"प्रयास" वरून आठवलं....

आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853)
विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार.
तसाच लान्स आर्मस्ट्राँगही आठवला. उत्तम सायकलपटू, ऐन उमेदीच्या काळात(१९७१चा जन्म, १९९६ला कॅन्सरचे निदान झालेले) अवघड ठिकाणी कॅन्सर झालेला. त्याच्या उपचारानेही बराच अशक्तपणा येणार असे डॉक्टरांचे मत. म्हणजे सामान्य निरोगी माणसात जितकी शारीरिक ताकद शिल्लक असेल त्यापेक्षाही हा जरासा कमीच असणार. मग शारीरिक श्रमाची परीक्षा पाहणार्‍या , टोकाचे कष्ट लागणार्‍या सायकलिंग सारख्या खेळात प्रावीण्य तर अगदी दूर. अशक्य. काही चमत्कार घडला तरच तो पुन्हा थोडीफार सायकल चालवेल असे वाटलेले. पण खेळावर निःसीम प्रेम आणि असामान्य जिद्द ह्याची शिदोरी गाठीशी. पठ्ठ्याने प्रयत्न चालूच ठेवले आणि बघता बघता काहीच काळात त्याने सायकल हाती घेतली. पुनश्च श्रीगणेशा केला. इथून पुढे त्याने पुन्हा यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खुळेपण ठरेल असेही कित्येकांना वाटले. साल १९९९ उजाडले आणि साहेब "टूर द फ्रान्स" ह्या जगातल्या सर्वात मोठ्या सायकलिंग स्पर्धेत विजेते ठरले!! अरे हो, हे टूर द फ्रान्स म्हणजे काय? साधारण ३२०० किलोमीटर्सची सायकलिंग एकट्याने करायची. स्पर्धा काही आठवडे चालणार!
गंमत पुढेच आहे. १९९९ ते २००५ असे सलग सात वेळा तो हे जिंकला! शेवटी अपराजित म्हणूनच रिटायरही झाला. इतर ठिकाणी त्याची तुलना केवळ सचिन,विश्वनाथन आनंद, कॅस्पराव्,पेले- मॅराडोना ह्यांच्या भीमपराक्रमाशीच होऊ शकते.
आजवर ही स्पर्धा त्याच्याशिवाय कुणीही इतक्या वेळेस जिंकलेली नाही. इतर काही जणांनी ५ वेळेस जिंकलेली आहे.
प्रतिकूल परिस्थितीने त्याच्यापुढे गुडघे टेकले.
.
.
सुधा चंद्रन... बालवयातच एक नर्तिका म्हणून प्रचंड लौकिक झालेला. पुढे जाऊन खरोखर फार मोठी जागतिक जागतिक कीर्तीची नर्तिका होणार असा सगळ्यांना विश्वास. ऐन वयाच्या विशीतच ह्या नर्तिकेच्या पायाला कुठल्याशा उपचारादरम्यान गँगरिन असल्याचं सापडलं. गँगरिन म्हणजे जखमी शरीर सडू लागणे. तो भाग काढला नाही तर हळूहळू संपूर्ण शरीर सडत जाऊन मरते. महाभारतात आधी मांडी फुटली, गँगरिन झाला आणि मग हलाखीने,वेदनेने दुर्योधन मेला, तसाच.
पाय गेले स्वप्नं पंगू होत नाहीत. आवडील, ध्यासाला,वेडाला उडायला शरीरापेक्षाही वेगळीच मानसिक घडण हवी असते. ती असेल तर शरीर दुय्यम ठरू शकते. प्राप्त परिस्थितीतही पुढे जाऊया अशी आशा धरून तुटलेल्या पायाच्या ठिकाणी लाकडी जयपूर फूट लावून तिने पुन्हा ठेका धरला. पुन्हा एकदा संगीत अंगात भिनू लागले. त्याही स्थितीत अत्युत्तम अशी कला सादर करणार्‍या सुधाची देश विदेशात इतकी ख्याती पसरली विविध खंडांत तिला आमंत्रणे आली. युरोप, अमेरिका इथेही तिचे प्रयोग झाले. "पाय तुटला" असे फार काळ वाटून न घेता "अजूनही बरेच शरीर शिल्लक आहे. ह्यायोगे मी संगीताचा आनंद घेऊ शकते. ह्या शिल्लक शरीराला त्या ताला झोकून अजूनही जो शरिरापलीकडील आनंद मिळवायचाय तो मिळवता येईलच की." असं वाटणं हीच तिच्या दुसर्‍या इनिंगची नवसंजीवनी तर नसेल?
.
.
शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं लहानपणापासूनच आकर्षण असणारा एक चिमुरडा. चार चौघात त्याची तारीफ होते गाण्याबद्दल आणि ऐन मोठा झाल्यावर तारुण्याच्या मध्यात क्षयरोग झाल्यानं थेट फुफ्फुसांवर हल्ला होऊन त्या काळात नवीनच शोधल्या गेलेल्या क्षयाच्या उपचारांमुळे त्याचा जीव तर वाचतो., पण फुफ्फुसांवर कायमचा मोठा आघात झालेला. लांब, पल्लेदार चालणार्‍या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत जाण्याचं स्वप्न पार धुळीला मिळालं. सगळ्या आशा संपल्या. आता तर ह्या गायकाला फार "चलता है" ह्या क्याटेगरीत पोचण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार इतका आजाराचा परिणाम वाटलेला. आता काही नाही असच वाटू लागलं.
वाटू लागलं,.... पण कुणाला? इतरांनाच! स्वतः त्या गायकाच्या गावीही हे दु:ख नसावे. "गायला आवडते. मी गाणार. आजारी पडलो तर अंथरुणावर संगीताचा ध्यास घेणार. फुफ्फुसं कमी ताकतीची झाली तर आहे त्या ताकतीनं गाणार. एक फुफ्फुस बंद पडलं तर दुसर्‍यानं होता होईल तेवढं गाणार." असं काहीसं खूळ डोक्यात असेल तर काय होणार?
चार चौघांसारखं मग तो तसं गाऊ शकला नाही. पण म्हणून काय झालं.? त्यानं स्वतःची अशी एक सुरेल पण तुटक्-तुटक वाटेल अशी शैली निर्माण केली! त्या शैलीचा तो स्वतः जनक बनला. अरे हो, त्याचं नाव सांगायचं राहिलं.
--पं कुमार गंधर्व.
.
.
अशी जगभरातली शेकडो उदाहरणं देता येतील. मागे एकदा एका गिरीप्रेमी मिपाकरानं सांगितल्या प्रमाणं एका डोक्यात अस्सल ट्रेकिंगचं वेड चढलेल्या कुणीतरी आपले हातपाय गमावलेले. मग? आता फिटली का हौस जन्माची? जिरली का जिद्द? तर नाही. महाशय ट्रेकिंग करतच आहेत. हात पाय नाहीत, तर नाहीत. ते दाताने दोर व इतर साधने धरत हे करतात.
अजूनही कुठल्याशा महिलेचा किस्सा ऐकलाय. सर्व खंडातील एकूणएक सर्वोच्च शिखरे पालथी घालताना कधीतरी तिने पाय गमावला. त्यानंतर विशेष अतिरिक्त मदतीशिवाय पुन्हा ती ही सर्व शिखरे चढून आली.
आख्ख्या युरोपातली प्रमुख विरोधी राष्ट्रे जिंकल्यानंतर नाझी जर्मनीने १९३९- १९४० मध्ये संपूर्ण केले.एकाकी पडलेल्या ब्रिटनवर केंद्रित केले. अमेरिकाही युद्धात उतरलेली नव्हती. लंडानवर तुफान बॉम्बहल्ले होताना पाहून ब्रिटन नक्कीच गुडघे टेकेल असे कित्येकांना वाटले. पण लंडनने त्यानंतर अत्यंत हिमतीने अचाट असा दिलेला लढा "बॅटल ऑफ ब्रिटन" ह्यानावाने जणू दंतकथा बनून गेला.

पडलेला प्रश्न एकचः- अशा असामान्य समस्या मानवात लपलेल्या असामान्य धैर्याला किंवा कुलूप लावलेल्या एखाद्या गुणसूत्राला क्वचित जागे करते काय?
त्याच घटनेला इतरही तसेच सामोरे गेले असते का? ही जिद्द येते कुठून? मानसशास्त्र काय म्हणते ह्याबद्दल.
तुम्हालाही काही विलक्षण उदाहरण ठाऊक असतील, आठवत असतील तर अवश्य सांगावीत.

टीप :- १.जवळपास सर्वच माहिती गप्पांतून, ऐकण्यातून, कार्यक्रमांतून समजलेली आहे. लिखित स्रोत नाही. शिवाय
कुठल्याही विषयाची नीटशी मांडणी करणे अजूनही शिकतोच आहे. चुभूदेघे.
२.मनोगताचा शुचि वापरूनच चर्चा प्रस्ताव टाकला आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म!

मांडणी थोडी ललित लेखनासारखी वाटली पण चर्चेचा विषय चांगला आहे. प्रश्नांच्या उत्तरांवर विचार अद्याप केलेला नाही.

आर्मस्ट्रॉन्गच्या बाबतीत

आर्मस्ट्रॉन्गची कामगिरी डोपिंगच्या आरोपांमुळे वादग्रस्त आहे. असे असले तरी डोपिंगशिवाय जगण्याची इच्छा, जिद्द ह्या गोष्टीही लागत असतीलच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

यदृच्छा

ह्या असामान्य भासणार्‍या गोष्टी बहूदा यदृच्छेने घडणार्‍या आहेत, प्रतिकुल परिस्थिती अनेकांना अनुभवावी लागते पण प्रत्येकजणच त्यातून वैशिष्ठ्यपुर्ण असे काही करत नाही, पण त्यांचे तसे असणे प्रेरणादायक असते खरे.

मुद्दे...

@प्रियाली:- काही मुद्द्यांची भर घालता आली तर बरे होइल.

@धम्मकलाडू :-
होय. डोपिंगचा मुद्दा आहेच. पण निव्वळ डोपिंगने अशक्त माणूस अचाट काम करेलसे वाटत नाही.
. असे असले तरी डोपिंगशिवाय जगण्याची इच्छा, जिद्द ह्या गोष्टीही लागत असतीलच.
+१

@अजूनकोणमी:-
ह्या असामान्य भासणार्‍या गोष्टी बहूदा यदृच्छेने घडणार्‍या आहेत,

"भासणार्‍या" हा शब्द का वापरला असावा? मी उल्लेख केलेली उदाहरणं असामान्य नाहित असे म्हणायचे आहे काय? आर्मस्ट्राँग नुसता एखाद्या वर्षातला विजेता नाही, तर "ऑल टाइम ग्रेट" मध्ये जाउअन् बसलाय.(डॉन ब्रॅडमन प्रमाणं.)

--मनोबा

दुरुस्ती

>>"भासणार्‍या" हा शब्द का वापरला असावा? मी उल्लेख केलेली उदाहरणं असामान्य नाहित असे म्हणायचे आहे काय? आर्मस्ट्राँग नुसता एखाद्या वर्षातला विजेता नाही, तर "ऑल टाइम ग्रेट" मध्ये जाउअन् बसलाय.(डॉन ब्रॅडमन प्रमाणं.)<<

भासणार्‍या हा शब्द नक्कीच चूकिचा होता, असे वाचावे - ह्या असामान्य गोष्टी बहूदा यदृच्छेने घडणार्‍या आहेत, प्रतिकुल परिस्थिती अनेकांना अनुभवावी लागते पण प्रत्येकजणच त्यातून वैशिष्ठ्यपुर्ण असे काही करत नाही, पण त्यांचे तसे असणे प्रेरणादायक असते.

आर्मस्ट्राँग असामान्य आहेच.

 
^ वर