कामाला जायला हरकत नाही... उत्तम क्रिएटिव्हिटी आहे.
आपला
गुंडोपंत

स्वागत.

मला वाटलं की माय गोठ्यात बसून चाकू सुरीला धार काढत होती. ;-)

माहितीच्या आदान-प्रदानाच्या संकेतस्थळावर अशा नव-नवीन कल्पनाविलासाचे आम्ही स्वागत करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोदोहन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
दूध काढताना गाईच्या पुढ्यात वासरू बांधलेले असते.गाय वासराला चाटते आणि इकडे दोहन चालते. हे मी प्रत्यक्ष पाहिलेच आहे. पूर्वी आमच्या गावी आमचा गोठा होता.गाई होत्या. माझी आई दूध काढत असे. ते झाल्यावर वासरू सोडले की ते गाईच्या ओटीला ढुशा मारीत दूध पीत असे. हे मी नेहमीच पहात असे.
.......यनावाला.

गाय, वासरू आणि कासंडी...

काल एका दूरचित्रवाहिनीवर (टि.व्ही. चॅनलवर) "आपलं घर" या अनाथाश्रमाची माहिती देताना एक छायाचित्र दाखवले. त्यात तर गाईच्या (त्यातही जर्सी) एका आचळाला वासरू पीत आहे आणि दुसर्‍या आचळातून दोहन करताना मुलाच्या कासंडीत दुधाची धार पडत आहे हेही मी चक्षुर्वैसत्यम पाहिले आहे. आता बोला!
याही पेक्षा महत्वाचे : "आपलं घर" बद्दल सामाजिक उपक्रम या सदरात पुण्याच्या कोणी सदस्यांनी माहिती दिली तर चांगले होईल.

गाय आणि वासरू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गाईला पान्हा फुटतो तो वासरासाठी.ज्ञानेश्वरीत म्हटले आहे:
............ वत्साचेनि वोरसे | दुभते होय घरोद्देशे|
.............जाहले पांडवाचेनि मिषे| जगदुद्धरण ||
वासरासाठी पान्हा(वोरस) फुटतो त्या निमित्ताने घरात दुध दुभते होते.त्याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नाच्या निमित्ताने सांगितलेल्या गीतेमुळे जगाचा उद्धार झाला.

वा!

संदर्भ उत्तम आहे. बोलता-बोलता वेगळाच विषय निघावा, आणि तरीही त्यातून मनोरंजक माहिती मिळावी तशी ही उप-चर्चा वाचून वाटले.

अवांतर टीप - समास कसा सोडावा

एखादा श्लोक, ओवी किंवा कोणतेही उद्धरण जर इतर मजकुरापेक्षा वेगळे दिसावे असे वाटत असेल तर नेमका तेवढाच मजकूर निवडून (सिलेक्ट करून) खिडकीच्या वर असलेल्या (Indent) या चित्रावर टिचकी मारावी. त्यामुळे अश्या मजकुराच्या आधी <div style="margin-left: 40px;"> असे आणि मजकुरानंतर </div> असे उमटते आणि मजकूर प्रत्यक्ष दिसताना उजवीकडे सरकलेला दिसतो. जसे,

वत्साचेनि वोरसे | दुभते होय घरोद्देशे|
जाहले पांडवाचेनि मिषे| जगदुद्धरण ||

याउहोहीआआ*

*याचा उपयोग होईल ही आशा आहे. HTH=Hope That Helps चे निर्बुद्ध मराठीकरण :)

धन्यवाद!

श्री.शशांक यांनी माझी अडचण बरोबर ओळखली. मला समास सोडायला जमत नाही हे त्यांच्या नेमके लक्षात आले. त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यांचे मनःपूर्वक आभार.

यनावाला

पण उत्तर काय?

तुषार काळभोर

ते ठिक आहे, पण नेमके उत्तर एकदा द्या बुआ!

काही कळत नाही

गाय गोठ्यात बसून धार काढते, ही कल्पना नवीन आहे.

गजिनी बघितल्याचा परिणाम..

प्रगत शेतकरी: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.तुषार आणि श्री.शशी यांस,
उत्तर वर दिलेच आहे. वाचनाच्या सुविधेसाठी ते पुन्हा खाली देत आहे:
***********************************
खरे तर निश्चित असे एकमेव उत्तर काढण्यासाठी पुरेशी माहिती कोड्यात नाही.इथे तर्क चालवायचा म्हणजे कल्पना करायच्या.
......गाईचे दोहन करण्यासाठी तिला पान्हा फुटावा लागतो.या साठी तिथे वासरू असावे लागते. त्या वासराचे चार पाय.
.....शेतकरी प्रगत आहे.त्याला पाय् , विषम संख्या, मूळ संख्या या संज्ञा माहीत आहेत. त्याचे गावही प्रगत असणार. माय गोठ्यात बसून दूध काढीत आहे. तेव्हा ती तीन पायांच्या स्टुलावर बसली असण्याची शक्यता अधिक आहे.त्याचे तीन पाय.असे तेरा.
(माईचे २+गाईचे ४+वासराचे ४ + तिवईचे ३)
खरे तर हे तसे कोडे नव्हेच. उगीच पाय् वर काही कोटी करायची म्हणून लिहिले. विसुनाना, अत्त्यानंद, डॉ.बिरुटे यानी तिवईची कल्पना मांडलीच आहे.

 
^ वर